R2T (समाप्त)

वाह्यात कार्ट's picture
वाह्यात कार्ट in भटकंती
25 Jan 2013 - 6:38 pm

R2T भाग १

बुधला माचीच्या पायथ्याला पोहोचेपर्यंत ऊन बरंच चढलं होतं. पायथ्यापास्न वर जायला एक कातळटप्पा लागतो. तो चांगलाच तापलं होता. तो सर करून एक शिडी लागते. शिडीवरून एकदाची माची गाठली आणि हुश्श केलं. माचीवर एक मामा ताक विकायला बसले होते. इतक्या उन्हात्न बोंबलत आल्यावर ते पांचट ताकपण एक नंबर लागलं. त्या माचीवर तेलाच्या बुधल्याच्या आकाराचा सुळका आहे. त्यामुळे त्याला बुधला माची म्हणतात. सुळक्याच्या मध्यापर्यंत गिर्यारोहणाच्या साहित्याशिवाय चढाई करता येते. मध्यावर सुळक्याला एक चिमणीवजा खाच आहे. त्यातनं दोरीच्या साह्यानी सुळक्याच्या माथ्यापर्यंत जाता येतं. बाकीचे दमले असल्यामुळे मी आणि एक भूषण (तोच तो CALL-सेंटर वाला. रेंज नसल्यामुळे भलताच “आनंदी, स्वच्छंदी, हर्षित, उल्हासित, आनंदविभोर” वगैरे वगैरे वाटत होता.) मध्यापर्यंत जाऊन आलो. तिकडून पुढे मग अजून एक-दोन कातळटप्पे सर करून कोकण दरवाजा गाठला. पाठीवरच्या ओझ्यानं पार मेटाकुटीला आणलं होतं. Sack मध्ये मी इतकं साहित्य (वाचायचं नव्हे.!! इकडे ढगात जायची वेळ आली असताना कोट्या कसल्या करताय गलगले.!!) आणलं होतं की अक्षरशः संसार थाटू शकलो असतो. ताट, वाटी, चमचे (चमचे बाळगत असलो तरी कॉंग्रेसधार्जिणा नाही हं.), लिंबू, मिरची, मीठ, साखर, तेल, पीठ, मोठं भांडं, बाकरवडी, श्रीखंड, खजूर, चिक्की, वगैरे वगैरे.

1

2

कोकण दरवाज्यात जरा विसावलो. दरवाज्याच्या गोमुखी रचनेमुळे दारात मस्त गार वारा खेळत होता. मन आणि अंग दोन्ही शांत झालं. जरा आरमामुळे दुसऱ्या भूषणमध्ये एकदम उत्साह संचारला आणि आमच्या अजून थोडावेळ विश्रामाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून गडी तडक निघाला. आणि मोजून १३ सेकंदांमध्ये परत मागे आला. काय झालं विचारलं तर म्हणे आपले नातेवाईक बसलेत बाहेर आपली वाट बघत. जाऊन बघितलं तर १५-२० माकडांची एक टोळी वाटेत स्वागतासाठी सज्ज बसून होती. मी खूप ट्रेक करत असल्यामुळे मीच सगळ्यात शूर असा निष्कर्ष (खोटा) काढून मला पुढे ढकलण्यात आले. मी उसनं अवसान आणून बाजूबाजूने पुढे गेलो. आश्चर्य म्हणजे माकडांनी आम्हाला अजिबात त्रास न देता पुढे जाऊ दिले.(दोनच दिवसांपूर्वी “माय बॉस बजरंगबली” नामक चित्रपट झी सिनेमा वर बघितल्याची पुण्याई असावी बहुदा.) मग मेंगाई मंदिर गाठलं आणि सगळे लादीवरच आडवे झाले. काय झोप लागली सांगू!जाग आल्यावर पहिलं तर सुर्यनारायण सुद्धा दमून घरी चालले होते. लगेच शिताफीने कॅमरा काढून थोडा क्लिकक्लिकाट केला.

