आत्महत्येला कव्हर!

मीराताई's picture
मीराताई in जनातलं, मनातलं
15 Aug 2013 - 12:44 am

खरं सांगू का? तशा माझ्यापुढे समस्या खूप आहेत, पण माझी मुख्य समस्या ही आहे की, माझ्या समस्या कोणाला समजतच नाहीत. पहा, तुम्ही पण हसलात न मला? हसू नका हो! अगदी पोटतिडिकीने सांगतोय, माझी कोणतीच समस्या कोणालाच समजत नाही.खरंच का लोक एवढे बिनडोक असतात? की त्यांच्या बेपवाईमुळे असं घडतं? कोण जाणे! पण या काळातही माझा मनुष्यप्राण्यावरचा विश्वास टिकून आहे खरा! कदाचित, ...कदाचित मलाच माझ्या समस्या नीट सांगता येत नसाव्यात. तसा मी मुखदुर्बळच! म्हणजे, असं आई म्हणते लहानपणापासून; अर्थात माझ्या लहानपणापासून, तिच्या नव्हे. माझं हे असंच होतं, एक सांगायला जावं, तर त्यातून अर्थ वेगळाच निघणार! असो. तर काय? माझी समस्या!

प्रपंच म्हणजे अठरा धान्याच कडबोळं असं कोणीतरीसं म्हटलंय ते खोटं नाही. सुरुवातीला चांगलं खमंग लागतं, पण नंतर मात्र पोटदुखीनं हैराण करतं. सध्या मी त्या पुढच्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. बरोबर ओळखलंत, त्या पोटदुखीच्या टप्प्यावरच येऊन ठेपलोय मी. म्हणजे असं पहा, थोरल्या कन्यका आता ग्रॅज्युएट होतायत. तेव्हा सौभाग्यवतींना त्यांच्या लग्नाची - म्हणजे कन्येच्या लग्नाची चिंता सतावतेय. काय ते तिच्या मित्रांचे फोन - म्हणजे कन्येच्या हो - तासन्तास त्या गप्पा, ते हिंडणं-फिरणं. आमच्या हिची अगदी झोप उडालीय. म्हणून लग्नाची घाई! आता लग्न म्हटलं की काही लाखांची बेगमी हवीच! पण येवढयाने काय होतंय? नंबर दोन,म्हणजे मोठे चिरंजीव आता बारावीला आणि नंबर तीन म्हणजे आमचं शेंडेफळ, धाकटे चिरंजीव दहावीला! पाहिलंत? म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंब एका महान दिव्यातून पार पडतंय. हे दहावी-बारावीचं दिव्य इतकं महान आहे की त्यामानाने माझ्या डोक्यावर असलेली व्हीआरएसची टांगती तलवार हीसुध्दा क्षुल्लकच बाब वाटतेय. आता व्हीआरएस घेतली तर एका मुठीने सातएक लाख मिळतील हे खरं, पण त्याने काय काय होणार आहे? आई बिचारी! तिला वाटतं, हे पैसे हाती आले की आपला मुलगा धनाढय, लखपति होणार! आता तिला कुठे सांगत बसू की हे सात लाख म्हणजे या महागाईच्या राक्षसाच्या तोंडच्या दोन घासांनासुध्दा पुरेसे नाहीत म्हणून? असो. तर मुलीचं लग्न, मुलांची शिक्षणं (आणि नंतर लग्नसुध्दा!) आमची तिघांची दुखणी-बहाणी आणि रोजचं सगळं याला कसं पुरं पडायचं या चिंतेने मी हवालदिल होतोय आणि त्यातच पुन्हा ते फोन! म्हणे लोन घ्या, म्हणे गुंतवणूक करा, टॅक्स फ्री, म्हणे हे अन् म्हणे ते! अरे, 'पैसा खेळता हवा' हे तत्त्व म्हणून ठीक आहे,पण तो कोणी आणि कोणाच्या हातात खेळवायचा? ऑं? आहे उत्तर? या वित्तसंस्थांनी तर पैशाचं खेळणंच करून टाकलंय. अशाच त्या बडया बँकेकडून फोन आला. काय तर म्हणे गुंतवणुकीची नवीन योजना. इथे पैसा पुरवता पुरवता नाकीनऊ येताहेत तर गुंतवणूक काय करतो कपाळ? अरे बाबा, तू इंग्लिशमध्ये बोललास म्हणून मीपण बोलतोय, याचा अर्थ माझे खिसे भरलेत टंच असा नाही होत रे! म्हटलं, 'मला इंटरेस्ट नाही, पण तरी पक्का चिवट तो! शेवटी म्हटलं, 'ये एकदाचा आणि जा बडबडून!'

