आंधळी कोशिंबीर - एक धमाल करमणूक

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
31 May 2014 - 2:56 pm

बापू सदावर्ते (अशोक सराफ) एक निवृत्त विधुर. एका मोठ्या बंगल्यात तो आपल्या रंगा (अनिकेत विश्वासराव) नावाच्या तरूण अविवाहीत मुलाबरोबर राहतो. बापू स्वतः अत्यंत काटकसरी व प्रचंड भांडकुदळ. भांडणात कोणालाही हार जात नाही.

शांती चिटणीस (वंदना गुप्ते) आपल्या वयात आलेल्या पण अत्यंत पोरकट असलेल्या राधिका (मृण्मयी देशपांडे) नावाच्या
मुलीबरोबर एकटीच राहणारी विधवा. ती सुद्धा प्रचंड भांडकुदळ. राधिका जराशी पोरकट, काहीशी अर्धवट.

तिच्या शेजारी दुष्यंत मारणे (आनंद इंगळे) हा अविवाहीत वकील आहे. त्याचा शांतीवर क्रश आहे. शांतीला पटविण्यासाठी तो तिला वेळोवेळी स्वतःच रचलेल्या कविता पाठवितो आणि राधिकाला सारखे मिठाईचे बॉक्स पाठवत राहतो. शांतीने फाडफाड बोलून त्याचा अपमान करून त्याला हाकलून सुद्धा तो तिचा नाद सोडत नाही.

रंगा एक टिपीकल नवयुवक आहे. बापाच्या पैशावर मनसोक्त उधळपट्टी करणारा. फोटो स्टुडिओ चालविणारा त्याचा वसंता (हेमंत ढोमे) नामक मित्र त्याच्यासारखाच. रंगाने वेळोवेळी गोरक्ष (हृषिकेश जोशी) नावाच्या टपोरी गुंडाकडून उसने पैसे घेतलेले असतात. गोरक्ष वडगाव, धायरी भागातल्या अंगावर भरपूर सोने बाळगणारा टिपीकल टपोरी गुंड राजकारणी. गोरक्षची बहीण (प्रिया बापट) हिला मॉडेलिंगचे वेड आहे. घरातल्या घरात वेगवेगळे रोल करून पाहणे हा तिचा छंद.

पैशासाठी गोरक्ष रंगाला तगादा लावतो व एक कल्पना सुचवितो. बापाचा बंगला गहाण टाकून आपले १३ लाख रूपये फेडावेत अशी कल्पना तो रंगाला सुचवितो. पण आपला बाप गहाण टाकण्याच्या कागदावर कधीही सही देणार नाही याची रंगाला कल्पना असते. पण बापाला वेडा ठरविला तर त्याच्याऐवजी रंगाची सही चालेल असे मारणे वकील सुचवितो.

बापाला वेडा ठरविण्यासाठी त्याला कोणीतरी भांडणात हरविणे आवश्यक आहे असे रंगाला वाटते. भांडणात हरल्यामुळे त्याला वैफल्य येऊन तो वेडा होईल अशी त्याची कल्पना. त्यासाठी तो आणि वसंता शांती चिटणीसला थाप मारतो की आपला बाप वेडा आहे व त्याच्याशी कोणतरी भांडले तरच तो पुर्ववत होईल आणि म्हणून शांतीने त्याच्या घरी जाऊन बापूशी जोरदार भांडण करावे असे तो शांतीला सुचवितो. इकडे रंगा आणि वसंता बापूला तीच थाप शांतीविषयी मारतात. शांती वेडी असून तिच्याबरोबर कोणीतरी भांडण केले तरच ती पूर्ववत होईल असे सांगून तिच्याशी भांडायला तो बापूला राजी करतो.

शांती बापूशी भांडायला येते आणि हळूहळू परिस्थितीला कलाटणी मिळते. ती कशी ते प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. इकडे रंगा गोरक्षच्या बहीणीच्या प्रेमात पडतो तर अर्धवट राधिका वसंताच्या प्रेमात पडते. शांतीला पटविण्याचे मारणे वकीलाचे प्रयत्न सुरूच असतात. बापू आणि शांती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. शेवट अपेक्षेप्रमाणेच गोड आहे.

