दोघेही खेळात पार गुंग झाले आहेत. वेळ कुठे गेला त्यांना कळंत नाही. ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे पृथ्वीवरील शेकडो वर्षे असे म्हणतात. प्रेमी युगुलांच्या बाबतीत असेच काही घडत असावे. दोघांना भान येते तेव्हा जाणवते की ते दोघेही टेबलाच्या खाली आहेत व काही अंतरावर चहु बाजूंनी दिसत आहेत ते आपल्या सहकाऱ्यांचे पाय आहेत. ते बहुदा जेवण करून परतले आहेत आणि हे संस्मरणीय दृश्य नजरेत साठवण्यासाठी टेबलाच्या सर्व बाजूंनी घेराव करून उभे आहेत. दोघेही लाजेने चूर होवून विरुध्द दिशांनी पळतात. आपला बाल्या तर कोटाने तोंड झाकून पळंतो. हास्याचा एकच फवारा उडतो अन गाणे संपते.
हिंदी चित्रपटातील युगल गीते हा एक धमाल प्रकार आहे. (त्याला मराठीत द्वंद्व गीते का म्हणतात कोणास ठावूक.) त्यातील विविधता पाहून मन थक्क होते व कान तृप्त होतात. विरह व्याकूळ
प्रेमिजनांची आर्त गीते, शृंगाराच्या हलक्याशा शिडकाव्या पासून ते त्याच्या गडद -भडक आविष्कारापर्यंतची गाणी, एखादे काम सोबत करत असताना मिळून म्हटलेली गाणी, छेडछाड , मस्करीची गाणी-- किती किती रूपे सांगावीत! एकेका मूडची अक्षरशः शेकडो सुंदर गाणी आहेत. प्रत्येक माणसाची निवड वेगळी. कारण गाणे एकच असले तरी प्रत्येकाच्या भाव विश्वात त्याचे पडलेले प्रतिबिंब वेगळे असते. म्हणूनच कलाकाराने निर्मिलेली कलाकृती कितीही सुंदर असली तरी अपूर्णच असते. रसिकाच्या मनात तिचा प्रतिसाद उमटल्यावरच तिला पूर्णत्व येते.
प्रत्येक अर्थच्छटेची गाणी मला आवडतात. पण त्यातही निवड करायची झाल्यास मी छेडछाड- मस्करीची गाणी निवडीन. कारण आपण चेष्टा-मस्करी कुणाची करतो , तर बरोबरीच्या माणसाची. मोठ्यांची चेष्टा करणे शिष्टसंमत नाही, आणि लहानांची चेष्टा करण्यात मजा कसली? चेष्टा करायला दोघांमध्ये बरोबरीचे, शक्यतो दोस्तीचे नाते असणे ही मस्करीची पूर्व अट आहे. तसे नसेल तर ते नाते मस्करी करण्याचा अधिकार देणारे असावे- म्हणजे की दीर-भावजय, मेव्हणा- साली इ.पण त्यातही बरोबरीचे नाते गृहीत धरले आहेच. शिवाय चांगली थट्टा करण्यासाठी तुमच्याकडे निर्मल विनोद बुद्धी असायला हवी. गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक ह्या साऱ्यांकडे ती असेल तर ते गाणे ऐकायला- बघायला बहार येईल ह्यात काय शंका?
एरवी आपल्या भारतीय समाजात स्त्री-पुरुषांचे नाते असमानतेच्या पायावर उभे असलेले आपल्याला हर घडी प्रत्ययास येते. हिंदी चित्रपटातल्या नायिका म्हणजे बहुतेक वेळी सुंदर कचकड्याच्या बाहुल्या असतात. त्यांना स्वतंत्र विचार बुद्धी, व्यक्तिमत्व असते हे भान किती निर्माता-दिग्दर्शकांकडे असते? (अगदी आघाडीच्या चित्रपट तारकांची स्व-प्रतिमा काय असते हा आणखी वेगळा विषय आहे.) तुम्ही आतापर्यंत गाजलेले हिंदी चित्रपट आठवा. त्यातील नायिका किती शिकली होती व कोणता व्यवसाय करीत होती हे सांगता येईल , किंबहुना त्यात वेगळे सांगण्यासारखे काही असेल?
