“डोळे हे जुल्मि गडे… रोखुनी मज पाहू नका ”…
च्यामारी, आज पहाटे स्वप्नात पुन्हा मधुबाला, आणि तीही चक्क डोळे हे जुल्मि गडे म्हणणारी ?
… अगदी पूर्वी स्वप्नात शिवाजी महाराज, टारझन, वज्रहनुमानमारूती वगैरे यायचे…
… आणि आता चक्क मधुबाला ?
मजा आहे बेट्या तुझी. चल चहा कर आता.
“पाणी-दूध मिसळलं? मिसळलं.
साखर टाकली ? टाकली.
उकळी आली? आली.
चहापत्ती टाकली? टाकली.
आलं किसून टाकलं? टाकलं.
झाकण ठेऊन ग्यास बंद ? बंद”.
चहा गाळून, मफलर टोपी चढवून, कपबशी घेऊन, वरांड्यात येऊन बसलो.
चहाचा पहिला घोट घेतला, तर वाफेनं चष्म्याची काच वाफकटली, म्हणून चष्मा काढून ठेवला.
तेवढ्यात समोरच्या वरांड्यात हालचाल दिसली.
आली वाटतं मधुबाला…
“सहज तुझी हालचाल, मंत्रे जणु मोहिते …
सहज चालणेही तुझे, सहज पाहणेही तुझे
मोहिनी मज घालते…”
… पुन्हा चष्मा चढवून बघतो, तो रानगवा आणि त्याचं ते कुत्रं. कुत्रं कसलं, ढाण्या वाघच तो. हा ढाण्या वाघ, त्याचा मालक रानगवा, आणि मालकीण तेवढी अनारकली.
अगदी अनारकलीच.
“मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे…”
म्हणजे आपण नंदलाल की काय?
शिव शिव .. या वयात असले विचार ?
तेवढ्यात आठवलं, फ़ुलझाडांना पाणी द्यायला विसरू नका म्हणून बजावून गेलीय ही जाताना….
आता आधी तेच करूया, म्हणून पाण्याची झारी आणायला अंगणात आलो…
“मधुर सुवासाची, सुंदर झारी भरोनी…. जा जा जा झणि, घेउनि ये … ”
अंगणात बघतो, तो कुत्र्यानं घाण करून ठेवलेली.
“च्यामारी, कुत्रं कुणाचं, आणि घाण कुठे. रानगव्या, दिसते तुझी बायको मधुबालेसारखी, म्हणून काय तुझ्या कुत्र्याची घाण रोज मी स्वच्छ करू ?”
मधुबाले सारखी ? छे छे, काहीतरीच काय ? ती कुठे आणि ही कुठे…
… पण मुळात मी अंगणात आलोच कश्यासाठी होतो? आत गेल्यावर आठवेल, म्हणून आत यायला वळणार, तर समोर परांजप्या आणि कुंटया उभे.
“ काय म्हणताय काका? वहिनी अजून आल्या नाहीत वाटतं ? आणि काय म्हणतात तुमचे ते अण्णा ? ठरलं का त्यांचं, पुढलं उपोषण कशाबद्दल करायचं ते” ?
हा परांजप्या माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षं लहान, तरी मला काका म्हणतो, आणि हिला वहिनी. गेली पंधरा वर्षं पेन्शन खाऊन खाऊन चरबी वाढलीय मस्तवालाची. तिकडे परांजपीण आणि कुंटीण दत्तमंदिरात कीर्तनाला गेल्या, की हे दोन्ही टोणगे सकाळीच शिग्रेटी फुंकत रिटोळगिरी करत हिंडत असतात.
"चला, निघतो... पेन्शन घ्यायला जायचंय" असं, मुद्दाम मला खिजवायला म्हणत परांजप्या तुरुतुरु गेला. आता पूर्वी मी चांगली पेन्शनवाली नोकरी सोडून धंदा सुरु केला, पण तो पार बसला, हे किती वेळा उगाळावं माणसानं?
मग मी आत आलो तर टेबलावर काहीतरी चमकताना दिसलं. स्पष्ट दिसेना, म्हणून कपाळ चाचपडतो, तर चष्मा नाही. कुठे बरं गेला चष्मा? आठवेना. बहुतेक बाहेर वरांड्यात काढून ठेवला असेल, म्हणून पुन्हा तिथे जाऊन चष्मा घेऊन आत येऊन बघतो, तो हिच्या कानातल्या कुड्या. फारच विसरभोळी बुवा ही. दागिने काय टेबलावर ठेवण्याची वस्तू आहे? आणि तीही तीन दिवसापासून? आत नेऊन कपाटात ठेऊया म्हणून खोलीत शिरलो. पण कपाटाची किल्ली कुठे असते बरे? काही केल्या आठवेना.
