अमिताभ वि. विनोद खन्ना, एक जबरदस्त रंगलेला सामना

Atul Thakur's picture
Atul Thakur in जनातलं, मनातलं
16 Feb 2014 - 6:33 pm

films

हिन्दी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले कि ते जेव्हा कधी काळी एकत्र आले, रसिकांना जबरदस्त रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र कुठले कलाकार एकत्र आल्यावर ही आग पेटणार होती याचं गणित फक्त परमेश्वरालाच ठाऊक असणार. दिलिपकुमार राजकपुर प्राचिन काळी “अंदाज” मध्ये एकत्र आले तेव्हा एक पडद्यावर युद्ध घडलं होतं. मात्र ही चकमक “इन्सानियत” मध्ये देव आणि दिलीपकुमार एकत्र आल्यावर झडली नाही. “संघर्ष” मध्ये संजीव कुमार विरुद्ध दिलीपकुमार असा सामना होता. त्यात पुन्हा बलराज साहनी. मात्र तेथे जयंतच काही दृश्यात भाव खाऊन गेला. पुढे अनेक वर्षांनी “विधाता” मध्ये जेव्हा संजीव दिलीप एकत्र आले तेव्हा दिलीपकुमारला larger than life दाखवलं गेलं होतं. संजीवकुमारचा रोल छोटा होता. तरीही ” तुमने तो मुझे रिश्तेसेही रिटायर्ड कर दिया” म्हणत संजीवकुमारने आपली चुणुक दाखवलीच. प्राण, अशोककुमार सारखे कसलेले अभिनेते चित्रपट कसाही असो, समोर कुणीही असो, नेहेमीच उत्तम अभिनय करुन गेले. जगन्मित्र असल्याप्रमाणे त्यांना कुठल्याही सामन्यात ओढता येणार नाही. मात्र त्या सोनेरी दिवसात “पैगम” मध्ये जानी राजकुमार आणि दिलीपसाहेबांचा सामना झाला होता. आणि पुढे अनेक वर्षांनी ती चकमक “सौदागर” मध्ये रसिकांनी पाहिली. तसे काहीवेळा गाजलेले कलाकार काही चित्रपटात एकत्र आले पण कुठे अंगार दिसला नाही. किंवा एकानेच चित्रपट खाऊन टाकला. शशी कपुर, जितेंद्र, मनोज कुमार सारखे कलाकार समोर असताना युद्ध घडण्याची शक्यता कमीच. मात्र शम्मी आणि राज कुमारच्या “उजाला” मध्ये खलनायक राजकुमार वरचढ ठरला होता. “मेरा गाव मेरा देश” मध्ये विनोद खन्ना आणि धर्मेंद्र सारखे तगडे देखणे मस्तवाल कलाकार समोर उभे ठाकले होते. आग पेटली होतीच. पण खलनायक विनोद खन्नाच्या जब्बरसिंगचे प्रचंड कौतुक झाले. पुढे हे दोघेही कलाकार काही चित्रपटांमध्ये जरी एकत्र आले तरी ते परस्परांना पुरक म्हणुनच. शत्रु म्हणुन प्रेक्षकांनी त्यांना स्विकारलं नाही. “बॉम्बे टु गोवा” मध्ये अमिताभ शत्रुघ्नसिन्हाला पाहयला मजा आली होती. पुढे “कालापत्थर”ने अपेक्षा आणखि उंचावल्या होत्या. “दोस्ताना” मध्ये तर कळस झाला होता. पण पुढे काही घडलं नाही. त्यातही प्रेक्षकांनी अमिताभचा प्रतिस्पर्धी म्हणुन शत्रुघ्न सिन्हाकडे पाहिलं नाही. अमिताभने सुपरस्टार पदाकडे जाताना अनेक कलाकारांवरोबर जोड्या जमवल्या. धर्मेंद्र, ॠषी कपूर, शशी कपूर त्याला पूरक ठरले. “शक्ती” त खर्‍या अर्थाने सामना रंगला. पण तो अभिनयाचा सामना होता. कुणाचंही पद हिरावुन घेण्याचा तेथे प्रश्नच नव्हता. दिलीपकुमारची बेताज बाहशाही आणि अमिताभचे सुपरस्टार पद अढळच राहणार होते. सुपरस्टारपदाकडे जाताना अमिताभला खर्‍या अर्थाने प्रतिस्पर्धी लाभला तो विनोद खन्नाच्या रुपातच.

