कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)
कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)
कान्हाला गेल्यावर सगळ्या वातावरणामध्ये एकच एक प्रश्न असतो.. "वाघ दिसणार का?"
कान्हा मध्ये एकुण ९०-१२० वाघ असावेत. ते संपुर्ण जंगलात कुठेही असु शकतात. पर्यटकांसाठी मु़ळातच ५-१०% च जंगल खुले आहे. त्यामुळे तुम्ही ४-५ तास ज्या भागात फिरणार, तिथे बरोब्बर त्याच वेळेला एखादा वाघ असण्याची शक्यता फार कमी. जंगलात जर तेव्हाच एखादी वाघीण पिल्लांसाठी म्हणुन एक दिवसा आड शिकार शोधत फिरत असेल..किंवा एखाद्या वाघाला कुरणात फिरायला आवडत असल्याने तो दाट जंगलात न रहाता बाहेर आला असेल..किंवा भर उन्हाळ्याचे दिवस असतील म्हणुन पाणी प्यायला बाहेर पडला असेल..किंवा थंडीमध्ये पहाटे गवतावर जे दव तयार होतं ते त्याला आवडत नाही म्हणुन तो रस्त्यावर येऊन बसला असेल..तर कदाचित तुम्हाला दिसेल..
जंगलात जेव्हा सफारीच्या गाड्या फिरत असतात तेव्हा गाईड लोकं एकमेकांना सतत विचारत रहातात "सायटींग हुवा?". समजा एखाद्या ठिकाणी वाघ दिसला तर खबर पसरते आणि सगळ्या गाड्या तिकडेच वळतात. आणि तोच रस्ता गजबजुन जाऊ शकतो. आता वाघासाठी तुम्ही आलाय की तुमच्यासाठी वाघ रस्त्यात येऊन पोज देऊन बसलाय? उत्तर सोप्पं आहे..! म्हणुनच एखाद्या ठिकाणी वाघ बसला असेल तर वनखाते तो रस्ताच बंद करु शकते.
कान्हा हा वाघांची संख्या वाढावी म्हणुन खुप कष्टाने चालवलेला प्रकल्प आहे. त्यासाठी गावेच्या गावे हलवली आहेत. कान्हामध्ये फक्त आणि फक्त प्राण्यांनाच प्राधान्य आहे. बाकी सगळं दुय्यम. इथले नियम सतत तुम्हाला ह्या गोष्टीची जाणिव करुन देतील. जंगलात जायला मिळणं हे आपल्यावर उपकार आहेत हेच मनात धरुन इथे वावरणे श्रेयस्कर..
वाघ दिसणं हे महामुश्किल काम आहे हे मला मागच्या महिनाभरात लक्षात आलं होतं. म्हणुन मी आधीपासुनच सगळ्यांच्या मनाची तयारी करत होते..
"आपण जंगल बघायला चाललोय..वाघ नाही..कान्हा मध्ये इतर अनेक प्राणी आहेत जे तुम्हाला भारतात कुठेही पहायला मिळणार नाहीत..वाघ कदाचित इतर जंगलात पहाल..त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवु नका..ग्रुपनी मिळुन ४० सफार्या करुनही एकालाही वाघ दिसला नाही ह्यातच काय ते समजुन घ्या.."
पण आशा लई वंगाळ..दुसर्या दिवशी सकाळी सगळे आशाळभुत लोक सकाळी ५.३०ला उठुन तय्यार झाले होते..जिप्सी तयार होतीच, मुबानी नाश्ताही पॅक करुन दिलेला. कॅमेरे ,२-४ मेमरी कार्डस वगैरे घेऊन मंडळी पहिल्या सफारीला निघाली. ही सफारी मी आणि माझ्या नवर्यासाठी फार महत्वाची होती. कारण आम्ही ही एकमेव सफारी करणार होतो. काही कळायच्या आत सफारी बुकिंग संपल्यामुळे फक्त २ मॉर्निंग सफारी आम्हाला मिळाल्या होत्या. त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही आणि दुसर्या दिवशी माझे आई-वडील सफारीला जाणार होते. अर्थात आई-बाबांनी ताडोबाला वाघ पाहिला होता त्यामुळे त्यांना आमच्या एवढी घालमेल होत नव्हती.. आणि बाकी सगळ्यांना उद्याची सफारी होतीच नशीब आजमावायला..
का कोण जाणे नवर्याला वाघ दिसावा अशी माझी फार फार इच्छा होती..ही ट्रिपच मी मुळात खास माझ्या नवर्यासाठी जीव तोडुन प्लान केली होती..त्यामुळे काहीही होवो पण वाघ दिसोच असं खरं तर मनोमन मलाही वाटत होतंच..