चित्रपट एकंदरीत धमाल करमणूक आहे. चित्रपटात एकूण ३ गाणी आहेत व सर्व गाणी चित्रपटाच्या कथेला साजेशी आहेत. श्रीकांत मोघेही एका छोट्याश्या भूमिकेत चमकून जातो. मेंदू घरी ठेवून जास्त विचार न करता हा चित्रपट पाहिला तर पैसे नक्कीच वसूल होतील.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

31 May 2014 - 3:05 pm | मुक्त विहारि

तेव्हढाच टाइमपास..

सिनेमा आवडला तरी ठीक नाही आवडला तर ए.सी.त बसून झोप तरी घेईन...

आत्मशून्य's picture

31 May 2014 - 4:06 pm | आत्मशून्य

आवडला. मस्त.
- धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2014 - 4:02 pm | संजय क्षीरसागर

रिव्यूज उलटसुलट येतायंत.

श्रीगुरुजी's picture

31 May 2014 - 8:07 pm | श्रीगुरुजी

रिव्ह्यूज कसेही असले तरी मला हा चित्रपट आवडला. चित्रपटाला साजेशी रॉक स्टाईल गाणी आणि बालिशपणाचा अतिरेक करणारी अतिशय सुंदर दिसणारी मृण्मयी देशपांडे यांचा उल्लेख करायचा राहूनच गेला होता.

त्रिवेणी's picture

31 May 2014 - 7:48 pm | त्रिवेणी

उद्या जाणार आहे आं.को.ला

श्रीगुरुजी's picture

31 May 2014 - 8:05 pm | श्रीगुरुजी

लोकसत्तामध्ये आलेले हे सविस्तर परीक्षण

http://www.loksatta.com/manoranja-news/aandhali-koshimbir-marathi-movie-...

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जीवनपट त्याचबरोबर राजकारण आणि मनाला भिडणा-या विषयांवर सखोल भाष्य करणा-या चित्रपटांची रांग लागलेली असताना ब-याच कालावधीनंतर एक विनोदीपट प्रदर्शित झाला आहे. आंधळी कोशिंबीर आज प्रदर्शित झाला. बराच अवधीनंतर आंधळी कोशिंबीरच्या निमित्ताने पक्व परंतु सुसंस्कृत प्रासंगिक व भाषिक विनोद आणि घरातल्या सर्वांनाच हास्याचा आनंद देणारी कथा पाहावयास मिळणार आहे. समाजामध्ये अनेक नातेसंबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध विकसित होत असताना त्यांच्या जाणीवा, विचार बदलत असतात. जेव्हा असे चार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक कुटुंब बनते, तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशा गोंधळातून निर्माण झालेला विनोदीपट म्हणजे आंधळी कोशिंबीर.

