CID ची गोष्ट !

पामर's picture
पामर in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 12:52 pm

गेले किती तरी दिवस(सॉरी, वर्ष आणि दररोज दुपारी) मुंबई पोलिसांकडे प्रचंड म्हणजे प्रचंड काम असल्याने अनेक महत्वाच्या cases सोनी चॅनलनी ह्या CID कडे सोपवल्या आहेत हे सर्वांना माहीत आहेच.(हेच हो आपले खुन, अपहरण वगैरे..)आपले सर्वांचे लाडके A.C.P. प्रद्युम्न (काय त्यांचे डोळे,काय त्यांचे टक्कल,काय त्यांचा ३ piece suit ...वा जवाब नाही! ),cases कडे इतक्या बारकाईने लक्ष देतात की स्वतः च्या केसांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही.असो.त्यांच्या बरोबर अगदी लक्ष्मण,हनुमानासारखे असणारे अभिजित अणि दया,त्यांना cases solve करायला मदत करतात(?),त्या दोघांचे अफाट साहस(बोंब च्यायला!),कर्तव्यनिष्ठा,कार्यतत्परता,(अजुन शब्द आठवत नाहीयेत...),फ्रेडी चे comic timing (त्याला बालिशपणा,निर्बुद्धपणा पण म्हणतात बरका!)आणि forensic lab मधे केस(झिंज्या!)मोकळ्या सोडून वावरणा-या डॉ.तारिका आणि महान forensic doctor,म्हणजे डॉ.साळुंके (हा माणुस lab मधे प्रेतांशी बोलतो,इथे कसली तरी धुर येणारी रसायने ठेवतो,भारी technology वापरतो आणि तो काहीही शोधू शकतो )ह्यांच्यापाईच आपण शांत झोपू शकतो आहोत(पोटभर हसल्या नंतर!)तर ही गोष्ट आहे CID ची!

अश्याच एका दिवशी CID bureau मधे direct ACP ला phone येतो.(बाकी सर्व पोलिस स्टेशनचे फ़ोन busy असून,सर्व पोलिस मेलेले,झोपलेले किंवा रजेवर असतात !)त्यांचा एक डोळा बराच चकणा होतो,ते ओरडतात "Oh,My God!".ते अभिजितकडे त्रासिक नजरेने पाहत म्हणतात,"जल्दी चलो अभिजित,एक खुन हो गया है| ".लगेच दया CID ची scorpio बाहेर काढतो.सर्वजण घटनास्थळी जायला लागतात.ACP परत एकदा हात गोल गोल फिरवत ओरडतो,"दया गाडी और जल्दी भगाओ|".....(त्यांना माझ्या कडुन एक ऑस्कर आणि एक कटिंग!!..काय तो जिवघेणा अभिनय..नाद्च नाही...)

तिथे पोचल्यावर सर्व CID team members च्या अंगी असलेले एकेक दैवीगुण दिसू लागतात.ते सगळे आता 'सुराग ढुंडू'लागतात.....तेवढ्यात कोणीतरी ओरडतो,"सर, यंहा पे एक लाश है|"(आजी म्या ब्रह्म पाहिले,वा वा वा !)अजुन बरीच 'छानबीन' करून कोणी (जगात कोणालाही दिसेल अशी!)गोळी शोधतो...मॉडेलिंग धड जमले नाही म्हणुन रोजगार हमी योजनेत CID मधे लागलेला inspector आहे ते सरळ दिसत असून सुद्धा ACP विचारतात,"आखिर ये गोली चली कहांसे?"(दोन मुस्कटात वाजवून त्यांना जागं करावसं वाटतं)कोणी तिकडे थेट American police style,'CID do not cross' वगैरे च्या(त्या चोरबाजारातून मागवलेल्या सारख्या दिसतात)पट्ट्या लावतो.ACP वदतात,"सोचो दया सोचो, आखिर ये खुन किया तो किया किसने?" (दयाच्या चेह-यावर ढीम्म मठ्ठ..सॉरी गंभीर भाव) आणि ते त्यांचा मोर्चा जगप्रसिद्ध lab कडे नेतात.

