हमशकल्स - एक मैलाचा दगड

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
15 Jul 2014 - 1:31 pm

हो हो, 'हमशकल्स' हा एक मैलाचा दगडच आहे. 'हमशकल्स'ला नाके मुरडणार्‍या तमाम अभिजनांच्या चित्रपटीय जाणीवांची मला अक्षरशः कीव येते. अहो, असं धाडसच कसं काय करू शकतात ही लोकं? 'हमशकल्स' हा चित्रपट म्हणून उच्च दर्जाचा तर आहेच परंतु माणसाच्या अंतरंगाचा इतका तपशीलात धांडोळा घेणारी, माणसाच्या मनाच्या बहुपेडी जडण-घडणीची नुसतीच दखल घेणारी नव्हे तर इतक्या सुबक पद्धतीने ती जडण-घडण दुनियेसमोर निर्भीडपणे मांडणारी ही कलाकृती अजरामर आहे यात शंकाच नाही. कल्पनाविलास ही संकल्पनाच तोकडी पडेल अशी कल्पनाउड्डाणांची आणि कल्पनाभरारीची विस्मयकारक किमया 'हमशकल्स' या चित्रपटात अनुभवायला मिळते हे कसं विसरू शकतो आपण? हा किंवा असा निर्भेळ आनंद, ही परमानंदाची अनुभूती फार थोड्या चित्रपटांनी प्रेक्षकांना दिली.

तीन-तीन सोबत राहणार्‍या व्यक्तींची तीन-तीन बहुआयामी रुपे आणि त्यातही एका त्रिकुटाने धारण केलेले स्त्रीचे अवतार अशी सर्वरसपरिपोषक योजना आपल्या पुराणात तरी अनुभवायला मिळते का? विष्णूचे सगळे अवतार फिके पडावेत अशी ही कालातीत कथायोजना साजिद खान नामक महान कथाकाराने साकारून दाखावली ही कौतुकास्पद गोष्ट नाही? महाभारतातदेखील अशा चमत्कृतीयुक्त रसाची वानवा आहे. अर्जुनाचे बृहन्नडा होणे हे सैफ, रितेश, आणि राम यांच्या स्त्रीवेषातील पात्रांपेक्षा खूपच अळणी वाटावे असे कथासूत्र बांधणे हे सामान्य जनांचे काम नाही. राम कपूर नामक बांधेसूद नटाला स्त्रीवेषात पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके न चुकते तरच नवल! त्याचेच स्त्रीरुप त्याच्याच शेजारी आणून बसवले असते तर राम आणि सीता यांची अजरामर रुपे याची देही याची डोळा पाहण्याचे सद्भाग्य प्रेक्षकांना लाभले असते. बालगंधर्वांनी सैफ, रितेश, आणि राम यांची स्त्रीरुपे पाहिली असती तर त्यांनी तत्क्षणी स्त्रीभूमिका सोडून नाटकांना राम-राम ठोकला असता. नंतर कधी काळी या त्रिकुटांची चित्रे बघून "आज खुश तो बहुत होंगे तुम!" असे म्हणून बालगंधर्वांनी या तिघांना जणू कौतुकाची पावतीच दिली असती. सैफच्या स्त्रीभूमिकेबद्दल काय बोलावे? शर्मिलाची अडीच पट एन्लार्ज्ड अशी छबीच जणू सैफच्या स्त्रीभूमिकेत दिसली. आवाजातही तसा फारसा फरक नव्हता. एका अभिनेत्रीची इतकी तंतोतंत आठवण करून देणे यातच त्याच्या स्त्रीभूमिकेचे यश आहे. रितेश तसा 'अपना सपना मनी मनी' मध्ये स्त्रीभूमिकेत चमकला होता. 'हमशकल्स' मधली त्याची स्त्रीभूमिका वाखाणण्याजोगीच आहे. पोटाचा आणि गालांचा वाढलेला घेर त्याच्या या भूमिकेच्या आड येत नाही हे त्याच्या अभिनयाचे यश! प्रेक्षकांमधल्या कित्येक बायका या त्रिकुटाची स्त्रीपात्रे पडद्यावर आल्यावर आपापल्या नवर्‍यांच्या डोळ्यांवर हात ठेवत होत्या हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. बिपाशा, तमन्ना भाटिया, आणि इशा गुप्ता यांच्या मादक अदा या त्रिकुटाच्या अदांपुढे अगदीच कुचकामी वाटत होत्या. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे नंदू माधवचा करिष्मा फोल ठरावा तशी अवस्था बिपाशा, तमन्ना, आणि इशा यांची होत होती. तोकडे कपडे घाला, चिंब भिजून सौष्ठव दाखवा, मादक अंगविक्षेप करा...प्रेक्षक या सौंदर्यवतींकडे ढुंकूनही बघायला तयार नव्हते. एक वळण असे येते की पुरुषावतारातले सैफ, रितेश, आणि राम या स्त्रीवेषातल्या सैफ, रितेश, आणि राम यांच्यावर लट्टू होतात. नंतर सगळ्या नायिका एक विशिष्ट अत्तर शोधून आणतात. या अत्तराची शक्ती इतकी अमाप असते की त्यापुढे 'बैद्यनाथ बिटा एक्स गोल्ड', '३०३' आणि 'वायाग्रा' देखील लोळागोळा-पालापाचोळा होऊन पडावेत. नाना पाटेकर या चित्रपटात असते तर त्यांना "साला, एक अत्तर, एक अत्तर आदमी को सांड बना देता है...एक अत्तर" असा संवाद म्हणायला कित्ती कित्ती आवडले असते हा विचार मनात चमकून जातो. या अत्तराच्या जादूने या सहा पात्रांमध्ये प्रणयाची जी घाई उडते ती अवर्णनीय आहे. माणसाच्या आयुष्यात विकारांच्या असलेल्या प्राबल्याचे आणि माणसाच्या वैषयिक गुलामगिरीचे इतके गहिरे आणि बहुमितीय चित्रण अजून कोठे बरे बघावयास मिळेल?