१९७३ साली “जंजीर” पासुन हिन्दी चित्रपटसृष्टीत नव्या झंझावाताला सुरुवात झाली. अमिताभ बच्चनने युवकांच्या क्रोधाला पडद्यावर वाट करुन दिली. “आनंद” नंतर “नमकहराम” मध्ये आद्य सुपरस्टार राजेशखन्नासमोर बच्चन खर्‍या अर्थाने उभा ठाकला. मात्र “मेरे सपनोंकी रानी” चे दिवस संपले होते हेच खरं. आता “है कोई माई का लाल” चे दिवस आले होते. अमिताभने त्यानंतर मागे वळुन पाहिलंच नाही. त्याने केलेले सर्व चित्रपट तुफान चालले असं नाही मात्र बच्चनला लोकांनी नेहेमीच डोक्यावर उचलुन धरलं. हे काहीसं क्रिकेटसारखं होतं. मॅच हरली तरी बच्चनची सेंचुरी ठरलेली असायची. म्हणुनच आजदेखिल त्याचे “फरार”, “बेनाम”, “परवाना”.सारखे चित्रपट पाहायला मजा येते. त्यातच अमिताभला “सौदागर”साठी फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. तेव्हा या अभिनेत्यात “अँग्री यंग मॅन” पेक्षाही बरंच काही आहे हे जगाला दिसुन आले. त्याच वेळी दुसर्‍या बाजुने एका आणखि अतिशय देखण्या आणि तगड्या अभिनेत्याचा प्रवास सुरु झाला होता. अस्सल नर म्हणता येईल अशा मर्दानी पुरुषी सौंदर्याचा तो एक दुर्मिळ नमुना होता. विनोद खन्नाने “मेरे अपने” मध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाची चुणुक दाखवुन दिली. गुलजार सारख्या संवेदनशील दिग्दर्शकाचा हा चित्रपट बेकार तरुणांच्या नैराश्याचा आणि क्रोधाचा आदिम अविष्कार होता. पुढे यातर्‍हेचे अनेक चित्रपट आले. पण यासम हाच. त्यानंतर “मेरा गांव मेरा देश” ने इतिहास घडवला. त्यामागोमाग विनोद खन्नाच्या करियरला वेगळं वळण देणारा “अचानक” आला. काहीशा कलात्मक चित्रपटाकडे झुकणार्‍या “अचानक” ने खन्नामधील अभिनेत्यावर शिक्कामोर्तब केले. पुढे “इम्तेहान”, “हाथकी सफाई” असा प्रवास करत हा अभिनेता “जमीर” मध्ये बच्चनसमोर उभा राहिला. तसा दोघांचा एकत्र असा हा पहिला चित्रपट नव्हता. आधी “रेश्मा और शेरा” मध्ये दोघं एकत्र आले होते. पण त्यावेळी अमिताभ बच्चन हा “अमिताभ बच्चन” झाला नव्हता नी विनोद खन्ना देखिल “विनोद खन्ना” नव्हता. शिवाय त्यात दोघेही मुख्य अभिनेते नव्हते. चित्रपट सुनील दत्तचा होता. “रेश्मा और शेरा”, “जमीर”, “हेराफेरी”, “अमर अकबर अँथनी”, “खून पसिना”, “परवरिश” आणि “मुकद्दर का सिकंदर” अशा तब्बल सात चित्रपटात दोघं एकत्र आले. पैकी “जमीर” मध्ये खन्नाला विशेष काम नव्हतंच. हा चित्रपट पुर्णपणे बच्चनचाच होता. दोघांच्या जुगलबंदीविषयी लिहिताना बाकीच्या पाच चित्रपटांचाच गांभिर्याने विचार करावा लागेल.

