कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
17 Jan 2014 - 4:19 pm

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)

ट्रिप प्लान करायला सुरु केलं तेव्हाच "ट्रीप अॅड्व्हायझर" ला शरण गेले होते. खुप शोधाशोध केल्यावर एक निश्चित समजलं, ते म्हणजे आपलं भयंकर कन्फ्युजन झालेलं आहे. ३ गेट्स पैकी कोणतं गेट निवडावं? कोणता झोन चांगला? सफारी म्हणजे काय? एका गेट हुन दुसर्‍या गेटला जायला म्हणे १ तास लागतो, मग हॉटेलमधुन एका गेट्वरुन दुसर्‍या भलत्याच गेटवर सकाळी ६ ला पोहचायचं कसं? असे एक ना दोन, हजार प्रश्न पडले..

म्हणलं मारो गोली.. जे हॉटेल बेस्ट,त्याच्या जवळचा झोन बेस्ट..म्हणुन चांगल्या हॉटेलवर लक्ष केंद्रित केलं. [१]

एम्.पी टुरीझमची कान्हा मधली हॉटेल्स [२] म्हणे अगदी जंगलात आहेत. पण अर्थातच त्यांचे दर सुद्धा तेवढेच भारी आहेत. शिवाय दिवाळीमुळे त्यांनी काही % ने सरसकट रेट्स वाढवले होतेच. आणि ह्यावर टॅक्स..त्यामुळे त्याच्या नादी लागणे शक्य नव्हतं.

मुबा हे नाव कायम लिस्ट मध्ये [३] सगळ्यात वर सापडायचं.म्हणुन मग त्यांना आणि इतर ४-५ हॉटेल्सना मेल टाकुन ठेवला. सगळीकडे साधारण रेट्स सारखेच होते.पण मुबाची मज्जा म्हणजे तिथे "मडहाऊस" होतं. ज्यात ४ माणसं राहु शकत होती. आणि किंमत मात्र साधारण बाकी खोल्यां एवढीच (ज्यात २ माणसं राहु शकतात). मग काय २ मडहाऊन बुक करुन टाकले. आणि लगेच घरी जाऊन "आपण जंगलात चाललोय..उगा भारी हॉटेल सारख्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत. उलट साधेपणानी रहाण्यात जास्त मजाय. जंगलात जाऊन झोपडीत राहु.. कसलं भारी" असं ब्रेन वॉशिंग सुरु केलं.

मुबाला मी पहिला कॉल केला ते ऑनलाईन बुकिंग कसं करावं म्हणुन. मी बुकिंग करत असताना इतके प्रश्न फॉर्ममध्ये दिसल्यावर मी जरा गांगरुन गेले होते. शिवाय सिझन मध्ये सफारी हवी असल्याने काही तासातच सफारी संपत आल्या.
म्हणुन मी गडबडीने मुबाच्या - जुनैदला कॉल केला. तो भला माणुस रेल्वे मध्ये होता, तरी त्यानी मला डीटेल मध्ये सर्व काही सांगितले. मी जर त्या दिवशी बुकिंग नसतं केले तर मला सगळाच प्लान गुंडाळावा लागला असता कारण दुसर्‍या दिवशी अजुन एखादी सफारी बुक करावी म्हणुन मी साईट वर गेले तर सर्व काही सोल्ड आउट.. [४]

पुढे मी जुनैदला १०० तरी कॉल केले.. हवामान कसय.. रस्ते कसेत..जबलपुरला कसं जाऊ.. लहान मुलांना खायला आहे का तुमच्याकडे.. तुमचं स्वयंपाकघर वापरू द्याल का????
प्रत्येक वेळेस त्यानी मला सविस्तर उत्तरं दिली आणि दर वेळी शेवटी हे आवर्जुन म्हणाला की "तुम्ही या तर.. तुम्हाला अगदी घरात असल्या सारखं वाटेल.. मुलांची काळजी करु नका.." ह्यातला शब्द न शब्द खरा झाला...

पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे आम्ही पुण्यातुन निघालो.नागपुरात पोहोचल्यावर गाडी (विदाऊट कॅरिअर!!) हजर होतीच.. काय वाट्टेल ते केलं तरी एवढं सामान आणि माणसं ८-१० तास आत कोंबता येणार नाहीत हे कळुन चुकलं. (लोकांनी घरदार कान्हाला पर्मनंट शिफ्ट करत असल्या सारखं सामान घेतलं होतं). आधी गाडी शहरात नेऊन कॅरिअर लावुन आणणे भाग होते. तोवर गपगुमान मराठी माणसं नागपुरात पंजाबी जेवण जेवली. (ते सगळी कडे मिळतं). गाडी आली. क्वालिस मध्ये ड्रायव्हर सकट ९ जण कोंबले.पोरांना अंगाखांद्यावर नाचवत (कारण बाकी कुठेच जागा नव्हती) आणि माणशी १ अशा १० बॅगा क्वालिसच्या डोक्यावर बांधुन नागपुर मधुन आमची वरात दुपारी ४ ला निघाली.

१० व्या मिनिटाला लोक्स पश्चातपाच्या आगीत आणि नागपुरी उकाड्यात होरपळुन निघाले. काय ते रस्ते.. अहाहा!! पुढचे अखंड १० तास आम्ही घसळुन घुसळुन निघालो.. मध्यप्रदेश तर सुड आहे नुसता सुड.. अत्यंत दळभद्री रस्ते, रहदारी फारशी नाहीच्..दुकानं, हॉटेल सोडा चहाची टपरी पण दिसेना.. रात्र झालेली.. अधुन मधुन काही घरं दिसायची.. तिथे मात्र दिवाळीची जोरदार रोषणाई केलेली. प्रत्येक घरा समोर शेणाचं काही तरी बनवुन त्याची पुजा केलेली.

Diwali

आम्ही मात्र हे काही एंजॉय करण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो. सोबत घेतलेला निम्मा फराळ संपवलेला. अबीरनी रडुन रडुन गोंधळ घातलेला. सगळे जण मोठे गाव म्हणुन बालाघाटची वाट पहात होते. पण तिथे पोहचल्यावरही सगळे काही बंद झालेले. रात्रीचे ९.३० झालेले पण सगळीकडे सामसुम.. कसंबसं एक हॉटेल शोधलं, वरण भात मिळवला आणि पोरांना खाऊ घातला.. झालं आता फार तर १-२ तास आणि पोहचुच आपण अशी मनाची समजुत घालत डोळे मिटुन घेतले..

..अचानक खाडकन डोळे उघडले.. गेले मागचे १७ वर्ष गाडी अंधार्या, खडबडीत रस्त्यांवर पळतेच आहे असं फिलिंग आलं.. पोरं कधीच झोपुन गेली होती..पाय बधीर झालेले..सगळे झोपलेले..बाबा, नवरा, दादा आणि (मुख्य म्हणजे) डायवरकाका फक्त जागे होते आणि माझ्याकडे खाऊ की गिळु नजरेनी पहात होते.जंगलातुन गाडी जातच होती.. जातच होती..पण हॉटेल सोडा, साधं कुत्र पण दिसेना..
मी चुकुन विचारलं..."किती वाजले? " (विनाशकाले विपरीत बुद्धी...)
दादानी मोठठा सुस्कारा सोडुन सांगितलं..."एक.."
"काय???? एक?????" अज्ञानाच्या सुखात झोपी गेलेले टक्क जागे झाले...नशीब पोरांना अजुन आपण गाडीतच आहोत हे झोपेत असल्यामुळे समजलं नव्हतं..

परत मुबाला कॉल लावला..दादा म्ह्णे "सांग त्यांना.. अजुन १० मिनिटांनी आता हिमालय सुरु होईल.." बस्स..तेवढंच पुरेसं होतं..लोक्स वेडेच झाले..अक्षरशः डोळ्यातुन घळाघळा पाणी येइस्तोवर हसायला लागले.. (ह्याला म्हणतात अति झालं न हसु आलं..)आम्हाला दुनियेतली सगळी हॉटेल्स दिसु लागली पण मुबा दिसेना..बर्‍याच गोंधळातुन शेवटी एकदाचं मुबा आलं..म्हणजे एक मोठं गेट ,एक गोठा आणि एक वॉचमनची रुम दिसली..! गेट मधुन आता गेलो की परत जंगल सुरू, हॉटेल बिटेल कुछ नही..
"आता हे आत गेल्यावर पुरूषांना खोल्या सारवायला आणि बायकांना भाकर्‍या बडवायला घ्या म्हणणार" गोठा आणि एकंदरीत रागरंग पाहुन आईनी अंदाज बांधला..
पुन्हा भुकेले, पेंगुळलेले, पहाटे ४ पासुन प्रवासात असलेले, वैतागलेले लोक धो धो हसायला लागले..

