आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
19 Feb 2013 - 10:00 pm

आयटीच्या गोष्टी - नमन

कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. आता जोपर्यंत हे पुढचं काम येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच कधी येता कधी जाता, ऑफीसमध्ये काय करता हे विचारत नाही. कंपनीची अपेक्षा एव्हढीच असते की तुम्ही ऑफीसला नऊ तास भरायचे. तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफीसला जाता. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता. दहा ते बारा या वेळात यच्चयावत वृत्तपत्रांच्या आंतरजालीय आवृत्त्या चाळता. बारा वाजता सबवे काउंटरवर जाऊन मस्त एक फुट लाँग हाणता. जमलं तर बाहेर येऊन मोसंबीचा रस वगैरे पिता. डोळे मिटू लागले आहेत याची जाणिव होताच डॉर्ममध्ये अगदी संध्याकाळचे चार वाजेपर्यंत ताणून देता. चार वाजता उठून फ्रेश होता. कँटीनला येऊन मस्त एक चहा घेता. थोडा वेळ जिमला जातात. नंतर क्रिकेट ग्राऊंडला एखादा फेरफटका मारता. साडे सहा वाजायला थोडा वेळ असेल तर एखादा बकरा पकडून त्याला पकवत बसता. आणि साडे सहा वाजताच बाईकला किक मारून घरी सुसाट सुटता. एव्हढं सारं करुनही तुम्हाला महिना अखेरीस पुर्ण पगार मिळतो.

कशी वाटली कल्पना?

आता अ़जून एक कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. तुम्ही ऑफीसला येऊन नुसती हजेरी लावण्याला प्रचंड कंटाळले आहात. अचानक एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफीसला येऊ नका. कदाचित अजून दोनेक महिने तुम्हाला घरी राहावं लागेल. महिना अखेरीस तुमचा पुर्ण पगार तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्यासाठी काम आलं की आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ.

कशी वाटली कल्पना?

आता तिसरी कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अमुक अमुक ट्रेनिंगला नॉमिनेट करतो. तुम्ही आनंदाने उडया मारायला लागता. हे तेच ट्रेनिंग असतं जे त्याची फी जास्त असल्यामुळे आणि ऑफीसमधून एक महिना सुटटी मिळणे शक्य नसल्यामुळे तुम्ही पुढे ढकललेलं असतं. आणि इथे तर कंपनी चक्क त्यांच्या पैशाने ते ट्रेनिंग द्यायला तयार असते. ते ही तुम्हाला महिन्याचा पुर्ण पगार देऊन.

कशी वाटली कल्पना?

तुम्ही जर नॉन आयटी इंडस्ट्रीत असाल तर या कल्पना कल्पनाच राहतील. पण तुम्ही जर आयटीत असाल तर मात्र या कल्पना वास्तवात उतरू शकतात. नव्हे, मोठया आयटी कंपन्यांमध्ये जवळपास वीस ते तीस टक्के कर्मचार्‍यांना हे भाग्य (किंवा दुर्भाग्य; कसे ते पुढे पाहू) लाभण्याची दाट शक्यता असते.

आयटी कंपन्यांमध्ये काही कर्मचारी राखीव असतात. या कर्मचार्‍यांना बेंच रीसोर्सेस असं म्हणतात. मोठया आयटी कंपन्यांमध्ये तर अगदी एकुण कर्मचारी संख्येच्या वीस ते तीस टक्के कर्मचारी राखीव असतात. हे राखीव कर्मचारी सहसा उत्पादक काम करत नसल्यामुळे कंपनीला त्यांच्यापासून थेट उत्पन्न असे नसतेच. आणि तरीही या राखीव कर्मचार्‍यांना कंपनीला महिना अखेरीस पुर्ण पगार द्यावा लागतो.

आयटीतील बेंच ही संकल्पना सांघिक खेळांमधील बेंच या संकल्पनेवर आधारीत आहे. काही सांघिक खेळांमध्ये प्रत्यक्ष खेळणार्‍या खेळाडूंबरोबर न खेळणारे पण गरज पडली तर खेळू शकणारे खेळाडू संघात ठेवावे लागतात. आयटीतील बेंच असाच आहे. आयटी कंपन्यांना प्रत्यक्ष काम न करणारे परंतू गरज पडल्यावर लगेच काम करु शकणारे काही राखीव कर्मचारी ठेवावे लागतात.

हे सारं आपण जरा अधिक विस्ताराने पाहूया.

आयटी कंपन्या दोन प्रकारच्या असतात.

१. स्वतःची विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणार्‍या (प्रोडक्ट बेस्ड)
२. ग्राहकाच्या गरजेनुसार संगणक क्षेत्रातील सेवा पुरवणार्‍या (सर्व्हीस बेस्ड)

प्रोडक्ट बेस्ड कंपन्या म्हणजे स्वतःचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन बनवून ते बाजारात विकणार्‍या कंपन्या. उदा. मायक्रोसॉफ्ट जी एमएस ऑफीस, एमएस विंडोज असे प्रोडक्ट्स बनवते. किंवा टॅली सोल्युशन्स ही भारतीय आयटी कंपनी जी टॅली नावाचं प्रोडक्ट बनवते.

सर्व्हीस बेस्ड कंपन्या म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार संगणकीय सेवा देणार्‍या आयटी कंपन्या. बर्‍याचशा भारतीय आयटी कंपन्या आणि भारतातू काम करणार्‍या बर्‍याचशा परदेशी कंपन्या या प्रकारात मोडतात.

काही वेळा एकच आयटी कंपनी प्रोडक्ट बेस्ड आणि त्याच वेळी सर्वीस बेस्ड असू शकते. पण अशा कंपन्या खुपच कमी असतात.

सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांचे तेल आणि नैसर्गिक वायू, औषध निर्माण, दुरसंचार, मिडीया अशा इतर विविध उद्योगक्षेत्रातील कंपन्यांबरोबर संगणकीय सेवा पुरवण्याचे करार असतात. इथे आयटी कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडर असते आणि कोअरमधील कंपनी क्लायंट. आयटी कंपनीसाठी ते एक प्रकारचं खातंच असतं. म्हणून या कराराला अकाऊंट म्हणतात. एका अकाऊंट मध्ये म्हणजेच एका क्लायंटकडे त्याच्या व्यवसायाचे सेल्स, मार्केटींग, एचार, प्रोडक्शन असे अनेक विभाग असतात. आणि या वेगवेगळ्या विभागांना सर्व्हीस प्रोव्हायडरकडून त्यांचे काम संगणकीकृत करायचे असते. त्यासाठी अनेक छोटया मोठया संगणक प्रणाल्या बनवल्या जातात. सर्वसाधारणपणे एक संगणक प्रणाली बनवण्याचे काम किंवा बनवल्यानंतर तिची देखभाल करण्याचे काम म्हणजे एक प्रोजेक्ट असा हीशोब असतो. या प्रोजेक्टवर अ‍ॅप्लिकेशन डीझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टींग, डेटाबेस असे विविध कौशल्य असणारी एक किंवा एकापेक्षा अधिक माणसं कार्यरत असतात.

बरेच वेळा होतं काय, सर्व्हीस प्रोव्हायडर आयटी कंपनीकडे एखादा नवा क्लायंट येतो. किंवा जुन्या क्लायंटला त्याच्या एखाद्या विभागासाठी एखादी अदययावत संगणक प्रणाली बनवून हवी असते. किंवा त्या क्लायंटला त्याचा आधीचा सर्व्हीस प्रोव्हायडर चांगल्या दर्जाची सेवा देत नाही म्हणून दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडून ते काम करुन घ्यायचे असते. ईथपर्यंतही ठीक आहे. पण ह्या क्लायंटला त्याचे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे असते. कारण त्यासाठी तो भरमसाट किंमत मोजायला तयार असतो. जर एखाद्या सर्व्हीस प्रोव्हायडरने काम लगेच सुरु करण्यात असमर्थता दाखवली तर क्लायंट लगेच दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडे जाण्याची शक्यता असते.

क्लायंट लाख म्हणेल की मी जर एव्हढे पैसे मोजतोय तर माझे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे. पण सर्व्हीस प्रोव्हायडरने त्या कामासाठी आवश्यक असणारे कौशल्य असणारी माणसे अगदी आताच कुठून आणायची? आयटी मधला नोकर भरती हा प्रचंड वेळखाऊ प्रकार आहे. नविन भरतीची जाहीरात देणे, उमेदवारांचे नोकरीच्या अर्जांची छाननी करुन त्यातल्या त्यात योग्य वाटणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणं, मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांशी पगाराची घासाघीस करुन त्यांना निवडपत्र देणं, तो उमेदवार आधीच दुसर्‍या आयटी कंपनीत काम करत असल्यामुळे त्याच्यासाठी दोन तीन महिने थांबणं याच्यात कधी कधी अगदी सहा महिनेसुद्धा जातात. बरं एहढं सारं केल्यानंतर तो उमेदवार दुसर्‍याच कंपनीत जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग क्लायंटला आज आणि आताच नविन माणसं कुठून द्यायची.

या समस्येवरचा उपाय म्हणजे बेंच.

प्रत्यक्षात कर्मचार्‍यांची गरज नसतानाही नविन भरती करुन ठेवायची. जसे काम येईल तशी ही नविन भरती केलेली माणसं त्या कामावर रुजू करायची. मोठया आयटी कंपन्यांमध्ये वर्षाचे बारा महिने नोकर भरती सुरु असते ती यामुळेच.

बरेच वेळा एखादा चालू असलेला प्रोजेक्ट संपतो. त्या प्रोजेक्टमधल्या माणसांना दुसरे काम मिळेपर्यंत ती माणसेही बेंचवर जातात.

ही बेंचवरची माणसे वर कल्पना म्हणून वर्णन केलेल्या सोयींचा लाभ घेऊ शकतात. अर्थात ते बरंचसं कंपनीवर अवलंबून असतं सार्‍याच कंपन्यांत हे असं होतंच असं नाही. किंवा होत असलं तरी अगदी असंच होतं असंही नाही.

बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांना पुर्ण पगार द्यावा लागत असल्यामुळे आयटी कंपन्यांसाठी बेंच हा प्रकार "असून अडचण नसून खोळंबा" असा असतो.

ही झाली कंपनीची बाजू. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांचं काय?
ते ही पाहूया. वरच्या तीन प्रकारच्या बेंच वर्णनांवरुन नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांचा नक्कीच हेवा वाटेल. पण आयटीत बेंचवर येणं ही तितकीशी चांगली गोष्ट नाही.

१. सुरुवातीचे एक दोन महिने चांगले जातात. पण नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो.
२. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हा असा प्रकार आहे की जर तुम्ही एक दोन महिने त्यापासून दूर राहीलात तर ते सारं तुम्ही विसरुन जाण्याची दाट शक्यता असते. महिनाभर रीयाज केला नाही तर गायकाला त्याचा गळा साथ देत नाही तसंच काहीसं आहे हे.
३. बरेच वेळा बेंचवर असल्यानंतरही नको असलेला प्रोजेक्ट नाकारण्याचा अधिकार असला तरी कधी ना कधी प्रोजेक्ट घ्यावाच लागतो. बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो. आपली कामाच्या वेळा, आपल्याला काम करायची ईच्छा असलेली टेक्नॉलॉजी यात तडजोड करावी लागते.
४. खुप दिवस बेंचवर राहील्यास कंपनी आपल्या दुसर्‍या शहरातील ऑफीसला बदली करु शकते. केव्हा केव्हा टेक्नॉलॉजीमधल्या माणसाला कंपनीच्या बीपीओ आर्मलाही पाठवले जाते.
५. सर्वात महत्वाचे म्हणजे, आर्थिक मंदीच्या काळात पहिली तडी बेंचवरील कर्मचार्‍यांवर पडते.

वरवर चांगला वाटणारा हा प्रकार तसा कर्मचार्‍यांसाठीही वाईटच असतो. एक दोन महिन्यांसाठी बेंचवर येऊन लगेच हवा तसा प्रोजेक्ट मिळाल्यास मात्र मज्जानू लाईफ. पण असे खुपच कमी वेळा होते. वर्ष - दिड वर्ष बेंचवर असलेले किस्से आयटीत ऐकायला मिळतात.

आता समारोपाच्या काही ओळी लिहून हे प्रकरण आटोपतं घेतो. शंभराच्या आतबाहेर कर्मचारी संख्या असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये बेंच हा प्रकारच नसतो. त्याचे क्लायंटही कधी घोडयावर येत नाहीत. हजाराच्या आसपास कर्माचारी संख्या असलेल्या कंपन्यांमध्ये खुपच कमी कर्मचारी बेंचवर असतात. कारण त्यांना बेंच परवडतच नाही. आणि मोठया आयटी कंपन्या बेंच ठेवतात कारण ती त्यांच्या व्यवसायाची गरज असते.

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Feb 2013 - 10:14 pm | पैसा

अवघड आहे. नको रे ब्वॉ तुमची आयटी.

अग्निकोल्हा's picture

19 Feb 2013 - 10:29 pm | अग्निकोल्हा

.

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2013 - 10:30 pm | श्रीरंग_जोशी

हा विषय वाटतो तितका सरळ नक्कीच नाही. पण आपण अगदी सहजतेने त्यावर माहितीपूर्ण भाष्य केले आहे.

बाकड्यावर बराच वेळ बसावे लागल्यास काही ठिकाणी वार्षिक गुणांकनावर (Ratings from appraisal) परिणाम होऊ शकतो. पण बाकड्यावर नसताना आव्हानात्मक काम मिळाले असेल अन चांगली कामगिरी केली असेल तर तो मुद्द गौण ठरतो.

तसे आजकाल पूर्वीइतके बाकड्यावर बसू दिले जात नाही. एकतर दिले जाईल ते काम करा अथवा, दुसर्‍या शहरात बदली घ्या नाही तर सरळ राजीनामा द्या असेही म्हंटले जाते.

अन बाकड्यावरच्या कर्मचार्‍यांना घरीच बसा असे सांगितले जाते कारण त्यांच्यावर उगाच कंपनीची संसाधने कशाला वाया घालवायची असा विचार असतो... उदा. उपहारगृह, ग्रंथालय वगैरे तुडूंब भरून वाहू लागतात.

बेंचवर बसण्यासारखा त्रास नाही,आधी हमाला सारखे राबायचे आणि बेंचवर बसल्यावर इतरांची मॉनिटर पाहण्यात गुंग झालेली टाळकी पहायची ! मी आत्ता पर्यंत एकदाच बेंचवर बसलो आहे,त्यावेळी इथे मिपावर यायचे सुद्धा वांदे झाले होते,कारण इंटरनेट अ‍ॅक्सेस नाही. सगळीच बोंब... त्यात मग कंपनीने एक लर्नींगवेबसाइट उघडुन दिली आहे,त्यात रजिस्टर करुन होडफोनचा जुगाड करुन व्हिडीयो पाहत बसायचे...मला तर व्हिडीयो सुरु झाल्या नंतर १५ मिनीटाच झोप यायची ! ;)कोण कोण हा व्हिडियो पाहते याची माहिती काढता येत असल्याने स्क्रीनवर व्हिडियो चालु ठेवुन इतर उध्योग देखील चालु केले... ;)अगदी फस्ट्रेशन वाढल्यावर ऑफिसमधे भगवद गीता आणुन सगळे अध्याय देखील वाचुन काढले.
सध्यांकाळ कधी होईल आणि दिवस कधी एकदाचा संपेल हा विचार सकाळी डेस्कवर बसताना रोज यायचा,इमोशन अत्याचार म्हणजे काय याचे उत्तम उदा.म्हणजे बेंचवर बसणे.

अरे, घरातील भाज्या निवडायला घेऊन जायच्या. मुलाबाळांचे लोकरीचे कपडे विणणे, सटरफटर खरेदी उरकून येणे असे करता आले असते का? दिवाळी, नवीन वर्षासाठी एरवी इमेलवरून ह्याप्पी न्यू ईयर किंवा ह्याप्पी डिवॉली अशा शुभेच्छा देण्याऐवजी झाडून सगळ्या नातेवाईकांना ग्रिटींग कार्डे पाठवायची. त्यावर हाताने दोनेक ओळी लिहिल्या की त्यांना वाटेल आजकालच्या काळातला हा मुलगा किती वेगळा आहे! ;)

अरे, घरातील भाज्या निवडायला घेऊन जायच्या. मुलाबाळांचे लोकरीचे कपडे विणणे, सटरफटर खरेदी उरकून येणे असे करता आले असते का?
आज्जे अंग आम्ही सरकारी कार्यालयात काम नाही हो करत... तिथे तर रोजच्या कामाबरोबर ही कामे सुद्धा अगदी सहज पार पडतात म्हणे ! ;)

नवीन वर्षासाठी एरवी इमेलवरून ह्याप्पी न्यू ईयर किंवा ह्याप्पी डिवॉली अशा शुभेच्छा देण्याऐवजी झाडून सगळ्या नातेवाईकांना ग्रिटींग कार्डे पाठवायची. त्यावर हाताने दोनेक ओळी लिहिल्या की त्यांना वाटेल आजकालच्या काळातला हा मुलगा किती वेगळा आहे!
हॅहॅहॅ... बर्‍याच दिवसांनी चांगला विनोद वाचला ! ;) हा मुलगा वेगळा आहे, हे आधीच सर्व नातेवाईकांना ठावुक झालेले असते ! ;)

रुस्तम's picture

19 Feb 2013 - 10:49 pm | रुस्तम

Napoleon बोलला हे...

China is a sleeping giant,when she shall open her eyes it shall be directed towards India.

हे वाक्य विवेकानंदांचेच आहे.
संदर्भः- Vivekananda’s journey to the West and prediction on China

नेपोलियनचे वाक्य आहे :-"China is a sleeping giant,Let her sleep, for when she wakes she will shake the world."

रेवती's picture

19 Feb 2013 - 10:37 pm | रेवती

पण मी काय म्हणते, हे बेंच प्रकरण चालू असताना त्या लोकांनी त्यांचे इतर कामे करून घ्यायला काय हरकत आहे? जसे एरवी घरातल्या कामांना बोट न लावणारं पब्लीक याच काळात घरच्यांना मदत करणे, त्यांना तीर्थक्षेत्री फिरवून आणणे (देवाधर्मासाठी......नाहीतर काहींचे तीर्थक्षेत्र वेगळे असते.), आपापली तसे दुसर्‍यांची लग्ने उरकून घेणे इ. जीवनात एरवी ज्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही, जसे की गाणे शिकणे, वाद्य शिकणे, थोडी समाजसेवा असे करावे. बाकी हे बेंच प्रकरण कंटाळवाणे दिसतेय.

अगं आज्जे,घाण्याला दावलेल्या बैलाला तोंडाला फेस येई पर्यंत राबवायचे,एकदा पूर्व-पश्चिम नांगरलेले शेत परत दक्षिण-उत्तर नांगरायला लावायचे...अश्या राबणार्‍या बैलांना स्वतःचे आयुष्यचमुळी जगता येणे कठीण झाले असते,तिथे तिर्थक्षेत्रात कुठे चक्कर मारायचा वेळ मिळणार ? आणि बरं तिर्थक्षेत्री फिरुन आल्यावर कंपनी प्रसाद म्हणुन हातात नारळ देणार नाही याची खात्री काय ? तेव्हा बुड खुर्चीला टेकवुन ८ तास ती खुर्ची गरम करुन घराकडे जाउन दुसर्‍या दिवशी परत त्याच खुर्चीत बसण्या शिवाय पर्यांय नसतो... अशाच काही सुरस कथा ऑनसाईटचे गाजर पाहुन हुरळुन गेलेले आणि नंतर हिंदुस्थान येण्यासाठी धडपडणार्‍या बैलांच्या सुद्धा आहेत...