“हेराफेरी”, “परवरीश” या दोन चित्रपटांचा एकत्रित उल्लेख केला तर काहींना आश्चर्य वाटेल. पण दोन्हीत विनोद खन्नाला इतर चित्रपटांच्या तुलनेने जवळपास अमिताभ इतकेच काम आहे. नकारात्मक भूमिकेत खन्नाचा अभिनय जास्त खुलतो असं माझं निरिक्षण आहे. अमिताभ मात्र रुढार्थाने दोन्हीत “हिरो”च आहे. मला स्वतःला “परवरीश” जास्त भावला याचं कारण दोघांची सरळसरळ टक्कर होती. खन्ना सुरुवातीपासुनच नकारात्मक भुमिकेत होता. सारे काही गोडगोड होताना सुदैवाने चित्रपटच संपतो. यात खन्नचे पारडे मला तरी जड भासले. त्याच्या भुमिकेला कंगोरे होते. खलनायकाचा मुलगा असल्याची समजुत लहानपणापासुन करुन घेतलेला नायक त्याने चांगला सादर केला आहे. “अमर अकबर अँथनी” हा सर्वार्थाने अमिताभचा भाव खावुन जाणारा चित्रपट होता. त्याचे संवाद, दृश्य सारे काही अमिताभला, त्याच्या क्षमतेला समोर ठेउनच लिहिल्यासारखे वाटत होते. अमिताभनेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवित धम्माल उडवुन दिली. “अँथनीभाय” सारखी बंबईया हिन्दी त्या ठसक्यात बोलावी ती अमिताभनेच. फक्त एकमेव हाणामारीच्या दृश्यात दोघांचा सामना झाला. अ‍ॅक्शन हा विनोद खन्नाचा प्रांत आहे यावर बहुतेक चित्ररसिकांचे एकमत होईल असे मला वाटते. हा सीन खन्नाने खाउन टाकला आहे अशी माझी आजदेखिल समजुत आहे. “खूनपसिना”त पुन्हा “परवरीश” प्रमाणेच खन्नची भूमिका वेगळी होती. त्याने त्या विशिष्ट गेटअपच्या आधारे झोकात केली. आतुन पेटती आग राखलेला खन्नाचा “शेरा” पहायला मजा आली. त्यामानाने अमिताभची भुमिका चाकोरीबद्ध “हिरो”ची होती. “मुकद्दर का सिकंदर” हा चित्रपट अमिताभचाच होता हे बहुतेकांना मान्य व्हावे. प्रकाश मेहराने आपल्या आवडत्या अमिताभला संपूर्ण वाव दिला होता. विनोद खन्ना या चित्रपटात दुय्यमच भासला. त्यानंतर अचानक विनोद खन्ना भरल्या ताटावरुन उठुन रजनिशांकडे निघुन गेला आणि एक रंगलेला सामना निर्णय न लागताच संपुष्टात आला. आता प्रश्न असा आहे कि समजा विनोद खन्ना मध्येच सोडुन गेला नसता तर काय झालं असतं? यासाठी या दोन दिग्गजांची तुलना करणे नुसते आवश्यकच नसुन अपरिहार्य देखिल आहे.