काही कळत नव्हतं काय चाललय.. लोक वेड लागल्या सारखे हसत होते.. रात्रीचे २ वाजत आलेले..नुसतीच गाडी आत आली..पण अंधारात काही कळेना..शेवटी गाडी एका कमानीपाशी थांबली. काही लोक आमच्या साठी उभे होते.
आत गेलो..पहिला धक्का.. मुबा हे नुसते हॉटेल नसुन एक मिनी जंगल आहे.. आत छोटा ओढा लागतो.. त्यावर छोटे छोटे पुल आहेत.. दाट झाडं आहेत.. गवतीचहाची पुरुषभर उंचीची झाडं सगळी कडे लावली आहेत.. वर काळकुट्ट आकाश.. आकाशाचा खरा रंग असा असतो हे मला पहिल्यांदा कळालं.. डब्यातली साखर सांडावी तसे तारे सांड्ले होते अक्षरशः..

हे मुबाचे पहीले दर्शन..

Muba 1

Muba 2

मला थोडं बरं वाटलं.. म्हणलं खरच हे हॉटेल बेक्कार निघालं असतं तर माझी खैर नव्हती.. तरी मडहाऊस कसं असेल ह्याची धाकधुक होतीच.. हे मडहाऊस..

Mudhouse

आणि हा त्या समोरचा मुख्य हॉटेल कडे जाण्याचा रस्ता..
Mudhouse 2

मडहाऊस चक्क अप्रतीम निघालं. बाहेरुन मातीनी सारवलेलं पण आतुन अटॅच बाथरुम, दगडी बांधकाम असणारं, कन्सिल्ड वायरंगचं, कंदिलामध्ये बल्ब लावुन झोपडीचा फील देणारं, अंगण आणि तुळशी व्रुदांवनाचं, बाकी हॉटेलपेक्षा थोडसं बाजुला, हॉटेलमधुन येताना छोटासा ओढा आणि त्यावरचा पुल ओलांडुन याव लागेल असं.. मडहाऊस..!!
रचना गावतल्या घरा सारखी पण सुविधा सगळ्या..मोठे बेड आणि स्वच्छ ब्लॅकेट्स.. थुई थुई नाचुन घेतलं..जंगलात असल्या घरात रहायचं म्हणजे स्वर्गच हो..

मुबा ही ५५ एकर वरील प्रॉपर्टी आहे. इथे सफारी व्यतिरिक्त तुम्ही खुप काही करु शकता. जंगल ट्रेल म्हणुन आजुबाजुच्या जंगलात (जे कोअर जंगलात येत नाही) फिरु शकता. जवळच एक छोटेसे तळे आहे..शेकोटीसाठि सारवुन घेतलेली खास जागा आहे.. एका रुम मध्ये खेळण्यासाठी टेबल टेनिस आणि बिलिअर्ड आहे..

पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इथले अत्यंत रुचकर जेवण.. तुम्ही इथे जेवणाच्या वेळेची अक्षरशः वाट पहाता. जंगलात असल्याने इथे मर्यादित गोष्टी मिळतात. आणि जबलपुर जवळ असल्याने जेवणात बटाटा असतोच असतो. पण मसालेच इतके फ्रेश घालतात की सकाळ संध्याकाळ जरी बटाटा दिला तरी काही फरक पडणार नाही. हे खरय की जेवणाचा पॅटर्न एकच आहे त्यामुळे ४ दिवस कुणा कुणाला कंटाळा येउ शकतो. पण मुळात तुम्ही कुठे आहात याच जरासं भान ठेवलं की तुम्हाला जंगल जास्त अनुभवता येतं. काही लोकांना जंगलाच्या नीरव शांतते पेक्षा जोर जोरात गाणी लावणे, गप्पा मारणे जास्त आनंददायी वाटत होते. त्यांना जेवणातही मोठ्या हॉटेल सारखा पंजाबी मेन्यु हवा होता. आम्हाला इतक्या सुंदर जंगलात कुणी इतक्या प्रेमानी चविष्ट, गरम गरम आणि ताजं जेवण खाऊ घालतय ह्यात आनंद होता.. एक तर जंगलातली गुलाबी थंडी, मोकळी स्वच्छ हवा, मोबाईलचे नेटवर्क नाही की टिव्ही नाही, भल्या पहाटे उठुन रात्री लवकर दमुन झोपणे यामुळे की काय, पण सगळच सुंदर वाटत होतं..

