माझं खोबार... भाग २

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
5 Oct 2008 - 5:08 am

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७ , ... भाग ८

*************

अजून इतर काही गप्पा होऊन, मी तिथून परत निघालो. मात्र परत निघायच्या आधी मी काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यात मुख्य म्हणजे की मी कुठेही जायला तयार आहे पण माझी बायको माझ्या बरोबर असेल आणि कंपनीने ती सगळी जबाबदारी घेतली पाहिजे.

मी थोडा खुशीतच घरी आलो. घरी येऊन ही बातमी सांगितली. कुणाच्या ध्यानी मनी पण नव्हतं की असं काही होईल. घरात एकदम शांतता पसरली. त्यात परत मी जेव्हा 'सौदी अरेबिया' हा शब्द उच्चारला तेव्हा तर वातावरण अजूनच नाजूक झालं. आपल्या मनात सौदी अरेबिया म्हणलं की एक वेगळंच चित्र असतं. विशेषतः आई-वडिल जरा काळजी करत होते. पण त्यांनी पण अगदी दिलखुलास पणे तुझ्या करिअरच्या आड आम्ही येणार नाही असे सांगून मला हलकं केलं. पत्नीने पण पूर्ण पाठिंबा दिला. चला, एक किल्ला सर झाला. पण जसजशी ही बातमी माझ्या इतर नातेवाईकांत पसरली तसतसे मला अथ पासून इति पर्यंत काहिही सल्ले यायला लागले. त्यातली काही मतं तर पूर्णपणे अतर्क्य अशी होती. मग मी ठरवलं, आता आपण जायचंच जायचं, पण जितकी जमेल तितकी माहिती गोळा करू सौदी अरेबिया बद्दल. त्या वेळी आंतरजाल आजच्या इतकं सहज उपलब्ध नव्हतं. एका मित्राच्या घरी सोय होती. तिथे जाऊन काही माहिती काढायचा प्रयत्न केला.

तसं बघितलं तर सौदी अरेबिया हा सगळ्यात मोठा आखाती देश. पण जवळजवळ १०० वर्षांपूर्वी पर्यंत हा देश अस्तित्वातच नव्हता. संपूर्ण अरबस्तान हे छोट्या छोट्या टोळ्या, त्यांच्या अधिपत्याखालील प्रदेश, ओटोमान साम्राज्याच्या प्रभावाखालचे प्रदेश असं विभागलं गेलं होतं. आपल्या महाराष्ट्राचे जसे कोकण, देश, खानदेश, मराठवाडा, विदर्भ असे विभाग आहेत तसे, अरबस्तानाचे पण नज्द, जिझान, हेजाझ (मक्का आणि मदिना या भागात आहेत), नजरान, तबुक, अल्-हासा / कतिफ असे पूर्वापार चालत आलेले भाग आहेत. हे सगळे भाग वेगवेगळ्या राजांच्या अंमलाखाली होते. त्यांच्या आपापसात मारामार्‍या / लढाया चालत. हा सगळा गोंधळ अव्याहत पणे शतकानुशतकं चालत आला होता. अश्या अनागोंदीच्या वातावरणात दोन सामाजिक शक्तींचा उदय झाला. एक होती धार्मिक तर दुसरी होती राजकिय.

धार्मिक शक्ती.

इस्लामच्या ४ पारंपारिक विचारधारा आहेत. जशी आपल्या कडे सांख्य वगैरे वेगवेगळी तत्वज्ञान आहेत तशी. त्या आहेत, हनबाली, हनाफी, मलिकी, शाफी. इ.स. १७०३ मधे हनबाली परंपरेच्या एका इमामाच्या घरी मुहम्मद इब्ने (इबने) अब्द्'अल वहाब अत्-तमिमी चा (तमिमी टोळीतल्या अब्द्'अल्-वहाब चा मुलगा मुहम्मद) जन्म झाला. अगदी लहान वयातच त्याने धार्मिक शिक्षण घेतले आणि इतर शहरातल्या विद्वानांना भेटून त्यांच्या कडून ज्ञान मिळवले. इ.स. १७४० मधे तो परत आपल्या गावी आला. त्याच्या फिरस्ती मधे त्याला अश्या बर्‍याच गोष्टी आढळल्या ज्या मुळे लोक इस्लाम च्या मूळ शिकवणी पासून ढळले होते. त्याने इस्लामचा अतिशुध्द (त्याच्या मते) असा एक प्रकार आचरायला सुरुवात केली. हळूहळू त्याला बरीच लोकप्रियता मिळत गेली. त्याच्या शिकवणूकीप्रमाणे 'अल्ला' ची बरोबरी कोणीच करु शकत नाही. स्वतः पैगंबर मुहम्मद सुध्दा एक सामान्य माणूसच होते. कुराण मानवापर्यंत पोचवायला अल्ला ने त्यांची निवड केली इतकेच. थडगी किंवा दर्गे इ. ठिकाणी प्रार्थना करणे हे पाप आहे. किंबहुना ती नष्ट केली पाहिजेत. व्याभिचाराला एकच शिक्षा, दगडांनी ठेचून मारणे. खुनाबद्दल एकच शिक्षा, मुंडकं उडवणे. इ.इ. (मंडळी काही ओळखीचं वाटतंय का? बरोबर, ही वहाबी (जिला सलाफी असेही म्हणतात) विचारसरणी म्हणजेच आजचे तालिबान. तालिबान हे पूर्णपणे वहाबीस्ट आहेत.) तो लोकप्रिय होत गेला तसतसे स्थानिक सत्ताकेंद्रं डळमळीत व्हायला लागली (आपल्या इंद्राच्या सिंहासनासारखं हो). त्याच्या विरुध्द कारस्थानं झाली, हल्ले झाले. त्याला पळूनही जावं लागलं. आणि तिथेच त्याला भेटला मुहम्मद इब्ने सा'उद (सौद हा सोपा उच्चार झाला).

