पायाखालची रायगड जिल्ह्याची माती सुटून आता दहा वर्ष झाली मात्र त्या मातीचा सुगंध आजही मनात दरवळतोय.
असं वाटतं की शाळेत आपल्याला पुर्ण नांव सांगायला सांगितलं आहे आणि आपण नांव सांगून झाल्यानंतर एका दमात "मुक्काम वडगांव कोंड पोष्ट गोरेगांव तालुका माणगांव जिल्हा रायगड" असा पत्ता सांगत आहोत.
गावातून बाहेर पडून पूर्वेला तोंड करुन उभे राहीले की दूरवर समोर दिसणारा कावळे घाट आणि त्याच्या पाठीमागे दिमाखाने उभा असलेला छत्रपतींचा रायगड आजही नजरेसमोर तरळतो. लहानपणी आजीने सांगितलेली आख्यायिकाही आठवते. आमचे पोष्ट असलेल्या गोरेगांवाचे नांव म्हणे पूर्वी घोडेगांव होते. शिवरायांच्या घोडयांच्या पागा इथे असत म्हणे.
पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला नवी मुंबई आणि ठाणे, दक्षिणेला रत्नागिरी आणि सातारा आणि पूर्वेला पुणे जिल्हा अशा सीमा असलेल्या या जिल्ह्याचे नांव पूर्वी कुलाबा असे होते. बॅ. अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्याचे नांव बदलून रायगड असे ठेवण्यात आले.
जिल्ह्याचे वैशिष्टय असे की जिल्हयाच्या दक्षिणोत्तर तीन गोष्टी एकमेकांना जवळपास समांतर धावतात, पश्चिमेला अरबी समुद्राचा किनारा, पूर्वेला सहयाद्री पर्वतरांगा, आणि जिल्हयाच्या मधून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग. अपघातांसाठी देशभरात बदनाम असलेला हा राष्ट्रीय महामार्ग पूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ म्हणून ओळखला जायचा. नुकतेच याचा क्रमांक बदलून ६६ करण्यात आला आहे. शीव - पनवेल द्रुतगती मार्गाला जोडूनच पनवेलपासून सुरु होणारा हा महामार्ग दक्षिणेला कशेडी घाट ओलांडून रत्नागिरी जिल्हयात शिरतो. जिल्हयातून सहयाद्री पर्वत ओलांडून घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे जिल्ह्यात जाण्यासाठी तीन घाट रस्ते आहेत, खोपोली गावातून खंडाळ्याला जाणारा बोर घाट, माणगावातून पौडला जाणारा ताम्हिणी घाट आणि पोलादपूरवरुन भोरला जाणारा वरंधा घाट. या तिन्ही घाटात पावसाळ्यात निसर्ग मुक्त हस्ताने आपल्या सौंदर्याची उधळण करत असतो.
शिवछत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असून छत्रपतींची राजधानी असलेला रायगड किल्ला महाड तालुक्यात आहे. बळळालेश्वराच्या पाली गावाच्या पाठीमागे भींतीसारखा उभा असलेला सुधागड सुंदर आहे. अलिबागच्या किनार्यापासून साधारण एक किलोमीटर आत समुद्रात असलेला कुलाबा हा जलदुर्ग, मुरुडच्या समुद्रातील जंजिरा हा किल्ला पर्यटकांना भुरळ घालत असतात.
हा जिल्हा पश्चिम किनारपट्टीवर चिंचोळया पट्टयाच्या स्वरुपात पसरला असल्याने जिल्ह्याच्या उरण, अलिबाग, मुरुड, तळा श्रीवर्धन या तालुक्यांना समुद्र किनारा लाभला आहे. दक्षिण काशी म्हणून शिवतीर्थ हरीहरेश्वर हे गांव आणि एकेकाळी सुवर्ण गणेशासाठी प्रसिद्ध असलेले दिवेआगर गांव श्रीवर्धन तालुक्यात आहेत. दिवेआगर गावातून उजव्या बाजूने शेखाडी गावावरुन श्रीवर्धनकडे जाणारा रस्ता आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देतो. हा रस्त्या अगदी समुद्र किनार्याला चिकटून जातो. सूर्यास्ताच्या वेळी हा रस्ता आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो. श्रीवर्धनकडे जाताना डाव्या बाजूला छोटे छोते डोंगर आणि उजव्या हाताला चिकटूनच खडकाळ समुद्रकिनार्यावर धडका देणार्या लाटा. ईतका सुंदर रस्ता महाराष्ट्रात दुसरा नसावा.
