जेफ्री आर्चरच्या 'अला चार्ट' कथेचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे...
आर्थर होपगार्ड सैन्यदलाच्या सेवेतुन दिनांक ३ नोव्हंबर, १९४६ रोजी सेवामुक्त झाला आणि महिन्याभरातच तो सैन्यदलात जाण्यापुर्वी काम करीत असलेल्य ईंग्लड मधील कोव्हेंट्री शहराच्या बाहेर असलेल्या ट्रंफ कार कंपनीत दाखल झाला. गेली पांच वर्षे त्याने सैन्यदलासाठी बहादुरीची कामे केली होती आणि त्या कामाचे बक्षीस म्हणुन युध्द संपल्या नंतर काहीतरी चांगली संधी मिळेल अशी आशा मनात ठेऊन तो परतला होता. परतल्या नंतरची वास्तुस्थिती मात्र वेगळीच आहे असे त्याला जाणवले. कारण त्याला अपेक्षीत असा प्रतिसाद कोठुनही मिळत नव्हता. अखेर चार आठवडे प्रयत्न करुन थकल्या नंतर तो काहिशा नाखुशीनेच जुन्या कंपनीतील व्यवस्थापकाला भेटायला गेला.
"तुझी ईच्छा असेल तर तुझ्या पुर्वीच्याच कामावर पुन्हा रुजू होऊ शकतोस" येथून जाण्यापूर्वी तो कार कंपनीत मोटारींना चाकं बसवण्याच्या विभागात काम करीत होता आणि त्याला ते काम अजिबात आवडत नव्हते.
"पण पुढे काय? आपल्याला पुढे काही भवितव्य आहे?"
"निश्चितच", व्यवस्थापक उत्तरला "हल्ली मोटार गाडया या केवळ गर्भश्रीमंत किंवा मोठमोठया व्यवसायिकांनी वापरण्याची वस्तु राहिलेली नाही तर मध्यमवर्गाच्याही वापराची वस्तु झाली आहे. आपली कंपनी देखील कुटुंबाने वापरण्यासारख्या काही गाडया आता बाजारात आणत आहे."
"हो, म्हणजे आणखी गाडयांवर चाकं चढवावी लागणार तर..." नाराजीच्या सुरातच तो म्हणाला.
"ठिक आहे, तर मग तुझी कागदपत्रे तयार करुन घेतो"
आणि तांसाभरातच तो त्याच्या नेमणुकीच्या सर्व औपचारीकता पूर्ण करुन बाहेर पडला.
पुढील काहि दिवसांतच तो आपल्या पुर्वीच्या दिनक्रमात रुळुन गेला. त्याच्या मनाशीच कंपनीतील आपले दुय्यम स्थान स्विकारले होते. मात्र हे स्थान त्याच्या मुलानेही स्विकारावे हे त्याला कदापिही आवडणार नव्हते.
तो जेव्हा युध्दभूमीवर गेला तेव्हा मार्क केवळ पांच वर्षाचा होता. मात्र परतल्यानंतर आर्थर आपल्या मुलाला शक्य त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करीत होता. मार्कला आपल्याच कंपनीत काम करतांना पहावे लागू नये यासाठी तो झपाटल्यासारखे काम करु लागला. आपल्या मुलाला गणित, विज्ञान, ईंग्रजी यासारख्या महत्वाच्या विषयांची खास शिकवणी लावणे शक्य व्हावे यासाठी तो जास्तीत जास्त वेळ काम करुन जास्तीचे पैसे कमावण्याचे प्रयत्न करु लागला. त्याने मुलाच्या शिक्षणासाठी केलेल्या मेहनतीचे मार्कने देखील परीक्षांमध्ये यशस्वी होऊन फळ दिले. गुणांच्या जोरावर मार्कला प्रतिष्ठित अशा 'किंग हेन्री ग्रामर स्कूल' मध्ये प्रवेश मिळाला. तिथेही त्याने यशस्वी परंपरा कायम ठेवली.
अठराव्या वाढदिवसाला मार्कने त्याला विद्यापीठात जाउन शिक्षण पुढे चालू ठेवायचे नाही असे सांगीतल्यानंतर आँरर्थरने आपली नाराजी लपविण्याचा अटोकाट प्रयत्न केला.
"ठिक आहे, पण तू पुढे काय करायचे ठरवले आहेस लॅड?" आवाजावर नियंत्रण ठेवत आर्थरने विचारले.
"शाळा संपताच मी तुमच्याच कंपनीत, तुमच्याच विभागात दाखल होणार आहे, तसा अर्जही मी कंपनीत भरुन दिला आहे"
"पण, तू कशासाठी...."
"का नाही?" आर्थरचे बोलणे पूर्ण ऐकून घेण्यापूर्वीच मार्क उत्तरला, "माझे बरेच मित्र हे सत्र संपताच ट्रंफ मध्ये नोकरीची सुरुवात करणार आहेत. नोकरीसाठी आणखी वाट पाहण्याची त्यांची तयारी नाही."
"तुझे डोके फिरले आहे, दुसरं काही नाही."
"ते राहू दे डॅड. कंपनी चांगला पगार देतेच शिवाय तुम्ही हेही दाखून दिले आहे की जास्त वेळ काम करुन जास्त पगारही मिळतो आणि़ कष्ट करण्याची माझी तयारी आहे."
तुला असं वाटत का इतकी वर्षे मी रात्रंदिवस मेहनत करुन तुला चांगले शिक्षण मिळेल याची काळजी घेत राहिलो ते माझ्या प्रमाणे तू देखील मोटार गाडयांची चाकं बसवण्याचे काम करीत आयुष्य वाया घालवण्यासाठी?"
"गाडयांना चाकं लावणे एवढे एकच काम तेथे नाहिए हे तुम्हालाही चांगलेच माहित आहे डॅड."
"हे बघ तुला मी बजाऊन सांगतो, तुझे मित्र काय करणार आहेत याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. मी जिवंत असे पर्यंत तुला तेथे काम करु देणार नाही. तू चांगला शिकुन वकील, चार्टड अकाउटंट, सैन्यदलात अधिकारी किमान शाळेत शिक्षक झालेला मला जास्त आवडेल. तुला त्या कार कंपनीतच इतका रस का आहे?