राजकिय शक्ती

मुहम्मद इब्ने सा'उद (सा'उद चा मुलगा मुहम्मद) हा एक स्थानिक शेख (मुखिया / पाटिल) होता. मुहम्मद इब्ने अब्द्'अल वहाब त्याच्या आश्रयाला गेला. दोघांची मैत्री जुळली. इब्ने सा'उद हा इब्ने अब्द्'अल्-वहाब च्या विचारांनी प्रभावित झाला आणि त्या दोघांनी शपथ घेतली की पूर्ण अरबस्तान हा शुध्द इस्लामच्या प्रभावाखाली आणायचा. राज्य इब्ने सा'उद आणि त्याचे वारस करतिल (हेच ते सा'उदी राजघराणं). धर्माचा गाडा इब्ने अब्द्'अल्-वहाबच्या विचारांप्रमाणे चालेल. इब्ने सा'उदच्या मुलाशी इब्ने अब्द्'अल्-वहाबच्या मुलीचे लग्न लावून दिले गेले. अरबस्तानाच्या पवित्र भूमी वर मुस्लिमेतर शक्ती कधीही प्रबळ होता कामा नयेत अशी शपथ घेतली गेली. (हीच घटना नेमकी बिन लादेन च्या उदयाला कारणीभूत ठरली. अमेरिकेने इराक विरुध्द सैन्य सौदी अरेबियात पाठवले तेव्हा बिन लादेन बिथरला आणि बंड करुन उठला. त्या मागे हीच प्रेरणा होती.)

तर या दोन माणसांनी मिळून हळू हळू हातपाय पसरायला सुरुवात केली. हा प्रकार पिढ्यानपिढ्या म्हणजे १८१८ पर्यंत चालला. १८१८ मधे तुर्की सुलतानाला या प्रकाराची भिती वाटायला लागली आणि त्याने सैन्य पाठवून परत स्वतःचे राज्य मजबूत केले. थोडी वर्षं गेली आणि परत सा'उदी घराणं परत वरचढ झालं. इ.स. १८९१ मधे अल्-राशिद नावाच्या एका प्रतिस्पर्धी शेखने सा'उदी घराण्यावर हल्ल करुन त्यांना पळवून लावले. त्या वेळी सा'उदी घराण्याच्या मुख्याचा १४ वर्षांचा मुलगा अब्दुल अझिझ हा पण पळाला. या कुटुंबाने आश्रय घेतला कुवेत मधे. (या उपकाराची परतफेड सौदी कुटुंबाने जेव्हा सद्दाम ने कुवेत गिळंकृत केलं तेव्हा कुवेती राजघराण्याला आश्रय देऊन केली. कुवेतचा 'अमिर' आणि त्याचं कुटुंब रियाध मधे सुखात नांदत होतं.) इ.स. १९०२ मधे याच अब्दुल अझिझ ने अल्-राशिद चा निर्णायक पराभव करुन स्वतःचे राज्य स्थापित केले, नाव दिले 'सौदी अरेबिया'. स्वतःला 'मलिक' म्हणजे राजा घोषित केले. परत आपल्याला पळावे लागू नये म्हणून त्याने हळू हळू अरबस्तानातले इतर भूभाग जिंकून घ्यायला सुरुवात केली. त्या करता साम-दाम-दंड-भेद सगळे उपाय वापरले. त्याची २२ अधिकृत लग्नं झाली (एका वेळेला ३ किंवा ४ च बायका असायच्या). त्याचं सगळ्यात पहिलं अपत्य इ.स. १९०० साली तर सगळ्यात धाकटं अपत्य इ.स. १९५२ मधे जन्मलं. त्याच्या ६व्या आणि सगळ्यात आवडत्या पत्नीला २१ मुलं झाली. हे सगळं इथे लिहायचं कारण की आपल्याला अरबस्तानातल्या सामान्य माणसाच्या विचारसरणी ची थोडी कल्पना यावी. (माझ्या ओळखीच्या एका मध्यमवयीन गृहस्थानी त्यांच्या कुटुंबाच्या व्हिसा साठी अर्ज केला त्यात 'बायकांची संख्या - १' आणि 'मुलांची संख्या - २' असे लिहिले होते. त्यांच्या कंपनीतला 'मंदूप' - सरकारी कामे करणारा स्थानिक मनुष्य त्या नंतर किती तरी दिवस त्यांच्या कडे बघून हसत असे. :) )