ही कथा रेंगाळते ती आठ मुख्य पात्रांभोवती. भांडखोर स्वभाव असणारे बापू (अशोक सराफ) आणि त्यांचा मुलगा रंगा (अनिकेत विश्वासराव) हे एका प्रशस्त बंगल्यात राहत असतात. रंगाकडे काहीच काम नसल्यामुळे तो व्यवसाय करण्याच्या विचारात असतो. त्याला साथ लाभते ती त्याच्या वैचारीक मित्र वश्याची (हेमंत ढोमे). मात्र, प्रत्येक गोष्टी सांभाळून ठेवणारे अगदी गाडी घरात असूनही तिचा वापर न करणारे बापू रंगाला व्यवसायासाठी काही पैशाची मदत करत नाहीत. त्यामुळे हे दोघे गोरक्ष नावाच्या (ऋषिकेश जोशी) स्थानिक गुंडाकडून पैसे उधार घेतात. उधारी घेतलेल्या पैशांपेक्षा त्याचे व्याजच इतके होते की यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. आता हे कर्ज फेडायचे कसे म्हणून स्वतः गोरक्षच या दोघांना एक कल्पना सुचवतो. त्यासाठी ते बापूंचे घर त्यांच्या नकळत गहाण ठेवण्याचे ठरवतात. तेव्हा एन्ट्री होते ती वकिल मारणेची (आनंद इंगळे). पेशाने वकील पण मनाने कवी असलेला मारणे कॉलेजच्या दिवसापासूनच शांतीवर (वंदना गुप्ते) प्रेम करत असतो. दिवसभरात तिच्यावर डझनभर कविता करून तिला त्रास देणे आणि तिच्या फोटोची पूजा करणे हा मारणेचा दिनक्रम. शांतीला लग्नाच्या स्वप्नात सतत रमत असलेली मात्र डोक्याने अजूनही लहान अशी राधिका (मृण्मयी देशपांडे) मुलगी असते. आता या घोळात घोळ निर्माण होतो तो रंगा आणि वश्याच्या भन्नाट कल्पनेमुळे. बापूंकडून घराच्या कागदावर सह्या करून घ्यावयाच्या असल्याने रंगा-वश्या हे बापूचं आणि शांतीबाईंच भांडण लावायच ठरवतात. जोपर्यंत बापूंना भांडणात कोणी हरवत नाही तोपर्यंत त्यांचं खच्चीकरण होणार नाही, असा या दोघांचा समज असतो. आणि त्यांना भांडणात कोणी हरवू शकतं ते म्हणजे शांतीबाई. पण बापू-शांती भांडण करण्याऐवजी एकमेकांच्या प्रेमात पडतात. मूळतः हे दोघे वेडे असून ते त्यांच्या पहिल्या जोडीदारासारखे दिसत असल्याचे या दोघांना रंगा-वश्याने सांगितलेली असतं. प्रेमात पडल्यावर हे दोघ भांडणाऐवजी एकमेकांची अधिक काळजी घेऊ लागतात. मग त्यांना वेगळ करायला हवं या निर्णयावर पोहोचल्यावर हे दोघेही वेडे नसल्याचे सिद्ध करण्यासाठी म्हणून मंजूला (प्रिया बापट) रंगा घेऊन येतो. गोरक्षची बहिण मंजू हिच्या डोक्यात अभिनयाच खुळ असतं. प्रत्येक अभिनय हा खरा वाटला पाहिजे, असं मत असणारी मंजू रंगाची मदत करायला तयार होते. मदत कसली तिला तर तिचा अभिनय दाखविण्याची एक संधीच मिळते. पुढे सुरु होते ती नात्यांच्या गुंतागुंतीची आंधळी कोशिंबीर.

पुढे जाऊन यांच्या जोड्या कश्या बनतात.... शांतीबाई मारणेसोबत जातात की बापूंसोबत..... रंगाला घराच्या कागदांवर बापूंच्या सह्या मिळतात की अजून काही गोंधळ उडतो.... मंजू तिच्या अभिनयाची जादू चालविण्यात यशस्वी होते का... डोक्यात लग्नाच खुळ असलेली राधिका वश्याला आपल्या वशमध्ये करते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि निखळ हास्याचा आनंद लुटण्यासाठी हा चित्रपट पाहावयास हवा.
आंधळी कोशिंबीर... शीर्षकचं इतकं वेगळ आणि आकर्षक असल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरतो. नुसती ताणूनच धरत नाही तर चित्रपट पाहताना आपल्याला त्याचा पुरेपूर अनुभव त्यातील विनोदातून होतो. एखाद्याला रडवणं सोप पण हसवण कठीण म्हणतात ना. प्रेक्षकांना जबरदस्तीने हसवण्याचा अजिबात प्रयत्न न करता प्रत्येक विनोदाला टायमिंग आहे. त्यामुळे आपल्याला अगदी पोट धरुन हसू येईल याची काळजी लेखक आणि दिग्दर्शकाने घेतलेली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अवधूत गुप्तेने दिलेले शीर्षक गीत हे मराठीतील रॉक गीत झाले आहे. अवदूतचा आवाज म्हणजे रॉक संगीताला साजेसा. त्यामुळे अतिशय सुंदर आणि रॉकिंग चाल लाभलेले हे गीत आपल्याला त्याच्या तालावर थिरकायला भाग पाडते. जणू मराठीतील एक पार्टी साँग म्हणूनच हे वाजावल जाईल. अभिनय आणि अजिंक्य देव या दिग्दर्शक-अभिनेता बंधू जोडीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका नव्या जोडीची भर पडली आहे. ती म्हणजे आनंद आणि आदित्य इंगळे. पहिल्यांदाच दिग्दर्शन केलेल्या आदित्यच्या या चित्रपटात आनंद इंगळेने काम केले आहे. एक भाऊ दिग्दर्शक तर दुसरा अभिनेता. पण, आदित्यने पहिल्यांदाच दिग्दर्शन करूनही आपल्या कामाची कमान अतिशय उत्कृष्टरित्या पेलून एक धमाल चित्रपट तयार केला आहे. ब-याच कालावधीनंतर विनोदसम्राट अशोक सराफ हे विनोदी भूमिकेत पाहावयास मिळाले. त्यामुळे विनोदी भूमिकांपासून काहीकाळ दुरावलेले आणि आपल्या अभिनयाबाबत अतिशय चोखंदळ असलेले अशोक सराफ यांना पडद्यावर पाहताना आनंदच होतो. आपल्या चाहत्यांना अभिनयाने कसे मंत्रमुग्ध करावे हे त्यांना लिलया जमते. त्यांना तितकीच चांगली साथ मिळाली ती वंदना गुप्ते यांची. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांच्या छत्रछायेत अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, ऋषिकेश जोशी, आनंद इंगळे या कलाकारांचा अभिनयही तितकाच तोडीसतोड झाला आहे. मृण्मयी पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये दिसतेय. अगदी बालीश वाटणारी मृण्मयी मनाला मोहून जाते. सारांश काय तर चित्रपटाची पटकथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे तुम्हाला मनोरंजनाची पूर्ण हमी मिळते. आठ पात्रांमध्ये रंगलेली आंधळी कोशिंबीर ही या आठवड्याची मेजवानीच आहे.