(लॅब मधे)CID lab मधे नेहमी काही तरी उकळत ठेवलेले असते.(विग घातलेले) डॉ.साळुंके आणि झिप-या केसांची डॉ.तारिका dead-body च्या बाजुला उभे असतात.इतक्यात इथे आपले ACP व त्यांची team येउन धड़कतात.डॉ.त्यांना म्हणतात,"कुछ तो गड़बड़ है बॉस|"दोन-तीन आठवडे जंगलात सडत असलेल्या body चा मरायचा time डॉक्टरद्वयींनी बरोबर सांगितलेला असतो.(ह्यांना FBI ची नोकरी कशी मिळत नाही ?)त्या body वर कसले कसले प्रयोग करून त्यांनी खुन्याचे finger-prints पण शोधून काढलेले असतात.(आता ही मात्र हद्द झाली,लवकर बोलवा अश्या महान लोकांना अमेरिकेला!)आता ते एकदम hi-tech computer वरून ते prints match देखिल करतात.आता काय खुनी सुटत नाही(आणि आपला जीव ही).जगातल्या सगळ्या criminals ची माहिती असणा-या computer वरून एक पत्ता घेउन ACP सर्वांना घेउन निघतात.(इतक्यात अभिजित हळूच तारिका कडे बघतो,रडल्या सारखा चेहरा करून लाजतो.!)

ते एका मोठ्या societyत किंवा बंगल्याच्या आवारात पोचतात.एका बंद दरवाज्या समोर थांबतात.दरवाजा ठोठावत ACP म्हणतात,"मैडम,दरवाजा खोलिए,हम लोग CID से हैं|"(आत कोण आहे..ह्यांना आधीपासुन माहितीये..तरी इतकी वर्ष हे ACP ते ACP च) आतून काहीच हालचाल नाही.ACP दयाला सांगतात,"दया तोड़ दो दरवाजा|"(दरवाजा तोड म्हणून सांगायला ह्याच्या बापाचे काय जाते?) मग तो भीमरूपी महारुद्र दया खंद्याच्या धड़का मारून तो दरवाजा तोडून टाकतो.(मला वाटत तो शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा पण तोडू शकतो!).लगेच ACP आज्ञा देतात,"अभिजित इस कमरेका चप्पा चप्पा छान मारो,कुछ ना कुछ सुराग जरुर मिलेगा|"..हे लोक परत शोधाशोध सुरु करतात...आणि लोग CID से हैं म्हणल्यावर warrant वगैरे फालतु आणि ते लक्ष का देतील...) इतक्यात बाहेर एक गाडी निघून गेल्याचा आवाज येतो.सगळे धावत बाहेर येतात...पुन्हा ACP आपल्या अगाध ज्ञानाचे प्रदर्शन करतात,"उस गाडी का पीछा करो,मुझे लगता है,खुनी इसी गाडी में है|"(त्यांनी part-time ज्योतिषाचा व्यवसाय करायला हरकत नाही.)

त्यांचा पाठलाग सुरु होतो.पुढच्या गाडीतले लोक गोळ्या झाड़त असतात.मग बाँड पटाला लाजवेल असा chase करून ते गाडी पकडतात.पण मग गाडीतले लोक पळायला लागतात..ते पुढे CID मागे...आता direct गोळ्यांच्या फैरी झडतात..CID च्या गोळ्या बरोब्बर त्यांच्या खांद्यावर नाहितर पोटरीवर बसतात..ते खाली कोसळतात..CID त्यांना धावत जाऊन त्यांना पकडतात...त्यांना पकडल्या पकडल्या ACP,"दया,अभिजित इन्हें bureau ले चलो|"

