शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये...

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
6 Apr 2014 - 1:22 pm

लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा. म्हणजे प्रत्येक महान स्टोरीटेलिंग मधे सामान्य लोकांची असामान्य कामे असतात तसे सामान्य माशांनी केलेल्या असामान्य गोष्टी तुम्हाला कळतील.

झटपट उत्क्रांती -

पाण्याबाहेर काहीतरी इंटरेस्टिंग दिसते आहे असे अनेक पिढ्या पाहिल्यावर प्राचीन काळी पाण्यातून जलचर प्राणी बाहेर पडला व जमिनीवर चालू लागला त्याला बरीच वर्षे लागली असा आमचा समज होता. पण सध्याच्या इन्स्टंट युगात एवढा काळ थांबायला कोणाला वेळ आहे! येथे मासे पाण्यातून वर उचलले जाउन वादळाबरोबर गोलगोल फिरत असताना त्यांना पक्ष्यांप्रमाणे हवेतल्या हवेत झेप घेऊन भक्ष्य पकडताही येउ लागते. सुमारे हजार एक फुटांवर हवेत गोल गोल फिरत असलेल्या माशाला तेथून थेट खाली पत्र्याच्या वस्तूवर आपटल्यावर, अजिबात लागत नाही. बरं लागले नाही तर नाही, इतका वेळ चक्कर येइपर्यंत गोलगोल फिरतोय, धप्पकन एका टणक गोष्टीवर पडलोय, आजूबाजूला पाणी नाही, त्यामुळे श्वास घेणे अवघड - "मै कहाँ हूँ?" हा प्रश्नही पडत नाही. ती तोपर्यंत कधीही न पाहिलेली पत्र्याची वस्तू म्हणजे कार असून आत माणसे असणार व आपण ती खाऊ शकतो एवढे ज्ञान त्यांना लगेच येते. ते लिटरली आभाळातून पडले असल्याने काहीही करता येते त्यांना बहुधा.

डार्विन बिर्विन विसरा. इंटेलिजंट डिझाईन वाले उत्क्रांतीची थिअरी चुकीची आहे उगाच म्हणत नाहीत.

टोर्नेडोचा मात्र सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मधे विश्वास असावा. कारण आख्ख्या पॅसिफिक महासागरातून तो फक्त शार्क मासे उचलतो. दुसरे कोणतेही मासे, जलचर, दारूच्या बाटल्या, शेवाळ काही नाही. फक्त शार्क्स. तेही छोटी पिल्ले बिल्ले एकही नाही. सगळे फुल साईज.

एक "बोर्डवॉक" टाईप किनारा. राईड्स ई. एक विजेचा पाळणाही. तेथेच हीरोचा बार. पाणी किनार्‍यावर येउन आदळू लागते (फक्त क्लोज अप्स मधे. लांबून घेतलेल्या शॉट्स मधे एकदम शांत किनारा). हीरोच्या बार मधे डायरेक्ट खिडकीतून एक शार्क मासा येउन पडतो. त्याला स्वतः श्वास घेण्यापेक्षा लोकांना खाण्यात जास्त इंटरेस्ट. त्यामुळे हीरॉइनला त्याला मारावे लागते. पण नंतर बार्स च्या खिडक्यांमधून मासे येणे ही नेहमीचीच गोष्ट असल्याप्रमाणे सगळे गप्पा मारतात.

मग पाण्याच्या तडाख्याने तो विजेचा पाळणा निखळतो व मोठ्या चाकाप्रमाणे धावू लागतो. येथे "मागे वरती पाहात पुढे धावायचे" कौशल्य असलेले लोक - जे डायनोसोर, गॉडझिला वगैरे चित्रपटात पळतात- ते वापरले आहेत. एका रुंद (व कोरड्या) रस्त्यावर मागून पाळणा येत असताना आजूबाजूला न जाता त्याच रेषेत सरळ पळायचे हे अनेकदा अयशस्वी झालेले तंत्र वापरल्याने त्या चित्रपटांत जे होते तेच येथे होते. भौगोलिकदृष्ट्या समुद्रसपाटीकडून जमिनीकडे उतार असल्याने बीचवरचा पाळणा निखळला तर तो साहजिकच तिकडे घरंगळत जातो हे ही येथे सिद्ध होते.