आदर्श पती-पत्नी नात्याविषयी हिंदी चित्रपटाच्या व प्रेक्षकांच्या कल्पना साधारणतः खालील ओळीत दिल्याप्रमाणे असतात-
"बैठ जा, बैठ गयी, खडी हो जा, खडी हो गयी
घूम जा, घूम गयी , गयी , गयी , गयी "
(आनंद बक्षी, 'अमीर गरीब', १९७४)
एखाद्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या बाईला आपल्या प्रेमपाशात बध्द करून तिला चारचौघींसारखे 'शिस्तीत' वागायला शिकविणे, तिचे गर्व हरण करून तिला आदर्श भारतीय नारी बनविणे हा बहुसंख्य हिंदी चित्रपट लेखक, दिग्दर्शक व नटांचा आवडता अजेंडा असावा अशी मला दाट शंका येते. शेक्स्पीयरच्या' टेमिंग ऑफ द श्रू 'ची कितीतरी रुपांतरे भारतीय चित्रपटातून सादर केली गेली. खालील गीत एके काळी खूप लोकप्रिय झाले होते-
"शादी के लिये रजामंद कर ली , रजामंद कर ली
मैने एक लडकी पसंद कर ली
ओ उडती चिडिया पिंजडे में बंद कर ली, हा बंद कर ली
मैने एक लडकी पसंद कर ली "
(आनंद बक्षी, 'देवी' , १९७०)
आता आता कोठे हे चित्र थोडे फार बदलू लागले आहे. पण सिनेमातली बाई 'माणूस' म्हणून कुठे तरी दिसू लागली आहे असे वाटते न वाटते तोच तिच्या शरीरावर भर देणारे इतके चित्रपट येतात, त्यांची एवढी चर्चा होते की शरीराहून वेगळे तिचे काही व्यक्तिमत्व असते ह्याचा पुन्हा एकदा सर्वांना विसर पडतो. असो.
ह्या पार्श्वभूमीवर स्त्री-पुरुषांच्या नात्यात हसी-मजाक , चेष्टा दाखवून त्या दोघांना बरोबरीच्या नात्यावर आणून ठेवणारी गाणी किती मोलाचे सामाजिक कार्य करीत आहेत ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. अगदी पन्नास व साठच्या दशकातही नायक-नायिकेची अशी छेड -छाड गीते प्रसिध्द होती.
त्याच्या पुढचे पाउल म्हणजे नायिकेने नायकाची घेतलेली फिरकी. साधा-भोळा , भोट , शामळू , चम्या , मामा अशा बिरुदावलीने सुशोभित नायक व तेज-तर्रार, मिरची, तडका, स्मार्ट अशी विशेषणे लागू पडतील अशी नायिका , व तिने आपल्या भोळ्या नायकाची घेतलेली फिरकी म्हणजे एकदम मस्त प्रकार. 'छोटी सी बात' आठवतो? आपला भाबडा अमोल व सोनटक्क्याच्या फुलासारखी टवटवीत विद्या सिन्हा ह्यांचा खट्टा-मीठा रोमान्स. त्यांचे हे गाणे तर कहर आहे -
'जानेमन जानेमन तेरे दो नयन,
चोरी चोरी लेके गये देखो मेरा मन,
जानेमन हा जानेमन "
ह्या त्याच्या लाडिक तक्रारीला ती काय खट उत्तर देते-
"मेरे दो नयन चोर नही सजन
तुम से हि खोया होगा देखो तुम्हारा मन "
( योगेश, १९७६)
तूच वेंधळा आहेस . कुठे तरी पडले, हरवले असेल तुझे हृदय, मला कशाला दोष देतोस, असा सारा भाव. वरून जानेमन, जानेमन म्हणणे आहेच.
हे सारे गाणे - त्याचे शब्द, चित्रांकन, अभिनय सारेच अप्रतिम आहे. मी आज निवडलेले गाणे त्याच बाजाचे , पण त्याहून गंमतीदार आहे.
चित्रपट आहे 'मिस्टर अंड मिसेस ५५'. १९५५ चा हा चित्रपट,म्हणजे 'छोटी सी बात' च्या २१ वर्षे पूर्वीचा. त्यातही गम्मत महणजे हे गाणे ज्यांच्यावर चित्रित केले गेले ते ह्या चित्रपटाचे नायक-नायिका नाहीत. त्यातील पुरुष म्हणजे विनोदी अभिनेत्याचा शिक्का बसलेला उत्कृष्ट नट - जॉनी वाकर. दिग्दर्शक गुरुदत्त च्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातील हा एक. गुरुदत्तने आपल्या मैत्रीला जागून जॉनी वोकर ला आपल्या प्रत्येक सिनेमात उत्तम भूमिका व एक बहारदार गीत दिले. ह्यातील नटी म्हणजे यास्मीन. तिचे मूळ नाव विनिता भट्ट. ती ह्या गाण्यात इतकी गोड दिसते, तिच्या अदा , तिच्या गालावरच्या खळ्या इतक्या घायाळ करणाऱ्या आहेत की ह्या चित्रपटानंतर ती लग्न करून निघून गेली ह्याची हे गाणे पाहणाऱ्या प्रत्येकाला खंत वाटल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे गाण्याचे नायक-नायिका म्हणून दोघेही शोभतात.मजरूह सुल्तान्पुरींच्या गीताला स्वरसाज चढविला आहे जवांदिल ओ पी नय्यर ह्यांनी. ह्या अवखळ गीताला गायले आहे रफी व गीता दत्त ह्यांनी.
