मराठी लेखनावर इंग्रजीचा प्रभाव

मी_ओंकार's picture
मी_ओंकार in कलादालन
4 Oct 2008 - 3:22 pm

नमस्कार,
मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द, ते शोधताना संस्कृतातील जड शब्दांचा होणारा वापर या आणि अशा बर्‍याच मुद्द्यांवर बर्‍याच ठिकाणी बर्‍याच वेळा काथ्याकूट झालेला आहे. तरीही या नवीन काथ्याकूटास सुरवात करण्याचे मागील काही दिवस विचार घोळत होते. याचा उद्देश वर सांगितल्यापैकी पहिला म्हणजे मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव आणि प्रामुख्याने लेखनावरील प्रभाव हा आहे.
हा विषय चर्चेला घ्यावा असे वाटण्याचे कारण म्हणजे अलिकडे मिपावर आणि इतरत्र वाचण्यात आलेले काही लेख आणि प्रतिसाद. सर्वात आधी एक महत्वाचे स्पष्टीकरण. इथे सांगितलेली उदाहरणे ही अत्यंत प्रातिनिधिक अशी आहेत. यात कोणावर वैयक्तीक टिका करण्याचा हेतू नाही.
सर्वप्रथम मिपाकरचे झालेले 'मिपाकर्स'. तात्यांनी एका लेखात 'लँड होणे' असा शब्द वापरला होता. (त्यावर ऋषिकेशने एक प्रतिसादही दिला होता. खरं तर तेंव्हाच हे सगळं डोक्यात आलं. ) पेठकरकाकांनी एका प्रतिसादात 'लेख फोकस्ड हवा होता' म्हटले होते. अगदी कालपरवाच धमुने 'अपील होणे' ला मराठी शब्द विचारला होता. आणि म. टा. मध्ये एका अग्रलेखात 'हार्डकोअर' दहशतवादी असा उल्लेख वाचण्यात आला. तसाही म. टा. चा याबाबतीत काही चांगला लौकिक नाही. (हार्डकोअर साठी कट्टर असा शब्द वृत्तपत्रीय भाषेत कितीतरी वर्षांपासून वापरला जातो. ) असो.मिपावर लिहिणारे, वाचणारे सगळेच मराठीप्रेमी आहेत याबद्दल शंकाच नाही. आणि आपण दिवसातून एकतरी चक्कर मिपावर टाकतोच. ज्यामुळे मराठी वाचणे लिहीणे अशा गोष्टी होतात.
मराठी बोलताना इंग्रजी शब्द टाळणे हे मला वाटते आता थोडे अवघड झाले आहे. मुख्य कारण म्हणजे जिथे आपण काम करतो त्या जागा. तिथे इंग्लिश मध्ये बोलावे लागत असल्याने आपल्या मराठी बोलण्यावर त्याचा प्रभाव पडणे अगदी साहजिक आहे. इथे थोडेसे मागे वळून पाहिले तर लक्षात येईल की आपल्या वडील, आजोबा यांच्या काम करण्याचा जागा या सरकारी ऑफिस, बँका, शाळा, पोष्ट अशा असल्यामुळे तिथे मराठीच बोलले जात असे. आता आपण दिवसातून दहा दहा तास ज्या ठिकाणी असतो तिथे जर सतत कानावर आणि बोलताना इंग्रजीच येत असेल तर आपल्याला त्याची थोडी सवय होणारच.
याच संदर्भात दुसरा मुद्दा असा की बोलताना आपल्याला विचार करायला कमी वेळ मिळतो. त्यामुळे जिभेवर रुळलेले शब्द पटकन तोंडात येतात. तेंव्हा आपण अर्थाकडे ज्यास्त लक्ष देतो आणि समोरच्याला आपण बोलतो ते कळले की नाही हेच महत्वाचे ठरते.
माझा या चर्चाप्रस्तावाचा रोख हा मराठी लिखाणामध्ये होणार्‍या इंग्रजी शब्दांच्या वापरावर आहे. लिहिताना आपल्याला थोडा वेळ नक्कीच असतो ज्यात बरोबर मराठी शब्द शोधून लिहिता येईल. हे काम थोडे वेळखाऊ आणि कष्टाचे आहे हे मान्य. आणि लिहिताना सुद्धा वाचणार्‍याला कळंल की झालं असा मुद्दा ही मांडता येईल. पण जर हे कष्ट आपण आत्ता नाही घेतले तर असे बरेच शब्द आपल्याला आठवणार नाहीत. हा धोका बराच मोठा वाटतो. त्यातून आपण नियमीतपणे मराठी लिहितो वाचतो तरीही आपल्याला काही शब्द आठवत नाहीत. बाकीच्यांचा विचार केला तर आणखी मोठ्या प्रमाणात हा धोका जाणवतो. अर्थात भाषेचे प्रवाहीपण आणि बोलल्या जाणार्‍या भाषेचे लिखाणात पडणारे प्रतिबिंब असेही मुद्दे आहेत. पण तसे लिखाण हे वातावरण निर्मिती साठी, संवादापुरतेच असावे.
मला वाटतं, हे मराठी शब्द आठवणे तसं फारसं अवघड ही नाही. आणि त्यासाठी कुणी भाषापंडीत असण्याची ही गरज नाही. शिवाय जे शब्द इंग्रजीमधूनच आलेले आहेत (टी व्ही, फ्रीज वगैरे) त्यांना अवजड संस्कॄतमधून उचललेले शब्द वापरण्याचाही माझा अट्टाहास नाही. हे शब्द अगदी सोपे असेच. फक्त नेहमीच्या वापरापासून किंवा बोलण्यापासून म्हणा थोडे लांब गेलेले. थोड्या विचाराने सुचणारे. फक्त त्यासाठी जिभेवर रुळलेले इंग्रजी शब्द वापरण्याचा मोह टाळायला हवा. हा मोह सर्वांना न पडो हीच सरस्वतीचरणी कलत्रींसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे या मातृमांगल्याच्या महामहोत्सवात माझी प्रार्थना. या विषयावर तुम्हा सर्वांचे विचार ऐकायला नक्कीच आवडतील.
जाता जाता मला सुचलेले आपण वापरतो असे काही इंग्रजी शब्द आणि त्यांना मराठी पर्याय.
actually ------------- खरं तर,
obviously ------------- साहजिक
complicated -------------- कठीण,
परवाचाच incident ------------- परवाचीच गोष्ट
incidently -------------- योगायोग
casually -------------- मजेत, सहज
जसे सुचतील तशी यात भर टाकेनच.