धन्या's picture

19 Feb 2013 - 11:00 pm | धन्या

तुम्हाला काय वाटतं, आयटीवाले हे सारं करत नाही का? :)

जेव्हा ऑफीसमध्ये बेंचवर असतानाही नऊ तासांची हजेरी लावणे बंधनकारक असते तेव्हा पब्लिक आपलं अ‍ॅक्सेस कार्ड मित्राकडे हजेरी लावण्यासाठी दिलं जातं. आणि हा पठठया मस्त कुठेतरी पाच सहा दिवसांसाठी मध्यप्रदेश, राजस्थान वगैरे फीरायला जातो.

चूकून एचार किंवा नविन काम देणार्‍या मॅनेजरचा फोन आलाच तर सरळ आजारी असल्यामुळे घरी आलोय असं सांगितलं जातं. मॅनेजर काय लगेच सिस्टीममध्ये जाऊन हजेरी चेक करत नसतो. तो कॉल संपल्यानंतर मित्राला फोन फीरवला जातो. xx चा फोन आला होता. त्याला कळलंय मी ऑफीसमध्ये नाही हे. उद्यापासून माझं कार्ड स्वाईप करु नको. फिनिश.

xx - हा आयटीवाल्यांचा ठेवणीतला शब्द आहे. कुणाचाही उद्धार करण्यासाठी वापरला जातो.

तिमा's picture

20 Feb 2013 - 9:59 am | तिमा

बुद्धाच्या वडीलांनी जर गौतमाला लहाणपणापासुन आयटीची ओळख करुन दिली असती तर एकदम समोर आलेल्या त्या अनोख्या सत्याने तो असा भांबावला नसता.

५० फक्त's picture

20 Feb 2013 - 10:12 am | ५० फक्त

ऐटीची ओळख दिलिच होती करुन, बेंचची दिली नव्हती त्याचा परिणाम, त्यावेळी काय सगळीकडे मंचकच असायचे ना, बेंच बिंच असली कॉस्ट कटिंग नव्हती.

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2013 - 11:08 pm | श्रीरंग_जोशी

एखाद्याला ६ आठवडे बाकड्यावर बसावे लागेल असे सुरूवातीला सांगितले जात नाही. कधी दोन दिवसातही काम मिळते कधी दोन महिनेही वाट पहावी लागते. त्यामूळे एखाद्या सहलीसाठी तिकिटे वगैरे काढली अन नेमके काम मिळाले असेही होऊ शकते.

माझ्या सुदैवानी मला भारतात काम करताना फारसे बाकड्यावर बसावे लागले नाही. अमेरिकेत ती संधी दोनदा मिळाली पण त्याचा पुरेपूर वचपा पुढचे काम मिळाल्यावर निघाला.

अभ्या..'s picture

19 Feb 2013 - 11:00 pm | अभ्या..

आयला कसलं भारी. एशी हापीस, परत वापरायला नेट, फुल्ल पगार आणि काम नाय. भारीच की.
पण नगं आमाला.

राजेश घासकडवी's picture

19 Feb 2013 - 11:24 pm | राजेश घासकडवी

नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो.

बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो.

अरेरे, केवढं हो तुमचं कठीण आयुष्य!

आयला आधीच एसीत बसून कामं करायची. आणि काही महिने पेड व्हेकेशनही एसीत बसून घ्यायची. आणि वर त्या सुट्टीचा कसा त्रास होतो याच्या कहाण्या लोकांना सुनवायच्या. फारच तुम्हाला त्रास बुवा. खरोखरची हमाली करणाऱ्यांना हमालांना नसतो बुवा एवढा त्रास.

ही सारी सुखं मिळतात हे मान्य आहे. पण अनिश्चिततेची तलवार डोक्यावर लटकत असते हे ही तितकंच खरं आहे. कंपनी कधी दुसर्‍या शहरात बदली करु शकते, कधीही कामावरुन कमी करु शकते. ईतकंच काय, ज्या तंत्रज्ञानातलं ओ की ठो कळत नाही त्या तंत्रज्ञानावर काम करावे लागते.

आयटीमध्ये आपल्याला नको असलेल्या टेक्नॉलॉजीवर काम करायला लागणं म्हणजे नरक असतो हे आयटीवालाच समजू शकतो. :)

ही सारी सुखं मिळतात हे मान्य आहे. पण अनिश्चिततेची तलवार डोक्यावर लटकत असते हे ही तितकंच खरं आहे. कंपनी कधी दुसर्‍या शहरात बदली करु शकते, कधीही कामावरुन कमी करु शकते. ईतकंच काय, ज्या तंत्रज्ञानातलं ओ की ठो कळत नाही त्या तंत्रज्ञानावर काम करावे लागते.आयटीमध्ये आपल्याला नको असलेल्या टेक्नॉलॉजीवर काम करायला लागणं म्हणजे नरक असतो हे आयटीवालाच समजू शकतो.

यात विशेष ते काय .हे तर सर्वच क्षेत्रात होते.मंदीचा तडाखा इतर क्षेत्रातही तर जबर बसलाय. तिकडे जे काम करत आहेत त्यांनाही घरी बसायची वेळ आलीये . सो फक्त हे आय टी मध्ये घडत अस नाही .
तुम्हाला मिळणाऱ्या सुखांचा होणार्या त्रासाशी रेशो काढला , तर कदाचित समजेल. किती आरामशीर आयुक्ष जगताय तुम्ही

दादा कोंडके's picture

20 Feb 2013 - 2:59 pm | दादा कोंडके

यात विशेष ते काय .हे तर सर्वच क्षेत्रात होते.मंदीचा तडाखा इतर क्षेत्रातही तर जबर बसलाय. तिकडे जे काम करत आहेत त्यांनाही घरी बसायची वेळ आलीये . सो फक्त हे आय टी मध्ये घडत अस नाही .

सहमत. खरं तर आयटी म्हणजे आराम, चकचकीत पॉश वातावरणात राहून दाबून पगार घेणं, कंपनीच्या बस मधे ट्याबमध्ये डोकं खुपसून बसणे आणि कंटाळा आला की रस्त्यावरची गर्दी बघणे, ऑनसाईटला जाण्यासाठी लसलसत कसबसं ऑफशोअरचा प्रोजेक्ट संपवणे, रस्त्यावर कुठेही आधिच वाट बघत उभं असलेल्या प्रवाश्याबरोबर भाव मोडून निघालेल्या रिक्षात फक्त जायचं ठिकाण सांगून तोर्‍यात बसणं. फक्त आंघोळ करताना गळ्यातला ब्याज काढणं. त्याशिवाय का अगदी पॅशन म्हणून गेलेली सर्व फिल्ड मधले बहुतेक आयाअयटीयनस देखिल आयटीत आहेत?

आणि उगाच मंदीबिंदीचं सांगू नका राव. त्यापेक्षा जास्त तडाखा आमच्या उत्पादन क्षेत्राला बसतो. आमच्या प्रॉडक्टचं शेल्फलाईफ कमी असतं. बाजरात मागणी कमी झाली की ढुंगणावर लाथ घालून हाकलतात. युनिअन-बिनियन काही कामाची नसते. मागं पुण्यातल्या एका नामवंत कंपनीत कामगारांच्या मागणीसाठीचा संप मालक मंडळींनी धुर्तपणे मोडून काढला. युनिअनच्या पाच-सहा महत्वाच्या लोकांना पुर्ण पगार द्यायचं कबूल केलं पण ज्वाबला हात लावायचं नाही असं सांगितलं. काहिही करा पण काम करायचं नाही. ती मंडळी चार-पाच महिने होती आणि नंतर कंटाळून सोडून गेली. ती आयटीत थोडीच होती. ;)

ही कारणं म्हणजे बाहेरच्यांनी न्वास्टॅल्जिक होण्यासारखं, शहरातल्यांनी खेड्यातल्या शुद्ध हवा आणि ताज्या भाज्यासाठी झुरण्यासारखं, शीशीडी मध्ये बसून टपरीवरच्या चहाची आठवण करण्यासारखंच बेगडी आहे.

नानबा's picture

20 Feb 2013 - 3:02 pm | नानबा

सहमत..

स्पा's picture

20 Feb 2013 - 3:07 pm | स्पा

ही कारणं म्हणजे बाहेरच्यांनी न्वास्टॅल्जिक होण्यासारखं, शहरातल्यांनी खेड्यातल्या शुद्ध हवा आणि ताज्या भाज्यासाठी झुरण्यासारखं, शीशीडी मध्ये बसून टपरीवरच्या चहाची आठवण करण्यासारखंच बेगडी आहे.

=)) =))

धन्या's picture

20 Feb 2013 - 8:09 pm | धन्या

तुम्ही विनाकारण बचावाचा पवित्रा घेतला आहे. प्रवाहाविरुद्ध पोहणं आणि प्रवाहाला विरोध करणं या दोन भिन्न बाबी आहेत. :)

दादांना दिलेलं उत्तर वाचा.

लेखमालेतील या लेखाचा उद्देश "आम्ही आयटीवाले कसे गरीब बिचारे आहोत" हे दाखवण्याचा नाही. नॉन आयटीवाल्यांना आयटी विश्वाची ओळख व्हावी म्हणून हा आंखो देखा हाल आहे.

माझ्या लेखनाचा रोख तसा जाणवत असेल तर त्याचा अर्थ मी हा लेख लिहिताना अनबायस्ड राहायला कमी पडलो हा आहे. पुढच्या भागांमध्ये लेख लिहिताना शक्य तेव्हढा त्रयस्थ राहण्याचा प्रयत्न करेन. :)

दादा कोंडके's picture

21 Feb 2013 - 1:13 am | दादा कोंडके

खुप वेळी त्या रिक्षेवाल्याचं आधिचं गिर्‍हाइक मीच असतो त्यामुळे थोडी जळजळ व्यक्त केली. :)
पुढच्या भागाची वाट बघतोय.

