वास्तविक शेअर मार्केट हा सगळ्यांचा वादाचा, समज - गैरसमजाचा असा विषय आहे. पण मला कळलेले मार्केट (जे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार कारण ते चक्रधर स्वामींच्या दृष्टांतासारखे आहे. )थोडेसे असे की ज्यात दोन प्रकारचे पैसे कमावण्याचे मार्ग लोक ढोबळपणे अवलंबतात.
अत्यंत किचकट ट्रेडिंग प्रणाली पासून लांब राहून मी माझे काही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे साधे प्रयोग केले ते हि मांडतो आहे.
तर
१) गुंतवणूक योग्य मार्केट २) ट्रेडिंग योग्य मार्केट.
दोन्ही पद्धतीच्या मार्केट मध्ये अभ्यास हा अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा मी बाजारात जाऊन वांगी घेऊन येतो तेव्हा ती खराब निघतात आणि बायको बदडून काढून माझ्या पाठीचे भरीत करते. आता तुम्ही म्हणाल की बाजारात वांगी खरेदी करणे आणि एखादा शेअर खरेदी करणे सारखेच का? तर मी म्हणेन होय कारण इथे सुद्धा दोघे आहेत एक विकणारा आणि एक घेणारा. आता घेणारा जर मी असेन जो फारसा कधीही बाजारात जाऊन भाजी घेत नाही आणि घेणारी माझी बायको असेल जी रोज बाजारात जाऊन भाजी खरेदी करते तर विकणारा जो एकाच जागी कित्येक वर्ष बसून भाजी विकतोय तो तुम्हाला लगेच ओळखतो की हा बकरा चांगला आहे आणि त्याची ना खपणारी वस्तू तो तुमच्या गळ्यात मारतो पण बायको हा प्राणी जगात फार हुशार असतो (ती नावारासुद्धा एका नजरेत जोखते हो !)ती भाजी बरोबर पाहून, भाव करून घेते मी भाजीवालीकडे पाहून(हे फार महत्वाचे आहे बरे का!) भाजी घेतो. थोडक्यात मी ज्या चुका तिथे करतो त्याच सर्वत्र करत फिरत असतो त्याला अपवाद एकाच प्रांताचा ज्या प्रांतात मी मुरलेलो आहे. तिथे मला कुणी फसवू शकत नाही (आणि इथे सगळे क्रेडीट मला बर का. आणि तिथे मात्र भाजीवालीने फसवले हो...हल्लीचे भाजीवाले...आणि स्वातंत्रपूर्व काळात वगैरे गप्पा मारायला मी मोकळा ) तर जी गत भाजीवालीकडे तीच शेअर मार्केटमध्ये. कुणीतरी मला सांगितले हॉट टीप आहे आणि मी घेतले शेअर्स आणि नंतर आपटला की हो शेअर!! झाले मग मार्केट कसे वाईट माणूस कसा फसतो जु गा र आहे जू गा र ..वगैरे वगैरे
मग मार्केट मध्ये टीप येते ती हॉट असते तरी मला का मिळत नाहीत पैसे : - ह्याचे विवेचन नको का करायला. मुळात टिप्स ह्या ब्रोकर,ओपेरेटर (च्यायला म्हणजे काय आणि नवीन ?!!) जनरेटेड असतात. म्हणजे मार्केट जर कंपनीच्या आर्थिक निकषांवर चालत असते तर त्यात चढ उतार (आणि आपल्याकडे जरा जास्तच चढ उतार) आलेच नसते किंवा फारतर जेव्हा कंपन्याचे आर्थिक निकाल जाहीर होतात तेव्हाच ते चढ उतार झाले
असते. मग हे गुजराती (पिढ्यानपिढ्या) कमावतील कसे ?
मग एखादा शेअर जमा करून ठेवायचा असेल तर मार्केटमध्ये वाईट बातमी सोडायची ती बातमी पूर्वी कर्णोपकर्णी पसरत असे आता सी एन बी सी आणि तत्सम तज्ञ आहेत ते करायला तर आपण कुठे होतो हं वाईट बातमी सोडायची आणि सामान्य माणसाला शेअर्स विका म्हणून सांगायचे (मग त्यांनी विकले ते घेतात कोण?) जेणे करून शेअर्स गडगडले पाहिजेत आता हे गडगडणारे शेअर्स एकट्याने घेणे शक्य नाही मग ग्रुप करून विकत घ्यायचे (इथे हि अनेक प्रकार आहेत) आणि आपला पूर्ण पैसा त्यात लागला की मार्केट मध्ये चागल्या बातम्या सोडायच्या आणि खरेदी करा म्हणून सांगायचे हे करत असतानाही त्यांची गणिते असतात म्हणजे किती रुपये किती काळ गुंतून पडणार आहेत त्यावर किती व्याज मला द्यावे लागणार आहे त्यानुसार शेअरचा भाव ठरलेला असतो त्या भावापर्यंत शेअर पळवत नेला कि लोकांनाही त्या शेअरबद्दल विश्वास निर्माण होतो आणि जिथे हि मंडळी बाहेर पडणार तिथे तुम्ही आम्ही आत जाण्यासाठी धडपडतो.
ह्या सगळ्यांचे प्रतिबिंब ग्राफ्सद्वारे मांडले जाते पण पडद्यामागचे खेळ सामान्य लोकांपुढे न ठेवता त्याला सपोर्ट-रेझिस्टन्स अशी नावे दिली जातात आणि आणखीन गुंगवले जाते.
हे सगळे अतिशय जवळून पाहिले असल्याने आणि पार मार्केट रिंग मध्ये काम केल्याने हे खेळ करणाऱ्याबद्दल मनात राग ठासून भरलेला आहे.(निधड्या छातीचा मराठी मुठी आवळणे आणि रागावणे हेच करू शकतो) पण सर्व अर्थशास्त्र आणि अर्थ क्षेत्र हे मारवाड्यांच्या (होय गुजरात्यांच्यातर अजीबात नाही )हातात का आहे? त्यांच्याकडे पैसे आहेत रे ?आरे मग माझ्या कडे का नाहीत ? तीर्थारुपानी ठेवले नाहीत काय करणार ?आपल्या रक्तातच नाही काय करणार ? शेअर्स असोत कि मेटल असो किंवा रियल इस्टेट असो.सर्व मारवाड्यांच्या हातात.
पण त्यांच्यात राहून मी एक शिकलो कि आपण अभ्यास करतो ते हि अभ्यास करतात पण ते करतात तो वेगळा अभ्यास (ज्याच्या कडे मी काम केले तो तर मला हिणवून हिणवून सांगायचा तू बी कॉम मी आठवी जेमतेम पण मी बघ आणि तू बघ....पण त्यानेच बरेच हिंडवले मला मार्केटमध्ये अर्थ क्षेत्राची ओळख करून दिली वाणिज्य म्हणजे नुसतेच अकाउंटीग नाही रे हे मला शिकवले ) मी करतो ती खर्डेघाशी.
मग इकडचा लाडू तिकडे करताना पडणार्या पाकळ्या खाऊन जगलेल्या कैद्याची गोष्ट मला आठवते. तेव्हा आपणही तेच करायचे ठरवून मी ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्या दोघांची सांगड घातली.