"कारण एका शिक्षकापेक्षा तेथे जास्त कमाई आहे. एकदा माझ्या फ्रेंचच्या शिक्षकांनीच मला सांगीतले आहे की त्यांची परिस्थिती तुमच्या इतकी चांगली नाहिए".
"हे बघ मला काही एक पटत नाही, लॅड."
"खरी गोष्ट ही आहे की, मी माझं सगळं आयुष्य तुमच्या रम्य कल्पनेतील स्वप्नपूर्ती साठी वाया घालवण्यात मला रस नाही,डॅड."
"ठिक आहे, पण मला तू तेथे आयुष्य वाया घालवावे असे वाटत नाही." नाष्टयाच्या टेबल वरुन उठतांना आर्थर म्हणाला, "आज सकाळी कंपनीत गेल्या गेल्या पहिलं काम तुझ्या अर्जाचा अजिबात विचार केला जाऊ नये अशी तजवीज करणे हेच आहे."
"हे ठिक नाही,डॅड मलाही हक्क...."
पण त्याचे म्हणणे ऐकल्या शिवायचं वडील खोलीतून बाहेर निघून गेले होते. त्यानंतर कामावर जाण्यापूर्वी एक शब्दही ते आपल्या मुलाबरोबर बोलले नाहीत.
त्यानंतर एक आठवडा ऊलटून गेला तरी त्या दोघांनी एकमेकांशी अवाक्षरही उच्चारले नाही. शेवटी मार्कच्या आईने दोघांमध्ये समेट घडऊन आणला. तिने दोघांसमोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार मार्क वर्षभर बाहेर कोठेतरी नोकरी करेल एक वर्षानंतरही त्याची कार कंपनीतच नोकरी करण्याची ईच्छा असेल तर त्यावेळी त्याचे वडील कोणताही अडथळा आणणार नाहीत.
आर्थरने या प्रस्तावाला संमती दिली. मार्कनेही दुसरा कोणताच उपाय नसल्यामुळे नाईलाजानेच संमती दिली.
"पण जर तू एक वर्ष पूर्ण करु शकलास तरच!" आर्थर निर्वाणीच्या सुरात म्ह्णाला.
त्या वर्षी उन्हाळयाच्या सुटटीच्या अखेरीस आर्थरने आपल्या मुलासाठी अनेक नोकरीचे प्रस्ताव आणले. परंतु त्यापैकी एकातही मार्क ने उत्साह दाखवला नाही. त्याचे हे वर्ष असेच वाया तर नाही जाणार? अशी चिंता त्याच्या आईला वाटू लागली. एकदा रात्रीच्या भोजनासाठी बटाटयाचे काप करण्यास आईला मदत करतांना म्हणाला, "त्यातल्या त्यात मला होटेल मनेजमेंटचा पर्याय बरा वाटतो".
"हो नाहीतर काय, डोक्यावर छप्पर आणि नियमीत जेवणखाणे मिळण्याची तरी खात्री असते." आईनेही आपली संमती दर्शवली.
"पण ते तुझ्यासारखे जेवण बनऊ शकत नाहीत". मार्क बटाटयाच्या फोडी प्लेटमध्ये ठेवत म्हणाला. "आणि तसाही एकाच वर्षाचा तर प्रश्न आहे". पुढिल एक महिना त्याने आजुबाजूला असणा-या विविध हाटेलमध्ये अयशस्वी प्रयत्न करण्यात घालवला.
शेवटी आर्थरनेच माहिती मिळवली की त्याच्याबरोबर सैन्यात काम करीत असलेला एक मित्र सध्या लंडनला हाटेल सेव्हाय मध्ये मुख्य पोर्टर आहे. सैन्यात अधिकारी असलेल्या या मित्राने त्याला दिलासा दिला की, त्याचा मुलगा जर खरच गुणी असेल तर तो पुढे जाउन मुख्य पोर्टरच काय पण हाटेलचा व्यवस्थापक देखील बनू शकेल. या बोलण्यामुळे आर्थर देखील आश्वस्त झाला. मात्र मार्क अजूनही आपल्या मित्रांना पुढिल वर्षी त्याच्यात येऊन सामिल होण्याचे आश्वासन देत होता.
१ सप्टेंबर, १९५९ ला आर्थर मुलाबरोबर बसने कोव्हेन्ट्री स्टेशन पर्यंत गेला. मार्कचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला, "लॅड, मी आणि तुझी आई मिळून या वर्षीचा तुझा नाताळ खास बनऊ याची खात्री बाळग आणि काही काळजी करु नकोस, सर्जी तुझी चांगली देखभाल करेल त्याच्याकडून तुला काही नव्या गोष्टी शिकायला मिळतील. तेवढे नाक व्यवस्थीत साफ ठेवायला विसरू नकोस."
यावर मार्क ने काहीही न बोलता हलकेसे सिमत करुन आगगाडीतील आपल्या जागेवर जाऊन बसला. "तुला या बददल निश्चितच वाईट वाटणार नाही......" एवढे त्याच्या वडिलांचे शब्द कानावरपडे पर्यंत गाडी स्टेशनाबाहेर पोहोचली होती.