असा हा देश. अवाढव्य. जवळ जवळ भारता इतका. पण लोकसंख्या भारताच्या अडिच टक्के असेल. नैसर्गिक विविधतेने नटलेला - जगातल्या भयाण वाळवंटातील एक 'रब-अल-खाली' - एम्प्टी क्वार्टर - रब = क्वार्टर / खाली = रिकामं - सौदी अरेबिया मधे आहे. पण सौदी अरेबिया मधे 'आभा' नावाचं एक शहर आहे जिथे बारा महिने पाऊस असतो. तापमान १८-२० डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास घुटमळत असतं. तबुक नावाचं एक शहर आहे जिथे नजर जाईल तिथपर्यंत फळबागा आहेत. आमची एक कस्टमर कंपनी होती. त्यांच्या कडे ३५००० हेक्टर ची जमिन लागवडीखाली होती. अल्-हासा हे जगातलं सगळ्यात मोठं 'ओऍसिस' सौदी अरेबिया मधे आहे. (अवांतर - अल्-हासा चे लोक जळू म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांची 'दृष्ट' लागते अशी त्यांची ख्याती आहे ;) ) इस्लामच्या ३ पवित्र ठिकाणांपैकी २ या देशात आहेत, मक्का-अल्-मुकर्रमाह (मुकर्रमाह = कृपाळू) आणि मदिना-अल्-मुनव्वराह (मुनव्वराह = प्रकाशमान, दिव्य).


मक्का - का'बा


मदिना - पैगंबरांचे विश्रांतिस्थान

तर एकूण अश्या या 'दिव्य' देशात मी जात होतो तर. मी जितकं वाचत गेलो तितकी माझी भिती कमी होत गेली, कुतूहल वाढत गेलं. आब्बी तो जानाच मांगताय, इथपर्यंत तयारी झाली मनाची. आता चालू नोकरीचा राजीनामा देण्या आधी नविन कंपनीचे अपॉइंटमेंट लेटर मिळणे आवश्यक होते. ती वाट बघणे चालू झाले. एकदाचे ते आले. त्या कागदावरची ती नाजूक आणि सुरेख अरबी भाषेची वळणदार अक्षरं मनाला एका नविन दुनियेची चाहूल देत होती. नक्की काय ते कळत नव्हतं. मनाने तर मी कधीच सुलतान शहरयार आणि राजकन्या शहराझाद च्या अरेबियन नाईट्स १००१ (अल्फ लायला-व-लायला = १००० आणि १ - अल्फ = १००० - व = आणि, लायला = रात्र) गोष्टींच्या सुरस आणि चमत्कारिक जगात पोचलो होतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी तडक जाऊन राजीनामा दिला. बर्‍याच वाटाघाटींनंतर तो मंजूर पण झाला. परतीचा दोर कापला. आता फक्त विसाचे काम झालं की चाललं आमचं बुंऽऽग सौदीला. आत्तापर्यंत मी सौदी अरेबिया मधे अल्-खोबार या गावात राहणार हे नक्की झालं होतं. हे गाव म्हणजे सौदी अरेबियाच्या तेल व्यापारचे केंद्र. मुंबई आणि नवी मुंबई सारखी खोबार आणि दम्माम ही जुळी शहरं, दम्माम मोठं, जुनं आणि स्थानिक प्रांताची राजधानी. तर खोबार हे नविन, आधुनिक, आखिव रेखिव (सगळे रस्ते काटकोनात) असं पाश्चात्य छाप असलेलं शहर. कोणीतरी सांगितलं की खोबार हे सौदी अरेबिया मधलं सगळ्यात लिबरल ठिकाण आहे. तेवढंच बरं वाटलं. व्हिसाचे काम दिल्लीला होणार होतं. तिथे जेव्हा मेडिकल टेस्ट करायला गेलो तेव्हा मजूरांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या. म्हणलं आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.

