केळ्याच्या पूर्‍या

Primary tabs

स्पंदना's picture
स्पंदना in अन्न हे पूर्णब्रह्म
3 Apr 2013 - 4:13 am

तर मंडळी झाल काय की सहज फिरायला म्हणुन २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात आलो होतो. आता सहकुटुंब अस बाहेर फिरणं काही सोप्प नसत हो. त्यात मुलबाळं बरोबर. मग अस फिरताना बरोबर थोडी फळ ठेवणं साहजिकच आहे नाहे का? तर ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टला मी अशीच एका सुपर मार्केट मध्ये शिरले. कुठं काय, कुठं काय, घेत घेत, आपल नेहमीचं, "गरिबांच फळ" केळी उचलली. आता केळी घेताना आपण ती कायमच घडाने घेतो ना? निदान डझनावर तरी! तशीच आपली उचलली अन चालले कॅश काउंटरकडे . तिथल्या एका हेल्परने मला मध्येच हटकलं अन विचारल, " हे! बाइंग सो मेनी बनानाज? हॅव यु चेक्ड द प्राइस?" च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या. भारतिय दिसले म्हणुन काय अगदी केळी खरेदी करायचीपण लायकी नाही की काय? ऑ?
गेले तशीच ठुमकत कॅश काऊटरवर. तर कॅशियरला एऽऽव्हढी केळी बघुन घाम फुटला राव! म्हणतो, " डिअर, दिज बनानाज आर ट्वेल्व्ह डॉलर्स किलो! आर यु शुअर यु स्टिल वाँट टु बाय ?"
आता माझी अवस्था त्या गोष्टीतल्या गरिब ब्राम्हणासारखी झाली. एका ठगाने विचारलं," हे वासरु कुठे घेउन निघालाय?" दुसरा हटकतो, " कुत्रं का खांद्यावर घेतलय?" म्हंटल नक्की भानगड काय?
तर कळलं की ऑस्ट्रेलियाची सुपिक भुमी, म्हणजे ऑस्सी कोकण, पूरग्रस्त झाल्याने तिथेली सारी शेतं वाहुन गेली. अन केळ्याच्या बागा उध्वस्त झाल्याने, केळ्यांचे भाव आभाळाल भिडले आहेत.
म्हणजे हे गरिबांच फळ अगदी श्रीमंतांचेही डोळे पांढरे करायला निघालं होतं. " कालाय तस्मै नमः।"
सहजच मनात आलं, आपल्याकडे नव्या नवरी बरोबर शिदोरी म्हणुन बर्‍याचदा केळी पाठवली जातात. निदान गावाकडे तरी. बरं झाल पाश्च्यात्त देशात ही "शिदोरीची" भानगड नाही. नाहीतर काय द्यायच दरवेळी मुलगी निघाली तर; नाही का?
आता ही शेती पुन्हा भरभराटीला यायला जवळ जवळ दोन वर्षे गेली. अन तोवर आम्ही आमच बिर्‍हाड ऑस्ट्रेलियाला हलवलं होतं. मग नेहमी "केऽऽळी !" असं जरा कमी महत्त्व देउन उच्चारायचं फळ आता " कितीला आहे नेमकं?" असा भाव तपासून घेणे अंगवळणी पडलं.
त्यातूनच सुरु झाली, एव्हढं महागामोलाचं फळ टाकुन न देण्याची कसरत. केळ्यांच काय असतं, तर ती पिकली की काळी पडतात, अन साधारण मऊ होतात. असा काळपटपणा दिसला रे दिसला की बच्चे कंपणी नाक मुरडुन ती खायला तयार होत नाहीत. मग त्याचा शिरा करुन झाला. अहो पण एकावेळी चार माणसांच्या शिर्‍यात तुम्ही जास्तीत जास्त एक केळं मिसळु शकता! रव्यात केळ मिसळायच असत म्हंटल, केळ्यात रवा नाही. अशीच एकदा; साधारण काळी पडलेली केळी उचलुन टाकायला निघाले, पण माझ्यातली गृहीणी, अन कृषक कन्या, ( प्रत्येक भाताचा कण, शिजायला १५ मिनिटं लागत असतील पण तो शेतात चार महिने उभा असतो अस मी अगदी ठासुन सांगत असते मुलांना) काही; ती केळी तशी टाकायला तयार होइना. मग लढवल डोकं, अन केल्या त्याच्या पूर्‍या.
अगदी सोप्प्या! अजिबात गोड होत नाहीत, खुसखुशीत, अन चहाची लज्जत वाढवणार्‍या.
तर घ्या मंडळी घरातलेच चार जिन्नस घेउन करा पिकल्या केळ्यांच्या पूर्‍या!
चला साहित्य घ्या.
किती केळी आहेत काळपटलेली?
एका केळाला साधारण एक कप गव्हाचे पिठ म्हणजे कोरडी कणिक. मी दोन केळ्यांचे प्रमाण वापरलं आहे.
तर साहित्यः-
२ पिकुन काळपटलेली केळी
२ वाट्या कणिक.
१ टेबलस्पून घरच तूप.
१ टीस्पून मिठ.
तळायला तेल.
ithe