- ओंकार

भाषा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Oct 2008 - 3:26 pm | यशोधरा

खरं आहे ओंकार. कधी कधी मराठी शब्द सुचत नाही पटकन्... :(

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2008 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

actually ------------- खरं तर,.........प्रत्यक्षात
obviously ------------- साहजिक..............उघडपणे
complicated -------------- कठीण,...........गुंतागुंतीचे
परवाचाच incident ------------- परवाचीच गोष्ट.............परवाचीचच घटना
incidently -------------- योगायोग................????
casually -------------- मजेत, सहज...............गंभीर नसलेले

मिपावर ल्याहायला सुरूवात केली तेंव्हा एक जाणवले इथे 'शुद्धलेखन' casually घेतले जाते. (विशेष गांभिर्याने घेतले जात नाही.) त्या मुळे मुक्त मनाने विचार मांडताना काही प्रभावी परीणाम साधण्याच्या हव्यासा पायी इंग्रजी शब्दांची मदत घेतली. (कारण इथले सोवळे-ओवळे तितकेसे गंभीर नाही).
'लेख फोकस्ड हवा होता' च्या ऐवजी 'अजून मुद्देसूद हवा होता' असेही चालले असते. अशी शब्दयोजनाही मी अनेकदा करतो. पण सहा दिवस सात्विक जेवण जेवल्यावर एखाद दिवशी 'अभक्ष्य' भक्षिण्याचा मोह अनावर होतो.
टी व्ही, फ्रीज वगैरेला सुद्धा 'दूरचित्रवाणी संच' आणि 'शीतकपाट' असा शब्द वापरावयास हरकत नाही. तसेही 'कपाट' हा शब्दही मराठी कुठे आहे? मग 'शीतफडताळ' म्हणावे का?
अवजड संस्कॄतमधून उचललेले शब्द वापरण्याचाही माझा अट्टाहास नाहीतरी पण मातृमांगल्याच्या महामहोत्सवात हा शब्द तसा कठीणच नाही का? अधीच्या वाक्याच्या अगदी विपरीत.
आपल्या लेखनप्रपंचाचा आशय ध्यानात आला. मान्यही आहे. तसा प्रयत्नही सतत करीत असतो. ह्या पुढे अजून कटाक्षाने करेन.