मग काय? आला ठरल्या वेळी! पढवलेल्या पोपटासारखा माहिती सांगू लागला. वयाचे हिशेब, व्याजाच्या लाभाचे अन् बोनसचे हिशेब सांगून झाले आणि वर हे पण, की आतापर्यंत बँकेने गिऱ्हाईकांना भरमसाठ नफा मिळवून दिलाय, पण 'मार्केट डाऊन' झालं तरी काही ना काही आम्ही तुमच्या पदरी टाकूच! विमासंरक्षण पण देऊ हे सांगितलं आणि मग त्याचे तपशील तो उत्साहाने सांगू लागला. 'नैसर्गिक मृत्यूला तर विमा आहेच, पण बरेच आजार आहेत, अपघात आहे आणि आत्महत्येलासुध्दा यात कव्हर आहे; मात्र ती एक वर्षानंतर केली गेली तरच!' या वाक्यावर मात्र मला हसू आवरलं नाही. थोडंसं गोरंमोरं होत त्याने खुलासा केला, 'म्हणजे मला तसं म्हणायचं नाही. पण योजनेची सगळी माहिती द्यावी लागतेच ना? तशा सुचना आहेत आम्हाला.'

तो गेला, पण माझ्या डोक्यात एक विचित्र कीडा वळवळत ठेवून गेला. कळत नकळत मी विचार करीत राहिलो. शेअर्सचे पैशाचे खेळ खेळण्याचं धाडस माझ्या मध्यमवर्गीय काळजात नाही. माझ्यासारखे गुंतवणूक करणार ती सुरक्षित, सरकारी-निमसरकारी वगैरे प्रकारची. पण त्यात पैसे दुप्पट व्हायलासुध्दा किमान सहा-सात वर्षे लागतात. खाजगी पतपेढयांत जरा लवकर वाढ होते, पण भरवसा काय? कोणीतरी घपला केला की आम्ही टांगलो! म्हणजे नुकसान करून घेऊन पुन्हा तोंडाला काळं फासून घ्यायचंच लक्षण म्हणा ना! त्यापेक्षा हे बरं की!

या विचारासरशी माझा मीच दचकलो! कारण ते जे 'हे' मला बरं असं वाटत होतं ते होतं आत्महत्येच्या मार्गाने समृध्दीचं स्टेशन गाठणं! माय गॉड! एरवी तसा मी भ्याड नाही, पलायनवादीपण नाही. कितीही समस्या पुढे आल्या तरी मी त्यांना चांगलाच पुरा पडतो. एखादी समस्या हाती घेतली की तिचा फडशा पाडायचाच हा आपला खाक्या! मग भले त्यातून आणखी दोन समस्या निर्माण होवोत!! आपण डरपोक नाही. अरे पण पैशाचं सोंग आणायचं कुठून? खर्च तर 'आ'वासून उभे! काय करावं? कसं करावं?