असाच एकदा रंगलेला सारीपाटाचा डाव
Saaripat

मुबाची खरी श्रीमंती आहेत इथली माणसं.. १-२ गोष्टी इकडे तिकडे झाल्याही असतील, पण ह्या माणसांनी आम्हाला ते जाणवु दिलच नाही.ती भली माणसं रात्री २ पर्यंत आमच्या साठी जागली, नुसतीच नाही जागली.. गरम गरम जेवणं वाढण्यासाठी जागली..आम्ही फक्त जेवण ठेवा एवढच संगितलं होतं. ते गरम असेल आणि ताटात वाढुन मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे सुखावुन चार घास जास्त जेवलो.आपल्याला झोपण्यासाठी रात्री २ ही वेळ नक्कीच विषेश नाही, पण ही माणसं सकाळी ३ ला उठतात आणि ५.३० ला निघणार्‍या सफार्‍यांसाठी सोबत नाश्ता पाठवतात हे कळाल्यावर आमच्या साठी २ पर्यंत जागणे निश्चित खुप होते. चार दिवसात आम्हाला एकदाही तक्रारीला वाव दिला नाही ह्या लोकांनी. जिथे गप्पा मारत बसलो असु तिथे गवती चहा घातलेला गरम वाफाळता चहा घेऊन येणार.. जवळच मस्त पै़की शेकोटी पेटवुन देणार.. सकाळी ५.३० ला उठवायला येणार (सफारीला उशीर होऊ नये म्हणुन..), सोबत भरगच्च नाश्ता पाठवणार.. आणि बोलणं सुद्धा अदबशीर.. लोचट नाही की अति गोगोड्ड नाही.. ह्यांच्यामुळे मुबा कायम स्मरणात राहील..

मुबाच्या आजुबाजुची स्थानिक लोकांची घरं
House 1

House 2

२२ तास झाले होते घराबाहेर पडुन.. खुप मोठा प्रवास झाला होता.. रात्री २.३० ला पाठ टेकली खरी पण ५.३० ला लगेच उठायचही होतं.. लोक्स एवढे दमले होते.. क्षणभर वाटुन गेलं.. कुणी उठेल का सफारी साठी?..पण मला खात्री होती.. लोक्स ५.३० च्या ठोक्याला उठणार.. "स - फा - री" ह्या जादुई शब्दासाठी उठणार..

आणि न जाणो..आत्ता या क्षणी बाजुच्या जंगलामध्ये तो त्याचे भेदक डोळे रोखुन उभा असेल..आपली वाट पहात..!

pugmark

तळटीपा:-

१. तुमचं बुकिंग कोणत्याही गेटच असलं तरीही तुम्ही कोणत्याही गेट मधुन आत जाऊ शकता. जंगलातल्या जंगलात मग तुम्ही ३०-४० किमी अंतर कापुन ज्या झोनच बुकिंग आहे त्या झोन मध्ये जाऊ शकता. त्यामुळे वेळ वाया न जाता तुम्हाला जंगलात फिरायला मिळतं

२. कान्हा मधले हॉटेल्स

३. एम्.पी टुरीझमची कान्हा मधली हॉटेल्स

४. सफारींची संख्या अत्यंत कमी असते. आणि दिवाळी सारख्या सुट्टीच्या सिझनमुळे धडाधड बुकिंग होते. ऑनलाईन व्यतिरिक्त तुम्ही सफारीच्या दिवशी ऑन द स्पॉट तिकीट मिळवु शकता पण ते खरच खुप कठिण आहे. आणि एवढ्या लांब जाऊन असा दैवावर हवाला ठेवण्यात काही अर्थ नाही. अर्थात काही लोक इतके लकी होते की सहज म्हणुन सकाळी लवकर गेले, असं ऑन द स्पॉट तिकीट मिळाले म्हणुन अचानक सफारीला गेले आणि नुसता वाघ नाही तर वाघीण आणि एकेमेकांशी मस्ती करणारे त्यांचे बच्चे तासभर पाहुन आले.

