विज्ञानाच्या चष्म्यातून जाती

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
21 Mar 2014 - 10:35 am

तुमचे पूर्वज किती ?

स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे . आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे .

चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप असू द्या . आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत . तुमचे पूर्वज किती ? तुमच्या पूर्वजांच्या संख्येत जातीव्यवस्थेचे गुपित दडले आहे . आई आणि बाप हे दोन पूर्वज झाले . आजी आजोबा दोन्हीकडचे पकडले तर ४ होतात आणि दोन पिढ्यांमागे पुर्वजांची संख्या होते ४. तीन पिढ्या मागे गेले तर हि संख्या आठ वर जाते . आपल्या पैकी प्रत्येकाला आठ पणजी पणजोबा आहेत . हि संख्या भूमितीय गतीने वाढत जाते. जितक्या पिढ्या मागे जायचे आहे तितक्या वेळेला दोन या संख्येला दोन ने गुणायचे आहे . साधे शाळेतले गणित ! आजी आजोबांच्या पिढीत म्हणजेच दोन पिढ्या मागे आपल्या पूर्वजांची संख्या दोनाचा दुसरा घात = ४ एव्हढी असते. तीन पिढ्या मागे गेले तर पूर्वजांची संख्या ८ आहे . चार पिढया पूर्वी दोनाचा चौथा घात म्हणजे आपले १६ पूर्वज होतात . इथ पर्यंत ठीक आहे . जितक्या पिढ्या मागे जायचे तितक्या वेळेला दोन ला दोन ने गुणले कि आपल्याला पूर्वजांची संख्या मिळते . ज्या पिढीतल्या पूर्वजांची संख्या शोधायची आहे त्या संख्ये एव्हढा दोनाचा घात त्या पिढीतल्या आपल्या पूर्वजांची संख्या दाखवेल हे गणिती सूत्र आपल्याला मिळाले !

पण जातीचा अभिमान केवळ या सोळा पूर्वजा पर्यंतच मर्यादित नाही . प्रत्येक जातीला कमीत कमी दोन हजार वर्षापुर्वीच्या पुर्वाजाबद्दल प्रेम वाटत असते . त्यांचा अभिमान वाटत असतो . आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या अपमानाचे उट्टेहि काढायचे असतात .

1) गणित पहिले : अफ़ाट पुर्वज

साधारण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . खरे तर इतिहासात यापेक्षा लवकर मुले होत आली आहेत . तरी आपल्या गणिताच्या सोयीसाठी आपण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . म्हणजे शंभर वर्षात चार पिढ्या झाल्या. हजार वर्षात चाळीस पिढ्या होतील . आणि दोन हजार वर्षात ८० पिढ्या होतात . आणि आपण आधीच सिद्ध केल्यानुसार दोन हजार वर्षापूर्वी तुमच्या पूर्वजांची संख्या मोजण्याचे सूत्र आपल्याला ठाउक झाले आहेच . ती संख्या येईल दोनाचा ८० वा घात . दोन ला ८० वेळा दोन ने गुणायचे आहे . इथे मात्र आपल्याला सायनटिफ़िक केलक्युलेटर लागणार आहे. एक्स चा वाय वा घात काढण्याचे एक बटण त्या केलक्युलेटर वर आहे . २ चा ८० वा घात = 1208925819614629174706176 अशी एक अगडबंब संख्या मिळते . हि संख्या आपण वाचूही शकत नाही . आजही पृथ्वीची तेव्हढि लोकसंख्या नाही . बरे हे पूर्वज एका माणसाचे झाले बरका ! आजच्या सर्व माणसांचे पूर्वज याच गणिताने काढले आणि त्यांची बेरीज केली तर तेव्हढि माणसे उभी करायला शंभर पृथ्व्यांचे क्षेत्रफ़ळ हि पुरणार नाही . या पहिल्या गणिती संकल्पनेला अफ़ाट पुर्वज असे नाव देऊ . काहीतरी चुकते आहे नक्की ! नेमके काय चुकते आहे ? ? ते पुढे पाहूच … पण स्वत:ची जात आणि पूर्वज याविषयी थोडा वेगळा विचार करावा लागणार हे नक्की .... !! .

a

नातेवाइकात अंतर्गत लग्ने होतात .

एकाच कुटुंबात लग्ने होत असतात . आणि आपण ज्यांच्याशी लगिन करू शकतो असे आपले रक्त बांधव म्हणजेच "जात" हे तर आपण विसरूनच गेलो कि ! अनेक जातीत विवाह करण्यापूर्वी पदर जुळवण्याचा विधी आहे . आपल्या आधीच्या पिढ्यात कोणि नातेवाइकानि लग्न केले आहे का ? हे तपासले जाते आणि मग तसा पदर आधीच्या पिढीत जुळला असेल तरच लग्न केले जाते . म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यात नातेवाइकात लग्ने झालेली आहेत . दूरचे चुलत मावस भाऊ बहिण लग्न करत असतात त्यामुळे आपले पूर्वज अगडबंब संख्येत नसतात . समजा तीन पिढ्यांपूर्व आपल्या सोळा पुर्वाजात कोणि चुलत मावस सोयरिक जुळवली असेल तर चार पिढ्या पूर्वीच्या पणजोबांची संख्या कमी भरते…. कारण चुलत मावस बहिण भावांचे काही पणजोबा समान असणार आहेत . चला म्हणजे आपल्या पूर्वजांची संख्या 1208925819614629174706176 एव्हढी अगडबंब नाही . नात्यातल्या लग्नांना धन्यवाद ! नाइतर लई पितरांचे पारणे फेडत बसावे लागले असते !