इथे येऊन माझा प्रवास सुरु झाला की गुंतवणूक योग्य मार्केटमध्ये ट्रेडिंग योग्य मार्केटमधून पैसे कमवायचे आणि गुंतवत राहायचे. आता मी जी पद्धत अवलंबली त्यात पैसे हळू हळू मिळतात कारण मी ही मराठीच सुरक्षितता आधी.
मग नवीन नवीन सुरुवात करणार्यांसाठी कशी सुरवात करावी किती पैसे लावावेत ? हे प्रश्न येतात (वास्तविक लावावेत असे विचारल्यावर विचारणार्याची मानसिकता कळते कि आज तंगडी येणार कि बंगला ह्या पद्धतीने तो मार्केट कडे हि जुगार म्हणूनच बघतोय मग त्याला सांगावे लागते "बाला ! जल्ला कवरे लाऊ नाय रे कवरे गुंतवू म्हण हं ) तर त्यावर माझे उत्तर हे की तुझ्याकडचे पैसे १० वर्ष अडकून पडले तरी चालतील असे असतील तेवढे लाव किंवा भरपूर असतील तर तुझी उद्दिष्टे वगैरे ठरवून त्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने गुंतव.
तुमचे पैसे ठरले आता शेअर्स कोणते घेऊ? शेअरची निवड करण्याआधी सेक्टर, इंडस्ट्रीजवगैरे समजून घ्या म्हणजे फार्मा सेक्टर,बँक सेक्टर वगैरे नंतर त्यातल्या कंपनीज.
मला विचारले तर (म्हणजे होमियोपाथकडे जाऊन मी कुठली मुळी चोखाल्यावर बरे वाटेल हो....चुकतय हो ) मी म्हणेन बँक हा सेक्टर बेस्ट कारण तिथे जोखीम इतर कंपनींच्याबाबतीत असलेल्या जोखमीपेक्षा कमी असते. (मी फार ढोबळपणाने इथे हे लिहितोय ह्यावरचे विवेचन मी नंतर करीनच ). पण एखादा माणूस फार्मा सेक्टर मध्येच कामाला असेल किंवा ज्या सेक्टर मध्ये कामाला असेल त्याच सेक्टरचा विचार त्याने करावा कारण त्याला त्यात अधिक माहिती असण्याचा संभव आहे. मी वाणिज्य म्हणजे व्यापार करणार आणि व्यापाराच्या खेळात लहान असल्यापासून बँक बनून बाजूला बसणेच आवडत आले आहे.(दुसर्या शब्दात महाआळशी प्राणी )
आता एखादी बँक ठरली तर थोडा अभ्यास करा कसला ? किमतीतले चढ उतार कमीत कमी गेल्या ३ महिन्यांचे आणि.......
१) जर १० शेअर्स घेणार असाल तर २ च घ्या आणि हळू हळू घेत १० पूर्ण करा आणि लिहून ठेवा कितीला पडले ते म्हणजे ब्रोकरेज वगैरे सगळे मिळवून उदा. रु. १०० ला एखादा शेअर घेतला तर १००*१० = १०००/- आता ह्यच्या १०% शेअर्स सरळ डीमेट करा म्हणजे ९ राहिले आता १०००/९ = १११ भाव आल्यावर तुम्ही ९ शेअर्स पूर्ण विकून टाका जमलेला १ शेअर तुमच्याकडे नाहीच असे समजून डीमेटला पडला राहू देत जेव्हा जेव्हा डीमेट स्टेटमेन्ट येईल तेव्हा तो त्यातला फक्त आणि फक्त प्रोफीटच दाखवेल. जर भाव १११ आलाच नाही तर...तर तुमचा अभ्यास कमी पडतोय. अभ्यास वाढवा हेच त्याला उत्तर आहे. आणि जरी १११ ला भाव नाही गेला तरी शेअर्स लाभांश देईलच म्हणून थांबू शकता त्याचा दुष्परिणाम म्हणजे ट्रेडिंग बंद. (पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात......सुरु )
२) रोज एका बँकेचा एकाच शेअर घ्या त्यासाठी भाव पाहू नका, अभ्यास करू नका आणि वर्ष संपल्यावर किंवा चांगला परतावा मिळेल (३६% वर्षाला....मारवाडी म्हणतो )तेव्हा बाहेर पडा.
३) आता जानेवारी ते मे सुगीचा काळ आहे मिळणाऱ्या लाभांशावर नजर ठेऊन आणि आपले भांडवल लक्षात घेऊन थोडा अभ्यास करून लाभांश देणारे शेअर्स घ्या आणि येणारा लाभांश परत त्याच कंपनीत गुंतवत राहा. (माझा १४ वर्षाचा मुलगा हेच करतो आणि लाभांशाच्या रुपात पैसे पासबुकात वाढलेले दिसले कि जो आनंद मी त्याच्या चेहऱ्यावर पाहतो तो अवर्णनीय आहे.)
मला माहित आहे वरील लिखाण त्रोटक आहे.विस्तृत आता खाली प्रतिसादाद्वारे होईलच....
(ढिशक्लेमर : वरील लिखाण ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. प्रेमभंग झालेल्यांनी....म्हणजे मार्केट मध्ये पोळलेल्यानी लांब राहावे किंवा बोध घ्यावा )
प्रतिक्रिया
9 Dec 2013 - 2:40 pm | अव्यक्त
मी साधारण सन २००७ मध्ये शेअर मार्केट मध्ये माझ्या अल्पमतीप्रमाणे सदरहू गुंतवणूक केली आहे ती अश्शी….
SCRIP NAME BUY PRICE
GUJ ALKALIES AND CHEMICALS 134
HOTEL LEELA VENTURES LTD 35
INFOTECH ENTERPISES LTD 150
IGATE GLOBAL SOLUTIONS LTD 472
RANBAXY LABORATORIES LTD 420
RELIANCE CAPITAL LTD 412
RELIANCE INDUSTRIES LTD 873.25
RELIANCE POWER LTD 130
reliance power च्या ipo नंतर शेअरमार्केटकडे share मार्केट मधील मंदी मुळे दुर्लक्षच झाले ते आजतागायत… २००७ मध्ये जे शेअर खरेदी केले तेच शेअर आजपर्यंत घेवून बसलो आहे… तरी ह्यापुढे परत शेअर मार्केट मध्ये पुन्हा active होऊन तोटा नाही तरी कमीत कमी नफा कमवायचा आहे… महिना १००० Rs गुंतवणुक करून महिना काठी कमीत कमी नफा होयील अस्से shares मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन अपेक्षित आहे… त्याचप्रमाणे वरील नमुद केलेल्या shares पैकी कोणते shares काढावे व कोणते ठेवावे (with explainations) ह्याविषयी सुद्धा मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती… market मध्ये जुने न चालणारे shares काढून नवीन shares market मध्ये चालणारे भरायचे आहेत तरी विशेष मार्गदर्शन हवे आहे.
9 Dec 2013 - 3:34 pm | ज्ञानव
तुमच्याकडे किती शेअर्स आहेत माहित नाही पण जर प्रत्येक कंपनीचा १ च शेअर आहे असे गृहीत धरून ....