त्रित्रिकुटांपैकी एक त्रिकुट मेंटल हॉस्पीटलमध्ये असते. खुलासा: त्रित्रिकुट हे श्री श्री रविशंकरांसारखे काहीही नसून सैफ, रितेश, आणि राम यांच्या तीन-तीन अवतारांना त्रित्रिकुट म्हणून संबोधण्यात आले आहे. तर हे मनोरुग्ण त्रिकुट हॉस्पीटलमध्ये धमाल घडवून आणत असते. हसून-हसून मुरकुंडी वळणे चिल्लर वाटावे इतके भयंकर विनोदी प्रसंग इथे उदयाला येतात. मुरकुंडी माहित नाही पण एका कोथरुडकाकाछाप प्रेक्षकाचा चष्मा शेजारी ठेवलेल्या कुंडीमध्ये पडून फुटल्याचे मी पाहिले. उद्वेगाने कुणी चष्मा फेकणार नाही; म्हणजे तो चष्मा हसता-हसता बेभान झाल्याने कुंडीत पडला असावा; नव्हे त्यामुळेच पडला होता हे खरे. "हम पागल नही हैं; हमारे दिमाग में कुछ प्रॉब्लेम हैं" असा विनोदी संवाद अत्यंत विनोदी पद्धतीने सतत म्हणणारे सैफ आणि रितेश या हॉस्पीटलमध्ये किती धमाल उडवत असतील याची आपण कल्पना करू शकता. या त्रिकुटापैकी राम कपूरचे पात्र उत्कट आणि विचलित असे आहे. विचलित उत्कटता किंवा उत्कट भाबडेपणा असेच या रामचे वर्णन करावे लागेल. कुणीही शिंकलं की हा उत्कट राम विकट राम होतो आणि डायरेक्ट शिंकणार्‍या व्यक्तीचा गळा दाबायला सुरुवात करतो. भावनांच्या कल्लोळांचे हे अनेकविध रंग अभिनयाच्या कुंचल्याने अचूक साकारणे सोपे नाही. राम कपूरने हे आव्हान लीलया पेलले आहे. गळा दाबतांना हात कुठे ठेवायचे, गळा दाबण्याआधी झेप घेतांना पाय, कंबर, पोट, आणि धड हे सगळे अवयव सोबत घेऊन कशी झेप घ्यायची, एखादा अवयव मागे राहून जायला नको ही कसरत कशी करायची, चेहर्‍यावर भाबडेपणा आणि ज्याला शिंक आली त्या व्यक्तीविषयीची चिड यांचे बेमालूम मिश्रण चेहरा शक्य तेवढा विनोदी करून कसे दाखवायचे ही अभिनयाची कसोटी राम कपूरने नुसती पेलली नाहीये तर फत्ते केलेली आहे.