एरवी मी अनेकदा ह्या स्तंभातून लिहितांना गीताच्या चित्रीकरणाला कमी महत्व दिले आहे. अनेकदा त्या गीताला संदर्भ- चौकटीच्या बाहेर उभे करून त्याच्या आशयाचे सौंदर्य उलगडून दाखविण्यावर मी भर दिला आहे. ह्या गीताची गम्मत वेगळीच आहे. हे गाणे तुम्ही केव्हाही, कोठेही ऐका, तुमचे मन एकदम प्रसन्न होईल ह्यात शंका नाही. पण हे गीत पाहिले तर त्याची खुमारी अनेक पटींनी वाढते. स्थळ एक सरकारी ऑफिस. बॉक्स फायली भरलेली लाकडी कपाटे, दाटीवाटीने मांडलेली टेबले. वेळ बहुदा लंच टाईमची. कारण गाणे सुरु होते तेव्हा पुतळ्यासारख्या दिसणाऱ्या शिपायाशिवाय आपल्या प्रेमी जोडीला डिस्टर्ब करणारे कोणीही आजूबाजूला नाही. तो शिपाई देखील भलताच समजूतदार आहे. तो त्यांचा रसभंग होईल असे काहीही करीत नाही.
आपला नायक उगाचच गोल गोल फिरतो. शोधल्यासारखे करतो. टेबलाखाली वाकून बघतो. ड्रोवरची उघडझाप करतो.अंगावर सूट चढवला असला तरी तो 'आपला बाळ्या ' आहे हे कोणालाही समजून यावे. ती टायपिस्ट आहे. एकदम स्मार्ट. तिने केसांचा बॉब केला आहे. तिचे टाईपरायटर समोर बसणेही दिमाखदार आहे. ह्या गोंधळात तिला काही काम करणे कसे शक्य होणार? ती त्रस्त नजरेने त्याच्याकडे पाहते. तो जणू तिच्याकडे लक्ष नाही असे दाखवीत तिच्या टेबलापाशी येतो, उचक-वाचक करतो. तिच्या टेबलावरील फाईल उस्कटतो , तिचा ड्रोवर उघडतो, तिच्या पर्स मध्येही हात घालतो. आता तिची सहन शक्ती संपते. ती पर्स हिसकावून घेत त्याला विचारते- काय शोधतो आहेस? तो म्हणतो- जे हरवले आहे ते."काय हरवले आहे ?" ह्या प्रश्नाला त्याचे उत्तर असते- "जे मी शोधतो आहे ते". तिचा पारा चढतो, ती ताडकन उठते. तिला कळते की ह्या प्रश्नोत्तराला काही अर्थ नाही. ती वैतागून त्याच्याकडे पाहते. तो शांतपणे फोनजवळ जातो. एक नंबर फिरवतो, तिकडून प्रतिसाद आल्यासारखे दाखवितो आणि-- आणि एकदम गावू लागतो--
एकदम स्वप्नमय दृश्य. ते दोघेही गात आहेत, नाचत आहेत. ते निरस सरकारी कार्यालयही जणू त्या दोघांसोबत नाचू गावू लागते.हातात हात घेवून, गिरक्या घेत ते नाचतात. टेबलाभोवती फेर धरतात. कधी टेबलाच्या खाली जावून एकमेकांना शोधतात. आपापला रोल प्ले ते मस्तच करतात. जणू काय त्याचे खरच काही हरवले आहे, जणू त्याचे हृदय ही पेन्सिल , रबर, पेन ह्याप्रमाणे एखादी स्टेशनरीची वस्तू आहे व ती त्याला ते शोधण्यास मदत करते आहे, मधेच त्याच्या वेंधळेपणाबद्दल त्याला छेडते आहे.--
तो तिला विचारतो- " मला कळत नाहीये माझे मन गेले तरी कुठे. आत्ता आत्ता तर ते इथे अगदी माझ्याजवळ होते. शप्पथ, मी त्याला पाहिले . कुठेच गेले नव्हते ते. पण आता मात्र ते कुठे दिसत नाही. तू पाहिलेस का त्याला कुठे आस पास, कुठे जातांना किंवा येतांना?"
