जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

सुज्ञ माणुस's picture
सुज्ञ माणुस in भटकंती
29 Jan 2014 - 10:46 am

जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

जीवधन आणि नाणेघाट यांचा इतिहास आणि माहिती सर्वश्रुत आहेच. यावर बरेच धागे आधीच उपस्थित असल्याने अजून एकाची भर न टाकता फक्त माझा अनुभव मांडतो.
कोणाला इंटरेस्ट असेल तर इतिहास, जायचे कसे वैगरे आणि आधीचे लेख या ब्लॉग लिंक वर वाचू शकता.

कुकडेश्वर मंदिरापासून ST पकडून रात्री घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला.रात्री अंधारात बस मधून उतरलेले गावकरी आणि सगळ्यात पुढे सरपंच पोपटराव. त्यांच्या मागून चालत आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी.
आमचे जेवण झाले होते पण त्यांचे व्हायचे होते. आम्ही त्यांच्या अंगणात आमची पथारी मांडली. त्यांनी जेवायचा आणि आत खोलीत झोपायचा फार आग्रह केला. पण आम्ही नाही गेलो. आता शरीर इतके दमले होते की कुठेही झोप आली असती.
शेणाने सारवलेल्या अंगणात एक सोलर दिवा लावलेला होता. बाकी गर्द अंधार आणि फुल टू थंडी. फार मजा आली.

सकाळी सकाळी जाग आली ती गावातील बायकांच्या पाण्याच्या गडबडीने. प्रत्येक घरातून बायका आणि पोर -टोर डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायला जात होती. आम्ही आवरून पाणी भरायला त्यांच्या बरोबर गेलो.
तळ्यावर पोहोचलो तेवढ्यात सूर्य नारायण ही नुकतेच ड्यूटी वर आले होते.
.
पाणी भरून जरा फ्रेश झालो.
.
आता खरी चढाई सुरू झाली. यावेळी खायचे कमी घेतले होते आणि पाणी जास्त होते. गावात कुठेही खायचे मिळेल असा समज करून खायचे सामान आम्ही आधीच खाल्ले होते. आता फक्त एक चिवडा पाकीट आणि कालच्या डब्यातल्या उरलेल्या पोळ्या शिल्लक होत्या.
सकाळी आम्ही निघालो तेव्हा ज्यांच्या घरापाशी आम्ही राहिलो ते नुकतेच उठले होते. त्यामुळे त्यांना काही मागावे आणि पैसे देतो म्हणावे योग्य वाटले नाही. म्हणून सकाळी चहा हि न पिता चढाई चालू झाली.पहिल्या तासाभरातच कळले की आता वाट लागणार आहे. खायला काही नाही, पोटात काही नाही आणि एवढा डेंजर किल्ला. ओह्ह!
या पठारावरून समोरच 'नवरा ( मोठा पहिला त्रिकोणी डोंगर) , नवरी (त्या पुढचे डोंगर) आणि भटोबा सुळके दिसत होते.
.
खायचे वांदे आणि यात अजून भरीस भर की रस्ता हि माहीत नव्हता. घाटघर पासून चढून आम्ही दुसऱ्या वाटेने उतरून नाणेघाटात जाणार होतो. गावातून पुढे एक पठार लागते तेथून वरती बघितल्यास किल्ल्याचा थोडा भाग पोखरल्यासारखा वाटतो तेथून वाट आहे. आम्ही पठारावरून एका वाटेने वर चढून गेलो. वर गेल्यावर काही वाटच मिळेना. सगळे मोठे कडेच लागले. मग तेथून खाली उतरून परत पठारावर आलो. मग दुसरी पायवाट पकडून परत तेवढेच वरती गेलो तर तिथे फारच घनदाट कारवीचे जंगल लागले. झाडे तोडत, मार्ग काढत कसेतरी वर पोहोचलो तर तिथेही रस्ता नाही. परत खाली पठारावर.
असे वर -खाली करत तब्बल सात वेळा रस्ता चुकून झाल्यानंतर मात्र आमचा स्टामिना संपला. मग ठरवले की इथून परत मागे घाटघर गावात जाऊ आणि तिथून नाणेघाटला जाऊ. काही नको जीवधन.
असे म्हणून मी परत निघालो. परतताना हि वाट असावी, इथून तिथे जात असावी अशी चर्चा चालूच होती.