दिवस-रात्र, उठता-बसता, जेवता-खाता, येता-जाता, तोच विचार! अगदी आंघोळ करतानासुध्दा 'भीमरूपी महारुद्रा'ऐवजी 'विम्याचा काळ, त्याचे वार्षिक, षष्मासिक हप्ते, त्याची मॅच्युरिटी अमाऊंट, बोनस किती अन् किती हजारांचे किती लाख होतील? याचेच हिशेब अन् विचार मनात घोंगावू लागले. त्यात पुन्हा व्हीआरएसचे हिशेब. 'ती घेतली तर सात लाख येतील हातात. लेकीच्या लग्नाला, अगदी साधं करायचं म्हटलं तरी दागदागिने, देणीघेणी मिळून दोन लाख तरी हवेतच. नंबर दोन आता बारावीला. त्याच्या इंजिनीयरिंगला खरे तर दोन अगदीच अपुरते, पण सध्या तेवढेच ठेवायचे. नंबर तीन दहावी पास होईल तेव्हा त्याला लाखभर बक्कळ झाले. खरं म्हणजे असा भेदभाव बरा नाही. पण इलाज नाही. हातात येतील तेवढयात सारं जमवायचं. बरं, हे झाले दोन न् दोन चार न् एक पाच, उरले दोन. पैकी एक बायकोच्या नावावर ठेवले पाहिजेत. बस् मग उरलेल्या त्या एकात या योजनेचा शुभारंभ करायचा.' जरा खटकतो नाही हा शब्द? शुभारंभ? पण काय आहे, शेवट गोड तर सारं गोड! बरोबर?

हां! तर मग काय म्हणत होता तो एजंट? एका लाखाचे पंधरा वर्षांचे हप्ते म्हणजे वर्षाला सात. याचा अर्थ पस्तीस हजारात पाच लाखांचा विमा उतरवता येईल. पहिल्या वर्षाचा एक दणदणीत हप्ता भरून टाकायचा. वर्षभराने आत्महत्या केली की मॅच्युरिटी अमाउंटच्या दुप्पट अन् अधिक बोनस वगैरे! म्हणजे... म्हणजे दहा ते अकरा लाख! ग्रँड! म्हणजे फायदा शेअर्ससारखा, पण बाजार घसरण्याचा धोका नाही! गुंतवणूक सुरक्षित अन् फायदा भरपूर, तो पण खात्रीचा!
हे एकदा यशस्वी झालं की सगळयांचेच सगळे प्रश्न चुटकीसरसे सुटतील. मुलीचं लग्न थाटामाटात होईल. नंबर दोनला चांगले गुण मिळाले तर प्रश्नच नाही, पण कमी पडले तरी खाजगी कॉलेजच्या डोनेशनची व्यवस्था आहेच. नंबर तीनचा मोठासा प्रश्न नाही. बी. ए. झाला की लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देईन म्हणतोय. सरकारी अंमलदार व्हायचंय त्याला. त्याला काही मोठासा खर्च नाही. त्याच्यानावे ठेवलेले हवे तसे वापरी ना का? कर म्हणावं लेका मजा बापाच्या जीवावर! मला त्याचा आनंदच वाटेल; अर्थात मला म्हणजे माझ्या आत्म्याला! नाही का? पण हे काय? मला असं उगीचच भरून का येतंय? पण असं करून नाही चालणार. मन घट्ट करून ही योजना पार पाडलीच पाहिजे.