पण मार्कला अगदी पहिले पाऊल हाटेलमध्ये टाकल्या पासूनच वाईट वाटायला लागले होते. दुय्यम पोर्टर म्हणुन त्याचा दिवस सकाळी सहा वाजता सुरु होऊन संध्याकाळी सहा वाजता संपत असे. त्याला सकाळी चहासाठी पंधरा मिनीटे, दुपारच्या जेवणासाठी ४५ मिनीटे आणि दुपारच्या चहा साठी १५ मिनीटे सुटटी मिळेल असे सांगीतले गेले होते. मात्र एक महिना संपल्या नंतरही त्याला या सर्व सुटटया एकाच दिवशी कधी उपभोगता आल्या असे घडले नाही. त्याकाळात त्याच्या लक्षात असेही आले की, ज्याच्याकडे याबाबतीत तक्रार करावी असे येथे कुणीही नाही. त्याच्या कामाचे स्वरुप म्हणजे हाटेलात राहण्यास आलेल्या ग्राहकांचे सामान वर त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचवणे आणि जाणा-यांचे बाहेर दरवाजापर्यंत पोहोचवणे असे होते. सरासरी तेथे जवळपास तीनशे व्यक्ती रोज तेथे मुक्कामासाठी येत असत त्यामुळे येण्याजाण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालू रहात असे. त्याचे मित्र गावाकडे जेवढे कमावत होते त्याच्या जेमतेम आर्धी कमाई सध्या मार्कची होती. त्याला मिळणारी सर्व टीप मुख्य पोर्टर त्याच्याकडून काढून घेत असे. त्याने अनेकदा जादा वेळ काम केले होते मात्र त्याबददल त्याला एक पेनी देखील मिळालेली नव्हती. याबददल एकदाच मुख्य पोर्टरला विचारण्याची हिंमत त्याने केली होती त्यावर, "तुझी वेळ अजून यायची आहे मार्क," असे उत्तर त्याला मिळाले होते.
त्याची मात्र याबाबत काहीही तक्रार नव्हती की, दिलेला गणवेष योग्य मापाचा नव्हता, त्याची खोली अतिशय छोटी होती, मिळणा-या टीप मध्ये काहिही हिस्सा मिळत नव्हता. त्याच्या खोलीतून दिसणा-या चेरिंग क्रास रेल्वे स्टेशन कडे त्याने पूर्ण दुर्लक्ष केले होते. मात्र मुख्य पोर्टरला आपण फारसे खुश ठेऊ शकत नाही याची त्याला फार चिंता वाटत असे. सर्जी- सार्जंट क्रॅन, हाटेल सॅव्हाय मधील नोकरी आपल्या सैन्यदलातील नोकरीचे विस्तारीत रुप मानत असे.
रोज रात्री मार्क जेव्हा थकून भागून आपल्या छोटयाशा खोलीत परतत असे तेव्हा १ सप्टेंबर, १९६० या तारखेवर त्याने लाल रंगाचे वर्तुळ काढुन ठेवलेल्या तारखे पर्यंत पोहोचायला अजून किती दिवस राहिले आहेत याची नोंद तो झोपण्यापूर्वी जरुर करीत असे, ज्या दिवशी तो आपल्या कार कंपनीतील मित्रांबरोबर पुन्हा एकदा जोडला जाणार होता.
मार्क नाताळची सुटटी साजरी करण्यासाठी चार दिवसांच्या सुटटीवर घरी आला तेव्हा त्याचा ओढग्रस्त चेहरा आणि ढेपाळलेली तब्येत पाहून आईने आर्थरला विनवले की झाले तेवढे पुरे; जाउदे, उरलेले दिवस सोडून दे आणि करु दे त्याला त्याच्या मनासारखे. मात्र आर्थरचे मत स्पष्ट होते. "आम्हां दोघांमध्ये करार झाला आहे, तो जर त्याच्याकडून पूर्ण करण्याएवढा जबाबदार नसेल तर कार कंपनी मध्ये येऊन काम करावे असे मला मुळीच वाटत नाही".
सुटटीच्या दिवसांमध्ये तो आपल्या मित्रांच्या कामावरुन परत यायच्या वेळी कंपनीच्या प्रवेशद्वारा जवळ वाट पाहत उभा रहात असे. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक विकांताला केलेल्या मौजेच्या सुरस कहाण्या ऐकत असे क्रिकेट मॅच, पब मध्ये जाउन केलेली धमाल, नृत्याचे कार्यक्रम असे अनेक विषय त्यांच्या गप्पांमध्ये येत असत. सर्वांनाच मार्क बददल सहानुभुती वाटत होती आणि येत्या सप्टेंबरमध्ये आपल्यात सामिल होण्याची वाटही पहात होते. त्यांच्यापैकी काहींनी आठवणही करुन दिली "आता बस काही महिन्यांचा तर प्रश्न आहे."
सुटी संपऊन मार्क पुन्हा लंडनच्या वाटेवर होता. सुटटी फारच लवकर संपली असे त्याला वाटत होते. पुन्हा एकदा हाटेलातील सामानाच्या चढ उताराच्या कामावर जायला त्याच्या अगदी जिवावर आले होते.
लवकरच ईंग्लंड मधील पावसाळा संपला आणि घरच्या पर्यटकांबरोबरच अमेरीकन पर्यटकांचाही ओघ वाढला. मार्कला अमेरीकन पर्यटक मनापासून आवडत असत. ते त्याला बरोबरीची वागणुक देत. इतरांपेक्षा टीपही जास्त देत असत. मात्र अजूनही टीपची सारी रक्कम सर्जी घेत असे वरुन, "तुझी वेळ अजून आलेली नाही मार्क", असे हेही सुनावत असे.
अशाच एका अमेरीकन ग्राहकाने पंधरा दिवसांच्या वास्तव्यात त्याच्यासाठी रोज उत्साहाने धावपळ करणा-या या मुलाला जतांना चक्क दहा पौंडाची नोट बक्षीस दिली. त्याला धन्यवाद देऊन मार्क मागे वळला तर समोरच सर्जी त्याची वाट अडऊन उभा होता. "ती नोट मला दे," अमेरीकन ग्राहक – दृष्टीआड होताच सर्जी ओरडला. त्याच्याकडे नोट देत म्हणाला, "मी तुला पाहिल्या- पाहिल्या लगेचच देणार होतो" "या नोटेवर माझाच हक्क आहे आहे हे माहित असूनही तू ती खिशात टाकणार होतास ना? सर्जी गुरकावला.
"नाही अजिबात नाही, खरंतर परमेश्वर जाणतो की ती माझी कमाई आहे" मार्कनेही त्याला उत्तर दिले.
"तुझी वेळ अजून आलेली नाही मार्क", सर्जी तुटकपणे म्हणाला.
"तुझ्यासारखा कोत्या मनाचा माणुस असतांना ती वेळ येणारही नाही", मार्कचाही आवाज चढला.
