लाईफ ऑफ पाय : मला भलताच आवडलेला चित्रपट

विसुनाना's picture
विसुनाना in जनातलं, मनातलं
17 Jan 2013 - 2:48 pm

म्हणजे काय आहे की -
या समस्त जगातील कोणत्याही गोष्टीचे, वस्तूचे अथवा प्राणीमात्राचे समिक्षण करण्यास मी एक अत्यंत नालायक मनुष्य आहे (हेही समिक्षण त्यात आले असावे.)
याचे कारण असे की एखादी गोष्ट /वस्तू / प्राणीमात्र मला आवडले की भलतेच आवडते आणि वाईसे वर्सा. मग त्यात उडदामाजी असलेले काळे-गोरे मला दिसत नाही. समिक्षा म्हणजे कशी 'ब्यॅलन्स्ड' असली पायजे ह्ये काय आपल्याला जमत नाही.

मागे एकदा 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ'नामक कादंबरीबद्दल प्रेमाचे असेच भरते आले होते आणि आपणही एक समिक्षा लिहावी किंवा गेलाबाजार एखादे रसग्रहण तरी लिहावे अशी प्रबळ इच्छा झाली होती.(अवांतरः 'इच्छा' या शब्दातला च 'चमचा' च असा थेट उच्चारून पहा - मजा येते/मझा येतो - माझी आजी तसा उच्चार करत असे.) पण तसे होऊ शकले नाही.म्हणजे इच्छा पूर्ण झाली नाही. त्याला अनेक कारणे होती. आणि मग आता बर्‍याच दिवसांनी जेहत्ते कालाचे ठायीं समस्त जगात कोणी फक्त तीन लोकांनी लिहिलेली हिंदूची समिक्षणेच तेवढी कशी योग्य आहेत (पैकी एक डॉ. सदानंद मोरे आहेत हे आठवते, बाकीचे दोन कोण ते कुणाला लक्षात असल्यास कृपया कळवावे) आणि बाकीची कशी बकवास आहेत हे समजल्याने आपण एक बकवास समिक्षण लिहिले नाही याबद्दल हायसे वाटले.

असे बरेचसे भरतेस्वरूप (किंवा भरीत किंवा भारीतस्वरूप) अनुभव गाठीशी असल्याने आणि तसेच आंतरजालावर चित्रपटक्षेत्रातील ज्ञानी मनुष्यें असल्याने 'लाईफ ऑफ पाय' (किंवा पायचे आयुष्य) नामक इंग्रजी चित्रपटाबद्दल त्या ज्ञानी मनुष्यांपैकी कोणीतरी भलेबुरे दोन शब्द लिहील असे मनापासून इच्छित (च - चमच्यातला) होतो. पण हाय रे दैवा! इतके दिवस वाट पाहूनही त्यावर कोणीच काही लिहिले नाही. तेव्हा हे कार्य करणे आपल्याच नशिबी लिहून ठेवले आहे असे जाणवून हे शिवधनुष्य पेलण्याचा एक शबल प्रयत्न मी करू पहात आहे.

'सोनी म्यॅक्स' या टीव्ही च्यॅनलवर ऑस्कर नॉमिनेशन्सवर एक टॉक शो सुरू होता. त्यात बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध आणि प्रतिथयश दिग्दर्शक श्री. करण जोहर यांनी फारच महत्त्वाचे विधान केले. ते म्हटले - "लाईफ ऑफ पाय ही मूळ कादंबरी मी पाच-सहा वर्षांपूर्वीच वाचली होती. पण तिच्यात चित्रपट बनवण्याचा काही जर्म मला दिसला नाही. ती काही खास कादंबरी वाटली नाही मला. 'आंग ली'ने कसा काय बुवा या कादंबरीवर चित्रपट बनवला? थ्री-डी गिमिक्स वापरून काहीतरी केले आहे झाले. पण मला तरी तो काही ऑस्कर नॉमिनेशनवाला चित्रपट वाटला नाही." - - अशापैकी महनीय व्यक्तींनी हे मत व्यक्त केल्यावर हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे असे मला वाटले आणि माझा अंदाज चुकला नाही.