केळी हाताने कुस्करुन त्यात तूप अन मिठ मिसळुन घ्या.
ithe

आता त्यात मावेल तेव्हढी कणिक घाला. वरुन अजिबात पाणी घालायचं नाही. छानसा गोळा तयार करुन घ्या.
ithe
मी साधारण चहा करताना या पूर्‍या तळते, तोंवर हे तयार केलेलं पिठ फ्रिज मध्ये अगदी दोन तिन दिवस छान रहात.
आता एक चपातीच्या आकाराची पात लाटा अन वाटीने पूर्‍या कातून घ्या.
ithe
तळा.
हां हां हां! इथे जरा जपून हं. कारण हे पिठ इतकं हलक असत की पूर्‍या लगेच तांबूस होउन जळायची शक्यता असते, म्हणुन जरा लक्ष देउन ! बाकि काही नाही.
ithe
चला! या खायला!
ithe

__/\__
अपर्णा.

प्रतिक्रिया

किलमाऊस्की's picture

3 Apr 2013 - 4:19 am | किलमाऊस्की

मस्त!!

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 4:30 am | श्रीरंग_जोशी

एका कल्पक पाककृतीची रोचक जन्मकहाणी आवडली.

फोटोज झकास आहेत.

आनन्दिता's picture

3 Apr 2013 - 5:09 am | आनन्दिता

काय सुंदर लिहीतेस ग!!

पाक्रु पण आवडली अन पुर्यांचे आकार सुद्धा!!
शेवटच्या फोटोतली रेड डीश आहे ना ती माझ्या लहानपणापासुनच्या लाडक्या डीश सारखीच आहे.. ती मी इथे येतानाही सोबत आणलीय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Apr 2013 - 10:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी

पाक्रु आवडली.
आणि अपर्णातै छान लिहीतात या बद्दल वादच नाही, पण त्या खुप कमी लिहीतात हि तक्रार आहे.

ठिक आहे आनंदिता, आजपासुन ती डिश आनंदिताताईची अस म्हणायला लागते, म्हणजे मुलं फॉलो करतील. तेव्हढीच एक सोय डिश ओळखायची. म्हणजे कस, लग्नातली कढई, दुधाचे पातेले, तसं आनंदिताची डिश.

आनन्दिता's picture

4 Apr 2013 - 8:57 am | आनन्दिता

जोरदार अनुमोदन!!! :)

रेवती's picture

3 Apr 2013 - 5:18 am | रेवती

पुर्‍या आणि फोटू आवडले. निळ्या वाट्या आवडल्या. कांगारूंच्या देशातील वाहून गेलेल्या केळ्याच्या बागेची कहाणी ऐकून आता मीही घडाचे दर बघणार, एरवी जितकी हवी तितकी उचलली जातात. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2013 - 8:16 am | अत्रुप्त आत्मा

:)

प्रचेतस's picture

3 Apr 2013 - 8:36 am | प्रचेतस

मस्त.

यशोधरा's picture

3 Apr 2013 - 8:53 am | यशोधरा

मस्तच :)

अवांतरः सद्ध्याच तुमच्या तिथे आऑमसं झालं त्याला गेला होतात का?

स्पंदना's picture

3 Apr 2013 - 9:32 am | स्पंदना

अऑमस सिडनीत होतं.
मी राह्यले मेल्याबर्नात.
गेले होते काहिजण, पण मी इकडे ममत हजेरी लावलीय. आता नविन टिम बनते आहे, त्यामुळे, ममत व्यस्त आहे. अर्थात आमच्या तर्फे दोन नाटक पाठवली होती. बरी झाली.

यशोधरा's picture

3 Apr 2013 - 9:50 am | यशोधरा

भारी की! नाटकवाल्या बै झाल्यात तुम्ही :) संहिता कोणत्या? की तुमच्यापैकीच लिहिली?

