****************************************************************************
Munich Massacre... (भाग ४) - Operation Wrath of God
Munich Massacre... (भाग ५) - Operation Wrath of God
****************************************************************************
Operation Wrath of God सुरू असताना पीएलओ, पीएफएलपी, ब्लॅक सप्टेंबर या संघटना शांत बसून नव्हत्या. मोसादच्या लेटर बॉम्बला यांनीही लेटर बाँबने उत्तर दिले. कांही मोसाद एजंट्सवर प्राणघातक हल्ले झाले, कांहीजण त्यात मारले गेले.
युरोप आणि मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या या नाट्याचे पडसाद उमटले युरोप पासून दूर, बँकॉक येथे.
२८ डिसेंबर १९७२ ला बँकॉक मधील इस्रायली दूतावासावर पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी हल्ला करून १२ जणांना ओलीस ठेवले. मागणी होती ३६ दहशतवाद्यांच्या सुटकेची. परंतु परिस्थिती चिघळण्याआधीच थाई पोलीसांच्या मुत्सद्देगिरीला यश आले व दहशतवाद्यांनी सर्वच्या सर्व ओलीसांना सुखरूप सोडले. दहशतवादी सुरक्षीतपणे कैरो ला निघून गेले.
एका अर्थाने ही पीएलओ ची हार होती. परंतु मोसादच्या अंदाजाप्रमाणे पीएलओने ही हार मुद्दामहून पत्करली होती. संपूर्ण जगाचे लक्ष विचलीत करण्यासाठी, कोणत्यातरी मोठ्या घटनेसाठी इस्राईलला गाफील ठेवण्यासाठी..
मोसादचा अंदाज खरा ठरला, पीएलओ ची पुढची चाल होती..
इस्रायली पंतप्रधाना गोल्डा मेअर यांची हत्या...
१९७२ साली म्यूनीक हत्याकांडाला उत्तर म्हणून सुरू असलेल्या Operation Wrath of God ला म्यूनीकपेक्षाही भयंकर उत्तर देण्याच्या कट अली हसन सलामेह आणि त्याचे सहकार्यांनी रचला. गोल्डा मेअर यांच्या जानेवारी १९७३ मध्ये होणार्या रोम दौर्याची गोपनीय माहिती पीएलओ ला मिळाली व आणखी एका भयानक हत्याकांडाला प्रत्यक्षात आणण्यासाठी हे दहशतवादी सज्ज झाले.
या दहशतवाद्यांनी खांद्यावरून डागता येणारी मध्यम पल्ल्याची अनेक स्टर्ला मिसाईल्स डिसेंबर १९७२ मध्ये युगोस्लावीयामधून इटलीमध्ये व तिथून रोम मध्ये आणली. इस्रायली पंतप्रधानांसोबत असणारे मोशे दायान, मोसाद प्रमुख झुवी झमीर आणि शिष्टमंडळातले सर्व मंत्री, महत्त्वाचे अधिकारी एकाच फटक्यात ठार करून इस्रायलला पुरते नमोहरम करण्याच्या दृष्टीने सर्व हालचाली सुरू झाल्या.
गोल्डा मेअर, काळा आयपॅच लावलेले मोशे दायान आणि इस्रायली अधिकारी सैनीकांसोबत..
या कटाचा शेवटच्या भाग म्हणून मोसाद आणि इस्रायली गुप्तहेरांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी युरोप पासून दूर, बँकॉक येथे पीएलओ दहशतवाद्यांनी २८ डिसेंबर १९७२ इस्रायली दूतावासावर हल्ला करून १२ जणांना ओलीस ठेवले व नंतर सोडून दिले. मुद्दाम पत्करलेल्या या शरणागतीमुळे इस्राईल आणि मोसाद गाफील राहतील असा पीएलओचा होरा होता परंतु या घटनेमुळे व विशेषत: मुद्दाम पत्करलेल्या शरणागतीने मोसादचे गुप्तहेर अधिक सावध झाले.