सुधीर जी's picture

31 May 2014 - 8:22 pm | सुधीर जी

ज्याना आपले पैसे फुकट जावू नये असे वाटत असेल तर घाई करू नये इतक्यात हा चित्रपट
पाहण्याची
कारण सध्या मराठीत इतर विषयावरील खुप छान चित्रपट आले होते आणि येतील
पण विनोदाचा दर्जा पुर्विसारखा राहिला नाही

सिनेमा पाहावासा वाटतोय खरा.

मात्र - ”श्रीकांत मोघेही एका छोट्याश्या भूमिकेत चमकून जातो.” हे वाक्य खटकलं.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2014 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणावेसे वाटले पटकन, परंतु बाकी रसवर्णन बहारदार.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2014 - 11:56 am | llपुण्याचे पेशवेll

विशेषतः लक्षा आणि अशोक हे दोघेही पाचकळ चित्रपटांमधे काम केल्यामुळे बरेच बदनाम झाले असले तरी विनोदाचा हातोडा यांच्या इतका वेगात - अचूक कोणी चालवू शकेल असे वाटत नाही. अशोक सराफांनी हे आता देखील एक डाव आणि अन्य अनेक चित्रपटांमधून हे सिध्द केले आहे.

पैसा's picture

5 Jun 2014 - 11:42 pm | पैसा

एकदा टाईमपास म्हणून बघायला हरकत नाही.

प्रसाद१९७१'s picture

6 Jun 2014 - 1:05 pm | प्रसाद१९७१

अशोक सराफ ह्या माणसाच्या अभिनया बद्दल माझे अतिशय वाईट मत आहे. त्यामुळे तो असलेला सिनेमा, नाटक, सिरिअल बघत नाही. त्यामुळे पास.

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2014 - 1:21 pm | टवाळ कार्टा

अभ्यास वाढवा :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Jun 2014 - 10:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

+१०००००

इनिगोय's picture

16 Jun 2014 - 9:58 pm | इनिगोय

अशोक सराफ यांच्या उत्तम भूमिका असलेल्या चित्रपटांची नावं द्याल काय? चौकटराजा हे पटकन आठवलेलं एक नाव.

एक डाव भूताचा, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, लपंडाव (हा जालावर कुठे आहे का?) आणि रजंनाबरोबरचे बरचसे चित्रपट (मागे कोणीतरी रजंनाचे चि. इथेच दिले होते). त्यांच टाईमिंग खरचं खूप मस्त आहे. पण अमरीश पुरीला जसे खलनायकाचेच रोल देऊन देऊन एकच साचा बनवला गेला तसेच काहीसे अशोक सरांफाच्या बाबतीत विनोदी भुमिका देऊन झाल्याचे कुणीतरी जाणकार म्ह्टल्याचे आठवते आणि थांब थांब जाऊ नको लांब (पाहिला नाही :) ) सारख्या चित्रपटांवर त्यांचे नाव आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jun 2014 - 5:34 pm | llपुण्याचे पेशवेll

अशोक सराफ यांचे वजीर मधले काम देखील अप्रतिम. आपल्याला भौ लई आवडले. एक उनाड दिवस पण मस्तं.