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 8:21 pm | आजानुकर्ण

इतर नोकऱ्यांच्या तुलनेत आयटीतल्या नोकऱ्या अजूनतरी चांगल्याच आहेत. कोणतीच कंपनी मजामजा करायची संधी द्यायला किंवा समाजसेवा करायला नोकरांची भरती करत नाही. त्यामुळे मंदीमध्ये कंपनीने उपकार करावे अशी भावना चुकीची आहे. निवांत एसीमध्ये गुबगुबीत खुर्चीवर बसून दिवसातला अर्धा वेळ इंटरनेट ब्राऊजिंग, इमेलमधून गप्पा वगैरे अगदी प्रोजेक्टवर असणारी मंडळीही करतात. मिपावर वीकडेला जास्त प्रतिसाद येतात याचे कारण काय असावे बरे? थोडक्यात चार तासच काम करुन क्लायंटला आठ तासाचे बिलिंग करुन आठ तासाचा पगारही मिळतो. बेंचवर असताना कोणत्या इंडस्ट्रीमध्ये पगार मिळत नाही. सरळ हाकलून देतात. आयटीमध्ये निदान महिनाभर तरी तशी संधी दिली जाते.

पिलीयन रायडर's picture

20 Feb 2013 - 12:04 pm | पिलीयन रायडर

राजेश...
मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये जॉईन झाले.. लोक कधी कधी "stretch" करण्या बद्दल बोलायचे..मी मॅनेजर ला विचारलं "म्हणजे?? ९ तास काम करुन वर अजुन काम???" त्यावर तो म्हणाला होता.. " तुला काही दिवसानी कळेल, काहीच काम नसल्यापेक्षा एकवेळ अति काम चांगलं"... बेंच च्या बाबतीत तसंच असावं..

- मी आयटी मध्ये नसुन असल्या सारखी आहे..

च्यायला कुठल्या अभद्र दिवशी कॉमर्सला यायचं ठरवलं राव...

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2013 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा

धन्य...धन्य...ते आय.टी.क्षेत्र

अवांतर-आमच्याही बाहेरगावी जाऊन करायच्या ८ ते १५ दिवसांच्या कामात आंम्ही बेंच वापर्तो... ;-) पण बॅच वापरायची गरज भासलेली नाही अजून ;-)

रंगा काकांच्या सर्व मताशी सहमत .. बेंच वर असणं सगळ्यात बेकार ..
त्यात ज्या ट्क्नॉलॉजीवर कधीच काम केलं नाहि त्यावर काम करायला
लागणं हे त्याहुनहि बेकार .
बाकि लेख आणि चर्चा जमेल तसे वाचतेय ...

बेस्ट लक धन्याकाका :)

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2013 - 2:06 am | श्रीरंग_जोशी

५-६ वर्षांपूर्वीपर्यंत रविवारच्या टाइम्स अ‍ॅसेंट पूरवणीमध्ये बर्‍याच कंपन्यांच्या नोकरीविषयक जाहिराती असायच्या.
इन्फोसिसची पण कल्पक जाहिरात असायची त्यात त्यांच्याच कर्मचार्‍यांचा मॉडेल म्हणून वापर केलेला असायचा.
त्याचे किंवा तिचे ४ वेगवेगळे फोटो असायचे.

वर्णन असायचे की मी अमुक अमुक वर्षांपासून इन्फिमध्ये आहे. मी हे शिकलो, ते शिकलो. मला अशी संधी मिळाली, तशी संधी मिळाली. मी माझा वैयक्तिक छंदही जोपासू शकतोय वगैरे वगैरे.

तर एक फ्रेशर जो मोठ्या उत्साहाने कंपनीमध्ये रुजू झाला होता. त्याला सुरूवातीच्या प्रशिक्षणानंतर ११ महिने झाले तरी काम मिळाले नव्हते. इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करूनही प्रत्यक्ष काम करायलाच मिळाले नाही.

यावरून उद्विग्न होऊन त्याने वर उल्लेखलेल्या जाहिरातीचा फॉरमॅट वापरून अन स्वतःचा मॉडेल म्हणून वापर करून कंपनीसाठी नमुना जाहिरात बनवली. मी १४ महिन्यांपासून इन्फिमध्ये आहे. ३ महिन्यांचे प्रशिक्षण मिळाले. ११ महिन्यांपासून मी कुठलेच काम केलेले नाही. रोज फुकट चहा कॉफी पितो. कंपनीच्या जिममध्ये जाऊन बॉडी बनवतो.
मूड नसेल तर हापिसात जातही नाही.

एवढे करून तो थांबला नाही तर कंपनीच्या सर्वोच्च अधिकार्‍यांना त्याने कंपनीच्या इमेल सुविधेचा वापर करून हि जाहिरात पाठवली.

ढकलपत्रातून हि जाहिरात तेव्हा अनेकांना आली असेल. शेवटी असेही लिहिले होते की कंपनीने त्या कर्मचार्‍याला लगेच कामावरून काढून टाकले. (या घटनेच्या खरेपणाविषयी मला खात्रि नाही, पण त्याची ती जाहिरात फारच कल्पक होती).

हल्ली बर्‍याच कंपन्यांमध्ये बेंच अंतर्गत सुविधांसाठी 'वापरण्याचे' प्रमाण वाढलेय. त्यामुळे दुहेरी फायदा होतो -
१. कर्मचार्‍यांना हव्या त्या टॅक्नोलाजीवर काम करायला मिळते, अद्ययावत ठेवता येते
२. कंपनीची अंतर्गत वेबसाईट, कॉलेबरेशन रीसोर्सेस, अंतर्गत सॉफ्टवेअर्स बनविता येतात तसेच अद्ययावत ठेवता येतात.
३.रीक्रुटमेंट, ट्रेनिंग डिपार्टेमेंट ह्यांना अशा अनुभवी पण बेंच वरच्या लोकांचा उपयोग होतो.

माझ्या मते 'बेंच वर आराम करायला मिळतो' हे आठ्-दहा वर्षापूर्वी जितक्या प्रमाणात होतं तितक्या प्रमाणात आता मुळीच नाही. बिलेबल नसली तरी नॉन्-बिलेबल प्रोजेक्ट्स काढत असतातच. तसेच, प्रोसेस इंम्प्रुव्हमेंट, सिस्टीम ऑटोमेशन्स, कवालिटी एशुअरन्स, क्वालिटी कंट्रोल अशा विविध मार्गानी भरपगारी सॉफ्टवेअर इंजिनिअरला न वापरले तरच नवल!

उपास's picture

20 Feb 2013 - 2:55 am | उपास

अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही खूप वेळ बेंच वर असाल तर तुमच्या रिझ्युमेची वाट लागलीच म्हणून समजा. शिवाय पगार जरी मिळत असला तरी (जर बेंच वर नसता तर) मिळणार्‍या अनुभवाला तुम्ही पारखे होता. वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही नवशिके असताना बेंच वर आला तर करियरच्या बाबतीत गोंधळ उडू शकतो. खूप वेळ बेंचवर असलेली मुलं पुढे रिजेक्ट होऊ शकतात (जिथे तुमचा ऑन द जॉब एस्क्पेरियन्स बघितला जातो).

विजुभाऊ's picture

20 Feb 2013 - 3:55 am | विजुभाऊ

बेन्च हा प्रकार सध्या दुर्मीळच झालेला आहे. नवी रीक्रूटमेन्ट करताना सुद्धा प्रोजेक्ट हातात आल्यानन्तरच आत घेतले जातेय. पण बेन्च हे प्रकरण तसे वाईटच तुम्ही त्या काळात नवे शिक्षण घेतले तरच काय तो फायदा होतो.आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर असाल तर हापिसातसुद्धा जायची गरज नसते. अशामुळे घरात तुम्ही नक्की नोकरीवर आहात की कसे याबाबत संभ्रम निर्माण होतो.

पाषाणभेद's picture

20 Feb 2013 - 5:47 am | पाषाणभेद

चालूद्या. वाचतोय.

चौकटराजा's picture

20 Feb 2013 - 6:10 am | चौकटराजा

धन्याकाका, त्याचं काय आहे बेंचवर राहून कंटाळायचे नाही असे क्लासेस आय वाल्यांसाठी घेउ म्हणतो. व्ही आर एस ची ९ वर्षे नउ मिनिटांसारखी गेली म्हणून म्हणतो. बाकी ज्यूस ई ई सोयींबरोबर एखादी सुबक ठेंगणी बेंच मधे कंपल्सरी असली पाहिजेच अशी पॉलीसी असलेल्या काही कंपन्या असतात काय ब्वॉ ? ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली )

सुख टोचतं म्हणतात ते असं ;-)

दादा, वरकरणी पाहिलं तर तसं वाटणं साहजिक आहे. बेंच हा प्रकार महिन्या-दोन महिन्यांत आटोपला तर ते नक्कीच सुख असतं. पण प्रकरण लांबलं तर समोर दु:खाची खाई असते. नंतर बेंचवाल्यांनी जे काम पदरात पडतंय ते स्विकारलं नाही तर कडेलोट होण्याची दाट शक्यता असते.

५० फक्त's picture

20 Feb 2013 - 10:19 am | ५० फक्त

@ मा.मिस्पाजी, माझ्याच कवितेतल्या दोन ओळी,

असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक
सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले

सुख टोचतं कारण ते टोकदार असतंच पण ते टोचु नये अशी एक त्याची प्रतिमा आपण करुन घेतलेली असते, दु:खाचं तसं नसतं ते टोकदार असतंच आणि ते टोचण्याआधीच ते टोचणार आहे याची तयारी आपण ठेवलेली असते, किंबहुना जे टोचतं ते दु:खच अशी भावना घेउन आपण जगतो, जेंव्हा कुणीतरी बाहेरचं आपल्याला जाणीव करुन देतं की जे टोचतंय ते सुख आहे दु:ख नाही, तेंव्हा वाईट वाटते टोचण्याचं नाही तर जे टोचत होतं ते सुख आहे हे आपल्याला आधी समजलं नाही याचा तो त्रास असतो.