अचानक १४ जानेवारी १९७३ ला; गोल्डा मेअर यांच्या रोम प्रवासाच्या फक्त तीन दिवस आधी एका मोसाद गुप्तहेराने सांकेतीक भाषेमधले दोन फोन कॉल्स ऐकले व तत्काळ मोसाद अधिकार्यांना माहिती दिली. अरबी भाषेतल्या या संभाषणामधली वाक्ये होती,
"time to deliver the birthday candles for the celebration" आणि
"Clear the apartment and take all 14 cakes"
बँकॉक दूतावासावरील हल्ल्याने सावध झालेल्या मोसाद अधिकार्यांनी विशेषतः झुवी झमीर यांनी या वाक्याचा अर्थ लावताना केक आणि मेणबत्त्या म्हणजे एखादे हत्यार असावे आणि त्यातही मेणबत्त्या म्हणजे एखादा रॉकेटचा प्रकार असावा असा अंदाज केला. या घटनेमुळे होणार्या परिणामांची गंभीरता लक्षात घेवून मोसादने युध्दपातळीवर हालचाली सुरू केल्या. सर्वप्रथम एका मोसाद अधिकार्याला तत्काळ रोमला पाठवण्यात आले व संपूर्ण शहराचा विशेषत: पंतप्रधानांच्या ताफा जाणार असलेल्या रस्त्याचा अंदाज घेण्यात आला. स्वतः झुवी झमीर लगेचच रोममध्ये आले व डायगॉझ या इटलीच्या सिक्रेट सर्वीस एजन्सीसोबत संपूर्ण परिस्थितीवर देखरेख करू लागले. दुसर्याच दिवशी डायगॉझ आणि मोसाद एजंट्सनी मिळून ज्या ठिकाणाहून अरबी भाषेतले सांकेतीक संभाषण झाले होते त्या ठिकाणावर छापे मारले. पीएलओ एजंट्स रहात असलेल्या त्या संपूर्ण घरामध्ये त्यांना दोनच गोष्टी मिळाल्या, एका कागदाच्या चिटोर्यावर स्टर्ला मिसाईल्स चा एक भाग आणि त्या मिसाईलचे रशीयन भाषेमधले 'युजर मॅन्यूअल'.
स्टर्ला मिसाईल.
डायगॉझ आणि मोसादच्या छापेमार पथकाने पीएलओ एजंट्सच्या शोधासाठी आणखी १० ते १२ ठिकाणी छापे मारले पण एकही दहशतवादी त्यांच्या हाताला लागला नाही. सतत दोन दिवस छाननी करून, वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम उघडूनही फारसे महत्त्वाचे असे काहीच हाती न लागल्याने आणि इस्रायली पंतप्रधानांचे इटलीमध्ये आगमन होण्याची वेळ जवळ आल्याने सर्वच जण एका विचित्र दडपणाखाली वावरत होते, वेगवेगळे दस्तावेज, गुन्हगारांच्या रेकॉर्डची तपासणी केली जात होती, सर्वजण एका संधीची वाट बघत होते, फकत एक संधी; माहितीचा एक स्त्रोत बस्स!
गोल्डा मेअर यांच्या विमानाची वेळ जवळ येत होती, मोसाद एजंट्स आणि इटालीयन सैनीकांवरचा ताण वाढत होता.. काहीतरी व्हावे आणि विमान उशीरा यावे अशी सर्वजण मनातल्या मनात प्रार्थना करत होते. (मात्र या धोकादायक परिस्थितीत पंतप्रधानांचे विमान थोडे उशीरा का 'आणवले' गेले नाही किंवा संपूर्ण दौरा रद्द का केला गेला नाही हे ही एक अनाकलनीय कोडे आहे - दहशतवाद्यांपुढे इस्रायल नमले असा संदेश जावू न देण्यासाठी किंवा मिसाईलच्या बातमीबाबत खात्री नसल्याने असेल परंतु पंतप्रधानांचा प्रवास सुरूच राहिला.)