विनोद खन्ना हा मला दिग्दर्श्काच्या हातातील अभिनेता वाटतो. गुलझार सारख्या दिग्दर्शकाने त्याला आपल्या चित्रपटात घेतले यातच त्याची ताकद दिसुन येते. पण या भूमिका विशिष्ट तर्‍हेच्या होत्या हेही येथे नमुद करायला हवा. विनोद खन्ना हा विशिष्ट साच्यातल्या भुमिकेसाठी योग्य अभिनेता असे त्याचे वर्णन करता येईल. “मेरे अपने” मध्ये समाजाने नाकारलेला तरुण, “अचानक” मध्ये बायकोच्या विवाहबाह्य संबंधांमुळे उध्वस्त झालेला फौजी, “इम्तहान” मध्ये वडीलांशी भांडुन बाहेर पडलेला प्रोफेसर, “इन्कार” मध्ये प्रेयसीने संबंध तोडलेला इन्सपेक्टर, खन्नाच्या या सार्‍या भुमिका गाजलेल्या आहेत. आणि त्यात काहीएक पॅटर्नदेखिल दिसुन येतो. कुठुनतरी नाकारला गेलेला माणुस्…अगदी “मीरा” मध्येही विनोदच्या भोजराजाला बायकोचे म्हणजे मीरेचे प्रेम मिळत नाही. ती श्रीकृष्णाच्याच प्रेमात आकंठ बुडालेली असते. त्यामुळे हॉलिवुडमध्ये ज्या तर्‍हेच्या डर्टी हॅरी भुमिका क्लींट इस्टवूडने साकारल्या त्या किंवा चार्लस ब्रॉन्सनच्या डेथविश टाईप भूमिका खन्नाला अगदी चपखल बसल्या असत्या. त्यात त्याला तुलनाच नव्हती. मात्र अमिताभ हे वेगळं रसायन आहे. चतुरस्त्र हेच विशेषण त्याला योग्य आहे. वर सांगितलेल्या “अमर अकबर अँथनी” मधला हाणामारीचा सीन जरी विनोद खन्नाने खाल्ला असला तरी पुढे जोडुनच जेलच्या दृश्यात ” अपुनने सिर्फ दो फाईट मारा लेकीन सॉलिड मारा कि नही? ” असं मिस्कीलपणे विचारुन पुन्हा अमिताभच सीन घेऊन जातो. त्यातही विनोदी दृश्य आणि नृत्य यात अमिताभच्या जवळपासही विनोद खन्ना जाऊ शकेल असं वाटत नाही. आवाजाचंही तेच. तेथेही बच्चन वरचढच राहणार. दारुड्याचे सीन करावेत तर बच्चननेच. भावनिक दृश्यातही तुलना केली तरी बच्चनचंच पारडं जड भासतं. बच्चनने वाट्याला आलेल्या गाण्यांचं सोनं केलं. “डॉन”, “याराना”,”अभिमान”, “मंझील”,”आलाप” मध्ये अमिताभला पडद्यावर गाताना पाहणे हा आनंदाचा भाग असतो. विनोद खन्नाने असा चमत्कार अपवादात्मकच केला असेल. अमिताभच्या यशस्वी भुमिकांमधले वैविध्यही लक्षणियच आहे. ही सारी गोळाबेरीज करुन म्हणावेसे वाटते कि विनोद खन्ना मध्येच चित्रपटसृष्टी सोडुन रजनिशांकडे गेला नसता तरी इतिहास फारसा बदलला नसता. अमिताभचं सुपरस्टारपद हे निश्चितच होतं.

खरं सांगायचं तर विनोद खन्ना हे आमचं पहिलं प्रेम. कॉलेजमध्ये तो अमिताभपेक्षा श्रेष्ठ कसा यावर घातलेले वाद आठवतात आणि त्यावेळच्या मानाने आता समज किंचित वाढल्याने ह्सु येतं. अजुनही विनोद खन्ना हेच आमचं पहिलं प्रेम आहे. त्याचा देखणा चेहरा, बलदंड शरीरयष्टी आणि अफलातुन अ‍ॅक्शनवर आम्ही आजही फिदा आहोत. तो परत आल्यावर भक्तीभावाने त्याचे नवीन चित्रपट पाहायला सुरुवात केली. “इन्साफ” मध्ये पुन्हा तो देखणा चेहरा दिसला. “सत्यमेव जयते” ने तर अपेक्षा वाढवल्या पण पुढे “महादेव” नंतर त्याचे चित्रपट पाहवेनात. मग पुन्हा आम्ही “मेरे अपने” कडे वळलो.तरीही हे मान्य करायला हवं कि अमिताभला सर्वाधिक टक्कर दिली ती विनोद खन्नानेच. हा सामना निश्चितच खूप रंगला होता. पण अखेरीला “छोरा गंगा किनारेवाला”च वरचढ ठरला.