या जिल्हयाने देशाला चिंतामणी देशमुखांच्या रुपाने देशाला पहिले अर्थमंत्री दिले. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले आणि श्री. मनोहर जोशी हे रायगड जिल्ह्यामधलेच. सध्याचे जलसंपदा मंत्री श्री. सुनिल तटकरे हे रोहा तालुक्यातील कोलाड गावचे.
महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात माहिती असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ माणगांव तालुक्यातील लोणेरे या गावी आहे. १९८९ साली महाराष्ट्र शासनाने एका अधिनियमाने सुरु केलेले हे विदयापीठ तंत्रशिक्षणाची पंढरी असून इथे अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांमध्ये पदविका,पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच पी एचडी घेता येते. डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींशी निगडीत असणारे चवदार तळे विद्यापीठापासून वीस किमी अंतरावर महाड या छोटेखानी शहरात आहे.
जिल्हयाच्या उत्तर भागात प्रामुख्याने आगरी आणि कोळी बांधवांची वस्ती असून मध्य व दक्षिण भागात कुणबी, वैश्यवाणी तसेच इतर समाज आहेत. भात शेती हा ईथला प्रमुख व्यवसाय असून भातशेतीच्या जोडीला दुधाचा जोडधंदा केला जातो.
असा हा रायगड जिल्हा शेजारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारखे समृद्ध जिल्हे आणि शहरे सीमेवर असूनही काहीसा मागासच राहीला आहे.
प्रतिक्रिया
18 Jun 2014 - 6:37 pm | प्रचेतस
तुझ्याकडून रायगड जिह्यावर अजून बरंच काही अपेक्षित होतं.
दिवेआगर ते श्रीवर्धन व्हाया शेखाडी हा नितांतसुंदर रस्ता आहे. शेखाडीपुढचा घाट आणि तो ओलांडल्यावर अगदी रस्त्याकडेला लागणारी शुभ्र वाळूची पुळण अतिशय सुंदर.
18 Jun 2014 - 6:54 pm | केदार-मिसळपाव
आणी, फक्त आणी फक्त फोटो असलेलेच वाचले जाइल. (ही प्रेमळ विनंती आहे.)
18 Jun 2014 - 7:15 pm | विकास
सहमत. फोटो पण टाकावेत की! :)
18 Jun 2014 - 7:06 pm | प्यारे१
'रायगड जिल्ह्याची थोडक्यात ओळख' असं सरकारी पत्रक कुणी निवेदकानं वाचल्यासारखं वाटलं.
18 Jun 2014 - 11:17 pm | धन्या
धागा टंकताना तोच उद्देश समोर होता.
19 Jun 2014 - 1:39 pm | प्यारे१
असे असेल तर सरकारी वृत्तांत छान झालेला आहे. :)
19 Jun 2014 - 2:57 pm | सुबोध खरे
धनाजीराव
अशा शासकीय वृत्तांता वर न थांबता खाजगी कामासाठी मुद्दाम वेळ काढून सविस्तर लिहिलेला वृत्तांत येऊ द्या. आमची आई अलिबाग जवळील नागावची त्यामुळे माहेरच्या जिव्हाळ्याची माणसे आमच्या जवळची असतात.
18 Jun 2014 - 7:13 pm | दिपक.कुवेत
माझ्या मते शीक्षणमंत्री सी.डी. देशमुख हे हि रोहा-रायगडचेच ना? शीवाय प. पु. पांडुरंगशात्री आठवले हे हि रोह्याचेच ना?