हॉटेलपासुन ५ किमीवर मुक्की गेट होतं तिथे जाऊन तिकीट आणि आयडी प्रुफ दाखवुन गाईड घ्यायचा आणि जंगलात घुसायचं असा सोप्पा प्लान होता. पण मी तिकीटावर सगळ्यांची नावाखेरीज संपुर्ण माहिती लिहीली नसल्याने आम्हाला अडवलं. ड्रायव्हर आणि मुबचा मॅनेजर ह्यांनी "अर्ज लिहुन देतो की नियम माहिती नव्हता" असा मार्ग काढुन तिथल्या अधिकार्याला पटवलं. त्या माणसालाही आयडी प्रुफ असल्याने तशी काही हरकत नव्हती. त्यामुळे त्यानी आम्हाला आत सोडलं आणि माझा पुन्हा धडधडायला लागलेला जीव भांड्यात पडला..कुठुन बुद्धी झाली आणि ट्रिप प्लान केली असं वाटत होतंच इतक्यात गाडी दाट जंगलात घुसली आणि अचानक सगळ्या चिंता गाडीच्या एका झोकदार वळणा सरशी मागे पडल्या.. आम्ही अत्यंत सुंदर अशा जंगलात शिरलो होतो..असं वातावरण मी कधीही अनुभवलं नव्हतं...
भल्या पहाटेची वेळ.. अजुनही अंधार होता.. दिवाळी नंतरची गुलाबी थंडी..सगळीकडे दव पडलेलं..जंगलाचा फिरवा ओला वास सगळीकडे भरुन राहीलेला..पक्षांची किलबिल हाच काय तो आवाज..उंच उंच सालाची झाडे..त्यांच्या मधुन जाणारे वळणा वळणाचे रस्ते..
धुक्याची चादर ओढुन झोपलेलं तळं..
हळुहळु सुर्य वर येत होता.. गुलाबी थंडी आता उबदार होत होती..
मध्येच सपाट मैदानं.. कुरणं..
कुरणाच्या आसपास आल्यावर काही गाड्या थांबलेल्या दिसल्या. सगळ्यांचे डोळे तळ्याकडे लागलेले. आम्ही पण थांबलो. असं वाटत होतं की दुरवर कुठे तरी कुरणात वाघ बसलाय. कुणीतरी हालचाल पाहिली होती.. शरीरातला सगळा जीव डोळ्यात एकवटला...पापणी लवत नव्हती..श्वास रोखुन सगळे फकत वाघ आहे का हे पहात होते.. आशा खरच फार वाईट.. तिथे वाघ आहे की नाही हे ही आम्हाला निश्चित माहिती नव्हतं.. पण तो असेल आणि कदाचित उठेल म्हणुन पार अर्धा किलोमीटर दुरवर असलेल्या ठिकाणी अंदाजपंचे नजरा लावुन सगळे बसले होते.. आमच्या ग्रुपमध्ये एकट्या बहीणीने ताडोबाला वाघ पाहिला होता.. ती एकदम म्हणाली..
"ताई..मला नाही वाटत इथे वाघ आहे.."
"का ग बाई..शुभ बोल की.."
"अगं वाघ जवळपास जरी असेल ना, तरी सगळं वातावरण बदलतं.. पक्ष्यांचा आवाज बदलतो.. माकडं ओरडु लागतात..इथे तर सगळं शांत आहे.."
दादालाही एव्हाना वाघ नाही हे पटायला लागलं होतं..शेवटी अजुन वेळ घालण्यात अर्थ नाही म्हणुन आम्ही पुढे निघालो..
जंगल आहे तसंच सुंदर होतं पण आमच्या नजरा मात्र बदलल्या होत्या.. आता आम्ही फक्त "शोध" घेत होतो..कान टवकारुन बसलो होतो..कुठे काही तरी बदलेल ह्याची वाट पहात..
आमच्या अस्तित्वाची फारशी दखल न घेता बागडणारी हरणं..दखल घ्यायला आम्ही वाघ थोडीच होतो..!
रस्त्याच्या कडेला थंडीमध्ये पिसं झडुन गेले मोर..
खळाळणारे ओढे..
मध्ये एकदा आम्ही एक ब्रेक घेतला. गाडी कान्हा गेट जवळच्या कँटीनला आली. तिथे नाश्ता वगैरे करुन परत जंगलात शिरलो. आता हा परतीचा प्रवास होता. अजुनही आम्हाला वाघ दिसलेला नव्हता.डोळे आता शिणुन गेले होते..
अचानक कुणीतरी आमच्याकडे पहातय असं वाटलं.. दचकुन पाहिलं तर सांबार...शिंग झडुन गेलेलं..
मध्येच एकदा एका तळ्यावर दुरवर काही बारसिंगा डुंबत होते.. पण त्याचे फोटो नीट घेता आले नाहीत..
बायसन महाराज पण कान्हाची खासियत आहे.. हे ही एका कडेला गपचुप चरत उभे होते..