सुख टोचतं कारण ते टोकदार असतंच पण ते टोचु नये अशी एक त्याची प्रतिमा आपण करुन घेतलेली असते, दु:खाचं तसं नसतं ते टोकदार असतंच आणि ते टोचण्याआधीच ते टोचणार आहे याची तयारी आपण ठेवलेली असते, किंबहुना जे टोचतं ते दु:खच अशी भावना घेउन आपण जगतो, जेंव्हा कुणीतरी बाहेरचं आपल्याला जाणीव करुन देतं की जे टोचतंय ते सुख आहे दु:ख नाही, तेंव्हा वाईट वाटते टोचण्याचं नाही तर जे टोचत होतं ते सुख आहे हे आपल्याला आधी समजलं नाही याचा तो त्रास असतो.

काही समजलं नाही
संक्षी ना विचारून सांगतो

तिमा's picture

20 Feb 2013 - 8:14 pm | तिमा

काही समजलं नाही

छोटा गंधर्वांचे 'नच सुंदरी करु कोपा' ऐका, म्हणजे समजेल.
'कुचभल्ली वक्षाला टोचुनिया शिक्षेला'

सप्रेम नमस्कार, तिमा तुम्हाला. असे अनुभव खुलेपणानं सांगायला ते बेंचवर का आहेत ?

बरं झालं, १९९६ ला अ‍ॅपटेकला अ‍ॅडमिशन घेतली नाही ते, आम्ही आपले कोअर मध्ये सुखी आहोत. आपल्या कंपनीला आपली असणारी गरज आहे तशी ठेवणे हे सध्यातरी आमच्याच हातात आहे. जसे आपले भविष्य आपल्या हाती, तसे आपली नोकरी आपल्या हाती.

गणामास्तर's picture

21 Feb 2013 - 1:11 pm | गणामास्तर

आम्ही आपले कोअर मध्ये सुखी आहोत. आपल्या कंपनीला आपली असणारी गरज आहे तशी ठेवणे हे सध्यातरी आमच्याच हातात आहे. जसे आपले भविष्य आपल्या हाती, तसे आपली नोकरी आपल्या हाती.

लाख मोलाचं बोललातं ५० राव तुम्ही..

बेंचवर असण्याचा पुरेपूर अनुभव आय.टी. मध्ये नसून पण नुकताच घेतलाय. कंपनीकडे प्रोजेक्ट नसल्यामुळे ३ आठवडे निवांत घरी बसलो होतो, आणि महिना अखेरीस फुल्ल पगार पण घेतला होता. :)
पण तरीही, फुकट बसणं जाम पकतं राव.

प्रीत-मोहर's picture

20 Feb 2013 - 9:49 am | प्रीत-मोहर

मूळ लेख आणी श्रीरंग व धन्या यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत....

(बेंच चा अनुभव नसताना नोकरी सोडुन बेंच अनुभवणारी) प्रीमो

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2013 - 10:23 am | परिकथेतील राजकुमार

आम्ही १२ महिने २४ तास बेंचवरच असतो.

लेखन पॉशच एकदम.

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2013 - 11:30 am | संजय क्षीरसागर

साला, कुणी ऊठवायला नको आपल्याला.

आम्ही १२ महिने २४ तास बेंचवरच असतो.

हेच माझही आहे पण आपल्या घरात.अर्थातच बिनपगारी.

मला कीतीही २-३-४-५-६ वर्ष असं पगारी बेंचवर बसायला मिळाले तर चालेल.

कोणीतरी माझी मदत करु शकेल का मला अशी बेंचवरची नोकरी मिळवुन द्यायला?
हो पण अचानक काम आलं तर मात्र मी नोकरी सोडुन पुन्हा अशीच बेंचवरची दुसरी नोकरी शोधणार.(मिळालीच तर).

१० वर्षा पुर्वी तर onsite सुद्धा बेन्च वर बसायला मिळायचे. म्हणजे अमेरिका, इंग्लन्ड मधे राहयचे, डॉलर , पाउंड मधे पगार घ्यायचा आणी काम काही नाही.

काही नशिबवान लोक, ६ - ६ महिने रहायची अशी. काही भारतातून जाउन, अमेरिकेत ६ महिने बेंच वर बसुन तशीच परत आली.

बेंच वर बसणे = गॅस वर बसणे..
आय.टी. किंवा ज्यांनी हा अनुभव घेतला असेल त्यांच्यासाठी बेंच वर चा अर्थ वरीलप्रमाणे. :)

आयटीत आल्यापासून बाकड्यावर जायची संधी मिळालेली नाही याची पुन्हा आठवण झाली. तेव्हा यात अधिक माहितीची भर टाकु शकत नाही

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 8:24 pm | आजानुकर्ण

आयटीत आल्यापासून सुरुवातीचे ट्रेनिंगचे दोन महिने सोडल्यास एकही दिवस बाकड्यावर गेलेला नाही. मात्र बाकड्यांवर बसलेल्या १५-२० टक्के पब्लिकमुळे आमचा वेरिएबल पे अनेकदा अफेक्ट झाला आहे. :(

तुम्हाला उद्देशून असं नाही पण एक गोष्ट लिहावीशी वाटते की कुणी जर आपण आयटीत असूनही एकदाही बेंचवर गेलो नाही याचं कौतुक करुन घेत असेल तर ती ते अयोग्य आहे. त्यात कौतुक करुन घेण्यासारखं काहीच नाही. कुणाला लगेच प्रोजेक्ट मिळतो, कुणाला नाही मिळत. :)

मात्र बाकड्यांवर बसलेल्या १५-२० टक्के पब्लिकमुळे आमचा वेरिएबल पे अनेकदा अफेक्ट झाला आहे.

हे विधान मात्र चुकीचे आहे. बाकडयावर बसलेल्या १५ - २० टक्के पब्लिकमुळे बिलेबल पब्लिकच्या वेरियेबल पेवर कसा काय परीणाम होईल? १५ - २० टक्के बेंच ठेवणं ही मोठया आयटी कंपन्यांची गरज असते, व्यावसायिक धोरणाचा भाग असतो.

बरोबर आहे . १५ ते २०% बेन्च ठेवावाच लागतो .. अचानक आलेल्या प्रोजेक्ट्स्ना
मॅनपॉवर अचानक कुठुन दाखवणार ?? . बेन्चवरच्या लोकांमुळे वेरिएबल पे
कसा काय अफेक्ट होऊ शकतो ??
कळुद्या जरा आम्हा अज्ञानानाहि ??

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 9:10 pm | आजानुकर्ण

प्रोजेक्ट्स असे अचानक येत नाहीत. अनेक महिने आरएफपी वगैरे भानगडी चालू असतात. प्रोजेक्ट कधी मिळेल याचे प्रोजेक्शन असते त्यानुसारच हायरिंग होते. आला माणूस की घ्या ठेवून किंवा आला प्रोजेक्ट की करा वगैरे करत नाहीत. वेरिएबल पेबाबत खाली माहिती दिलीच आहे.

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2013 - 9:17 pm | श्रीरंग_जोशी

प्रकल्प बहुतेकवेळा अचानक येत नसले तरी काही वर्षानुवर्षांपासूनचे ग्राहक ऐनवेळी अधिक काम देतात अन त्यांच्या मागणीची पूर्तता करता न येणे हि कंपनीसाठी नामुष्की असते.

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 9:53 pm | आजानुकर्ण

हो हे मान्य आहे. पण आता टीसीएस सारख्या २ लाख लोकांना नोकऱ्या देणाऱ्या कंपनीने त्यापैकी २० टक्के म्हणजे जवळपास चाळीस हजार लोकांना बिनकामाचा पगार द्यायचे ठरवले तर कसे काय होणार.

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2013 - 9:57 pm | श्रीरंग_जोशी

आजच्या परिस्थितीत २०% लोक बाकड्यावर ठेवणे म्हणजे नक्कीच घाट्याचा सौदा आहे.
माझ्या निरिक्षणाप्रमाणे हे प्रमाण यापेक्षा बरेच खाली आलेले आहे पण खात्रीने सांगू शकत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Feb 2013 - 1:39 am | विश्वनाथ मेहेंदळे

८५+ % युटीलायझेशन म्हणजे दिवाळी अहो. पुरावा हवा. हा घ्या. http://www.tcs.com/investors/Documents/Presentations/TCS_Analysts_Q3_13.PDF
पुष्ठ क्रमांक १९ पहा.
Utilization Rate
• 81.7% (excluding Trainees)
• 72.1% (including Trainees)

शंभरातून बहात्तर गेले म्हणजे किती राहिले ?? मोड बोटे, कर हिशोब (पुलंकडून साभार).

०५८+% युटीलायझेशन म्हणजे दिवाळी अहो. पुरावा हवा. हा घ्या. http://www.tcs.com/investors/Documents/Presentations/TCS_Analysts_Q3_13.PDF
पुष्ठ क्रमांक १९ पहा.
Utilization Rate
• 81.7% (excluding Trainees)
• 72.1% (including Trainees)

शंभरातून बहात्तर (किन्वा ब्यान्शी) गेले म्हणजे किती राहिले ?? मोड बोटे, कर हिशोब (पुलंकडून साभार).

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 1:50 am | श्रीरंग_जोशी

या माहितीबद्दल धन्यवाद. आशा आहे इतर मोठ्या कंपन्यांची परिस्थिती इतकी वाईट नसावी...

सदर कंपनीबाबत इतर कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांना नेहमीच कुतूहल वाटते... त्यांचे नफ्याचे आकडे नेहमीच अचंबित करून जातात.

या कंपनीच्या उसातील कर्मचार्‍यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार मिळतो असे ऐकले आहे (केवळ ऐकले आहे वाचलेले नाही ;-)).