स्पा's picture

3 Apr 2013 - 9:24 am | स्पा

सही लिहिल्येस ग

यम्मी दिसतायेत पुर्या :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2013 - 10:04 am | प्रभाकर पेठकर

व्वा! पिकलेल्या केळ्यांची कहाणी मस्त.

कांही बेकरीवाले, जास्त पिकलेली केळी स्वस्तात विकत घेऊन 'कप केक' मध्ये वापरतात. त्यामुळे साखर कमी लागते.

श्रिया's picture

3 Apr 2013 - 10:21 am | श्रिया

मस्त पाककृती! अगदी मऊ केळाच्या पुर्‍या असूनही छान फुगल्या आहेत.

ऋषिकेश's picture

3 Apr 2013 - 10:24 am | ऋषिकेश

छान!
लिहिण्याची शैली विशेष आवडली!

दिपक.कुवेत's picture

3 Apr 2013 - 12:09 pm | दिपक.कुवेत

ती लिहिण्याची शैली सगळच आवडेश. पण कणिक हातानी का मळली नाहि?

पिकलेल्या केळ्याचे काय करायचे हा प्रश्न सुटला !
बादवे, अपर्णा, कणकेत चिमुटभर पिस्ता कलर टाकला तर भारी दिसतील नै ?

पाकृ बरोबरच तुझ्या खुमासदार शैलीतलं लेखनही आवडलं. :)

कच्ची कैरी's picture

3 Apr 2013 - 12:42 pm | कच्ची कैरी

अरे व्वा उपयुक्त पाककृती !

धनुअमिता's picture

3 Apr 2013 - 1:14 pm | धनुअमिता

छान दिसतायेत पुर्‍या.
मस्त लिहीले आहे.

त्या हार्ट शेप पुऱ्या पाहून आश्चर्य वाटले. हल्ली अश्याच असतात की हा एक तुमच्या कल्पकतेचा भाग ?

कवितानागेश's picture

3 Apr 2013 - 2:21 pm | कवितानागेश

मस्त झाल्यायत. :)

मस्त पाकृ. पण वाटी किंवा कोणताही साचा वापरुन केलेल्या पुर्‍या अज्जिबात आवडत नाहीत.

सानिकास्वप्निल's picture

3 Apr 2013 - 3:39 pm | सानिकास्वप्निल

दिल शेप पुर्‍या बघून दिल खुश हो गया अपर्णाताई :)

nishant's picture

3 Apr 2013 - 3:53 pm | nishant

पाक्रु आणि तुमचे लेखन दोन्हि मस्त :)

प्यारे१'s picture

3 Apr 2013 - 4:12 pm | प्यारे१

काय ऊत आलाय नुसता एकेकीला पाकृ करायला! ;)
चांगली झाली आहे पुरी. ह्ह्ह्ह!

ह्या पुर्‍या सुद्धा तिखट - गोड होतील व चहाचा लुफ्त अजुन वाढेल......हा फक्त माझा अंदाज

स्पंदना's picture

3 Apr 2013 - 4:18 pm | स्पंदना

सार्‍यांना धन्यवाद.
दिपक.कुवेत मी हाताने मळत बसले कणिक तर फोटो कसे काढायचे?
प्रपे काका आयडीयाची कल्पना मस्त.
तर्री काका अहो लहान मुलांच घर आहे, आकार बदलला की चव बदलते त्यांची. माझ्याकडे तर शंकरपाळेपण कुठ बदक, ट्री, कप अश्या शेपमध्ये असतात.
आणि सुड भाऊ, नका हो असा सूड घेऊ. जरा कमी काम लागत आम्हाला. स्वयंपाक हा आवडीचा अन सवडीचा नसतो, सगळ्या बाहेरच्या कामानंतर येउन घरचा घास मिळावा सर्वांना या आस्थेपोटी असतो. तेंव्हा मारला थोडा शॉर्टकट तर चालावा.
स्नेहांकिता पिस्ता कलर घालुन पहाते.
बाकि अन्न हे पूर्णब्रह्मच्या मृणालिनी, सानिका, अन रेवती यांचे आभार.