धन्यवाद.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2008 - 4:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

तुमची बायको गाडी चालवायला शिकत असेल, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2008 - 4:38 pm | प्रभाकर पेठकर

हे वाक्य माझे नसून दूसर्‍याचे आहे. त्यामुळे त्यात फेरबदल न करता वापरलेले आहे. नाहीतर,
'तुमची बायको चारचाकी स्वयंचलित वाहन चालवायला शिकत असेल तर तिच्या मार्गात आडवे-उभे-तिरपे कसेही येऊ नका'
असे वाक्य मला सुचते आहे.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

अवलिया's picture

4 Oct 2008 - 5:57 pm | अवलिया

मागे पण येवु नका हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ

मी_ओंकार's picture

4 Oct 2008 - 6:16 pm | मी_ओंकार

काका,
तुमच्या वाक्याबद्दल मला काहीच म्हणायचे नव्हते. तुमच्या मराठी लेखनाबद्दल मला आदरच आहे. ते केवळ उदाहरणादाखल होते.

बाकी संस्कृत शब्दांबद्दल मी इंग्रजी शब्दांना सुचवण्यात येणारे पर्यायी शब्दांबद्दल बोलत होतो.

ओंकार

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2008 - 9:10 am | प्रभाकर पेठकर

आपल्या लेखनप्रपंचाचा आशय ध्यानात आला. मान्यही आहे. तसा प्रयत्नही सतत करीत असतो. ह्या पुढे अजून कटाक्षाने करेन.

माझ्या ह्या वाक्यात आपल्या मुद्याची स्वीकृती आहे.
बाकी सर्व हलकेच घ्यावे ही विनंती.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

वरील लेख वाचून मला एक उदाहरण द्यावंसं वाटंतंय. अर्थात मराठी माणसांनीच मराठी बोलंलं नाही तर परप्रांतीय तरी ती कशी बोलणार.

आज सगळेजण आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालतात. काही वेळेला परीस्थितीही कारणीभूत असते. पण प्रामुख्याने कारणं दोन - १. आई-वडील दोघंही आय.टी. मधे असतात आणि प्रतिष्ठा जपायची असते, २. आपल्याला नाही तर नाही, आपली मुलं तरी शिकतील असा विचार असतो. तशातच आजकाल घरा-घरातली संस्कार केंद्र (आजी-आजोबा) कालबाह्य होत चालल्येत. आणि घरी आजी-आजोबा असलेच तरी संवाद साधायला त्यांच्याजवळ माध्यम नसतं. कारण आजी-आजोबांच माध्यम वेगळं असतं आणि मुलांचं मिडीयम वेगळं असतं. त्यामुळे मुलं शाळेतून घरी आली की वॉश घेऊन, फ्रेश होऊन मगच आजी-आजोबांशी कम्युनिकेट करतात.

कलंत्री's picture

4 Oct 2008 - 5:53 pm | कलंत्री

मराठीतील शब्द वापरणे खरेतर अतिशय सोपे आणि गोमटे काम आहे.

लेखामध्ये आपले अस्सल आणि रांगडे शब्द वापरत गेलो तर नक्कीच तो लेख इतरांना आवडल्याखेरीज राहत नाही. शब्द -> विचार -> प्रभाव आणि इतरांचा स्विकार अशी वहिवाट असेल तर चांगले शब्द वापरले तर नक्कीच आपल्या लेखाचा पाया भक्कम असा होतो.

ओमकार यांनी उल्लेख केल्या प्रमाणे मातृ ( मराठी ) मांगल्य ( मनात प्रसन्नता) महा महोत्सव ( मिपावर येणे -भाग घेणे) असाही होऊ शकतो.

शेवटी मराठी आपली भाषा आहे आणि तिचे जतन करणे आपलेच कर्तव्य आहे.

शब्दपूजा करत रहा. ( यावर एखादा लेख लिहायचा विचार आहे).