एका झाडे तोडल्याच्या आवाजाने थांबलो तर एक गावकरी दिसला. त्याला सांगितल्यावर त्याने परत आम्हाला वाट समजावली आणि आम्ही आता शेवटचा चान्स म्हणून परत किल्ल्यावर चढाई केली. आठ वेळा कारवीतून मारामारी करून जाऊन हात पायावर ओरखडे उठले होते. चेहरा घामेघूम आणि पोट रिकामे. अश्या अवस्थेत "काही झाले तरी आता जायचेच" असा विचार केला आणि परत सुटलो. कॅमेरे केव्हाच ठेवून दिले होते.
पुन्हा अर्धा तास अंदाजे चढून गेलो तर समोर एक गुहा दिसली. आता खात्री पटली की तब्बल ४ तासाने का होईना आपण बरोबर मार्गाला आहोत.
.
कोलंबसाला जहाजावर किनाऱ्यावरचे पक्षी बसलेले पाहून आनंद झाला असेल तसा आनंद आम्हाला झाला. आता कॅमेरे बाहेर आले. मस्त गार वारा वाहत होता.
या दगडात खोदलेल्या पायऱ्या इंग्रजांनी तोफगोळे मारून तोडून टाकल्या. आता फारच गुळगुळीत आहेत. पण चढून जाण्या इतपत आहेत. पावसाळ्यात मात्र ह्या डेंजर असतील.
.
त्यानंतर पुढचे संकट म्हणजे १५ फुटी रॉक पॅच. दोरी वैगरे काही प्रकार नसल्याने आम्हाला फार अवघड झाले. शेवटी सगळे सामान खाली ठेवून भूषण वर गेला. मग माझ्याकडे असलेली एकमेव नॉयलोनची दोरीला आम्ही दगड बांधला आणि वर फेकला. तो दगड पकडण्याचे ७-८ प्रयत्न झाल्यावर शेवटी दोरी त्याच्याकडे पोहोचली. मग सॅक, कॅमेरे बांधून दोरीने वर पाठवले. आणि मग शेवटी मी वर चढलो.
.
नुसते चढायला थोडे अवघड आहे. पण सामान घेऊन चढताना पाठीवर वजन असल्याने उलटा झोक जायची शक्यता आहे. तेथे बोल्ट पण मारलेले आहेत. रोप लावता येत असेल तर मग सोपे आहे.
या पायऱ्या चढून आल्यावर लगेचच एक उद्ध्वस्त दरवाजा लागतो. तेथून डावीकडे पाण्याचे टाकी आहेत. हे पाणी पिण्यायोग्य नाही. दुसऱ्या रस्त्यावरून उतरताना लागणारे टाकीतले पाणी बरे आहे.
.
येथून किल्ला सुरू होतो. सुरवातीलाच २ बुरूज दिसतात.
.
येथून अजून सुमारे अर्धा तास चालून गेल्यावर हे धान्य कोठार लागले. एवढ्या वरती येऊन कोण धान्य साठवण करत असावा?
.
आता सकाळपासून पोटात काहीच नसल्याने खूप दम तर लागलाच पण पुढे चालणेही अशक्य झाले. चिवडा वैगरे थोडा खाल्ला पण त्याने अजून त्रास व्हायला लागला. आता पोटात काहीतरी ढकलणे गरजेचे होते. शेवटी असह्य झाल्यावर कालचा उरलेला डबा उघडला. काल पहाटे केलेल्या पोळ्या शिळ्या झाल्याने अशक्य वास येत होता. भाजी तर नव्हतीच मग नाईलाजाने एक एक पोळीचा तुकडा आणि घोटभर पाणी पिऊन वेळ काढली. कालची शिळी पोळी खाऊन अजून त्रास होईल म्हणून पाणी जास्त पिले. थोडा गार वारा पिऊन परत निघालो.
झेंडा दिसल्यावर तेथून चढून किल्ल्याच्या पश्चिम बाजूस गेलो.समोर बघतो तर काय ? कमाल ! नानाचा अंगठ्याचे विहंगम दर्शन घडले. निसर्ग कोणाचा कसा हिशोब लावेल काही लिमिटच नाहीये राव ! काय दिसत होता तो. असे रौद्र रूप पाहिले की सह्याद्री पार वेड लावतो.
.
येथून उतरायला चालू केले. पोटात काही नसल्याने फार काही फिरण्यात इंटरेस्ट नव्हता. पण जे काही पुढात येत होते खरंच भारी होते.हा पश्चिम महा-दरवाजा. अखंड कातळात बेमालूमपणे उभा ठाकलेला. एकावेळी एक घोडा येऊ शकेल एवढीच त्या कातळानंमध्ये जागा होती. त्याची उंची तर बघा. वाह ! मान गये उस्ताद !शत्रू अगदी येथपर्यंत चढून आला तरी त्याला येथे पोहोचेपर्यंत दरवाज्याचा अंदाज येणार नाही. या उपर वरतीही बुरूज बांधले आहेत. घोरपड आणा वा कोरफड आणा, येथे चढाई करणे अशक्यच. याची स्थापत्यकला करणारा माणूस कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेऊन आला असावा?
.
जुन्नर मधल्या जवळपास सर्व किल्ल्यांची अशीच स्थापत्यकला दिसते. शिलाहार राजांनी हे किल्ले वा प्रवेशद्वारे बांधली होती. हे अर्ध गोलाकार घुमट प्रवेशद्वार अजूनही तेवढेच सुस्थितीत आहे.चार लेयर मध्ये कोरलेली नक्षी केवळ अद्भुत. त्यावर चंद्र, सूर्य आणि तोरणा कृती आकृती कोरलेली आहे.
.
पण आता येथून कसोटीची दुसरी इनिंग चालू झाली. येथेही एक १० फुटी रॉक पॅच आहे. तो उतरायला फारच अवघड वाटला मला. मला २० मिनिटे लागली तो उतरायला सगळे समान खाली फेकून दिल्यावर. तेथेच भूषण २ मिनिटात उतरला.
.
थोडे हळू उतरत, सुमारे २ तासात आम्ही उतरणीला लागलो. तेथून वर तो रॉक पॅच कहर दिसत होता. 'हॅरी पॉटर' वा 'लॉर्ड ऑफ द रिंग' पिक्चर मधला सीन वाटतो की नाही?
.
येथून उतरताना मागे पहिले तर अजून एक आश्चर्य. वानरलिंगी सुळका मस्त ऊन खात बसला होता.हे पाहून खरंच "लॉर्ड ऑफ द रिंग" मधला तो सुळक्या वरचा डोळा आठवला.
.
.
जसे आम्ही उतरत होतो तसे नानांचा अंगठा आम्हाला जास्तच खुणावत होता.कसला अंगावर येतोय असे वाटतेय की नाही?मुरबाड कडून जुन्नर ला येताना माळशेज मधून ST येते तेव्हा हा कडा दिसतो एका स्पॉट ला. फारच भयानक वाटतो तो त्या पुढच्या बाजूने.
.