"काय म्हणालास तू?सर्जी संतापला
"तेच जे तू ऐकलेस" मार्क
"तू तुझी नोकरी घालवली आहेस, माझ्याशी कोणीही, अगदी कोणीही अशा प्रकारे बोलत नाही". असे म्हणून तो तरतरा मुख्य व्यवस्थापकाच्या केबीनच्या दिशेने निघाला.
मुख्य व्यवस्थापक गेराल्ड ड्रमंडने मार्कला आपल्या केबीन मध्ये बोलावण्यापूर्वी मुख्य पोर्टरचे म्हणणे ऐकून घेतले.
मार्कने त्याच्या केबीनमध्ये प्रवेश करतांच गेराल्ड ने पहिलेच वाक्य उच्चारले "तू माझ्यासमोर तुला नोकरीवरुन काढून टाकण्यावाचून दुसरा काही उपायच ठेवलेला नाही".
मार्कने काळा लांब कोट घातलेल्या उंच्यापु-या गेराल्डला अपादमस्तक न्याहाळले, "सर, नक्की काय घडले हे मला सांगायची परवानगी मिळेल का? मार्कने ह्ळुवार आवाजात विचारले. त्याने परवानगी देताच सकाळचा सर्व प्रकार सांगीतलाच त्या बरोबरच त्याच्या वडीलांबरोबर झालेल्या करारा बददलही सांगीतले कृपा करुन मला कराराप्रमाणे उरलेले दहा आठवडे पूर्ण करु द्या, नाही तर माझ्या बाजूने करार मोडला असेच माझे वडील मानतील".
"हे पहा, माझ्याकडे सध्या इतर कोठेही जागा रिकामी नाही; हां, मात्र बटाटे सोलण्यासाठी माणसे कमी आहेत अशी तक्रार भटारखान्यतून होती तुझी तयारी असेल तर उरलेले दहा आठवडे तिकडे काम करु शकतोस."
"काहीही काम चालेल",
ठिक आहे, तर उद्या सकाळी सहा वाजता भटारखान्यात पोहोच, मी तीस-या क्रमांकाच्या शेफला तुझ्या बददल सांगून ठेवतो पण लक्षात ठेव मुख्य शेफ तुझ्या त्या मुख्य पोर्टरहून महाभयानक आहे."
मार्कने फारसे मनावर घेतले नाही. त्याला पूर्ण विश्वास होता दहा आठवडयांचा तर प्रश्न आहे ते तर चुटकी सरशी जातील.
दुस-या दिवशी पांढ-या पोशाखाऐवजी पांढरा शर्ट आणि निळी पँट घालून सकाळी साडेपांच वाजताच भटारखान्यात दाखल झाला. भटारखान्याने हाटेलचे संपूर्ण तळघर व्यापलेले होते आणि तेथे स्वागतकक्षापेक्षाही जास्त वर्दळ होती हे बघुन मार्क आश्चर्यचकीतच झाला. तिस-या क्रमांकाच्या शेफने त्याला एकदम कोप-यात एक टब, थंडगार पाणी आणि एक चाकू देऊन बटाटयाच्या डोंगरासमोर उभे केले. सकाळचा नाष्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण या सर्व वेळी तो बटाटेच सोलत होता. रात्री रुमवर परतल्यावर क्षणार्धातच त्याला गाढ झोप लागली अगदी रोज नेमाने कॅलेंडरवर केली जाणारी 'एक दिवस संपला' ही नोंद करण्याचेही त्राण त्याच्या अंगात राहिले नव्हते.
पहिला आठवडा संपला तरी मुख्य शेफ 'जॅक्स' या महामानवाचे दर्शन त्याला झाले नव्हते. तेथे जवळपास सत्तर लोक काम करीत होते. मार्कची आता खात्रीच पटली होती की उरलेले दिवस कोणच्याही लक्षात येण्यापूर्वीच संपून जातील.
रोज सकाळी सहा वाजतांच तो आपल्या कामाच्या जागेवर पोहोचून बटाटे सोलून त्याच्या बाजूलाच सदैव गोंधळलेल्या अवस्थेत असणा-या टाड कडे देत असे. मग तो त्या दिवशीच्या खास मेन्यू आणि मुख्य शेफच्या सुचनांप्रमाणे वेगवेगळया प्रकारे त्यांना आकार देत असे. जसे सोमवारी हलके तळलेले, मंगळवारी कुस्करलेले, बुधवारी फ्रेंच फ्राय, गुरुवारी चकती सारखे काप, शुक्रवारी क्रोकॅटो. ही व्यवस्था मार्कच्या लवकरच लक्षात आली त्यानुसार आपल्या कामाची आखणी करुन तो टाँडच्या पुढे राहु लागला. त्यामुळे या कामात त्याला कोणत्याही समस्या आल्या नाहीत.
टॅडची कामाची पध्दत पाहिल्यानंतर मार्कला जाणवले की काही सूचना देऊन तो टॅड्चा भार कमी करु शकेल मात्र त्याने गप्प राहणेच पसंत केले कारण त्याला माहित होते की यामुळे त्याच्याच समस्याच वाढतील आणि यावेळी मुख्य व्यवस्थापक त्याला दुसरी संधी नक्कीच देणार नाही.
मार्कच्या लवकरच लक्षात आले की मंगळवारी आणि गुरुवारी ठरलेल्या मेन्यूच्या कामात टॅड नेहमीच मागे पडतो. त्यावरुन तो तीस-या शेफची बोलणीही खात असतो तीसरा शेफ मार्ककडे नजर टाकून कामाची प्रक्रीया अव्याहत चालू राहील याची काळजी घेण्याची खात्री करुन घेत असतो. मार्कही एक टब जास्त बटाटे सोलून ठेऊन त्याची अपेक्षा पूर्ण करण्याची आणि कामात गोंधळ होणार नाही याची काळजी घेत असे.
