१. देवादिकांच्या पौराणिक कथा, हा जगभरातील कलवंतांना शतकानुशतके आव्हान देणारा लोकप्रिय विषय. भारतात लेणी व मदिरांमधील भित्तिचित्रांखेरीज हस्तलिखित पोथ्यांमधील चित्रांची समृद्ध परंपरा होती. उदाहरणार्थ खालील चित्रे बघा:
रावण-वध: (जलरंग) उदयपूर, इ.स. १६४८
कुंभकर्ण वध : उदयपूर, इ.स. १६४८
विराट रूपदर्शन (तपशील अनुपलब्ध)
रामचरितमानस मधील एक प्रसंग : जोधपूर, इ.स. १७७५
‘पद्म राजाच्या प्रासादावरून आकाश-गमन करताना जालंदरनाथ आणि पद्मिनी’ चित्रकार: अमरदास भट्टी.जोधपुर, इ.स. १८३०
वानरसेनेसह रामाचा लंकेत प्रवेश. (जलरंग) जोधपूर इ.स. १७७५.
२. मात्र ही चित्रे फक्त राजे-रजवाड्यांकडे असल्याने सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी वा घरात लावण्यासाठी चित्रे उपलब्ध नसत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिथोग्राफीचा प्रसार झाल्यावर मात्र ही परिस्थिती बदलली. सुरुवातीच्या काळात ही चित्रे जर्मनीतूनच छापून येत.
..
लिथोग्राफीची शिळा, व त्यावर रेखाटलेले चित्र.... लिथोग्राफीचे छपाई यंत्र (पेटंट १८५० लंडन)
३. १८७८ साली पुण्यास चित्रशाळा प्रेस सुरु झाला, त्यात छापलेली चित्रे:
..
दुर्गा, सिद्धिविनायक, नृसिंहावतार : चित्रशाळा प्रेस, पुणे (१८८०)
४. त्याच सुमारास कलकत्त्यात विविध आर्ट स्टुडियो/प्रेस सुरु झाले, त्यांची काही चित्रे:
.
दुर्वास - शकुंतला, अभिमन्यु - उत्तरा, शंतनु - गंगा.
कृष्ण-बलराम, अक्रुरासह मथुरेस (कंस-वधासाठी ?) जाताना.
द्रौपदी वस्त्र - हरण.
५. एकोणीसाव्या शतकात संगीताची छापील पुस्तके उपलब्ध झाली. त्यांची मुखपृष्ठ चित्रे:
..
प्रल्हाद संगीत १८६६, लावनी नविन विलास १८७३, गोपिचंद राजा का सांग १८७७.
६. तात्कालीन प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांनी स्वप्रयत्नाने पाश्चात्त्य पद्धतीच्या, प्रत्यक्ष मानवी मॉडेल वरून तैलरंगात चित्रण करण्याच्या कलेत प्राविण्य मिळवून, देवी-देवतांची, पौराणिक विषयांवरची चित्रे बनवून ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य केले.
रविवर्माच्या तैलचित्रांना त्याकाळी एवढी मागणी होती, की तेवढी निर्मिती करणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून निवडक चित्रांचे ‘ओलीयोग्राफ’ जर्मनीतून बनवून आणावेत, असे त्रावणकोर (आणि नंतर बडोदे) संस्थानचे दिवाण टी. माधवराव यांनी त्यांना सुचवले. पुढे जर्मनीतून शिळाचित्र छपाईचे यंत्र व सामान मागवून ‘फ़ाईन आर्ट एंड लिथो प्रेस’ नामक छापखाना १८९४ साली रविवर्माने सुरु केला. त्यासाठी जर्मन विशेषज्ञ Fritz Schleicher, आणि त्याचा सहायक P. Gerhard यांना सुद्धा आणले. रविवर्मा प्रेस मध्ये छापलेल्या अनेक प्रकारच्या चित्रांमुळे त्याकाळी भारतातील घरा-घरात चित्रकला पहुचली.
