जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर
कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे.
इतिहास :
शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते.ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.
साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडले नाही. बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची या राजांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी.
जायचे कसे :
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघर ला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किमी वर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. पण ते २ तास चालणेही वर्थ आहे असे ते पांडवकालीन मंदिर पाहिल्यावर वाटते.
गावाचे नाव 'पुर ' असून कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे.
जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे.
बसच्या वेळा : जुन्नर ते कुकडेश्वर
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०
सद्यस्थिती :
मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेलं आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन किर्तीमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही खूपच भारी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.
हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीवकाम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा गावात निर्णय झालाय. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीवकाम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.
आमची मुशाफिरी :
कुकडेश्वर मंदिरात पोहोचायला जवळपास ७ वाजले होते. जवळपास अंधार पडत आला होता त्यामुळे तिथे पोहोचूनही काही बघायला मिळेल की नाही असे वाटले.
सूर्य नारायण जाता जाता काही राहिले तर नाही ना? म्हणून टॉर्च मारून बघत असावा असे वाटले.
आणि जाताना आकाशाला गिफ्ट म्हणून मावळतीचे रंग देऊन जात असावा.
पश्चिमाभिमुख शिवमंदिर :
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार :
उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम पूर्वी कधी पहिले नव्हते.
प्रवेशद्वारावरील शिल्पे :
मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर असून त्यात काय आहे ते कळू शकले नाही. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.(अंधार असल्याने आणि ट्राय पॉड नसल्याने याचे फोटो काही धड आले नाहीत. )
मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. थोडीही जागा रिकामी अशी सोडलेली नव्हती. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. असेच सेम शिल्प खांबाच्या इतर दोन्ही बाजूस आहे. त्याखाली ढोल वाजवतानाचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य काहीतरी असावे. यालाच वेलबुट्टी म्हणत असावेत कदाचित.
त्याच्या पुढच्याच/समोरच्या खांबावर नृत्य शिल्प कोरलेले आहे आणि त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी. हे काय कोरले आहे याची कुठेतरी माहिती असावयास पाहिजे होती. गावात काही जुनी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा इतिहास माहीत आहे.
हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.
उशिरा तेथे पोहोचल्याचा एक मात्र फायदा झाला की कॅमेराचे काही गोष्टी ज्या आजपर्यंत प्रयत्न केला नव्हत्या त्या कळल्या. अंधारात लॉग एक्स्पोजर / शटर स्पीड कमी करून काही फोटो काढले.
एव्हाना आठ वाजत आले होते. जुन्नर पासून साडेसातला सुटणारी आणि अंजानावळ येथे मुक्कामी जाणारी शेवटची गाडी आम्हाला घाटघरला, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी सोडणार होती. ती पकडण्यासाठी परत ३ किमी चालत जाऊन फाट्यावर उभे राहायचे होते.
आमच्या सुदैवाने आम्ही उभे होतो तेथे एक दुधाची गाडी आली. गाडीतली माणसे आजूबाजूच्या गावातील गावकऱ्याकडून त्यांच्या गाई-म्हशींचे दूध घेतात, त्याचा हिशेब ठेवतात. मग ते दूध एकत्र करून घरी येऊन मोठ्या फ्रीज मध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरी ला विकतात आणि हिशेबानुसार लोकांना पैसे देतात. हेच दूध डेअरी मधून प्रक्रिया होऊन ( घट्ट दुधात पाणी घालूनही ) पुणे आणि आजूबाजूच्या गावास जाते. ओह्ह मला वाटायचे की, चितळ्यांच्या गायीच्या दुधाच्या पिशवीत चितळ्यांनीच पाळलेल्या गायीचे दूध असेल. असो. गाय कोणाचीही असो, शहरात गायीच्या दुधाच्या पिशवीत गायीचेच दूध येतेय हे हि नसे थोडके !