समिक्षणाच्या सुरुवातीला किंवा नमनाला विहीरभर तेल घालून (जसे मी येथे केले आहे)झाल्यावर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रघात आहे. आणि त्याबरोबरच एक धोक्याची सूचना (-यापुढचा प्यारेग्राफ चित्रपटाची कथा फोडतो, तेव्हा ज्यांना तो पहायचा आहे त्यांनी हा प्यॅरा वाचू नये इ.) लिहायचा प्रघात आहे. या प्रघाताला अनुसरून कथा आणि धोक्याची सूचनाही लिहायला घेणार होतो. पण त्याची काहीही गरज नाही. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि ज्यांना तो समजला आहे त्यांनी हे संपूर्ण समिक्षण वाचण्याची गरजच नाही. त्यांनी इथूनच कन्नी काटली तरी चालेल. किंवा आता इथेपर्यंत वाचलेच आहे तर पुढेही वाचा, बापडेहो.

तसे म्हटल्यास या चित्रपटाची कथा सांगितली काय किंवा न-सांगितली काय? त्याने काहीच फरक पडत नाही. (ऑं? खरेच.) (म्हणजे हाच तर त्या चित्रपटाचा वरच्या आवरणातला संदेश आहे.)थोडे आत गेले तर चित्रपट 'ईश्वर आहे की नाही?' या अनादि-अनंत प्रश्नाचे काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.(मंडळी सरसावून बसली असावीत.)

चित्रपटाची बाह्यकथा (म्हणजे यान मार्टेल या लेखकाने लिहिलेल्या मूळ कादंबरीची कथा)म्हणजे एक सरळसोट निवेदन आहे. [After studying philosophy at Trent University in Peterborough, Ontario, Martel spent 13 months in India visiting mosques, churches, temples and zoos, and spent two years reading religious texts and castaway stories. - विकी] भारतात इतर जगाच्या तुलनेने कमी खर्चात बराच काळ राहता येते म्हणून एक गरीब फ्रेंच लेखक कादंबरी लिहीण्यासाठी पाँडिचेरीत रहात असता एका भारतीय व्यक्तीच्या संपर्कात येतो. (पण त्याची ती मूळ कादंबरी पूर्ण होत नाही.) ती भारतीय व्यक्ती त्याला आपल्या 'पाय पटेल'(पिसिन मोलिटर पटेल) नामक भाच्याच्या आयुष्यात घडलेल्या विचित्र कथेबद्दल सांगते. ही कथा एखाद्या कादंबरीचा विषय बनू शकते असेही सुचवते.तेव्हा तो फ्रेंच लेखक पाय पटेलला भेटायला कॅनडात जातो आणि ती कहाणी ऐकतो. त्याचे हे सर्व निवेदन म्हणजेच 'लाईफ ऑफ पाय' कादंबरी.

या पाय पटेलने फ्रेंच लेखकाला सांगितलेली कहाणी मात्र अशी सरळ नाही. ती 'अकटस्य विकटो' आहे. म्हणजे ती तशीच असणे पाय पटेलला अपेक्षित आहे. त्याला कदाचित कापुसकोंड्याचीही गोष्ट अपेक्षित असेल असे कोणी म्हणेल. पण तसे नाही. कारण सुरुवात आणि शेवट हे दोन बिंदू निश्चित असणे त्याला अपेक्षित आहे. त्यांमध्ये जे काही घडते ते अकटस्य विकटो असू शकेल किंवा अत्यंत तर्कशुद्ध (तर्कदुष्ट म्हणा हवे तर)असेल - त्याने काय फरक पडतो असा पायचा सवाल आहे. (आणि पर्यायाने लेखकाचाही.) चित्रपटभर एक अतर्क्य कहाणी सांगणारा, अ‍ॅब्सेंट माईंडेड वाटणारा पाय पटेल शेवटच्या काही मिनिटांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून वाचकाला/प्रेक्षकाला गारद करतो.(आणि इर्रफानखानने या प्रॅक्टिकल पण ईश्वराला मानणार्‍या पायला अत्यंत ताकदीने उभे केले आहे.)