१)तुमची गुंतवणूक २६२५.२५ इतकी आहे. (त्यात
मी ३६% दरसाल इतकी वाढ असेल आणि त्यात एखादा आय गेट ग्लोबल सारखा ट्रेड बंद असलेला शेअर जरी असेल तरी विकून टाकेन. म्हणजे माझे तत्व प्रत्येक शेअर मागे किती नफा असे नसून गुंतवलेल्या भांडवलावर किती नफा हे आहे. तेव्हा ह्या विचाराने जायचे असल्यास तुम्ही एकदा ३६% मिळाल्यावर विकून टाकणे उत्तम आणि नफ्यातला लॉस लक्षात ना घेता नव्याने सुरु करणे आणि त्यात सातत्य ठेवणे चांगले....हे माझे मत आहे.
२)महिना रु. १००० गुंतवून कुठलीही बँक जी ९५-१०५ पर्यंत सध्या ट्रेड करते अगदी बेस्ट आय डी बी आय मध्ये गुंतवणूक करावी त्यासाठी तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन प्रश्नोत्तराच्या रूपाने घ्यावे (मी इथे टीप,विविक्षित शेअर ह्याबद्दल लिहिण्याच्या विरोधात आहे कारण मला पूर्ण अर्थाक्षेत्रावरचे लेख अपेक्षित आहेत आणि धंदेवाईक सल्ला हवा असेल तर फी लागेल असे म्हंटले तर मोहोळ उठेल नाही का?..असो.)पण गुंतवणूक करण्यासाठी आधी मॉक ट्रेडिंग शिकून घ्यावे आणि सर्व अभ्यास तसेच प्रत्यक्ष ट्रेड ह्यात सातत्य ठेवावे.
३) जे मुद्दे (१ आणि २) तुम्हाला समजले नाहीत त्याबद्दल सोदाहरण स्पष्टीकरण वेगळ्या धाग्यावर किंवा इथेच प्रतीसादामार्फत देईनच.
9 Dec 2013 - 11:44 pm | यसवायजी
नफ्यातला लॉस लक्षात ना घेता म्हणजे काय?
10 Dec 2013 - 8:01 am | ज्ञानव
अव्याक्तभाऊनी २००७ मध्ये गुंतवणूक केली आहे असे आज २०१३ मध्ये व्यक्त केले आहे. व्याजाचे हिशेब ज्याचे त्याचे वेगळे असतात. मी ३६% प्रतिवर्ष म्हंटले आहे त्याप्रमाणे गणित करता आज २०१३ ला एकूण भांडवलावर किती परतावा अपेक्षित आहे ? त्यात् ३६% चक्रवाढ व्याजाने वगैरे तर शक्यच नाही म्हणून एकूण गुंतवणुकीच्या ३६% एकदा आजच्या घडीला जरी मिळाले तरी तो टेक्निकली लॉसच आहे. म्हणून
12 Dec 2013 - 7:39 pm | ज्ञानव
तुमच्या एकूण पोर्ट-फ़ोलिओबद्दल मी बरोबर सांगितले कि नाही ते काही कळले नाही.
कारण मला सुधारणा करायला बरे पडेल जर काही गैर सांगितले असेल तर....
8 Mar 2014 - 11:01 pm | ज्ञानव
शेअर्सचे काय केले? विकले ठेवले वाढवले काहीतरी व्यक्त करा की
9 Dec 2013 - 2:43 pm | अव्यक्त
तुमचा एक आणि दोन क्रमांकाचा मुद्दा अगदी डोक्यावरून गेला. सन्धर्भसहित स्पष्टीकरण दिल्यास माझ्यासारखा सामान्य वाचकास त्याचा फायदाच होईल...तुर्तास धन्यवाद...
11 Dec 2013 - 11:00 am | ज्ञानव
उदाहरण : बँक ऑफ इंडिया
चढ उतार फरक (ज्याला स्प्रेड असे म्हणतात)
2०४.२५ (दिनांक २६.११.२०१३ रोजीची न्यूनतम पातळी )
२३२.०० (दिनांक ०९.१२.२०१३ रोजीची उच्चतम पातळी )
आता उच्चतम पातळी - न्यूनतम पातळी (२३२ - २०४.२५ = २७.७५)म्हणजे (१३.५८%)
माझे भांडवल २०४.२५ * १० = २०४२.५/-(ब्रोकरेज आणि इतर खर्च धरून समजा किंमत २०५* १० = २०५०/- )
१ शेअर मी माझा नफा म्हणून आधीच बाजूला काढून ठेवला म्हणजे आता मझ्याकडे ९ शेअर्स विक्रीयोग्य आहेत आणि माझे भांडवल २०४२.५ (किंवा २०५० )हे बाजारातून पुन्हा वसूल करणे आले तेव्हा २०४२.५ / ९ = २२६.९४ (किंवा २०५०/९ =२२७.७७) तर २२६.९४(किंवा २२७.७७) ह्या भावाला मी ९ शेअर्स विकून मोकळा होईन असा त्याचा अर्थ.
वरील उदाहरण हे शेअर्सची वृद्धी कशी करावी ह्या युद्धनीतीचा एक भाग आहे. त्यासाठी आवश्यक ते ज्ञान,शिस्त आणि मुख्य म्हणजे प्रगल्भता ह्या गोष्टी गुंतवणूकदाराकडे आहेतच असे गृहीत धरले आहे.
जर मार्केट तेव्हडे वर गेलेच नाही तर ?तुम्ही म्हणता तसेच कसे होईल? ई किंवा तत्सम प्रश्न ज्यांना पडतात त्यांनी आणि ज्यांना आपले अपयश माझ्यासारख्या मार्केट - भक्तावर फोडायची सवय आहे त्यांनी मार्केटपासून लांबच राहावे हे माझे प्रामाणिक मत आहे.
9 Dec 2013 - 4:26 pm | मुक्त विहारि
पुढल्या लेखाच्य प्रतिक्षेत.
9 Dec 2013 - 9:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
कोणीतरी सांगत होते कि सलग ६५ महिने NSC काढा म्हणजे पेन्शनची सोय होईल...असे काही आहे काय?
9 Dec 2013 - 9:52 pm | ज्ञानव
9 Dec 2013 - 10:15 pm | आनंदराव
प्रथम ज्ञानाव यांचे आभार कि त्यांनी हा विषय निवडला .
मी स्वतः २००६ पासून मार्केट मध्ये गुंतवणूक करतो अहे. माझी पण थोड्याफार प्रमाणात अव्यक्त प्रमाणेच परिस्थिती झाली होती . पण मी निराश न होता मला जसे जमेल तसा मार्केट चा अभ्यास केला आणि करतो अहे.
माझ्या अल्प अनुभव नुसार मी असे सांगेन कि इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा या मध्ये पैसे कमावण्याच्या संधी खूप जास्त आहेत . त्याला अट एकच : हाव नको.
या मार्केट मध्ये तुम्ही गुंतवणूक च्या दृष्टीने पाहणार असाल तर यामध्ये सगळ्यात लवकर पैसे वाढतात .