वल्ली: तु म्हणतोस तसा शेखाडिचा तो समुद्रकिनार्याच्या बाजुनी जाणारा निनांतसुंदर जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा अक्षःरश वेड लागलं होतं. मनात म्हटलं काय साली नशीबवान लोक आहेत ईथली. समुद्र अगदि हाकेच्या अंतरावर. आता तर दर वर्षी एखाद खेप तरी नक्कि होते (श्रीवर्धन सासुरवाडि असल्याने). पूळणिवर जाउन नुसता समुद्र बघत बसायचं. खुप निवांत/रीलॅक्स वाटतं. समुद्राची साथ घेत, त्याचं खारं वार पित बाईक चालवायला भन्नाट मजा येते. याच वाटेवर श्री. बालाजी तांबे ह्यांच फार्म हाउस पण आहे. छ्या एका क्षणात सगळं नजरेसमोरुन तरळुन गेलं.
18 Jun 2014 - 7:23 pm | आतिवास
लेख अपुरा वाटला मला...:-(
18 Jun 2014 - 7:25 pm | कवितानागेश
तो श्रीवर्धनकडचा रस्ता आठवला लगेच आणि गारगार वाटलं.
बाकी रायगड जिल्ह्यात अजूनही छोट्या छोट्या गावात कातकरी वस्त्या टिकून आहेत. कात तयार करण्याचा उद्योग किती होतो हे मात्र माहित नाही.
18 Jun 2014 - 11:23 pm | धन्या
कातकरी वस्त्या अजूनही टिकून आहेत हे खरे आहे मात्र कात तयार करण्याचा व्यवसाय केव्हाच अस्तंगत झाला आहे. दहा पंधरा वर्षांपूर्वी त्याची जागा हातभट्टीच्या दारु उद्योगाने घेतली होती. मात्र पुर्ण जिल्ह्यात त्याचा अतिरेक झाला, गावकरीसुद्धा घरोघरी दारु पाडू लागले. शेवटी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलून तो व्यवसाय मोडीत काढला.
18 Jun 2014 - 7:35 pm | स्पा
हे एवढचं?
18 Jun 2014 - 8:01 pm | सूड
सुरुवात वाचून तुझ्या गावातल्या काही आठवणी वाचायला मिळतील असं वाटलं होतं. तिसर्या-चौथ्या परीच्छेदानंतर लेख माहितीपूर्ण असला तरी काहीसा रुक्ष वाटला. रायगडच्या मातीचा सुगंध येण्यापेक्षा कोणीतरी शेती अधिकारी मातीचा सामू तपासायला आल्यासारखं वाटलं. :)
18 Jun 2014 - 8:10 pm | किसन शिंदे
धन्या, लेख अजून थोडा मोठा हवा होता. भौगोलिक माहितीसोबतच तिथल्या एकूण संस्कृती-समाजाबद्दल विस्तृतपणे वाचायला आवडलं असतं.
18 Jun 2014 - 8:49 pm | अजया
आमच्या रायगड जिल्ह्याबद्दल अजून वाचायला नक्की आवडेल. एका बाजूने नवी मुंबई च्या झगमगाटापासून ते अत्यंत दुर्गम भागातल्या कातकरीवाड्या.हायवेलगतचे लेडिज बार उपस्थितीने धन्य करणारे गुंठा मंत्री, तर मरणपंथाला लागलेली इंडस्ट्री, पिचलेले कामगार. नितांत सुंदर डोंगर रांगा, भातशेती, तर नव्या मुंबईच्या एयरपोर्ट जवळ अशी जहिरात करुन तयार होणारी इमारतींची जंगलं..हे सगळं रायगड जिल्ह्याचं सद्यचित्र. उभा जिल्हा असल्याने आमच्या असोसिएशनच्या बैठका अंतरामुळे बारगळतात. आमचे कर्जत .रसायनी साईडचे डॉक्टर्स महाडला जाऊ शकत नाहित आणि त्यांना आम्ही लांब !! सध्या नागोठणे मध्यवर्ती समजतो आम्ही रायगड जिल्ह्याच्या !!