डायगॉझ आणि मोसाद एजंट्स एकत्र येवून तसेच संयुक्तरीत्या आपापल्या मार्गाने तपास करत होते.
पंतप्रधानांचे विमान येण्यास केवळ एक तासाचा अवधी होता तोच अचानक एका पेट्रोलींग पार्टीला धावपट्टीजवळच्या एका शेतामध्ये एक व्हॅन थांबलेली दिसली. संशयास्पद रीतीने उभ्या असलेल्या या गाडीजवळ जावून आतील प्रवाशांना बाहेर येण्यास फर्मावले असता आतून दोन दहशतवादी बाहेर पडले व त्यांनी पेट्रोलींग पार्टीवर गोळीबार सुरू केला. पेट्रोलींग पार्टीमधील मोसाद एजंट्स आणि इटलीच्या सैनीकांनी केलेल्या गोळीबारामध्ये ते दोन्ही दहशतवादी ठार झाले. त्या व्हॅनचा ड्रायव्हर मात्र पळ काढण्यात यशस्वी झाला. त्या व्हॅनमध्ये सहा मिसाईल्स होती. पळून गेलेल्या ड्रायव्हरने थोड्याच अंतरावरील रस्त्यावरून जाणर्या एका कारमधल्या प्रवाशाला बंदुकीचा धाक दाखवून थांबवले व त्याची कार घेवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कारमधला प्रवासी मोसाद एजंट असल्याने पेट्रोलींग पार्टीला गुंगारा देवून पळून गेलेला दहशतवादी पुन्हा डायगॉझ+मोसाद च्या ताब्यात आला. त्या दहशतवाद्याला त्याच कारमध्ये कोंबून लगेचच एका ट्रकमध्ये बसवण्यात आले हा ट्रक म्हणजे मोसादचे 'मोबाईल कमांड पोस्ट' होता. त्या दहशतवाद्याकडून पीएलओ चा प्लॅन आणि त्याच्या साथीदारांचा ठावठिकाणा काढून घेण्यासाठी प्रचंड मारहाण करण्यात आली. त्याने काही वेळातच आपल्या साथीदारांचा ठावठिकाणा सांगीतला. 'मोबाईल कमांड पोस्ट' सह मोसाद एजंट्सनी तडक तिकडे धाव घेतली. त्यांना रस्त्याशेजारी एक संशयास्पद थांबलेली आणखी एक व्हॅन दिसली, या व्हॅनच्या छताबाहेर काहीतरी डोकावत होते, एकाही क्षणाचा विचार न करता 'मोबाईल कमांड पोस्ट' च्या ट्रकने त्या व्हॅनला ठोकर मारली व छतावरून डोकावणार्या मिसाईल सह व्हॅन उलटवली. व्हॅन उलटल्याने आतले दहशतवादी मिसाईलच्या वजनाने दबले जावून जायबंदी झाले व ड्रायव्हर बेशुध्द पडला. मोसाद एजंटसनी सर्वांना ताब्यात घेतले व तत्काळ डायगॉझला या चमत्कारीक 'अपघाताबद्दल' कळवले.
गोल्डा मेअर यांचा दौरा निर्धोकपणे पार पडला. इस्राईलच्या राजकीय आघाडीला संपवण्याचा पीएलओ चा मनसुबा लष्करी आघाडीने उधळून लावला.
यानंतरचा पीएलओने इस्राईलविरूध्द केलेली मोठी कारवाई म्हणजे ऑपरेशन एंटबे. पीएलओच्या पॉप्यूलर फ्रंट फोर थे लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन या एका संघटनेने तेल अवीवकडून पॅरीसला जाणार्या विमानाचे अपहरण केले व त्यातल्या २४८ प्रवाशांना इस्राईलपासून दूर युगांडा मध्ये नेवून ठेवले. आठवड्याभरातच इस्राईलच्या कमांडोजनी अविश्वसनीय "ऑपरेशन थंडरबोल्ट" पार पाडले. इदी अमीन व इस्राईल विरोधकांच्या हातातून सर्व प्रवाशांना अलगदपणे सोडवून आणले. इस्राईलचा हा मोठा विजय होता. (या घटनेबद्दल विस्तृतपणे लिहीन कधीतरी..)