जाउ दे. आठवेल तेंव्हा ठेऊ कपाटात. तूर्तास स्वयंपाकघरात नेऊन ठेऊया म्हणून कुड्या घेऊन निघालो, तेवढ्यात आठवलं कि अरे, आपण फ़ुलझाडांना पाणी देऊ म्हणून झारी घ्यायला अंगणात गेलो, तर परांजप्या आणि कुंटया बोलले वगैरे. मग झारी घेऊन पाणी भरायला बाथरूमीत येतो, तर कालचे ओले कपडे तिथे पडलेले. धुवायला वाटतं आपण काल… ‘धुवायला वाटतं ??? … “धुवायला विसरलो वाटतं” म्हणायला हवं ... च्यामारी आता स्वत:शी बोलतानापण विसरायला होतंय...
... तर आता आधी हे कपड्याचं निस्तरूया म्हणून साबण बघतो तर तो नाही… होय होय, साबणपण आणायला ही बजावून गेलेली आहे. शिंच्या या बायकांना म्हातारपण आलं, तरी माहेरचा सोस सुटत नाही. आता काय तर म्हणे भाचीचं बाळंतपण आहे, म्हणून जायलाच हवं. पण एक बरंय. आपण इकडे मोकळे. काहीही करा, खा, प्या, बोलणारं कुणी नाही.
तेवढ्यात आठवलं, मधुबाला सकाळी त्या रानगव्याला टाटा करायला अंगणात येते, मग तिथेच बराच वेळ असते. ती दिसते का हे बघायला पुन्हा वरांड्यात आलो, तर पेपर आलेला. काय म्हणतो आजचा अग्रलेख? अरे, पण पुन्हा चष्मा कुठे ठेऊन आलो आपण ??
क्रमश:)
प्रतिक्रिया
5 Mar 2014 - 7:12 pm | जेपी
मी पयला ....
5 Mar 2014 - 7:19 pm | आत्मशून्य
मधुबाला नाही ? मग कोण ...विसरला वाटते. ?
खुसखुशीत सुरुवात...!
5 Mar 2014 - 7:21 pm | बॅटमॅन
ही एक भन्नाटच सेरीज!!! स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैलीतला धागा मस्त आवडला.
5 Mar 2014 - 7:32 pm | पैसा
फुलपाखरासारखी आठवण आणि त्यात सतत येणारी मधुबाला! झकास आहे!
5 Mar 2014 - 7:48 pm | मुक्त विहारि
क्रमशः वाचून आनंद झाला....
5 Mar 2014 - 9:09 pm | शुचि
हाहाहा
:) मस्त
5 Mar 2014 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी सुरुवात ! पुभाप्र.
5 Mar 2014 - 10:33 pm | पाषाणभेद
एक सहज शंका, जर मधूबालेच्या वेळी रंगीत चित्रपट/ फोटो कॅमेरे असते तर मधूबाला एवढीच सुंदर भासली असती काय?
5 Mar 2014 - 11:06 pm | बॅटमॅन
सहमत.
मात्र मध्ये कुठेतरी मधुबालेचा एखाददुसरा साडीधारी रंगीत फटू पाहिल्याचे आठवते, अर्थात त्यातसुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती.
6 Mar 2014 - 7:52 am | चित्रगुप्त
ही पहा साडीतील मधुबाला:
.
6 Mar 2014 - 1:59 pm | आत्मशून्य
अगदी फटुवर तांत्रीक करामती केलेल्या असुनही.
6 Mar 2014 - 10:32 am | रसिया बालम
पुदिल भाग लवकरच येउ देत...
--(चातक)रसिया बालम
6 Mar 2014 - 10:39 am | मदनबाण
वा... :)
इथे ही डोकवुन पहा मंडळी :- "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!"
{प्रेमलुब्ध } ;)
6 Mar 2014 - 10:41 am | रसिया बालम
It is impossible to love and to be wise.
-- Francis Bacon *kiss3* *KISSING*
6 Mar 2014 - 12:57 pm | स्पंदना
कस अगदी ओघवतं लेखन आहे.
क्रमश; आवडलं.
येउ दे लवकर.
6 Mar 2014 - 1:55 pm | चिगो
चित्रगुप्तकाका फारच हिरवे.. नाय नाय.. रंगीत आणि रंगीन आहेत, ब्वॉ.
(ह.घ्या हे वे.सां.न.) झक्कास.. एक नंबर मिष्कील लेख.. :-)
6 Mar 2014 - 8:53 pm | चित्रगुप्त
या लेखात खरेतर मधुबाला ओघानं आलेली आहे, खरा विषय वयानुसार होणारा स्मृतिचा लोच्या: पाच मिनिटापूर्वीचे आठवत नाही, पण लहानपणाचे लख्ख आठवते, तेंव्हाचे पाठांतर वगैरे कधीच विसरायला होत नाही, वगैरे आहे. बघूया आता पुढे काय काय सुचते...