तर त्या दुधाच्या गाडीने आम्ही ५ मिनिटात फाट्यावर आलो. आता एकदम गडद अंधार पडला होता. आजूबाजूला वस्ती नसल्याने आणि पर्यायाने एकही दिवा नसल्याने सारे नभांगण तारकांनी भरून व्यापले होते. या आधी मान वर करून आकाशात तारे कधी पाहिले हे आठवण्यात काही क्षण गेले. मग आठवले की २ वर्षापूर्वी हरिश्चंद्राला गेलो होतो तेव्हा असेच तारे पाहत बसलो होतो.
मधल्या काळात ताऱ्यांनी खुणावलेच नाही का ? का ते बघण्याएवढी मान कधी वरच आली नाही ?
हॉल च्या छताला लावलेले रेडियम चे तारे जास्त जवळचे वाटले? का हातात अख्खी 'गॅलेक्सी' आल्यामुळे ताऱ्यांचे वेडच नाहीसे झालेय? असो.
पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी हे विचार एकदम तोडले. एकमेव असलेला विजेरी दिवा पेटवला आणि त्या प्रकाशात डबा उघडून जेवण चालू केले. आजूबाजूला गर्द अंधार, निरव शांतता, दूरवर मिणमिण करणारे दिवे, जोडीला हा कंदील आणि डब्यात गोड शिरा. अहाहा ! त्या दिवशी 'कॅण्डल लाईट डिनर' चा खरा अर्थ कळला.
जेवण होऊन थोडावेळ एका गावकऱ्याशी गप्पा टाकल्या. थोडा वेळात दोन पिवळे दिवे भयंकर आवाज करत, अंधारातून माग काढत आमच्या दिशेने आले आणि थांबले. मग कळले की ती ST होती. गाडीत बसलो आणी गाडी घाटघर दिशेने पळू लागली. त्यानंतर घाटघरपर्यंत जो काही रस्ता आहे, त्याला 'कच्चा रस्ता' म्हणणे म्हणजे कुत्र्याला गेंडा म्हणणे आहे. फक्त आणि फक्त 'हमर' घेऊन जाण्यासाठीच तो रस्ता असून हा ड्रायवर उगाच त्यावर ST चालवतो आहे का काय अशी शंका येते. येथे ST मधून उतरताना ड्रायवर, कंडक्टर आणि ST महामंडळ तिघांनाही सलाम ठोकावासा वाटतो. आम्ही ठोकलाही!
घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला.
राहायची व्यवस्था :
गावात कोणाकडे तरी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्या समोर मोठी ओसरी आहे. १५-२० लोक तेथे झोपू शकतात.
अजून काही :
१. महाराष्ट्र सरकारने हे शिवालय तीर्थक्षेत्रे बनवून त्याचा विकासकाम (?) हाती घेतले आहे.
२. कुकडेश्वर मंदिर हे 'क- वर्गीय' मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे. गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पूर' गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो (नदीचा उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
३. पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
४. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबाला हि जाऊ शकतो.
पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.
बाकी २०१३ मध्ये वर्षभर काय काय कमाई झाली ती येथे वाचू शकता.
२०१३! फुल टू कमाई !
प्रतिक्रिया
2 Jan 2014 - 3:42 pm | सुहास..
जीर्ननगरीचा दुसरा भाग आवडला ...
ईतिहासाकरिता श्री . टल्ली ....आपल हे श्री वल्ली ;) यांची मदत घ्यावी.
जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ) >>. अशी माहीती देण्याची पध्दत आवडली आहे ...
जाता जाता : आंबेगाव किंवा अवसारी घाटातल्या अभयारण्यामध्ये पण जाणे झाले होते का ?