चला. पुन्हा एकदा आरामखुर्चीत रेला . गरम वाफ़ाळत्या कॉफीचा अजून एक घुटका घ्या . आता आपण उलटे गणित करणार आहोत . आपले आधीचे गणित साफ चुकले आहे . नव्याने विचार करावा लागणार आहे . दर वर्षी पृथ्वीची लोकसंख्या वाढत जाते हे आपल्याला माहित आहे. म्हणजे दर एक पिढीत मागे मागे गेले कि पूर्वजांची संख्या कमी कमी होत गेली पाहिजे कारण साधारणत : एकापेक्षा जास्त मुले होण्याकडे कल असतो . चार पोरांचे आईबाप दोन असतात म्हणजे मागच्या पिढीत पुर्व जांची संख्या वर्ग मुळा एव्हढी झाली ! पूर्वीचे गणित प्रत्यक्षात उलटे चाललेले दिसते ! मगाशी आपण एका व्यक्तीच्या पूर्वजांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला . आता उलटा विचार करू या .

आजच्या सर्व पृथ्वीवरच्या माणसांचे पूर्वज किती होते ?

ते शोधून काढु ! विचार करायला सोपे जावे म्हणुन उदाहरणार्थ एक छोटे गाव घेऊ .

2 ) गणित दुसरे : दोनच पूर्वज : आदम आणि इव्ह

पश्चिम महाराष्ट्रातले एक गाव सावरखेड ! चला तर या काल्पनिक गावात समजा आज पाचशे लोक रहात आहेत . आधीच्या पिढीत किती बरे लोक रहात असतील ? समजा या गावाची लोकसंख्या स्थिर आहे . गेले कित्येक वर्षे इथे ५०० च लोक राहतात . मग आजच्या ५०० लोकांचे पूर्वज किती ? इथे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत .

१) काही लोक नपुंसक असतात .
२) काही लग्ना आधीच मारून जातात
३) काहीची मुले लवकर मरतात

म्हणजे आजच्या पाचशे लोकांचे पूर्वज किती ? काही लोकाना स्वत:चे वंशसातत्य राखता येत नाही हे लक्षात घेतले तर सहज लक्षात येईल कि ५०० लोकांचे पूर्वज ५०० पेक्षा कमी असणार ! काही वंश प्रत्येक पिढीत नामशेष होणार . आपल्या गणिताच्या सोयीसाठी . ५०० लोकांचे पूर्वज ४९० आहेत असे मानु ! दहा लोक दर पिढीत नपुंसक तरी निघतात किंवा मुले होण्या आधीच खपतात .

एक पिढी पूर्वीचा इतिहास पाहिला तर सावरखेडात ५०० च लोक राहत होते पण ते सर्व आजच्या सावरखेड करांचे पूर्वज नाहीत . दहा लोकांचा वंश नाश झालेला आहे . म्हणजे आजच्या जिवंत पाचशे लोकांचे एका पिढी पूर्वी ४९० वंशज होते. दोन पिढ्यांपूर्वी देखील वंश नाशाचा जीवशास्त्रीय नियम लागू होतोच ! दोन पिढ्या मागे गेले तर विस वंशाचे सातत्य तुटले आहे . आणि आजच्या ५०० जिवंत लोकांचे उगमस्थान म्हणजे दोन पिढ्यान पूर्वीचे ४८० लोक . कोणत्याहि कुटुंबाची वंशावळ पाहिली तर मुले न झालेले असे अनेक विवाहित आणि अविवाहित लोक दिसतील .

b

आजच्या लोकसंखेचे पालकत्व कमी पूर्वजांकडे असते हा मुद्दा आहे . जर पन्नास पिढ्या मागे गेले . आणि दर पिढीत दहा लोकांचे वंश सातत्य तुटते असे मानले तर आजच्या सावरखेड गावाचे सर्व लोक एकाच माता पित्याची आपत्ये आहेत. हे झाले सावरखेडचे आदम आणि इव्ह ! याला आपण आदम इव्हचे गणित म्हणु .

हे गणित फार विण्ट्रेस्टिंग आहे ! समजा दर पिढीत दहा नाही एकाच माणसाचे वंश सातत्य तुटते असे मानले तर पन्नास पिढ्यापुर्वि आजच्या लोक संख्येचे ४९० पूर्वज होते असे मानणे भाग आहे . पण मग ५०० पिढ्यांपूर्वी काय ? पुन्हा आपल्याला सावर खेडचे ५०० पिढ्या जुने दोनच आदम इव्ह मिळतात ! म्हण्जे सवाल फकस्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच आहे ! गावाची लोकसंख्या कितीही असो ! नपुंसकांची संख्या कितीही असो ! पुरेशा पिढ्या मागे गेले कि सर्वांचे कोमन आई बापच मिळणार आहेत . फकस्त जरा जास्त पिढ्या मागे जावे लागेल ! म्हणजे प्रत्येक गावातले सर्व लोक एकमेकांचे बांधव आहेत हे मानणे भाग आहे .

हे गणितही उघडच चुकले आहे ! कारण गावाबाहेर लग्ने होतातच . आपले गृहीतकच चुकले होते . च्यामारी ! पण हाच नियम सार्या पृथ्वी लाच लागू केला तर ? पृथ्वीबाहेर लग्न करण्याची पद्धत नाही . दर पिढीत काही लोक नपुंसक निघणारच. काही वंशांचा नाश होणारच . आणि पुरेशा पिढ्या मागे गेले तर आजच्या सर्व मानव जातीचे समान पुर्वज मिळतील !