५. वरील सर्व फोटो माझी बहीण,नवरा,वहीनी आणि दादा ह्यांनी काढले आहेत.

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

17 Jan 2014 - 4:22 pm | सौंदाळा

मस्त असणारच,
आधी प्रतिक्रिया मग वाचन ;)

जेपी's picture

17 Jan 2014 - 4:31 pm | जेपी

हा भाग पण मस्त .

मदनबाण's picture

17 Jan 2014 - 4:38 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :) हे असं मलापण अनुभवता यावे असे वाटु लागले आहे.

कपिलमुनी's picture

17 Jan 2014 - 4:45 pm | कपिलमुनी

कान्हा ला जायचा सोयीचा मार्ग कोणता ?

पिलीयन रायडर's picture

17 Jan 2014 - 5:04 pm | पिलीयन रायडर

आमच्या सोबत ८ मोठे आणि २ पिल्लं असल्याने आमच्या तर्हे तर्हेच्या अडचणी होत्या. म्हणुन आम्ही फार द्राविडी प्राणायाम करुन गेलो. पण एकंदरीत माझ्या मते खालील मार्ग सोयीस्कर आहेत (हे मी फक्त मुक्की गेट साठी लिहीतेय. किसली गेट साठी बहुदा सिवनी वरुन जाणे सोयीस्कर आहे. )
१. पुणे / मुंबई - नागपुर (व्हाया रेल्वे) - भंडारा - गोंदिया - बाला घाट - परसवाडा - बैहर - कान्हा (परतीच्या वेळेस आम्ही ह्या रोडने आलो. मधला थोडासा पॅच सोडला तर खुप चांगला रोड आहे)
२. जबलपुर - कान्हा हा रोड उत्तम आहे असं म्हणतात. जबलपुरची कनेक्टीव्हीटी सुद्धा उत्तम आहे.

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 7:05 pm | बॅटमॅन

समजा नागपूर बेस केला तर किती वेळ लागेल? नागपूर ते कान्हा?

पिलीयन रायडर's picture

18 Jan 2014 - 12:30 pm | पिलीयन रायडर

नागपुर ते कान्हा साधारण ३०० किमी आहे.पण रस्ते खुप खराब असल्याने फार वेळ लागतो.आम्ही कदाचित चुकीचा रूट निवडला असेल ,ते थोडं अजुन एक्स्प्लोअर करायला हवं. येताना आम्ही रामटेक वरुन आलो तो रस्ता उत्तम होता. खर तर आधी आमचा प्लान नागपुर - जबलपुर (NH7) हायवेने जायचा होता. आम्हाला वाटलं की हायवे असल्याने सुपर स्पीड्नी पोहचु. आणि तिथे रात्री ट्रॅव्हलनी प्रवास करता येतो. पण जेव्हा खुराना ट्रॅव्हल्सला फोन केला तेव्हा समजलं की पावसामुळे हायवे इतका खराब झाला आहे की खाजगी गाड्या बंद केल्या आहेत ट्रॅव्हल्सवाल्यांनी. तेव्हाच आम्हाला जरा धाक्धुक वाटायला लागली होती.

नागपुरला मुक्काम केला तरी उत्तमच, मी जर पुन्हा गेले तर मी जबलपुरला रेल्वेनी जाईन आणि जबलपुर - कान्हा (१५० किमी) रस्ता निवडेन. कारण त्याची स्थिती उत्तम आहे असं ऐकलय. आणि मी जबलपुरला एक मुक्काम करेन. जबलपुर जवळ "भेडाघाट" आहे (~२० किमी).
तिथे नर्मदेच्या तीरावर संगमरवर तयार झालाय (मार्बल रॉक्स).शिवाय मार्बल रॉक्स पाशी रोपवे सुद्धा आहे.