18 Jun 2014 - 8:50 pm | यशोधरा
धन्या, सविस्तर लिही जरा.
18 Jun 2014 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुरुवात छान केली. पण, लेख घाईघाईत आटपता का घेतला ? "क्रमशः" लिहीलं नाही तरी काही हरकत नाही... आन्दो पुढचे भाग :)
आणि हा रायगड जिल्ह्याचा नकाशा (जालावरून साभार)...
18 Jun 2014 - 10:40 pm | खटपट्या
आमचा सबंध रायगडशी गावी (राजापूर) जाताना येतो तेवढाच. मला आठवते ते वडखळ नाक्यावरचे ट्राफिक. पुढे गेल्यावर सुतासारखा सरळ रस्ता. माणगाव चे आनंद भुवन हॉटेल जिथे आम्ही नेहमी सुरमई फ्राय मागवतो. आता महामार्ग चौपदरी करायला घेतला आहे. कधी पूर्ण होणार देव जाणे पण काम चालू आहे.
मुंबई गोवा मार्ग पूर्ण चौपदरी झाल्यावर त्यावर प्रवास करणे एक पर्वणी असेल. (टोळ नसावा हि ईश्वरचरणी प्रार्थना)
18 Jun 2014 - 11:31 pm | धन्या
वडखळ नाक्यावर वळल्यावर पुढे अगदी सुतासारखा सरळ रस्ता आहे खरे. :)
आनंद भुवनचा दर्जा खुपच घसरला आहे. आम्ही बाटूला इंजिनीयरींगला असताना वर्गमित्र अधून मधून तिथे जेवायला जात असू. आता मात्र तिथल्या चांगल्या जेवणाच्या फक्त आठवणीच उरल्या आहेत.
18 Jun 2014 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा
@असा हा रायगड जिल्हा शेजारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारखे समृद्ध जिल्हे आणि शहरे सीमेवर असूनही काहीसा मागासच राहीला आहे.>>> ह्या वाक्याशी अत्यंत सहमत.
प्रामुख्यानी रस्ते..वीज..पाणी..आरोग्य सुविधा ह्या अत्ता अत्ता कुठे सार्वत्रिक होऊ लागल्या आहेत.(म्हसळ्याच्या कचकाऊन गर्दीमार्गाला..४/६वर्षापूर्वी झालेला..पर्यायी रस्ता,ही तर माझ्या दृष्टीने क्रांति'च आहे. ;) ) अनेक गावात अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण हे काहि वर्षांपूर्वी झालेलं आहे.तिथेही ट्यूबलाइट सारखे स्वच्छ पांढरा शुभ्र उजेड देणारे दिवे अत्ताशीक कुठे लागायला लागलेत.(आणि अजूनही बर्याच ठिकाणी खांबांच्या वर,डोक्यावर टोपली टाकलेले पिवळसर अंधुक उजेड देणारे गुलोप आहेत.त्या प्रकाशात वर्तमानपत्र वाचायला सुद्धा अर्धा खांब चढून -वर जावं लागेल.) जिथे सार्वजनिक नळकोंडाळी बसवलेली दिसतात,ती सरकारी यो जनांच्या फोटू/अहवालांपुरतीच बसवलेली असतात की काय ? अशी शंकाच येत नाही,तर खात्रीही पटते. रायगड जिह्यात जाणरे सगळे घाटरस्तेही गेल्या दहा वर्षात प्राथमिक अवस्था पूर्ण करू लागलेले आहेत..म्हणजे,,,हे सर्व-पुढच्या कोकण पट्ट्याच्या हिशेबात अत्यंत सं............................थ गतीनी चालू आहे,असं म्हटल्यास वावगं ठरू नये. चायनीजच्या टपर्या,स्वत देशी दारू,आणि मोबॉइल विक्री दुकाने..एव्ह्ढीच काय ती कानाकोपर्या पर्यंत पोहोचलेली आहेत. जुन्या चहा/चिवड्याच्या हाटेलांसारखी!