येथून एक पठार लागले. मग फुल टू पायपीट. आता संपूर्ण जीवधन दृष्टिक्षेपात येत होता.
.
एका स्थळावर वाचले होते की जीवधन आणि नाणेघाट हाकेच्या अंतरावर आहे. 'कोणाच्या हाकेच्या' हा तपशील मात्र आम्हाला कळला नाही. बरेच अंतर होते.
आता अंगठ्याच्या एकदम समोर आलो. एखादे ग्लायडर असते तर वा काय मजा आली असती. सरळ पळत जाऊन बुंग sssssssss !
.
अर्धा तासात नाणेघाटात पोहोचलो. याचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. त्यामुळे तो सांगत बसत नाही. नाणेघाटात सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे पुरातन कालीन आणि दगडाचे जकातीचे रांजण आणि येथून होणारे दळणवळण, सातवाहन राजवंश यांची महती सांगणारे गुहेतील शिलालेख.त्या काळी हे मोठाले रांजण दिवसातून ७-८ वेळा रिकामे केले जायचे. यावरून नाणेघाटाची उपयुक्तता लक्षात येईल.
.
नाणेघाटातील गुहा. याला नुकतेच ग्रिल बसवले आहे. ऐतिहासिक गोष्टींची वाट लावण्यात आपले सरकार हुशार आहे.
.
सातवाहन राजवंश यांची महती सांगणारे गुहेतील शिलालेख.
.
नाणेघाटातील गुहेमधील ब्राह्मी लिपीत लिहिलेले सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेख आजही संशोधनाचाच विषय आहेत. शिलालेखात नमूद केलेल्या काही सातवाहन राजांची, त्यांच्या वंशाची आणि त्यांनी केलेल्या यज्ञांची माहिती या लिंक वर जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखातून मिळेल.