तो आगस्ट महिन्यातील पहिला मंगळवार होता आणि काम करता करता टॅडचे बोट कापले गेले. त्याचे रक्त लाकडी टेबलवर सर्वत्र पसरले होते ते पाहून मार्क वेडयासारखा ओरडू लागला. हा गोंधळ मुख्य शेफच्या कानावर गेल्यामुळे "त्याला पहिल्यांदा तेथून बाहेर काढा" असा आवाज आल्याचे मार्कने ऐकले. "आणि तू.." मार्ककडे बोट दाखऊन शेफ म्हणाला, "हा सगळा पसारा आवर आणि उरलेल्या बटाटयाचे काप करायला घे. मला अजून येणा-या आठशे भुकेल्या ग्राहकांना खाऊ घालायचे आहे."
"मी?" मार्कने विचारले.
"हो तूच, त्या स्वत:ला शिकाऊ शेफ म्हणवणा-या आणि बोट कापून घेणा-या मुर्खापेक्षा काही वाईट काम करणार नाहीस." असे म्हणून मुख्य शेफ तेथून चालता झाला. मार्क काहिसा घाबरतच टॅडच्या टेबलाकडे गेला आणि तेथील काम संभाळू लागला. कोणताही वितंडवाद त्याला टाळायचा होता कारण समोरचे कॅलेंडर त्याला शेवटचे पंचवीसच दिवस राहिले असल्याचे दखवत होते.
मार्क समोर आता असलेले काम त्याने आईला मदत करण्यासाठी अनेकदा केले होते. व्यवस्थीत सफाईने केलेले काम मुख्य शेफला टॅडकडून कधीच मिळाले नव्हते. तो दिवस संपता संपता मार्क दमला असला तरी रोज जाणवणारा थकवा त्याला जाणवला नाही.
त्या रात्री अकरा वाजता आपली शेफची हॅट काढून मुख्य शेफ बाहेर गेला आणि उरलेल्या सर्वांनीच हातातले काम पूर्ण करुन बाहेर जाण्याची तयारी सुरु केली. काही सेकंदातच बाहेर गेलेला शेफ पुन्हा आत आला आणि भटारखान्यात फेरी मारु लागला सर्वच जण पुढे तो काय करतो ते उत्सुकतेने पाहू लागले. शेफ जे शोधत होता ते दिसतांच .... तो सरळ मार्ककडे गेला...
"अरे बाप रे तो तर माझ्याचकडे येतोय"
"हेय तुझे नांव काय?
"मार्क होपगार्ड, सर" मार्क कसाबसा एवढेच बोलू शकला.
"तुला बटाटे सोलायच्या कामावर ठेऊन वाया घालवले जातेय.. तू उद्यापासून भाज्यांच्या कामात लक्ष घाल. सकाळी सात वाजता कामावर ये" मुख्य शेफ म्हणाला, "आणि हो तो अर्ध बोटतुटया जर परत आलाच तर त्याला बटाटे सोलायच्या कामावर ठेवा"
मार्क काही बोलण्यापूर्वीच मुख्य शेफ मागे वळून चालू लागला. उरलेले तीन आठवडे भटारखान्याच्या केंद्रभागी, तेही मुख्य शेफच्या सतत नजरे समोर घालवण्याच्या कल्पनेनेच त्याला धडकी भरली. परंतू वस्तुसिथती स्विकारण्या खेरीज दुसरा कोणताही मार्ग नव्हता.
दुस-या दिवशी उशीर व्हायला नको म्हणुन तो सहा वाजताच कामावर पोहोचून वेळ घालवण्यासाठी कोव्हेंट गार्डन बाजारातून आलेल्या भाज्यांच्या गाडया रिकाम्या होतांना बघत होता.
मुख्य शेफ साडे सात पूर्वी काही मिनिटे तेथे आला. त्याने भाज्या पाहिल्या नंतर वेगवेगळया भाज्या कापायला मार्कला सांगीतले.
"पण मला तर त्या कापता येत नाहीत" मार्कने प्रामाणिकपणे सांगीतले. त्याला जाणवले की त्याचे बाकीचे सहकारी त्याच्या पासून दूर जात आहेत.
"तर काय तुला मी हे शिकऊ? मुख्य शेफ ओरडला "तुला काय वाटले बटाटे सोलता, कापता आले की तु शेफची सगळी कामे शिकलास?
"नाही, मला खरे तर....." यापुढे काही बोलण्यापेक्षा मार्क ने गप्प राहणेच पसंत केले. शेफने बहुधा त्याचे अर्धवट वाक्य ऐकलेच नव्हते. त्यानंतर भटारखान्यातील सर्वांनी एक अदभूत देखावा पाहिला. शेफ स्वत: मार्कला भाज्या कापणे, त्यांचे तुकडे करणे, सोलणे यांचे अगदी प्राथमिक धडे देत होता. "हो आणि त्या दुस-या मुर्खाचे कापलेले बोट लक्षात ठेव" भाजी कापण्याची धारदार सुरी मार्कच्या हातात देत म्हणाला, "नाहीतर पुढचा नंबर तुझा लागेल".
मार्क पूर्ण लक्ष देऊन गाजर कापू लागला, मोड आलेली कडधान्ये निवडू लागला, तसेच भाज्यांशी संबंधीत इतरही कामांमध्ये लक्ष घालू लागला. विविध भाज्या कापण्याचे कौशल्य हळूह्ळू आत्मसात करुन घेतले आणि पुन्हा एकदा शेफच्या अपेक्षेपेक्षाही लवकर त्याने आपल्या कामात प्राविण्य संपादन केले. रोजच्या दिवसाचे काम संपऊन मुख्य शेफ बाहेर गेल्यानंतर दुस-या दिवसासाठी त्याच्या वापरण्यातील उपकरणे, सुर-या ई. चकचकीत साफ केल्याशिवाय मार्क बाहेर पडत नसे.
मुख्य शेफ कडून भाज्या कापायला शिकल्याच्या सहाव्या दिवशी मार्कला जाणवले की तो त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांच्या जवळपास जाईल असे काम करु लागला आहे. पुढच्या शनिवार पर्यंत मार्क भाज्या बनवण्याची तयारी ब-यापैकी करु लागला होता. त्याला आता वाटू लागले होते की शेफच्या त्याच्या कडून असणा-या अपेक्षा तो ब-याच अंशी पूर्ण करीत आहे. कोणत्याही बाबीत होकार अथवा नकार देण्याव्यतिरीक्त जॅक्स भटारखान्यातून येता जाता कोणशीही फारसा बोलत नसे. लवकरच मार्क, जॅक्सला काय अपेक्षीत असेल याचा अंदाज करुन त्याप्रमाणे आगोदरच तयार राहू लागला. एकंदरीत जरी आपण येथे अगदी सुरुवातीच्या पायरीवर आहोत याची जाणीव असूनही येथे आल्यानंतर फारच थोडया कालावधीत तो स्वत:ला त्या व्यवस्थेचाच एक घटक मानू लागला होता.