आरामखुर्चीत रेलून कॉफीचे घुटके घेत आपण मानवता सिद्ध केली आहे आणि जातिवाद खोटा ठरवला आहे ! थांबा एका मिनिटासाठी काहीतरी चुकते आहे हे नक्की .... !!

3 ) दोनही गणितांचा मसावि : मानवाची वैज्ञानिक महामाय

आपले पूर्वज संख्येने भरपूर आहेत . त्यांनी परस्परात लग्ने केलेली आहेत आणि अनेक मानवांना स्वत:चे वंश सातत्य राखता येत नाही हे आपण वरील दोन्ही शक्यतात पडताळून पाहिले . या दोन्ही गणिती प्रक्रिया जीवशास्त्रात एकाच वेळी चालू आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे .

पृथ्वीची लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे . याचाच दुसरा अर्थ असा की दर सेकंदाला आजच्या जिवंत माणसांच्या वंश सातत्यातल्या पूर्वजांची संख्या कमी होते आहे . फक्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच हिशेब बाकी आहे . मानवाच्या पुरेशा पिढ्या होऊन गेल्या … कि आजच्या भूतलावरची सर्व ,माणसे एकाच मातेची लेकरे उरणार हे उघड आहे .

c

आता प्रश्न असा आहे कि खरोखर मानवाच्या इतक्या पिढ्या होऊन गेल्या आहेत का ? उत्तर होय असे आहे !

आजच्या मानवाची मूळ माता ९९००० ते २००००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत असावी . मात्र तिच्या काळातील ती एकमेव स्त्री नव्हती. फक्त तिची माता सोडून इतर स्त्रियांना आजच्या एखाद्या जिवंत स्त्री पर्यंत अखंड वंश साखळी निर्माण करता आली नाही . तसेच हि मूळ माता हि एक पदवी असून विशिष्ठ स्त्रीच मूळ माता असेही ठाम सांगता येत नाही . कारण मूळ माता ठरण्यासाठी तिला अखंड वंश सातत्य असलेल्या किमान दोन मुली असणे आवश्यक असते . जेव्हा एखाद्या वंश रेषेतील शेवटची स्त्री मारते तेव्हा हे वंश सातत्य खंडित झाल्याने मूळ माता पदवी पुढच्या पिढीकडे सरकते . म्हणजेच मूळ माता हि विशिष्ट व्यक्ती नसून कालांतराने बदलू शकणारी व्यक्ती असते .

या स्त्रीला पिढीगणिक बदलू शकणारी कॉमन मदर इव्ह - वैज्ञानिक महामाय म्हणतात .

थोडक्यात सर्व मानवांची आई एकाच आहे . मग बापाचे काय ?

खरी गम्मत इथून सुरु होते . हि जी कोणि काळानुसार बदलणारी वैज्ञानिक महामाय आहे ती केवळ आरामखुर्चीत कॉफीचे घुटके घेत - मेंदूचे व्यायाम करत गवसलेली नाही . त्यासाठी शास्त्रज्ञांनी जगातल्या १३५ भिन्न भिन्न जमातींच्या स्त्रियांचे रक्त तपासले आहे . मायटोकोण्ड्रिया म्हणजे पेशीचे उर्जा केंद्र . आपल्या डी एन ए चा अर्धा भाग पित्याकडून आणि अर्धा भाग मातेकडून येत असतो . मात्र आपणा सर्वाना हे मायटोकोण्ड्रिया मात्र फक्त मातेकडून मिळत असतात. म्हणजे आजच्या सर्व प्रजातीच्या स्त्रियात आणि पुरुषात असलेले मायटोकोण्ड्रिया त्याना त्याच्या मातेपासून मिळाले आहेत . शास्त्रज्ञांनी पिग्मी ते अंदमानी आदिवासी ते आफ्रिकन ते युरोपियन अशा सर्व भिन्न १३५ प्रजातींच्या स्त्रियांचे मायटोकोण्ड्रियल डी एन ए तपासले . त्यात दर पिढीत होणारे म्युटेशन आणि मोलेक्युलर क्लोक यांच्या अभ्यासावरून निश्कर्ष काढले . त्यानुसार हि मायटोकोण्ड्रियल कॉमन मदर इव्ह - वैज्ञानिक महामाय सिद्ध केलेली आहे.हि थेअरि बायबल च्या विरुद्द असल्याने धर्म मार्तण्ड सन्तप्त आहेत।

.

मानवाच्या दर पिढीत काही वंशाचा नाश होत असल्याने हि महामाय दर पिढीतही बदलू शकते ! म्हणजे आजचे सर्व मानवांची माता मिळते पण पिता नाही . कारण दर पिढीत गुणुसुत्रे बदलत असतात . लग्न केल्याने त्यांचे मिश्रण होत असते . त्यामुळे आपल्या रक्तात अनेक पुरुष पूर्वजांची गुणसुत्रे खेळत असतात . आणि तत्कालीन महामायेचा तत्कालीन पती तत्कालीन बाप असतो !

आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे यांचा अभिमान बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे "आदम इव्ह" हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !

Ref : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins

विज्ञानविचार

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Mar 2014 - 10:55 am | llपुण्याचे पेशवेll

वैज्ञानिक माहीती उत्तम पण त्यावरून काढलेले निष्कर्ष नेहेमीप्रमाणेच विनोदी. पण तुमच्या लेखातून खूप उत्तम माहिती खूप कमी श्रमात आम्हाला मिळते. कारण ती सगळी वाचण्याचे, संकलनाचे आणि नेटके पणाने मांडण्याचे परिश्रम तुम्ही आधीच घेतलेले असतात. परंतु निष्कर्ष मात्र कायम एका विशिष्ठ प्रकारेच विचार केल्याने थोडेसे गंडलेले वाटतात. पण असो.