प्रमोद देव's picture

5 Oct 2008 - 10:07 am | प्रमोद देव

ओंकारशी मी पूर्णपणे सहमत आहे. मीही जाणीवपूर्वक मराठी लिहायचा आणि बोलायचा प्रयत्न करत असतो आणि इतरांनाही तसे करण्यासाठी उद्युक्त करत असतो. त्यात एका मर्यादेपर्यंत यशही येतेय. पण तरीही बरेचशे लोक इंग्लीश हीच आपली मातृभाषा आहे असे समजून सर्रास त्या भाषेतले शब्द वापरत असतात आणि फक्त क्रियापदांसाठीच मराठीची फोडणी वापरत असतात.

मराठी माणसांनी मराठी माणसाशीच लेखी संवाद देवनागरीत साधावा म्हणून मी मेतकूटवर(हा ऑर्कुट साठी वापरलेला शब्द आहे) एक मायमराठी
म्हणून मंच स्थापन केलेला आहे. अतिशय उत्साहाने त्यात जवळ जवळ ५०जण सामील झालेत. पण वाईट ह्याचे वाटते की ह्यातले जेमतेम १/५ सभासदच जाणीवपूर्वक देवनागरीतून मराठीत संवाद साधणारे लोक सोडले तर बाकीचे ४/५ लोक मिंग्लीश अथवा सरळ सरळ इंग्लीशमध्येच संवाद साधत असतात. एरवी अगदी मराठी बाणा वगैरे बाळगणारे लोकही मिंग्लीशचा आधार घेतात तेव्हा त्यांची कींवही येते आणि वाईटही वाटते. ह्याच संदर्भात मी सुप्रसिद्ध पत्रकार 'राजु परुळेकर' ह्यांनाही मेतकूटवर एक खरड पाठवलेली होती की त्यांनी देवनागरीतून मराठीत व्यवहार करावा...पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये. कविता,लेख मराठीतून लिहीणारे नामांकित कवी,लेखकमंडळी एरवी मात्र मिंग्लीशचाच आधार घेतात असाही माझा अनूभव आहे. मेतकूट अथवा इतर ठिकाणी जसे की वेगवेगळ्या निरोप्यांमध्ये(मेसेंजर्स),विरोपातून(इ-मेल) मराठी माणसांनी मराठी माणसांशी मराठीतून संवाद साधावा अशी अपेक्षा आहे;पण तीही बहुतांशी व्यर्थ ठरते आहे.

मराठीत बोलण्याची,देवनागरीत लिहीण्याची उर्मी जोवर आतून येत नाही तोवर ह्यात बदल होणार नाही असे माझा स्वानुभव सांगतो. त्यामुळे कोणत्याही जाहीर आवाहनाला आधी जो भावनिक प्रतिसाद मिळतो तो केवळ तात्कालिक स्वरूपाचा असतो असे वेळोवेळी दिसून आलेले आहे. पण आपल्यासारख्या मराठी प्रेमींनी जिद्द न हरता पुनःपुन्हा असे प्रयत्न करत राहीले पाहीजे असे वाटते.
आपल्या कार्यात मी आपल्याला सुयश चिंतितो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 10:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

देवकाका,

तुमचं म्हणणं पटतं पण विशेषनामांचं भाषांतर नाही पटत. ऑर्कुट हे एका तुर्की इंजिनियरचं नाव आहे ज्याच्या डोक्यातून या "सोशल नेटवर्किंग"ची कल्पना आली. त्यानी ती कल्पना गुगलला विकली किंवा तो गुगलमधेच कामाला होता. त्यामुळे ऑर्कुट हा शब्द मराठी नसेल तरीही त्याचं भाषांतर खटकलं.

(अवांतरः माझ्या इंग्रज मित्रांना तुमच्याबद्दल सांगताना तुमचं नाव "जॉय गॉड" सांगायचं का प्रमोद देव?)

मी_ओंकार's picture

6 Oct 2008 - 8:18 pm | मी_ओंकार

अगदी बरोबर बोललात.

पण तरीही बरेचशे लोक इंग्लीश हीच आपली मातृभाषा आहे असे समजून सर्रास त्या भाषेतले शब्द वापरत असतात आणि फक्त क्रियापदांसाठीच मराठीची फोडणी वापरत असतात.