सहाय्यक शेफच्या सुटीच्या दिवशी मार्कला तयार अन्नपदार्थांच्या सजावटीची संधी मिळाली. त्याने प्रत्येक पदार्थ आकर्षक आणि खाण्यास योग्य पद्धतीने ग्राहकांसमोर सादर करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले. त्याच्या या कामाची मुख्य शेफने केवळ मनाशीच नोंद घेतली नाही तर खास फ्रेंच मध्ये 'बोन' 'फारच चांगले' अशी तारीफही केली सॅव्हाय मधील वास्तव्याच्या शेवटच्या तीन आठवडयात त्याच्या खोलीत अगदी समोर लावलेल्या कॅलेंडरकडे पाहीलेही नाही.
गुरुवारी सकाळी सहाय्यक व्यवस्थापकाच्या कार्यालयाकडून लवकरात लवकर येऊन भेटण्याचा त्याला निरोप मिळाला. मार्क आज ३१ आगस्ट, त्याच्या कामाचा अखेरचा दिवस आहे हे जवळपास विसरुनच गेला होता. त्याने लग्नाच्या मेजवानीच्या विविध पदार्थंपै़की काही पदार्थ सजवले, आपले त्यावेळे पर्यंतचे ठरलेले काम पूर्ण केले, अॅप्रनची घडी करुन ठेवताना त्याने अभिमानाने स्वत: पूर्ण केलेले काम न्याहाळले आणि आपली कागदपत्रे व शेवटचा पगार घेण्यासाठी निघाला.
"हे काय या वेळी कोठे निघालास" जॅक्सने विचारले.
"माझे काम संपले", मी निघालो, कोव्हेंटीला"
"ठीक आहे तर, सोमवारी भेटूच तुलाही एक-दोन दिवस सुटटीची गरज आहेच"- जॅक्स
"नाही, नाही मी माझ्या घरी उज्वल भवितव्यासाठी निघालो आहे"
शेफचं लक्षं लग्नाच्या मेजवानीच्या पुढील पदार्थांच्या तयारीकडे होते. त्याकडे पहातच काही कळत नसल्यासारखे पुन्हा विचारले "निघालास?"
"हो, येथे मी आजच एक वर्ष पूर्ण केले आणि आता घरी निघालो आहे."
"मला खात्री आहे तुला खुप चांगल्या हाटेलमध्ये काम मिळाले असेल?" शेफने अगदी मनापासून आणि आपुलकीने विचारले.
"मी हाटेलमध्ये काम करण्यास निघालो नाही."
"बहुधा चांगल्याशा उपहारगृहात असेल होय ना?"-शेफ
"मला ट्रंफमध्ये काम मिळणार आहे."
शेफ गोंधळून त्याच्याकडे पहात राहिला त्याला कळेना की त्याचे ईंग्रजीचे ज्ञान कमकुवत आहे की हा मुलगा थटटा करतोय
"आता आणखी हे ट्रंफ काय आहे?"
"ती एक मोटारगाडया बनवणारी कंपनी आहे"
"तू कार बनवणार आहेस?"
"नाही संपूर्ण कार नाही तिची चाकं बसवणार आहे"
"तू चाकांवर कार बसवणार आहेस?" अविश्वासने विचारले
"नाही, कारला चाकं बसवणार आहे" मार्क हसत म्हणाला. शेफला अजुनही हा प्रकार काय आहे ते कळत नव्हते.
"म्हणजे तू कार कंपनीतील कामगारांसाठी जेवण बनवणार आहेस?"
"नाही, जसे मी आपल्याला सांगीतले मी कार कंपनीत कारला चाकं बसवायला जाणार आहे" मार्कने सावकाशपणे आणि प्रत्येल शब्दावर जोर देत सांगीतले.
"छे, हे शक्य नाही."
"अगदी शक्य आहे, तेच सिध्द करण्यासाठी मी एक वर्ष वाट पाहीली आहे, मार्कने स्पष्टीकरण दिले.
"मी जर तुला सहायक शेफ च्या जागेवर नेमणुक केली तर, तुझा विचार बदलेल?
"पण तुम्ही असे का कराल?" मार्क ने प्रतिप्रश्न केला.
"कारण तुझ्याकडे गुणवत्ता आहे, मला वाटतं तु एक शेफ बनू शकतोस नव्हे फार चांगला शेफ बनू शकतोस"
"नाही धन्यवाद, माझ्या मित्रांबरोबर काम करण्यासाठी, हा मी निघालो कोव्हेंटीला.
"वाया जाणारी गुणवत्ता",असे काहिसे पुटपुटत मुख्य शेफ आपल्या कामाकडे वळला.
रुम वर परत येऊन मार्क ने भिंतीवरचे कँलेंडर काढून कच-याच्या डब्यात फेकून दिले, सामानची आवरा आवर करुन, अखेरीस आपल्या खोलीची किल्ली तेथील व्यवस्थापका कडे जमा केली.
शेवटचा पगार आणि कार्यालयातील औपचारिकता पूर्ण करुन निघतांना तेथील कर्मचा-या म्हंटले "अरे हो, मुख्य शेफचा फोन आला होता, त्याची ओळख सांगून तुंला कोठे काम मिळणार असेल तर तुला मदत करायला त्याला आवडेल" त्या कर्मचा-याच्यासाठी शेफ चा अशा प्रकारे निरोप देणे ही फारच दुर्मिळ बाब होती.
"नाही मी जेथे निघालो आहे तेथे या सर्वाची काही आवश्यकता भासणार नाही, तरी पण या आपल्या सर्वांचे आभार".