मारकुटे's picture

23 Mar 2014 - 2:34 pm | मारकुटे

अगदी सहमत आहे. आणि काही करुन सर्वसमावेशक धर्माविरुद्ध बोलणे सिद्ध करण्यासाठी बायबल कुराण वेद एका पंक्तीत बसवून धंतड तत्त्ड टेर्‍या बडवायच्या. मुदलात तिन्ही ग्रंथ वाचणे सोडा हात लावूनही पाहिलेले आहेत की नाही ही शंकाच असते. असो. एकच एक विज्ञान एके विज्ञान घोकणार्‍या आणि विज्ञानानेच जग तरणार आहे नाही तर ते बुडलेच ब्वा अशा भ्रामक विचारांच्या अंधश्रद्ध विज्ञानवाद्यांमुळे सध्या करमणुक छान होते हे मात्र नक्की :)

प्यारे१'s picture

2 Apr 2014 - 1:57 pm | प्यारे१

+१०८,७८६,०००

मूकवाचक's picture

29 Mar 2014 - 5:36 am | मूकवाचक

+१

पिलीयन रायडर's picture

21 Mar 2014 - 11:00 am | पिलीयन रायडर

छान आहे लेक।.. अगदी सगळाच नीट वाचला नाही अजुन.. पण मुद्दा समजलाय..

पण तसंही.. जात ही घरातल्या संस्काराशीच निगडीत असते.. उद्या हिंदु माळ्याचा मुलगा समजा अगदी मुसलमान घरात चुकुन वाढला, तरी तो वागणार बोलणार मुसलमाना सारखा.. तेच त्याच्या जातीच लक्षण आहे. आणि आपल्या जातीला / समाजाला/ राज्याला / देशाला / रंगाला इ. इ. सगळ्यात उच्च / योग्य समजणं हे सगळीकडेच दिसुन येतं..

छे छे अमेरिकेत वगैरे असेल तर ते शायंटीफिक असते हो... विठ्ठल विठठल म्हणत जवळ आलेला वारकरी कळकट मळकट पण गॉड ब्लेस यु म्हणुन जवळ आलेला अमेरीकन ऑसम !! नाही समजणार तुम्हाला... ;)

नानासाहेब नेफळे's picture

21 Mar 2014 - 11:13 am | नानासाहेब नेफळे

छान लेख, डोक्यावरुन गेला, परंतु त्या दातेरी चित्रांमुळे केसांचा भांग तरी पडला व्यवस्थीत!!!!हाकानाका, भांग पाडलात,धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2014 - 11:26 pm | संजय क्षीरसागर

डोक्यावरुन गेला, परंतु त्या दातेरी चित्रांमुळे केसांचा भांग तरी पडला व्यवस्थीत!!!!हाकानाका, भांग पाडलात,धन्यवाद.

असे चुकीचे विज्ञानिक निष्कर्श काढले आहेत. पण आशय आवडला असल्याने खोलात जात नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Mar 2014 - 2:04 pm | अत्रुप्त आत्मा

हम्मम्म!
अता....
http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/digger-smiley-emoticon.gif
असो!

विजुभाऊ's picture

24 Mar 2014 - 9:08 am | विजुभाऊ

अरेच्चा. कट्टर हिंदु बांधवांकडून ही थत्ती चिच्यांची भाषा यावी .......... अहि आश्चर्यम.....

अमोल केळकर's picture

24 Mar 2014 - 11:06 am | अमोल केळकर

छान माहिती

अमोल केळकर

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 2:02 pm | प्रसाद गोडबोले

लेख छान आहे ...

पण बरीच मते पटली नाहीत . ती काही लिस्ट डाऊन करत बसत नाही आता ....
फकस्त

आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे यांचा अभिमान बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे "आदम इव्ह" हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !

हे जरा उगाचच वाटले ... जरी सर्व मानव एका आई पासुन जन्मलेले असले तरी एकसारखे दिसत नाहीत ...१००० वर्षांच्या उत्क्रांतीतुनच तर वंश जात वगैरे तयार झाले ना ? मग एकदम ते डिस्काऊंट का बरे करावेत ?

बाकी एक अवांतर प्रश्न : आपण पुरुषसुक्त वाचले आहे का ?

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 2:36 pm | बॅटमॅन

पुरुषसूक्त सरळ सरळ जातीव्यवस्थेचे समर्थन करते. वेदात आहे म्हणून त्याला समर्थन द्यावे असे आजिबात वाटत नाही. तसेही ऋग्वेदातील उत्तरकालीन भाग आहे तो.

मुद्दा मांडायची पद्धत कशीही असली तरी मूळ मुद्दा बरोबरच आहे. जातींमध्ये फरक असलेच तर त्यांच्या आसपासच्या भौतिक साधनांमुळे अन परंपरांमुळे येतात. त्यात जेनेटिक्स काही नसते.

जातींच्या उतरंडीत उच्च ठिकाणी असलेल्यांना जातींचे समर्थन करावे वाटणारच, पण त्यात शास्त्रीय तथ्य काहीच नाही. समाजात सर्व प्रकारचे लोक सर्व काळी असतात, पण याचा अर्थ जातींमध्ये काही खास असते असा आजिबात नाही.