चवीचे जावू देत , पण आकार आंइ लेखनशैलीवर फुल्ल टु फिदा :)

मस्त दिसतायत पुर्‍या.. पुर्‍यांचा आकारही आवडला.
मी असेच केळ्याचे गोड पराठेही करते.. छान लागतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2013 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरी मस्तच. पण, पुरीचा पूर्वार्ध मला आवडला. ऑष्ट्रेलियातबी द्ष्काळ पडलाय, केळीच्या बागांची वाट लागली तेव्हा मह्या मनात विचार आला. माणसं कुठवर बी जाऊ दे. लोकांचं सुकदुक जिकडं तिकडं सेमच असतं असं वाटलं.

>>>माझ्यातली गृहीणी, अन कृषक कन्या, ( प्रत्येक भाताचा कण, शिजायला १५ मिनिटं लागत असतील पण तो शेतात चार महिने उभा असतो अस मी अगदी ठासुन सांगत असते मुलांना.

व्वा. इथं मी तुमच्या पायावर डोकं ठेवलंय असं चित्र डोळ्यासमोर आणा. :)

-दिलेप बिरुटे

माझी आई खूपदा करायची या पुय्रा, शाळेतून आल्यावर चहाबरोबर खायला!! ती पण ह्या पुय्रा वाटीनेच छोटे गोल करून तळायची, बिस्कीटांच्या आकारात!!

अभ्या..'s picture

4 Apr 2013 - 3:11 am | अभ्या..

छान हो अपर्णातै.
अगदी छान पुर्‍या झाल्यात. पिझ्झा पुरीसारख्याच इनोव्हेटीव्ह.
चवीला कशा लागल्या? जरा जरा सत्यनारायणाच्या प्रसादाची आठवण आली काय? ;)

प्रीत-मोहर's picture

4 Apr 2013 - 9:08 am | प्रीत-मोहर

मस्तच ग. पण आमच्याकडॅ केळी एवढी पिकेस्तोवर टिकतच नैत ना!!!

इन्दुसुता's picture

5 Apr 2013 - 8:12 am | इन्दुसुता

गेल्याच आठवड्यात केल्या होत्या. ( आणि खरं तर पाकृ देण्याचाही विचार केला होता २ क्षण )!
पण मी या पुर्‍या नेहमी तिखटाच्याच करते. नेहमीच्या तिखट मीठाच्या पुर्‍यांच्या कणकेमध्ये शिजवलेली केळी घालून... खूपच आवडता पदार्थ. :)

निवेदिता-ताई's picture

5 Apr 2013 - 9:13 am | निवेदिता-ताई

नविन प्रकार...अजुन कधी खाल्ला नाहीय...पण करुन पाहीन.

मदनबाण's picture

6 Apr 2013 - 9:37 am | मदनबाण

अरे वा... वेगळीच पाकॄ. :)
ते मोठी राजेळी केळी असतात ना...त्याची ती भरलेलीकेळी करतात ती तर शॉलिट्ट लागतात ! :)

बाप रे! क्षुल्लक केळी ती काय अन इतकी महाग? : (
पुर्‍यांचा आकार मस्तच. पाकृ ही आवडली.

दीपा माने's picture

10 Apr 2013 - 4:45 am | दीपा माने

अपर्णाताई बनाना कपकेक्स करत्ताना ह्या पुर्‍यांचीही कल्पना डोक्यात आली होती पण वाटले होते की पुर्‍यांना आंबुसपणा येईल की काय, पण तुमचा प्रयोग पाहुन आता करायलाच घेते.

सहज's picture

10 Apr 2013 - 11:26 am | सहज

केल्या. खाल्या.

मुख्य म्हणजे जास्त पिकलेली केळी वाया न गेल्याचे समाधान मिळाले :-)

त्रिवेणी's picture

12 Apr 2013 - 8:31 pm | त्रिवेणी

"च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या. भारतिय दिसले म्हणुन काय अगदी केळी खरेदी करायचीपण लायकी नाही की काय? ऑ?"
च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या. भारतिय दिसले म्हणुन काय अगदी केळी खरेदी करायचीपण लायकी नाही की काय? ऑ?
मस्त.
मला पुर्‍या त्या माशाच्या प्लेट सहित हव्यात.

पैसा's picture

13 Apr 2013 - 7:42 pm | पैसा

मी काही दिवसांपूर्वी खूप पिकी केळी संपवण्यासाठी मिपा आणि फेसबुकवरच्या लोकांची डोकी खाऊन या पुर्‍या आणि केळ्याच्या हलव्याच्या पाकृ मिळवल्या होत्या, त्याची आठवण झाली!

पुर्‍यांची कहाणी नेहमीप्रमाणे अपर्णा इश्टाईल!