Marble Rocks

एक मोठा धबधबा (धुवांधार) आहे.

Dhuvadhaar

चौसठ योगिनी मंदिर

Chaushath Yogini Temple

एम्.पी टुरीझम आणि "जबलपुर टुरीझम" इथे आणि सगळी माहिती मिळेल. MPTDC चे "मार्बल रॉक्स" हे हॉटेल बरेच फेमस आहे. मुळात भेडाघाटला २ च हॉटेल मला सापडले. :- मार्बल रॉक्स आणि "हॉटेल रिव्हर व्ह्यु" (हे जरा स्वस्त पण साधं हॉटेल आहे.) खरतर जबलपुरला पुष्कळ हॉटेल्स आहेत, भेडाघाटला मुक्कामाची गरज नाही. पण भेडाघाटची हॉटेल्स ही अगदी नदीकिनारी आहेत असं ऐकलय.

ह्या प्लानचा एक प्रॉब्लेम असाय की रेल्वे प्रवासामुळे बराच वेळ वाया जातो. पुणे- जबलपुर विमान तिकीट खुप महाग पडेल. म्हणुन मग आम्ही नागपुरला विमानानी जाणे असा मधला मार्ग काढला. आणि मध्यप्रदेशच्या रस्त्यांचा धसका घेऊन जबलपुर कॅन्सल केलं!!

खर तर पुणे - नागपुर - कान्हा हा सलग प्रवास हेक्टिक आहेच. (मुलांसकट तर खुपच) त्या ऐवजी नागपुरला मुक्काम खरच चांगला पर्याय आहे. (आमच्या इतर काही प्लानमुळे आम्हाला तस ब्रेक घेता आला नव्हता.)

~ वरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन घेतलेली आहेत ~

मुक्त विहारि's picture

17 Jan 2014 - 4:45 pm | मुक्त विहारि

मस्त

वाचत आहे.

प्यारे१'s picture

17 Jan 2014 - 4:59 pm | प्यारे१

वाचतोय!
येऊ द्या.

कंजूस's picture

17 Jan 2014 - 5:04 pm | कंजूस

उत्सुकता वाढलीय .

प्रचेतस's picture

17 Jan 2014 - 5:06 pm | प्रचेतस

मस्त लेखन.

सुज्ञ माणुस's picture

17 Jan 2014 - 5:07 pm | सुज्ञ माणुस

हा पण भाग मस्त!
शेवटचे वाक्य >> ओहोहो कमाल !

विस्तृत माहिती!

रेवती's picture

17 Jan 2014 - 6:41 pm | रेवती

चांगली माहिती.

श्रीमत's picture

17 Jan 2014 - 6:44 pm | श्रीमत

मस्त चालली आहे सफारी...
पण नगपुरच्या रस्त्या बद्दल फक्त "अहाहा!!" एवढच :(

इन्दुसुता's picture

17 Jan 2014 - 9:07 pm | इन्दुसुता

हा भागही आवडला.
आता ज्या सफारी केल्या त्यात काय बघायला मिळाले त्याबद्दल उत्सुकता आहे.
"त्या"च्याशी नजरभेट झाली की नाही?

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Jan 2014 - 9:27 pm | लॉरी टांगटूंगकर

उत्तम प्रवास चाललाय!! वर्णन शैली खासच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2014 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिहिण्याची शैली छान खुसखुशीत आहे ! पुभाप्र.

सखी's picture

17 Jan 2014 - 11:14 pm | सखी

मस्त होतीय लेखमाला, त्या लोकांनी खरच रात्री २ वाजता जेवायला वाढल्याबद्दल कौतुक वाटतयं त्यांच. नागपूर+मध्याप्रदेशातले रस्ते खूप चांगले असायचे असे ऐकले होते त्याल तडा गेला म्हणायचा. अबीरला घेऊन इतक्या लांबचा प्रवास करायची तुमची डेरींग भारीच :) माझ्या मुलगा अमेरीका-जर्मनी-मुबंई अशा विमानप्रवासात इतका वैतागला होता, की त्याला झोपपण येत नव्हती, त्यामुळे मलाही झोपून नाही दिले त्याने.

अर्धवटराव's picture

17 Jan 2014 - 11:46 pm | अर्धवटराव

खुप आवडेश.
पुढील भागाची उत्सुकतेने वाट बघतोय.