आता सगळे bureau मधे आले आहेत.मंद मंद प्रकाश आहे(नुसता प्रकाश नाही तर, CID team पण मंदच आहे,असो) गाडीत पकड़लेले लोक एका खुर्ची वर एका line मधे बसवले आहेत.गब्बरसिंग,अजित,जीवन वगैरे लोकानां स्वतः ची लाज वाटावी असा एक महाभयानक चेहरा करून ACP विचारतात,"बोलो,बोलो तुमने ऐसा क्यूँ किया?"त्यांचा डोळा आता अधिकच चकणा दिसतो आहे.लोक काही कबूल होत नाहीत असे बघून दया पुढे सरसावतो.....आणि एक वीज पडल्याचा भास असावा अशी असलेली दयाची चपराक तो त्या लोकांच्या कानाखाली पेटवतो.(ह्याला Wrestling मधे finishing move म्हणतात.)लोक आपला गुन्हा कबूल करतात(बहुतेक केला नसला तरी.....)ACP विजयी हसत (हे विजयी हास्य बरचसं भितीदायक आणि इतकं विनोदी असत हे मला माहीत नव्हत..)म्हणतो,"अब तो तुम्हे फांसी होगी|"(देशातली न्यायालये बंद करा ना,दया कोणताही गुन्हा एकदाच कानाखाली मारून कबूल करून घेतो आणि ACP कोणीही न विचारता शिक्षा देतो!)

अशी ही साठा उत्तराची कहाणी सकल संपन्न होते.गुन्हेगारांना शिक्षा होते.CID team पुन्हा गुन्ह्याच्या वासावर निघते.एका Episod चा happy ending होतो.आणि मी मात्र इतकी विनोदी,इतकी टुकार,इतकी भंगार,इतकी भिकार serial परत का बघितली म्हणून स्वतः ला दोष देत झोपायचा प्रयत्न करतो,पण झोपत मात्र नाही.... काय माहीत स्वप्नात ACP प्रद्युम्न आला आणि म्हणाला,"दया, इसके finger prints लेलो| "तर.........

विनोदआस्वाद

प्रतिक्रिया

स्पा's picture

13 Jul 2014 - 3:10 pm | स्पा

लोलच लोल

पगला गजोधर's picture

14 Jul 2014 - 10:00 am | पगला गजोधर

ACP: दया, गोलीका जख्म सीनेपे है, मतलब . . . (गहन विचारांती)… गोली सामनेसे चलायी हुई है !
दया: सर, यु आर सिम्पली ब्रिलीयंट . . .

मुक्त विहारि's picture

13 Jul 2014 - 3:17 pm | मुक्त विहारि

झक्कास..

मंदार कात्रे's picture

13 Jul 2014 - 4:50 pm | मंदार कात्रे

;)

चौकटराजा's picture

13 Jul 2014 - 5:51 pm | चौकटराजा

आणि मी मात्र इतकी विनोदी,इतकी टुकार,इतकी भंगार,इतकी भिकार serial परत का बघितली
कारण त्वा पामराला ठाव हाय की ब्वाणचा पिच्चर बघाया पॉपकार्न धरून कित्ती किती पयशे जात्यात. परत जायाचे पेट्रोलचा कर्च वायला. हेय काय घराल बसून शान लोळत बगता येतं त्ये बी वायाला चाल्लेली चपाती फोडणीची करून खायाला आस्ती बरूबर !

थोडं अजून फुलवता किंवा खुलवता आलं असतं...

थोडं अजून फुलवता किंवा खुलवता आलं असतं...

कुणाला ? दयाच्या अवाढ्व्य शरिराला ?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा

*clapping* :D

प्यारे१'s picture

13 Jul 2014 - 10:41 pm | प्यारे१

>>> CID ची scorpio

आधीची टोयोटाची 'कॅलिस' विकली काय?

बाकी लहान पोरांमध्ये 'शीआयई' लई फेमस आहे.
एका लहानग्यानं शीआयई म्हटल्याम्हटल्या त्याच्या काकूनं लगबगीनं कागद शोधायला सुरुवात केलेलं परतेक्ष पाह्यलंय.

बॅटमॅन's picture

14 Jul 2014 - 1:14 pm | बॅटमॅन

एका लहानग्यानं शीआयई म्हटल्याम्हटल्या त्याच्या काकूनं लगबगीनं कागद शोधायला सुरुवात केलेलं परतेक्ष पाह्यलंय.