2 Jan 2014 - 5:16 pm | कंजूस
पूर्ण देऊळ पाहून बरे वाटले .मी येथे २२ सप्टेंबर २००४ ला आलो होतो .देवळाचा फक्त चौथरा होता .सर्व दगड जमीनीवर मांडून ठेवलेले त्यावर खुणेचे क्रमांक पुरातत्व खात्याने(आभार) टाकून ताडपत्री घातलेली होती ,पावसाळ्यामुळे काम बंद होते .
हे आणि खुबी फाट्याजवळ खिरेश्वराचे देवळाचे दगड सांधा मारून बसवलेले नसल्यामुळे हलले आहेत .
आता जायला पाहिजे .
2 Jan 2014 - 6:06 pm | मुक्त विहारि
कधी?
मुहुर्त काढा.
आम्ही तयार आहोत.
2 Jan 2014 - 6:18 pm | मुक्त विहारि
मस्त
2 Jan 2014 - 6:30 pm | अत्रुप्त आत्मा
पहिले ४ फोटू अफाट ! बाकी धागा अवडला. :)
2 Jan 2014 - 6:33 pm | प्रचेतस
छान लेखन.
अशा प्रकारची प्राचीन मंदिरे मुख्यतः चालुक्य, शिलाहार, यादवकालात बांधली गेली. मंदिराची शैली भूमिज पद्धतीची आहे. अशा प्रकारच्या बर्याच मंदिरांचे कळस आजमितीस अस्तित्वात नाहीत. यादवराजवटीच्या अस्तानंतरच्या इस्लामिक राजवटीत अशा प्रकारची मंदिररचनेची शैली पूर्णतः लयाला गेली व अत्यंत साधी मंदिरे निर्माण होऊ लागली.
ह्या विस्मृतीत गेलेल्या अद्भूत मंदिरांकडे बघून ही पांडवांनीच बांधलेली आहेत असा समज इकडे निर्माण झाला.
ह्या स्त्रिया नसून वेताळ आहेत. कोकणातल्या प्राचीन मंदिरांत असे वेताळ अथवा भूतगण आढळतात. हे मंदिर शिलाहारांनीच बांधलेले आहे हा कयास पण यामुळेच करता येतो.
अगदी टिपीकल शैली. गणपती अजून मुख्य देवतांत स्थानापन्न झालेला नव्हता. त्यामुळे गणेशपट्टीका नाही. तर देवी अथवा शिवमूर्ती द्वारपट्टीवर कोरलेल्या आढळतात.
ती फुलांची नक्षी आहे. बर्याच ठिकाणी आढळते.
ते (पुरुष) प्रतिहारी आहेत.
डावीकडच्या प्रतिहाराच्या हातात एक लांबट पिशवी दिसेल. याचा अर्थ मंदिराच्या उभारणीसाठी हे धन घेऊन आलेत. उजवीकडचा शैव प्रतिहारी आहे. डमरू आणि (बहुधा) त्रिशूळ अशी साधने हातात आहेत.
बाकी अंधारामुळे तुमची बरीच शिल्पे बघायची हुकली म्हणायची.
मंदिरांच्या आत स्तंभांवर भारवाहक यक्ष आहेत. तर बाह्यभिंतींवर नरवराह, भैरव, सरस्वती, हरिती अशा दैवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
2 Jan 2014 - 7:21 pm | कपिलमुनी
भारीच ओ !
अशा प्रतिसादामधून बरीच माहिती मिळते ..
धागाकर्त्याचे आणि तुमचेही धन्यवाद !
2 Jan 2014 - 7:23 pm | सुहास..
अगदी हेच म्हणतो आणि जरा टेचात म्हणतो
2 Jan 2014 - 7:35 pm | बॅटमॅन
टिपिकल वल्ली प्रतिसाद!! आवडला हेवेसांनल.