ती खट्याळपणे उत्तरते-"जाउन जाउन ते जाणार तरी कोठे? मी चांगले ओळखते ना त्याला.कुणाच्या तरी अदावर तो फिदा झाला असणार. आणि गेला असणार तिच्या मागे. किंवा असेही झाले असेल की तो कुणाच्या तरी टपोऱ्या मोठ्या मोठ्या डोळ्यांचा माग काढत गेला असेल आणि तिच्याशी नजरानजर झाल्यावर मग घाबरून कुठे दडी देवून बसले असेल. एक नंबरचा भित्रा आहे तो. कुणा मुलीच्या नजरेला नजर भिडविण्याची हिम्मत आहे कुठे त्याच्यात (म्हणजे तुझ्यात?) उगाचच एखादीच्या मागे-पुढे चकरा मारणे आणि तिने विचारले की काहीतरी गोलंगोल बोलणे किंवा घाबरून जाणे एवढेच येते त्याला (म्हणजे तुला)."
तिने एव्हढे टोमणे मारले तरी आपल्या हीरोला राग आला नाही. त्याला कळंते आहे की लाईन क्लीअर आहे. तिला खरेच राग आला असता तर आतापर्यंत तिने ऑफीस डोक्यावर घेतले असते. तिचे डोळे आणि मनमोहक अदा ह्यांवर आपण भाळलो हे तिला माहीत आहे व त्याबद्दल तिची हरकत नाही. मग हा खेळ आपण पुढे चालवायला हरकत काय? तिच्या बोलण्याचा धागा पकडून तो आणखी पुढे नेत तो म्हणतो-
""खरे आहे तुझे म्हणणे. आहेच तो मुलखाचा भित्रा. मला वाटते की मोठे मोठे डोळे पाहून तो नक्की भ्याला असेल. घाबरून त्याचा उंदीर तर नाही झाला? मी त्याला इतक्या कान्या-कोपर्यात शोधले तो दिसला नाही. म्हणजे तो नक्कीच उंदीर झाला असणार.उंदराचे काय? तो कोठेही कपाटाखाली फाईलमागे जावून बसला तर मला दिसणार तरी कसा? तूच सांग त्याला कसे शोधायचे ते. त्याला घेतल्याशिवाय मला कुठेच जाता येणार नाही हे तर तुला माहित आहेच. इतर कोणाला मी सांगणार तरी कसा की माझे हृदय गायब झाले आहे न कुणा मुलीला घाबरून त्याने दडी मारली आहे. तुझी गोष्ट वेगळी. तू चांगले ओळखते त्याला. --"
त्याने दिलेले महत्व ती कशाला नाकारते ? उलट त्याला उपदेशाचा एक आणखी डोस पाजत ती म्हणते-
"तुला माहित आहे न तुझे मन कसे घाबरट आहे ते. तू त्याला इथे ऑफिसात आणायला नको होते. घरीच का नाही ठेवले त्याला? तिथे निदान ते सुरक्षित तरी राहिले असते. बरे आता जावू दे तो विषय. हरवले तर शोध त्याला लौकर. अरे, बघता बघत संध्याकाळ होत आली. त्याला घेतल्याशिवाय तू घरी जाणार तरी कसा? तुझ्या घराचे लोक तुला रागावणार नाहीत का?"