चित्रपट हा एक भूलभुलैया आहे. विचार करायला लावतो. 'पाय' या नावाबद्दलच खूप घोळ घातला आहे लेखकाने. त्याचा अर्थ सांगायला बरीच रिळे (किंवा डीव्हीडीवरचे बरेच सेक्टर्स म्हणा)खर्ची पडली. मुळात फ्रेंच स्विमंग पूलचे नाव - पिसिंग (म्हणजे मुतर्‍या) पटेल हे त्याच्या नावाचे विडंबन आणि ते नाव पुसावे म्हणून पाय पटेलने केलेले प्रयत्न हेही स्वप्नवत वाटतात. पण मला काय जाणवले ते सांगतो. 'पाय' ही संख्या संमोहक आहे. (भल्याभल्यांना भुरळ घालते.)'लाईफ ऑफ पाय इज नेव्हर रिपीटिंग अँड नेव्हर एंडिंग' (- हे माझे इंटरप्रिटेशन.)

काळातील दोन बिंदूमध्ये एक अतिरंजित वाटणारी कथा घडू शकते किंवा एक तर्कशुद्ध वाटणारी कथा घडू शकते. एका कथेत माणसाळत जाणारा वाघ, तरंगणारी बेटे, मनुष्यभक्षी वनस्पती असू शकतात तर दुसरीत नरभक्षण करून स्वतःला जगवणारी माणसे असू शकतात. आयुष्याचेही असेच आहे. आयुष्य सरळसोट असू शकते किंवा अनेक चित्रविचित्र घटनांनी भरलेले असू शकते. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये जे काही घडू शकते ते सर्व म्हणजे आयुष्य. पण ज्या कथेत वाघ आहे, बेटे आहेत ती कथा रंजक वाटते. तद्वत ज्या आयुष्यात ईश्वर आहे ते आयुष्य रंजक आहे असे आपले मत पाय पटेलच्या तोंडून लेखक व्यक्त करतो.

व्यामिश्रता हेच या चित्रपटाच्या कथेचे वैशिष्टय. आरंभ,गणिते,तर्क,शक्यता,उपमा,कार्यकारणाभाव,शेवट अशा सर्वच पैलूंवर विचारतरंग निर्माण करणारे हे कथानक आहे. इतक्या ताकदीच्या कथानकावर चित्रपट निर्माण करणे धाडसाचे होते. योग्य हाताळणीखेरीज हा चित्रपट फसला असता.

या चित्रपटाचे नेमके यश कोणते? तर मूळ कथेला दिग्दर्शकाने प्रेक्षकांपर्यंत सरळ पोचवले. जसेच्या तसे. पायच्या कथेतला अकटस्य-विकटोपणा अंगावर यावा ही कथेची गरज होती.त्यातली काही दृष्ये जवळजवळ अ‍ॅनिमेशनपटातली वाटतात. (आंग लीच्या जागी मी असतो तर कदाचित निवेदनाचा भाग टू-डी आणि पायच्या कहाणीचा भाग थ्री-डी केला असता. हॉ, हॉ, हॉ - म्हणायला माझे काय जाते? पण कदाचित तुम्हालाही ते पटेल. पिक्चर पहा.)

दबंग२ जिथे लागला होता त्याच्या शेजारच्याच स्क्रीनवर हा पाहिला. हाही विचित्र योगायोग असावा. (जास्त खोलात विचार केला तर दबंग२ पेक्षा सरळसोट कहाणी आणि अकटस्य विकटो सादरीकरण कोणते असेल? दबंग२ आणि लाईफ ऑफ पाय हे चित्रपटसृष्टीचे दोन धृव आहेत.)