हि नाणेघाटाची घळ. अखंड आणि सर्वात कठीण असे दगड फोडून तयार केलेला ऐतिहासिक राजमार्ग. हे कातळ जसे प्याटर्न मध्ये कातरले आहेत त्यावरूनच त्यांची कठिणता लक्षात येईल. पश्चिम घाट हा जसा निसर्ग सौंदर्या साठी ओळखला जातो तसेच इथल्या किल्ल्यांची अभेद्यता आणि दगडांची कठिणता यासाठीही साठी ओळखला जात.
.
.
पश्चिम घाटात जीवसृष्टीत हि खूप वैविध्य आढळते. जीवधन किल्ल्याच्या जंगलात रानडुकरांचा मुक्त संचार असतो. तेथील स्थानिक मंडळी मोठ्या ग्रुपने रानडुक्कर पकडायला जातात.
आम्ही उतरत असताना एक ग्रुप वरती जात होता. त्यातला एक माणूस म्हणाला की "जंगलातून सांभाळून जा, मला काहीतरी हालताना दिसले." खालून लोकांच्या आरडा ओरडा ऐकू येत होता. मग थोडी धाकधूक वाटली. वाटले की जवळपास असलेले जनावर लांब जावे म्हणून ते ग्रुप ने ओरडत होते. पण त्यांच्यापासून लांब जाऊन ते आपल्या अंगावर आले तर?
मग खाली गेल्यावर कळले की ती लोक सगळीकडे विखुरली होती आणि ओरडत ती रान-डुकराचा पाठलाग करत होते. बराच वेळ म्हणजे ४-५ तास हा प्रकार चालला होता. शेवटी त्यांनी त्याची शिकार केलीच आणि खायला गावात आणले.

एक ग्रुप रात्री गुहेत राहिला होता. ते साप पकडून त्यांचे फोटो काढून त्यांना सोडून देत होते. इथे पश्चिम घाटात सापांचेही विविध प्रकार आढळतात. त्यांनी रात्रीपासून ८ साप पकडले होते. आम्हाला तर एकही दिसला नाही.किल्ल्यावर कबुतर मी कधी पहिले नव्हते. ते इथे पाहिले.

असो.आम्ही जातो आमच्या गावा, सातवाहन कालीन ऐश्वर्याचा राम राम घ्यावा.
.
नाणेघाटात थोडी विश्रांती घेऊन मुंबईकर नाणेघाट उतरून मुरबाड वरून कल्याण ला आणि आम्ही परत मागे फिरून घाटघरला जाऊन बस पकडून जुन्नर आणि मग पुणे.