अतुल ठाकुर

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

16 Feb 2014 - 8:55 pm | सुहास झेले

मस्त लेख... नो डाऊट की अमिताभ हा सुपरस्टार आहे, पण दोन्ही अभिनेत्यांनी त्यांची स्वतंत्र उंची गाठलीय. मला सुद्धा विनोद खन्ना नकारात्मक भूमिकेत जास्त आवडतो. काही वर्षापूर्वी आलेला रिस्कमध्येही तो भाव खाऊन गेलेला... :)

मंदार दिलीप जोशी's picture

19 Feb 2014 - 10:09 am | मंदार दिलीप जोशी

अनुमोदन सुहास.

अधिक,
इंग्रजी सिनेमातले अनेक अभिनेते जसे प्रामुख्याने उत्कृष्ठ नकारात्मक भूमिका करतानाच विनोदी, सकारात्मक भूमिकेतही चमकतात तसे आपल्याकडे लोक का करताना दिसत नाहीत कोण जाणे. आपल्याकडील प्रेक्षकांचा हा पराभव म्हणावा का? प्राण नंतर विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे एक नंबर खलनायक ठरू शकले असते पण त्यांनी नायक होण्याच्या नादाला लागून ती बस चुकवली असे वाटते.

अनुप ढेरे's picture

16 Feb 2014 - 9:10 pm | अनुप ढेरे

आवडला लेख.

तुमचा अभिषेक's picture

16 Feb 2014 - 9:34 pm | तुमचा अभिषेक

लेख आधीही वाचला होता, पुन्हा वाचला, पुन्हा आवडला.
तो काळ आपला नसल्याने अधिकाराने भाष्य करू शकत नाही यावर जास्त पण काल एका चर्चे दरम्यान त्या काळातील हँडसम अ‍ॅक्शन हिरोंची नावे आठवायला घेतली आणि गाडी विनोद खन्नावरच अडकली.

मदनबाण's picture

17 Feb 2014 - 11:32 am | मदनबाण

लेख आवडला ! :)
बाकी विनोद खन्ना आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रीत झालेल "चांदनी" या चित्रपटातले सुरेश वाडकर यांच्या आवाजतले गाणे मला फार आवडते...

आशु जोग's picture

18 Feb 2014 - 3:16 pm | आशु जोग

>> कुणाचंही पद हिरावुन घेण्याचा तेथे प्रश्नच नव्हता. दिलीपकुमारची बेताज बाहशाही आणि अमिताभचे सुपरस्टार पद अढळच राहणार होते. <<

खूप छान बारकाईने लेख लिहीला आहे. महत्त्वाची गोष्ट लिहीताना कुणाबद्दलही अनादरही नाही. एका वेगळ्याच दॄष्टिकोनातून विचार केलाय

Atul Thakur's picture

19 Feb 2014 - 9:27 am | Atul Thakur

महत्त्वाची गोष्ट लिहीताना कुणाबद्दलही अनादरही नाही.

अशाच तर्‍हेचे लेखन नेहेमी करण्याची इच्छा आहे. बघुया किती जमतंय ते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

अर्धवटराव's picture

19 Feb 2014 - 4:48 am | अर्धवटराव

लेखातल्या विचारांशी, भावनांशी, कन्क्लुजनशी अगदी १००% सहमत.