एकेका तपशिलाचा विचार करू लागलो तसतशी ही योजना चांगलीच लाभदायक आहे हे माझ्या ध्यानात येऊ लागलं. येऊनजाऊन प्रश्न होता तो माझ्या 'नसण्याचा!' नाहीतरी काय? कोण कोणाला पुरलाय या जगात? नाही का? माझी या घरातली भूमिका आहे ती कमावत्या पुरुषाची, 'ब्रेड विनर'ची! ती भूमिका निभावणे हे महत्त्वाचं! 'बाय हूक ऑर क्रूक!' बाकी बायको-पोरं समंजस आहेत. त्यांचं हित त्यांना कळतंय. फार फार तर काय? चार दिवस दु:ख करतील. मग आपापल्या मार्गाला लागतीलच ना? लेक आपल्या संसारात रमेल. पोरं आपापल्या अभ्यासात मग्न होतील. लेकीचे तऱ्हेतऱ्हेचे कपडे शिवता शिवता हिचा हात चांगला तयार झालाय. तेव्हा आलेल्या पैशातून तिलापण छानसं 'बुटिक' काढता येईल. नाहीतरी लेक म्हणतेच, 'आई, तू जर बुटिक सुरू केलंस न तर मस्त चालेल बघ. माझ्या सगळया मैत्रिणी तर जळतात बघ माझ्या ड्रेसेसवर. त्यांनापण छानछान ड्रेसेस मिळतील. मग तू काय, यशस्वी उद्योजिका!' एकूण काय? माझ्यावाचून कोणाचं फारसं काही अडणार नाही. तेव्हा?

ठरलं! ही योजना आता शिस्तीत पार पाडायची. आता पुढचा विचार. आत्महत्या कशी करावी? कशी बरं?
अजून एक वर्षाचा अवकाश आहे. व्यवस्थित, सांगोपांग विचार करून एखादा मार्ग शोधून काढता येईल. सर्वप्रथम मी वर्तमानपत्रांतल्या आत्महत्त्यांच्या बातम्या वाचून त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. तशी माझी वृत्तीच अभ्यासू. कोणत्याही विषयाचा नीटपणे साद्यंत अभ्यास करण्याची सवयच अंगवळणी पडून गेलीय, तीर्थरूपांच्या कृपेने! आता जरी ते छडया मारायला या भूतलावर नसले तरी त्यांच्या शिकवणुकीचा पंतोजी मात्र सदैव छडी घेऊन मनात उभा असतो. आताही जणू काही ते सांगताहेत असं वाटतंय, की 'आत्महत्त्या करायचीच असेल तर कर बापडा, पण अभ्यासपूर्वक कर काय करायचं ते आणि यशस्वी होऊन दाखव!' असो.

तेव्हा, बातम्या वाचताना आणि वाचलेल्या आठवताना लक्षात आलं की बरीच माणसं पाण्यात उडी मारून जीव देतात, पण छे! 'प्रथम ग्रासे मक्षिकापात: !' मी पट्टीचा पोहणारा; तेव्हा हा मार्ग माझ्यासाठी कामाचा नाही. ठीक आहे. हरकत नाही. 'सीर सलामत' आहे तोपर्यंत 'मार्ग पच्चास!' काय?

मुंबईच्या आम्हा गरीब जनतेसाठी लोकल ट्रेन हा एक जीव देण्याचा हमखास मार्ग आहे. पण इथेही समस्या आहेच! त्या एका जीवाच्या जीव देण्याने बाकीच्या हजारो जीवांची गैरसोय आणि घालमेल होते त्याचं काय? मला तरी ते प्रशस्त वाटत नाही. शिवाय शरीराचा तो चेंदामेंदा होणं! शी: ! शहारे येतात अंगावर नुसत्या कल्पनेनेच! माझ्या मावसबहिणीच्या नणदेने तर धसकाच घेतलाय त्या लोकल प्रवासाचा. तिच्या डोळयादेखतच म्हणे तसला तो भयंकर अपघात घडला कोणाचा तरी. बिचारी कितीतरी महिने घाबरून उठत होती रात्री-अपरात्री! माझ्या आत्महत्त्येपायी कोणालाही असा काही त्रास व्हावा हे मला मुळीच खपणार नाही. मग ती कोणाच्याही मावसबहिणीची नणंद असो किंवा खाष्ट सासू असो किंवा तो आणखी कोणाचा कोणीही असो. तेव्हा इथेही फुली. पण मग आत्महत्या कशी करावी?
गळफास लावून घेतल्याच्या बातम्या एकसारख्याच येत असतात - 'ओढणीने पंख्याला लटकावून घेऊन ...ने आत्महत्त्या केली.' रोज जवळपास एक-दोन तरी आत्महत्त्या या पध्दतीने घडतातच. म्हणजे हासुध्दा जीव देण्याचा एक मोठा लोकप्रिय प्रकार दिसतोय. ठीक आहे. लेकीच्या ओढण्या काय पुष्कळ पडल्या आहेत घरात. येवढंच की तिच्या वापरून झालेल्या ड्रेसची ओढणी घ्यायला हवी. हो, तिची गैरसोय नको करून ठेवायला मरता मरता! म्हणून मग मी तिच्या ड्रेसेसवर बारीक लक्ष ठेवू लागलो. सहज गाठ मारता येईल अशा तलम ओढणीवाल्या ड्रेसेसबद्दल मी एक-दोनदा तिला म्हटलं पण की, 'काय ग, हा ड्रेस बराच वापरून झाला नाही का तुझा?' तेव्हा तिने अतिशयच आश्चर्याने अन् गोंधळलेल्या मुद्रेने 'माझ्याकडे पाहिलं. झालं असं की ते ड्रेसेस तिने नुकतेच वापरायला काढले होते. 'मला काय कळतंय त्यातलं?' असं पुटपुटत मग मी आपलं पेपरमधे डोकं खुपसून बसलो.