या सगळ्यात कौतुक वाटले ते MSEB वाल्याचे. कुठे कुठे जाऊन हे टॉवर बांधत असतात. नाणेघाटातून वैशाखरे गावात जाणाऱ्या वीजतारा कश्या जोडल्या असतील असा प्रश्न पडतो.का हे टॉवर हि सातवाहनानी बांधले असावेत? :)
.
२ दिवसात मस्त भटकंती तर झालीच पण जुन्नरसारख्या, महाराष्ट्राचा शिरेटोप असणाऱ्या, सातवाहन कालीन इतिहास लाभलेल्या संपन्न प्रदेशाविषयी खूप काही कळले. कुकडेश्वर मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यकला यावर अधिक अभ्यासाची गरज आहे.

सातवाहन साम्राज्य :
ज्यांना इतिहासात जायची फार आवड आहे त्यांना सातवाहन साम्राज्याचा इतिहास फारच इंटरेस्टिंग वाटेल.विकिपीडिया वर खूपच छान माहिती वाचायला मिळेल.

सागर

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

29 Jan 2014 - 11:21 am | प्रमोद देर्देकर

आवडेश. मला पण हे सगळे किल्ले करयचे आहेत. खुप छान माहीती आहे. खालुन दुसरे जे छायाचित्र आहे त्यात पुढे दरी आहे काय? आणि तो गडप्रेमी तेथुन पुढे उतरुन खाली जातोय काय?

सुज्ञ माणुस's picture

29 Jan 2014 - 1:59 pm | सुज्ञ माणुस

खालुन दुसरे जे छायाचित्र आहे त्यात पुढे दरी आहे काय? >>
दरी नाहीये पण तेथून खूप खाली खोलगट आहे. तोच नाणेघाट आहे. शेवटून तीन आणि चार चित्रे आहेत त्या वाटेने खाली मुरबाड कडे उतरता येते. दगडातच खोदले असल्याने दगडांची अक्षरशः रास आहे. पण जे काही आहे ते कमाल आहे. :)

विटेकर's picture

29 Jan 2014 - 4:51 pm | विटेकर

सुरेख वर्ण न आणि छायाचित्रण !

मुक्त विहारि's picture

29 Jan 2014 - 4:54 pm | मुक्त विहारि

मस्त..

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Jan 2014 - 5:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

नाणेघाट आणि जीवधन असा एकत्र ट्रेक केला होता. पण आम्ही कल्याणहुन मुरबाड-वैशाखरे येथे गेलो आणि नाणेघाट चढलो.
अवांतर-देउळ सिनेमात शेवटी उमेश कुलकर्णी ती मुर्ती घेउन पळुन जातो आणि रात्री भटकत असतो तो परीसर नाणेघाटाचा वाटला मला.

प्रचेतस's picture

29 Jan 2014 - 6:01 pm | प्रचेतस

मस्त फोटो आणि वर्णन.

जीवधनच्या पूर्व बाजूने (घाटघरकडून) वर चढताना हमखास चुकायला होतेच. कारण रस्ता असा नाहीच ओढ्यातून वाट आहे. काही ठिकाणे खडूने बाणांच्या खुणाही केलेल्या आहेत.
ती लहानशी गुहा आहे तशा प्रकारची लहान गुहा हडसरच्या वाटेवरही आहे बहुधा ही कड्यातली ओहोरलेली टाकी आहेत.

तो रॉकपॅच तुलनेने सोपा आहे. बोटे अडकवण्यासाठी उत्तम खोबण्या आहेत आणि पाय ठेवण्यासाठी पावठ्या. पाल भिंतीला चिटकावी तसा माणूस भिंतीला चिकटतो. अर्थात ओझे घेऊन तसे अंमळ अवघडच जाते.

या पायऱ्या चढून आल्यावर लगेचच एक उद्ध्वस्त दरवाजा लागतो. तेथून डावीकडे पाण्याचे टाकी आहेत. हे पाणी पिण्यायोग्य नाही.