स्पंदना's picture

19 Feb 2014 - 5:54 am | स्पंदना

विनोद खन्ना मलाही आवडायचा. खर्र्र्र्र्र्र्र्र्र!
आता मलाही हसू येतय. आता माझी कन्यासुद्धा अशीच(काय ते इंग्लिश हिरो टेनेजर्स ह्यॅ) कुठल्यातरी हिरोच नाव घेउन व्हॅलेंटाईन डे साजरा करुन आली. मग मातर खरच मला माझ हसू आलं.
लेखन अतिशय सुरेख. रटाळ न वाटता असा विषय ज्या पद्धतिने हाताळलाय ते अतिशय आवडल.
पु.ले,शु. :)

उपास's picture

19 Feb 2014 - 8:07 am | उपास

खूप छान धांडोळा घेतला आहे.. अमिताभ (अगदी कुठल्याही वयातला) आपला नंबर एक आवडता.. पन विनोद खन्ना आवडायला लागला त्याच्या शरीरयष्टी, देहबोली, नजरेतला वचक, मर्दानगी ह्या सगळ्यांसाठी.. 'दयावान' मुळे त्याच्यावर थोडा जळफळलो होतो आम्ही तेव्हा (सुज्ञास सांगणे न लगे!).. पण त्याच्या अभिनयाला त्या पिक्चर मध्येही तोड नव्हतीच..
लेख लिहिल्याबद्दल धन्यवादच..!

अजूनही "धकधक " होते.

:-)

अर्धवटराव's picture

19 Feb 2014 - 9:14 am | अर्धवटराव

मुकद्दर का सिकंदर मधे विनोद खन्ना थोडा दुय्यम वाटतो खरा, पण "आमा मिलालो यार... झिंदगीमे सिकंदरने बहोत कम लोगोसे हाथ मिलाया है" म्हणणारा बच्चन आणि रेखाला अमिताभ पासुन दूर राहायला समजवणार्‍या विनोदची इंटीमसी एकाच लेव्हलची वाटते. "पहेले सिकंदरसे तो निपटलो" म्हणणारा बच्चन आणि "क्यो.. आप कोइ स्पेशल है क्या" म्हणत गुंडांना धू धू धुणारा विनोदचा कॉन्फीडन्स अगदी सारखा वाटतो.

अमर अकबर एंथोनी मधे तर ॠषी कपूर सुद्धा काय भाव खाऊन गेला आहे. पण तिथेही सर्वात मोठा भाऊ म्हणुन विनोद खन्ना अगदी फिट्ट बसला. बटवारा पर्यंत विनोद खन्ना बराच प्रौढ झाला होता. पण धर्मेंद्र त्याच्या समोर अगदी किस झाड कि पत्ती वाटला.

मंदार दिलीप जोशी's picture

19 Feb 2014 - 10:12 am | मंदार दिलीप जोशी

मस्त लेख.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Feb 2014 - 12:51 pm | अविनाशकुलकर्णी

या वरुन आठवले..विनोद खन्ना हा भगवान रजनिश यांचा भक्त होता त्याला रजनिशानी सल्ला दिला होता..ज्जो अक्टिंग कर रहे हो उसे जिवन समझो.और जिंदगी को अक्टिंग समझो"

अर्धवटराव's picture

19 Feb 2014 - 1:59 pm | अर्धवटराव

ज्जो अक्टिंग कर रहे हो उसे जिवन समझो.और जिंदगी को अक्टिंग समझो"

बळच. जे आहे ते तसं असु द्यावं ना शांतपणे. पण नाहि. उगाच बिचारा ना घर का ना घाट का झाला.
(तुम्ही ह घ्या हो. आयला आजकाल भितीच वाटते कॉण्ट्रोव्हर्सीज ची)

सिरुसेरि's picture

28 Aug 2015 - 10:33 am | सिरुसेरि

विनोद खन्नाने अगदी अलिकडच्या रिस्क , वॉन्टेड , दबंग या चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली आहे .