उदा . :
जुलै २०१३ मध्ये मार्केट १९,५०० वरून १७,००० वर आले होते. तेव्हा बँकिंग शेअर आपटले होते. उदा . axis bank ७८० वर होता , आज तो १,३०० वर आहे. म्हणजे ७०% परतावा केवळ ५ महिन्यात . तुम्ही कोणताही बँक शेअर घ्या साधारण ३०-४०% परतावा या ५ महिन्यात दिला अहे.
अशा संधी २००७ पासून सलग येत आहेत . अगोदर हि येत अस्तिल.
आपण संधी ओळखली पहिजे.
आणि मार्केट चा अभ्यास करायचा नसेल तर सरळ blue chip stock घ्यायचे आणि SIP करायची . ( blue chip stock कोणते ते ECONOMIC TIMES मध्ये समजतील ).
अजून काही माहिती हवी असल्यास मी नक्की देईन , आणि हो कोणाच्याही "टिप्स " वर अवलंबून राहू नका . मार्केट मधल्या तुमच्या profit आणि loss ला तुम्ही च जवाबदार असता . इतर कोणीही नाही .
9 Dec 2013 - 10:18 pm | ज्ञानव
आनंदयात्री जी
एका अर्थयात्री कडून तुम्हाला धन्यवाद
9 Dec 2013 - 10:32 pm | आनंदराव
आनंदयात्री जी
एका अर्थयात्री कडून तुम्हाला धन्यवाद
कशाला कशाला :)
9 Dec 2013 - 11:05 pm | सदासुखि
मला खुपच कमी माहिती आहे गुंतवणुकिबद्दल. पण समजा मला शेअर मध्ये गुंतवणुक करायची असेल तर सुरुवात कशी करावि?(अभ्यास काय करावा लागतो?........अगदिच लहान मुलासारखा प्रश्न आहे...माफ करा)
मी २००७ मध्ये मुच्युअल फंड मध्ये गुंतवणुक केलि होती पन सध्या ती लॉस मध्ये आहे.
10 Dec 2013 - 2:39 pm | ज्ञानव
जर शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर
१) आधी वाचन वाढवणे:- त्या विषयाची संपूर्ण माहिती, त्याची टर्मिनोलोजी समजून घ्या (कारण T+२ म्हणजे काय हे रोज ट्रेड करणार्यांना हि कळत नाही.ब्रोकरकडून आलेले लेजर कसे वाचायचे हे समजत नाही असे बरेचजण आहेत आणि ते नंतर भांडण, गैरसमज पसरवणे हे प्रकार करत राहतात.)
२)प्रत्यक्ष ट्रेडिंग करण्याआधी मॉक ट्रेड म्हणजे खोटे मनातल्या मनात पण गंभीरपणे ट्रेड करून पाहा आणि मग विचार करा असे मला वाटते.
12 Dec 2013 - 2:41 pm | कपिलमुनी
monneycontrol, http://money.rediff.com/ अशा ठिकाणी अकाउंट काढून बुकमार्क करून चढ उतार बघता येतो .. पॅटर्न ठरवता येतो ..
डीसेंबर-जानेवारी मधे केलेली योग्य गुंतवणूक बजेट नंतर फायदा देते
9 Dec 2013 - 11:13 pm | अगोचर
३६% वर्षाला हा परतावा अर्थातच फार चान्गला आहे ... पण त्यामागे अजुन काही गणित / ठोकताळे आहेत का ?
फार उपयोगी माहिती देत आहात. धन्यवाद.
- (अनभिज्ञ पण उत्सुक)
9 Dec 2013 - 11:46 pm | यसवायजी
चांगलं काम करताय.. धन्यवाद.
पुभाप्र.
10 Dec 2013 - 8:00 am | कंजूस
फारच मजेदार लेखन आणि माहिती आहे .
शेअर्समध्ये (आणि जमीन )गुंतवणूक फायदेशीर होईल का हे तुमची कुंडलीतील ग्रहदेखील ठरवतात .याबाबत इथले ज्योतिषी प्रकाश टाकू शकतील .
याचे कारकत्व
(influence) शनि आणि बुध ग्रहांकडे जाते .कोणत्या गोष्टीतले मर्म समजण्यासाठी बुध चांगला असावा लागतो नाहितर आडाखे सारखे चुकतात .
शनि नरमाईचे धोरण ठेवतो आणि वेळ योग्य आली की फायदा करून घेतो .
रवि शनि एकाच स्थानात असतील तर या फंदात अजिबात पडू नये .
यासाठी कोणीतरी वेगळा धागा काढावा .
15 Dec 2013 - 10:54 pm | ज्ञानव
श्री धीरुभाई अम्बानींची पत्रिका आहे माझ्याकडे.....भल्याभल्या ज्योतिषांनी पैश्याचा योग नाही पण कुटुंबाकडून म्हणजे बापजाद्यांकडून भरपूर पैसे ह्या माणसाला मिळतील"च" असे मला उत्तर दिले.
मग मी जेव्हा श्री धीरूभाई अंबानी ह्यांची पत्रिका आहे असे सांगितले तेव्हा.....नाही मग तुम्ही पत्रिका चुकीची"च" आणली आहे असे सांगून मला चक्क हाकलून लावले.
7 Jan 2014 - 10:17 am | प्रकाश घाटपांडे
हा हा हा
धिरुभाई जन्माला आले त्यावेळी त्या रेखांशावर अन्य बालके पण जन्माला आली असतील त्यांची व धीरुभाईंची ठोकळा पत्रिका एकच असणार. त्या लोकांची आर्थिक स्थिती पाहिली पाहिजे. मजेशीर निरिक्षणे मिळतील. असो
पुण्यात सुनंदा राठी या अर्थक्षेत्रातील तज्ञ व ब्रोकर या ज्योतिषी आहेत. त्या कैक वर्षे भाग्यसंकेत नावाचा वार्षिक दिवाळी अंक चालवतात. त्यात गुंतवणुकी विषयी भविष्य असते.
7 Jan 2014 - 11:21 am | ज्ञानव
आणि पुण्यातले एक मास्तर ह्यांची सारखी पत्रिका आहे. पण तो विषय आणि शेअर मार्केटचा विषय एकत्र आणू नये असे वाटते. पण प्रत्येक "अस्थिर" माणूस "अस्थिर" ग्रहांची मदत मागत फिरताना दिसतो तेव्हा वाईट वाटते.
4 Jan 2014 - 8:57 pm | आयुर्हित
नक्कीच वेगळा धागा काढावा! खूप इंटरेस्टिंग आहे हे!
आपला लाडका : आयुर्हीत
10 Dec 2013 - 2:23 pm | अव्यक्त
आनंदयात्री जी..
आणि मार्केट चा अभ्यास करायचा नसेल तर सरळ blue chip stock घ्यायचे आणि SIP करायची..ह्या आपल्या विधानावर सविस्तर विवेचन कराल काय?
10 Dec 2013 - 2:29 pm | अव्यक्त
कोणीतरी सांगत होते कि सलग ६५ महिने NSC काढा म्हणजे पेन्शनची सोय होईल...असे काही आहे काय? राजेंद्रजी,पण तुम्ही हे नमूद केलं नाही कित्ती हजारांच्या nsc कराव्यात आणि ते व्यवहारी ठरेल काय… समजा क्ष व्यक्तिचे वय आजच्या घडीला अंदाजे ३७ पकडून चालू त्याला कधी त्या nsc चा लाभ होणार… ह्या आपल्या विधानावर सविस्तर विवेचन कराल काय?