त्याच्यावर शेवाळ्याचा गालीचाच पसरलेला आहे. पण ते शेवाळे हलकेच बाजूला करून बघा. अतिशय थंडगार आणि नितळ पाणी आहे. अगदी पिण्याजोगे.

बाकी तुम्ही दोन गोष्टी पाहायला विसरलात. किल्ल्याच्या दक्षिणेकडे जीवधनला लागून असलेल्या डोंगराचा अतिशय खोलवर तुटलेला कडा आहे जो घाटघर मार्गावरून चढताना त्या रॉकपॅचपाशी अल्पसा दिसतो. वरून त्याचे अतिशय रौद्रभीषण दर्शन होते. त्याच्या थोडंसं अलीकडे वानरलिंगी सुळका जीवधनच्या कड्यावरून पाहणे हा तर अविस्मरणीय अनुभव. कड्यावर आडवे झोपून पाहिल्यासच वानरलिंगीचा पायथा दिसतो.

शिलाहार राजांनी हे किल्ले वा प्रवेशद्वारे बांधली होती

जुन्नर मधील बहुतांशी किल्ले ही सातवाहन राजांची निर्मिती. जुन्नर तर सुरुवातीच्या काळात सातवाहनांची उपराजधानीच होती. नाणेघाटासारख्या अत्यंत महत्वाच्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी इथे किल्ल्यांची फळीच उभारण्यात आली.

चंद्र, सूर्य आणि तोरणा कृती आकृती कोरलेली आहे.

ते चंद्र, सूर्य आणि कलश आहेत. तसा कलश अगदी इथल्या लोहगडाच्या एका दरवाजावरही दिसतो जो सर्वात प्राचीन आहे. लोहगडपण सातवाहनांची निर्मिती.
चंद्र-सूर्याचा अर्थ म्हणजे "यावच्चंद्र दिवा करौ" -जो पर्यंत सूर्य चंद्र असतील तोपर्यंत (ह्या किल्ल्यांचे ऐश्वर्य अबाधीत राहो)

या काळी हे मोठाले रांजण दिवसातून ७-८ वेळा रिकामे केले जायचे.

हा जकातीचा रांजण असेल असे मला वाटत नाही. त्याकाळी जकात नाण्यांच्या स्वरूपात गोळा केली जायची ही नाणी फार लहान असत. हा रांजण इतका मोठा आहे की तो पूर्ण भरायला कित्येक दिवस लागत असतील. रहदारी भरपूर असली तरी एका दिवसात रांजण पूर्ण भरण्याइतकी नक्कीच नसे.
माझ्या मते हा रांजण पिण्याच्या पाण्यासाठीच असावा. घाट चढून आल्यावर पहिली गरज म्हणजे पाणॉ. त्यासाठी गुहेनजीकच्या टाक्यांतील पाणी तिथेच दूषित न होऊ देण्यासाठी ते इकडील रांजणात भरत असावेत.
बाकी काही अभ्यासक त्याला एक बौद्ध स्तूप मानतात जे मला व्यक्तिशः पटत नाही.

हा बघा आमच्या जीवधनच्या ट्रेकदरम्यान वानरलिंगीचा वरून घेतलेला फोटो.

a

यशोधरा's picture

30 Jan 2014 - 1:55 am | यशोधरा

प्रतिसाद आवडला.