यथावकाश तारीख ठरली, तिकिट पण आलं हातात. ७ फेब्रुवारी १९९९ ला सकाळी १०.३० ला सौदी अरेबियन एयरवेजचं विमान सुटणार. तयारी झाली. पहिलाच परदेश प्रवास. ती परदेशप्रवासाची खास ३२ साईझ ची बॅग आली घरात. कपडे, रोजचं सामान नुसता गदारोळ झाला होता घरात. कसं बसं ते सामान त्या खास बॅगेत भरलं आणि ६ तारखेला रात्री शांतपणे गप्पा मारत बसलो. या सगळ्या मानसिक आणि शारिरीक ताणाने मला सणसणून ताप चढला होता. त्यातच घरवाली पोटूशी होती. आता परत कधी भेटणार, कसं होणार हेही विचार मनात होतेच. कशीबशी रात्र गेली. आमच्या घरच्या पद्धतीप्रमाणे आम्ही गाडी सुटायच्या जितकं आधी जाता येईल तितकं आधी स्टेशनवर जाऊन बसतो. विमानतळ झाला म्हणून काय झालं. शिस्त ही शिस्त. ;) १०.३० च्या विमानासाठी वडिलांनी सकाळी ६.३० लाच घराबाहेर काढलं. घरापासून विमानतळ......... फक्त १५ (अक्षरी पं ध रा) मिनिटे दूर. पण आता काहिही सहन करायची तयारी ठेवली होती. विमानतळावर पोचलो. तिथे काही अपेक्षेप्रमाणेच काही हालचाल दिसत नव्हती आमच्या फ्लाईटची. काउंटर ७.३० ला उघडणार होते. बसलो निवांत गप्पा मारत. आईचा चेहरा सगळं काही सांगत होता तिला बोलायची गरजच नव्हती. वडिलांच्या चेहर्‍यावर काळजी आणि दु़:ख यांचं मिश्रण. बायको तर थोडी दूरच जाऊन उभी होती. एकंदरीत दृश्य टिपिकल होतं. :)

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली, "सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ला जाणार्‍या प्रवाशांनी लक्ष द्या..."

क्रमशः

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Oct 2008 - 5:23 am | मदनबाण

व्वा..फारच सुरेख...वाचण्यात दंग होऊन गेलो...
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

टारझन's picture

5 Oct 2008 - 5:30 am | टारझन

बिप्पीन भौ .. सगळा सौदीचा इतिहास चक्क फोटूंसकट .. भाषा उकल.. ती मुस्सु नावं लिहीने .. जबरा आहे ..
एक कळत नाय .. इतके दिवस वाचनमात्र का होतात? तुम्ही वाचनमात्र असल्यामुळे तुम्हाला पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... आणि एवढं प्रॉपर लिहील्याबद्दल अनखिन थोड्या वाढदिवसाच्या शुभेच्छा :)

शेवटी ते खोबार काय ते समजलं.. नाय तर डोक्याचं खोबरं व्हायची पाळी आलेली

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

टुकुल's picture

5 Oct 2008 - 5:49 am | टुकुल

मस्त लिहिल आहे.
बिप्पीन भौ, मागच्या भागाची जशी लिंक दिलीत तसच त्यातली शेवटची काही वाक्य परत दिल्यास वाचायला बरे पडेल.

>>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.

हे काही कळाले नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते

व्हिसा प्रोसेसिंग मधे 'मेडिकल टेस्ट' हा एक अतिशय जबरा प्रकार असतो. पूर्ण (म्हणजे पूर्ण) तपासणी करतात. एक्स्-रे वगैरे काढताना शर्ट वगैरे काढावा लागतो तो संदर्भ आहे इथे.

बिपिन.

आनंदयात्री's picture

6 Oct 2008 - 2:36 pm | आनंदयात्री

>>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.

=)) =)) =))
टुकुल्याने अर्थाचा अनर्थ केला ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 3:25 pm | बिपिन कार्यकर्ते

हात् मेल्या... ;)

टारझन's picture

6 Oct 2008 - 10:38 pm | टारझन

आग्ग्यायायायाअयाअ ..

>>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.
=)) =)) =)) =)) =))
आयला हे आमच्या नजरेतनं कसं सुटलेलं ? बेक्कार .. अब बिप्पिन भौ .. हत् मेल्या म्हणो या और कुच .. नो जवाब .. इट्स हिट विकेट

- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

फटू's picture

5 Oct 2008 - 5:51 am | फटू

सफर ए सौदी अरेबिया मस्त चाललीय... सौदी अरेबियाच्या हीश्ट्री जाग्रपीचा सचित्र धावता आढावा तर मस्तच...

पुढचा भाग लवकरच येउद्या... आमची "जाणून घेण्याची ईच्छा" आम्ही तुर्तास काबूत ठेवतो...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शितल's picture

5 Oct 2008 - 6:20 am | शितल

मस्त लिहिले आहे.
फोटो ही आवडले. :)
लवकर लिहा,वाचत आहे आणी पुढच्या भागाची वाट पहात आह.

प्रमोद देव's picture

5 Oct 2008 - 8:32 am | प्रमोद देव

इतिहास,भूगोल आणि वर्तमानाची झकास सांगड.