मग सुरक्षिततेचा मार्ग म्हणून बोहारणीला द्यायचे कपडे ही कुठे ठेवते ते सहज म्हणून विचारल्यासारखं दाखवलं आणि त्या बॅगेत माझा जुना शर्ट ठेवण्याचं निमित्त करून ओढणीचा शोध घेऊन ठेवला. पण आता त्या ओढणीची गाठ कशी बांधायची ही नवीनच समस्या माझ्यापुढे उभी राहिली. काय आहे की, वरती एक टोक पंख्याला बांधणं हे मोठंसं कठीण नाही. उंच स्टूल घेतलं की झालं काम.एवढंच की एरवी मी असा चढून पंखा पुसतो तेव्हा ही स्टूल घट्ट धरून खाली उभी असते. आता मला एकटयालाच त्या डुगडुगणाऱ्या स्टुलावर उभं राहून हे काम करावं लागेल, ते पण पडून हाडं मोडून न घेता! बघू, जमेल ते. खरी समस्या यातली ही आहे की, गळयाकडची गाठ कशी बांधायची? तसा टाय बांधता येतो मला, पण त्या पध्दतीचा इथे उपयोग होईल असं वाटत नाही. कोणाला विचारावं तर चोरी. स्वत:च प्रयोग करून शोधावं, तर घरात सारखं कोणी ना कोणी असतंच. कित्येक वर्षांत घरात मी एकटा असा कधी राहिलोच नाही, पण ही गोष्ट एवढया वर्षांत कधी लक्षातच आली नव्हती. याचा अर्थ आणखी एक समस्या! अहो, कसं म्हणजे काय? प्रत्यक्ष कृती म्हणजे आत्महत्या हो - ती करताना मी घरात एकटं असायला हवं; ते कसं साधायचं याचापण विचार करून ठेवायला हवं. एकंदरीत प्रकरण फारच कठीण आहे हे लक्षात येतंय, पण मी धीर सोडला नाही. आधी गाठ मारण्याचं तंत्र कुठून अवगत करता येईल याचा विचार आणि शोध जारी ठेवला. त्याशिवाय इतरही मार्गांचा अभ्यास चालू आहेच की!