आजानुकर्ण's picture

21 Feb 2013 - 2:48 am | आजानुकर्ण

सदर कंपनीची एक ऐकीव गंमत अशी की असे नॉन बिलेबल रिसोर्सेस हे नवीन क्लायंटला प्रपोजल देताना 'फ्री' म्हणून ऑफर करण्यात येतात.

उदा. दोन डेवलपर्सवर एक डेवलपर फ्री वगैरे... ;)

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 2:54 am | श्रीरंग_जोशी

ऐकावे ते नवलच.

पण याच कंपनीच्या भारतातल्या कर्मचार्‍यांकडून ऐकले आहे की या कंपनीतली नोकरी सरकारी नोकरीइतकीच चैनीची नोकरी आहे म्हणून.

आजानुकर्ण's picture

21 Feb 2013 - 3:03 am | आजानुकर्ण

या कंपनीच्या अशा अनेक ऐकीव गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत. उदा. यांचा बिलिंग रेट सर्वात कमी असतो. (मला वाटते ऑफशोअरसाठी 25 डॉलरपेक्षाही कमी). यांची बेंचस्ट्रेंग्थही सर्वांपेक्षा जास्त आहे, एवढे करुन यांचा फायदाही सर्वांपेक्षा जास्त असतो.

मी कॉलेजात असताना वर्षभर सदर कंपनीच्या आर अँड डी विभागात ट्रेनी म्हणून काम केले होते. तेव्हा ही कंपनी आम्हाला हजार रुपये स्टायपेंड द्यायची. जो आमच्या क्लासमध्ये फक्त आणखी दुसऱ्या एक कंपनीतील ट्रेनींना मिळत होता. त्यामुळे कंपनीच्या एम्प्लॉईजला फायदे मिळत असावेत असे वाटते.

शिवाय या कंपनीतील नोकरांना टाटाच्या अनेक उत्पादनांमध्ये (टायटन, इंडिका, तनिष्क वगैरे) सवलत मिळते असेही ऐकले आहे.

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 3:10 am | श्रीरंग_जोशी

२००९ च्या सुरूवातीला भारतातील एक नावाजलेल्या मा. त. कंपनीच्या आकडेवारीची बनवेगिरी उघड झाली होती.

आशा आहे की येथे तसे काही नसावे. मी ज्याही ग्राहकांकडे (अमेरिकेतील कंपन्या) काम केले आहे तिथे या कंपनीची माणसे काम करीत नसल्याने काहीच अंदाज नाही की यांचे काम (एवढ्या कमी बिलिंगमध्ये) चालते तरी कसे?

आजानुकर्ण's picture

21 Feb 2013 - 3:20 am | आजानुकर्ण

एखाद्या माणसाचे utilization 70 टक्के जरी पकडले. (म्हणजे वर्षाच्या 2000 तासांपैकी 1400 तास) आणि अगदी 25 डॉलरचा rock bottom रेट पकडला तरी 50 प्रति डॉलर भावाने त्या माणसाने कमावून दिलेला रेवेन्यू 17,50,000 रुपये इतका येतो. यातला निम्मा तरी नक्कीच फायदा असावा. शिवाय क्लायंटच सगळी सॉफ्टवेअर वगैरे देतो. कंपनीला डेस्कटॉप, चहाकॉफी वगैरे माफक खर्च.

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 3:25 am | श्रीरंग_जोशी

फायदा होतच असणार नाहीतर....

बाकी भारत सरकार व अनेक राज्यसरकारांच्या खात्यांचे लाँग टर्म प्रकल्प या कंपनीकडे बहुसंख्येने असतात हे पण ऐकले आहे :-).

उपास's picture

21 Feb 2013 - 3:27 am | उपास

कॉस्ट टू कंपनीचा जरी विचार केला तरी प्रचंड फायद्यात आहे हे प्रकरण, येन केन प्रकारेण (बी बिलेबल..) प्रॉजेक्ट मॅनेजरचं रेटींग त्याच्यावरच.. टॉप लाईन आणि बॉटंम लाईन ही अशी सरळ सरळ आहे.
अवांतर : एक एच आर वाला, सीटूसी (कॉस्ट टू कंपनी) समजावत होता मागे जॉब बदलताना, म्हटलं तू मला पीटूसी (प्रॉफीट टू कंपनी) देतोस का काढून, माझयवर किती कमावते कंपनी आणि किती मला देते ते? मग लगे हात त्याला, तुमचे एम्प्लोयी हे तुम्ही एसेट म्हणून समजत नसून लाएबिलिटी समजता असं सांगत बिनपाण्याची करुन घेतली.. (थोडकयात कंडू शमवला) :))

ऑफशोअर बिलिंग रेट्स हे खूप मोठ्या प्रमाणात बदलत नसावेत टीसीएस / विप्रो / इन्फी मध्ये.
३० डॉलर पेक्षा जास्त रेट ऑफशोअरला पहिल्या लेव्हलला (सॉफ्टवेअर इंजिनिअर) फार कमी वेळा पाहिला आहे (जवळजवळ नाही). इतर अनुभवी मिपाकरांनी याहून जास्त रेट पाहिला असल्यास जरूर शेअर करावे. नवीन माहिती उपयोगीच ठरेल.
खूप जास्त फायदे काही मिळत नाहीत टाटा उत्पादनांमध्ये. २००४ मध्ये आय पी ओ जेव्हा आला तेव्हा मात्र चांदी झाली होती. एम्प्लॉइज शेअर्स कोटा इतका मोठा होता की बाजारात रिटेल गुंतवणूकदाराला बोलीच्या १/५ ते १/७ शेअर्स मिळत असताना एम्प्लॉईजना १-१ शेअर्स मिळाले होते. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे होते तेव्हा त्यांनी किंवा बाजारातून / मित्रपरिवारातून उचलून ५-१० लाखाचे शेअर्स सुद्धा १-१ मिळाले होते आणि मोठा नफा कमावला होता. गेल्या ८ वर्षात मूळ गुंतवणूक आजच्या भावाने ६ पट झाली आहे.
बेंच स्ट्रेंग्थ हा अतिशय गुलदस्तात ठेवला जाणारा आणि अतिशय फज केलेला (मराठी?) प्रकार आहे.
एथिक्स आणी पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीत डोळ्यापुढे टिम्सच्या टिम्स बेंचवर दिसत असताना युटिलायझेशन ८०% दाखवलेले पाहिले आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Feb 2013 - 3:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

आशा आहे इतर मोठ्या कंपन्यांची परिस्थिती इतकी वाईट नसावी

ही परिस्थिती वाईट नाही हो. वर पण ४-५ दा हा उल्लेख आला आहे. एक काम करा, इन्फोसिस च्या संकेतस्थळावरून हीच माहिती काढा आणि बघा.

या कंपनीच्या उसातील कर्मचार्‍यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार मिळतो असे ऐकले आहे

असे काही नाही आहे. TCS, Infy, Wipro आणि तत्सम कंपन्यांना सगळ्या गोष्टी कम्पेरेबल ठेवाव्या लागतात. नाहीतर काशी लागेल. बघा जरा नीट विचार करून.

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 3:13 am | श्रीरंग_जोशी

त्याचे असे आहे की काही लोक उसात येण्यासाठी तडजोड करायला तयार असतात त्यामुळे कमी पगार देणार्‍यांचे फावत असते.
एल -१ व्हिसावर आलेल्यांना कंपनी बदलण्याचाही पर्याय नसतो त्यामुळे यायला मिळते यावरच ते लोक समाधानी असतात.

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 8:55 pm | आजानुकर्ण

त्यात कौतुक करुन घेण्यासारखं काहीच नाही. कुणाला लगेच प्रोजेक्ट मिळतो, कुणाला नाही मिळत.

वेल. असेच काही नाही. प्रोजेक्टवर असतानाच आपले स्किलसेट नेहमी अद्दयावत ठेवले की प्रोजेक्ट संपण्यापूर्वीच दुसरा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता वाढते. मात्र 'मला एवढेच येते आणि मी त्याच गोष्टीवर (आहे त्या ज्ञानावर अवलंबून राहून) एवढेच काम करणार अशी हटवादी भूमिका घेणारे महिनोन्महिने बेंचवर राहतात.) त्यामुळे या ज्या कुणाला प्रोजेक्ट मिळत नाहीत त्यांचे स्किल्स फारच स्पेशलाईज्ड असतात (जे फार कमी भारतीय आय टी कंपन्यांमध्ये आहे) किंवा त्यांचे स्किल्स रेडिली ट्रान्सफरेबल नसतात (जे सर्वच कंपन्यांमध्ये आहे)). शिवाय टेक्निकल स्किल बाजूला ठेवले तरी इतर डोमेन्स किंवा वर्टिकल्समधील प्रोजेक्ट मॅनेजर, रिसोर्स मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून राहणे वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते. त्यामुळे थोडेफार कौतुक करण्यासारखे आहे असे वाटते. बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.

बाकडयावर बसलेल्या १५ - २० टक्के पब्लिकमुळे बिलेबल पब्लिकच्या वेरियेबल पेवर कसा काय परीणाम होईल?

कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच.

बाकी 15-20 टक्के बेंच ठेवण्यामागचा आतबट्ट्याचा व्यवहार ध्यानात आल्यावर आता अनेक कंपन्या बेंचची साईज कमी करत आहेतच.

प्रतिसादातील पहिला परिच्छेद नक्कीच माहितीपुर्ण आणि ऑप्टीमिस्टीक आहे. बेंचवर जाणार्‍यांनी असा दृष्टीकोन ठेवला तर बेंच कालावधी नक्कीच कमी होईल.

बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.

हे वाक्य मात्र सरसकटीकरण केल्यासारखं आहे त्यामुळे असहमत. बेंचवरील सारीच जनता अशी नसते. खुप जणांना काम मिळावे अशी प्रामाणिक ईच्छा असते आणि ते त्या दृष्टीने प्रयत्नही करत असतात.

कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच.