कदाचित इतकेच नसेलही. इतर कोणा प्रेक्षकाला 'लाईफ ऑफ पाय'मधून आणखी काही जाणवेल.एखाद्या शेरामधले शब्द स्पष्ट पण त्याचा अर्थ संदिग्ध पाहिजे.त्याचा अर्थ बहुपदरी पाहिजे. ज्याचा जसा अनुभव तसा त्याला तो भिडला पाहिजे.तरच तो शेर श्रेष्ठ! (नाही का,चित्तरंजन?)या चित्रपटाबाबतही असेच म्हणता येईल. किंवा 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीबाबतही असे म्हणता येईल.

लाईफ ऑफ पाय आणि हिंदूमध्ये मला एक समान स्वर ऐकू आला. तो एक स्वर ऐकण्यासाठी ऐकणार्‍याचा कान 'हिंदू' असला पाहिजे. लाईफ ऑफ पाय कादंबरीच्या लेखकाचा कान दोन वर्षे तेरा महिन्यांत हिंदू झाला.अँग ली ला हा चित्रपट बनवावासा वाटला म्हणजे त्याला तो स्वर ऐकू आला.

शेवटी एक वाद निर्माण करणारे विधान - 'कान हिंदू असतील तर आपोआपच शांतीमंत्र ऐकू येईल'.

चित्रपटसमीक्षामत

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

17 Jan 2013 - 2:58 pm | स्पंदना

स मि क्ष ण.

थोडक्यात आटपेल अस वाटल नाही वाचताना सुरवातीला. म्हणजे मी लेखाची लांबी न बघता वाचायला सुरवात केली अन अपेक्षा होती "अब मै तो गयी" पण काहीही न सांगता बरच काही सांगण, म्हणजे ते हा बिंदु(च्यायला आजच बिकांचा बिंदु की टींब वाचावा?) ते तो बिंदु+ दबंग२+ बरच काही.
माझ्या मते अतिशय हुच्च अस समिक्षण असाव त्यामुळे मला जरा जड गेलं असाव अशी स्वतःची समजुत.

नीलकांत's picture

17 Jan 2013 - 3:03 pm | नीलकांत

चित्रपट अत्यंत आवडला.. बाहेर पडल्यावर बराच काळ त्याच धुंधीत होतो. बोटीवरचा प्रवास भन्नाटच होता. मात्र शेवटाला इरफानने (पाय पटेल) जो चित्रपट पलटवलाय ते अगदी झकासच. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही त्यामुळे तुलना नाही करू शकत. मात्र चित्रपट भन्नाट आहे.

शेवटी इरफान जेव्हा लेखकाला दोन पैकी कोणती कथा आवडली असं म्हणतो, तेव्हा लेखकाप्रमाणे आपल्याला सुध्दा प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा प्यारी वाटते. देवाचा संदर्भ आणि अनुभव सुध्दा आपल्याला असाच हवा असतो ना ?

विसूनानांनी लिहीलंय म्हणजे डायरेक्ट दिल से... :) आवडलं !

- नीलकांत

परिक्षण, किंबहुना चित्रपटावर लिहिलेले मुक्तक आवडले.
पायचा प्रवास अफलातून रेखाटला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2013 - 4:11 pm | अत्रुप्त आत्मा

लाइफ ऑफ पाय,म्हणजे माझ्यासाठी बरच काहि आहे.बरच काही. एक सातत्त्यानी लक्षात रहाणारा चित्रपट.केंव्हातरी काहितरी उत्कृष्ट कलाकृती निर्माण होते...ती म्हणजे लाइफ ऑफ पाय

समीक्षण कळलं नाही आणि कळलंही, जसा सिनेमासुद्धा कळला नाही आणि कळलाही ;)

या क्रिप्टिक सिनेमातल्या 'पाय' या नायकाच्या नावापासून ते त्या विलक्षण आणि फक्त नायकानेच अनुभवलेल्या बेटापर्यंत प्रत्येकच गोष्टीला स्वतंत्र कथानक आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं ती कथानकं आणि त्यांना ओवणारं सूत्र समजून घ्यायला "कोSहम्? सोSहम्|" हे उमजायला हवं.
माझ्याही''मभआचि' च्या यादीतला सिनेमा..!