त्रित्रिकुटापैकी सुरुवातीच्या त्रिकुटातला राम कपूर कुटील असतो. निष्पाप सैफच्या संपत्तीवर त्याचा डोळा असतो. हा निष्पाप सैफ संपूर्ण चित्रपटात हे निष्पाप भाव टिकवून ठेवतो. सोपं नाहीये! भले भले यात तोंडघशी पडले आहेत. विवेक मुश्रनसारख्या चतुरस्त्र अभिनेत्याला त्यातल्या त्यात ही किमया जमायची. त्यानंतर अविनाश वाधवान, राहुल रॉय, कुमार गौरव यांच्या प्रयत्नांनादेखील दाद द्यावीच लागेल. कुमार गौरवच्या डोक्यावरचे केस भावनांचे खेळ चेहर्‍यावर दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये कसे मागे-पुढे हलत असत हा त्याच्या स्निग्ध अभिनयशक्तीचा भक्कम पुरावाच आहे. पटत नसेल तर "कोई परदेसी आया, परदेस में, देस बनाया, परदेस में..." हे गाणे बघा. त्यात पद्मिनी कोल्हापुरेला न बघता लक्ष कुमार गौरवच्या हलणार्‍या डोक्यावर केंद्रित करा. माझे म्हणणे तुम्हाला तात्काळ पटेल. बाकी माझे म्हणणे पटल्यानंतर पद्मिनीला बघायला हरकत नाही. तिच्या अभिनयाविषयी नंतर कधी तरी. या गाण्यात तिचा अभिनय महत्वाचा नाहीच आहे म्हणा! असो. असं लक्ष विचलित होतं बघा. तर हा कारस्थानी राम त्याच्या डॉक्टर मित्राच्या मदतीने माणसाला अर्ध्या मिनिटात कुत्र्यासारखे भुंकायला आणि वागायला लावणारे एक औषध शोधून काढतो. महाभारतात शकुनीमामा द्युताद्वारे पांडवांना चारीमुंड्या चीत करण्याचे स्वप्न बघतो. 'हमशकल्स' मधल्या पहिल्या त्रिकुटातला सैफचा हा राममामा श्वानप्राशाद्वारे सैफला कुत्रा म्हणजेच मानसिकदृष्ट्या अस्थिर जाहीर करून त्याची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या कुटीलतेची झेप बघा. माणसाचे मन खरोखर अनाकलनीय आहे हेच सत्य यावरून पटते की नाही? हे औषध प्राशन केल्यावर सैफ आणि रितेश एका कॉर्पोरेट बैठकीमध्ये कुत्र्यासारखे भुंकायला आणि चावायला लागतात. अन्नाच्या भांड्यांमध्ये तोंड खुपसून तिथल्या जेवणाचा फडशा पाडतात. माणसाच्या या अधःपतनाचे काळजाला भिडणारे आणि विनोदाच्या अंगाने जाऊन कारुण्याचा सडा पाडणारे हे चित्रण बघून प्रेक्षक हसतात तर खरे पण कुठेतरी त्यांच्या पापण्या ओलावतात हे ही खरेच. माझ्या शेजारी बसलेल्या एका प्रेक्षकाने तर एक अख्खा रुमाल भिजला असेल एवढे नाक क्लीअर केले. तो ही कुणाचा मामा असेलच. किंवा त्याला त्याच्या मामाची आठवण आली असेल. मला त्याच्या भिजलेल्या कडा, भिजलेला रुमाल, भिजलेले नाक याकडे बघवेना. हलला होता बिचारा. मी माझा रुमाल देऊ केला. त्या प्रेक्षकाने हसून नाकारला. "कुठे ही जा, यांचं मेलं तपकीर ओढणं काही सुटत नाही; ही तपकीर सवतच आहे माझी" असं काहीसं मला ऐकू आल्यावर मी माझा रुमाल मागे घेतला. पण म्हणून चित्रपटात घडणार्‍या प्रसंगाची खोली काही कमी होत नाही!