8 Mar 2014 - 11:56 am | शशिकांत ओक
सीनियर शहरवासी झाल्याने असे काही तरी नको ते आठवत राहते व चहा करताना साखर घालायचा विसर पडतो... पुर्व काळातील गुप्त स्मृती चाळवतात. म्हणून कदाचित आत्मचरित्र लिहायला सुरसुरी येते म्हणतात...
8 Mar 2014 - 12:34 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त लिहिले आहे, पुढील भाग लवकर टाका,
या वरुन सहज ल़क्षात आले की,
मला पण हापिसात जाताना रोज बस स्टॉपवर उभी असलेली एक मधुबाला दिसते. ती दिसावी म्हणुन हल्ली घरातुन पाच मिनिटे आधि निघतो आणि मग ती दिसे पर्यंत मारुतीच्या देवळात प्रदक्षीणा घालतो. कधी कधी एकाच प्रदक्षीणेला दर्शन मिळते तर कधी कधी अकरा झाल्या तरी मारुती पावत नाही. एक दोन वेळा तर मारुतीरायाने माझी बसही चुकवली आहे.
8 Mar 2014 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त! :)
8 Mar 2014 - 2:29 pm | कंजूस
आता मलाही
आठवत नाही चित्रपटांची नावं पण कथानक असे होते -एक चित्रकार (वयाने
पन्नाशी पुढचा)आणि त्याची तरुण चिकनी मधुबाला छाप मॉडेल .दोघे निरनिराळ्या
ठिकाणी जातात बीच ,केफे ,चौक ,बार वगैरे .तिथे हा चित्रकार फक्त काळया
ब्रशने दहा बारा फराट्यांत तिची लय कागदावर उतरवतो .फारच सुरेख .
सिनेमा सुरू झाल्यावर मोठ्या आशेने आलेले बरेच प्रेक्षक उठून गेले .
मी शेवटपर्यंत चित्रपट पाहिला .अशी चित्रकला मला येत असती तर ?फोटोग्राफी
त्यापुढे काहीच नाही .
एक चित्र येऊ द्याच चित्रगुप्त .अंधुकपण चालेल चष्मा सापडेपर्यंत .
कोणाला माहीत आहे का तो चित्रपट??
8 Mar 2014 - 2:38 pm | चित्रगुप्त
@कंजूसः कोणता बुवा हा सिनेमा? बघायलाच हवा.
ब्रशच्या फराट्यानं मॉडेलचं चित्रं काढून बरीच वर्षं उलटली आहेत, पण आता सुरु करायला हवंच ते पुन्हा. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
8 Mar 2014 - 2:45 pm | चित्रगुप्त
सिनेमाचे नाव आठवले की जरूर कळवा.
खालील दृष्य असलेला आहे का तो सिनेमा?
8 Mar 2014 - 3:57 pm | कंजूस
नक्कीच
.
हा सिनेमा मी '८८ ते '९१ दरम्यान पाहिला होता .
इकडे कोणाला रंगीत मधुबाला कशी असेल ते पाहायचे होते पण कलात्मक रेषा किती
एक पटींनी सुंदर चित्र बनवतात ते मला प्रथमच समजले .
जव्हारचा वारली चित्रकार सोमा जीवा .त्याने रेल्वे ,विमान प्रथमच
पाहिल्यावर ते वारली शैलीत रेखाटले .त्यातली लगबग ,चैतन्य किंमती कैमरेही
फोटोंत आणू शकत नाहीत .
26 Jul 2023 - 4:26 am | चित्रगुप्त
भिक्षेच्या धाग्याच्या निमित्ताने २०१४ चा हा धागा आठवला. नवीन मिपाकरांसाठी वर आणला आहे.
27 Jul 2023 - 9:15 am | अनिल हटेला
सुरुवात आवड्ली
पू भा प्र..
27 Jul 2023 - 6:37 pm | कुमार१
खुसखुशीत सुरुवात...!
27 Jul 2023 - 11:46 pm | रंगीला रतन
तुम्हाला वेगळा सांगायला पाहिजे का? जुने धागे वर काढू नका म्हणुन.
28 Jul 2023 - 1:17 am | चित्रगुप्त
का बरे ? एक वाचक म्हणून मला स्वतःला कुणी जुने धागे वर आणलेले खूप सोयीचे वाटते. अनेकदा नवे सगळेच धागे वाचणे शक्य नसल्याने बरेच काही वाचण्याचे राहून जात असते. त्याशिवाय नवनवीन मिपाकर भर्ती होत असतातच. त्यामुळे विस्मरणात गेलेले काही धागे पुन्हा वर येणे उपयोगीच असते. बाकी लेखन आवडले नसेल तर तसे जरूर सांगावे.