बाकी त्या "पांडवकालीन" सारखा प्रकार ग्रीसमध्येही होता. ट्रोजन काळात बांधलेल्या तटबंदीच्या भिंतींमध्ये दगडाचे इतके अजस्र ब्लॉक्स असायचे की नंतरच्या क्लासिकल काळात लोकांना वाटायचे हे एकडोळ्या 'सायक्लॉप्स' नामक राक्षसांनी केलेले बांधकाम आहे म्हणून. त्यामुळे तशा भिंतींना "सायक्लोपीअन" हे विशेषण चिकटले ते आजपर्यंत!!! ट्रॉय, मायसीनी, आर्गॉस, इ. अनेक ठिकाणी अशा भिंती बघावयास मिळतात.
3 Jan 2014 - 10:46 am | सुज्ञ माणुस
वल्ली, मस्त प्रतिसाद. वाटच बघत होतो तुमच्या प्रतिसादाची :) बरीच माहिती कळते तुमच्याकडून.
ते (पुरुष) प्रतिहारी आहेत. >> त्यांच्या पायावर साखळ दंडा सारखे काहीतरी दिसतेय ते काय असावे?
स्त्रिया नसून वेताळ आहेत. >> एका ठिकाणी ती अस्थिपंजर झालेल्या वृध्द स्त्रियांची शिल्पे आहेत असे वाचनात आले. याबद्दल अधिक माहिती असेल तर आवडेल.
अंधारामुळे तुमची बरीच शिल्पे बघायची हुकली म्हणायची.>> खरच. मंदिर आतून पूर्ण पाहिले. बाहेरून एवढा अंदाज आला नाही. फोटो काढले बरेच पण खूप काही धड आले नाहीयेत.
शेवटच्या फोटोतला कळस मंदिराच्या मागील बाजूस पडलेला आहे. तो नाही बघता आला.
3 Jan 2014 - 8:23 pm | प्रचेतस
ते साखळदंड नसून पुष्पमाला आहेत.
अस्थिपंजर झालेली शिल्पे जुन्या शैव मंदिरांत दिसतात. हे वेताळ किंवा भूतगण. कोकणातल्या मंदिरांत हे वेताळ सुटे कोरलेले आढळतात तर देशावर हे बाह्यभिंतींवर कोरलेले दिसतात. खिद्रापूर आणि पिंपरी दुमाला येथील प्राचीन मंदिरांत अशी शिल्पे आहेत. नेमके माझ्या घरचे नेट डाउन असल्याने आता फ़ोटो टाकू शकत नाहीये.
3 Jan 2014 - 8:46 pm | पैसा
3 Jan 2014 - 8:59 pm | प्रचेतस
यक्झेक्टली.
4 Jan 2014 - 11:29 am | शेखरमोघे
प्रतिहारी म्हणजे द्वारपाल अथवा राखणदार का? इतरत्र (उदा. बदामी पट्टदकल, एके काळची चालुक्यान्ची राज्याभिषेकाची जागा)मी पाहिलेले (शिल्पातले) द्वारपाल हातात गदेसारखे काहीतरी घेतलेले असे होते, पण कुबेर मात्र लोडाला टेकून बसलेल्या शेठजीसारखा आरामात होता. इथे मग हे प्रतिहारी थैली घेऊन कसे हजर?
कोणा तज्ञाकडून "हे कसे करावे" याची माहिती मिळल्यास बदामी पट्टदकलची द्वारपाल आणि कुबेर ही छायाचित्रे "मि पा" वर लावू शकेन.
4 Jan 2014 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे
मी काही तज्ञ नाही. पण चित्रे बघायची उत्सुकता आहे म्हणून मी वापरत असलेली पद्धत खाली दिली आहे.
१. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो किंवा तत्सम संस्थळावर चढवा. शक्यतो गुगल-फोटोच वापरा. कारण तेथिल चित्रे सर्वांना दिसतात असा अनुभव आहे. इतर ठिकाणची चित्रे काही जणांना दिसत नाहीत.
२. त्या संस्थळावर चित्र उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" वर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकायला तयार झाले आहे.