तो भराभर स्टेशनाच्या दिशेने चालू लागला, युस्टन स्टेशनवर येऊन तो फलाट क्रमांक सात वर पोहोचला. तेथे कोव्हेंटी च्या दिशेने जाणारी गाडी उभी होती. पण तो निरुददेश इकडे तिकडे भटकत राहिला. पहिली, दुसरी आणि तिसरीही गाडी निघून गेली..स्टेशनवर संध्याछाया पसरत होत्या.
...आणि तो आला त्यापेक्षा अधिक वेगाने उलटया दिशेने चालू लागला. थोडी घाई केली तर आपण अजूनही वेळेत पोहोचून रात्रीच्या जेवणासाठी शेफची मदत करु शकतो याची त्याला खात्री होती.
पुढील पांच वर्षे मार्क जॅक्स ल रेन्युआच्या हाताखाली शेफ होण्याचे धडे गिरवित होता. भाज्यानंतर विविध पदार्थ आणि ते बनवण्याची प्रकीया यामध्ये तो हळूहळू पारंगत होत होता. आपल्या गुरु कडून तो खूप काही शिकला आता मुख्य शेफ कोणत्याही चिंतेशिवाय सुटीवर जाऊ शकत होता. मार्क मुख्य शेफच्या जबाबदा-या सहजपणे हाताळत असे. पुढील दोन वर्षात मार्क मास्टर शेफ बनला. आणि १९७१ मध्ये जॅक्सला पॅरीसमधील अतिशय प्रतिष्ठित अशा 'जार्ज सिंक' मध्ये बोलावणे आल्यानंतर तेथील जबाबदारी एकाच अटीवर संभाळली की, त्याच्या बरोबर मार्कलाही 'जार्ज सिंक' मध्ये सामाऊन घेतले जाईल.
"तुझी पॅरीसला येण्याची ईच्छा नसेल तर लक्षात ठेव कोव्हेंटीला जाणे ही तुझ्यासाठी चुकीची दिशा असेल. मला खात्री आहे सॅव्हाय मध्ये तुला माझी जागा मिळेल."
अखेरीस मार्क जॅक्स बरोबर पॅरीसला पोहोचतो आणि काही दिवसातच परीसवासी जार्ज सिंक मध्ये गर्दी करु लागले. तेथे राहण्यासाठी नव्हे तर या शेफ जोडगोळीने बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी.
याच जार्ज सिंकमध्य जॅक्स आपला ६५ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या नंतर कोण? असा प्रश्नही त्याला पडला नाही. मद्याचा ग्लास उंचावत त्याने मार्कला म्हंटले "अभिनंदन, जार्ज सिंकचा मुख्य शेफ बनणारा तू पहिला ईंग्रज ठरणार आहेस! हा, मात्र आता तुला तुझे नांव बदलून मॅक करावे लागेल"
"तसं कारायची गरजच पडणार नाहिए" मार्क उत्तरला.
"हो खरच, मी तुझ्या नांवाची शिफारस केली आहे"
"तसे असेल तर मला नकार द्यावा लागेल."
"आणि मग काय कारला चाकं बसवायला जाणार आहेस वाटतं?" जॅक्सने थटटेच्या सुरात म्हंटले.
"नाही इथेच नदीच्या डाव्या किना-यावर मी एक छोटेसे उपहारगृह सुरु करायचं ठरवतोय. माझ्या बचतीत मी फार काही करु शकणार नाही पण तुमच्या मदतीने..."
जॅक्सनी त्याप्रमाणे डाव्या किना-यावर १ मे, १९८२ रोजी 'रि दू प्लासियर' सुरु केले. जार्ज सींकच्या ग्राहकांची पावले तिकडे वळण्याची फार वाट त्या दोघांना पहावी लागली नाही. त्यांच्या किर्ती सर्वत्र पसरल्याची ही पावतीच होती की थोडयाच कालवधीत त्यां दोघांनी 'नोव्हेल कुसिन' नावांचे आणखी एक उपहारगृह सुरु केले. काही दिवसांतच केवळ आघाडीचे चित्रपट कलाकार किंवा मंत्रीमंडळातील व्यक्तीच तेथे तीन आठवडयांपूर्वी एखादे टेबल राखून ठेऊ शकतील एवढे महत्वाचे स्थान ठरले. पत्रकार आणि ग्राहक या दोन उपहारगृहांपैकी कोणते अधिक चांगले आहे यावर वाद घालू लागले. परंतू दोन्ही ठिकाणावरील गर्दी साक्ष देत होती की दोन्हीतही फारसा फरक नाही.
आक्टोबर १९८६ मध्ये जेव्हा जॅक्सचे वयाच्या ७१ वर्षी निधन झाले तेव्हा सर्वच पत्रकारांनी लिहले की आता उपहारगृहांचा दर्जा निश्चितच घसरणार. मात्र वर्षभरातच या सर्वांना मान्य करावे लागले की ब्रिट्नहून फ्रान्सला येणा-या शेफला पांच वर्षांत हातपाय मारणेही शक्य होत नाही. मात्र मार्क त्यांच्याहून खूपच वेगळा आहे.
जॅक्सच्या मृत्यूनंतर आपल्या मातृभूमीकडे परतण्याची मार्कला तीव्र ईच्छा होऊ लागली. त्यातच त्याने डेली टेलीग्राफमध्ये कोव्हेट गार्डन भागात नव्याने होणा-या बांधकाम प्रकल्पासंदर्भातील माहिती वाचली. त्याच्या मालमत्तेची कामे पहाणा-या दलाला त्याने अधिक माहिती काढण्यास संगीतले.
११ फेब्रुवारी, १९८७ ला त्याने आपले तीसरे उपहारगृह 'चेझ जॅक्स लंडनच्या मध्यवरर्ती भागात सुरु केले.
या सर्व कालावधीमध्ये मार्कचे कोव्हेंटीला नियमीत येणे-जाणे चालू होते. असे असूनही आपल्या आई वडीलांना तो त्याच्या हाताची चव चाखण्यासाठी पॅरीसला घेऊन जाऊ शकला नव्हता. त्याचे वडील सेवानिवृत्त होऊन बराच काळ झाला होता. मात्र आता त्याच्या स्वत:च्या देशाच्या राजधानीत उपहारगृह सुरु केले होते आणि आता तो त्यांना सहज राजी करु शकणार होता.