काही लोक म्हणे 'टिक ट्वेंटी' वगैरे पिऊन जीव देतात. शी: ! काहीतरीच! असलं काहीतरी घाणेरडया वासाचं न् चवीचं पिऊन मरायचं? छी: ! मी तर आधीच चवी आणि वासांबद्दल विलक्षण चिकित्सक आहे. बायको त्याला 'नाटकं अन् नखरे' म्हणते ते सोडा. पण आपण नाही बाबा असलं काही घाणेरडं पिणार. पुन्हा याची शंभर टक्के खात्री नाही. काहीजणांचा म्हणे प्रयोग फसतोसुध्दा! आणि माझं असं जर काही झालं तर विम्याचे पैसे राहिले बाजूला, उलट मला तुरुंगाचीच हवा खावी लागेल. नाहीतर मग प्रकरण दाबायला चार ठिकाणी आणखी वर हजारो रुपये चारावे लागतील. असो. पण त्यापेक्षा काहीतरी चमचमीत खाऊन मरता आलं तर किती बरं होईल नाही? पहायला हवं. लोक म्हणे चमचमीत खाण्याचा अतिरेक करून गंभीर आजाराने मरतात, पण इथे तर तडकाफडकी परिणाम हवाय! काय बरं करावं? कशी बरं करावी आत्महत्या?

तशी 'टिक ट्वेंटी' शिवाय इतरही विषं असतात म्हणे. पण त्यांची नावं मला कशी कळणार? मी आठवण्याचा प्रयत्न केला. तरुण वयात रहस्यकथा वाचत असे. त्यातले उल्लेख आठवू लागलो. पण काही म्हणता काही आठवेना. मग इकडून तिकडून गोळा करून काही रहस्यकथा वाचून पाहिल्या. माझं हे वाचन पाहून मुलांच्या भुवया उंचावल्या. बायको कुत्सितपणे हसली, पण मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यांच्याचसाठी तर मला हे करणं भाग होतं. उद्या माझ्या मृत्यूनंतर त्यांना डबोलं मिळेल तेव्हा कदाचित त्यांच्या लक्षात माझं हौतात्म्य येईल. मग मात्र त्यांना माझी किंमत कळेल.तेव्हा मी आपला माझा रहस्यकथांचा अभ्यास करीत राहिलो. मात्र विष हस्तगत करणं हे बरंच कठीण काम आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यातून ते हस्तगत केलं आणि ऐनवेळी सिनेमात वगैरे दाखवतात तसं नेमकी मांजराने कुठून तरी येऊन उडी मारली अन् विष सांडून गेलं तर काय करायचं? आली ना पंचाईत? पुन्हा पुन्हा कुठे जायचं ते शोधायला? तेव्हा मग? पुन्हा समस्या! छे: काय करावं? कशी करणार आत्महत्या?

सैन्यातले, पोलिसांतले किंवा खाजगी शस्त्रपरवाना बाळगणारे लोक पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन मरतात म्हणे. मी यांपैकी कोणातच बसत नाही आणि चुकून माकून हातात पिस्तूल गवसलं तरी ते कसं पकडावं इथपासून समस्या! त्यातून ते जमवलं आणि गोळी झाडता आली तरी आयत्यावेळी भीतीने हात कापू लागला तर मस्तकाऐवजी गोळी सुटायची भलतीकडेच पंखा, कपाट किंवा असंच कुठेतरी! सगळीच फजिती!

