मिर्झा बर्जिसचा आणि माझा कित्येक तपांचा पक्का दोस्ताना होता. आमच्या वृत्तीत, स्वभावात आणि कौटुंबीक पार्श्वभूमीत जमीन अस्मानाचा फरक असूनही तो टिकून होता. मिर्झा एका ख्यातनाम नबाबी खानदानातला होता. तो परिस्थितीने पुरता गांजून गेलेला होता. तरीही रक्तात मुरलेली घमेंड, मिजास अजूनही तशीच होती. 'उपरसे शेरवानी और अंदरसे परेशानी' अशा आपल्या केविलवाण्या अवस्थेची जाणीव त्याला वारंवार व्हायची, पण तो पुरता असहाय होता. परिस्थितीवर मात करण्यासाठी काही प्रयत्न करेल तर तो मिर्झा बर्जिस कसला? 'ठेविले अनंते' तैसेची राहून आर्थिक परेशानी लपवून ठेवत आपल्या शेरवानीला मात्र तो प्राणपणाने जपत होता. त्यातच धन्यता मानत होता. शेवटी सुंभ जळाला तरी पीळ जात नाही असे म्हणतात तेच खरे! मग्रुरीने वागलो तरच आपला खानदानी रूबाब समाजाच्या लक्षात येतो असाही या बापड्याचा गोड गैरसमज होता.
एके दिवशी दुपारी आम्ही त्याच्या अलीशान पण पुरता खटारा झालेल्या गाडीतून 'अनारकली'मधे मोजड्या विकत घ्यायला गेलो. मिर्झासाहेबांनी आपल्या गाडीतून खाली उतरण्याची तसदी घेतली नाही. मोठ्या रूबाबात त्याने हॉर्न वाजवला आणि दुकानाच्या मालकाला 'सलीमशाही' मोजड्या दाखवण्याचचं फर्मान सोडलं. या प्रकारच्या मोजड्या मुघल सम्राट वापरायचे असा त्यांचा लौकिक होता. अजूनही गावात शाही खानदानातला असा मिर्झाचा दबदबा होता. दुकानदारानी आपल्या एका चुणचुणीत नोकराला खास त्याच्या तैनातीसाठी धाडलं. दुकानातला मोजड्यांचा एकही प्रकार मिर्झाच्या पसंतीस उतरत नव्हता. तो प्रत्येक नग पाहून तोंड वाकडं करत होता. खरं तर सलीमशाही मोजड्या विकत घेण्याची त्याची ऐपत उरलेली नव्हती. येनकेनप्रकारेण आपला डामडौल दाखवण्यासाठी हौस मात्र फिटलेली नसावी. मला या सार्याच अभद्र प्रकाराचा उबग यायला लागला होता.
मिर्झा अक्षरश: भिकेला लागायचे दिवस आता फार दूर नव्हते. इतक्यात एक आंधळा भिकारी आपल्या चारपाच वर्षांच्या मुलीला घेउन आला. "आंधळ्याला काही धर्म करा बाबा" तो भसाड्या आवाजात किंचाळला. "गरीबाला चार आठ आणे मदत करा बाबा, चार दिवस खायाला न्हाई", त्याच्या मुलीनी दीनवाण्या आवाजात विनवणी केली. मिर्झानी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं, पण त्यांचा ओरडा काही थांबला नाही. शेवटी वैतागून मिर्झा किंचाळला, "चला, व्हा पुढं!". यावर त्या मुलीनी चक्क आपला फाटका फ्रॉक वर करत खपाटीला गेलेलं पोट दाखवलं. मिर्झा पुटपुटला, "साली बेशरम जात! पैसे मिळवायला वाट्टेल ते करतील." तो पुन्हा जोराने खेकसला, "चला पुढे व्हा! बेशरम!!!". भिकारी यावर जागचा हलला नाही. मिर्झानी आपलं दारिद्र्य झाकण्याची ती सुवर्णसंधी दवडली नाही. रागारागाने त्याने आपली गाडी सुरू केली आणि 'अनारकली'मधून काहीही खरेदी न करताच आम्ही परत फिरलो.
या घटनेनंतर काही महिन्यांनी आम्ही एका चित्रपटाला गेलो. चित्रपटात नाविन्य म्हणाल तर नावालाही नव्हतं. उलट अगदी ठरावीक साचेबंद 'मसाला' खचाखच भरलेला होता. नायिका मात्र फटाकडी होती. अभिनय बेताचाच असला तरी दिसायला, नाचायला जोरदार होती. तेवढी एकच जमेची बाजू असली तरी नायिकेमुळे चित्रपट किमान सुसह्य तरी होत होता. मिर्झा नायिकेच्या अदाकारीत पुरता गुंगला होता. कथानकाकडे बहुधा माझंच लक्ष असावं. त्यात नाममात्रही सुसंगती नव्हती. बँकेतल्या एका कनिष्ठ लिपीकाच्या आयुष्याभोवती गोष्ट गुंफलेली होती. या भल्या माणसावर अफरातफरीचा खोटा आळ येतो. हाय खाउन त्याची पत्नी मरते. त्याचा एकुलता एक मुलगा (बहुधा भावी नायक) आपल्या आजीसोबत रहायला लागतो. घरातला कर्ता माणूस तुरूंगात गेल्याने त्यांच्यावर एकदम भीक मागायची वेळ येते. दोघे जोडीने मुंबईतल्या एका बकाल वस्तीतला गजबजलेल्या चौकात पदपाथावर बसून भयाण पार्श्वसंगीताच्या साथीने भसाड्या आवाजात गात भीक मागायला लागतात.