एक रस्ता. त्यावर थोडे पाणी असल्याने शार्क्स आरामात फिरत आहेत. तेथे एका स्कूल बस मधल्या मुलांना वाचवून नायक दोरखंडावर चढत चालला आहे वरती पुलाकडे. वरती पुलावर पाणी बिणी तर नाहीच, लक्ख उजेड आहे. तो अर्ध्या अंतरावर असताना खालून एक मासा उडी मारून तो दोर तोंडात पकडतो आणि 'चेस' करायचा प्रयत्न करतो. आता हवेत असलेल्या माशाला मारायचे म्हणजे खालील पर्याय शिष्टसंमत आहेतः
१. काहीही करायचे नाही. तो दोन मिनीटांत हवेत आपोआप मरेल किंवा कंटाळून दोर सोडून देइल.
(२. त्याचे गुणगान करायचे. मग तोही काही बोलायचा प्रयत्न करेल. तोंडातून दोर सुटून पडेल. पंचतंत्र फेम उपाय.)
३. चाकूने दोर कापून त्याला पाण्यात पाडायचा व आपण माणसे वाचवतोय की मासे याबद्दल सस्पेन्स निर्माण करायचा.
तुम्ही ओळखलेच असेल की तिसरा उपाय केला जातो. मासा हवेत उडू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही याप्रमाणे माशाला मारण्यासाठी त्याला पाण्यात पाडणे हा सर्वोत्तम उपाय नाही हे कथेला मान्य नाही.

मग हीरोच्या फॅमिलीला वाचवायचे ठरते. हीरो, हीरॉइन व एक दोन इतर लोक एलए च्या आतील बाजूस असलेल्या भागात जातात. तेथे त्याचे घर व आधी दुरावलेली बायको व मुलगी राहात असते. अमेरिकन मूव्हीत नवरा बायको दुरावलेले नसणे ही चैन शक्यच नाही. त्यामुळे त्या ताराचा - नायकाच्या एक्स-बायकोचा- दुसरा नवरा/बॉयफ्रेण्ड तेथे असतो. साहजिकच ते याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. येथे शार्क कोठून येणार, आणि आले तरी येथील इमर्जन्सी सर्विसेस "Are second to none" असे त्या बॉयफ्रेण्डने म्हंटल्याम्हंटल्या लगेच बाहेर पूल मधे शार्क्स दिसतात व एक काच फोडून घरातही येतो. कोठून आला तो? घर तर टेकडीच्या उतारावर असते? आणि कोण असे अंगण्/स्विमिंग पूल च्या तुलनेत सखल जागेत घर बांधतात?

आता तो बॉफ्रेच "त्यातल्या त्यात व्हिलन" असल्याने शार्क त्याला मारतो. तो ही वाईट बिईट नसतो. जरा खउट असतो एवढेच. पण त्याला शार्कने मारल्यावर दोन मिनीटात सगळे काहीच न घडल्याप्रमाणे गप्पा मारतात. अरे, इतके दिवस तुम्ही एकत्र राहात होता ना? जरा स्मार्टXXX डॉयलॉग मारण्याआधी एक दोन अश्रू तरी ढाळा त्याच्यासाठी? हे लोक तेथून बाहेर पडल्यावर एक मिनीटात त्या सगळ्या नेबरहूड मधे फक्त यांचेच घर कोसळते.