त्रित्रिकुटापैकी तिसरे त्रिकुट नेमके कुठे असते आणि काय करत असते हे आत्ता आठवत नाहीये. कथेची बांधणीच इतकी अजोड होती की काय कुठे कसं आणि कशासाठी जोडलयं हेच कळत नव्हतं. अशी बुद्धीला चालना देणारी कथानके किती बरे पाहिली आहेत आपण? मिथुनदांचा 'गुंडा' किंवा रोनित रॉयचा 'दानवीर' किंवा धर्मेंद्रचा 'गोलाबारूद' किंवा देव आनंदचे 'सौ करोड', 'अव्वल नंबर', 'चार्जशीट', आणि 'लव अ‍ॅट टाईम्स स्क्वेअर' सारखे मोजके अपवाद आहेत म्हणा. पण 'हमशकल्स' ची सर या कुणालाच नाही. नाही म्हणायला तिसरा राम कपूर एका पंजाबी हॉटेलचा मालक असतो हे लक्षात आहे. या त्रित्रिकुटापैकी ३-४ अवतार त्याच्या हॉटेलमध्ये नाचून-गाऊन विविधगुणदर्शनाचा एक कार्यक्रम करतात. कलेचं हे लेणं खरोखर नेत्रसुखद आहे. हां....आत्ता आठवलं. तिसरे सैफ आणि रितेश बहुतेक चोर असतात असा माझा दाट संशय आहे. त्यांनादेखील शेवटी पहिल्या त्रिकुटातल्या सैफ आणि रितेशची दया येते असं काहीसं दाखवलं आहे. करुणरसाचे पाटचे पाट वाहतात या चित्रपटामध्ये.

बाकी बिपाशा, इशा, आणि तमन्ना आपली चविष्ट कामे पार पाडतातच. बिपाशा आता बिप्पुमावशी किंवा बिप्सताई दिसते परंतु त्या भूमिकेमध्ये अशाच समंजसपणे विपुल अंगप्रदर्शन करणारी सुशील, विचारी, धोरणी, अदबशीर अशी ताई अपेक्षित होती. त्यादृष्टीने तिची निवड योग्य आहे आणि तिने अभिनयाची जी अंगथरारक उंची गाठलेली आहे ती लाजवाबच आहे. पण अभिनयात बाजी मारते इशा गुप्ता! भारत भूषण, प्रदीप, राजकुमार, राजश्री, पद्मिनी अशा अभिनयरत्नांची भक्ती केल्यावर काय बिशाद आहे की चेहर्‍यावर भाव उमटतील! आणि कलेचे निर्विकार रुप खरे म्हणजे तेच आहे. अभिनय सूक्ष्म असला पाहिजे. भडक अभिनय करणारे अनेक आहे परंतु सूक्ष्म अभिनय करू शकणारे विरळाच.

तसं सांगण्यासारखं, वेचण्यासारखं, वेधक असं खूप आहे 'हमशकल्स'मध्ये. तूर्तास एवढे पुरे. परिपूर्ण अनुभूतीसाठी 'हमशकल्स' पाहणे हाच एकमेव पर्याय आहे. एकदा तरी अनुभवावा अशी ही पर्वणी आहे.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

साती's picture

15 Jul 2014 - 2:00 pm | साती

अजून वाचून पूर्ण झाले नाही.
पण त्याआधीच तुम्हाला आणि साजिदला आपपल्या कलाकृतीची पावती दिल्याशिवाय रहावत नाही.

सौंदाळा's picture

15 Jul 2014 - 2:05 pm | सौंदाळा

तुमची अशी फटकेबाज समीक्षणं वाचण्यासाठी टुकार सिनेमे बनलेच पाहीजेत ;)
सही लिहीलय

अर्धं वाचूनच प्रतिक्रिया देतोय, उरलेलं जरा चवीनं वाचेन म्हणतो.

धमाल मुलगा's picture

15 Jul 2014 - 2:49 pm | धमाल मुलगा

शर्मिलाची अडीचपट एन्लार्ज्ड छबी काय, निष्पाप भाव काय, तुलनेसाठी 'विवेक मुश्रन'???? कुमार गौरवचा स्निग्ध अभिनय काय....
ठ्या: करुन फुटलो तेज्यायला! बर्‍याच दिवसांनी कॉफीचा कप टू किबोर्ड प्रवास घडला. :D

चित्रपट पूर्ण बघून त्यावर लेख लिहीपर्यंत स्टॅमिना टिकवून ठेवल्याबद्दल आपल्याला एक हॉरलिक्स ची (किंवा तुम्हाला आवडेल अशी) बाटली. ;)

मुक्त विहारि's picture

15 Jul 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि

झक्कास.

मी पैसे देवून अजिबात हिंदी सिनेमे बघत नसल्याने, ह्या आनंदाला मुकणार.