तिमा's picture

17 Jan 2013 - 5:53 pm | तिमा

'तिकडे' अगोदरच प्रतिसाद देऊन बसल्याने इथे 'पाय' काढता घेतो.

पैसा's picture

17 Jan 2013 - 6:22 pm | पैसा

पाय या शब्दाची गेल्या काही दिवसांत जरा धास्ती बसली आहे. त्यामुळे वाचावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत होते. :D पण वाचल्याबद्दल पश्चात्ताप झाला नाही. मात्र चित्रपट हा प्रत्येकाने स्वतंत्रपणे अनुभवावा. अर्थातच जेव्हा कधी हा चित्रपट पाहीन तेव्हा या परीक्षणाबद्दल विचार न करता पाहीन. इरफान खान आहे म्हणजे "मस्ट वॉच"

शुचि's picture

17 Jan 2013 - 6:55 pm | शुचि

काळातील दोन बिंदूमध्ये एक अतिरंजित वाटणारी कथा घडू शकते किंवा एक तर्कशुद्ध वाटणारी कथा घडू शकते. एका कथेत माणसाळत जाणारा वाघ, तरंगणारी बेटे, मनुष्यभक्षी वनस्पती असू शकतात तर दुसरीत नरभक्षण करून स्वतःला जगवणारी माणसे असू शकतात. आयुष्याचेही असेच आहे. आयुष्य सरळसोट असू शकते किंवा अनेक चित्रविचित्र घटनांनी भरलेले असू शकते. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये जे काही घडू शकते ते सर्व म्हणजे आयुष्य.

वा!!!

रेवती's picture

20 Jan 2013 - 10:14 am | रेवती

आत्ताच पाहिला. ठीक होता. समुद्रातले दिवस संपता संपेनात. आता बास म्हणायची वेळ आली होती. मनुष्याच्या आणि प्राण्याच्या मनस्थितीत पडत गेलेला फरक हा आधीही वेगवेगळ्या (सिनेमांच्या) निमित्ताने आपण पाहिलाय. उदाहरण देता येणार नाही पण तरीही म्हणतीये.

दादा कोंडके's picture

20 Jan 2013 - 9:55 pm | दादा कोंडके

समुद्रातले दिवस संपता संपेनात. आता बास म्हणायची वेळ आली होती.

मिरासदारांच्या ड्रॉइंगमास्तरचा तास मधलं, "पानिपतच्या पहिल्या लढाइत पराक्रम तर भलताच झाला. इतका की पुढे पुढ तो नको म्हणायची पाळी आली!" आठवलं. :)

स्मिता.'s picture

21 Jan 2013 - 4:59 pm | स्मिता.

मीसुद्धा गेल्या शनिवारी म्हणजे तसा फारच उशीरा पाहिला. कदाचित आधी सगळ्यांकडून फार कौतुक ऐकल्याने जरा जास्तच अपेक्षा घेऊन गेले होते. तसा चित्रपट आवडला, काही विनोदही हसवून गेले पण मनावर अगदी कायमस्वरूपी, किमान दीर्घकालीन छाप उमटवणारा असा काही वाटला नाही. 3D परिणामही सुरुवातीला जाणवले पण नंतर डोळे सरावल्यावर ते ही जाणवले नाही. बरं देव आहे की नाही, त्याबाबतचं तत्त्वज्ञान काहीच उलगडलं नाही. अर्थात ही माझी तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान समजून घेण्याची मर्यादा असू शकते हे मान्य आहेच.

चित्रा's picture

20 Jan 2013 - 10:49 am | चित्रा

धन्यवाद. नुसते परीक्षण वाचून चित्रपट बघण्यातली मजा कधीकधी नाहीशी होते. तसे यामुळे झाले नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2013 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिच्चर डाऊनलोड करायला कोणी लिंक द्या रे....
विसूनानाचं चित्रपट परिक्षण म्हणजे लेख वाचून आणि चित्रपट पाहून प्रतिक्रिया द्यावी लागते.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2013 - 11:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'' आयुष्य सरळसोट असू शकते किंवा अनेक चित्रविचित्र घटनांनी भरलेले असू शकते. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये जे काही घडू शकते ते सर्व म्हणजे आयुष्य'' आणि

''दोन बिंदूमध्ये कोणत्यातरी क्षणी ईश्वराची सोबत होते ती ओळखता आली पाहिजे. तो येतो मदत करतो आणि पुन्हा मागे वळूनही पाहात नाही. - इति लाईफ ऑफ पाय.