18 Jun 2014 - 11:35 pm | धन्या
म्हसळ्याचा बाह्यवळण रस्ता अक्षरशः वरदान आहे. म्हसळा गावातून जात असताना समोरुन एसटी आली की दिवसा डोळ्यांसमोर काजवे चमकतात. :D
18 Jun 2014 - 11:04 pm | मुक्त विहारि
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
18 Jun 2014 - 11:43 pm | धन्या
काही तांत्रिक कारणामुळे आज माझ्याकडे बराच वेळ होता. वेळ सत्कारणी लावावा म्हणून रायगडाबद्दल लिहायला सुरुवात केली मात्र त्या रुक्ष कार्यालयिन गजबजाटात पहिल्या परिच्छेदानंतर काही सुचेना. सुरु केलेलं लेखन थांबवायचीही ईच्छा नव्हती. त्यामुळे "रायगड जिल्ह्याची थोडक्यात ओळख" असा उद्देश समोर ठेऊन टंकत गेलो.
लेख बर्यापैकी रुक्ष झाला आहे याची जाणिव आहे. पुन्हा कधीतरी चांगलं लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे आभार. :)
19 Jun 2014 - 9:14 am | मुक्त विहारि
म्हणूनच म्हणालो,
की, पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत...
रायगड बद्दल अजून वाचायला नक्की आवडेल, वेशेषतः तुमच्या गावाबद्दल.
19 Jun 2014 - 2:57 pm | सूड
ओके...पण अजून लिही. पुभाप्र.
19 Jun 2014 - 7:45 am | स्पार्टाकस
पालीच्या बल्लाळेश्वराच्या मागे असलेला किल्ला हा सुधागड नसून सरसगड आहे. सुधागड पालीपासून सुमारे १५ कि.मी.वर आहे.
19 Jun 2014 - 1:10 pm | धन्या
दुरुस्तीसाठी आभार.
सुधागड हा पालीचा तालुका आहे.
19 Jun 2014 - 8:27 am | स्पार्टाकस
रायगड जिल्ह्याविषयी हे एवढंसंच ?
कित्येक गोष्टींचा उल्लेख राहून गेला आहे असं वाटतं.
रायगडाच्या जोडीला इतर अनेक किल्ले या जिल्ह्यात आहेत. अभेद्य जलदुर्ग असलेल्या जंजिर्याचा अनुल्लेख तर विशेष खटकणारा. त्याचप्रमाणे अलिबागचा जलदुर्ग, प्रबळगड, पेब, पेठ, ढाक बहिरी, रोह्याजवळची अवचितगड, घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी ही संपूर्ण रेंज, चंद्रगड-मंगळगड असे एकापेक्षा एक दुर्ग इथे आहेत. चंद्रगडाजवळील उमराठे हे तानाजी मालुसर्यांचे गाव.
शेखाडीवरुन श्रीवर्धनला जाणार्या रस्त्याप्रमाणेच रेवदंडा-मुरुड हा रस्ता जवळपास समुद्रकिनार्यानेच जातो. या मार्गाने जाताना मुरुडच्या आधी काही अंतरावर भर समुद्रात शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग नजरेस पडतो. अभेद्य जंजिर्यावर वचक ठेवण्यासाठी हा किल्ला राजांनी बांधला होता.
अष्टविनायकांपैकी पालीच्या जोडीला महडही रायगड जिल्ह्यातच आहे. त्याखेरीच अलिबागजवळचं बिर्ला मंदीर, नांदगावचं गणपती मंदीर, मुरुडचं डोंगरावरचं दत्तमंदीर, अलिबागजवळचं कणकेश्वर हे देखील प्रसिध्द आहे.
पुण्याबरोबरच रायगड जिल्ह्यातून घाटावर सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी अंबेनळी घाट आहे. हा घाट पोलादपूरहून प्रतापगडाच्या जवळून महाबळेश्वरमार्गे पाचगणी-वाई आणि सातार्याकडे जातो. ट्रेकर्ससाठी तर सह्याद्री चढून घाटमाथ्यावर पोहोचण्यासाठी अनेक वाटा आहेत. सवाष्णीचा घाट, नाणदांडा घाट, चंद्रगडावरुन आर्थरसीट पॉईंटकडे जाणारी वाट ही काही उदाहरणं.