सखी's picture

17 Jun 2014 - 6:09 pm | सखी

हो वजीर विसरलेच. तसेच आत्मविश्वास मधली त्यांची भूमिका छोटी होती का? कळत-नकळत सारखीच - त्यातली लहान भूमिका होती पण तोही चांगला होता.
मला नक्की आठवत नाही पण त्यांची सुरवातीची 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक ही भूमिका खूप गाजली होती का?

एस's picture

17 Jun 2014 - 6:17 pm | एस

कमाल आहे. अशोक सराफ यांच्या वाईट भूमिका असलेल्या चित्रपटांची नावे आठवताहेत का? ह्या माणसाचा वाईट अभिनय अजून पाहिलेला नाही. भूमिका कलाकाराच्या हातात नसतात. अभिनय असतो.

वजीरमध्ये "वेरी बीजी, वेरी वेरी बीजी" हा प्रसंग टाळता आला असता तर चार चांद लागले असते.

लपंडाव म्हणजे "तीन फुल्या तीन बदाम" वाला ना? आपलीमराठी.कॉम वर आहे.

अनुप ढेरे's picture

17 Jun 2014 - 6:34 pm | अनुप ढेरे

होय होय तोच तो...

सखी's picture

17 Jun 2014 - 6:39 pm | सखी

हो तोच तो, मला सापडला नव्हता मागे. घरी जाऊन बघते परत आता, ऑफीसात बॅन आहे.

चैतन्य ईन्या's picture

17 Jun 2014 - 6:42 pm | चैतन्य ईन्या

एक प्रामाणिक शंका हे टाईमिंग नक्की कशाला म्हणायचे? खरे तर सगळे डायलॉग्ज आधीच लिहिलेले असतात मग जो विनोद होतो फक्त अभिनयापासून नक्कीच होत नाही मग टाईमिंग कशाला म्हणायचे?

सखी's picture

17 Jun 2014 - 7:06 pm | सखी

सादरीकरण ही पण एक कला आहे, पटकथा नुसती वाचायचीच म्हटले तर कोणीही वाचु शकेल ना. त्यातुन परत काही काही अभिनेत्यांची एकमेकांशी केमेस्ट्रीपण असते, ते आपसुकपणे होत असावे पण नंतर ते अजुन मेहनतपण घेतच असणार. कधी बोलायचे, कधी थांबायचे, किती लांब पॉज घ्यायचा, प्रतिक्षिप्त क्रिया कशी आणि किती वेळ द्यायची ह्या सगळ्याचा अचुक परीणाम साधतं ते टाईमिंग असावं. मुळचं ऑल दी बेस्ट नाटक हे याचं खूप चांगल उदाहरण होतं एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे तिघे मुख्य कलाकार आणि एक मुलगी....त्या चारच कलाकारांनी खूप चांगली केमेस्ट्री साधली होती आणि प्रेक्षकांचे बारीक लक्ष असायचं आधंळा ह्ळुच बघतोय का किंवा मुका माणुस बोलतोय का यावर.
खालचे वाक्य विकीवरुन.
Comic timing is the use of rhythm, tempo and pausing to enhance comedy and humour. The pacing of the delivery of a joke can have a strong impact on its comedic effect, even altering its meaning; the same can also be true of more physical comedy such as slapstick.

प्रभाकर पेठकर's picture

19 Jun 2014 - 11:17 am | प्रभाकर पेठकर

>>>> कधी बोलायचे, कधी थांबायचे, किती लांब पॉज घ्यायचा, प्रतिक्षिप्त क्रिया कशी आणि किती वेळ द्यायची ह्या सगळ्याचा अचुक परीणाम साधतं ते टाईमिंग असावं.