10 Dec 2013 - 2:55 pm | प्रकाश घाटपांडे
माझ्या मते शेअर मार्केटमध अत्यल्प कमावतात व बहुसंख्य गमावतात. इरॅशनल मार्केट आहे. समजा एखादा सर्वसामान्य गुंतवणुकदार जर दहा वर्षे गुंतवण करत असेल तर त्याची सरासरी कमाई ही एफडी पेक्षा जास्त नसेल
10 Dec 2013 - 3:16 pm | ज्ञानव
आयसी आयसी आय बँक १९९९ ला ९० रुपये होता आज रुपये १२००/- आहे
आशियन पेंट्स ५० शेअर्स १९९८ ला रुपये १३ होता आज रुपये ५०० /- (ह्यात त्याने दिलेले बोनस शेअर्स धरलेले नाहीत अन्यथा त्याची किंमत ५००० आहे.)
मल्ल्याचे दारूचे शेअर्स मेक्डोवेल २००४ मध्ये रु.५५ आज २५२५/- आहे.
वरील सर्व शेअर्स मध्ये बोनस राइट वगैरे शेअर्स मिळवले तर इतका नफा देणारा कुठलाही धंदा नाही. (पूर्ण चिकित्सेअंती हे मत बनवले आहे.)पण प्रचंड गैर समज आणि अज्ञानातून येणारी क्लिष्टता म्हणून आम्ही फक्त नावे ठेवतो आणि गुजराती,मारवाडी,पंजाबी प्रचंड कमावतात.
पैसा आहे त्यांच्याकडे...... हि तर मोठी पळवाट आहे आपलेच बरोबर आहे ह्याच्या समर्थनार्थ.
13 Dec 2013 - 12:55 am | उपाशी बोका
मी १९९१-९२ मध्ये २० रुपयांनी घेतलेला Zodiac-JRD-MKJ चा शेअर आज १८.२० रुपयांना आहे.
तरीही मी म्हणेन की पैसे कमवायला शेअर मार्केट हा चांगला उपाय आहे.
13 Dec 2013 - 8:10 am | ज्ञानव
विजेते प्रत्येक क्षेत्रात असतात आणि त्याच क्षेत्रात पराभूत ही असतात. पण पराभूत का पराभूत झाले ? आणि विजेते का विजेते झाले तेही आपण पाहणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे. शंतनुराव किर्लोस्कर किंवा चौगुले स्टीम शिपचे मालक पराभूत झाले....पुन्हा उभे राहिले....विजेते झाले.त्यात्य तुम्ही फक्त ते विजेते झाले म्हणाल आणि त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांचा, वाईट परिस्थितीला हार ना मानता केलेल्या संघर्षाचा अपमान नाही का?
Zodiac-JRD-MKJ
१)हा शेअर कुठल्या सेक्टर मधला आहे ?
२)तो वर जाईल ह्या एका आशेवर किंवा कुणीतरी सांगितले म्हणून घेतला आहे का?
३)१८.२० ह्याच भावाने तो का घेतला ?
वगैरे अनेक प्रश्न बाजूला ठेऊन मी हाच शेअर का घ्यावा हा प्रश्न तरी स्वतःला विचारला जायला हवा.
आणि उमेदवारीच्या काळात मी घेतलेले अनेक शेअर्स आज दिसतही नाहीत (तरीही त्यातले थोडे पैसे परत मिळवले ..डी लिस्ट झालेले असून) पण ती सर्वस्वी माझी चूक होती जी सुधारत सुधारत मी स्वतःचे काही नियम काही स्त्रेटेजीज बनवत गेलो आणि शिकत गेलो. एम बी ए करायला जी फी द्यावी लागेल तेव्हढी फी मी तोट्याच्या रुपात दिली आणि शाळा पूर्ण केली.
आज मी गुंतवणूकदार घडवण्याचा प्रयत्न करतो पण ज्या दुसर्या क्षेत्रांचे मला आकर्षण आहे त्यातल्या लोकांचे कसे चुकते आहे "अरे मी असतो तर असे केले असते तसे केले असत" ह्या नुसत्याच मत प्रदर्शनाच्या अपरीपक्वतेतून आता बाहेर आलो आहे.
नक्कीच आहे कारण १०० वर्षाची परंपरा आहे.
आर्थिक विकासाचे थर्मामीटर आहे.
सरकार देखील त्यात पैसे गुंतवा सांगते
आणि त्याहीपेक्षा
जे मला कळत नाही ते सगळे वाईट म्हणणार्यांनी लांबच राहावे.
10 Dec 2013 - 10:36 pm | आनंदराव
आनंदयात्री जी..
आणि मार्केट चा अभ्यास करायचा नसेल तर सरळ blue chip stock घ्यायचे आणि SIP करायची..ह्या आपल्या विधानावर सविस्तर विवेचन कराल काय?
अव्यक्त जी,
मला जेवढे ज्ञान आहे ते आपल्या समोर मांडतो . तज्ञांनी चूक सुधारावी .
blue chip stock म्हणजे ज्यांची बाजारातील पत खूप चांगली आहे अशी कंपनी .
ही ढोबळ व्याख्या झाली . उदा : TCS , INFOSYS , रिलायंस , एल & टी वगैरे .
या कंपन्या मध्ये investment केली असता ती बुडण्याचा धोका फारसा नस्तो. ( हे माझे विधान खूप धाडसाचे आहे ).
म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक ची किंमत आज समजा १०रु आहे . ती उद्या ८ झाली तरी धोका नस्तो. काही दिवसांनी त्या ८ चे १६ पण होतात . उदा : रिलायंस २००८ साली ३२०० रु होता ननतर खाली येउन १२०० वर कितीतरी दिवस होत. मी स्वत १,०५० ने घेतला अहे. . आज ५ वर्ष झाली त्याने १००० चा पण भाव दाखवला नहिये. पण मी निर्धास्त आहे. कारण ते पैसे मी बाजूला ठेवले असल्यासारखे आहे. कारण कंपनी ब्लु चीप आहे.
तर असे शेअर्स तुम्ही निवडा आणि दरमहा थोडे थोडे घेत चला.
त्यामध्ये ३ भाग करा .
१) असे शेअर्स कि जे तुम्ही ५ वर्षानंतर विकू शकता .
२) असे शेअर्स कि जे तुम्ही १० वर्षानंतर विकू शकता .
३) असे शेअर्स कि जे तुम्ही फक्त तुमच्या म्हातारपणात तुमच्या गरजेला विकू शकाल .
पण या मध्ये जोखीम अशी आहे की असे शेअर्स तुम्हाला कोणीही सांगणार नहि. तर तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटतील तेच शेअर्स घेऊन पुढे जा. आनि संयम ठेवा ।
आता पासूनच अभ्यासाला सुरुवात करा . इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा यामध्ये जर चांगला अभ्यास केलात तर यश तुमचेच अहे. अहो , सायकल शिकताना पण ४-५ वेळा पडतोच की आपण . काय ?