अजूनही बरंच काही आहे..
19 Jun 2014 - 2:47 pm | धन्या
तुम्ही ट्रेकींगच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील गड किल्ले पालथे घातलेले दिसत आहेत.
माझा ट्रेकींगशी संबंध अगदी काल परवा आला, भटक्या मिपाकरांशी दोस्ती झाल्यानंतर. तोपर्यंत ट्रेकिंगचा ट सुद्धा मला माहिती नव्हता. त्यामुळे तुम्ही उल्लेख केलेले गड किल्ले, घाट वाट मला माहिती नाही. :)
19 Jun 2014 - 8:44 am | नाखु
धन्यवाद अशासाठी की जिल्हा गुणविशेष आणि विविधता यावर लक्ष्य ठेवून सुबक लेखाजोखा मांडला आहे.
आता जिल्ह्याविषयी सविस्तर लिहिलेच आहे तर ऊघडा आठवणींचा पेटारा आणि काढा बाहेर जरा अनवट चीजा (खास धन्याशेठ भाषेत) त्याकरीता अभिनंदन.
19 Jun 2014 - 10:17 am | प्रभाकर पेठकर
रायगड जिल्ह्याचा माहितीपट आवडला. थोडा सरकारी भाषेत झाला आहे. पण हरकत नाही. बर्यापैकी माहिती मिळते.
एका लेखात सर्व उरकण्यापेक्षा रत्नांगिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे दुर्ग, रस्ते, निसर्गसौंदर्य, खाद्यरसना, व्यवसाय, माणसे वगैरे वगैरे विषयांना स्पर्ष करीत आणि भरपूर छायाचित्रांची रेलेचेल उडवून देत समग्र रायगड जिल्हा नजरेसमोर उभा केल्यास विषयाला न्याय दिल्यासारखे होईल.
तुमच्या जवळ लेखनकला आहेच, जरा वेळातवेळ काढून मांडी ठोकून बसण्याची गरज आहे. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून सवड काढून एक अशी लेखमाला येऊ द्या की तो एक परिपूर्ण दस्ताऐवजच ठरावा. शुभेच्छा...!
19 Jun 2014 - 10:35 am | असा मी असामी
गाववाले रायगड ची मस्त माहिती. साने गुरुजी स्मारक मंदिर राहिले...
मी पण मुक्काम पोष्ट गोरेगांव. व्यनी करत आहे.
19 Jun 2014 - 11:35 am | बॅटमॅन
लेख चांगला पण त्रोटक. अजून अवश्य लिहा नंतर कधीतरी..
19 Jun 2014 - 1:18 pm | राही
असा मी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अनेक चांगले उपक्रम वडघर, माणगाव येथून चालतात. आंतरभारतीअनुवादसुविधा केंद्राच्या कार्यशाळा इथे भरतात. इथे अनुवादास मदत करू शकणारे एक सुसज्ज ग्रंथालय आहे. अनेक अनुवादित पुस्तके आहेत. रायगडच्या सुपुत्रांपैकी गागोदे येथील विनोबाजी, पालगडचे सानेगुरुजी, महामहोपाध्याय पां.वा. काणे यांचा उल्लेख राहिला. यांपैकी दोन भारतरत्ने आहेत. (नजिकच्याच आंजरले येथले महर्षि धोंडो केशव कर्वे हे आणखी एक भारतरत्न. शिवाय रँग्लर परांजपेही तेथीलच.) ही प्रचंड मानवसंपदा एवढ्याश्या भूभागात निपजली याचे आश्चर्य आणि कौतुक वाटते. रत्नागिरीला लो.टिळक आहेतच.
