जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
16 Feb 2014 - 3:30 pm

ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्‍यांची,
आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची,
विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही,
तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही,
खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती,
सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी,
दगड खडकांशी झुंजणारे ते आकांताने वर येतात,
काठावरचे 'बघे' त्यांना पुन्हा खाली लोटून देतात

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

पाणी नसल्या विहिरीच्या काठावर झुंबड हीऽ मोठी
माणसांची, पोरांची, पोरींची आणि गावच्या पुंडांची
'भाईयो और बहनो स्पेशल शो, विहिरीतला तमाशा,
साथमें खाओ, या फिर पिओ मस्त थंडा पेप्सीकोला'
पेप्सीकोला घेई हाती नि चिमणी बघते दुरून,
'काम' सोडून पुंड बसला निवांत टमरेल झाकून

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

शाळेची घंटा झाली. आता जन गण मन' म्हणा
सारे प्रार्थनेला उभे रहा, राष्ट्रगीताला मान द्या
एऽ जब्या, हलू नकोस, हात हवेतला वळवू नकोस,
रग लागल्या पायावरचा भार मुळी सोडू नकोस
आपल्या महान देशाबद्दल थोडा आदर असू दे
'भारतमाता की...' लाही 'जऽय'चा प्रतिसाद दे

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

अरे, बेहत्तर आहे दगडावरची पकड सुटली तरी,
अरे, बेहत्तर आहे पुन्हा तळाशी कोसळलास तरी
नेहेमीप्रमाणेच एक-दोन हाडेच काय ती पिचतील,
कदाचित बापासारखे तुझे गुडघेसुद्धा फुटतील,
सावळ्या देहावरती कुठे रक्ताचे ओघळ वाहतील
पाहशील तू, काठावरचे त्यांना सुद्धा दाद देतील

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

हा तर पोचला काठापर्यंत, फारच आहे माजला
हाणा सारे नेम धरून, होउ द्या वर्षाव दगडांचा
साला इतक्या लवकर शो संपवतो म्हणजे काय,
इथे आम्हाला तर अजून 'प्रेशर' पण आला नाय
साल्या, इथून कटायचं. इथे काठावर नाही यायचं,
ज्यानं त्यानं आपापल्या पायरीनंच असतं र्‍हायचं

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

काठावरची ती अबोल चिमणी काठावरच राहील,
पेप्सीकोला संपला की आपल्या घरी निघून जाईल
येड्या, विहिरीतल्या जीवांसाठी नसते कधी चिमणी,
शिटणार्‍या पारव्यांशीच विहिरीची असावी सलगी
तळाच्या पारव्याने नसते अशी झेप कधी घ्यायची
उंच झाडावरच्या चिमणीची नसते आस धरायची

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

कडक कपड्यातले काही लोकही विहीरीवरती आले,
पॉपकॉर्नच्या पुडीसोबत थोडे त्यांनीही येन्जॉय केले,
थोड्या वेळात वैतागले, म्हणे वेळ साला फुकट गेला
याच्या पेक्षा ढिशुम ढिशुम पिक्चर असता पायला
शालू बी साली चिकणी नाय, एक लवसीन बी नाय
चंक्याची असली खडकाळ विहीर पायची काय?

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

चंक्या लेका फुकट रे फुकट केलास सारा खटाटोप,
विहीरीच्या तळातले विहिरीतच राहणार लोक
दिगंताची सारी खडकाळ, वांझ जमीन पाहिलीस,
काठावरच्या माणसांची पण नियत नाही जाणलीस
या असल्या खडकात कुठे रुजते अबोलीचे बीज?
साध्या हिरव्या अंकुराचीही इथे नसते कुठे वीण

इथे हवा गुलाबांचा ताटवा, वॅलंटाईन 'डे'चा फुलोरा,
सलमानच्या फाईट्सवर 'चिकनी चमेली'चा उतारा

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

('नागराज मंजुळे' या अवलियाच्या फँड्री' ने दिलेला अनुभव)

कलाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

16 Feb 2014 - 3:35 pm | प्यारे१

क्लास्स्स्स्स!

आधी चेपुवर वाचली. दंडवत.