मारकुटे's picture

28 Mar 2014 - 7:35 am | मारकुटे

>>>जातींच्या उतरंडीत उच्च ठिकाणी असलेल्यांना जातींचे समर्थन करावे वाटणारच,
असे काही नाही. सर्व जातीच्या लोकांना आपापल्या जातीचा अभिमान असतो. अनेकांना होय मी *** आहे असे अभिमानाने सांगतांना ऐकले आहे. आणि *** =ब्राह्मण दरवेळेलाच असते असे नाही. प्रत्येकाला आपली जात अतिशय प्रिय असते.

>>>पण त्यात शास्त्रीय तथ्य काहीच नाही.
शक्यता नाकारता येत नाही,

>>>समाजात सर्व प्रकारचे लोक सर्व काळी असतात,
काही गोरे लोक पण पाहिले आहेत ;)

>>>पण याचा अर्थ जातींमध्ये काही खास असते असा आजिबात नाही.
जातीमधे असलेच तर एक गुण नक्की आहे ज्यांचे प्रेम विवाह होत नाही, होऊ शकत नाहीत त्यांना लग्नासाठी मुलगी मिळण्याची शक्यता जातीतला/ जातीतली असल्याने वाढते. अर्थात जातीमुळे ते टिकेल याची खात्री नाही. तसेही हल्ली तीन वर्षांच्यावर लग्न टिकले की मुलामुलीत दोष आहे असे मानतात हे वेगळे.

प्रत्येकाला आपली जात अतिशय प्रिय असते.

उतरंडीत आपल्यापेक्षा वर असलेल्यांसमोर दाखवण्यापेक्षा खाली असलेल्यांपुढे दाखवणे जास्त प्रिय असते.

तसेही हल्ली तीन वर्षांच्यावर लग्न टिकले की मुलामुलीत दोष आहे असे मानतात हे वेगळे.

लग्न आणि नोकरीत गल्लत झालीय का? नसेल तर सोर्स संध्यानंद आहे का?

मारकुटे's picture

29 Mar 2014 - 10:19 am | मारकुटे

>>>उतरंडीत आपल्यापेक्षा वर असलेल्यांसमोर दाखवण्यापेक्षा खाली असलेल्यांपुढे दाखवणे जास्त प्रिय असते.

आरक्षणामुळे हे उलट झाले आहे.

>>>लग्न आणि नोकरीत गल्लत झालीय का? नसेल तर सोर्स संध्यानंद आहे का?

समाजात काय चालू आहे हे समजायला वर्तमानपत्र वाचण्याची गरज नाही.

प्रसाद गोडबोले's picture

2 Apr 2014 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले


सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्। स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशांगुलमं॥१
पुरुष एवेदम् यत् भूतम् यच्च भव्यम्। उतामृतत्वस्येशानो यदह्नेना तिरोहति॥२
एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पूरुषः। पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥३॥
त्रिपादूर्द्ध्वः उदैत् पुरुषः पादोस्येहा भवात् पुनः। ततो विष्वङ् व्यक्रामच्छाशनान शने अभि॥४
तस्मात् विराडजायत विराजो अधिपूरुषः। सहातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथॊ पुरः॥५
यत् पुरुषेण् हविषा देवा यज्ञमतन्वत। वसन्तो अस्या सीदाज्यम् ग्रीष्म इद्ध्म शरधवि॥६
सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः। देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुं॥७॥
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः। तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥८॥
तस्माद्यज्ञात्सर्वहुतः संभृतं पृषदाज्यं। पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये॥९॥
तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे। छंदांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥१०॥
तस्मादश्वा अजायंत ये के चोभयादतः। गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥११॥
यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्। मुखं किमस्य कौ बाहू का उरू पादा उच्येते॥१२॥
ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥१३॥
चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत। मुखादिंद्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत॥१४॥
नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत। पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्॥१५॥
वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे। सर्वाणि रूपाणि विजित्य धीरो नामानि कृत्वा भिवदन्यदास्ते॥१६
धाता पुरस्ताद्यमुदाजहार शक्रफ्प्रविद्वान् प्रतिशश्चतस्र। तमेवम् विद्वान् अमृत इह भवति नान्यफ्पन्धा अयनाय विद्यते॥१७
यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवा:॥१८॥

संस्कृत विकीपेडियावर वरील प्रत मिळाली .... आता १८ श्लोकांच्या ह्या सुक्तापैकी किती श्लोक जातीव्यवस्थेचे समर्थन करतात ह्याचा जरासा अभास करुया ....अरेच्चा , फक्त एक १३ वा श्लोक

ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥१३॥

हा श्लोक सोडला तर कुठेच जातीव्यवस्थेविषयी( प्रीसाईजली , वर्णव्यवस्थेविषयी ) काहीच सापडत नाहीये ... त्यातही कोणी कोणापेक्षा तरी ग्रेट असा सुर दिसत नाहीये ...
असा एखाद दुसरा श्लोक पकडुन एखादे काव्य जातीयवादी घोषित करायचे ठरवले तर मग गीते मध्ये तर देव सरळ सरळ म्हणतोय की चातुर्वणं मया सृष्टम ... मग आता काय करायचं ? अग्नये स्वाहा: ?

अवांतर : एनी वे १/१८ म्हणजे केवळ ५.५५% ... I am ok with that much जातीयता ;) :D

अतिअवांतर : मनुस्म्रूतीतील किती श्लोक वर्णव्यवस्थे विषयी बोलतात ? असे एक कुतुहल जागे झाले आहे ... आता तपासुन पाहिले पाहिजे

बॅटमॅन's picture

2 Apr 2014 - 4:16 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

बाकी % काढायचे झाले तर अन्य ग्रंथातही % कमीच निघावे ;) असो.