आता त्याला वाटते की -खूप झाले. ही अशी ताकास तूर लागू देणार नाही. उलट अशीच खेचत राहील. तिला सरळ विचारलेले बरे- " खरे खरे सांग. तूच माझे मन पळंवलेस ना? बघ हं. मी तुला चांगलाच ओळखतो. तू उगाच चालबाजी करू नकोस. गुपचूप मान्य केले तर ठीक. नाही तर---"
"नाही तर काय करशील रे? मला दम देतोस? हे बघ मी भलते सलते आरोप सहन नाही करणार. शेवटी हा चोरीचा मामला आहे.त्याचा फैसला असा कसा लागणार? चाल बरे, आपण सरळ पोलीस ठाण्यावर जाउ.तिथे ठाणेदार करेल फैसला. इथे असे भांडत बसायला काय अर्थ आहे? "
एव्हढा दम दिल्यावर बिचारा साधा सरळ नायक काय करणार? आक्रमकतेचे सोंग आपल्याला पेलवणार नाही हे तो ओळखतो . आता जरा नर्माईनेच काम घ्यायला हवे. आपल्याला प्रेमच हवे आहे तिच्याकडून आणि तिला जर ते वदवून घ्यायचे असेल तर आता वाट कशाला पहायची? "हे बघ. मला काय म्हणायचे आहे हे तुला चांगले माहित आहे. उगाच वेड पांघरून पेडगावला कशाला जातेस? मी तुझ्या कृपा कटाक्षासाठी इतका तळमळतो आहे. मग तू मला अजून तृषार्त का ठेवतेस? तुझ्या प्रेमाचे काही कटाक्ष तर टाक माझ्या दिशेने. माझे मन तुझ्याच बंदिवासात आहे. भरकटलेले माझे मन तुझ्या मनाच्या वस्तीला आले. त्याचे भाडे म्हणून दोन चार आणे घे , पण बिचाऱ्याची मुक्तता कर न."
शिकार आपल्या टप्प्यात आली आहे म्हटल्यावर ती काय गप्प बसते? ह्या बावळंटाला प्रेमाचे काही पाठ शिकवल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे उमजून त्याला पार शरणागती पत्करायला लावायची असे ठरवून ती त्याची मजा घेत म्हणते-"बच्चू, हे काम इतके सोपे नाही हे ध्यानात ठेव. ह्या साऱ्या नजरेने बोलण्या-ओळखण्याच्या गोष्टी आहेत. तू पडलास अनाडी. ठीक आहे तुला प्रेमाचे काही पाठ मी शिकवीन. पण आधी माझ्या पाया पड आणि मग कबूल कर . सांग मी केव्हापासून तुझ्याच मागे -मागे फिरत होतो . पण माझी हिम्मत झाली नाही. तूच आता माझी गुरु, तूच तारणहार. असे म्हण."
दोघेही खेळात पार गुंग झाले आहेत. वेळ कुठे गेला त्यांना कळंत नाही. ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे पृथ्वीवरील शेकडो वर्षे असे म्हणतात. प्रेमी युगुलांच्या बाबतीत असेच काही घडत असावे. दोघांना भान येते तेव्हा जाणवते की ते दोघेही टेबलाच्या खाली आहेत व काही अंतरावर चहु बाजूंनी दिसत आहेत ते आपल्या सहकाऱ्यांचे पाय आहेत. ते बहुदा जेवण करून परतले आहेत आणि हे संस्मरणीय दृश्य नजरेत साठवण्यासाठी टेबलाच्या सर्व बाजूंनी घेराव करून उभे आहेत. दोघेही लाजेने चूर होवून विरुध्द दिशांनी पळतात. आपला बाल्या तर कोटाने तोंड झाकून पळंतो. हास्याचा एकच फवारा उडतो अन गाणे संपते.
चारचौघात आपली चोरी पकडली जाण्याचे असे भाग्य तुम्हालाही लाभो--
प्रतिक्रिया
27 Dec 2012 - 10:15 pm | पैसा
अशी खट्याळ गाणी कित्येक आठवतायत. त्यातलं आणखी एक चलती का नाम गाडीमधलं
या गाण्यावर स्वतंत्रपणे लिहिलंत तरी आवडेल!
27 Dec 2012 - 10:49 pm | किसन शिंदे
हापिसात बॅन असल्याने गाणी पाहता आली नाहीत.
चलती का नाम गाडी मधलं कोणतं गाणंय? 'एक लडकी भिगी भागीसी'..का? ते असेल तर खरंच त्यावर एक अख्खा लेख लिहिता येईल.
रविंद्र सरांचा लेख नेहमीप्रमाणे अप्रतिमच!
27 Dec 2012 - 11:08 pm | पैसा
ते तर मस्त आहेच. पण हे "पाँच रुपय्या बारा आना" हे पण जाम मजेशीर आहे!
30 Dec 2012 - 5:15 pm | स्पंदना
हं! हे मस्त. एकदम मस्त. म्हणजे आतल्या आत गुदगुल्या होत अस्ल्यासारख. सुरेख. खुदखुदित!
31 Dec 2012 - 12:01 pm | बॅटमॅन
एकदम!! खुदखुदित हा शब्द विशेष अर्थवाही वाटला या लेखासंदर्भात.