काम करणार्‍या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नातूनच बेंचवाल्यांना पगार मिळत असला तरी तो व्यवसायाचा भाग आहे हो. त्यामुळे बिलेबल मंडळींनी आमच्या कमाईवर बेंचवाले बसून पगार घेतात असा टाहो फोडण्याला काहीच अर्थ नाही. जर बेंच नाही ठेवला तर त्याचा नविन येणार्‍या प्रोजेक्ट्सच्या संख्येवर (काही वेळा नविन क्लायंट मिळण्यावरही) परीणाम होईल आणि त्याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रगतीवर होईल हे आयटी व्यवसायातील वास्तव आहे.

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2013 - 9:23 pm | श्रीरंग_जोशी

बाकड्यावर नसणार्‍यांनी बाकड्यावरच्यांना कंपनीच्या आर्थिक नुकसानासाठी दोष देणे म्हणजे एखादया गाडीच्या चार टायर्सनी स्टेपनीला दोष देण्यासारखे आहे?

अचानक नवे काम आले तेव्हाच नव्हे तर काम करणार्‍यांपैकी कुणी आजारी पडला, कुणाला अपघात झाला, कुणाला अचानक अध्यात्माचा झटका आला तर बाकड्यावरचीच मंडळी कामी पडतात.

मा.त. मध्ये अनेकांना सरळसोट काम मिळत नाही. नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे काम अंगावर पडत असते त्यामूळे वर्षा दोन वर्षांतून जर दोन तीन आठवडे बाकड्यावर बसायला मिळाले तर अनेकांना ते हवेच असते. त्यातून ताजे तवाने झाल्यावर नव्या प्रकल्पात अधिक जोमाने कामगिरी करता येते.

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 9:39 pm | आजानुकर्ण

माझा आक्षेप गॅरंटीड पे बाबत नसून वेरिएबल पे बाबतच आहे. वेरिएबल पे हे एका स्वरुपाचे प्रॉफीट शेअरिंग असते. कंपनीला झालेला अधिकचा फायदा हा तो फायदा करुन देणाऱ्या लोकांमध्येच शेअर करावा हे न्याय्य आहे - आणि अशीच अंमलबजावणी आता अनेक कंपन्या करत आहेत.- बेंचवर असूनही प्रॉफीट शेअरिंगमध्ये हिस्सा देणाऱ्या कंपन्या आता मला माहीत नाहीत. मात्र दहा वर्षांपूर्वी बेंचवर असणारे आणि नसणारे यांमध्ये काहीच फरक केला जात नसल्याने स्वतःहून प्रोजेक्टवर जायला काहीच इन्सेंटिव नसायचा. एखाद्या व्यक्तीला प्रॉजेक्ट मिळवून देणे ही केवळ कंपनीच्या रिसोर्सिंग/फुलफिलमेंट टीमची जबाबदारी असल्याचा आभास निर्माण होऊन पब्लिक निवांत टंगळमंगळ करत राहत असे. दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड वर्षे बेंचवर राहूनही ३०० ते ४०० टक्के वेरिएबल पे घेतलेली मंडळी मी पुण्यात पाहिली आहेत. आता प्रॉफिट शेअरिंग फक्त काम करणाऱ्यांंसोबतच होत असल्याने अशा टंगळमंगळ करणाऱ्यांना स्वतःहून प्रॉजेक्ट शोधण्यासाठी एक दट्ट्या मिळतो. आर्थिक नाड्या आवळल्या जात असल्याने झटापट नवनव्या गोष्टी शिकून लवकर प्रॉजेक्ट मिळवण्यासाठी खटपटी केल्या जातात. - जे योग्य आहे. इतर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये अशी लक्झरी नसते.

मुळात ही बेंचची भानगड ही या कंपन्यांच्या दोन-तीन महिने नोटीस पीरिअडच्या धोरणामधून आली आहे असे वाटते.

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2013 - 9:47 pm | श्रीरंग_जोशी

आज जरी परिस्थिती कमालीची बदलली असली तरी पूर्वीही खूप काळ बाकड्यावर बसणार्‍यांना वार्षिक गुणांकनात मार खावा लागायचाच. अन पदोन्नातीही पुढे ढकलली जायची.. बाकी वैयक्तिक स्तरावरचे तोटे मूळ लेखात व चर्चेमध्ये उल्लेखिले आहेतच.

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 9:51 pm | आजानुकर्ण

आयटीतले वार्षिक गुणांकन हा एक जोक आहे असे वाटते (हे कोणताही आयटीवाला मान्य करील). एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक कामगिरी त्या बेल कर्व आणि नॉर्मलायझेशनमध्ये अगदी गुळगुळीत होते. त्यामुळे ३.२ चे ३.१ होण्याव्यतिरिक्त फारसा फरक पडत नव्हता. शिवाय 'कंपनी माझ्यासाठी प्रॉजेक्ट शोधू शकत नाही ही कंपनीची चूक आहे माझी नाही' असे स्पष्टीकरण तयार असायचेच. मात्र सध्या कंपन्या करत असलेला आर्थिक उपाय हाच सर्वात परिणामकारक आहे.

राजेश घासकडवी's picture

21 Feb 2013 - 6:58 am | राजेश घासकडवी

दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड वर्षे बेंचवर राहूनही ३०० ते ४०० टक्के वेरिएबल पे घेतलेली मंडळी मी पुण्यात पाहिली आहेत.

या आयटीवाल्यांची दुःखं पाहून काळजाचं अगदी पाणी पाणी होतंय...

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 7:17 am | श्रीरंग_जोशी

आपल्या जालिय वावरावरून आपण मा.त. क्षेत्रात जुने जाणते तज्ञ असाल असा गैरसमज झाला होता.

आपण तसे नाहीत हे पाहुन जरा आश्चर्य वाटले...

मैत्र's picture

27 Feb 2013 - 11:15 am | मैत्र

मी दुसर्‍या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे
बेंच --> युटिलायझेशन --> अप्रेझल --> रेटिंग --> व्हेरिएबल पे पर्सेंटेज असा परिणाम होत जातो.
रेटिंग प्रमाणे युनिट्चा आणि वैयक्तिक व्हेरिएबल पे कमी मिळणे हे नेहमीचे आहे.
बेंच मुळे रेटिंग नाही आणि म्हणून उर्वरित काळात उत्तम काम करुनही प्रमोशन नाही हे बरेचदा घडते.

मुळात इतर इंडस्ट्री ही इतक्या प्रमाणात पीपल बेस्ड नाही ज्यात इतकी वाढ / घसरणही होते. प्रॉडक्शन मध्ये वाढ झाल्यास बाहेरून काम केलं जातं / ओव्हरटाईम होतो / ऑर्डर बॅकलॉग होतो. घसरण झाल्यास बहुतेक वेळा टेम्पररी कामगार कमी केले जातात. त्यामुळे एकूणात बेंच ही संकल्पना फॉर्मल नाही. पण कुठलही मशीन १००% युटिलायझेशन केलं तर त्यात गरजेप्रमाणे वाढवण्यास वाव कमी राहतो. आय टी सोडून इतर इंडस्ट्री ही सगळा वेळ १००% वापरते आणि फक्त आयटी वालेच मजा करतात आणी टंगळ मंगळ करतात असे नाही.
आय टी प्रमाणे पूर्ण प्रोजेक्ट बेस असलेली इंडस्ट्री म्हणजे ईपीसी - इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स -- ही मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग / सब काँट्रॅक्टिंग / टेंपररी कामगार यावर चालते आणि यातही परमनंट एम्प्लॉइजचं काम कमी जास्त होतं बेंचप्रमाणे.

वामन देशमुख's picture

21 Feb 2013 - 3:45 pm | वामन देशमुख

… वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते.

या मुद्द्याशी १००% सहमत.

आइटी मधील बहुतेक लोक्स नवनवीन बाबी शिकण्याची तयारी, मौखिक आणि विशेषतः लेखी संवादकौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्वक्षमता, पेहराव आणि दृश्यव्यक्तिमत्त्व इ. सॉफ्ट स्किल्सबाबतीत अपेक्षेपेक्षा दोन पावले मागेच असतात असा माझा अनुभव आहे. आइटीमध्ये पुढारलेल्या विशेषतः दक्षिणेतील राज्यांतील ताज्या दमाच्या (fresher) आणि अनुभवी दोन्ही प्रकारच्या लोकांची कथा सारखीच!

मैत्र's picture

27 Feb 2013 - 11:04 am | मैत्र

ट्रान्स्फरेबल स्किल्स -- बरेचदा असे विविध स्किल्स वर काम केलेले लोक एक ना धड भाराभर चिंध्या होऊन जातात आणि प्रोजेक्टस मिळत गेले तरी कोअर स्ट्रेंग्थ आणि रेझ्युमे तयार होत नाही.
आजूबाजूचे स्किल्स असावेत आणि वाढवावेत. पण "फ्लेक्झिबिलिटी" च्या नावाखाली आयटी मद्ध्ये जे काही चालतं त्याचं दु:ख त्यातून गेलेल्य व्यक्तीला चांगलंच माहीत असतं.
इतर मॅनेजर्सशी संपर्क वगैरे सॉफ्ट स्किल्स -- सॉफ्ट स्किल्स हे बिहेविअरल स्किल्स असतात असा अंदाज आहे पॉलिटिकल नसावेत.
बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच. --
बहुतेक ठिकाणी बेंचमुळे युटिलायझेशन पर्यायाने अप्रैजल रेटींग आणि म्हणून भविष्यातले प्रमोशन्स / पगार वाढ यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बेंचवरचे सर्व आळशी असतात हा काही सर्वसामान्य नियम नाही.

बेंचवर काही महिने गेल्यावर माणसे कशी असहाय होऊन वाटेल ते काम घेतात याची कल्पना असावी. त्याचा फायदा घेऊन अनेकदा काहीही असंबद्ध कामे गळ्यात मारली जातात. सीए मनुष्य युनिक्स वर आणि एमबीए टेक्निकल डिझाईनवर काम केलेले पाहिले. कर्मचारी आणि काम दोघांची वाट लागते.
काही आडमुठे लोक असतात आणि त्यांना थोड्या अनुभवावर सगळं रेडीमेड हवं असतं हे खरं आहे.