हे आणि असे बरेच हल्ले एकमेकांवर केले गेले, त्यांना प्रत्युत्तरे दिली गेली. प्रत्युत्तराला उत्तर म्हणून आणखी हल्ले झाले, होत आहेत आणि कदाचित होत राहतील... अंतापर्यंत.
*****************
Operation Wrath of God इथे संपले का..? नाही.
Operation Wrath of God यशस्वी ठरले का..? सांगता येत नाही.
फक्त खेळाडूंच्या हत्येचा बदला घेतला असे म्हणावे तर प्रत्यक्ष म्यूनीक हल्ल्यामध्ये वाचलेला जमाल्-अल्-गॅशेय १९९९ साली एका डॉक्यूमेंट्रीच्या निमीत्ताने जगासमोर आला. ज्याला शोधण्यासाठी मोसादने जंग जंग पछाडले त्याला एका न्यूज क्रू ने शोधले व म्यूनीक हत्याकांडावर One Day in September ही डॉक्यूमेंट्री तयार केली. त्याला पाहून तगड्या इस्रायली मुठी वळल्या नसतील तरच नवल!
Operation Wrath of God परिणामकारक ठरले का..? याचेही उत्तर ठामपणे हो असे येणार नाही.
म्यूनीक हत्याकांडानंतर इस्राईल विरोधात कारवाया झाल्याच नाहीत असे नाहीये, अनेक कारवाया झाल्या अनेक इस्रायली बळी गेले. म्यूनीक च्या दरम्यान इस्राईलने पाळलेले वाटाघाटी न करण्याचे धोरण पुढे अनेकदा वाकवले, बर्याचदा तडजोड केली. अनेकदा तर मृत सैनीकांचे शव मिळवण्यासाठी जिवंत दहशतवाद्यांना तुरूंगातून सोडले आहे.
*****************
उत्तरे न मिळणार्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता अनेक अनुत्तरीत प्रश्नांना जन्म देवून हे ऑपरेशन सध्या थंडावले आहे.
मध्यपूर्वेतल्या या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ज्या दिवशी मिळतील त्या दिवशी इस्राईल आणि पॅलेस्टाईनचे एकमेकांशी हातमिळवणी करणारे हे कल्पनाचित्र प्रत्यक्षात येईल.
******************************************************************************
सर्व माहिती आणि छायाचित्रे अंतर्जालावरून साभार.
******************************************************************************
सर्व वाचकांचे आभार, तसेच या लेखमालेला वेळोवेळी प्रोत्साहन देणार्यांचे आणि सुधारणा सुचवणार्यांचे विशेष आभार.
******************************************************************************
प्रतिक्रिया
6 Jan 2013 - 1:47 am | लॉरी टांगटूंगकर
जबरदस्त लेखमाला चालली होती,
पुढचा भाग येणार नसल्याने विचित्र वाटतंय...