हे तर पुष्कळदा दिसून येते. असो. आपल्या उस्फुर्त प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

- ओंकार

प्रमोद देव's picture

5 Oct 2008 - 10:41 am | प्रमोद देव

अदिती ऑर्कुट हे विशेष नाम आहे हे मलाही मान्य आहे. पण त्याचे नाव बदलण्याचे एकच कारण आहे की ..ऑर्कुट हे एकत्र येण्याचे ठिकाण आहे.जिथे आपली मैत्री जमते म्हणजेच मेतकूट जमते..म्हणून हे नामकरण. त्यातून ऑर्कुट ला मेतकूट हे यमक जमले आहे म्हणूनही मजा वाटते बोलायला. बाकी त्यात मराठी अस्मिता वगैरे प्रकार नाही.

(अवांतरः माझ्या इंग्रज मित्रांना तुमच्याबद्दल सांगताना तुमचं नाव "जॉय गॉड" सांगायचं का प्रमोद देव?)

हाहाहा! मस्त आहे हेही नाव! मला चालेल. ;)
त्यात एक छोटा बदल....प्र म्हणजे अति अथवा जास्ती. तेव्हा प्रमोद म्हणजे एक्स्ट्रा जॉय असे म्हणावे. :)

फटू's picture

5 Oct 2008 - 10:55 am | फटू

ऑनलाईन = सचेत
ऑफलाईन = अचेत
सबटायटल = उपशिर्षक
ऑडीओ क्लीप = ध्वनीफीत
व्हीडीओ क्लीप = चित्रफीत

(कदाचित हे शब्द संस्कृत असतील / वाटत असतील पण नेहमीच्या वापरातील चांगले पर्यायी शब्द ठरू शकतात...)

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ऋषिकेश's picture

5 Oct 2008 - 12:01 pm | ऋषिकेश

सर्वप्रथम नेहमीच्या वापरातल्या इतरभाषिक शब्दांना तितकेच प्रवाही आणि सोपे मराठी शब्द असतील तर वापरे पाहिजेत या मताचा मी आहे. जर प्रतिशब्द फार बोजड असेल तर मी मुळ (मग तो इंग्रजी का असेना) शब्दच वापरेन.
दुसरे असे की, मागे एकदा उपक्रमावरील चर्चेत श्री यनावाला/वाचक्नवी यांनी एक मस्त गोष्ट सांगितली ती अशी की, ज्या शब्दांचे मराठीकरण पूर्ण झाले आहे, म्हणजे त्यास विभक्ती-प्रत्यय जोडता येतात अश्या परभाषिक शब्दांना मराठीच समजता येईल. जसे टेबल, पेन,.. याला आपण टेबलावर, पेनाने (टेबलवर, पेनने नाहि) सहज म्हणतो तेव्हा जर कोणी हे शब्द वापरले तरी त्याला मी मराठीच समजतो

अर्थात आपण म्हणता त्याप्रमाणे ज्या शब्दांना सोपा मराठी शब्द असेल तर वापरायचा प्रयत्न करायलाच हवा. आणि मी तसा प्रयत्न करतो ही.. वर पेठकरकाका म्हणाले त्याप्रमाणे एखादवेळी सवयीने इंग्राठी बोलून जातो. :)

तात्यांनी एका लेखात 'लँड होणे' असा शब्द वापरला होता. (त्यावर ऋषिकेशने एक प्रतिसादही दिला होता. खरं तर तेंव्हाच हे सगळं डोक्यात आलं. )

माझा आक्षेप लँड होणे या शब्दाला नव्हता तर फुलपाखरू फुलावर बसतंय या नाजूक कल्पनेत लँड होणे सारख्या काहिश्या राकट शब्दयोजनेला होता.
उद्या विमान धावपट्टीवर लँड झालं असं कोणी बोलून गेल्यास ते मला तितकंसं खटकणार नाहि.

-(मराठी) ऋषिकेश

गणा मास्तर's picture

6 Oct 2008 - 6:51 am | गणा मास्तर

ओंकारशी सहमत आहे. मीदेखिल जाणीवपूर्वक जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न करत असतो.
भारत, विमान , विमानतळ , सफरचंद, बातमी यासाठी हल्ली लोक पर्यायी ईंग्रजी शब्द वापरतात असा माझा अनुभव आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मी_ओंकार's picture

6 Oct 2008 - 8:39 pm | मी_ओंकार

सफरचंद, बातमी

बरोबर. मलाही हेच शब्द सुचले होते. त्याचबरोबर प्रॉब्लेम हा शब्द तर आता मराठीच झाला आहे.