"तुझ्या हाताची चव चाखण्यासाठी आम्हला लंडनला जाण्याची मुळीच गरज नाही. तू नेहमीच घरच्या घरी ते आम्हाला बनऊन खाऊ घालत आला आहेस. तुझ्या यशस्वी वाटचालीबददल आम्ही नियमीतपणे वर्तमानपत्रातून वाचत आलेलो आहोत. सध्या तुझ्या वडिलांच्या पायाच्या दुखण्यामुळे ते प्रवासही करु शकत नाहीत"
"या पदार्थाला काय म्हणतात रे?" त्याने बनवलेल्या एका पदार्थाचा स्वाद घेत वडिलांनी विचारले.
त्याने पदार्थाचे नांव सांगीतल्यावर ते म्ह्णाले, "आणि एवढे पैसे खर्च करुन ते असले पदार्थ खाण्यासाठी येतात?"
सर्वच जण हसले दुस-या दिवशी त्याने वडिलांच्या खास आवडीचा पदार्थ बनवला.
"हां हे खरे जेवण आणि लॅड तुला एक सांगतो तू जवळपास तुझ्या आई सारखेच जेवण बनवतोस."
पुढच्याच वर्षी चेझ जॅक्सला जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाला. अगदी टाईम मासिकाने देखील असा पुरस्कार मिळवणारे पहिले ब्रिटिश उपहारगृह असे म्हणुन त्याचा गौरव केला.
त्याचे हे यश साजरे करण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी अखेरीस लंडनला येण्याचे मान्य केले. त्यांना आणण्यासाठी खास मोटारगाडीची व्यवस्था मार्कने के. त्यांच्या राहण्यासाठी सॅव्हाय मध्ये अलीशानन खोली आणि जेवणासाठी चेझ जॅक्स मधील सर्वात लोकप्रिय टेबल राखून ठेवले.
त्याने आई वडिलांसाठी खास पदार्थ बनऊन खाऊ घातले. या सर्व सरबराईने खुश होऊन आणि थोडेफार मद्याच्या प्रभावाखाली असलेले त्याचे वडील सर्वांनाच हे हाटेल माझ्या मुलाचे आहे असे अभिमानाने सांगत होते.
हाटेलचा मुख्य वेटर मार्कला म्हणाला देखील, "खरोखरच सुखी, आनंदी आहेत ती दोघे. आपले वडिल सेवनिवृतितपूर्वी कोणी वकील, व्यवसायिक होते?
नाही तसे कोणीही ते नव्हते त्यांनी आयुष्यभर कारला चाकं बसवण्याचे काम केले.
"पण त्यांनी आपले सारे आयुष्य ते काम करण्यास वाया का घालवले?"
"कारण मला मिळाले तसे वडिल मिळण्याएवढे नशिबवान नव्हते."
प्रतिक्रिया
15 Dec 2012 - 7:16 pm | अनिल तापकीर
थोडीशी सुरवात केली छान वाटली पण जरा घाइ आहे तेव्हा पुर्न वाचल्या नंतरच बाकि बोलू
16 Dec 2012 - 12:31 pm | लाल टोपी
पहिल्या कथेला आलेला पहिला प्रतिसाद आपला आहे त्यामुळे पूर्ण वाचून आलेल्या प्रतिसादाची प्रतिक्षा आहे!
15 Dec 2012 - 10:47 pm | पैसा
आणि चांगला अनुवाद!
16 Dec 2012 - 12:56 am | अपूर्व कात्रे
छान अनुवाद केला आहे. कथा आवडली.
16 Dec 2012 - 6:02 am | स्पंदना
वन स्टेप अहेड ऑफ मी बॉय! वन स्टेप अहेड!
कथा आवडली.
16 Dec 2012 - 11:09 am | मनीषा
सुंदर कथा ... आणि अनुवाद ही चांगला केला आहे.
16 Dec 2012 - 11:49 am | अमोल खरे
सही आहे कथा. अप्रतिम. केवळ अप्रतिम.
16 Dec 2012 - 12:29 pm | लाल टोपी
लेखनाच्या पहिल्याच प्रयत्नाला आपण दिलेल्या प्रतिसादांबद्दल आणि केलेल्या कौतुकाबद्द्ल मनःपूर्वक आभार!
16 Dec 2012 - 10:29 pm | मैत्र
कथा सुंदर आहे आणि अनुवाद छान जमला आहे.
पुलेशु! लिहीत राहा..
16 Dec 2012 - 10:36 pm | किसन शिंदे
अनुवाद छान जमलाय राव!
कथा छान आहे.
17 Dec 2012 - 2:44 am | रेवती
मस्तच! अनुवाद आवडला.
17 Dec 2012 - 11:51 am | इरसाल
आवडले. एकदा सुरु केल्यानंतर शेवटपर्यंत वाचुनच थांबलो.
18 Dec 2012 - 1:45 pm | इनिगोय
+१
छान आहे कथा.
18 Dec 2012 - 2:08 pm | ५० फक्त
लई भारी अनुवाद केला आहे, धन्यवाद.
18 Dec 2012 - 2:28 pm | पिंगू
अनुवाद छानच जमला आहे.
- पिंगू
18 Dec 2012 - 2:31 pm | मृत्युन्जय
खुप सुंदर कथा. अनुवादही उत्तम जमला आहे.
18 Dec 2012 - 4:34 pm | सस्नेह
कथा अंमळ मोठी असल्याने टप्प्याट्प्प्याने वाचली.
कथा अन अनुवाद दोन्ही उत्तम.
जेफ्री आर्चर आवडत्या लेखकांपैकी आहे.
19 Dec 2012 - 11:23 pm | लाल टोपी
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!!
12 Oct 2014 - 12:27 am | हरीहर
नविन सभासद झाल्यानंतर मिपा वरील जुने लेखन वा॑च्रांना ही कथा सापडली सुरेख अनुवाद उत्तम कथा फारच आवडली.