.
सीता स्वयंवर
.
विश्वामित्र - मेनका, जळ-क्रिडा
.
शिव-पार्वती-गणेश, वनवासी राम
७. एकाच चित्रात अनेक दृष्ये दाखवणारे लिथोग्राफ सुद्धा तेंव्हा खूप प्रचलित होते. उदाहरणार्थः
.
दशावतार आणि यमयातना.
मार्कंडेय पुराण: विविध पापांबद्दल विविध नरकयातना
७. त्याकाळी पारंपारिक चित्रकलेस ग्रहण लागून त्याजागी पाश्चात्त्य पद्धतीच्या चित्रकलेचा प्रसार वेगाने होऊ लागला होता.
एका गणिकेचे व्यक्तिचित्र, दिल्ली. (हस्तिदंतावर जलरंग (१८३०-५०).
------------------------- क्रमशः --------------------------------------------
टीप: कोणत्याही कलाकृतीकडे बघताना आपण आस्वादक, अभ्यासक, समीक्षक, अश्या विविध भूमिका घेऊ शकतो. पैकी समीक्षकाच्या भूमिकेची खरेतर बहुतेकदा गरज नसतेच. एकदा समीक्षकाचा चष्मा चढवला, की आस्वादकाची भूमिका गळून पडते, आणि त्या कृतीतील असतील-नसतील त्या उणीवाच तेवढ्या दिसू लागतात.
या लेखमालेत आपण आस्वादकाच्या भूमिकेतून विविध चित्रांकडे बघणार आहोत. पुढील लेखात भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रांकन-पद्धतीतील फरक जाणून घेऊ.
(कलादालनात हा लेख देण्याचा प्रयत्न फसल्याने काथ्याकुटात देत आहे)
-----------------------------------------------------------------------------
ब्रिटिश म्युझियममधील आणखी काही चित्रे:
http://www.britishmuseum.org/whats_on/past_exhibitions/2009/indian_summe...
प्रतिक्रिया
18 Aug 2013 - 9:58 pm | विलासराव
वाटला हा चित्रकलेचा प्रवास.
18 Aug 2013 - 10:40 pm | सस्नेह
मजा वाटली ती ही की प्रांताप्रमाणे पात्रांची चेहेरेपट्टीसुद्धा बदलते !
18 Aug 2013 - 11:22 pm | विजुभाऊ
भारतीय चित्रांत परस्पेक्टिव्ह चा अभाव असायचा. बर्याचदा ती चित्रे वास्तवदर्शी नसायची. देखावे हे फक्त ब्याकग्राउंड म्हणौन यायचे.पाश्चात्य चित्रकारानी भारतीय चित्रकलेत वास्ताविकता आणली
19 Aug 2013 - 12:27 am | प्रास
विजुभाऊंचं म्हणणं पटत नाही. चित्रांचं पर्स्पेक्टिव्ह चित्रकारानेच ठरवावं, इतरांनी चित्रकाराच्या दृष्टीवर स्वमताचं आरोहण का करवावं? त्याबरोबरच वास्तवदर्शीत्व म्हणजे हुबेहुबपणाच असायला पाहिजे अशी आवश्यकताही भारतीय (किंवा त्या अनुषंगाने कोणत्याही) चित्रकलेसाठी म्हणता येईल असं वाटत नाही. हे आपलं माझं मत. याची योग्यायोग्यता, चित्रगुप्तकाकांसारख्या चित्रकारांनी ठरवावी.
बाकी धागा आवडला. या विषयावर अधिक वाचायला नक्कीच आवडेल. चित्रकलेचा तौलनिक अभ्यास या मार्गाने झालेला पहाता आला तर बहार यईल.