प्यारे१'s picture

2 Apr 2014 - 4:58 pm | प्यारे१

थोडा % वारीचा विषय निघाला म्हणून.
मुळातच ३.५% विरुद्ध ९६.५% असंच चित्र मी ऐकत आलेलो आहे.

३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं की ३.५ % वाल्यांबद्दल कौतुक वाटावं की त्यांच्याबद्दल असूया वाटावी हाच एक विषय डोक्यात येतो. ऐला, हुशार आहेत की हे लोक!
बाकीच्यांनी काय बांगड्या भरलेल्या का? जेत्यांचं राजकारण म्हणावं तर शोषित तसा का राहतो ह्याचाही विचार व्हायला हवा की!

जुन्या जातींच्या व्यवस्था मोडल्या तरी नव्या यायला कितीसा वेळ? जगाची निर्मितीच असमतोलामुळं झाली नि जग असेपर्यंत असमतोल कायम राहील ही वस्तुस्थिती आहे. समानता हा आदर्श वाद आहे नि तो सत्यत्वात येणं अशक्य आहे. आर्थिक, सामाजिक, वैचारिक, शारिरीक, नैसर्गिक कमी अधिक पणातून हे असमतोल वारंवार आपलं अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारे दाखवून देत राहिले आहेत. आत्ता देखील आहेत नि नंतर देखील असतील.

फक्त ह्यामध्ये नैसर्गिक कलाप्रमाणं त्या त्या व्यक्तिच्या नि समाजाच्या अनुरुप व्यवसायाची, उद्योगाची निवड करण्याचं पूर्ण नि एकमेकांच्या निकडी लक्षात घेऊन निकोप स्पर्धा हे हातात असू शकतं. ते व्हावं. व्हायलाच हवं असा आग्रह आपण धरु शकतो.

प्रसाद गोडबोले's picture

2 Apr 2014 - 5:10 pm | प्रसाद गोडबोले

३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं

तेही त्यांच्या सुक्त आणि स्मृती नावाच्या श्लोक्बध्द कवितांच्या सहाय्याने ...रादर त्यातल्याही केवळ ५.५% श्लोकांच्या सहाय्याने !!
खरचं आश्चर्यच आहे... हआयला श्लोक आहेत की म्यॅजिक स्पेल्स ... :crazy:

अवांतरः ह्यावरुन त्या गायत्रीमंत्राच्या पॉवर वरील धाग्याची आठवण झाली :D

=))

बोला गोपाळकृष्ण भगवान की..... जय!

बॅटमॅन's picture

2 Apr 2014 - 5:20 pm | बॅटमॅन

आयला, खरंच की!! हे मंत्रसामर्थ्य लक्षातच आलं नव्हतं =))

बॅटमॅन's picture

2 Apr 2014 - 5:19 pm | बॅटमॅन

३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं की ३.५ % वाल्यांबद्दल कौतुक वाटावं की त्यांच्याबद्दल असूया वाटावी हाच एक विषय डोक्यात येतो. ऐला, हुशार आहेत की हे लोक!
बाकीच्यांनी काय बांगड्या भरलेल्या का? जेत्यांचं राजकारण म्हणावं तर शोषित तसा का राहतो ह्याचाही विचार व्हायला हवा की!

मुळात फक्त ब्राह्मण विरुद्ध अन्य समाज हा सामनाच चूक आहे. असा सामना कधीच नव्हता. हा फक्त अलीकडच्या ब्राह्मणद्वेषाधारित प्रोपोगंडाचा परिणाम आहे. ब्राह्मणक्षत्रियांचा अलायन्स हा अतिप्राचीन काळापासून आहे. यात परस्परसामंजस्य होते, कारण प्रत्येकाची क्षेत्रे ठरलेली होती. एखादा राजा विद्वान झाला किंवा एखादा ब्राह्मण राजकारणात पुढे आला म्हणून अख्खी जात आपापला धंदा बदलत नसे. ते चित्र आहे तसेच राही. दोहोंचे मिळून राज्य होते. एकाचे प्रत्यक्ष भूमीवर तर एकाचे विचारपद्धतीवर- त्यालाच कल्चर-पॉवर काँप्लेक्स अशी संज्ञा आहे-आत्ताच्या मिलिटरी-इंडस्ट्रियल काँप्लेक्ससारखी. सध्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना वेगळे वैचारिक अधिष्ठान देऊ पाहताहेत, जे अजून एकारलेले आहे. पण त्यांना तितके डोके नसल्याने त्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी ती तेवढ्यापुरतीच राहणार हे नक्की. त्या संघटनेचे एकारलेपणच त्यांच्या मुळाशी आज ना उद्या येईल-अन नक्कीच येईल.

बाकी असमानता अनादिकाळापासून होती आणि पुढेही ती तशीच राहणार हे सत्य आहेच-त्याला विरोध करणे मूर्खपणा आहे.

मग कशाला विरोध करावा? तर हायरार्कीला, तिच्या चढणीला.. जन्माधारित व्यवस्थेच्या समर्थनाला.

अर्थात, ग्रंथ नसते तर असमानता नसती इ.इ. सुद्धा चुकीचे आहेच, पण ग्रंथांतल्या विचारांना विरोध करणे अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यामुळे समाजाला विचार करणे भाग पडते.