२००८-०९ मध्ये मंदीच्या काळात अनेक उत्तम लोक प्रोजेक्ट बंद झाल्याने बेंचवर आले. पुढचे प्रोजेक्टस नसल्याने लगेच काम मिळणे अशक्य होते ज्याचा त्यांचे स्किल्स/ अपग्रेडस / सॉफ्ट स्किल्स याचा काही संबंध नव्हता.
या काळात ज्या कंपन्यांनी उत्तम युटिलायझेशन दाखवले आहे ते सपशेल खोटे होते.
बरेचदा कॉफीबरोबर युटिलायझेशनचे आकडे कसे वाढवायचे आणि कुठल्या सब प्रॅक्टिसमध्ये किती वाईट स्थिती आहे आणि तरी त्यांनी काय भारी आकडा दाखवला आहे याची चर्चा व्हायची.
अनेक कंपन्या बेंचची साईज कमी करत आहेत -- असावेत पण आत्तापर्यंत हा व्यवहार आतबट्ट्याचा नव्हता.

अंगठ्याचा नियम -- सुमारे चार ते पाच दिवसाला कंपनी जेवढे बिलिंग तुमच्यावर क्लायंटला करते तेवढे त्या लेव्हलला महिन्याला ग्रॉस पगार असतो. यात थोडे कमी जास्त होते. बरेचदा ज्युनियर लेव्हलला कमीच.
हा ढोबळ नियम आहे अगदी काटेकोर नाही पण वस्तुस्थितीपासून खूप दूरही नाही.
या स्थितीत १५% बेंच अवघड नाही. इतर कॉस्ट वाढत आहेत आणि गेल्या तीन वर्षात पगार बरेच वाढले आहेत त्यामुळे बेंच परवडेनासा झाला आहे.

त्यामुळे बेंच परवडेनासा झाला आहे. - मग आता काय सतरंज्या देणार काय कंपन्या यापुढं,

अभ्या, काढतोस कारे एक चित्र, मोठा एसि हॉल आहे, चार बाजुला चांगल्या सतरंज्या, लोड,तक्के ठेवलेत, मधेच एक दोन पानाचे तबक आहेत, सकाळ ते संध्यानंद इकडं तिकडं विखुरलेत, एक दोन टिव्हीत इंद्रा द टायगर लावलाय,

५० भाऊ.. चित्र डोळ्यापुढे आलं .. झक्कास :)
इंद्रा द टायगर वाचून फिस्सकन हसू आलं. मस्त..

एकूणात मार्जिन्स कमी झाले आहेत. प्रचंड CAGR असण्याची वर्ष केव्हाच मागे गेली आहेत.
आतल्या गोटातली बातमी अशी ऐकली आहे की २८% पेक्षा कमी ऑपरेटिंग मार्जिन्स नसतील तर बिड न करणारी एक प्रसिद्ध कंपनी सुद्धा आता बरेचदा या तत्त्वाला मुरड घालू लागली आहे - याला अर्थात वाढती स्पर्धा, वाढलेल्या कॉस्टस, एकूणात थोडी खराब आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
उदाहरण म्हणून सांगतो -- २००५ पर्यंत तरी चहा कॉफी पूर्ण फुकट होतं. काही ठिकाणी अजून काही स्नॅक्स वगैरे फुकट होते. आता बहुतेक कंपन्यांमधून फुकट मिळणारी चहा कॉफी बंद झाली आहे. काही ठिकाणी पुर्वी कँटीन मध्ये बनवलेला चहा फुकट होता त्याजागी अतिशय टुकार चवीची पेये देणारी मशिन्स आली आहेत डीप टी बरोबर.
अशाच एका कर्मचार्‍यांच्या सोयी सुविधांसाठी प्रसिद्ध कंपनी मध्ये २००८ पर्यंत प्रत्येक मजल्यावर वर्तमानपत्रे असायची. २००९ च्या मंदीनंतर ती फक्त तळमजल्यावर ठेवण्याची पद्धत सुरू केली. (बहुतेक इमारतींना २-३ मजलेच असण्याची पद्धत आहे त्यामुळे ते शक्य झाले).
पूर्वी एम्प्लॉई डिपेंडंट्सचा मेडीकल इन्शुरन्स कंपन्या सरसकट करत होत्या. आता वयाच्या आणि इतर अनेक अटी घालून त्यात बरीच कपात केली आहे. काही ठिकाणी आई वडीलांचा मेडीकल इन्शुरन्स कंपनीच्या कॉस्ट्मधून काढून टाकण्यात आला आहे.
एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत पूर्वी कॉस्ट सेंटर्स होती. (त्याचं नाव सांगितल्यास बहुतेक जुन्या लोकांना समजेलच -- स्वॉन SWON) त्या धोरणात मोठे बदल झाले आहेत आणि पूर्णपणे कॉस्ट सेंटर असण्याला परवानगी दिली जात नाही.
बहुतेक कंपन्यांनी पूर्वी नसलेले व्हेरिएबल पे अमलात आणून कमी झालेला नफा हा एम्प्लॉइजच्या कॉस्ट मध्ये काही प्रमाणात वाचवला आहे. वरच्या पदांवर व्हेरिअबल पे चे प्रमाण खूप वाढले आहे.
कँटीन सबसिडीज आता कंपन्या भरणे टाळतात आणि ती कमी केलेली किंमत त्या केटररला बिझनेस देण्याच्या बदल्यात गळ्यात मारतात असे काही वेळा पाहिले आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Mar 2013 - 12:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत पूर्वी कॉस्ट सेंटर्स होती. (त्याचं नाव सांगितल्यास बहुतेक जुन्या लोकांना समजेलच -- स्वॉन SWON) त्या धोरणात मोठे बदल झाले आहेत आणि पूर्णपणे कॉस्ट सेंटर असण्याला परवानगी दिली जात नाही.

SWON वर invoice रेज करता येतो आता ?? नक्की ??

अभ्या..'s picture

1 Mar 2013 - 1:04 am | अभ्या..

अभ्या, काढतोस कारे एक चित्र, मोठा एसि हॉल आहे, चार बाजुला चांगल्या सतरंज्या, लोड,तक्के ठेवलेत, मधेच एक दोन पानाचे तबक आहेत, सकाळ ते संध्यानंद इकडं तिकडं विखुरलेत, एक दोन टिव्हीत इंद्रा द टायगर लावलाय,

पन्नासदादा मला आयटीकंपनीचं चित्र काढायला सांगताय का झेड्पीजवळच्या काँग्रेस भवनाचे?
बाहेर ताई आणि साह्यबाचे दोन डिजीटल पण लावतो मग ;)

मैत्र's picture

2 Mar 2013 - 9:29 pm | मैत्र

नाही नाही.. स्वॉन वर इन्व्हॉस करुन बिलिंग होत नसावे..
मी आता तिथे नाही. त्यामुळे नेमके सांगता येणार नाही.
उलट अनेक / जवळजवळ सर्व स्वॉन बंद केल्याचे समजले आहे. त्यामुळे इंटर्नल कॉस्ट वर बिलिंग दाखवणे बंद झाले आणि युटिलायझेशन हे पूर्णतः क्लायंट बिलिंगवरच होते असे ऐकले आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Mar 2013 - 1:25 am | विश्वनाथ मेहेंदळे

कॉस्टसेन्टर्स पूर्ण बंद करणे शक्य नाही. HR, Admin या सारखे विभाग हे पूर्णपणे कॉस्टसेन्टर्स असतात. इतकेच कशाला प्रत्येक बिल्डींगचे पण स्वॉन असते. या सगळ्या कॉस्ट त्या त्या विभागातील वॉन्स वर विभागून जातात. त्यामुळे तो खर्च कमी झाला कि आपसूकच युटिलायझेशन वाढते.

यापेक्षा जास्त इथे लिहिता येणार नाही. Confidentiality चे बंधन आहे. व्यनित या, मारू गप्पा :-)

(खूप लहान वयात वरील सिस्टीम्स आतून पाहिलेला) विमे ;-)

मृत्युन्जय's picture

20 Feb 2013 - 12:35 pm | मृत्युन्जय

लेख आवडला.

बेंचवर असणे काही काळासाठी खुप सुखाचे असेल यात शंका नाही. पण बेंचवर असण्याची काही तोटे कदाचित नॉन आय्टी पब्लिकला लक्षात यायचे नाहित:

१. काही काळ बेंचवर असणे हे लगेच काम उपलब्ध नसल्याने होउ शकते. मात्र ६-७ महिने काम दिले जात नसेल तर बेंचवरचा इंजिनीयर माठ असणार असा समज होउ शकतो (तसे नसेल तरी). की माठ आहे म्हणुनच एवढे दिवस काम मिळत नाही.

२. बेंचवर असणार्‍या माणसाची नौकरी रिसेशनमध्ये सगळ्यात आधी जाणार हे उघड आहे.

३. बेंचवरचा माणुस जर ७-८ महिने बेंचवर असेल तर त्याला नविन नौकरी शोधणेही अवघड जाणार. कारण ७-८ महिने अनुभव असा काहिच नाही. आयटी मध्ये पब्लिक लवकर आउट ऑफ नॉलेज जाते. शिवाय ८ महिने काम का दिले गेले नाही ह प्रश्न मुलाखत घेणार्‍याच्या मनात येणारच.

आयटीत आल्यापासून बाकड्यावर जायची संधी मिळालेली नाही. बाकी पहिले उदाहरण इन्फी बेन्च ला अगदी तन्तोतन्त लागू पड्ते आहे.

मन१'s picture

20 Feb 2013 - 12:52 pm | मन१

मस्त सुरु आहे.
दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता
कोण बुवा अशी ही माठ नि निरुद्योगी त्रागाधारी मंडळी?