चित्रपट आवडला.

-दिलीप बिरुटे

इनिगोय's picture

21 Jan 2013 - 6:16 pm | इनिगोय

बिरुटे सर..

दोन बिंदूमध्ये कोणत्यातरी क्षणी ईश्वराची सोबत होते ती ओळखता आली पाहिजे. तो येतो मदत करतो आणि पुन्हा मागे वळूनही पाहात नाही.

चित्रपट बघताना न सुटलेल्या एका 'का'चं उत्तर सापडलं. जियो!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Jan 2013 - 12:38 am | विश्वनाथ मेहेंदळे

थेटरातच पहा. अन्यथा नाही बघितलात तरी चालेल.
Its a visual treat. स्पा म्हणाला होताच की अवतार पण फिका वाटेल म्हणून.

खरं तर चित्रपट बघितल्यावर बराच वेळ डोक्यात मंथन सुरु होतं. तुमचं समिक्षण वाचल्यावर पुन्हा एकदा विचार चक्र सुरु झालं. प्रत्येकाला स्वतंत्रपणे काहीतरी वेगळं जाणवलं एवढं नक्की. कारण बर्‍याच मित्र मैत्रिणींचं वेगळं स्पष्टीकरण ऐकायला मिळालं.

एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. जातांना वाघाने मागे वळून का बघितलं नसावं ?

दे टाळी! जयवीताई, हा इंडीयन वाघ असला तरी सिनेमा हा परदेशी मनुष्याने तयार केलाय. सिनेमा पाहिल्यावर पाच मिंटातली ही माझी प्रतिक्रिया होती (वाघाने बघितले नाही हेही मला आवडलेच). हाच सिनेमा भारतीय मनुष्याने तयार केला असता तर वाचलेले सगळे प्राणी हे गुण्यागोविंदाने राहिले असते. किंवा वाघ व मुलगा काही तासात "तू तो मेरा यार है." असे दाखवले असते. ;)

हा आणि असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणे हेच या चित्रपटाचे यश आहे.

वाघ म्हणजेच पाय पटेल हे रूपक. (म्हणजे प्रत्यक्षात वाघ नाहीच.)

पायला त्याच्या वडिलांनी सांगितलेले असते की - 'हिंस्त्र प्राण्यांना मन नसते / विचार नसतात. जे तुमच्या मनात असते त्याप्रमाणेच ते तुमच्याशी वागत आहेत असा तुम्हाला केवळ भास होतो.' याचा उल्लेखही पाय शेवटी करतो. पायच्या मनातले हिंस्त्रपणाचे श्वापद त्याच्या आयुष्याबरोबर (अनुभवांमुळे) मवाळ होत जाते - विवेकाच्या कह्यात येत जाते. पण पूर्णपणे मरत नाही.
पायच्या मनात असणार्‍या हिंस्त्र श्वापदाने पुन्हा परतू नये असे पायलाच वाटत असते. त्यामुळे तो वाघ वळूनही न पाहता जंगलात अदृष्य होतो.

परंतु चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये जंगलात वाघाला शोधणारा शॉट घेऊन आंग ली ने प्रेक्षकांच्या मनात असलेली हिंसकपणाची ओढ त्यालाच दाखवली आहे. (व्हायोलन्स इज इन द माईंड ऑफ एवरी पर्सन. इथे थोडे विजय तेंडुलकरही आठवतात.)

-हे झाले माझे एक मत. इतरांना काय जाणवले तेही समजून घ्यायला आवडेल.