सुहास झेले's picture

16 Feb 2014 - 3:37 pm | सुहास झेले

जबरा... फेसबुकवर मघाशी वाचलेलं :)

किसन शिंदे's picture

16 Feb 2014 - 4:17 pm | किसन शिंदे

खरंच जबराट!!

प्रचेतस's picture

16 Feb 2014 - 3:42 pm | प्रचेतस

फॅण्टास्टिक.

आतिवास's picture

16 Feb 2014 - 3:51 pm | आतिवास

'फॅन्ड्री' पाहताना-पाहिल्यावर मनात उमटलेली आंदोलनं, ती सावरताना विखुरलेल्या संवेदना, वस्तुस्थितीची अपरिहार्यता जाणवून वाटलेली हतबलता, व्यवस्थेची घट्ट वीण आणि तिच्या भिंती.... असं बरंच काही अगदी नेमक्या शब्दांत अभिव्यक्त करणारं लेखन.

आवडलं असं म्हणतानाही... अस्वस्थ वाटलं पुन्हा एकदा ...

सुहास झेले's picture

16 Feb 2014 - 4:08 pm | सुहास झेले

अगदी अगदी... !!

प्रसाद गोडबोले's picture

16 Feb 2014 - 6:42 pm | प्रसाद गोडबोले

+१

आयुर्हित's picture

16 Feb 2014 - 3:56 pm | आयुर्हित

कविता उत्तम झाली !
खूप चांगले निरिक्षण आहे काठावरच्या लोकांबद्दल.
या असल्या खडकात कुठे रुजते अबोलीचे बीज? हा जर प्रश्न असेल तर मी म्हणेन "प्रयत्नांती परमेश्वर"
लगे रहो!

जेष्ट मिपाकर जे लिहु शकतात त्याला तोड नाही . ---^---

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2014 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

+++++१११११ टू जेपी
राम_/\_रमता_/\_राम_/\_

धन्या's picture

16 Feb 2014 - 4:40 pm | धन्या

मस्त !!!

Atul Thakur's picture

16 Feb 2014 - 6:52 pm | Atul Thakur

जबरदस्त :)

तुमचा अभिषेक's picture

16 Feb 2014 - 9:28 pm | तुमचा अभिषेक

खल्लास लिहिलेय !
हा सिनेमा बघण्यासाठी किंबहुना अनुभवण्यासाठी किमान पुढच्या रविवारची वाट बघावी लागणार आहे, पण हे वाचून आतापासूनच कालवाकालव सुरू झालीय..

स्पंदना's picture

17 Feb 2014 - 4:15 am | स्पंदना

दंडवत ररा.
पाहिला नाहे आहे अजुन्,पण वाचताना हेलावल मन.

ही कविता वाचून आता पाह्यला पाह्यजे असं वाटतंय.

देव मासा's picture

17 Feb 2014 - 9:36 pm | देव मासा

मी पहिला चित्रपट, मला आवडला ,चार स्क्रीन वर ''गुंडे; सिनेमा होता आणि फक्त एकच स्क्रीन फॅनड्री साठी मुश्किल्ने तिकिटे मिळाली.
जब्याच्या आईच्या भुमिकेत असलेल्या छाया कदमचा अभिनय पण छान आहे .

कवितानागेश's picture

18 Feb 2014 - 10:23 pm | कवितानागेश

भिडतय एकदम... मस्त लिहिलय. :(

अर्धवटराव's picture

18 Feb 2014 - 11:12 pm | अर्धवटराव

पण सिनेमा बघितला नाहि अजुन.
जे काहि वाचलं त्याचं चपखल वर्णन आलय कवितेत.

याबद्दल(किंवा इतर कुठल्याची संवेदनाशील बाबतीत) आपल्याला काहि करता येईल अशी आशा हिच दिलासेची बाब.
असेल आभाळ फाटलं, पण म्हणुन आपल्याला ठिगळं लावायला प्रॉब्लेम येऊ नये.

लौंगी मिरची's picture

19 Feb 2014 - 2:09 am | लौंगी मिरची

अजिबात आवडले नाहि .