रेवती's picture

15 Jul 2014 - 7:24 pm | रेवती

काळजी नको हो मुव्ही! ;)
असे मुव्हीज लगेच छोट्या पडद्यावर येतात.

मुक्त विहारि's picture

15 Jul 2014 - 7:46 pm | मुक्त विहारि

छोट्या पडद्यावर तर अजिबात नको...

जाहीरातीतून वेळ मिळाला किंवा जाहीराती दाखवून दाखवून चॅनलवाले कंटाळले की मध्येच एक ७/८ मिनीटांसाठी सिनेमा दाखवतात असे ऐकून आहे.

सविता००१'s picture

15 Jul 2014 - 3:10 pm | सविता००१

भारी फटकेबाजी आहे. मस्तच.

मृत्युन्जय's picture

15 Jul 2014 - 3:16 pm | मृत्युन्जय

अरारारारारारा. बाजार उठवला साजिद खानचा

कवितानागेश's picture

15 Jul 2014 - 3:38 pm | कवितानागेश

बघायलाच हवा आता. =))

बन्डु's picture

15 Jul 2014 - 3:47 pm | बन्डु

मी उगाच "मुडदा बशीवला" असं वाचलं नजर चुकीने Wink

शिद's picture

15 Jul 2014 - 4:10 pm | शिद

साजीद खानने हे खतरा परीक्षण जर वाचलं तर चित्रपटसॄष्टीतून संन्यास घेईल.
बेक्कार पिसं काढलीत राव. *lol*

त्रित्रिकुटांपैकी एक त्रिकुट मेंटल हॉस्पीटलमध्ये असते. खुलासा: त्रित्रिकुट हे श्री श्री रविशंकरांसारखे काहीही नसून सैफ, रितेश, आणि राम यांच्या तीन-तीन अवतारांना त्रित्रिकुट म्हणून संबोधण्यात आले आहे.

खिक्क्क्क्क...ह्या व्याक्यावर जाम हसलो.

Maharani's picture

15 Jul 2014 - 4:13 pm | Maharani

हवपुवा *lol*

विजुभाऊ's picture

15 Jul 2014 - 4:16 pm | विजुभाऊ

मैलाचा दगड की मैल्याचा दगड?

नाखु's picture

17 Jul 2014 - 10:36 am | नाखु

अशुतोषने या अक्कल्वान साजिद मज्कूरास जोधा-अकबर्"चित्रपटाबद्दल अकलेचे तारे तोडल्याबद्दल जागेवरच झापले होते.

स्वाती दिनेश's picture

15 Jul 2014 - 4:25 pm | स्वाती दिनेश

मस्त चिरफाड करुन पार लक्तरं करुन टाकली आहेत..
हसतेय अजूनही...
स्वाती

रेवती's picture

15 Jul 2014 - 5:18 pm | रेवती

या ऐतिहासिक चित्रपटाचे परिक्षण इतक्या पवित्र भाषेत लिहून तुम्ही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत साहेब!
आमचे पाय या शिनेमाच्या थेट्राला लागू नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. अगदी मोफत आविष्कारासही आमची ना असेल याची खात्री बाळगावी. आभार.

समीरसूर's picture

17 Jul 2014 - 12:26 pm | समीरसूर

खिल्ली उडविण्यासाठी मित्रांसोबत बघायला असे चित्रपट बरे असतात. :-)

पवित्र भाषा, पवित्र विचार्...आपकी पवित्र कैसी है? मेरा मतलब आपकी तबियत कैसी है?

उत्पल दत्तचा डायलॉग आठवला. 'गोलमाल'मधला... :-)

माझी पवित्र भाषा हा टोमणा होता का? :-) काही चुकलं असेल तर क्षमस्व...

अरे वा! आली आली नवी चिरफाड आय मीन परीक्षण. खालील वाक्ये विशेष आवडली.

कथेची बांधणीच इतकी अजोड होती की काय कुठे कसं आणि कशासाठी जोडलयं हेच कळत नव्हतं.

पण अभिनयात बाजी मारते इशा गुप्ता! भारत भूषण, प्रदीप, राजकुमार, राजश्री, पद्मिनी अशा अभिनयरत्नांची भक्ती केल्यावर काय बिशाद आहे की चेहर्‍यावर भाव उमटतील!

अणि धम्यासारखेच म्हणते "शर्मिलाची अडीचपट एन्लार्ज्ड छबी काय, निष्पाप भाव काय, तुलनेसाठी 'विवेक मुश्रन'???? कुमार गौरवचा स्निग्ध अभिनय काय...."