19 Jun 2014 - 3:19 pm | धन्या
साने गुरुजींचं स्मारक मंदिर माझ्या गावापासून दोन अडीच किमीवर आहे. मात्र स्मारकाबद्दल "साने गुरुजींचं काहीतरी आहे" या पलिकडे विशेष माहिती स्थानिकांना नाही. स्मारकवाल्यांनी आजुबाजूच्य खेडयांमध्ये पोहचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहण्यात, ऐकण्यात नाही.
19 Jun 2014 - 6:59 pm | स्पार्टाकस
अजून एक अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे पनवेल जवळील शिरढोण हे गाव.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान!
20 Jun 2014 - 12:22 am | राही
तारा येथील युसुफ मेहेरअली केंद्र, नेरे इथले शांतिवन, गागोद्याचा विनोबा आश्रम. सामाजिक उपक्र्म म्हणून ही स्थळे भेट देण्याजोगी आहेतच, शिवाय कुटिरोद्योगात बनवलेल्या अनेक गोष्टी इथे मिळतात. घाण्यावर काढलेले ताजे तिळाचे तेल, रसायने न वापरता बनवलेले साबण, नीम तेल, कडू बदाम तेल, राते तांदूळ, मध, पोह्याचे पापड, पोहे, घरगुती वापराच्या अनेक वस्तू, हातमागावर विणलेल्या चटया, सतरंज्या, आसने इथे मिळतात.
झाशीवाले (माझा प्रवास) गोडसे भटजी इथल्याच वरसईचे.
20 Jun 2014 - 7:19 am | चौकटराजा
आर> धन्या पन त्ये गरम पान्याचा कुंड र्हायलाच की ? आन आता पार नद्या काळ्या झाल्यात !
20 Jun 2014 - 4:38 pm | असा मी असामी
सव चे गरम पाण्याचे कुंड. आता आहे का नाही काय माहिती?
रामायणाचे इथे शुटींग झाले होते असे लहानपणी सांगायचे?
20 Jun 2014 - 4:46 pm | धन्या
लहाणपणी एकदा खरुज आली असताना घरच्यांनी सवला नेले होते, गरम पाण्याने आंघोळ करायला. तेव्हा आम्ही मुंबई गोवा महामार्गावर उतरुन होडीने सावित्री नदी ओलांडून सवला गेलो होतो.
20 Jun 2014 - 11:24 am | जागु
युसुफ मेहेर अली सेंटर
http://www.misalpav.com/node/18391 - भाग १
http://www.misalpav.com/node/18420 - भाग २
http://www.misalpav.com/node/18457 - भाग ३
20 Jun 2014 - 11:27 am | जागु
इथली माझ्या आवडीची गो ग्रिन नर्सरी. त्या साईडला गेले की मी इथे जातेच. पण आता बहुतेक ती हलवणार होते.
http://www.misalpav.com/node/18376
20 Jun 2014 - 10:36 pm | अजया
जागु,आपल्या आवडीची गो ग्रीन अजून तिथेच आहे.नुकतंच माझ्या घरच्या बागेचे काम त्यांनाच दिलं होतं.
20 Jun 2014 - 11:54 am | llपुण्याचे पेशवेll
छान माहीती. अजून येऊद्या.
20 Jun 2014 - 1:23 pm | प्रीत-मोहर
धन्या लेख अपुर्ण वाटलअ अरे.... अजुन येउदेत की
20 Jun 2014 - 10:46 pm | पैसा
ही फक्त सुरुवात आहे. तिथे उगवलेल्या गुन्हेगारीबद्दल, आणि इतरही खूप काही वाचायला आवडेल.
21 Jun 2014 - 12:16 pm | चौकटराजा
जरी बख्ख्ळ पयका देतो हिंजवडीचा माळ उघडा
गावाचा आठव देतो म्हणुनी पुजतो रायगडा
21 Jun 2014 - 6:19 pm | धन्या
खरं आहे काका. आयुष्याची पहिली बावीस वर्ष कोकणातील एका खेडेगावात गेली असल्यामुळे मनातून निसर्ग जात नाही. सुदैवाने माझ्या सध्याच्या हापिसाच्या मागच्या बाजूला गेले की मला निसर्ग भेटतो.