10 Dec 2013 - 10:40 pm | आनंदराव
माझ्या मते शेअर मार्केटमध अत्यल्प कमावतात व बहुसंख्य गमावतात. इरॅशनल मार्केट आहे. समजा एखादा सर्वसामान्य गुंतवणुकदार जर दहा वर्षे गुंतवण करत असेल तर त्याची सरासरी कमाई ही एफडी पेक्षा जास्त नसेल
प्रकाश घाटपांडे
घाटपांडे जी,
एक गम्मत बघा . ज्या व्यक्ती ने १९८० साली विप्रो मध्ये रु १०,०००/- गुंतवले असतील तर त्याची आजची किंमत रु ४७५ कोटी होईल .
12 Dec 2013 - 4:03 pm | सुधीर
"पोर्टफोलिओ मॅनेजमेंट" आणि "इक्विटी रिसर्च" हे एक स्वतंत्र करिअर आहे. कार्यालयात काम करताना (नोकरी करताना) "ट्रेडींग" करण्यात "कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट" आहे. कारण त्यामुळे कामावर १००% लक्ष राहणार नाही. त्यामुळे नोकरी करून ट्रेडींगला माझा विरोध राहील. "फक्त" टेक्निकल अॅनालिसीसच्या जोरावर पैसे कमवा छापाच्या फसव्या जाहिराती पाहिल्या की खूप वाईट वाटतं. दुर्दैवाने त्यांचे क्लासेसही-सॉफ्टवेअर विक्री तुडुंब चालतात.
काही जणांना थोडफार शेअर मार्केट मधलं कळतं, एखादं दुसरे शेअर्स ते विकतही घेतात. कधी नफा कमवतात तर कधी तोटा होतो. पण बर्याच वेळा (मित्र आणि सहकर्मचारी यांमध्ये) हे दिसून आलं आहे की, भविष्यात येणार्या आर्थिक घटनांचा अंदाज न बांधल्यामुळे पैसे चुकीच्या अॅसेट क्लास मध्ये गुंतवलेले असतात. ट्रेडींग मुळे वा एखादं दुसर्या शेअर मधल्या गुंटवणूकीमुळे "ओव्हर ऑल वेल्थ" मध्ये भूतकाळात कसे बदल होत गेले याची साधी नोंदच नसते. (फक्त शेअर मधल्या गुंतवणूकीकडेच सेपरेटली -वन केस म्हणून- बघितलं जातं)
फक्त एखाद दुसर्या कंपनीचा शेअर घेणं यात बरेच रिस्क फॅक्टर्स असतात. त्याचं ज्ञान जर नसेल तर अगदी काही ब्लुचिप कंपनीत पैसे गुंतवून पण चांगला फटका पडू शकतो. ईकॉनोमी, सेक्टर्स, पॉलिसीज, क्वॉर्टर्ली रिझल्ट्स, त्यात असू शकलेले झोलमाल, भविष्यातले रिझल्ट्स अशा बर्याच गोष्टींचा विचार एखादं दुसरा शेअर निवडताना करायचा असतो (आणि तो ही संपूर्ण पोर्टफोलिओची स्थिती लक्षात घेऊन), आणि या सगळ्या बाबी दरवेळा पडताळून पहाव्या लागतात. जर त्यासाठी वेळ नसेल तर, मला वाटतं सामान्य गुंतवणूक दाराने नेहमी इंडेक्स फंड्स (ज्यात मॅनेजमेंट फी कमी असते) वा इंडेक्स इटीएफ यांमध्ये "नियमीत" आणि "दीर्घ कालावधिसाठी" गुंतवणूक करावी. (माझ्या मते कमीत कमी १०-२० वर्ष) एखादवेळ अॅक्टिव्हली मॅनेज् म्युचुअल फंड इंडेक्स पेक्षा कमी परतावे देतील, पण पॅसिव्हली मॅनेज् इंडेक्स ईटीएफ वा इंडेक्स फंड नेहमीच इंडेक्सच्या जवळ जाणारे परतावे देतील.
बाकी इतर बर्याच जणांना, गुंतवणूकीबद्धल फारसा रस नसतो, त्यामुळे त्यांचे पैसे बर्याचवेळा सेव्हींग मध्येच पडून असतात. कधी कधी चुकीच्या पॉलिसीज मध्ये (म्युचअल फंड्स ते अगदी इन्शुरन्स पर्यंत) अडकून असतात. अगदी असही, असता कामा नये. अशांनी प्रोफेशनल आणि एथिकल गुंतवणूक तज्ञाची मदत घ्यावी. कारण या क्षेत्रात नीतिमत्ता जपणारी मंडळी कमी आहेत. बर्याचवेळा एजंट्स लोकच सल्लागार असतात असं आढळून आलं आहे.
12 Dec 2013 - 7:29 pm | ज्ञानव
मी स्वतःहि टेक्निकल अॅनालिसीसच्या (बर्यापैकी कमांड असूनही )विरुद्ध आहे अरे तिथे मार्केटला काय स्वप्न पडले आहे का कि तुमचा ग्राफ सेलिंग सिग्नल देतोय ती काय रेल्वे आहे आता सेलिंग सिग्नल म्हणजे खाली आणि बाईंग सिग्नल म्हणजे वर असे करायला आणि त्यातल्या लबाड्या सामान्य माणसाला कळत नाहीत तरी तो म्हणतो "टेक्निकल अॅनालिसीस शिकवा ना जरा "
आणि
हेही पटते कारण मी स्वतः ही सब-ब्रोकर आहे.
पण गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक तसेच गुंतवणूकदार आणि त्याची मानसिकता जवळून पहिल्याने "गुंतवणूकदारांबद्दल" काही वेळा अत्यंत वाईट वाटते आणि काही वेळेस कीव येते.
12 Dec 2013 - 8:16 pm | उपाशी बोका
पण गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक तसेच गुंतवणूकदार आणि त्याची मानसिकता जवळून पहिल्याने "गुंतवणूकदारांबद्दल" काही वेळा अत्यंत वाईट वाटते आणि काही वेळेस कीव येते.
केवळ हे वाक्य वाचून उत्तर लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. सविस्तर प्रतिसाद थोड्या वेळात लिहितो.
12 Dec 2013 - 8:55 pm | ज्ञानव
तुम्हाला मिसळपाववर लिहावेसे वाटत आहे तर प्रतिसादाची वाट पाहत आहे. घडणे-घडवणे घडलेच पाहिजे.
धन्यवाद.
13 Dec 2013 - 1:13 am | उपाशी बोका
सर्वात प्रथम पैसा आणि त्याचे महत्व बघू. पैसे देउन आपण आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकतो जसे अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी. गुंतवणूक म्हणजे आजची मजा आपण नंतर भविष्यकाळात करुया अशी इच्छा आणि त्याचे नियोजन.
आपण एखाद्या कंपनीत शेअर विकत घेतो तेव्हा त्या कंपनीचे अंशत: मालक होतो. कंपनीच्या भविष्यकाळातील फायद्यासाठी (future profit) आपण आज पैसे मोजून मालकी घेतो.