टायमिंग हे संवादात, अभिनयात, दूसर्‍या कलाकाराच्या प्रतिक्रियेनंतर किंवा अभिनय्/संवाद ह्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून येतं. जेंव्हा एकूण प्रसंगाला उठाव मिळण्यासाठी अत्यंत योग्य प्रमाणात टायमिंगचा वापर केला जातो ते उत्तम टायमिंग. 'फार्स' ह्या नाट्यप्रकारात आशयापेक्षा संवादफेक आणि टायमिंग ह्याला फार महत्व असतं. ते चुकलं तर 'फार्स' परिणामकारक होत नाही.
अशोक सराफ हा रमेश पवार ह्या एकांकिका लेखक आणि अभिनेत्याच्या साथीने अभिनय क्षेत्रात आला. त्या काळी महाराष्ट्रात एकांकीका स्पर्धांमधून रमेश पवार ह्यांच्या एकांकीका (तसेच महेश एल्कुंचवार ह्यांच्याही) अनेक बक्षिसे मिळवून जायच्या. अशोक सराफ आणि रमेश पवार हे 'म्ह्या' नांवाची एकांकिका करायचे ती महाराष्ट्रभर गाजली. पुढे रमेश पवारांनी 'वरचा कानून' की अशाच कांही नांवाची कथा लिहून त्याचे नाट्यरुपांतर केले होते. त्यातही रमेश पवार सोबत अशोक सराफ ह्यांची भूमिका गाजली होती. नाटक पडलं पण अशोक सराफचा नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. तिथून पुढे मराठी चित्रपट अशी वाटचाल झाली. फार्स आणि रमेश पवार ह्यांच्या एकांकीकांमधून आल्यामुळे, त्यातल्या त्यात 'म्ह्या' गाजल्यामुळे फार्सिकल अभिनय हा अशोक सराफच्या अंगाअंगात भिनला. ह्याचा प्रत्यय त्याच्या 'हम पांच' ह्या हिन्दी मालीकेतही प्रभावीपणे जाणवला. दादा कोंडकेंच्या चित्रपटात 'म्हमद्या खाटीक' गाजला तो त्याच्या 'काटूं क्या?' ह्या सततच्या विचारणेने आणि त्यामागिल त्याच्या वैचारिक बैठकीतील विनोदामुळे. ह्या चित्रपटा दादा कोंडकेंनी अशोक सराफला आपल्या नियंत्रणात ठेवला. त्यामुळे म्हमद्या खाटिक आवडला. डोक्यात शिरला नाही. अशोक सराफला (निदान त्याकाळी) मो़कळा सोडला तर त्या अन त्याच अभिनयाने तो डोक्यात जातो. 'हम पांच' मध्येही सर्व पात्रांचा अभिनय आणि कथांमधी वैविध्य ह्याने मालीका गाजली. (विद्या बालन तिथूनच चित्रपट क्षेत्रात आली.) पण त्यातही पुढे पुढे अशोक सराफ ह्यांची एखाद्या संवादावरची/प्रसंगावरची प्रतिक्रिया काय असणार हे ओळखता येण्याइतपत त्याच्या अभिनयात एकसूरीपणा आला होता.

एकूण काय तर अशोक सराफ हा चांगला अभिनेता आहे पण त्यालाही मर्यादा आहेत. आणि दिग्दर्शक त्याला कसा नियंत्रणात ठेवतो ह्यावर त्याच्या भूमिकेचे (आणि पर्यायाने कलाकृतीचे) भवितव्य अवलंबून असते असे माझे व्यक्तिशः निरिक्षण आहे. (ते बरोबरच आहे असा दावा नाही.) अशोक सराफचा अभिनय प्रवास अगदी सुरुवातीपासून पाहिल्याने एवढे सगळे लिहावेसे वाटले. त्याकाळी रमेश पवार, अशोक सराफ ह्यांच्या सोबत नाटकांमधून अनिकेत विश्वासरावचे वडिल शेखर विश्वासराव हेही असायचे.

धन्या's picture

19 Jun 2014 - 6:43 pm | धन्या

काका, रमेश पवार हे नाव पहिल्यांदा ऐकतोय. त्यानंतर त्यांनी सिनेक्षेत्रात काम नाही केले का?