सहज's picture

5 Oct 2008 - 8:36 am | सहज

असेच म्हणतो.

बिपिनभाय, हा भाग देखिल सुंदर झालाय. पुढच्या भागची वाट पहातोय.

चित्रा's picture

6 Oct 2008 - 5:53 am | चित्रा

छान लिहीले आहे. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.

सुक्या's picture

5 Oct 2008 - 8:50 am | सुक्या

पावनं .. लय भारी लिवलय. सौदीला हीरीत त्याल सापडतं यवडं आमाला म्हाइत व्हतं. तुमच्या लेखात लय नवीन गोस्टी म्हायती झाल्या. आमच्या गावचं मास्तर, तेला बी यवढं म्हाइत नाय. यक कळलं न्हाय. हीरीत त्याल सापडतं तर हे लोक पानी कुठनं आनत्यात? आमची आपली योक शंका हो.
बाकी समदं झ्याक.

सुक्या (बोंबिल)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 6:11 pm | बिपिन कार्यकर्ते

हीरीत त्याल सापडतं तर हे लोक पानी कुठनं आनत्यात?

कळेलच हळू हळू. :) आणि मला कळलं होतं तेव्हा मी जसा थक्क झालो होतो तसे तुम्ही पण व्हाल.

रेवती's picture

5 Oct 2008 - 8:58 am | रेवती

लवकर येऊ द्या.
आत्ताचा भाग छानच!

रेवती

मुक्तसुनीत's picture

5 Oct 2008 - 8:58 am | मुक्तसुनीत

मिष्टर कार्यकर्ते ,
वाचायला लागलो आणि गुंगून गेलो राव. फारच सुरेख वर्णने. वरती प्रमोदकाकांनी अचूक म्हण्टलंय. च्यामारी छुपे रुस्तुम निघालात राव :-)
यावेळचा क्रमशः जास्त बोचला. एकदम रंगून गेलो होतो आणि खटकन "क्रमशः". :-(

असो. तुम्ही वेळात वेळ काढून लिहिताय; ते जतन करण्याच्या लायकीचे बनते आहे !

मनिष's picture

6 Oct 2008 - 2:59 pm | मनिष

वाचतो आहे, अजून लिहा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहिलं आहेत म्हणून नाही तर छोटा भाग लिहून क्रमशः टाकलं आहेत म्हणून! लवकर टाका पुढेचे भाग.

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2008 - 10:05 am | पिवळा डांबिस

तुमचं प्रवासवर्णन तर मस्तच चाललंय...
पण सौदी अरेबियाविषयी मनात काही मूलभूत शंका आहेत.....
तुम्ही तुमच्या लिखाणात तेथे वास्तव्य करायला लागा, मग विचारतो.....
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2008 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीपीन,
सौदीच्या प्रवासात आपल्याबरोबर आम्हीही वावरतोय असे वाटत आहे. सुरेख माहिती, सुरेख वर्णन.
खोबार काय आहे, त्याचा प्रश्न सुटला :)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

ऋषिकेश's picture

5 Oct 2008 - 12:30 pm | ऋषिकेश

उ त्त म!!!!
अगदी माहितीपूर्ण लेख .. वा वा वा..
आधीचा भाग अनुभवप्रधान तर हा माहितीपूर्ण अशीच सरमिसळ असणार आसेल तर वाचायलाही मजा येईल आणि माहितीही मिळत जाईल...
मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे लेख संग्राह्य होणारसं दिसतंय :)

शुभेच्छा! वेळ होईल तसं क्रमशः निवांत झालं तरी मला चालेल :)

-(क्रमशः) ऋषिकेश

बापु देवकर's picture

5 Oct 2008 - 3:20 pm | बापु देवकर

बिपीनराव्.....तुमचे विमान मस्तच उड्तय.... चालु द्या... मी बरोबर आहेच..

विनायक प्रभू's picture

5 Oct 2008 - 3:28 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
चांगला लेख.
बाकी बि.का. अरब तेलांच्या विहिरिवर खुप प्रेम करतात.

विसोबा खेचर's picture

5 Oct 2008 - 4:48 pm | विसोबा खेचर

बिपिनकाका,

तुमच्या सचित्र प्रवासवर्णनामुळे मजा आली राव! सुंदर फोटू आहेत...

येऊ द्या अजूनही....

तात्या.

स्वप्ना हसमनीस's picture

5 Oct 2008 - 6:04 pm | स्वप्ना हसमनीस

मस्त वर्णन ! पुढचे भाग लवकर येऊ द्यात !वाचायला उत्सुक आहोत

जयवी's picture

5 Oct 2008 - 6:19 pm | जयवी

आमच्याही सौदी वास्तव्याच्या आठवणी जाग्या झाल्या :) फोटो, माहिती फारच सुरेख !!