मग अचानक त्यांना आठवते की हीरोचा एक मुलगाही तिकडे कोठेतरी आहे. त्यालाही घ्यायला निघतात. वाटेत तो स्कूलबसवाला शॉट येउन जातो. मुलाच्या वर्कशॉपमधे जरा थोडाफार वारा सोडला तर सगळे कोरडे आहे. तो मुलगा व त्याचे सहकारी का कोणास ठाऊक पण लपून बसलेले असतात. त्यांची शोधाशोध चालू होते. तेही जरा कोठून आवाज आला तर हातात गन सरसावून. हॅलो! तू वादळ, मासे वाल्या कथानकात आहेस. हा स्पाय थ्रिलर नव्हे. त्यात तू नायकाच्या मुलाला शोधत आहेस. जेथे पाणी नाही तेथे आवाज आला तर गन सरसावून जायचे कारण नाही.

वेअरहाउस मधे बॉम्ब बनवायचे व ते टोर्नेडो च्या आत टाकून उलटे प्रेशर निर्माण करून टोर्नेडो फुसका करून टाकायचा असा प्लॅन. कारण ते बार ओनर ई. असले तरी जात्याच स्फोटकांतले तज्ञ असल्याने ज्याला पाच मिनीटांपूर्वी टोर्नॅडो आले आहेत हेच माहीत नव्हते तो त्यांची क्षमता किती आहे व त्याची पॉवर नलिफाय करायला काय क्षमतेचा बॉम्ब लागेल हे सर्व अचूकपणे ठरवू शकतो.

तेवढ्यात एका सिनीयर सेंटरच्या स्विमिंग पूल मधे मासे पडू लागतात. दोन मजल्यावरून डाईव्ह मारणारा माणूस किमान काही फूट पाण्यात आत जातो तरंगायच्या आधी. येथे थेट हजार फुटांवरून सिनीयर्सच्या स्विमिंग पूल मधे पडणारे मासे पाण्याला स्पर्श झाल्याझाल्या जन्मापासून तेथेच असल्यासारखे पोहू लागतात. आता त्यांना मारायचे आहे. अं... पूल ड्रेन करता येतो ना? पण तेवढ्या आणखी उत्क्रांती होऊन चालू किंवा स्वतःहून उडू लागले तर कोण रिस्क घेणार? म्हणून मग नायक तेथे पेट्रोल सारखे काहीतरी ओतून तो पूल/टॅन्क पेटवून देतो.

आता हेलिकॉप्टर मधे नायिका व हीरोचा मुलगा चक्रीवादळाजवळ जातात. तेथे गेल्यावर लगेच जे बॉम्ब टाकायचे आहेत ते सीटवरून मागे वळून हात लांब करून घ्यावे लागतील असे ठेवलेले असतात. एकेक करून वादळांमधे बॉम्ब टाकले जातात व वादळ निकामी केले जाते. मात्र तिसर्या वादळाच्या वेळेस टायमिंग चुकते व नंतरच्या गडबडीत नायिका हेलिकॉप्टरमधून बाहेर फेकली जाते. त्यावेळेस स्वतः चक्रीवादळात गोल गोल फिरणारा एक मासा त्याही परिस्थितीत झेपावून तिला गिळतो. तो मुलगा कसाबसा हेलिकॉप्टर लॅण्ड करतो. मग हीरो ठरवतो की हे एकदाचे फिनिश करून टाकायचे. नक्की किती टोर्नेडोज आहेत याचे ज्ञान त्याला असते. सर्वांच्या सोयीसाठी तेथेच एक हेअरपिन टर्न असलेला रस्ता असतो व टोर्नेडो ला हेअरपिन टर्न्स आवडत नसल्याने तो ही त्याच्या दिशेने येत असतो. मग हीरो एका गाडीत एक बॉम्ब ठेवून ती गाडी त्या टर्न च्या जवळून सुसाट त्या वादळात सोडून देतो व आधी बाहेर उडी मारतो. अशा तर्हेने ते वादळ विरून जाते.