19 Aug 2013 - 11:30 am | चौकटराजा
प्रास साहेब, विजुभौ नी perspective या शब्दाचा वापर तांत्रिक अर्थाने केलेला आहे. इंडियन डेकोरेटीव्ह स्टाईलची शक्तिस्थळे
वेगळी आहेत. तत्कालिन चित्रकाराना परस्पेक्टिव चे ज्ञान असणारच पण लांबवर निमुळ्त्या होत गेलेल्या वस्तूवरचे बारीक काम दूरवर अति वारीक दाखवावे लागत असल्याने चित्रकार जरा परस्पेक्टिव च्या बाबतीत स्वात्रंत्र्य घेत असावेत. अर्थात
हा केवळ एक तर्क आहे.
19 Aug 2013 - 11:18 am | चित्रगुप्त
विजुभाऊंनी लिहिले, ते खरे आहे, परंतु हे पर्स्पेक्टिव्ह, शेड-लाईट वगैरे कित्येकदा अडसर ठरते. उदाहरणार्थ रामाची लंकेवर चढाई, जालंदर नाथ आणि पद्मिनीचे आकाश गमन इ. प्रसंग (त्यातील बारकावे आणि भव्यता यासह) पाश्चात्त्य पद्धतीने चित्रित करणे मुश्किलही नही, नामुमकिन हैत.
या विषयावर खरेतर विस्तृतपणे चर्चा पुढील एका भागात करायची आहे.
.....पाश्चात्य चित्रकारानी भारतीय चित्रकलेत वास्ताविकता आणली....
परंतु त्यामुळे आपली उपरणी, पागोटी, धोत्रे, पैठण्या, नथी इ.इ. टाकून आपण जीन्स - टीशर्ट घालू लागलो, तसे हे झाले.
शिवाय मुख्य गंमत म्हणजे ज्याकाळी रविवर्मा प्रभृति जुनाट वळणाची भारतीय कला टाकून पाश्चात्त्यांच्या पावलावर पाउल टाकुन 'आधुनिक' बनू पहात होते, अगदी त्याच वेळी तिकडे फ्रान्स वगैरे मधील चित्रकार सुद्धा त्यांची जुनाट वळणाची हुबेहुब वास्तवदर्शी कला टाकून, पौर्वात्त्यांच्या पावलावर पाउल टाकून 'आधुनिक' बनू पहात होते, उदाहरणार्थ खालिल चित्रे बघा:
.
तुलुज लोत्रेक, लिथोग्राफ १८८०-९० चे दरम्यान
19 Aug 2013 - 1:06 am | किसन शिंदे
पहिला भाग खुप आवडला. यातील काही चित्रे आधी पाहिली आहेत, काही पहिल्यांदाच पाहिली. शिव-पार्वती गणेश, नरकयातना आणि मेनेकेचे आधी पाह्यलेत, पण बाकीची आज पहिल्यांदाच पाहतोय. श्री दत्तगुरूंचे राजा रविवर्म्याने काढलेले चित्रही येथे टाका ना.
19 Aug 2013 - 1:45 am | चित्रगुप्त
दत्तात्रेय
अहिल्योद्धारः
19 Aug 2013 - 2:02 am | किसन शिंदे
व्वा!!!
दोन्ही चित्रे अप्रतिम.
19 Aug 2013 - 3:32 am | अर्धवटराव
क्या कहेने. एकदम सरस धागा. एखाद्या कलेचे प्रवासवर्णन जातीवंत कलाकाराने करावे, व आपण श्रवणभक्ती करावी... काय सुख आहे.
एक शंका.
दत्तात्रयांच्या चित्रात गाय आणि कुत्र्यांचे चेहेरे एकदम जसे असावे तसे भाव धारण करुन आहेत... पण खुद्द गुरुंचा चेहेरा चेहेरा न वाटता चित्रं वाटतं.. असं का?
अर्धवटराव
19 Aug 2013 - 4:45 am | स्पंदना
छानच! यातल नृसिंहाचे चित्र पाहिले होते.
लिथोग्राफी कशी करायचे याची माहीतीसुद्धा आली तर बरे होइल.