मृदुला's picture

5 Oct 2008 - 9:17 pm | मृदुला

मस्त लेख. सौदी आणि वहाबी चा संक्षिप्त इतिहास आवडला.
अनुभवकथन उत्तम.
तुम्हाला लिहायला लवकर आणि भरपूर सवड मिळो अशी शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2008 - 9:47 pm | प्रभाकर पेठकर

वा बिपिनराव,
मस्त लिहीलय. अभिनंदन.

ओमान (मस्कत) मध्येही 'वहेबी' जमात (टोळी) आहे. ते वरच्या दर्जाच्या टोळ्यांमध्ये गणले जातात.
लायला = रात्र मस्कत मध्ये 'लैल' म्हणजे रात्र. 'लैला' हा शब्द त्यातूनच तयार झाला असावा.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 10:06 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद काका. लायला आणि लैल एकच (माझा उच्चार चुकला आसेल कदाचित). (बिल्लैल = रात्री - मी रात्री येतो).

हे वहाबी हे एक तत्वज्ञान आहे. जबरी कट्टर, त्याना सलाफी असंही म्हणतात आणि ते सुन्नी पंथिय आहेत. ओमानी हे बहुतकरुन इबाधी आहेत. इबाधी ही शिया / सुन्नी सारखीच अजून एक शाखा आहे इस्लामची. एवढे जहाल नसतात.

बिपिन.

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2008 - 8:56 am | प्रभाकर पेठकर

उच्चार चुकीचा नसेल. अरबस्थानात वेगवेगळ्या प्रांतात्/देशात एकाच शब्दाचे वेगवेगळे उच्चार आढळतात. त्याचा परिणाम असावा.
खरं आहे, ओमनी, युएई वाले अरब सौदी अरबांइतके जहाल नाहीत.
'इबादत' म्हणजे 'पुजा' असा अंधूकसा अर्थ मला माहित आहे. 'इबाधी' म्हणजे 'पुजारी' असा अर्थ असावा. पण हिन्दू धर्मात 'पुजा' आणि 'पुजारी' इतका स्वच्छ अर्थ नसला तरी 'हाजी' च्या खालोखाल अर्थ असावा.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते

जुने संदर्भ आठवत होतो. आजकाल विकिबाबा आणि गूगलबाबा च्या कृपेने बरेचसे संदर्भ रेडीमेड मिळतात. हे पहा http://en.wikipedia.org/wiki/Ibadi . अजून एक 'ट्रिविआ'... ओमानी लोक हे अरबस्तानातले, इस्लामचा स्वीकार करणारे सगळ्यात शेवटचे लोक, आणि पैगबरांच्या मृत्यूनंतर इस्लामविरुद्ध बंड करणारे पण ते सगळ्यात पहिले लोक. खूप मोठं सैन्य पाठवून ते बंड शमवलं गेलं आणि ओमान मधे इस्लाम जिवंत राहिला. त्या बंडाचीच परिणती म्हणजे हा 'इबादिझ्म'....

प्राजु's picture

5 Oct 2008 - 10:10 pm | प्राजु

बिपिन.. सौदीचा इतिहास मस्त सांगितला आहेस. माहितीच नव्हतं हे काही.
आणि संपूर्ण लेखाला एक प्रकारच फ्लो आहे ज्यामुळे कंटाळवाणा कुठेही होत नाही. नविन देशाबद्दल बरीच माहिती मिळत आहे. पुढचा भाग वाचण्या उत्सुक.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

6 Oct 2008 - 12:17 am | धनंजय

तोल मस्त सांभाळला आहे...

छुपे रुस्तुम - आणखी लिहाच!

अनिल हटेला's picture

6 Oct 2008 - 8:50 am | अनिल हटेला

बिपीन भो !!!

एकदम बढीया !!!!

मस्त सफर चालू आहे आमचीही तुमच्या बरोबर !!!!

येउ द्यात पूढील भाग ही लवकर !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

रामदास's picture

6 Oct 2008 - 11:46 am | रामदास

फार सुरेख लिखाण.एव्हढे दिवस का बरं लिहीलं नसेल असा प्रश्न पडला.
(पण परदेशात काम फार असणार त्यामुळे वेळ कमी पडत असेल असा खुलासा माझा मी करून घेतला. )
आता रोज तुमच्या लिखाणची वाट बघणार हे नक्की.
बाकी विशेषणं सगळ्यांनी वापरली आहेतच, मी त्याचाच पुनरुच्चार करणं म्हणजे बासी ईद होईल.
शुभेच्छा.

धमाल मुलगा's picture

6 Oct 2008 - 2:08 pm | धमाल मुलगा

जनाब बिपीनमियाँ,
क्या कहने? अलबत, आपका यह बयाँ-ए-सफ़र, काबिल-ए-तारिफ है|

इसे पढ़ के सा'उदी के अतित के बारें में बडी खु़ब जानकारी हासिल हुई|

त्यातच घरवाली पोटूशी होती. आता परत कधी भेटणार, कसं होणार हेही विचार मनात होतेच.