फक्त ह्यामध्ये नैसर्गिक कलाप्रमाणं त्या त्या व्यक्तिच्या नि समाजाच्या अनुरुप व्यवसायाची, उद्योगाची निवड करण्याचं पूर्ण नि एकमेकांच्या निकडी लक्षात घेऊन निकोप स्पर्धा हे हातात असू शकतं. ते व्हावं. व्हायलाच हवं असा आग्रह आपण धरु शकतो.

अर्थातच सहमत.

शिवाय संघटित अल्पसंख्याकांनी असंघटित बहुसंख्य लोकांचा बुद्धिभेद करून म्हणा किंवा अन्य कशा मार्गाने म्हणा, त्यांवर सत्ता गाजवणे हे जगात सर्व काळी अन सर्व ठिकाणी घडत आलेले आहे. त्यामुळे त्यातही काही नवीन नाही. फक्त या संघटितांमध्ये फक्त साडेतीन टक्केवाले नव्हते इतकेच.

अवतार's picture

2 Apr 2014 - 8:46 pm | अवतार

फक्त या संघटितांमध्ये फक्त साडेतीन टक्केवाले नव्हते इतकेच.

हे साडेतीन टक्केवाले तरी मरायला संघटित केव्हा झाले होते? सतत ९६.५ टक्क्यांची भीती दाखवून आजही ब्रिगेडच्या काळात देखील जे संघटित व्हायला तयार नाहीत त्यांना इतिहासात तरी एकत्र येण्याचे कारणच काय होते? शंभूराजांच्या दरबारी एक बळाने मुसलमान केलेला कुलकर्णी परत धर्मात घ्या म्हणून विनवणी करत होता तेव्हा त्याला विरोध करणारे हे ह्याच साडेतीन टक्क्यांमधील होते. त्या विरोधाला न जुमानता त्या कुलकर्णीला धर्मात घेणाऱ्या शंभूराजांवर डूख धरणारे देखील हेच होते. आपल्याच जातीतला माणूस आपल्याच धर्मात परत येत असतांना त्यात मोडता घालणाऱ्यांना संघटित म्हणावे तरी कसे? संघटित असेलच तर तो पुरोहित वर्ग आणि सत्ताधारी वर्ग होता, साडेतीन टक्केवाले नव्हे.

संघटित असेलच तर तो पुरोहित वर्ग आणि सत्ताधारी वर्ग होता, साडेतीन टक्केवाले नव्हे.

साडेतीन टक्केवाले म्ह. नक्की कोण? अल्पसंख्याक समाज इ. सारखं बोलू नका हो. ब्राह्मण म्हणायचं असेल तर सरळ तसं म्हणा.धर्माबद्दल खुळचट कल्पना बाळगून असलेले लोक आपापल्या हक्कांबद्दल संघटित असतातच. एका ठिकाणच्या कृतीवरून दुसर्‍या ठिकाणच्या कृतीचा अंदाज लावला जाऊ नये. असो.

नानासाहेब नेफळे's picture

2 Apr 2014 - 5:38 pm | नानासाहेब नेफळे

बॅटमॅन, माहितीपुर्ण प्रतिसाद.

मारकुटे's picture

2 Apr 2014 - 7:11 pm | मारकुटे

>>>मुळात फक्त ब्राह्मण विरुद्ध अन्य समाज हा सामनाच चूक आहे. असा सामना कधीच नव्हता. हा फक्त अलीकडच्या ब्राह्मणद्वेषाधारित प्रोपोगंडाचा परिणाम आहे. ब्राह्मणक्षत्रियांचा अलायन्स हा अतिप्राचीन काळापासून आहे. यात परस्परसामंजस्य होते, कारण प्रत्येकाची क्षेत्रे ठरलेली होती

बराचसा सहमत असलो तरी ब्राह्मण विरुध्द क्षत्रिय संघर्ष आहेच आणि तो सुद्धा एकमेक्कांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी. राजर्षी ब्रह्मर्षी इत्यादी संदर्भ माहित असतीलच :)

तो प्रकार ब्रिटिशपूर्व काळात फार क्वचित कधीतरी झालेला आहे. वेदोक्त प्रकरणानंतर शाहूमहाराजांच्या पाठिंब्याने कोल्लाप्रात क्षात्र वैदिक पाठशाळा तयार केली गेली, क्षात्रजगद्गुरूंची पोस्टही तयार करण्यात आली. तेवढे सोडल्यास आधीचं उदा. इतकं डिरेक्ट नैये.

बौद्ध अन जैन धर्मातली काही मांडणी ब्राह्मणाऐवजी क्षत्रिय श्रेष्ठ अशी आहे, उदा. (भौतेक) अश्वमेध यज्ञ करताना यजमानाच्या वरची पोझिशन ही ब्राह्मणाची असते ती यांच्याप्रमाणे पाहिले असता क्षत्रियाचे स्थान वरती आहे.

पण मुख्य गोष्ट अशी आहे, की हा संघर्ष फार तीव्र झालेला ब्रिटिशपूर्व काळात तरी कधी माहिती नै. एखादे उदा. दिलेत तर तेवढीच माहितीत भर पडेल. विश्वामित्रांचं उदा. लागू पडतही नै, कारण तेव्हा क्षत्रियाचे ब्राह्मण होणे धर्मसंमत होते. हरित नामक एक राजा होता, ज्याच्या नावाने वैष्णव ब्राह्मणांचे हरितस गोत्रही आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Harita

पण अशी किती उदा. होती? अन मुख्य म्ह. राजा हरिताचे उदा. हे संघर्षाचे उदा. नै.