19 Aug 2013 - 12:01 pm | चित्रगुप्त
लिथोग्राफी साठी खालील दुवा बघा:
http://www.moma.org/interactives/projects/2001/whatisaprint/print.html
19 Aug 2013 - 8:23 am | बोलघेवडा
चित्र क्र. २ मधील प्रसंग कुंभकर्ण वधाचा नसून कुंभकर्णाला युद्धासाठी जागे करण्याचा असावा. काही लोक त्याला शास्त्राने टोचून उठवायचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला स्त्रिया संगीत / वादन करत आहेत. तो झोपेतून जागा झाल्यावर त्याच्या साठी थोडेसे मांस आणि रांजणात दारू देखील भरून ठेवलेली दिसत आहे.
19 Aug 2013 - 10:08 am | चित्रगुप्त
कुंभकर्णाचे चित्र त्याच्या वधाचे नसून जागे करण्याबद्दल निरिक्षण अगदी बरोबर आहे, लिहिण्यात झालेली ही चूक लेख प्रकाशित केल्यावर लगेच लक्षात आली होती, पण लेख स्वतः संपादित करण्याची सोय मिपावर नाही बहुतेक. मंडळी चित्रे लक्षपूर्वक बघत आहेत, हे बघून चांगले वाटले.
19 Aug 2013 - 8:28 am | प्रचेतस
लेख आवडला. व चित्रे तर खूपच सुंदर आहेत.
बाकी दुसरे चित्र कुंभकर्ण वधाचे नसून कुंभकर्णास झोपेतून जागे करणाच्या प्रयत्नांचे आहे असे निरीक्षण नोंदवतो.
19 Aug 2013 - 8:42 am | मदनबाण
बरीच नविन माहिती आणि चित्रे पहावयास मिळाली. :)
पुण्यातल्या चित्रशाळेतले सिद्धिविनायकाचे पेंटिंग मी कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते...पण कुठे ते आठवत नाही.
जाता जाता :--- ते साला जलक्रिडा वगरै पाहुन पुढल्या जन्मी राजा किंवा तथाकथित मालदार पार्टी होण्याची कधी कधी प्रबळ इच्छा होते ! ;) मिडलक्लास लाईफ आयुष्य जगणे म्हणजे जन्मभर पैश्यांच्या जुळवाजुळवीत आणि काय गमवले आणि काय कमवले याचा हिशोब करण्यातच कधी संपते ते त्यालाच कळत नसावे असे वाटते. बाकी या सर्वांच्या विरुद्ध म्हणजे नागा साधु बनणे... काय बी टेंशन नाय बघा. शिवाय नंगे से तो खुदा भी डरता है | ;)
19 Aug 2013 - 10:57 am | चित्रगुप्त
नागा साधु तर आपण घरातल्या घरात काही काळासाठी बनूच शकतो, पण मुख्य लोच्या त्या जळक्रिडा वगैरेचा आहे... :) :))
आपल्याइकडे देवादिकांची नसतील एवढी चित्रे अश्या जळक्रिडा वगैरेंची आहेत. खरे रसिक होते आपले पूर्वज.
19 Aug 2013 - 4:12 pm | मदनबाण
खरे रसिक होते आपले पूर्वज.
अगदी अगदी ! ;)
19 Aug 2013 - 10:25 am | दत्ता काळे
ह्या विषयात विशेष करुन रस आहे. पहिला भाग तर उत्तम.
मेणवलीच्या (वाई) नाना फडणवीसांच्या वाड्यात जुनी अप्रतिम चित्रे/ तसबिरी आहेत. तसेच औंध संस्थान ( जि. सातारा ) इथेसुद्धा यमाई देवीच्या देवळात आणि परत वेगळ्या म्युझियममध्ये कैक जुनी चित्रे लावलेली आहेत. औंध संस्थानचे राजे पंतप्रतिनिधी हे उत्तम चित्रकार होते त्यांची स्वःतची, त्यांनी जमवलेली आणि पाश्चात्य चित्रकारांनी काढलेली मूळ चित्रे तिथे पहावयास मिळतात.