प्रभाकर पेठकर's picture

19 Jun 2014 - 8:28 pm | प्रभाकर पेठकर

रमेश पवार हे ७० च्या दशकातले एकांकिका लेखक आणि त्यांच्या स्वतःच्याच एकांकिकेत कामं करायचे. त्याकाळी त्यांच्या कांही एकांकिका महाराष्ट्रात अनेक स्पर्धांमधून निवडून आल्या होत्या. ते स्वतः विशेष नावाजले नाहीत. पुढे देशी दारूच्या आहारी जाऊन त्यांनी स्वतःचेच नुकसान करून घेतले.
त्यांच्या ग्रूप मध्ये अशोक सराफ, प्रदिप कबरे, शेखर विश्वासराव (अनिकेतचे वडील) वगैरे होते. आजकालच्या वाहिन्या सुरु व्हायच्या आधी मुंबई दूरदर्शनवर 'कामगार विश्व' मध्ये होणार्‍या एकांकीकात कधी कधी दिसायचे. विशेष नावाजले नाहीत. पण अशोक सराफ आणि कांही अंशी प्रदिप कबरे ह्यांच्या नाट्यक्षेत्रातील प्रवेशाला त्यांचा हातभार लागला.

धनंजय माने इथेच रहातात का ?

हे ज्या वेळेस , ज्या पद्धतीने लक्ष्य विचारतो ना .... त्याला टायमिंग म्हणयचा..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Jun 2014 - 1:53 am | निनाद मुक्काम प...

विनोदाचा दर्जा खालावला आहे ,
फु बाई फु फुकट दाखवत असतांना तसेस असे सिनेमे कालांतराने छोट्या पडद्यावर येत असतांना उगाच थेटरात जाऊन पाहण्याची काही गरज नाही ,
डोके बाजूला ठेवून पाहायचा झाला तर लय भारी पहा .
निदान रितेश ला पहिल्यांदा मराठीत तेही मारामारी करतांना
सलमान ला एका प्रसंगात पाहण्यासाठी गेला बाजारभाव
अजय अतुल चे संगीत ऐकण्यासाठी कारणे बरीच आहेत
ता,क
रंजना च्या शिवाय अशोक चा अभिनय पाहणे असह्य
अपवाद बनवा बनवी

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2014 - 12:37 pm | श्रीगुरुजी

अशोक सराफ हा चांगला अभिनेता आहे. त्याने रूढार्थाने फारश्या गंभीर भूमिका केल्या नाहीत. बहुसंख्य चित्रपटात त्याने विनोदी भूमिका साकारल्या आहेत. परंतु ज्या ज्या भूमिका त्याने केल्या, त्या सर्व भूमिकात त्याने चांगले काम केले आहे. सचिनने बनविलेला "सव्वाशेर" हा चित्रपट कोणी पाहिला आहे का? यात अशोक सराफ विनोदी भूमिकेत नसूनसुद्धा त्याने चांगले काम केले आहे. "चौकट राजा" व इतर काही चित्रपटात त्याने गंभीर भूमिका केल्या आहेत. त्यातही त्याने चांगले काम केले आहे. बहुतेक चित्रपटात तोच भाव खाऊन जायचा. त्यामुळे इतर काही अभिनेत्यांनी त्याचा धसका घेऊन पहिल्या चित्रपटानंतर त्याच्याबरोबर काम केले नाही. दादा कोंडकेच्या "तुमचं आमचं जमलं" मध्ये तो खलनायक होता. पण "राम राम गंगाराम" नंतर दादा कोंडकेने त्याला आपल्या चित्रपटात घेतले नाही. महेश कोठारेने देखील आपल्या पहिल्यावहिल्या "धूमधडाका" नंतर अशोक सराफला घेतले नाही. कारण उघड आहे. मुख्य नायकापेक्षा प्रेक्षकांना अशोक सराफच जास्त आवडायचा.