पण गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक तसेच गुंतवणूकदार आणि त्याची मानसिकता जवळून पहिल्याने "गुंतवणूकदारांबद्दल" काही वेळा अत्यंत वाईट वाटते आणि काही वेळेस कीव येते.
मला स्वत:ला "ट्रेडर"बद्दल अत्यंत वाईट वाटते आणि कीव येते. कारण का ते सांगतो. ट्रेडरला झटपट फायदा हवा असतो. (Nothing wrong with that approach). भारतात tax चे नियम काय आहेत ते मला माहीत नाही, पण मी राहतो तिथे short term gain (१ वर्षाच्या आतला फायदा) हा रेग्युलर उत्पन्नात जमा होतो आणि मला त्याच्यावर अधिक दराने tax भरावा लागतो; पण तोच फायदा long term gain असेल तर कमी दराने tax भरावा लागतो. दुसरे म्हणजे सारखे सारखे ट्रेडिंग करून ब्रोकरेज वजा करून Net किती फायदा होत आहे, ते बर्याचदा लक्षात घेतले जात नाही. तुमचा फायदा होवो अथवा न होवो, ब्रोकरचा फायदा मात्र नक्की होतो. त्यामुळे ते ट्रेडिंगला उत्तेजन देतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ट्रेडर्स हा फायदा (वरचे उदाहरण ३६%) consistently किती वर्ष कमवू शकतात, ते बघणे रोचक ठरेल.
13 Dec 2013 - 8:27 am | ज्ञानव
ट्रेडिंग करताना स्वतःचे नियम असतात जे इथे कुणाला माहितच नसतात (एक मेव अपवाद आणि नियम म्हणजे स्टोप लॉस...जो लावणे म्हणजे स्वतःला खात्री नसल्याचे किंवा क्लीनर घेऊन गाडी चालवणे आले.)वर्षाला ३६% तुम्ही सहज जमवू शकता त्यापेक्षा जास्त जेव्हा काढता तेव्हा ते खूप रोचक होईल कारण रिस्क बेअरिंग, होल्डिंग ताकद वगैरे सर्व त्यात आले.
टेक्निकल अनालिसिस हा प्रकार सामान्य गुंतवणूक दराने लांब ठेवायला हवा हे माझे स्पष्ट मत आहे.
कारण software जनरेटेड सिग्नल्स हे माणसाने लिहिलेल्या जर-तर च्या भाषेवर असतात मार्केट नेहमी वेगळेच सांगते.
साधी अंक गणिते असतात थोडे लॉजिक असते आणि प्रचंड शिस्त असते (ह्या तीनवरच माझे सारे नियम मी बनवले आणि माझ्या क्लायंटना सांगितले.....फी जरा जास्त आहे पण तरीही....)
त्यामुळे बर्याच प्रवासाने आता काही गोष्टी जेव्हा समोरचा सांगतो तेव्हा वाईट वाटते आणि कीव येते.
गुंतवणूक आणि ट्रेडिंग ह्यातली गल्लत दूर केली की त्यांची गाडी सुरु होते.
12 Dec 2013 - 7:38 pm | आनंदराव
पण गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक तसेच गुंतवणूकदार आणि त्याची मानसिकता जवळून पहिल्याने "गुंतवणूकदारांबद्दल" काही वेळा अत्यंत वाईट वाटते आणि काही वेळेस कीव येते.
़जरा सविस्तर सान्गाल का?
12 Dec 2013 - 8:47 pm | ज्ञानव
सांगून झाले आहे. उदाहरण द्यायचे तर
१) ३% महिना व्याज मिळेल ह्या आशेने पैसे गमावणारे मी पहिले आहेत पण आमचे ब्रोकरेज आणि सल्ल्याची फी त्यांनाच खूपच "महाग" वाटते.
२)१५ दिवसात डबल,डाव्या हाताला एक उजव्या हाताला एक असे हातवारे करून MLM मार्फत इतके मिळतील तितके मिळतील नंतर फक्त बसून खायचे ह्याला हे भुलतात पण आमची फी "महाग" आहे.
३) मी जेव्हा सामान्यपणे गुंतवणुकीचे मार्ग दाखवतो त्याआधी वय,अनुभव,उद्दिष्टे, खर्च, इन्कम विचारतो तर एवढी माहिती तुला कशाला हवी..एवढाली फी घेऊन आणि वर एवढे प्रश्न विचारून काय होणार त्यापेक्षा कशात पैसे लावू आणि किती लावू आणि किती दिवसात किती जास्त मिळतील एवढेच सांग नाहीतर तो अमका ब्रोकर महिना एवढे कमावून देतोय जाऊ का त्याच्याकडे?......जा बाबा
४) अरे ह्या म्युचुअल फंडामध्ये घातले होते पण आज हि एन ए व्ही तेवढीच आहे.
५) सगळ्यात मोठी ओरड "मी घेतलेलेच शेअर्स चालत नाहीत साला नशिबच नाही आपले."
.
.
.
.
.
.
.
.
१००(नंबरी))तुझ्याकडे गुंतवणूक म्हणजे तू आम्हाला कामाला लावणार इथे गुंतवा तिथे मोर्गेज करा १०० रुपयात २०० चा माल घ्या, गणित करा...
नकोच ते.हि उत्तरे ऐकून कीवच येते गुंतवणूक ह्या शब्दातच मुळात तुमची स्वतःची मानसिक वैचारिक शैक्षणिक गुंतवणूक अपेक्षित आहे पण जर तुम्ही गुंतवणूक म्हणजे पैसे वाढवणे आणि त्यासाठी सल्लागार आहेत ते देतात वाढवून हि मानसिकता ठेवली तर.......कठीण आहे.
बरोबर आहेका मी म्हणतो ते?
12 Dec 2013 - 10:05 pm | आनंदराव
१००% बरोबर ! पूर्ना मान्य !
16 Dec 2013 - 2:26 pm | विअर्ड विक्स
शेअर मार्केट संबंधी मराठी व इंग्रजीतील उपयुक्त व reasonably priced पुस्तकांची नावे सुचवू शकलात तर बरे होईल...
thankx in advance.....
16 Dec 2013 - 4:31 pm | ज्ञानव
इंग्रजीकारिता माझ्याकडे भरपूर पी डी एफ जमा आहेत जर कुणाला हव्या असतील तर मला व्य.नी. करावा
अल्प मोबदल्यात मी त्या देऊ शकतो.
मोबदला : मिसळ पाव (अनलिमिटेड बर्का)
12 Aug 2016 - 6:03 pm | शैलेश लांजेकर
नमस्कार ज्ञानव साहेब,
आपण वर लिहिल्याप्रमाणे पीडीएफ फाइल्स करता व्यनि केला आहे. कृपया आपल्या सवडीनुसार या पीडीएफ ई मेल वर पाठवाव्यात. मी ठाण्यात राहात असल्याने तुमचा मोबदला तुम्हाला अगदी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मिळेल :-) :-)
14 Aug 2016 - 11:40 am | ज्ञानव
लवकरच पाठवतो.