19 Aug 2013 - 10:31 am | स्पा
औंध संस्थानात असलेल्या "यमाई देवीच्या" देवळात राजा रविवार्माने काढलेली अप्रतिम चित्र आहेत
जमली तर डकवेन इथे
19 Aug 2013 - 10:49 am | चित्रगुप्त
@ दत्ता काळे आणि स्पा: यमाई देवीच्या देवळात राजा रविवार्माने काढलेली चित्रे बघण्यास उत्सुक आहे, तुम्ही ती अवश्य दाखवा, वाटल्यास स्वतंत्र धागाच काढा त्यासाठी. एकादा फोटो सध्या असेल तर आताच द्या. ही चित्रे म्हणजे लिथोग्राफ्स आहेत की तैलचित्रे ? तैलचित्रे असल्यास त्यांना फारच जपले पाहिजे. फ्रेम केलेले लिथो असले, तरी आता ते दुर्मिळ असल्याने काळजी घेतली गेली पाहिजे.
मी माझ्या डोळ्यांसमोर (चाळीस वर्षांपूर्वी, इंदुरात) एक जुन्या मंदिरातील भव्य भित्तिचित्रावर ऑइलपेंट लावताना बघितले होते, कुण्या शेठने 'जीर्णोद्धारा'साठी देणगी दिली, म्हणून. त्यावेळी आपण काहीही करू शकलो नाही, याची अजूनही खंत वाटते.
19 Aug 2013 - 12:05 pm | स्पा
ओह हे मला माहित नव्हते , तिथे देखरेखी साठी बसलेल्या संस्थानातील माणसाने सरळ सरळ रवी वर्म्याची चित्रे आहेत असे सांगितले :)
19 Aug 2013 - 12:23 pm | दत्ता काळे
राजा रविवर्म्याची तर आहेतच पण काही पंतप्रतिनिधींचीपण आहेत.
19 Aug 2013 - 11:05 pm | चित्रगुप्त
स्पा यांनी यमाई देवीचे देऊळाचे आणि तिथल्या चित्रांचे सुंदर फोटो असलेला धागा दिला आहे. ती चित्रे रविवर्माची नसणार. याबद्दल कुणाला माहिती असल्यास/मिळवता आल्यास कळवावे.
स्पा यांचे विशेष आभार.
http://www.misalpav.com/node/25425
19 Aug 2013 - 10:40 am | सार्थबोध
अतिशय सुन्दर
19 Aug 2013 - 10:43 am | खबो जाप
बाकी काही म्हणा गणपती बाप्पा १८८० मधले असोत किव्हा आजचे असोत
तेव्हढीच श्रद्धा, तेव्हढीच प्रसन्नता आणि तेवढीच प्रेरणा मिळते
19 Aug 2013 - 11:08 am | अमोल केळकर
खुपच छान :)
अमोल केळकर
19 Aug 2013 - 11:38 am | ऋषिकेश
लेखांक आवडला.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत आहे.
फक्त "एकदा समीक्षकाचा चष्मा चढवला, की आस्वादकाची भूमिका गळून पडते, आणि त्या कृतीतील असतील-नसतील त्या उणीवाच तेवढ्या दिसू लागता" अशी टिपणी अनावश्यक व गैरलागु वाटली. असो.
19 Aug 2013 - 2:16 pm | उर्मिला००
अतिशय माहितीपूर्ण,सटीप चित्रांचा अप्रतीम धागा.अभिनंदन!!
20 Aug 2013 - 1:01 am | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
चित्रांवर टिपणी करू नये असे म्हणता ते ठीक. आस्वाद घ्यावा व सोडून द्यावे.
आस्वादात्मक विचार -
१) चित्रकारांनी ती काढताना त्यांच्या आसपासच्या वातावणरणाचे, संस्कृतीचे भान राखून ती काढली असावीत.