चलत मुसाफिर's picture

19 Feb 2014 - 9:57 am | चलत मुसाफिर

हा सिनेमा पाहायची उत्सुकता फार वाढली आहे. पण महाराष्ट्राबाहेर रहात असल्यामुळे वाट बघावी लागेलसं दिसतं. घरी गेल्यावर मिळेल बहुधा..

रमताराम's picture

19 Feb 2014 - 2:32 pm | रमताराम

पंधरा तारखेला संध्याकाळी फँड्री पाहिला त्यानंतर घरी आलो ते हे तुफान डोक्यात घेऊनच. शेवटच्या डुकराच्या पाठलागात त्य डुकराच्या जागी जब्या दिसू लागला नि डोक सुन्न झालं. त्यातच चित्रपट पाहताना आणि पाहून बाहेर पडताना असंवेदनशील प्रेक्षकांनी केलेली शेरेबाजी नि मतप्रदर्शन ऐकून डोकं आणखीनच आउट झालेलं. घरी येऊन ते डोक्यातलं सारं तुफान कागदावर उतरवलं. सतत भानावर असणार्‍या, भावनेपेक्षा विचारांच्या आधारे वाटचाल करणार्‍या एखाद्यालाही कविता अचानक भेटते ती अशी. मरुद्गणांनी दिलेल्या वेदनेतून वेदातील ऋचा रचणारा श्यावाश्व मी नसेन किंवा रामायणाचा वाल्मिकीही. पण कुठली तात्कालिक प्रेरणा त्यांना अशी मुळापासून उखडून अन्यत्र रुजवते याचा अनुभव मात्र नक्कीच घेतला. अर्थातच दुसरे दिवशी चेहर्‍याशिवाय संवादाच्या क्षेत्रात तिला सोडण्यापूर्वी थोडी वाक्यरचनेची डागडुजी केली नि इथे प्रकाशित केली.

आतिवासताईंचे आणि अन्य प्रतिसादकांचे आभार. डोकं ताळ्यावर यायला दोन दिवस लागले तेव्हा प्रतिसाद जरा उशीराच देतोय तेव्हा क्षमस्व.

बाळ सप्रे's picture

19 Feb 2014 - 5:58 pm | बाळ सप्रे

फँड्रीविषयी खूप उत्सुकता वाढलीय.. नक्की बघायचाय हा सिनेमा..

पण फँड्री शब्दाचा काही अर्थ लागत नाहिये..

देव मासा's picture

19 Feb 2014 - 6:24 pm | देव मासा

सिनेमा पहिल्या नंतर लागेल अर्थ , वढ पाचचि

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 4:27 am | आत्मशून्य

कडक कपड्यातले काही लोकही विहीरीवरती आले,
पॉपकॉर्नच्या पुडीसोबत थोडे त्यांनीही येन्जॉय
केले,
थोड्या वेळात वैतागले, म्हणे वेळ साला फुकट गेला
याच्या पेक्षा ढिशुम ढिशुम पिक्चर असता पायला
शालू बी साली चिकणी नाय, एक लवसीन बी नाय
चंक्याची असली खडकाळ विहीर पायची काय?

आम्ही काहीसे या क्याटेग्रितिल असल्याने शिणुन्मा नक्कीच बग्नार नाय..! तसही मराठी अन कलात्मक फार रटाळ मिश्रण आहे.

- दुनियादारी कादम्बरी पसंत नसूनही त्यावरील चित्रपटात फाटकी कलात्मकता आणि संकुचित मराठी अस्मितेच्या तोड्लेल्या नाळेचे कवतिक असणारा

विकास's picture

21 Feb 2014 - 4:36 am | विकास

मस्तच. हा चित्रपट पहाण्याची खूप उत्सुकता आहे. कधी बघायला मिळतोय माहीत नाही. पण आता उत्सुकता अजूनच वाढली आहे.

सुधीर's picture

24 Feb 2014 - 10:52 am | सुधीर

खरं तर पहिल्यांदा वाचली तेव्हा समजली नव्हती. फँड्री काय, जब्या काय? अर्थच कळत नव्हता. कालच चित्रपट पाहिला आणि तुमची कविता शोधून पुन्हा वाचली. मस्तच जमली आहे.