- ओंकार

गणा मास्तर's picture

7 Oct 2008 - 6:16 am | गणा मास्तर

भारत, विमान , विमानतळ , सफरचंद, बातमी हे मराठी शब्दच वापरले पाहिजेत असे मला वाटते.
प्रॉब्लेमसाठी समस्येपेक्षा अडचण जवळचा वाटतो
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

धनंजय's picture

6 Oct 2008 - 7:34 am | धनंजय

या बाबतीत मी विद्यार्थी आहे. जे काय नवीन मराठी शब्द प्रचलित होतील ते वापरण्यास मी तयार आहे.

(प्रचलित होणे महत्त्वाचे - अंगवळणी पडतील असे शब्द तयार करायला प्रतिभा बलवत्तर लागते.)

सोप्या सोप्या मराठी शब्दांच्या ऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यास मला जास्त खटकते.
वही (नोटबुक)
चूक (राँग)
लिही (रायटिंग कर)
असे प्रयोग माझ्या भाचेमंडळींकडून ऐकले आहेत, ते आवडले नाहीत.

काही इंग्रजी शब्द सोपे आहेत, आणि मला खटकत नाहीत.
पंचर, टायर, कार, वाल, पान्हा, टावेल (हा पंचापेक्षा वेगळा असतो), टमरेल, बाटली, नीब (शाईच्या 'पेन'ची), रबर, नोट (रुपयाची), बँक, बूट (हा जोड्याचा विशिष्ट प्रकार असतो), क्रिकेट, बॅट (पण चेंडू!), डँबीस, डामरट, इंजिन, लोकल (मुंबईतील रेल्वेगाडी), वाघीण (मालगाडीची), चार बुकं ...
या इंग्रजी शब्दांसाठी नवीन मराठी शब्द काढले, तर मला शिकायला कठिण जाईल असे वाटते.

इंग्रजी नामे मराठमोळ्या पद्धतीने वापरलीत तरी व्याकरणाच्या दृष्टीने मला ते ठीकच वाटते. (दुवा) सुशिक्षित मराठी समाजात नव-मराठी नव-शब्द प्रचलित झाल्यास, संवाद साधण्यासाठी मी ते जरूर वापरेन. संवाद साधण्यासाठी हे महत्त्वाचे असते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 10:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजयच्या विचारांशी संपूर्ण सहमत. मला "मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट पडतं" याचातर मला रागच येतो बर्‍याचदा!

पण..
पंचर, टायर, कार, वाल, पान्हा, टावेल (हा पंचापेक्षा वेगळा असतो), टमरेल, बाटली, नीब (शाईच्या 'पेन'ची),

पान्हा या शब्दामुळे थोडी गोंधळले.

अदिती

धनंजय's picture

6 Oct 2008 - 5:37 pm | धनंजय

पान्हा म्हणजे नट-बोल्ट फिरवायची कांडी (स्पॅनर, अमेरिकेत "wrench") किंवा कपड्याची रुंदी - डबल पान्ह्याचे धोतर (स्पॅनचे).

दुधाचा पान्हा नाही...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 5:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिलाच पान्हा (का पाना?) मला थोड्या वेळाने का होईना मला कळला, आधी तिसरा वाटला होता. पण दुसर्‍याची अजून थोडी शंका आहे,

>> कपड्याची रुंदी - डबल पान्ह्याचे धोतर (स्पॅनचे).
तो पन्हा ना?

अदिती

धनंजय's picture

6 Oct 2008 - 7:38 pm | धनंजय

आहे : पाना पान्हा पन्हा

हे सर्व शब्द मी तोंडीच ऐकलेले आहेत - लेखी वाचलेले नव्हते :-(

शब्दकोशातून बघून:
पेच फिरवायचा पाना (मूळ - [इंग्रजी] स्पॅनर)
कपड्याचा पन्हा (मूळ - [फारसी] पह्ना)
दुधाचा पान्हा (मूळ - [संस्कृत] प्रस्नव)

धमाल मुलगा's picture

6 Oct 2008 - 5:55 pm | धमाल मुलगा

२.पान्हा = दुधाचा हे ठाऊक आहे. ('वासरास पाहुन गायीला पान्हा फुटला' वगैरे)
३.पन्हा= कपड्यासंदर्भात. (धोतराचे उदाहरण.)