सुज्ञ माणुस's picture

30 Jan 2014 - 10:46 am | सुज्ञ माणुस

वल्ली, अभ्यासपूर्ण प्रतिसाद आणि फोटू दोन्हीही कमाल. आमचे राहिले ते बघायचे. ते बघायचे आहे हे माहित होते पण पोटात काही नसल्याने वाईट अवस्था झाली होती म्हणून स्किप केले ते.
सध्या हि रांजणात पाणीच होते. आणि त्यात पैसे टाकत असावेत तर पावसात त्यात पाणी साचू नये म्हणून काही उपाय योजना दिसली नाही. (जीवधन वर मात्र पायऱ्यांवर पाणी येऊ नये म्हणून पन्हाळी केलेली दिसली). त्यामुळे तुम्ही म्हणता तसेही असू शकेल असे वाटते.
चंद्र-सूर्याचा अर्थ म्हणजे "यावच्चंद्र दिवा करौ" -जो पर्यंत सूर्य चंद्र असतील तोपर्यंत (ह्या किल्ल्यांचे ऐश्वर्य अबाधीत राहो) >> हे माहित नव्हते. पण भारी आहे हे. :)

सुहास..'s picture

29 Jan 2014 - 7:02 pm | सुहास..

ज ह ब ह रा !!

मुशाफिरी तो मुशाफिरी , वल्ली का रिप्लाय सुभानल्ला !!

प्यारे१'s picture

29 Jan 2014 - 7:06 pm | प्यारे१

+११११

असेच म्हणतो!
त्या वल्ल्याला आता आपण काय बोलत नाय.
महाराष्ट्रात एखादी जागा आहे का रे बाकी ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2014 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

जेपी's picture

29 Jan 2014 - 8:34 pm | जेपी

मस्त लेख आणी फोटो आणी वल्लीयांचा प्रतिसाद लय भारी .

एक प्रश्न .

नाणेघाटचा वापर फक्त सातवाहनकालातच होता का ?
पुढे त्याचा उल्लेख येत नाही .

नाणेघाटाचा वापर सुमारे २२०० वर्षांपासून आजसुद्धा चालू आहे. आजही तिकडील काही गावकरी झटकन कोकणात जाण्यासाठी वा वरघाटी येण्यासाठी नाणेघाटाचा वापर करतात.
शिवाजी महाराजांच्या काही पत्रात बहुधा नाणेघाटाचा उल्लेख आहे. नक्की काय ते बघावे लागेल.
घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी एका अधिकार्‍याची नेमणूक होत असे त्यांना 'घाटपांडे' असे पदनाम असे.

आजच्या नाणेघाटाच्या वापराला वापर म्हणता येणार नाही .
कोणा गावकऱ्याचे सोयरे खाली असल्यासच तो जातो .
आर्थिक दृष्ट्या घाटघर अंजनावळे चे गावकरी जुन्नरच्याच बाजारला जातात .कोण खाली कोकणात तंगडतोड करून आणि पस्तिस रुपये खर्च करून कल्याणला जाईल ?

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2014 - 12:42 am | अत्रुप्त आत्मा

हॅट्स ऑफ

किसन शिंदे's picture

30 Jan 2014 - 1:23 am | किसन शिंदे

मुळ वृत्तांत, फोटो आणि त्याचबरोबर या वल्ल्याचा प्रतिसाद....सगळं अप्रतिम!!

यशोधरा's picture

30 Jan 2014 - 1:56 am | यशोधरा

मस्त लेख आणि फोटो.

वेल्लाभट's picture

31 Jan 2014 - 6:55 am | वेल्लाभट

खलास! केवळ खलास....
जबरदस्त झालाय ट्रेक...... अप्रतिम

अमोल केळकर's picture

31 Jan 2014 - 4:23 pm | अमोल केळकर

खुपच सुरेख माहिती आणि चित्रेही

अमोल केळकर

भ ट क्या खे ड वा ला's picture

31 Jan 2014 - 9:54 pm | भ ट क्या खे ड वा ला

भन्नाट ट्रेक आणि फोटो सुद्धा,
वल्लींचा प्रतिसाद तर एकदम भन्नाट

पैसा's picture

7 Feb 2014 - 2:04 pm | पैसा

सगळे फोटो, वर्णन मस्त! वल्लीचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच झकास. (या वल्ल्याकडे टाईम मशीन असावे असा अंदाज आहे. ते वापरून सातवाहनकाळात जाता येते बहुतेक!)