वर्तमानपत्रांतल्या 'त्या' बातम्यांकडे मात्र मी अगदी जाणून-बुजून दुर्लक्ष करतोय. येतंय काही लक्षात? नाही ना? अहो, मी त्या स्वत:ला पेटवून घेऊन जीव देणाऱ्यांबद्दल बोलतोय. मला तर ती कल्पनासुध्दा सहन होत नाही. का कोण जाणे, पण मला जेवणसुध्दा फार गरमागरम, वाफाळणारं असलं सहन होत नाही. असा वाफाळणारा भात हिने पानात वाढला की मी तर तिच्या अंगावर ओरडतो, 'काय मारायचंय का मला?' आणि ही आपली तोंडाला पदर लावून हास हास हासते. तिचं ते हसणं बघेबघेतो भात जरा निवला की मी शांतपणे जेवतो. अन् तिला हवा असतो वाफाळणारा भात. मग तोवर तिच्या पानातला भात थंड झाला की ती माझ्यावर वैतागते. माझ्याकडे नाराजीने पाहात नाक मुरडते, मान उडवते. ते असो. पण एकूण काय? स्वत:ला जाळून घेणं हे भयंकर आहेच, पण माझ्यासाठी तर ती महाभयंकर, अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. अन् पुन्हा त्या मूर्ख प्रयोगात आपल्याच घराचं नुकसान करायचं? तडफडत मरायचं आणि मग कदाचित 'हुतात्मा' होण्याऐवजी 'भुतात्मा' होऊन बसायचं? सगळा आतबट्टयाचा व्यवहार! मला तर स्वत:ला शांतपणे, चांगल्या रितीने जीव द्यायचाय आणि घरातल्या चीजवस्तूंचं तर जराही नुकसान होऊ द्यायचं नाहीय. शिवाय घरातल्या माझ्या मायेच्या माणसांनाही काही यातायात, त्रास होता कामा नये. या सगळया अटींची पूर्तता करून ही गोष्ट घडवून आणायची तर ती कशी जमेल? काय करावं? कसं करावं?

आता आणखी एक बातमी वाचनात आली. हिल स्टेशनला जाऊन काही लोक म्हणे स्वत:ला एखाद्या कडयावरून लोटून देतात किंवा क्वचित कोणी दुसऱ्यालासुध्दा ढकलतो! त्यावरून आठवलं, मागे महाबळेश्वरला गेलो तेव्हा गाईडने एका पॉईंटवर आम्हाला नेलं होतं आणि माहिती सांगताना तो म्हणाला, 'आणि हा आपला सुसाईड पॉईंट!' त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघं खूप हसलो होतो, अगदी मनसोक्त. तो पॉइंट बरा पडेल का? पण फारच गर्दी असते तिथे. कसं जमायचं एवढया गर्दीतून जीव द्यायला टोकाशी जाणं?

शिवाय आणखी एक समस्या माझ्या ध्यानात येते आहे. समजा अगदी सगळं जमवून आणलंच तरी तिथे दरीत जीव दिल्यानंतर कोल्हे, लांडगे वगैरे मंडळींची चंगळ होईल ही चांगली गोष्ट आहे, पण ती मंडळी काही माझ्या बायको-पोरांना तशा प्रकारचं 'डेथ सर्टीफिकेट' देणार नाहीत. ते देणारे कोल्हे-लांडगे नव्हे माफ करा, ते देणारी मंडळी वेगळीच असतात. म्हणजे आली का पंचाईत? चांगल्या रम्य ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात छानपैकी खुशाल मरावं म्हटलं तरी आपलं साध्य त्याने साधत नाही तर मग उपयोगच काय त्या मरण्याचा?

छे: ! माझं तर डोकं अगदी किट्ट होऊन गेलंय. मरणं जर इतकं कठीण असेल तर त्यापेक्षा जगण्यातल्या समस्या परवडल्या म्हणायच्या की! पहा ना, गेले कित्येक महिने मी यशस्वी, विनासायास, हमखास आत्महत्येचा उपाय शोधतोय, पण तो काही अजून सापडत नाहीय मला. एकूण काय? माझ्या पध्दतीप्रमाणे पूर्वीच्या समस्या उण्यापुऱ्या होत्या तशाच आहेत. त्यात आता या नवीन समस्या! त्याही कोणालाच न समजणाऱ्या! त्यातून बायको-पोरांच्या समस्या वाढू नयेत एवढीच इच्छा आहे. त्यासाठीच ही काळजी. अर्थात मी धीर सोडणाऱ्यातला नाही. माझा अभ्यास मी चालूच ठेवणार आणि व्यवस्थित अभ्यासपूर्ण पध्दतीने एक दिवस ....! पहालच तुम्ही!!....