या परवरदिगार... हमारी भाभीजान इन हालात में थी और आपको ऐसेही जाना पडा? तौबा तौबा| क्या गुज़री होगी आप पें|

और भी लिख्खो हज़रत, इत्मिनान से लिख्खो, ऍहेतरामसे लिख्खो....

आपका,
धमाल कोहीस्तानी

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 3:24 pm | बिपिन कार्यकर्ते

इस इज्ज़त आफजाई के लिये शुक्रिया धमाल मियाँ. वल्लाह, आपकी उर्दू के क्या कहने... हम तो फिदा है. लेकिन आपने वह 'अतित' जैसा हिंदी लफ्ज़ क्यूं इस्तेमाल किया? खालिस उर्दू मे उसे 'माझी़' (माझी नही, गौर फर्माइयेगा) कहते है. :)

बिपिन.

धमाल मुलगा's picture

6 Oct 2008 - 3:50 pm | धमाल मुलगा

इस गुस्ताखी़ के वास्ते मुआफी चाहुंगा|
हमजैसे उर्दुके नौसिखीये की इस नादानी को सम्हाल लिजे| और हौसला अफजाई के लिये तह-ए-दिल से शुक्रिया|

(स्वगत: 'माझी़' ...हम्म...एक शब्द आणखी मिळाला :) )

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2008 - 3:57 pm | स्वाती दिनेश

माझी... याने पास्ट.. बिता हुआ..(संदर्भ-इजाजत)
स्वाती

धमाल मुलगा's picture

6 Oct 2008 - 4:18 pm | धमाल मुलगा

स्वातीताई,
धन्यवाद. :)

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2008 - 2:12 pm | स्वाती दिनेश

दोन्ही भाग वाचले आत्ताच.. मस्त लिहिले आहेस.. पुढे वाचायला उत्सुक,
स्वाती

आनंदयात्री's picture

6 Oct 2008 - 2:35 pm | आनंदयात्री

बिपिनभौ !! रंजक आहे लिखाण तुमचे. सौदी बद्दलची माहिती आवडली !!

मनस्वी's picture

6 Oct 2008 - 2:40 pm | मनस्वी

छान लिहिलंएस बिपीन.
सौदी अरेबिया बद्दल माहिती नसलेली बरीच माहिती मिळतीये.
पुढचा भाग येउदेत.

मनस्वी

राम दादा's picture

6 Oct 2008 - 2:41 pm | राम दादा

वाचण्यात रस येत आहे. खुपच छान.. .पुढील भागाची वाट पहात आहे..

राम दादा..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 3:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही फारच तरूण आहात असं कळ्ळं, म्हणून वाढदिवसाच्या तुर्की शुभेच्छा!

अदिती

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 3:52 pm | विजुभाऊ

रीचार्ड एफ बर्टन या लेखकाने अरेबियन नाइट्स सर्वप्रथम इंग्रजीत आणल्या.
त्यासाठी तो अरबी भाषा शिकला. त्याला अशीयायी / युरोपीयन , अफ्रिकन खंडातल्या प्रमुख आणि बोली अशा एकूण एकोणतीस भाषा येत होत्या.
भाषा शिकण्यासाठी एक सोपी युक्ती त्याच्या कडे होती. तो एखादी भाषा शिकण्यासाठी त्या भाषीक स्त्रीशी संधान जुळवायचा.
अवांतरः मी सध्या बहाशा मलेशिया शिकतोय

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 4:13 pm | बिपिन कार्यकर्ते

रिचर्ड बर्टन हा एक अतिशय अवलिया वल्ली होता. मक्का मदिने ला जाऊन जिवंत परत आलेला पहिला नॉन्-मुस्लिम. नुसता तिथे गेलाच नाही तर तर चोरून तिथली रेखाटनं केली. अरबी भाषेत अतिशय पारंगत असल्याने तो एका श्रीमंत अफगाणी व्यापार्‍याचा वेष घेऊन जाऊ शकला. आफ्रिकेतली त्याची भटकंतीही तितकीच थरारक आहे. डहोमी (आताचे घाना / आयव्हरी कोस्ट वगैरे देश) वगैरे देशात तो ब्रिटनच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून गेला होता. तिथल्या सम्राटाने बाळगलेले स्त्रियांचे सैन्य, तिथे चालणारी सामुहिक हत्याकांडं या बद्दल त्याने खूप लिहिले आहे. खूप मनस्वी असलेला हा भटक्या एक वादळी जीवन जगला. भारतात पण बरेच वास्तव्य केले त्याने. अरेबियन नाईट्स आणि भारतातील काही 'विशिष्ट' पुस्तके यांचे भाषांतर त्याने केले आहे. नविन भाषा शिकत असताना, तो त्या भाषेतील शिव्या प्रथम शिकत असे. त्याचे इंग्लंड मधले थडगे पण एका तंबूच्या आकाराचे आहे.