6 Jan 2013 - 9:14 am | अमोल खरे
सही लेखमाला. काय मिळालं ह्याचा विचार केला तर न्याय मिळाला असं बोलायला लागेल. जे इस्त्रायली खेळाडु ह्यात मेले त्यांच्या नातेवाईकांना नक्की न्याय मिळाला. भारतात तो आजपर्यंत फक्त कसाबला फासावर लटकवला तेव्हा मिळाला. (मुंबई बॉम्बस्फोट, संसद हल्ला, राजीव गांधी हत्या प्रकरण अशी खुप मोठी लिस्ट आहे). इस्त्रायलच्या ह्या ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांना व्यवस्थित संदेश मिळाला की ज्या पद्धतीने ते लोकांना मारतात, त्यांना पण दुसरे कोणीतरी मारु शकतात म्हणुन. ह्या पुर्वीच्या एका धाग्यावर भारताच्या गुप्तहेर संस्था पण चांगल्या आहेत असा सुर एका सदस्याने लावला होता. तसं असेल तर बेस्टच आहे, पण भारताला हवे असलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानात आरामात आहेत हे ही लोकांना दिसताय. जर आपण म्हणतो की आपल्या संस्था बेस्ट आहेत, तर त्या ह्या दहशतवाद्यांना मारत का नाहीत ? माझ्यासारख्या सामान्यांना असे प्रश्न पडतात. हे प्रश्न इस्त्रायलच्या नागरिकांना पडत नसावेत कारण आपल्याला न्याय मिळेल ही त्यांची खात्री असते. ऑपरेशन रॅथ ऑफ गॉडचे हेच यश आहे. ह्या ऑपरेशनने इस्त्रायली नागरिकांचा त्यांच्या सरकारवरील विश्वास द्रुढ झाला, हेच त्यांचे यश आहे.
6 Jan 2013 - 9:30 am | श्री गावसेना प्रमुख
असे काही नाहीये त्याला राजकीय इच्छा शक्ती असावी लागते
मागे वाजपेयी सरकार असतांना ,पाकीस्तानात दाउद राहतो त्या इमारती बाहेर भारतीय गुप्तहेरांनी राजन ला हाताशी धरुन शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवुन आणला होता,त्याला जीगर लागत.
6 Jan 2013 - 4:18 pm | अमोल खरे
पण त्यात दाऊद मेला का ? ह्याच वाजपेयींनी लाहोर बससेवा सुरु केली, पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच वगैरे खेळवली. थोडक्यात काँग्रेसने ज्या गोष्टी केल्यावर हे त्यांच्यावर टिका करायचे त्याच गोष्टी ह्यांनी केल्या. कारगिल युद्धाच्यावेळी म्हणे सैन्याचे रिपोर्ट्स होते की अशी घुसखोरी होतेय, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. विमान अपहरणाच्यावेळेस दहशतवाद्यांना सोडलं. एक क्षण समजु कि ते बरोबर होतं, पण ते दहशतवादी नंतर पाकव्याप्त काश्मिर मध्ये फिरत होते तेव्हा त्यांना का नाही मारलं ? अनेक गोष्टी आहेत हो. काँग्रेस म्हणा का भाजपा, दहशतवाद्यांशी लढायला जे काळिज लागतं ते ईंदिरा गांधींनंतर आजपर्यंतच्या कोणत्याही भारतीय नेत्याकडे नव्हतं ही कितीही कडु असली तरी वस्तुस्थिती आहे. ईंदिरा गांधी जरा जास्त जगल्या असत्या तर कुणास ठाऊक, पाकिस्तान आज आहे तितका माजला ही नसता कदाचित.
तोपर्यंत आपण नशिबावर अवलंबुन जगत राहायचं. जाता जाता- माझ्या शाळेतील २-३ वर्ष ज्युनिअर असलेला मुलगा ताज मध्ये मारला गेला. त्याला तर नशिबाने कसाबला लटकवल्यावर न्याय मिळाला. पण राजीव गांधींना ज्यांनी मारलं ते दोन आरोपी जिवंत आहेत. त्यापैकी नलिनी म्हणुन जी कोण आहे तिची फाशीची शिक्षा म्हणे माफ केली. दुस-याला कधी फाशी होईल ते माहित नाही. फक्त राजीव गांधी नाही तर त्यांचे बॉडीगार्ड्स ह्या हल्ल्यात मारले गेले होते. त्यांच्या कुटुंबियांना कधी न्याय मिळणार ? इस्त्रायलचे कौतुक वाटते हे ह्यासाठीच.