17 Dec 2013 - 5:28 am | उपाशी बोका
- A Random Walk Down Wall Street by Burton Malkiel
- Fundamental Analysis for investors by Raghu Palat
- The Dhandho Investor: The Low-Risk Value Method to High Returns by Mohnish Pabrai
- Buffett Beyond Value: Why Warren Buffett Looks to Growth and Management When Investing by Prem Jain
- Personal Finance for Dummies by Eric Tyson
- Fundamental Analysis for Dummies by Matt Krantz
- The Four Pillars of Investing by William Bernstein
- Common Sense on Mutual Funds: New Imperatives for the Intelligent Investor by John Bogle
- Stocks for the Long Run by Jeremy Siegel
- The Intelligent Investor by Benjamin Graham
सध्या इतकी वाचा, मग इतर सांगतो.
16 Dec 2013 - 4:05 pm | अभ्या..
घेतलेल्या शेअरना विकून मिळणारा फरक आणि डिव्हिडनड याशिवाय शेअरसम्बंधित अजुन कसा पैसा मिळवता येतो?
16 Dec 2013 - 4:22 pm | बॅटमॅन
हा ना राव. मलाही नेमका हाच प्रश्न आहे.
16 Dec 2013 - 4:28 pm | ज्ञानव
जर तुमचा ब्रोकर हि सोय देत असेल तर त्याला शेअर्स लीज वर देऊनही तुम्ही पैसे कमावू शकता. आता महिंद्रा सत्यंम चा लीज रु. १० पर शेअर होता (भेल १.३०, लार्सन २.७५ वगैरे )
सामान्यतः मराठी माणूस लाभांश आणि भांडवल वृद्धी ह्या दोन गोष्टीच जाणतो आणि नवीन काही असेल तर बिचकतो किंवा त्याला "लफडी" म्हणून मोकळा होतो. त्यामुळे ब्रोकेर्स ही त्याला हे सगळे समजावत बसत नाहीत.
ह्या व्यतिरिक्त आरबीट्रेज म्हणजे एन एस इ आणि बी एस इ मधला फरक, शेअर्स ओकशन मार्केट मध्ये विकण्यासाठी देणे.
पण खरोखर "लफडी" ह्या प्रकारात मोडणारा आणि पूर्ण बेकायदेशीर असा कर्ब मार्केटचाही एक ट्रेड आहे त्यात भरपूर मिळतात आणि भरपूर जाऊ शकतात पण सामन्यतः ज्याला त्यातले काही कळत नाही त्याने त्या वाटेला जाऊ नये कारण त्यात पैसे मिळालेली उदाहरणे खूपच कमी आहेत. आणि जी आहेत तीही ब्रोकेरच्या मर्जीतली आहेत.
16 Dec 2013 - 4:33 pm | बॅटमॅन
पण हे आर्बिट्रेज फार कमी काळासाठी असतं ना? अलीकडच्या सटासट चालणार्या ट्रेडिंगच्या जमान्यात तर ते क्षणार्धात नाहीसं होत असल्याने फ्यूचर्सचे कॅल्क्युलेशन्स करताना नो आर्बिट्रेज हे अॅझम्प्शन असते, नै का?
16 Dec 2013 - 5:43 pm | प्रसाद१९७१
हल्लीच्या संगणक युगात, आर्बिट्रेज च्या संधी मिळत नाही. जो काही थोडा फरक दिसतो तो सगळा ब्रोकरेज मधे जातो.
ब्रोकर लोकांना जमत असेल कारण त्यांना ब्रोकरेज नसते ना.
16 Dec 2013 - 4:45 pm | ज्ञानव
श्री चिदंबरम कृपेने आज अनेक अडचणीही आहेत
पूर्वी मी स्वतः जोब्बिंग मध्ये १५-२० प्रती शेअर नफा काढलेला आहे पण एस टी टी , महाराष्ट्र सरकारचे tax ह्याने मार्जिन कमी होत गेले. तेव्हा, मी फक्त वरील प्रश्नाला उत्तर म्हणून काही मार्ग सांगितले होते.
पण कमोडीटी मध्ये आर्बिट्रेजला भरपूर वाव आहे आम्ही सिंडीकेटने(हा हि बदनामच आहे शब्द) मसाल्यात आर्बिट्रेज केलेले आहे.
फ्युचर्सचे वाटेला मी आजतागयात गेलेलो नाही त्यामुळे आणि अॅझम्प्शनवर काम करू नये कारण इक्विटी म्हणजे काही "लॉटरी" नाही.
नाहीका?
16 Dec 2013 - 5:35 pm | बॅटमॅन
धन्यवाद सर. प्रश्न इतकाच होता की जे वाचले आहे त्यापेक्षा वास्तव वेगळे आहे किंवा कसे. कमोडिटी मार्केटातले आर्बिट्राजही लै अल्पजीवी असते असे वाचनात आलेले आहे. तुम्ही सांगताहात ते मला नवीन आहे. या क्षेत्रात मी नवखाही नाही, कारण नवख्याने किमान एंट्री तरी केलेली असते, माझं तेही नाही. असो.
16 Dec 2013 - 6:09 pm | ज्ञानव
कमोडीटी मार्केट मध्ये आम्ही जेव्हा केले तेव्हा तरी बराच फरक मिळाला आम्हाला आणि मग काही "मुंगळे" आमचा गुळ आम्ही शोधू म्हणू लागले आणि सिंडीकेटचा बोर्या वाजला.
वेलची कोचीनला मी स्वतः जाऊन गोडाऊन ला भरून आणि नंतर संगणकाच्या माध्यमातून विकून किंवा कधी उलट करून पैसा मिळतो त्यात पण ते एकट्याचे काम नाही हे निश्चित आणि पुन्हा "लफडी" जमायला लागतात.
16 Dec 2013 - 6:12 pm | ज्ञानव
प्लीज "सर" वगैरे नको. मी हि एन्ट्री मारलेला नवखा आणि विद्यार्थीच आहे. कदाचित एक वर्ग पुढे असेन एखाद्याच्या आणि अनेक वर्ग मागे आहे बर्याच जणांच्या.
17 Dec 2013 - 9:35 am | ब़जरबट्टू
मास्तर म्हणतो, पण तुमचे लेख मार्गदर्शक आहेतच...
( शेअरमार्केटमध्ये लाख गुतंवुन लात खाल्लेला ) बज-या :)
17 Dec 2013 - 10:36 am | ज्ञानव
धन्यावाद
5 Jan 2014 - 5:36 pm | बर्फाळलांडगा
किंगफिशर एरलाईनच्या शेअरचे भवितव्य काय वाटते? स्वस्त आहेत तो पर्यन्त बल्क खरेदी करायची तीव्र इच्छा आहे, पुढे बरे दिवस येतील का?
6 Jan 2014 - 7:45 pm | कपिलमुनी
अशा प्रकारच्या वैयक्तिक प्रशनामुळे कोणत्याही अर्थ विषयक धाग्याची वाट लागते !
6 Jan 2014 - 7:27 pm | ज्ञानव
इथे देणे माझ्या नियमात बसत नाही. पण न राहवून सांगेन एकतर एविअशन ha आपला प्रांत नाही मग त्या धंद्यात पैसे घालावे का ? आणि बल्क मध्ये ? त्यापेक्षा त्याच विमानाचे तिकीट काढून चारधाम फिरून येणे मला पसंत आहे.