एकीकडे हा प्रसंग सुरू होता, इतक्यात मिर्झा अचानक मला म्हणाला, "तुझा हातरूमाल मिळेल का जरा? मी बहुधा घरीच विसरून आलो आहे." मी निमूटपणे त्याला आपला हातरूमाल दिला. माझ्या लक्षात आलं, की त्या प्रसंगानंतर शेवटपर्यंत मिर्झाची सतत तगमग सुरू होती. त्याला आपल्या भविष्याची चाहूल अस्वस्थ करत असावी. चित्रपट संपल्यावरही तो डोळे पुसतच आपल्या खुर्चीतून उठला. मी सहजच विचारलं, "मिर्झा, तू लेका चक्क रडत होतास की काय?" शरमेने त्याची मान खाली झुकली. पुन्हा उसनं आवसान आणून तो म्हणाला, "मुळीच नाही. माझ्या डोळ्यात सिगारेटचा धूर गेला होता!" त्याच्या आवाजातला कंप स्पष्टपणे जाणवत होता. मला तो काळजाला चरे पाडणारा वाटला.
मिर्झा अचानक उन्मादाचा झटका आल्यासारखा किंचाळला, "दारिद्र्याचं हे असलं उघडं नागडं प्रदर्शन मांडणार्या तथाकथित कलाकारांना चाबकानी फोडून काढायला हवं. असल्या चित्रपटांवर सेन्सॉरनीच बंदी घालायला हवी". एवढं बोलून तो अचानक माझ्या हाताचा आधार घेत मटकन खाली बसला. नंतरची चार क्षण टिकलेली शांतता मला स्मशानशांततेसारखी वाटली. स्वत:ला सावरत मिर्झानी मला प्रश्न विचारला, "एवढे पैसे खर्च करून, उधारी करून प्रेक्षक काय हे दारिद्र्य बघायला येतात? या कल्पनादारिद्र्याचा तुला संताप नाही का येत?" मी बिचारा या प्रश्नाचं काय उत्तर देणार होतो? काहीतरी थातुरमातुर उत्तर देणार, इतक्यात ओलावलेल्या पापण्यांची प्रकर्षाने जाणीव झाली. डोळ्यातून नकळत ओघळलेल्या दोन चुकार अश्रूंनीच मिर्झाच्या प्रश्नाचं खरं उत्तर देउन टाकलेलं होतं.
(संकल्पना एका पाश्चात्य लघुकथेवर आधारित)
प्रतिक्रिया
20 Apr 2013 - 5:44 pm | अक्षया
आवडला. :)
20 Apr 2013 - 5:49 pm | पैसा
सुरेख भावानुवाद!
20 Apr 2013 - 6:16 pm | कवितानागेश
छान. :)
20 Apr 2013 - 6:35 pm | अर्धवटराव
देशी बाज अगदी व्यवस्थीत नटला भावानुवादात.
अवांतरः शिर्षक वाचुन हे कुठल्या तरी धाग्याचं विडंबन आहे कि काय असं वाटलं :)
20 Apr 2013 - 10:52 pm | बॅटमॅन
तंतोतंत =))
पण कथा वाचून मस्त वाटलं. छानच उतरलीये!!!
20 Apr 2013 - 6:38 pm | प्यारे१
हम्म्म्म.
छान लिहिलाय.
20 Apr 2013 - 9:53 pm | सस्नेह
जमलंय !
20 Apr 2013 - 11:35 pm | इनिगोय
+१
23 Apr 2013 - 7:08 pm | तिमा
++१, छान लिहिलंय, शेवटपर्यंत पाश्चात्य गोष्टीवर आधारित आहे हे कळले नाही, हीच यशाची पावती.
21 Apr 2013 - 1:11 pm | स्पंदना
आवडला भावनुवाद. मस्त.
21 Apr 2013 - 7:15 pm | मुक्त विहारि
आवडला..
हे असे मिर्झा खूप बघितले आहेत...
22 Apr 2013 - 1:46 pm | नगरीनिरंजन
क्लास!
23 Apr 2013 - 4:15 pm | Dhananjay Borgaonkar
मस्त.
असले मिर्झा खुप पाहिले आहेत. नसलेली श्रीमंती,ज्ञान,तारुण्याची शेरवानी सांभाळत बसलेले :)
23 Apr 2013 - 5:48 pm | राघव
छान लिहिलंय. :)
राघव
23 Apr 2013 - 7:22 pm | उपास
शेवटी त्या मिर्झाला आठवण करुन द्यायला हवी का मोजडीच्या प्रसंगाची.. !!
24 Apr 2013 - 1:48 am | मोदक
जमलंय.. :)
24 Apr 2013 - 4:17 am | शुचि
अत्यंत करुण!!!! आजच एक सुंदर वाक्य वाचनात आले - व्हेअरेव्हर देअर इज ह्युमन बीइंग, देअर इज अ चान्स फॉर काईंड्नेस.
24 Apr 2013 - 10:17 am | मन१
उत्तम उतरलय.