मात्र इकडे अजून वरून शार्क्स पडतच असतात. टोर्नेडोज तर संपले होते ना? पण वेळ काळाबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. कारण तो हीरोही गाडीतून जाताना जेवढा वेळ लागला, त्याहीपेक्षा लौकर चालत परत येतो. वरून शार्क्स पडत असताना नेमके त्याच्या मुलीला त्याच वेळी तिच्या कॅरेक्टर मधले flaws, anxieties, vulnerabilities ई दाखवायची हौस येते, त्यामुळे ती वरती लक्ष द्यायचे सोडून इतरत्र बघत बसते व एका वरतून पडणार्‍या शार्क च्या रेंज मधे येते. आता टोर्नेडो संपले आहेत, उरलेले शार्क्स वरून पडत आहेत. सर्वसामान्य माणसे अशा वेळेस एखाद्या भक्कम इमारतीत जाऊन पाच मिनीटे थांबतील. पण हीरोला तसे करून कसे चालेल? त्यामुळे तो तिला बाजूला करून एक "आरी" (चेन सॉ) घेऊन आ वासून येणार्‍या शार्कपुढे उभा राहतो, व त्याच्या पोटात शिरतो.

येथे बाजूला असलेली त्याची बायको "आश्चर्याचा धक्का बसला" हे एक्स्प्रेशन देते. तिने आख्ख्या चित्रपटात तोच एक शॉट फक्त दिलेला आहे. हिंदी चित्रपटात जसे हीरोला एक फाइट मारायला सांगून तो शॉट अनेक वेळा रिपीट करतात, तसे तिच्याकडून या चित्रपटाकरता तो फक्त एक शॉट करून घेतला असावा व तोच नेहमी रिपीट केला असेल. सगळे दु:खाने शार्ककडे बघत असताना आतून एकदम आरीचा आवाज येतो व हीरो त्याचे पोट फोडून बाहेर येतो. आता चित्रपट संपला असे वाटत असतानाच, हीरो पुन्हा शार्कच्या पोटात हात घालून आणखी एक व्यक्ती बाहेर काढतो. ती म्हणजे दुसरीतिसरी कोणी नसून १०-१५ मिनीटे आधी गिळली गेलेली नायिका असते, हा तोच शार्क असतो (दिग्दर्शक मनमोहन देसाई कडे शिकवणीला असावा). म्हणजे वादळ विरल्यानंतरही इतका वेळ तो शार्क विझलेल्या भुईचक्रासारखा १०-१५ मिनीटे हवेतच फिरत असावा.

चेन सॉ हातात असलेला माणूस जर प्रेमात पडलेला असेल तर तो महाडेंजर, हे त्या बिचार्‍या शार्कला कसे माहीत असणार? "प्यार करे आरी चलवाये, ऐसे आशिक से डरियो.." हे गाणे त्याने ऐकले नसावे.

येथे याचा ट्रेलर आहे. नेटवर कदाचित पूर्ण चित्रपटही मिळेल. अमेरिकेतील लोकांसाठी नेटफ्लिक्स वर आहे. टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही.
http://www.youtube.com/watch?v=iwsqFR5bh6Q

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Apr 2014 - 1:29 pm | पैसा

अरे हे काय आहे? केवळ भयानक!!! =))

पिशी अबोली's picture

6 Apr 2014 - 1:45 pm | पिशी अबोली

=))

प्यारे१'s picture

6 Apr 2014 - 1:50 pm | प्यारे१

___/\___

पहिले नमन फारएण्ड ज्यांनी आमच्यापर्यंत हा 'इचिपितर'पट पोचवला (बघून),
दुसरे चित्रपटाच्या कथाकारांना,
तिसरे निर्माता, दिग्दर्शक, कलाकारांना नि शेवटी शार्क आणि टोर्नेडोंना!
आणि आम्ही इतके दिवस फक्त 'थ/दलैवा'ला नि बाळकृष्णा (गुंडा सोडून नंतर) नमस्कार करत होतो!
आता ह्या चित्रपटाच्या पोस्टरला आम्ही आमच्या अंतःकरणात मोलाचं स्थान देऊ शकू.

आत्मशून्य's picture

6 Apr 2014 - 1:51 pm | आत्मशून्य

बाकी शार्क्स बहुदा नाकानेच श्वास घेतात, पाण्याने नाही यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

मराठी कथालेखक's picture

16 Jul 2014 - 5:23 pm | मराठी कथालेखक

नाकाने श्वास घेणारे बहूधा देवमासे (व्हेल) असावेत शार्क नाही. गुगल करायचा(ही) कंटाळा आलाय *boredom* त्यामुळे खात्रीने सांगत नाही.