मुकद्दर का सिकंदर मध्ये कोण उजवे कोण डावे ठरले माहित नाही पण आमच्या पिताश्रींना आम्ही आमच्या नामकरणाची हकीकत विचारली त्यावरून विनोद खन्नाचा या सिनेमातील प्रभाव आम्हाला आता आजन्म विसरता येणार नाही

चांदणे संदीप's picture

29 Aug 2015 - 2:59 pm | चांदणे संदीप

कहरच की!
(कृ. ह. घ्या - हसून नाही ;) )

दा विन्ची's picture

28 Aug 2015 - 3:55 pm | दा विन्ची

रं सांगायचं तर विनोद खन्ना हे आमचं पहिलं प्रेम. कॉलेजमध्ये तो अमिताभपेक्षा श्रेष्ठ कसा यावर घातलेले वाद आठवतात आणि त्यावेळच्या मानाने आता समज किंचित वाढल्याने ह्सु येतं. अजुनही विनोद खन्ना हेच आमचं पहिलं प्रेम आहे. त्याचा देखणा चेहरा, बलदंड शरीरयष्टी आणि अफलातुन अ‍ॅक्शनवर आम्ही आजही फिदा आहोत.

संपूर्ण सहमत

पद्मावति's picture

28 Aug 2015 - 4:10 pm | पद्मावति

खूप छान लेख.
उत्तम अभिनय, हॅण्डसम व्यक्तिमत्व आणि खन्ना आडनाव - सगळं काही असून हा गुणी अभिनेता मागे पडला हे खरं आहे.
अमिताभ बच्चन या वादळा समोर जिथे राजेश खन्ना टिकले नाही तिथे बाकी काय. पण तरीहि अमिताभ ला विनोद खन्ना यांनी जबरदस्त टक्कर दिली होती. माझी एक आत्या म्हणायची की अमिताभ महानायक जरूर होता पण विनोद खन्ना म्हणजे God. इतका प्रचंड फीमेल फॅन बेस बहुतेक देवानन्द, राजेश खन्ना यांच्यानंतर विनोद खन्ना यांनाच लाभला असेल.

मुक्त विहारि's picture

28 Aug 2015 - 6:16 pm | मुक्त विहारि

आम्ही "महान" पर्यंत अमिताभचे पंखे....

पण "अमिताभ" शिवाय "विनोद" आणि "धर्मेंद्र" पण तितकेच आवडायचे.

एक एकटा एकटाच's picture

29 Aug 2015 - 6:49 am | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलाय लेख

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2015 - 8:14 pm | बोका-ए-आझम

आवडायचा, पण अमिताभ आल्यावर त्याचा प्रभाव काही वेगळाच होता. शिवाय अमिताभ अत्यंत मूर्ख सीन्सपण अत्यंत convincing रीतीने करायचा. तसं विनोदचं नव्हतं. तरीही इन्कार, हाथ की सफाई, मेरा गांव मेरा देश यातला विनोद खन्ना आवडला होता. राजकारण हे एक क्षेत्र असेल जिथे तो अमिताभपेक्षा पुढे गेलेला आहे. तो अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होता आणि आताही पंजाबमधल्या गुरदासपूरमधून लोकसभेवर निवडून गेलेला आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Aug 2015 - 8:45 pm | निनाद मुक्काम प...

त्याच्या बहरत्या काळात त्याला अमित पेक्ष्या जास्त मानधन किंवा तोडीसतोड देण्यास निर्माते तयार होते ,पंजाबी लॉबी त्याच्या पाठीशी होत्या. धर्मेद्र नंतर उमदा देखणा चेहरा तोच होता. आजही सलमान चे वडील म्हणून तो शोभून दिसतो .
त्याची मजबूत हवा होती एवढी की रविद्र महाजनी ह्यांना त्यांच्या कॉलेजात विनोद खन्ना म्हणात असत