अवांतरः नागपूरच्या रस्त्यांची चांगल्या अर्थाने बरीच तारीफ ऐकली होती... तुमचा अनुभव नेमका उलटा म्हणायचा.

प्रीत-मोहर's picture

18 Jan 2014 - 10:42 am | प्रीत-मोहर

हा भागही ऑसम पिरा. पुढचा भाग लवकर आनेदो.

पिलीयन रायडर's picture

18 Jan 2014 - 11:53 am | पिलीयन रायडर

नागपुरच्या रस्त्यांबद्दल थोडं :-
मी जे वर्णन केलं आहे ते नागपुर शहरातील रस्ते नसुन, नागपुर मधुन भंडार्‍याकडे जाताना लागणार्‍या रस्त्याबद्दल आहे. तिथे बहुदा फ्लायओव्हर बांधायचे काम चालु असुन रस्ते खुप खराब झाले आहेत. एकंदरीतच भंडारा -गोंदिया-तुमसर-बालाघट-बैहर हा रस्ता फार वाईट होता. मध्यप्रदेश मधले रस्ते विषेश करुन वाईट आहेत हे पुढेही आम्हाला जाणवले. पण येताना जो रुट आम्ही घेतला तो मात्र बराच सुसह्य होता. त्याविषयी मी पुढील भागात टाकेनच.

हो, मात्र नागपुर शहरातले रस्ते चांगले मोठे आणि प्रशस्त आहेत हे मात्र नक्की. मी एका चौकात गेले होते (बहुदा मेडिकल चौक की कायससा..) तिथे सरकारी हॉस्पिटल आहे अणि मयताचे सामन विकले जाते (!) .. तो चौक भलताच मोठा आहे.. चौक कसला.. तिथे ६ मोठे रस्ते येऊन मिळतात. त्यामानाने रहदारी कमी वाटली मला. नागपुर विषयीपण थोडेसे लिहीनच..

गजानन५९'s picture

18 Jan 2014 - 12:17 pm | गजानन५९

उपयुक्त माहिती

अवांतर :- तुमचा ट्रीप अँडवयजर वरील रिव्यू पण वाचला मस्त होता.

श्रीमत's picture

20 Jan 2014 - 4:08 pm | श्रीमत

हो बरोबर तो मेडिकल चौक...तिथे मोठे सरकारी हॉस्पिटल आहे.
कान्हा ला जायला नागपूर - मनसर (* रामटेक) हा मार्ग जरा बरा आहे.
नागपूर - मनसर हा रस्ता नविन आहे किवा अजून काम पण चालू असेल रत्त्याच.
* मनसर-रामटेक अंदाजे 17Km
राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते.त्यामुळे एतेहसिक महत्व असलेले हे रामटेक गडमंदिर अंदाजे 600 वर्षे जुने आहे रामटेक गडमंदिर परिसरात (आपण जिथे गाडी पार्क करतो तिथे तिथून जवळच ) कालिदास स्मारक पण आहे. 'शाकुंतल'. हे काव्य याच परिसरात लिहिले आहे.

पिलीयन रायडर's picture

20 Jan 2014 - 4:15 pm | पिलीयन रायडर

हो.. रामटेक बद्दलही लिहीणार आहेच मी..

म्हैस's picture

21 Jan 2014 - 10:13 am | म्हैस

wow ................................ ठरलं. कान्हाला जायचं.
पण जाण्यासाठी बेस्ट सीजन कोणता आहे? दिवाळीत फारच थंडी असते MP मध्ये :-(

पिलीयन रायडर's picture

21 Jan 2014 - 11:46 am | पिलीयन रायडर

थंडी होती..पण जंगलात उलट खुप छान वाटलं.. इथे जेव्हा थंडी वाढते तेव्हा लगेच माझ्या मुलाची त्वचा तडतडते आणि सर्दीही होऊ शकते. पण कान्हात मात्र त्याला ह्यापैकी काही त्रास झाला नाही. अगदी हेल्दी थंडी होती.. हाडं गोठवणारी नाही..

पैसा's picture

24 Jan 2014 - 8:13 pm | पैसा

हा पण भाग मस्त!