आता मिपावर या आणि :
२. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सुर्योदयाचे चित्र असलेल्या (डावीकडून ९ व्या) बटणावर टिचकी मारा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल)
३. आता दिसू लागलेल्या टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा:
अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)
आ) Width X Height: कोरे ठेवा.
इ) Alternate Text: इथे फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका.
४. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल.
५. आता चित्र फक्त "पूर्वपरिक्षण" करुन पहा:
अ) चित्र लेखनाच्या चौकटीत नीट दिसत असले तर कोड तसाच ठेवा.
आ) चित्र चौकटीबाहेर जात असल्यास Width मध्ये ६८० ते ३०० च्या मधला पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करून पहा व योग्य तो पर्याय स्विकारा.
इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.
६. पुढच्या प्रत्येक चित्राचा कोड पायरी क्रमांक १ ते ५ परत परत वापरून लेखात अंतर्भूत करा.
७. सर्व चित्रे आणि लिखाणाचे शेवटचे मनाजोगते "पूर्वपरिक्षण" झाल्यावरच सर्व लेख चित्रांसह "प्रकाशित करा".
तर दाखवा आम्हाला ती चित्रे लवकरच !
4 Jan 2014 - 2:20 pm | शेखरमोघे
विरूपाक्श मन्दिर, पट्टदकल येथील कुबेरशेट (उजव्या हातात फक्त एक शन्ख पण डावा हात बहुतेक खजिन्यावर)
द्वारपाल १ आणि २: हातातल्या गदेवर टेकून /रेलून "येक दम हीरोच्या पोझिशन" मध्ये उभा पाहिल्यावर "मुम्बै ब्यान्के भाईरचा" चा "येकाच वेळी बन्दूक आनि तम्बाखू" हाताळणारा दरवान आठवतो.
4 Jan 2014 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद ! मस्त आहेत चित्रे.
5 Jan 2014 - 7:35 pm | प्रचेतस
प्रतिहारी म्हणजे सेवक. हे स्त्री-पुरुष अशा दोन्ही प्रकारांत कोरले जातात. हे द्वारपाल नव्हेत. हे मुख्य प्रवेशद्वार आणि गर्भगृहांच्या द्वारांवर दोन्ही बाजूस अधिक संख्येने दिसतात. तर द्वारपाल दोन्ही बाजूस फक्त एक एक.
हे बघा पेडगावच्या बाळेश्वर मंदिरातील प्रतिहारी.
हे गोंदेश्वर मंदिरातील प्रतिहारी
2 Jan 2014 - 7:19 pm | कपिलमुनी
हे उगीचच 'दवणीय' !
2 Jan 2014 - 7:26 pm | आनंदराव
नि:शब्द !
2 Jan 2014 - 8:35 pm | कंजूस
वल्ली आता आणखी दोन कामे आहेत .
१ नाणेघाट गुहेतील लेखात काय लिहिलय ते अगदी थोडक्यात सांगा .नाणेघाटाचे वर्णन आल्यावर चालेल .
२दुसरा एक लेख "बैटमैन"ची सही
काय अर्थ आहे त्याचा ?
(फी म्हणून एक मिसळ)
2 Jan 2014 - 9:32 pm | प्रचेतस
जयंत कुलकर्णी काकांनी यावर पूवीच एक डिट्टेलवार लेख लिहिलाय.
सातवाहन आणि नाणेघाटातील शिलालेख
ते लॉर्ड ऑफ द रिंग्स मधली सैतानी भाषा आहे.
वन रिंग टू रूल देम ऑल, वन रिंग टू फाईंड देम, वन रिंग टू युनाईट देम अँड इन द डार्कनेस, बाईंड देम.
चला आता मिसळ खायला मिळेल. ;)
2 Jan 2014 - 11:15 pm | बॅटमॅन
सैतानी भाषा>>>आवडल्या गेले आहे. द ब्लॅक स्पीच ऑफ मॉर्डॉर!!!!