फुटलो. =)) _/\_ =))

खटपट्या's picture

13 Jul 2014 - 11:27 pm | खटपट्या

लय भारी !!!

एस's picture

14 Jul 2014 - 1:05 am | एस

खासच...

ब़जरबट्टू's picture

14 Jul 2014 - 10:31 am | ब़जरबट्टू

पण थोड्या वो कंसमे का स्वगत कमी लिहला असता तर बेस झाला असता.. लिंक तुटते हो..
बाकी मस्तच...

इशा१२३'s picture

14 Jul 2014 - 12:39 pm | इशा१२३

हाय राम..वैताग आणलाय या सीआयडी ने..माझ लेकरूही फॅन आहे या सीआयडी टिमच...दयाचे स्टंट तर काहिच्याकाहि दाखवतात आणि ते फार आवडतात.अभिजीतही लाडका.काहिहि असत कहर म्हणजे एका एपीसोडमधे तीन सिआयडि ओफिसरणी बारमधे नाचताना दाखवल्यात..खूनी शोधायला सापळा म्हणे..ड्यूटी..
असली विनोदि शिरियल फारच गंभीरपणे बघतात हि मुल.एकुणच लहान मुलांमधे भयंकर लोकप्रिय आहे सिरियल....सांगुन्,रागावून काहि उपयोग होइना लेकावर,शेवटी चॅनलच ब्लॉक केला.रोज खुनाखुनी आणि प्रेत बघणे नकोच..आता तारक मेहता बघणे चालू आहे...

एकुलता एक डॉन's picture

15 Jul 2014 - 1:10 am | एकुलता एक डॉन

कोनता हो? नाव सान्गु शकाल एपिसोद चे?

इरसाल's picture

14 Jul 2014 - 1:29 pm | इरसाल

ज खुनाखुनी आणि प्रेत बघणे नकोच..आता तारक मेहता बघणे चालू आहे...

अहो त्यात पण "दया" आहेच.

स्वाती दिनेश's picture

14 Jul 2014 - 4:21 pm | स्वाती दिनेश

वाचताना हसतेय नुसती...
मस्त!खिल्ली आवडली.
स्वाती

शिद's picture

14 Jul 2014 - 5:13 pm | शिद

ACP

ACP

टिपः जालावरुन साभार.

भाते's picture

14 Jul 2014 - 8:04 pm | भाते

पण आमच्या शिआयडीला कायबी बोलायचं नायं.
शनिवारी तो येकच टिपी असतो वो आम्हाला!

आसिफ's picture

14 Jul 2014 - 11:26 pm | आसिफ

The viral fever ने केलेले CID चे जबरा spoof बघा. हाफिसात असलेने अत्ता लिंक जडवु शकत नाही.

कुछ तो गडबड है दया..कुछ तो गडबड है..

पाटीलभाऊ's picture

15 Jul 2014 - 11:34 am | पाटीलभाऊ

तरी शिआयडी बघताना लय मजा येते राव..दिवस कसा जातो कळतच नाहि बुआ..!
काय तो अभिनय...अन काय ते संवाद.. *lol*

बॅटमॅन's picture

15 Jul 2014 - 12:12 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =)) =)) =))

कमलकाकू's picture

15 Jul 2014 - 12:44 pm | कमलकाकू

लै भारी..एवढ असूनही सीरिअल फुल्ल फॉर्मात आहे *lol*

पैसा's picture

1 Aug 2014 - 11:34 pm | पैसा

मस्त लिहिलंय! पण तरी शायडी द ग्रेट! दया कुछ तो गडबड है आणि दया तोड दो ये दरवाजा हे ड्वायलॉक ऐकल्याशिवाय बरं नै वाटत!

मराठे's picture

1 Aug 2014 - 11:53 pm | मराठे

सब टिव्ही वरची एफ.आय.आर. बघितली तर सिआयडी म्हणजे ब्रेकिंग ब्याड किंवा डेक्स्टरच्या तोडीची वाटेल.

कविता१९७८'s picture

2 Aug 2014 - 10:58 am | कविता१९७८

लहान मुलांना ही सीरीयल फार आवडते.