3

10

मग अंधार पडायच्या आत फाटी गोळा करणे, पाणी भरून आणणे वगैरे प्रापंचिक कामे सुद्धा संपवली. आमच्यातला एक निळू एका मोठ्ठ्या हाटीलात स्वयंपाकी आहे. तो स्वतःला शेफ वगैरे म्हणवतो. पण मधल्या आळीचे नाव सार्थ करायचे असल्यामुळे आम्ही त्याला स्वयंपाकीच म्हणतो. बरं एवढं शिकून त्याला चूल वगैरे पेटवता येत नाही. मग मी चूल पेटवायला घेतली. हे हृद्य दृश्य बघून माझ्या आईचे डोळेच पाणावले असते.(“चुलीतल्या धुरामुळे”.इति-गलगले.) चूल पेटवता पेटवता चांगलेच “धुम्रपान” झाले. तोपर्यंत एका बंडूने भाकरीचे पीठ कालवायला घेतले. त्यानी त्यात इतकं पाणी ओतलं, की ते “अश्वथामाच्या दुध” आता चहाला वापरता येईल असल्या टीनपाट कोट्या गलगलेनी केल्या. शेवटी आचारी मदतीस धावून आले आणि सर्व स्वयंपाक एकहाती बनवला. पिठलं भाकरी आणि कांदा असा फक्कड बेत जमला.
नंतर मंदिरात अंथरून पांघरून उलगडून, चांदण्यात जरा गप्पा मारायला बसलो. पण थंडी इतकी होती, की चहाचा बेत करायचा ठरवलं. परत चूल पेटवून, चांगला पातेलाभर “इंस्टंट” चहा आमच्या Software कंपनीच्या कृपेने तयार केला. मग पातेल्यासकट एक जवळचा लहान बुरुज गाठला आणि मैफल जमवली. गरम चहा, टिपूर चांदणं, शिळोप्याच्या गप्पा, जोडीला जुनी मराठी गाणी मोबाईलवर. क्या बात क्या बात क्या बात. अश्या ठिकाणी गप्पांचे विषय म्हणजे, जुनीपुराणी प्रेमप्रकरणे, शाळेतली आवडती मुलगी, कॉलेजमधली, कॉलोनीली मुलगी ते ऑफिस मधली आवडती मुलगी पर्यंतच मर्यादित असतात. त्यात माझी मौलिक भर टाकून विषय जरा भूत-खेतांकडे वळवला. तोरण्यावर म्हणे एका ब्राम्हणाचं भूत हातात कंदील घेऊन फिरताना दिसतं. आणि चुकलेल्या वाटसरुंना रस्ता दाखवतं. त्या भुताला उगीच त्रास नको म्हणून आम्हा शूर मावळ्यांनी आप-आपल्या विजेऱ्या काढून (विजेरीच म्हणायचंय. विजारी नव्हे.) मंदिराची वाट धरली.
पहाटे लौकर उठून मुखमार्जन, शंकानिरसन, चहापान (सर्व वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी) करून झुंझार माचीकडे कूच केले. नुकताच सूर्योदय झाल्यामुळे मस्त कोवळं ऊन पसरलं होतं. उजवीकडे राजगड दिसत होता. आणि समोर सिंहगड त्यावरील टॉवरमुळे ओळखू येत होता.

झुंझार माची उतरायला परत एक शिडीची वाट आहे. तिकडून मग मध्यावारच्या एका बुरुजावर पोचलो. बुरुजाच्या कडेने एका कातळटप्प्यानी माचीच्या टोकाकडे जाता येतं. वाटेत २-३ टाकी, २ चोर-दरवाजेपण लागतात. माचीची तटबंदी अजूनही बरीच टिकून आहे. टोकाला बसून थोडावेळ निसर्गाचा आस्वाद घेतला. लांबवर पसरलेले डोंगर बघून बरं वाटलं. काही-क्षण पुण्यातल्या गर्दीचा, कार्यालयातल्या साहेब नामक गारदीचा विसर पडला. असे ताजेतवाने होऊन परत मंदिराची वाट धरली. मंदिरात येऊन जरा बाकरवड्या, चिक्की, खजूर, बिस्कुटे यावर ताव मारला आणि मग पाठीवर सामान बांधून विंचवाचं बिऱ्हाड निघालं.
बिनी दरवाज्या मार्गे आम्ही वेल्ह्यात उतरणार होतो. बिनी दरवाजा ओलांडल्यावर पुढे गेलं की मस्त उतार लागतो. रस्ता एकदम घसरडा होऊन जातो.
आता घसरडा-निसरड्याचा किस्सा सांगतो. एका रविवारी सिंहगड उतरत असताना एका कडूनिंबाखाली जरा विसावलो होतो. तितक्यात अजून एक पुणेकर माझा मागनं तिथे येऊन विसावला. दोघेही पुणेकर असल्यामुळे एकमेकांकडे “हल्ली कुणीही उठतं आणि ट्रेकिंगला सुटतं” असे कटाक्ष टाकून समोर डोंगराकडे बघत बसलो. त्याचा धुळानं माखलेला मित्र पाठोपाठ आलाच.
धु.मा.मि.- “अरे इतकी माती आहे वाटेत कि निसटून पडलो मी. कसलं निसरडं झालंय.”
आरामात पहुडलेला मित्र.- “तुला घसरडं म्हणायचंय का ?”
धु.मा.मि.- “मी निसटून पडलो. मी निसरडंच म्हणणार.!”
आ.प.मि.- “बाळ.! सुक्या मातीवरून घसरलास की घसरडं आणि माती ओळी असलीकी निसरडं ”
हे ऐकून आणि दोघांकडे ह.कु.उ.आ.ट्रे.सु. असा कटाक्ष टाकून वाटेला लागलो.