7 Jan 2013 - 8:24 am | श्री गावसेना प्रमुख
कारगील
ही विकी ची लिंक वाचा थोडी ज्ञानात भर पडेल
ह्याच इंदिरा गांधीनी भिंद्रनवाले ला पोसुन खलीस्थानी भस्मासुर ओढवुन घेतला होता,
7 Jan 2013 - 9:50 am | अमोल खरे
विकी वर लिहिलेले सत्य मानुन चालणार असाल तर आनंद आहे. ईंदिरा गांधींनी खलिस्तानी भस्मासुर ओढवुन घेतला असेलही पण त्यांनीच खलिस्तानी भस्मासुर मोडुनही काढला होता.
असो, माझ्याकडुन ह्या चर्चेला पुर्णविराम. जर आपले सरकार दहशतवाद्यांना टिपुन मारताय असं तुम्हाला वाटत असेल तर ते लवकरात लवकर सत्यात उतरो ही आशा.
7 Jan 2013 - 11:21 am | श्री गावसेना प्रमुख
तुम्ही कारगील चे सत्य सांगणार नाहीत का मग,वाटल्यास व्यनि करा तुम्हाला माहीत असेल तर,
आणी खलिस्तानी भस्मासुर अजुनही आय एस आय च्या सहकार्याने उठण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात घ्या,
मी इथे फक्त वाजपेयींनी जे प्रयत्न केले ते सांगीतले होते ....असो
6 Jan 2013 - 10:47 am | रणजित चितळे
प्रचंड छान लेख मालिका होती.
अमोल खरेह्यांनी जे लिहिले आहे तेच प्रश्न मलाही पडतात (गावसेना प्रमुखांनी दिलेला एखाद दूसरा अपवाद वगळता) आपल्या कडे अजून सुद्धा अशोका पासून चालत आलेले पराकोटीची अहिंसेचा (अ) धर्मच फक्त बघायला मिळतो.
मोदक ह्यांच्या लेखांनी आपल्यात काय कमी आहे त्याची जाणीव करुन दिली.
आवांतर,
स्टर्ला मिसाईल ऐवजी स्ट्रेला मिसाईल असे म्हणायचे होते का
6 Jan 2013 - 1:45 pm | मोदक
बरोबर..
ते स्ट्रेला मिसाईल असे असायला हवे होते.
धन्यवाद रणजीतजी.
6 Jan 2013 - 10:50 am | पैसा
संपूर्ण मालिकाच अतिशय रंगतदार झाली. ऑपरेशन एन्टेबी अतिशय थरारक प्रकरण आहे. लवकरच लिही.
6 Jan 2013 - 11:14 am | रेवती
बापरे! किती हा ताण. ती गोल्डाबाई पोचतीये का नाही असा प्रश्न पडला होता.
6 Jan 2013 - 11:53 am | लाल टोपी
सुरेख लेख नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण मात्र अशा कार्ययोजनांचे यशापयश मोजण्याचे मापदंड्च वेगळे असतात. यावरुन एक संदेश तर निश्चित मिळतो की आमच्या वाटेला गेलात तर आम्ही सोडणार नाही.... नाहीतर आपण संसदेवर हल्ला झाला तरी निषेध करुन गप्प... सूत्रधार अटकेत पण फाशी द्यायला मतांचे गणित आड येते.
6 Jan 2013 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
मनावर पकड घेणार विषय ! आणि तो तुम्ही पुर्ण ताकदीने पेललाय !!
अशा लिखाणाच्या शेवटी "क्रमशः" बघायला जास्त आवडले असते. ते एन्टेबी प्रकरण जरा वेळ काढून लवकरच टाका. प्रतिक्षेत आहे.
7 Jan 2013 - 9:42 am | प्रचेतस
+१
7 Jan 2013 - 10:01 am | अक्षया
+ १
6 Jan 2013 - 9:22 pm | मुक्त विहारि
ह्या घटनेवर बेतलेला सिनेमा पण चांगला आहे..
7 Jan 2013 - 12:13 am | बॅटमॅन
जिंकलास रे मोदका. मानलं तुला!!
7 Jan 2013 - 8:07 am | ५० फक्त
मस्त लिहिलंस रे, धन्यवाद.