लक्षात राहणार्‍या चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटाचा शेवट खास आहे आणि तो "अक्षरशः अंगावर येतो". क्षणभर कळतच नाही की चित्रपट संपला आहे. "पुढे काय?" याचा कल्पनाविलास करायची मुभा दिग्दर्शक प्रेक्षकांना देतो. (तुमच्या कवितेमुळे) मला वाटलं, त्याची एक हिंट म्हणून दिग्दर्शकाने विहिरीचा एक शॉट चित्रित केला आहे ज्याचा संबंध पुढे कुठेतरी असेल असं आपल्याला वाटत राहतं पण तो त्याने जोडलेलाच नाही. जसं इन्सेप्शन मधलं टॉटेम वा पथेर पांचाली मधला साप लक्षात राहतो, तसाच फँड्रीचा "दगड" एक वेगळा परिणाम साधतो. व्यावसायिक चित्रपटाचा फारसा अनुभव नसूनही नागराज यांनी कथानक वास्तवाच्या फारच जवळ नेऊन ठेवताना चित्रपट हे माध्यम, कला म्हणून सुंदरपणे हाताळलं आहे. बाकी कलाकारांबद्दल, छायाचित्रण कलेबद्धल बद्दल मी वेगळं सांगायची गरज नाही. हॅट्स ऑफ टू नागराज मंजुळे आणि तुमच्या कवितेलाही.

पैसा's picture

1 Mar 2014 - 1:17 pm | पैसा

या कवितेनंतर सिनेमा अपेक्षाभंग तर करणार नाही ना असं वाटलं पटकन!

सस्नेह's picture

1 Mar 2014 - 2:10 pm | सस्नेह

आणि अस्वस्थ करणारे...

राजाभाउ's picture

1 Mar 2014 - 3:18 pm | राजाभाउ

अप्रतिम !!
खरच खूप दाहक आहे. सिनेमा पाहिल्यावर असे वाटले कि कोणीतरी जोरात कानफाडीत फोडली आहे. व्यवस्थाच अशी चिरेबंद कि अन्याय सहन करणर्याला सुद्धा तो अन्याय वाटत नही म्हणून जास्त अंगावर येतं खूप अस्वस्थ वाटते

वैदेही बेलवलकर's picture

1 Mar 2014 - 4:22 pm | वैदेही बेलवलकर

कडक कपड्यातले काही लोकही विहीरीवरती आले,
पॉपकॉर्नच्या पुडीसोबत थोडे त्यांनीही येन्जॉय केले,
थोड्या वेळात वैतागले, म्हणे वेळ साला फुकट गेला
याच्या पेक्षा ढिशुम ढिशुम पिक्चर असता पायला
शालू बी साली चिकणी नाय, एक लवसीन बी नाय
चंक्याची असली खडकाळ विहीर पायची काय?>>>

हे तर अगदी जाणवलं. संपूर्ण सिनेमागृहात अशाच अक्कलशून्य लोकांचा भरणा होता त्यामुळे चित्रपट पाहताना फार व्यत्यय येत होता. इंग्लिश सबटायटल्स दाखवत असल्यामुळे संवाद कळत होते म्हणून बरं. पण खरंच असं वाटलं कि नाट्यगृहात जशी मोबाईल सायलेंट किंवा व्हायब्रेट वर ठेवण्याची सूचना करतात तसेच " ज्यांना या विषयाविषयी किंवा चित्रपटाविषयी काहीही माहिती नाही अशा लोकांनी फालतू कमेंट्स देऊन इतर रसिकांना त्रास देऊ नये " अशी सूचना देण्यास सुरुवात केली पाहिजे कारण फँड्री आणि टाईमपास दोन्ही चित्रपट पाहताना अशा लोकांचा फार उपद्रव झाला. फँड्री पाहताना तर बरेच लोक टाईमपास सारख्या चित्रपटाची अपेक्षा ठेवून आले होते त्यामुळे त्यांचा वेळ जात नव्हता आणि त्यांना एकापेक्षा एक अशा तद्दन फालतू कमेंट्स आठवत होत्या.

अनुप ढेरे's picture

2 Mar 2014 - 11:00 am | अनुप ढेरे

'फँड्री' ची झाहिरात बघून हा टाईमपास छाप पिक्चर असावा असं वाटण स्वभाविक आहे.