गवि's picture

19 Jun 2014 - 12:53 pm | गवि

अशोक सराफविषयी या प्रतिसादातल्या मताशी पूर्ण सहमत. काही अत्यंत रद्दड चित्रपट पाहतानाही त्यातला अशोक सराफ हा एकमेव अभिनेता बघण्यात तरीही आनंद मिळायचा. येतील त्या भूमिका स्वीकारायला लागणं हा व्यावसायिक आयुष्यातला भाग असेलही, पण जी भूमिका मिळालीय तिच्यात जीव ओतणं, अत्यंत उत्साहाने ती करणं हा गुण अशोक सराफ यांच्यात स्पष्ट दिसतो. इतर अनेक प्रसिद्ध अभिनेतेही रिलक्टंट वाटतात, तुझं झालं की माझी बोलण्याची पाळी .. माझं वाक्य टाकलं की आता तू बोल.. तोपर्यंत मी नामानिराळा.. असं असल्याप्रमाणे साचेबद्ध वाक्यं टाकतात पण चेहरा मधल्या सूक्ष्म क्षणात निर्विकार असतो. जणू रुटीन पाटी टाकल्यागत.. हे नाटकातल्या अभिनेत्यांबाबत फार जाणवतं. अशोक सराफ यांनी उत्स्फूर्तपणे सर्व संवादांत कंटिन्युइटी जमवली आहे. त्यांच्या समोर एकाच सीनमधे संवाद करणारे बरेच कलाकार निष्प्रभ दिसण्याचं किंवा उदासीन वाटण्याचं कारण हेच असावं की अशोक सराफच्या अभिनयात प्रचंड ऊर्जा असते.

सखी's picture

19 Jun 2014 - 8:07 pm | सखी

पेठकर काका, श्री गुरुजी आणि गवि - या निमित्ताने झालेल्या चर्चेत तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद आवडले.

अनुप ढेरे's picture

19 Jun 2014 - 11:43 pm | अनुप ढेरे

प्रतिसाद आवडला. पण अशोक सराफचे २००४-०५ नंतरचे जे चित्रपट आले, म्हणजे मराठी सिनेमे 'प्रगल्भ' झाल्यानंतर, त्यातला अभिनय मला नाही आवडला. ८०-९० मधले पिक्चर बघताना जी मजा येते ती नाही येत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Jun 2014 - 12:40 am | निनाद मुक्काम प...

पेठकर काकांना अनुमोदन
अशोक ह्यांचा अभिनय हा छापील झाला होता , कोणत्या प्रसंगी तो कसा अभिनय करेल हे कोणीही ताडू शकते , अत्यंत एकसुरी व रटाळ पणा आला होता , राजाचा विषय निघाला म्हणून सांगतो ,
दर दोन तीन वाक्या नंतर सुस्कारे टाकून टाकणाऱ्या अशोक समोर दिलीप प्रभावळकर अष्टपैलू अभिनयाचे उत्कृष्ट उदाहरण आहे ,
तात्या विंचू ते गांधी ते नारबाची वाडी ते आता येऊ घातलेला
पोस्टर बोइज दरवेळी पात्रानुसार अभिनय शैलीत वैविध्य असणारे अनेक जातिवंत कलाकार आपल्या सिनेमासृष्टीत आहेत. त्याची आणि सचिन ची जोडी ह्यासाठी जमते कारण दोघानाही आपली लाल करायला भयंकर आवडते ,
महेश कोठारे ह्यांच्या सिनेमात अशोक नसल्याचे जे कारण प्रतिसादात दिले आहे ते निखालस खोटे आहे.

त्याकाळात महेश व सचिन ह्याचा स्वतःचा कंपू होता व त्यांच्यात शीत युद्ध जोरात चालले होते.
अशोक सचिनच्या तर लक्ष्या महेश च्या कंपूचा हुकमाचा एक्का होता.
महेश च्या सिनेमात लक्ष्याची भूमिका दुय्यम असली तरी कथानक हे लक्ष्या भोवती केंद्रित असायचे किंबहुना त्याला डोळ्यासमोर ठेऊन माझ्या सिनेमांच्या कथा लिहिल्या गेल्या.
असे महेश ने स्वतः मुलाखतीत सांगितले आहे ,
महेश हा उत्कृष्ट नट नसला तरी एक उत्कृष्ट निर्माता होता,
अपवाद वगळता लक्ष्या व अशोक हे अनुक्रमे सचिन व महेश च्या होम प्रोडक्शन मध्ये दिसले नाहीत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Jun 2014 - 8:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लक्ष्या ने सचिनच्या चार चित्रपटात कामे केली. अपवाद कसा म्हणता येईल ??
बनवाबनवी, आमच्यासारखे आम्हीच, भुताचा भाऊ आणि एकापेक्षा एक