एसमाळी's picture

15 Jul 2014 - 7:40 pm | एसमाळी

मस्त चिरफाड.
2007 नंतर एक ही चित्रपट थेटरात जाउन पाहिला नाही.
टिव्हीवर आल्यावर
हा लेख वाचत बघेन.
मजा येईल.

सानिकास्वप्निल's picture

15 Jul 2014 - 8:02 pm | सानिकास्वप्निल

चित्रपट परिक्षण आवडले...भन्नाट आहे =))

बाकी त्या साजिदचा खूपपपपपप राग येतो....ते भाऊ-बहिण जाम डोक्यात जातात...त्यांचे सिनेमे मी टाळतेच .

रेवती's picture

16 Jul 2014 - 2:29 am | रेवती

साजिदचा खूपपपपपप राग
भयानक सहमत.

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 3:07 am | प्यारे१

+२०१४

कोण साजिद खान? कोण फराह खान?

सुहास झेले's picture

15 Jul 2014 - 10:00 pm | सुहास झेले

आग्गागागागा ..... परीक्षण करावे तर समीरसूर यांनीच :)

मी-सौरभ's picture

15 Jul 2014 - 11:06 pm | मी-सौरभ

_/\_

विकास's picture

16 Jul 2014 - 12:23 am | विकास

हमशकल्स मध्ये दगड आहेत हे माहीत होते, पण तो चित्रपट मैलाचा दगड आहे हे आपले विचार वाचल्यावर समजले. :)

खटपट्या's picture

16 Jul 2014 - 2:14 am | खटपट्या

अरारारा !!!!

मागे साजिद कोणत्या तरी वाहिनीवर दुसऱ्यांच्या चित्रपटाची चिरफाड करायचा. ते आठवले. लोका सांगे….
यापुढे तुमचा लेख आल्याशिवाय चित्रपट बघणार नाही.

म्हणतात न कोणताही किल्ला बघायला जायच्या आधी त्याबद्दल वाचून जावं. तसं तुमचे परीक्षण वाचल्याशिवाय पिक्चर ची मजा नाय.

बेष्ट. नावे आणि त्यांचे मालक/मालकीण माहीत नसून (एक बिपाशा सोडून ;) ) सुद्धा मजा आली.

प्रोमोज पाहूनच सिनेमाच्या वाट्याला न जाण्याचे ठरवले होते.

समीरसूर's picture

17 Jul 2014 - 12:29 pm | समीरसूर

आमचं नशीब फुटकं. आम्ही अशाच गोष्टींच्या वाटेला जाणार. :-( मत मारी जाती हैं...

समीरसूर's picture

17 Jul 2014 - 12:28 pm | समीरसूर

एक दुरुस्ती: 'गोला बारूद' मध्ये धर्मेंद्र नव्हता. त्यात शत्रुघ्न सिन्हा, चंकी पांडे, आणि किमी काटकर हे नटश्रेष्ठ होते. चुकीबद्दल क्षमा असावी. :-(

इशा१२३'s picture

17 Jul 2014 - 12:58 pm | इशा१२३

भन्नाट लिहिलय..संपुर्ण शिणेमा बघितलात आणि डोक शाबूत ठेऊन सगळ लिहिलत....__/\__

एकुलता एक डॉन's picture

17 Jul 2014 - 9:21 pm | एकुलता एक डॉन
एकुलता एक डॉन's picture

18 Jul 2014 - 6:43 pm | एकुलता एक डॉन
पैसा's picture

30 Jul 2014 - 9:42 pm | पैसा

टाटास्कायवर शोकेसमधे हा सिनेमा बघायला मागवणार आहे. ३ तास बघून डोकं जागेवर राहिलं तर इथे परत येते!

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 3:51 am | प्यारे१

क्या आप को अपनी जिंदगी का कंटाळा आया है के आप पैसे देकर हमशकल्स देखना चाहते हो?

जितके साजिद खानच्या बुद्धीचे कारुण्य आणि दरिद्रता चित्रपट बघतांना जाणवून खिन्न व्हायला झाले, त्याच तीव्रतेने वरील परिक्षण वाचून हसून हसून मुरकुंडी वळली...
हे परिक्षण वाचून हसू येण्यासाठी तरी एकदा हा चित्रपट बघितला पाहिजे (परिक्षन वाचण्यापूर्वी)