3 Jan 2014 - 10:48 am | कंजूस
वल्ली धन्यवाद लेखाचा दुवा आणि आणि बैटमैनच्या सहीचे कोडे उलगडल्याबद्दल .
लॉर्ड अव दि रिंग्झ वाचेन म्हणजे सगळा बैटमैन कळेल .
मिसळ मंजूर करत आहे .
ठिकाण जुन्नर डेपोसमोरचे महाजन/महांबरे ? यांची खाणावळ .
संक्रांत १४ जानेवारी (इद ची पण सुटटी आहे ) नाणेघाट -चावंड -कुकडेश्वर-लेण्याद्री-शिवनेरी जमेल तेवढे किंवा तसे करेन/करुया म्हणतो .
#मुक्तविहारी ,जमत असल्यास( संक्रांत भेट ,मिपा)व्हाया नाणेघाट गुंफा वरचा मजकूर चोपडून धागा उघडा म्हणजे तिकडे प्रतिसाद येतील .कार्यक्रम ठरेल . मिसळ माझ्याकडून .
मी पावसात जीवधन दक्षिणवाटेने चढलो होतो .त्याची आठवण येते .घाटघर नाक्यावरचे हरिभाऊ बोराडे मोठी असामि आहे .
3 Jan 2014 - 11:06 am | सुज्ञ माणुस
दक्षिण वाटेने म्हणजे घाटघर गावातून का? का नाणेघाट वरून?
पावसाळ्यात घाटघर वरून जीवधन गेला असाल तर तुम्ही कमाल आहात. एकतर वाट सापडता सापडत नाही प्लस रोप न लावता १५ फुट रॉक पॅच. तो जास्त अवघड आहे पावसाळ्यात. :)
3 Jan 2014 - 5:46 pm | कंजूस
होय घाटघर गावाकडची वाट .रोप न लावता .त्या पायऱ्या (?!)ही भयानक निसरड्या होत्या .विशेष म्हणजे तिथूनच उतरलो होतो .
आता त्या आठवणीनेसुध्दा काटा येतो .त्यावेळी हितेश (नुकताच रॉक क्लाइमिंग किरण अडफडकरकडे शिकत होता .आता सिध्दगड कडा मोहिमेत होता )माझ्याबरोबर होता .
एक दोन ट्रेक सोडल्यास माझी सर्व सह्याद्री भटकंती एकट्यानेच करतो त्यावेळी धोकादायक रॉकपैच टाळतो .या गोष्टी परावलंबी आहेत .
रतनगडचा (व्हाया आसनगाव ,मुरशेत )लेख लिहिणार आहे .
3 Jan 2014 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर वर्णन आणि फोटो. सह्याद्रित किती स्थापत्यकृती-कलाकृती लपल्या आहेत याबाबत आपण किती अनभिज्ञ आहोत हे असे गड-देवळांचे वर्णन वाचले की कळन चुकते. लिखित इतिहास नसल्याने आणि दुर्ल़क्षित असल्याने अशी कित्येक ऐतिहासिक कला-परंपरेने भरलेली ठिकाणे कालाच्या उदरात गडप झाली असतील... निदान ह्याचा जिर्णोद्धार होतोय हेच नशीब !
मुख्य म्हणजे येथे त्याची माहिती टाकल्याबद्दल सुज्ञ माणूस यांचे धन्यवाद ! वल्लीसाहेबांनी नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद टाकून हा धागा अधिकच वाचनिय बनवला आहे.
3 Jan 2014 - 8:49 pm | पैसा
अशाच अनवट ठिकाणांची माहिती आणि छान छान फोटो येऊ द्या. आपल्या महाराष्ट्राचीही आपल्याला पुरती ओळख नाही हे परत परत कळतं आहे.
4 Jan 2014 - 12:54 pm | प्यारे१
भारीच.
वल्लीच्या प्रतिसादाची वाट पाहात होतो. ;)
आता सुफळ 'संप्रूण' वाटतोय धागा! :)