१.पाना = स्पॅनरला मी आणि आमचा मेकॅनीक(?) असेच म्हणतो, पण बर्‍याच लोकांना स्पॅनरसाठीदेखील पान्हा हाच शब्द वापराताना पाहिले आहे.

जाणकार ह्यावर प्रकाश टाकू शकतील काय?

मी_ओंकार's picture

6 Oct 2008 - 8:43 pm | मी_ओंकार

पन्हा की पन्ना ?? की पन्हाचे पन्ना झाले असावे?
माझ्या आईच्या बोलण्यात मी पन्ना असे ऐकले होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 9:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"हीरा-पन्ना"मधलं पन्ना कुठून आलं असावं?

अदिती

धनंजय's picture

7 Oct 2008 - 5:57 am | धनंजय

संस्कृत शब्दांपासून उद्भव.

मुक्तसुनीत's picture

6 Oct 2008 - 8:44 pm | मुक्तसुनीत

"पनाह देना" = आसरा देणे , शरणागतास संरक्षण देणे ?

धनंजय's picture

7 Oct 2008 - 5:59 am | धनंजय

फारसी शब्द. पण फारसी शब्दकोशात बघता, त्याचा कपड्याच्या रुंदीशी संबंध दिसत नाही... (किंवा दुधाशीही नाही.)

सर्वसाक्षी's picture

6 Oct 2008 - 11:06 pm | सर्वसाक्षी

ओंकारराव,
असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो).
इंग्रजी शिवाय भाषण वा लेखन प्रभावी होऊच शकत नाही वा इंगजी शब्दांचा नेमकेपणा वा बाज मराठी शब्दांना नाही असे ठणकावुन सांगणारे असंख्य मराठी आपल्याला हटकतील.

आपला हेतु स्तुत्य आहे. आवश्यक ते म्हणजे विशेषतः ज्या संकल्पना पाश्चिमात्य देशांतुन आल्या आहेत असे शब्द इंग्रजी असले तरीही वापरायला हरकत नाही. तसेच जर एखाद्या पाश्चात्य संकल्पनेला वा वस्तुला चांगला मराठी शब्द वापरायला काय हरकत आहे? क्लिष्टता टाळली व सोपे शब्द वापरले तर ते रूचण्याची व पटकन रूळण्याची शक्यता नक्कीच आहे. चीन मध्ये (भ्रमणध्वनीच्या)
हस्तसंचाला सर्रास स्सो ची म्हणतात. दूरध्वनी संचाला सहजगत्या त्येन व्हा म्हणतात.

अनावश्यक परकिय शब्दांच्या वापरामुळे अनेक चांगले मराठी शब्द विस्मृतित जात आहेत. उदाहरणार्थ - 'झकास'

असो. आपण आपले मराठीतुन बोलायचे. म्हणेना कुणी आपल्याला गावठी ,आचरट वा बुरसट!

धमाल मुलगा's picture

7 Oct 2008 - 10:29 am | धमाल मुलगा

असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो).
इंग्रजी शिवाय भाषण वा लेखन प्रभावी होऊच शकत नाही वा इंगजी शब्दांचा नेमकेपणा वा बाज मराठी शब्दांना नाही असे ठणकावुन सांगणारे असंख्य मराठी आपल्याला हटकतील.

:)
काय करणार साक्षीदेवा, 'हल्ली मराठी वर्ड्स रिमेंबर करायला जरा डिफिकल्टच जातं.' काय म्हणता?