शाळेत असताना, रिचर्ड बर्टन वर बाळ सामंतांनी लिहिलेआणि(नाव आठवत नाहिये पटकन) आणि मौज प्रकाशनाने (बहुतेक) प्रसिध्द केलेल्या पुस्तकाची पारायणं केली होती. त्याची आठवण करुन दिल्या बद्दल विजुभाऊंचे आभार (चुकून शुभेच्छा म्हणणार होतो... ;) )

ते पुस्तक कोणाकडे उपलब्ध असल्यास कळेल का?

बिपिन.

मेघना भुस्कुटे's picture

6 Oct 2008 - 8:38 pm | मेघना भुस्कुटे

'शापित यक्ष' - बाळ सामंत

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Oct 2008 - 5:25 pm | डॉ.प्रसाद दाढे

परचुरे प्रकाशन. अप्रतिम पुस्तक
अवा॑तरः माझ्याकडे बर्टन लिखित अरेबियन नाईट्स आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Oct 2008 - 5:44 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉ., हे पुस्तक 'आउट ऑफ प्रिंट' होते. मला ओळखीने नविन प्रत नुकतीच मिळाली आहे. परत चाळतो आहे, बर्‍याच दिवसांनी. रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाईट्सची प्रत मिळेल का? तुमच्या कडची प्रत ही मूळ आहे की संपादित. कृपया जरूर कळवणे.

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 4:22 pm | विजुभाऊ

रीचर्ड बर्टन हा वेश पालटुन फिरत असताना एके ठिकाणी पकडला गेला.
अशियायी पुरुषांप्रमाणे खाली बसुन लघवी न करता तो युरोपीयन लोकांप्रमाणे उभे राहुन लघवी करत होता. त्यामुळे लोकाना त्याचा संशय आला

मेघना भुस्कुटे's picture

6 Oct 2008 - 8:35 pm | मेघना भुस्कुटे

आयला धमाल लिहिता हो तुम्ही! इतके दिवस का शांत बसला होतात? टिपिकल वातावरण, बुंग, जितकं आधी निघता येईल तितकं आधी, अक्षरी पं-ध-रा, मजूर... वा वा! धमाल आहे...
भाषेबद्दल सगळं विस्तारानं लिहा हां! कंजूषी नको... :)

भाग्यश्री's picture

6 Oct 2008 - 10:19 pm | भाग्यश्री

खूपच आवडला हाही भाग.. एकदम माहीतीपूर्ण, नवीन शब्द्,देशाचा इतिहास कळतोय.. सही आहे!

सर्वसाक्षी's picture

6 Oct 2008 - 10:45 pm | सर्वसाक्षी

आपल्या सुरस आणि चमत्कारिक कथा वाचायला उत्सुक आहे

चतुरंग's picture

6 Oct 2008 - 10:56 pm | चतुरंग

एकदम ओघवतं आणि नेमकं लिहिलं आहे माहितीपूर्ण आणि तरीही रंजक!
१०.३० च्या विमानासाठी घरातून 'पं ध रा' मिनिटांच्या अंतरासाठी देखील ६.३० ला निघणं पण एकदम सह्ही! (माझे बाबा ही असेच आहेत. त्यांचे नेहेमीचे म्हणणे "अरे तिथे जाऊन मारा ना गप्पा काय मारायच्या आहेत त्या, आपल्याकडे कधी कशाने बंद होईल, संप होईल सांगता येत नाही आपण आपले आधी जाऊन बसलेले बरे!") अहो पण आमचं इतक्या आधी जाऊन पार भरीत होऊन जातं त्याचं काय?!

एकाच सुलतानाच्या भरपूर बायका आणि असंख्य मुलांचे उल्लेख वाचून करमणूक झाली! ;)

बिपिनराव लिखते रहो!

(खुद के साथ बातां : ह्या सुलतानांचा 'परफॉर्मन्स' बघून पाश्चात्यांना व्हायग्राच्या शोधाची प्रेरणा मिळाली की काय? ;)

चतुरंग

शुभान्गी's picture

11 Oct 2008 - 1:11 am | शुभान्गी

तुमचे अनेक गुण पाहिले पण हा गुण (लीहीण्ञाचा) आमच्या पासुन कसा काय लपला??? लिखाण अतिशय सुन्दर झाले आहे..... शब्द अतिशय सुन्दर गुन्फले गेले आहे. keep it up.....

मन्जिरि's picture

27 Oct 2008 - 2:20 pm | मन्जिरि

बिपिन नविन भाग कुथाय?

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Oct 2008 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो लिहितोय हो. सध्या थोडा व्यस्त आहे आणि त्यामुळे मनासारखा वेळ मिळत नाहिये. लिहितो लवकरच. :)

बिपिन कार्यकर्ते