मुक्त विहारि's picture

6 Apr 2014 - 2:38 pm | मुक्त विहारि

खतरनाक...

"टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही."

हे वाक्य तर कहर आहे.

सस्नेह's picture

6 Apr 2014 - 4:48 pm | सस्नेह

भन्नाट परिक्षण !
शेवट रोचक आहे !

खत्राड पिच्चर! जबराट परिक्षण!!

तुमचा अभिषेक's picture

6 Apr 2014 - 11:24 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा.. काय कसले आहे रे हे.. वाक्यावाक्याला हसायला येत होते.. फूल्ल टू विनोदी चित्रपट डो़ळ्यासमोर उभारला.. *lol*

बाकी तो मासा शार्क की काय तोच होता आणि तो उभयचर किंवा पाणी जमीन आणि हवा असा ट्रिपलचर नव्हता ना हे गूगाळून बघायला हवे ;)

स्पंदना's picture

7 Apr 2014 - 6:13 am | स्पंदना

या पिक्चरच पोस्टर पाहूनच खदाखदा हसले होते मी.
आता तुम्ही "आरी चलवाये" लावुन तर पार बुकणा पाडलाय त्याचा.
हे लेखण हॉलीवुड पर्यंत पोहोचेल का? उगा पैशाचा चुराडा करण्या ऐवजी कोठे तरी चाम्गल्या कामी येतील हे पैसे.

नितिन पाठे's picture

7 Apr 2014 - 1:36 pm | नितिन पाठे

इथे रजनीकांत असता तर.... पहिल्या पाच मिनिटात शार्क ची विल्हेवाट लावून टाकली असती...

वेल्लाभट's picture

7 Apr 2014 - 2:43 pm | वेल्लाभट

हाहाहाहाहाहाहाहा
हिलेरियस......... ह ह पु वा

येथे "मागे वरती पाहात पुढे धावायचे" कौशल्य असलेले लोक

हे वाचुन बराचश्या हॉलीवुड चित्रपटांची आठवण येऊन फस्स्स्कन हसू आले... =))

जबरा लेख... तबियत खुश झाली.

पिलीयन रायडर's picture

7 Apr 2014 - 3:37 pm | पिलीयन रायडर

काय लिहीलय.. जबरदस्त..!!!

चाकूने दोर कापून त्याला पाण्यात पाडायचा व आपण माणसे वाचवतोय की मासे याबद्दल सस्पेन्स निर्माण करायचा.

=))

राजो's picture

8 Apr 2014 - 9:40 am | राजो

एक लंबर परीक्षण..

अवांतर : मिथुनदांच्या चित्रपटांचे परिक्षण लिहाल का?

अजया's picture

8 Apr 2014 - 10:18 am | अजया

बघायलाच हवा!!!
=))

मृत्युन्जय's picture

8 Apr 2014 - 11:14 am | मृत्युन्जय

मी सुन्न झालोय. मी जानी दुश्मन बघितला, गायब बघितला, मृत्युदाता बघितला, गुंडा बघितला, धूम ३ बघितला, क्लर्क बघितला पण इतका सुन्न कधीही झालो नव्हतो जेव्हढा हे परीक्षण वाचुन झालो आहे.

मिथुन्दांच्यां एका चित्रपटात एक प्रसंग आहे, त्यात मिथुनदांना ब्रेन ट्युमर असतो. शेवटच्या मारामारीत विलन त्यांना बरोबर डोक्यात गोळी मारतो. त्याही अवस्थेत मिथुन त्या व्हिलनला गळा आवळुन वगैरे मारतो. मग दांना हास्पिटालात नेतात. तिथे डॉकटर गोळी काढण्यासाठी त्यांचे ऑपरेशन करतो आणी बाहेर येउन सांगतो की "बधाई हो. ऑपरेशन सक्सेसफुल रहा. हमने गोली के साथ ट्युमर भी निकाल दिया है." इतकी वर्षे मी याच सीन ने भारावलेला होतो. पण १५ मिनिटापुर्वी शार्कने गिळलेली नायिका हिरो शार्कचे पोट फाडुन बाहेर काढतो हे ऐकल्यावर माझ्यातला सगळे महान हिंदी पिक्चर बघुन पचवल्याचा अहंगंड गळुन पडला आहे. हा असा शक्य महान चित्रपट बघितल्याशिवाय आता मला अन्नपाणी गोड लागायचे नाही.

