बोल बैला बोल : नागपुरी तडका
बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!
नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!
थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...!
इच्छाधारी गायवासरे राजबिंडे नवी
खुर्चीसाठी त्यांना तुझी हाडंकुडं हवी
तुझे कष्ट त्यांचे लेखी भिक्षापात्रतेचे
ऐद्यांना देणार 'अभय' अन्न सुरक्षेचे
जागा हो बैलोबा तू जागलंच पाह्यजे...!
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------
प्रतिक्रिया
18 Sep 2013 - 10:01 am | अत्रुप्त आत्मा
मुटे काकांचा जोरदार फटका!
एकेका करंटा'त अनेकांना झटका!
18 Sep 2013 - 10:20 am | पैसा
डोळ्यावर झापडं बांधलीत!
18 Sep 2013 - 12:41 pm | स्पंदना
मी तर मुसक्यापण बांधलेत तोंडाला. उगा पिकाबिकाला तोंड लागल तर?
18 Sep 2013 - 2:24 pm | निश
गंगाधर सर, जिथे बळीराजाच आत्महत्या करुन राहीला तिथे राहीला तिथे मुक्या बिचार्या प्राण्यांचे हाल किती होत असतील त्याचा विचारही काळजाला दु:ख देऊन जातो. खरतर बळी राजा आपल्या मुक्या प्राण्याना जीवापलिकडे जपतो पण आज त्याचेच प्राण मातीमोल होत असताना तो आपल्या मु़क्या जनावरांची काळजी कशी घेणार? पण कविता खरच विचार करायला लावणारी आहे.
21 Sep 2013 - 9:06 am | गंगाधर मुटे
अन्नधान्य उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाल्यावर सरकारचे आणि पगारी अर्थतज्ज्ञांचे टाळके ठिकाणावर येईलही कदाचित. पण; तोवर वेळ निघून गेलेली असेल.
अन्नाला पर्याय केवळ आणि केवळ अन्नच असते. हे ज्या दिवशी सर्वांना कळेल तो दिवस सोन्याचा मानावा लागेल. :(
21 Sep 2013 - 11:03 am | अनिल तापकीर
मुटे साहेब आजही खरा शेतकरी बैलाला जीवापाड जपत असतो. कविता सुंदर आहे शेतात औत हाकताना बैलाला थोडेतरी मारावे लागते त्यावेळी वाईट वाटते पण वेळेत काम उरकण्यासाठी मारावे लागते शेवटी काम झाल्यावर बैलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला कि ते मुके जनावर सुद्धा थरारते. आजही काही शेतकरी बैल मेल्यानंतर त्याला शेतात पुरतात व त्यावर आंब्याचे झाड लावतात.
बाकी आपले लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर
3 Oct 2013 - 3:08 pm | psajid
खूप छान कविता आहे जी सद्यस्थितीवर योग्य भाष्य करून जाते. शेतात उन्हा - पावसात निरंतर राबणारा शेतकऱ्याच्या मित्राची कैफियत अगदी समर्पकरित्या व्यक्त केलीत. मागच्या वर्षीच्या दुष्काळामध्ये शेतकऱ्याला आपल्या पोटच्या पोरागत सांभाळेलल्या बैलजोडी ला दावणी ची दोरी कापून "जिकडे चारा - पाणी मिळेल तिकडे जा" म्हणत सोडताना मी स्वतः पाहिलेले आहे. भारत देश हा कृषीप्रदान देश आहे म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेहमीच असले हृदयद्रावक प्रसंग येतात मग तो ओला दुष्काळ असो किंवा सुका ! नाहीतर शेतमालाचे भाव पाडून, निर्यात बंदी करून राजकारण्यांनी थोपलेला मानवनिर्मित दुष्काळ असो, भरडला मात्र शेतकरीच जातो.
तुमची विनवणी ऐकून जर बळीराजा बोलू लागला तर तो किती-किती आणि काय-काय बोलेल ? याचा विचार करून मन भरून येतेय.
छान कविता !