7 Jan 2013 - 9:52 am | स्पा
सही सिरीज झाली हि , वर अमोल खरे साहेबांशी सहमत .
शेवट तर सुरेख जमलाय
7 Jan 2013 - 9:53 am | स्पा
ह्या घटनांवर काही चित्रपट आले आहेत काय ?
आले असल्यास कृपया लिंक दे
7 Jan 2013 - 9:54 am | अमोल खरे
म्युनिक म्हणुन आहे. एरिक बाना आहे त्यात. सुंदर पिक्चर आहे.
7 Jan 2013 - 11:58 am | किसन शिंदे
लेखमालिका अतिशय उत्तम झाली. या शेवटच्या भागात वाचकावर एक अनामिक ताण ठेवण्यात तु यशस्वी झालास.
7 Jan 2013 - 12:01 pm | रोहन अजय संसारे
शेवटी "क्रमशः" बघायला जास्त आवडले असते
8 Jan 2013 - 12:41 am | मोदक
वेल.. या लेखाच्या शेवटी एक अदृष्य क्रमशः आहेच.
या लेखानंतर इस्राईलच्या निर्मीतीमागचा रोचक इतिहास, त्यादरम्यानच्या घटना आणि जेरूसलेम शहरासंदर्भात घडलेल्या घडामोडींची एक चित्तवेधक सिरीज श्री बॅटमॅन लिहीणार आहेत..
त्या सिरीजनंतर मी पुन्हा इस्राईलने पार पाडलेली ऑपरेशन्स लिहायला सुरू करेन.
शत्रूराष्ट्राच्या लष्करी विमानांच्या ताफ्यातून पळवून आणलेले फायटर जेट,
इराकच्या अणुभट्टीवर केलेला हल्ला.. अशी अनेक ऑपरेशन्स आहेत.
बॅटमॅना.. यूवर टर्न नाऊ.
8 Jan 2013 - 8:21 am | प्रचेतस
त्या आधी श्री बॅटमॅन यांनी त्यांची अर्धवट राहिलेली 'ट्रॉय' मालिका आणि 'वाल्गुदभारत' हे महाकाव्य पूर्ण करावे अशी त्यांना इनंती.
8 Jan 2013 - 11:14 am | सस्नेह
गोल्डाबाई वाचल्या याचा आनंद झाला..
बाकी यावरून दहशद्वाद्विषयक धोरण कसे असावे याचा धडा आम्हा भारतीयांनी घेतला अस्ता तर किती बरे झाले असते !
8 Jan 2013 - 3:43 pm | गणेशा
लेखमाला अप्रतिम अशीच होती.. पुढील घटनेंच्या लिखानाबद्दल उत्सुक
8 Jan 2013 - 10:53 pm | एस
आणि तिचा तितकाच उत्कंठापूर्वक असा शेवट. या लेखमालेने कित्येकांना विचार करण्यास भाग पाडले, कित्येक प्रश्नांची बीजे शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करून दिली आणि त्याचबरोबर कल्पनेपेक्षाही थरारक वास्तवाची वाचकांना ओळख करून दिली, हे तुमच्या लेखनशैलीचे यश आहे. तितकेच ते यश तुम्ही जाणीवपूर्वक ठरवलेल्या लेखनाच्या चौकटीचेही आहे.
ऑपरेशन योनाथन एन्टबेच्या प्रतीक्षेत...
ता.क. - ह्या विषयावर विस्तृत प्रतिक्रिया आधी ठरवलेल्याप्रमाणे तुमच्या खरडवहीत लिहीन. विशेषतः भारतीय गुप्तहेर संघटनांबद्दल.
16 Sep 2015 - 2:03 pm | नया है वह
+अप्रतिम
23 Aug 2016 - 1:17 am | निओ
सर्व भाग वाचले. भारी झाली आहे. सध्या बोका भाउंची मोसाद लेखमाला अशीच तुफान झाली आहे.