पण सध्या तरी एक विनंती आहे. पहा जरा, तुम्ही पण विचार करा आणि एखादा चांगला मार्ग सापडला तर जरूर कळवा मला. मात्र हे सगळं तुमच्या-माझ्यातच हं! या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. काय? गळयाशप्पथ, तुमचे उपकार मी आत्महत्या यशस्वी होईपर्यंत विसरणार नाही. खरंच सांगतो.

-मीराताई

(कथा इतरत्र पूर्वप्रकाशित)

कथा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

15 Aug 2013 - 2:38 am | बहुगुणी

"इंटरेस्टींग जर्म" आहे कथेत, मांडणी आवडली, मात्र कथा अपुरी आहे आणि शेवट झालाच नाही असं वाटलं. "भाग २" लिहिता आला तर पहा.

पैसा's picture

15 Aug 2013 - 10:45 am | पैसा

सॉलिड डिटेलिंग आहे. एकूण आत्महत्या करणंही कठीण आहे असं दिसतंय! पण बहुगुणी म्हणतायत तसा दुसरा भाग लिहिता येतो का पहा, नाहीतर कोणी वाचकाने दुसरा भाग लिहायचा प्रयत्न करायला हरकत नाही!

कवितानागेश's picture

15 Aug 2013 - 10:49 am | कवितानागेश

:)
दुसरा भाग कदाचित फसलेल्या प्रयोगांचा लिहता येइल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2013 - 11:07 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच !

प्रयोग यशस्वी झाल्यास मृतात्म्याच्या डूआयडीने पुढचे भाग लिहिता येतील काय याचाही संमंने खुलासा करावा ;)

सुंदर कथा! अपुरी वाटण्याच्या भावनेला +१.

अशीच एक भन्नाट कथा जूल वर्नच्या ट्रायब्यूलेशन्स ऑफ अ चायनामन इन चायना या कादंबरीची आहे.

त्याची कथा (टंकाळा आला आहे म्हणून) इंग्रजीतल्या विकीपानावरून डकवतो:

Kin-Fo is a very wealthy man, who certainly does not lack material possessions. However, he is terribly bored and when news reaches him about his major investment abroad, a bank in the United States, going bankrupt, Kin-Fo decides to die. He signs up for a $200,000 life insurance covering all kinds of accidents, death in war, and even suicide. He rejects seppuku and hanging as means of dying, and is about to take opium laced with poison when he decides that he doesn't want to die without having ever felt a thrill in his life. Kin-Fo hires his old mentor, the philosopher Wang, to murder him before the life insurance expires.

(संपूर्ण विकीपान वाचण्यासाठी स्पॉयलर अलर्ट)

याचा मराठी अनुवाद भा. रा. भागवतांनी "एका चिन्याचा जमालगोटा" या नावाने केला आहे.

प्रीत-मोहर's picture

16 Aug 2013 - 10:30 am | प्रीत-मोहर

वा: मस्तच आहे कथा.
बाकी बहुगुणी काका आणि पैसातैंशी सहमत

विटेकर's picture

16 Aug 2013 - 4:59 pm | विटेकर

कथेची मांड्णी आवडली .. काहीशी नाट्यछ्टेच्या अंगानी जाणारी .. सुरेख नाट्यछ्टा होऊ शकेल !
छान लिहिलय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Aug 2013 - 3:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हि कल्पनाच भन्नाट आहे, आवडली कथा. काहीतरी वेगळ वाचल्याचे समाधान मिळाले.

मीराताई's picture

31 Aug 2013 - 11:20 pm | मीराताई

सर्व वाचकांचे आभार.
या कथेला पुढचा भाग नाही.
....कारण जीवनेच्छा बलवती|

बॅटमॅन's picture

1 Sep 2013 - 2:29 am | बॅटमॅन

भन्नाट हो कथा! आवडली. करुणरम्य अँगल देता आला असताही कदाचित, पण तो टाळलेला दिसतोय.

मुक्त विहारि's picture

1 Sep 2013 - 9:35 am | मुक्त विहारि

आवडला...