बरचं कोणी कोणी भेटत होतं.. पण जीवाला आस मात्र वाघाचीच होती.. आता आम्ही जवळपास गेट पर्यंत आलो होतो.. पुढे कुठे वाघ दिसायची चिन्ह नव्हती.. ज्या ज्या गाड्या भेटत होत्या त्यांच्याही चेहर्यावर निराशाच होती..
आज आम्ही खुप काही पाहिलं होतं..अनुभवलं होतं.. पहिल्यांदाच जंगलात फिरलो होतो.. एक अविस्मरणीय अनुभव घेतला होता.. पण.......
.... पण कान्हा मध्ये वाघ पहायची शक्यता मी आणि माझ्या नवर्यापुरती तरी संपली होती...
क्रमशः
प्रतिक्रिया
20 Jan 2014 - 5:41 pm | मुक्त विहारि
आवडले...
फोटो पण सुंदर आले आहेत.
21 Jan 2014 - 2:55 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत पु भा प्र.
20 Jan 2014 - 5:43 pm | स्वप्नांची राणी
आम्हालापण वाघ नाहिच दिसला. (पण अस काही होणार आहे का कि उद्याची पण सफारी तुम्हालाच मिळेल आणि वाघ दिसेल..? ;)
वरचे ते 'नेहेमिचेच यशस्वी' प्राणी मात्र भरपुर दिसले. आणि खरच वाघाशिवाय पण जन्गल ट्रिप ची मजा खुप आलि.
20 Jan 2014 - 5:49 pm | जेपी
बाकी मस्त लेख . ऐवढी डिट्टेल माहिती देताय की या धाग्याच्यां भरवश्यावर कान्हाला जावे .
धन्यवाद .
20 Jan 2014 - 5:51 pm | पिलीयन रायडर
हो हो.. राहीलय खरं.. अजुन बक्कळ लिहायचय हो..!!
21 Jan 2014 - 2:45 pm | वेल्लाभट
एक्क्क्दम सहमत....
फारच डीटेल.. तपशीलवार.. उत्तम. मानलं !
कधीपासून जायचंय.... बांधवगड ला जाईन म्हणतो या उन्हाळ्यात. लेट्स सी.
20 Jan 2014 - 6:02 pm | रेवती
फोटू आवडले.
20 Jan 2014 - 6:20 pm | परिंदा
आम्हीही डिसेंबरमध्ये रणथंबोरला गेलो होतो, पण वाघ दिसला नाही. :(
पण स्वच्छंद फिरणारी हरणे, सांबार, नीलगायी बघायला मिळाल्या. रानडुक्कर देखील दिसले. घुबड दिसले.
या आधी राणीच्या बागेत प्राणी पाहिलेल्या माझ्यासाठी हे ही नसे का थोडके!
20 Jan 2014 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
सफर मस्त रंगू लागलीय ! लेखनशैली आवडली. पुभाप्र.
20 Jan 2014 - 6:46 pm | प्रचेतस
सुंदर सफर.
20 Jan 2014 - 7:04 pm | अनन्न्या
प्रत्यक्ष वाघ पाहण्यासाठीची घालमेल जाणवतेय शब्दा-शब्दातून!
20 Jan 2014 - 7:09 pm | प्यारे१
+१११११.
आवडल्या गेले आहे. बाकी वाघाच्या दृष्टीनं विचार करा की जरा.
वाघ आहे तो वाघ! अपनी मस्ती मे मश्गुल. त्याला वाटलं तर दिसेल नाहीतर नाही.
पेशवे प्राणीसंग्रहालयात, औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात, अल ऐन ला कोंडलेले वाघ बघितलेत.
मजा नाय येत. वाईट्ट वाटतं.
21 Jan 2014 - 6:50 am | इन्दुसुता
वर्णन आवडले.
माझ्या ( कान्हा व अनेक ) सफारींची आठवण झाली..
21 Jan 2014 - 9:59 am | खटपट्या
अहो पिरातै, शेवटी वाघ दिसला कि नाही ते आधी डीक्लेर करून टाका,
21 Jan 2014 - 11:46 am | दिपक.कुवेत
आत्ताच पहिले दोन्हि भागहि वाचुन काढले. लेखन तर रसाळ आहेच शीवाय फोटोहि छान आलेत. पुढिल भाग लवकर टाक आणि फोटो जरा अजुन टाक कि!
21 Jan 2014 - 2:41 pm | कंजूस
लेखनात दिसतोय वाघ .छान केलंय वर्णन .फोटोपण भारीच .
24 Jan 2014 - 8:26 pm | पैसा
हाही भाग अगदी झक्कास!
24 Jan 2014 - 8:51 pm | आदूबाळ
आम्हालापण वाघ दिसला नव्हता :(
पण काय लिहिलंय, काय लिहिलंय...वा! मजा आ गया.
26 Jan 2014 - 11:25 am | मोदक
वाचतोय....