बाकी फारएण्ड काकांनी अजुन एक फाडु परीक्षण लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्यांना साष्टांग नमस्कार. ही चिरफाड हिरो ने शार्कच्या केलेल्या चिरफाडीच्या तोडीस तोड आहे.

मी चित्रपटाची डीव्हीडी शोधायला चाललो आहे. :)

चेन सॉ हातात असलेला माणूस जर प्रेमात पडलेला असेल तर तो महाडेंजर, हे त्या बिचार्‍या शार्कला कसे माहीत असणार? "प्यार करे आरी चलवाये, ऐसे आशिक से डरियो.." हे गाणे त्याने ऐकले नसावे.

येथे याचा ट्रेलर आहे. नेटवर कदाचित पूर्ण चित्रपटही मिळेल. अमेरिकेतील लोकांसाठी नेटफ्लिक्स वर आहे. टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही.

हसून, हसून पोट दुखायला लागले!

प्रचंड हसवणारे परीक्षण.. फारएन्ड स्टाईल.

हा टीव्हीसाठी बनवलेला बी सिनेमा (B Cinema) आहे.(बी ग्रेड मूव्ही ही भारतीय सिनेमातली कल्पना ती हीच का??)

आणि या चित्रपटाचा दुसरा भागही यावर्षी येतो आहे असे यासंबंधित विकीपानावर वाचले.. (का.. का .. का गेलो मी तिथे..??)

तिमा's picture

8 Apr 2014 - 7:43 pm | तिमा

नेहमीप्रमाणेच तुम्ही बहार उडवून दिली आहे. आता 'स्नेक्स ऑन ए प्लेन' या चित्रपटाचेही परीक्षण लिहा.

प्रीत-मोहर's picture

8 Apr 2014 - 8:14 pm | प्रीत-मोहर

टिप्पीकल फारँडी चिरफाड. अर्थातच आवडली हेवेसांनल.

शुचि's picture

9 Apr 2014 - 7:02 pm | शुचि

खदखदून हसले.

वरून शार्क्स पडत असताना नेमके त्याच्या मुलीला त्याच वेळी तिच्या कॅरेक्टर मधले flaws, anxieties, vulnerabilities ई दाखवायची हौस येते, त्यामुळे ती वरती लक्ष द्यायचे सोडून इतरत्र बघत बसते

हे वाक्य तर भारीच :D

Pain's picture

2 May 2014 - 11:55 am | Pain

फार आवडले!

अनन्त अवधुत's picture

16 Jul 2014 - 3:49 am | अनन्त अवधुत

नुकताच मिस्ट्री सायन्स थिएटरचा "शार्कनेडो" शो पहिला. त्यात त्या तिघांनी शार्कनेडोची पुरती चिरफाड केली आहे. हसून हसून पुरेवाट झाली. एकदम धमाल.
शार्कनेडो २ पण येतोय

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2014 - 1:06 pm | स्वाती दिनेश

एकदम फार एंड स्टाइल... भन्नाट परीक्षण.. हसता हसता खुर्चीतून पडले..
स्वाती

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jul 2014 - 1:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त परीक्षण...जालावर शोधुन चित्रपट बघितला जाईल

मराठी कथालेखक's picture

16 Jul 2014 - 5:20 pm | मराठी कथालेखक

मस्त परीक्षण...
लॉजिक गुंडाळून ठेवायचं ही भारतीय सिनेमांचीच मक्तेदारी नाहीये तर.. !!