प्रचेतस's picture

2 Apr 2014 - 8:10 pm | प्रचेतस

विश्वामित्रांचं उदा. लागू पडतही नै, कारण तेव्हा क्षत्रियाचे ब्राह्मण होणे धर्मसंमत होते.

नै बे. नाहीतर विश्वामित्राला राजर्षी चा ब्रह्मर्षी व्हायला इतकी यातायात करावी लागती ना.

बॅटमॅन's picture

3 Apr 2014 - 12:14 pm | बॅटमॅन

हो, पण मग राजा हरित क्षत्रियाचा ब्राह्मण झालाच की. विश्वामित्राला जास्ती खपायला लागलं कारण वसिष्ठाबरोबर त्याची खुन्नस होती इतकंच.

पैसा's picture

3 Apr 2014 - 12:45 pm | पैसा

हेच लिहायला आले होते. विश्वामित्राच्या तापट स्वभावामुळे आणि मोहात पडण्यामुळे त्याला ब्रह्मर्षी व्हायला वेळ लागत होता. एक गोष्ट आहे की विश्वामित्र एकदा वसिष्ठाचा खून करायला दगड घेऊन गेला होता तेव्हा अरुंधतीबरोबर वसिष्ठ गप्पा मारत बसले होते. अरुंधती म्हणाली की "काय सुंदर चांदणे पडले आहे ना!" त्यावर वसिष्ठ म्हणाले, "हो, अगदी विश्वामित्राच्या तपश्चर्येच्या तेजासारखं!" ते ऐकून विश्वामित्राला उपरती झाली. वसिष्ठ ऋषींना कितीही त्रास दिला तरी ते आपला दुस्वास करत नाहीत हे लक्षात येऊन त्याने वसिष्ठाबद्दलचा किंतु मनातून काढून टाकला आणि मग तपश्चर्या करून तो ब्रह्मर्षी पदाला पावला.

अख्खा परशुरामाचा भृगु वंशाचा इतिहास (भले तो नंतर दामटून घुसाडलेला असो) ब्राह्मण विरुद्द्घ क्षत्रिय असाच संघर्ष आहे. अर्थात त्याला सुद्धा अनेक कंगोरे आहेतच पण अगदी गळ्यात गळे घालून कधीच इथला समाज एकत्र नव्हता.

पण हा एक औटलायर आहे. गळ्यात गळे घालून इथला समाज कधी एकत्र नव्हता हे मान्य आहे, पण इन जण्रल अशी उदा. लै कमी आहेत इतकेच म्हण्णे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2014 - 8:12 pm | अत्रुप्त आत्मा

@अर्थात, ग्रंथ नसते तर असमानता नसती इ.इ. सुद्धा चुकीचे आहेच, पण ग्रंथांतल्या विचारांना विरोध करणे अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यामुळे समाजाला विचार करणे भाग पडते. >>> +++१११ दॅट्स इट!!!

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2014 - 9:59 am | प्रकाश घाटपांडे

कलम नामा मधे हा लेख आला आहे. त्यावर लेखकाचे नाव नाही.
http://kalamnaama.com/vinyanachya-chashmyatun-jati/

तिन तेरा's picture

28 Mar 2014 - 12:10 pm | तिन तेरा

उत्तम लेख.

मारकुटे's picture

3 Apr 2014 - 11:16 am | मारकुटे

माझे अस्तित्व खुपत असल्यास मला ठार मारण्याचा पर्याय तुम्हाला आहे, परंतु रक्ताने लडबडलेले तुमचे हात मरेपर्यंत तुम्हाला तुमचीच "चुक" होती ही जाणीव करुन देतील. - दुसरं कोण, मीच.

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2014 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

मारकुटे , हा प्रतिसाद काही कळाला नाही बुवा .

बाकी

माझे अस्तित्व खुपत असल्यास मला ठार मारण्याचा पर्याय तुम्हाला आहे, परंतु रक्ताने लडबडलेले तुमचे हात मरेपर्यंत तुम्हाला तुमचीच "चुक" होती ही जाणीव करुन देतील. .

अहो आम्ही हॅन्डग्लोव्स वापरु .हाकानाका :D

द्रुपल मधे असलेला घोळ आहे तो. एका टॅबमधे सदस्य माहिती संपादन आणि दुसर्या टॅगमधे प्रतिसाद लेखन केले आणि दोन्ही जर जवळपास एकावेळेस सेव्ह केले तर मजकुर अदलाबदल होते. बग आहे तो. नंतर प्रतिसाद सुधारणा करता येत नसल्याने प्रतिसाद तसाच राहिला. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. ग्लोव्हजवर सुद्धा रक्ताचे शिंतोडे रहातात आणि हाताप्रमाणाणे धुतायेत नाहीत.

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2014 - 2:30 pm | प्रसाद गोडबोले

ग्लोव्हजवर सुद्धा रक्ताचे शिंतोडे रहातात आणि हाताप्रमाणाणे धुतायेत नाहीत

अहो , युज & थ्रो ग्लोव्स हो ... डाक्टर लोकं ऑपरेशन करताना वापरतात अन नंतर टाकुन देतात ते :D

मारकुटे's picture

6 Apr 2014 - 1:07 pm | मारकुटे

बर मग?

प्रसाद गोडबोले's picture

7 Apr 2014 - 11:09 am | प्रसाद गोडबोले

मग तुमची स्वाक्षरी खोटी ठरेल की !!

मारकुटे's picture

7 Apr 2014 - 12:32 pm | मारकुटे

बर मग?