ते असो,
साक्षींच्या मतास पुर्ण अनुमोदन.
पण मासल्यादाखल, गेल्या आठवड्यातलीच एक घटना सांगतो. नीलकांतबरोबर मराठी टंकलेखनासंदर्भात चर्चा करत होतो.
मला 'फॉन्ट' ह्यासाठी चपखल शब्द काही सुचेना. नीलकांतने फट्टकन 'टंक' हा शब्द लिहीलेला होता.
किंवा, एखादी आज्ञावली/प्रणाली आपल्या संगणकावर 'प्रस्थापीत' करणे. (इन्स्टॉल करणे)
अशा प्रकारे, प्रतिशब्द वापरुन आपण एकवेळ बोलु शकु, परंतु मराठीमध्ये बोलणे/लिहिणे ह्याचा जो एक नैसर्गिक प्रवाह आहे त्यामध्ये (सध्यातरी) असे शब्द सर्वसामान्यांना खटकतात किंवा असे म्हणु की आपलेसे न वाटता, समोरच्याचं बोलणं शब्दबंबाळ आणि क्लिष्ट वाटतं.

ह्या संदर्भात भाषातज्ज्ञ काही मदत करु शकतील काय? जेणेकरुन मराठीचा वापर अधिकाधिक सुटसुटीत राहील.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 10:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो).
जेव्हा समोरच्याला हेही माहित असतं की जास्तीत जास्त मराठी शब्दच वापरणार्‍या माणसाला बर्‍यापैकी छान इंग्लीशही बोलता येतं, तेव्हा बुरसट वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. (स्वानुभव) कारण इंग्लीश बोलून दाखवून खोड(?) मोडता येते.
तीन वर्ष(च) इंग्लंडला राहून आल्यावर, "अजूनही तुला मराठी छान बोलता येतं", म्हणणारे महाभाग आढळले तसेच "तू आता जास्त शुद्ध मराठी बोलतेस", (शुद्ध म्हणजे कमीतकमी इंग्लीश शब्द वापरुन) असं म्हणणारेही आढळले.

अनावश्यक परकिय शब्दांच्या वापरामुळे अनेक चांगले मराठी शब्द विस्मृतित जात आहेत. उदाहरणार्थ - 'झकास'
गुजराथी मित्र आणि वाण्यांकडे खरेदी करण्यामुळे माझ्या तोंडात झकासपेक्षा चोक्कस हा शब्द जास्त येतो.

अदिती

धमाल मुलगा's picture

7 Oct 2008 - 11:32 am | धमाल मुलगा

काही प्रमाणात खरं आहे अदिती तुझं. पण...

जेव्हा समोरच्याला हेही माहित असतं की जास्तीत जास्त मराठी शब्दच वापरणार्‍या माणसाला बर्‍यापैकी छान इंग्लीशही बोलता येतं, तेव्हा बुरसट वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. (स्वानुभव) कारण इंग्लीश बोलून दाखवून खोड(?) मोडता येते.

ह्यातच तु म्हणालीस ना, की समोरच्याला हे माहित असतं, पण पहिल्या भेटीत प्रथमदर्शनी कुठे ठाऊक असतं ते?
मग 'माझं मराठी कसं सतत्च्या इंग्रजीच्या वापरामुळे कच्चं झालंय' हे दाखवण्यात धन्यता मानणारे कितीतरी जण आहेत. अगदी पदोपदी भेटतात. ह्या अशा चित्रामुळे 'आख्खी ३ वर्षं साहेबाच्या देशात राहिलेली मुलगी' चक्क मराठीत बोलते म्हणल्यावर लोक अचंबीत होणारच ना? :)

आणि राहिला मुद्दा 'झकास' ऐवजी चोक्कसचा, तर मी म्हणेन...हे चालुच राहणार.
असं झालं नाही तर भाषा वाढत नाही असं बर्‍याच जाणकारांचं म्हणणं आहे म्हणे.
शिवकालीन मराठीमध्ये नाही उर्दु/अरबी/फार्सी भाषांचा प्रभाव जाणवतो? तसंच हे. इंदौरात गेल्यावर तिथला माणुस अगदी आपसुकपणे नकळत 'बढिया' म्हणतो. त्याला झकास हा शब्द ठाऊक नसतो असं नाही, पण उत्स्फुर्ततेतुन त्याच्या तोंडुन 'क्या बात है, बढिया' असं निघतं.

अगदी इंग्रजी शब्दकोश पाहिला तर त्यातही हल्ली काही भारतीय (मुख्यतः हिंदी ) शब्द स्विकारलेले दिसतात. ह्याला भाषिक आक्रमण म्हणावे की भाषावृध्दी ह्यात मतभिन्नता आढळतेच. पण सध्या आपला तो विषय नव्हे. विषयांतराबद्दल क्षमस्व.