असो. तर सांगत की होतो. घसरडी वाट उतरत असताना वाटेत एक चौकोनी कुटुंब वर चढत होते. त्यांच्यातल्या दोन्ही लहान मुलांना, तोरणा हे पुणे जिल्ह्यातलं अत्युच्च शिखर आहे हे माहिती आहे पाहून कौतुक मिश्रित अचंबा वाटला.
उतरत उतरत शेवटी वेल्हा गाठलं. पटकन एका प्रवासी जीपनी गुंजवणे फाटा गाठला. तिकडून मग दुसऱ्या जीपनी आमचातल्या २ जणांनी गुंजवणे गाठलं आणि “बायकांना” उठवून फाटा गाठला.
आणि अशाप्रकारे R2T ट्रेक पूर्ण करून बंडू, निळू, झंप्या आणि गलगले निघाले पुण्याला.

अस्मादिक

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

25 Jan 2013 - 7:03 pm | यशोधरा

मस्त!

हाहाहा. फार फार मजेशीर वर्णन. फोटो खल्लास सुंदर.
ते निसरडं आणि घसरडं पटलं बरं का. ओले घसरडे = निसरडे :)

स्पंदना's picture

26 Jan 2013 - 10:45 am | स्पंदना

मस्त फोटोज ! तुफान वर्णन.

वरच्या एका फोटोत एक जण रांगत खाली येताना दिसताहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2013 - 12:07 pm | अत्रुप्त आत्मा

जबरी ,,, मस्त फोटू :-)

तिमा's picture

26 Jan 2013 - 12:07 pm | तिमा

दोन्ही भाग वाचल्यावर ते 'बायकां' चं प्रकरण लक्षांत आलं. मान गये उस्ताद!

मस्तच. वाक्यावाक्याला कोट्या आणि ते आपमि अन् धुमामि एकदम मौलिक :)

पैसा's picture

26 Jan 2013 - 10:56 pm | पैसा

फोटो आणि तुझी लिखाणाची खुसखुशीत इश्टायल एकदम आवडली ते ह.कु.उ.आ.ट्रे.सु. काय आहे तेवढं सांग!

नेत्रेश's picture

27 Jan 2013 - 3:59 am | नेत्रेश

दोघेही पुणेकर असल्यामुळे एकमेकांकडे “हल्ली कुणीही उठतं आणि ट्रेकिंगला सुटतं” असे कटाक्ष टाकून....

पांथस्थ's picture

27 Jan 2013 - 12:36 am | पांथस्थ

कार्ट्या,

एकदम कडक रे मित्रा. काय एक एक कोट्या आहेत. रात्री १२:०० वाजता लेख वाचायला घेतला आणी गडाबडा झालो.

बाकी ट्रेक एकदम जबरी झालेला दिसतोय!!

१४ वर्षांपुर्वी आम्ही सिंहगड - तोरणा - राजगड - रायगड असा ७ दिवसांचा ट्रेक केला होता, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

किसन शिंदे's picture

30 Jan 2013 - 8:39 am | किसन शिंदे

खुसखूशीत वृत्तांत आवडला.

दोघेही पुणेकर असल्यामुळे एकमेकांकडे “हल्ली कुणीही उठतं आणि ट्रेकिंगला सुटतं” असे कटाक्ष टाकून समोर डोंगराकडे बघत बसलो.

हे वाचून फिस्सकन हसलो. =))

घसरडं-निसरडं, बायका, चौकोनी कुटुंब, चमचे, वगैरे "गुद्दे" फार आवडले. फटू तर भारीच!!!

झुंजारमाचीचा पॅच अवघड आहे असे कैक लोकांकडून ऐकलेय. त्याबद्दल थोडके विवेचन आवडले असते वाचायला.

वाह्यात कार्ट's picture

20 May 2013 - 6:52 pm | वाह्यात कार्ट

@ बॅटमॅन- पुढचे लेख जरा सविस्तर लिहायचा प्रयत्न करीन

वाह्यात कार्ट's picture

20 May 2013 - 7:01 pm | वाह्यात कार्ट

यशोधरा, शुचि, aparna akshay, अत्रुप्त आत्मा, तिमा, इनिगोय, पैसातै, पांथस्थ, नेत्रेश, किसन शिंदे, बॅटमॅन.. खूप खूप आभार !! :)