नगरीनिरंजन's picture

22 Jan 2013 - 11:53 am | नगरीनिरंजन

या चित्रपटातच्या कथेतली रुपके इतकी सुंदर आहे की त्यावर जितकं बोलावं तितकं कमीच आहे. रिचर्ड पार्कर हे पायच्या अंगभूत हिंसक सामर्थ्याचे प्रतीक आहे असे मला वाटले. अगदी आणिबाणीच्या प्रसंगी त्याच्यातला रिचर्ड पार्कर जागा होतो. जहाज बुडल्यावर लाईफ बोटीवर आल्या आल्या त्याला रिचर्ड पार्कर आल्याचे जाणवते पण नंतरच्या भयंकर घटना घडेपर्यंत रिचर्ड पार्कर सुप्तावस्थेतच असतो.
नंतर रिचर्ड पार्कर बाहेर आल्यावर स्वतः पायलाही त्याची भीती वाटते पण तो हळूहळू त्याला काबूत ठेवायला शिकतो आणि मग पुढचा प्रवासभर त्याला रिचर्ड पार्करचा भीतीयुक्त आधार वाटतो.
किनार्‍यावर एकदा सुरक्षित पोचल्यावर आणिबाणी संपते आणि त्याचे ते सामर्थ्य आले तसे unceremoniously निघून जाते आणि पाय सामान्य माणसासारखा ढासळून ढसाढसा रडू लागतो.

सांजसंध्या's picture

20 Jan 2013 - 9:38 pm | सांजसंध्या

अजून पाहीला नाही हे सांगायला कसंसंच होतंय. पण होतंय काय कि सिनेमाला जायचं म्हणजे चार पाच जणं आणि मुलं. किमान तिकीट २०० ते ३०० रु. त्यात मुलांना आवडेलसा, समजेलसा निवडा. इंटर्वलला आणखी चढ्या दराने पॉपकॉर्न आणि कोक घ्या. दर आठवड्याला असे दीड हजार रुपये घालवणं परवडत नाही. सिंगल स्क्रीनला जायचं तर त्यांना पेप्रात जाहिराती देणं परवडत नाही.

म्हणून मनात असूनही आधीच्या आठवड्यात एखादा सिनेमा टाकलेला असल्याने मग नेमका चांगला मूवी राहून जातो. लॉर्ड ऑफ द रिंग्ज हा अजूनही पूर्ण पाहता आलेला नाही.

अगदी अगदी. मुलांना आवडला तर ठीके पण नाही आवडला तर मात्र हे प्रकरण महाग वाटायला लागतं. अश्या कारणाने आणि मुलगा लहान असल्याने मी बरीच वर्षे थेट्रात सिनेमा पाहिला नव्हता. तसेही फार सिनेमे पाहिले जात नाहीत पण तलाश हा मुलांनी बघण्यासारखा आहे की नाही हे मिपावर कोणी परिक्षण लिहून न कळवल्याने बघायचा राहून गेला आणि आमच्या राज्यातून तो गेला. मिपावरील परिक्षणांवर मी बरीच अवलंबून असते.

(तलाश हा मुलांनी बघण्यासारखा अज्जाबात नाही. पण मोठ्यांनी बघण्यासारखा नक्की आहे. चांगला सिनेमा.
बाकी खवत.)

ओक्के. बरं झालं सांगितलस.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Jan 2013 - 1:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

मिपावरील परिक्षणांवर मी बरीच अवलंबून असते

सगळेच मुसळ केरात !!!

श्रीरंग's picture

20 Jan 2013 - 10:23 pm | श्रीरंग

चित्रपट अजून पाहिला नाही. पण या चित्रपटात आणी "बिग फिश" या माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटात बरेच साधर्म असावे, असे सहीक्षण बघून वाटते आहे. आता पहायलाच हवा!

अगदी! शेवटाचा अपवाद वगळता थीम सारखीच आहे.

सस्नेह's picture

21 Jan 2013 - 10:02 pm | सस्नेह

आतापर्यंतचा अनुभव असा की विदेशी दिग्दर्शकानी बनवलेले भारतीयांचे चित्रपट ओढून ताणून 'भारतीय' बनल्यासारखे वाटतात. हा वेगळा आहे म्हणता ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jan 2013 - 11:04 pm | निनाद मुक्काम प...