२) सादर केलेली चित्रे पाहून पौराणिक चित्रकारांनी विशेषतः राम आदी व्यक्तींना देव मानल्यामुळे देवी देवतांच्या जीवनातील युद्धाच्या व सैन्याच्या संचलनाकडे ते सैनिकांच्यावेषात त्यांना दाखवण्याचे साहस करत नसावेत किंवा देवतांच्या लोकप्रिय व्यक्तिमत्वाला तडा जाऊ न देता ती रेखाटणे पसंत करत असावेत. जोधपुरच्या एका चित्रकाराने राम पावसाळा संपून मग सीतेच्या शोधासाठी जायच्या तयारीतील चित्रात डोंगरांचा भाग वगळता वाळवंटासमान भूभाग असल्याचा भासवले आहे. ते असेच सुचवत असावेत.
३) अहिल्येच्या चित्रातील ती फार तरुण आहे. विश्वामित्रांची दाढी पांढरी तर केस कलप लावल्यासारखे काळे कुळकुळीत. तर रानावनातून फिरताना रामलक्ष्मण अनवाणी. आता आजच्य़ा संदर्भात ते खटकते. ओकेबोके वाटते. कितीही झाले तरी ते राजकुमार होते असे अनवाणी दाखवणे अशोभनीय वाटते. कुंभकर्णाच्या चित्रातील तपशील व रेखाटन पाचवीतल्या मुलांसारखे बाळबोध वाटले.
४)नुकतेच सौदर्यशास्त्रावर नाशिकच्या राम कर्वे यांचे व गांगलांनी प्रकाशित केलेले पुस्तक हाती आले. ते वाचून व मिपावरील वल्ली व त्याच्या मित्रांनी काढलेल्या अजंठावेरूळ लेण्यांतील फोटो पाहून त्यावर कर्व्यांनी पुस्तकात जे म्हटले आहे ते यां तज्ज्ञांकडून समजून घ्यायला हवे असे वाटते.
५) वेळ मिळाला की कोहलींच्या लिखाणाची झलक म्हणून हनुमानाचे व्यक्तिमत्व त्यांनी कसे चित्रित केले आहे यावर लिहायचे आहे.
६) सौदर्यशास्त्रावरील या पुस्तकाची ओळख कोणास करून देता आली तर पहा.
11 Nov 2013 - 4:11 pm | चित्रगुप्त
@ शशिकांतः
गंमत म्हणजे रामाच्या डोईवर सोन्याचा किरीट, पण पायात काही नाही, अशी चित्रे आहेत.
मला वाटते राजा म्हटला की किरीट हवाच, हा संकेत, आणि या तजबिरी देवघरात ठेऊन पूजल्या जायच्या, तस्मात पायावर गंध लावायला पायताणांचा अडसर नको, म्हणून अनवाणी, असेही असेल. मजेदार असतात ही चित्रे.
असे बाळबोध वा सरधोपट चित्रिकरण हे भारतीय चित्रकलेच्या बलस्थानांपैकी एक आहे.
अगदी लवकर लिहा. प्रतिक्षेत आहे.
17 Apr 2014 - 10:23 am | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
मतदानाचा कार्यक्रम उरकल्यावर जुने धागे उपसता हे हाती न आलेले काम दिसले.. पाहू काही जमतेय का ते...
20 Aug 2013 - 6:25 am | पाषाणभेद
चित्रगुप्तांची चित्रे अन त्यावर विवेचन असणारे लेख म्हणजे डोळ्यांना मेजवानीच असते.
11 Nov 2013 - 6:45 pm | बबन ताम्बे
यातिल बरिच चित्रे पहिल्यान्दाच पाहिलि. अतिशय सुन्दर चित्रे व माहिति . धन्यवाद .
11 Nov 2013 - 7:00 pm | अमेय६३७७
उद्बोधक माहितीने आणि चित्रांनी युक्त असे हे लेखन आवडले.