@सोनी म्यॅक्स' या टीव्ही च्यॅनलवर ऑस्कर नॉमिनेशन्सवर एक टॉक शो सुरू होता. त्यात बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध आणि प्रतिथयश दिग्दर्शक श्री. करण जोहर यांनी फारच महत्त्वाचे विधान केले. ते म्हटले - "लाईफ ऑफ पाय ही मूळ कादंबरी मी पाच-सहा वर्षांपूर्वीच वाचली होती. पण तिच्यात चित्रपट बनवण्याचा काही जर्म मला दिसला नाही. ती काही खास कादंबरी वाटली नाही मला. 'आंग ली'ने कसा काय बुवा या कादंबरीवर चित्रपट बनवला? थ्री-डी गिमिक्स वापरून काहीतरी केले आहे झाले. पण मला तरी तो काही ऑस्कर नॉमिनेशनवाला चित्रपट वाटला नाही." - - अशापैकी महनीय व्यक्तींनी हे मत व्यक्त केल्यावर हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे असे मला वाटले आणि माझा अंदाज चुकला नाही.

संपूर्ण लेखात हे एवढेच कळले आणि आवडले .
हा सिनेमा न पाहताच मी बिनधास्त पणे जर्मनीत माझ्या ओळखीच्या सर्व जर्मन लोकांना हा सिनेमा पहाच .
काय सिनेमा आहे राव , एकदम सही
असे सांगून दणक्यात ह्या सिनेमाची पूर्व प्रसिद्धी केली ,
ह्या सिनेमाची मूळ कादंबरी मी सध्या वाचत आहे व मूळ कादंबरी पेक्षा सिनेमाच मस्त झाले आहे अशी एक अफवा सुद्धा उडवून दिली.
नेहमी नेहमी सिनेमा पेक्षा मूळ कादंबरी कशी अधिक प्रभावी आहे व तिचे सिनेमात रूपांतरण होतांना तिचा कसा बट्ट्याबोळ झाला हे ऐकून कंटाळा आला होता.
जर्मनीत भारताविषयी काहीही रुपेरी पडद्यावर आले की आवडीने पाहण्याचा ट्रेंड आहे.
तेव्हा हा सिनेमा आता खरच पहिला पाहिजे ,
आपण सिनेमाची निर्माण केलेली हवा अगदीच बिनबुडाची नव्हती ह्याची मला खात्री करून घ्यायची आहे.

करण जोहरच्या वक्तव्याबद्दल मला माहीत नाही पण सिनेमात संगणकीय चमत्कार दाखवलेत ते सुंदर दिसतात. तुमचे मन त्या मुलाला संकटातून बाहेर काढायच्या तयारीत असताना एकदम त्यात पाण्याखालून फिरणारे मासे (कृत्रीम), तार्‍यांनी भरलेले (कृत्रीम) आकाश. मध्येच हिरवे बेट असे मला तरी झेपले नाही बुवा! सिनेमा वाईट नक्कीच नाही. पण सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत (वेगवेगळ्या निसर्ग चित्रफितींमध्ये सृष्टीचे अनेक चमत्कार दाखवलेले असतात तरी). इतक्या दिवसांच्या झुंजीनंतर किनारा दिसल्यावर त्या तब्येत खालावलेल्या मुलाकडून आनंदाने उड्या अपेक्षित नव्हत्याच पण एकदम किनार्‍यावरच पोहोचलेला दाखवलाय (अरे बाबा, तुला जमीन कधी दिसली? आधी जंगल दिसलं का? थोडी आशा वाटली का? काहीही दाखवले नाही).

मस्त सिनेमा आहे. हिरवे बेट दिसल्यानंतर ची वाघाची हर्षमुद्रा खुप आवडली
प्रथम नाव वाचल्यावर गणपांच्या सुप्रसिध्द पाया पाकृचे प्रात्यक्षिक असेल वाटले होते ,हेच पाया चे यश आहे.