इंगलिश विन्गलिश... इंग्रजी विंग्रजी.... काय असतं बुवा हे ?
लहानपणापासून इंग्रजीला घाबरणारे कितीकसे पाहिलेत !
निरनिराळे अनुभव आपल्यालाही अनेकविध अंगांनी आले असतीलच.. बेशक.......शाळा, कोलेज, कार्यालय वगैरे......हो हो आठवा ते अनुभव.... रम्य ते दिवस, अनुभव, मित्रांसोबत केलेली मजा, नीट इंग्रजी न आल्याने कित्येकांची उडणारी भंबेरी आपण पाहिली, खिल्ली उडवली, पोटं दुखेस्तोवर हसलो वगैरे.
इथे तर नेमकं 'आर बाल्की' निर्मितीने तर आपल्या सारख्यांच्या घरचंच उदाहरण घेऊन कदाचित सिनेमा बनवलाय असं वाटतंय... "इंगलिश विन्गलिश".. आणि हो "गौरी शिंदे' च लिखाण आणि दिग्दर्शन कसं नमूद न करून चालेल, शेवटी मराठी बाणा तो...
श्रीमती शशी (श्रीदेवी)... लाडू उत्तम बनवते... व्यवसायच आहे हो तिचा या चित्रपटात... असो. (असा वेगळा उल्लेख का केला ? ते तुम्हास चित्रपट पाहून कळेलच.... का चित्रपटही पहावयास हवा ना, नुसती समीक्षा वाचून कसा होईल !!)
चित्रपटाची सकाळच... म्हणजे सुरुवातच सकाळच्या न्याहारीने दाखवलीय, जिथे आजकालची हि शेंबडी पोरं आपल्या आईची खिल्ली उडवताना दाखवलेत ... काय तर म्हणे हिला धड काय ते.... इंग्रजी विंग्रजी येत नाही नीटसं बोलता. आता नाही आलं तिला 'Jazz Dance' बोलता आणि झ्याझ म्हटला तर काय झालं एवढं त्यात.. त्या शेम्बड्यांना धड मातृभाषा नाही बोलता येत इथ. "तुमको गुस्सा नही आ रही" वगैरे काहीसा फुटकळ बरगळतात :-P.. बरं नवरोबा तोही त्यांना पाठींबा देतो. मस्करीत का होईना, पण कुठेतरी त्याच नवरेपण वरचढ होत असत ना आणि त्यात ह्याला हिचा लाडवाचा व्यवसाय खुपत असतो, डाऊन मार्केट वाटत असतो. (लोक शशीची प्रशंसा करून सुद्धा)
मुलगा शशीचा अतिशय गोंडस, दृष्ट काढण्यासारखा आहे. बहिण त्याची मैत्रिणीसोबत कॅफे कोफी डे मध्ये गेलीय अभ्यासाच्या नावाखाली हेही देखील तो किती निरागसपणे सांगतो हो... पण बहिण त्याची खडूस दाखवलीय यात, सदान कदा आपल्या आईला कमी लेखत असते, इंग्रजी येत नाही म्हणून. आईनं टोकलं कुठे गेली म्हणून, तर बया सांगते कशी, मैत्रिणीकडे अभ्यासाला होते; घरी का नाही करता येत अस विचारलं तर म्हणे, तू शिकवणार का इंग्रजी साहित्य???? उदाः - आता मराठी साहित्य आपलं कित्येकांना माहितीये ? पण नाही यांची इंग्रजीची, पाश्चात्यीकरणाची भुरळ ना..... पालक दिनाच्या निमित्ताने बाबा नाही आले म्हणून चिडणारी मुलगी ती, का ? तर आई येणार आता तिच्या त्या कॉन्वेंट शाळेत. अब्रू नुकसान झाल्यासारखं वागणं त्या पोरीचं (अब्रू - सामाजिक प्रतिष्ठा असा इथे अर्थ आहे).. असो... इथे 'मूल्य शिक्षण' हा विषय नाही सांगायचा मला.. सुज्ञांस इशारा पुरेसा असतो म्हणे....
सिनेमा जसजसा पुढे सरकत जातो तसं शशीच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाच तिला आमंत्रण येत अमेरिकेत यायला. मग काय सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे ह्यांच खरेदी सत्र सुरु होत. त्यातच mall मध्ये तिच्या नव-याला कार्यालयातील सहकारीण भेटते, लागला आपला गळाभेट घ्यायला. आता तिने यावर टोकलं तर म्हणतो कसा, असच असत ग कार्यालयांच कल्चर. प्रश्न गळाभेटीचा नसून, तसाच तो घरी का नाही वागत आपल्या बायकोशी असा तिचा खडा सवाल.... असो... हा मुद्दा नाहीये चित्रपटाचा.. पण टिपिकल नवरे कसे असतात हे नमूद न करून राहवलं नाही.....
पुढे अमेरिकेच्या विमानात शशीची गाठभेट दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनशी होते. शशीची उडणारी साहजिक तारांबळ आणि अमिताभ तिला कशी मदत करतो, छान आहे बघायला. (हा प्रसंग नसता तरी चालला असता, पण तरीही चित्रपटाच्या कथेच्या पार्श्वभूमीवर बसतो नेमका). पुढे अमेरिका दर्शन घेत असताना जेव्हा ती कॉफीच्या दुकानात काही खायला म्हणून जाते, तेव्हा तिथे घडणा-या प्रसंगावरून या चित्रपटाल कलाटणी मिळते अस मला वाटत. (काय होतं ते प्रत्यक्ष पहा, म्हणजे झाल)
शशीला पुढे इंग्रजी शिकावस वाटत, एका बसवरील जाहिरात बघून, "चार आठवड्यात इंग्रजी शिका".(अमेरिकेतही अशा शिकवण्या असतात बरं का !!, झटपट इंग्रजी शिका). बापडी करते आपला प्रयत्न, आणि पोचते तिथे जिथे तिला पोहोचायच असत; कारण मनात कुठेतरी मुलीचे टोमणे सलत असतात, कि केवळ इंग्रजी न येण्यामुळे ती तिची अवहेलना करत असते सतत. तर शशीची हि इंग्रजी शिकवणी बघण्यालायक , दृष्ट काढण्यालायक असते. बिच्चारी रोज न चुकता सर्वांचा डोळा चुकवून शिकवणीला जात असते. पण एके दिवशी तिच्या भाचीला [राधाला..... क्युट आहे हो ;-)] कळतं, पण तिला खूप आनंद होतो, कि आपली मावशी काहीतरी करण्यासाठी धडपडत आहे. नेमका याच शिकवणीत शशीला एक फ्रेंच माणूस भेटतो जो तिला वर उल्लेखलेल्या कॉफी शोप प्रसंगात मदत करतो. मनातून ती त्याला भावलेली असते, पण पठ्ठ्या बोलू शकत नाही. हि पडली हिंदी आणि हा फ्रेंच. (जास्त काही सांगत नाही इथे, पण हि शिकवणी, त्यात घडणारे प्रसंग पाहण्यासारखे आहेत, कस लोक इंग्रजी शिकण्यासाठी धडपडत असतात वगैरे.... बाय द वे यात काही या दोघांच प्रेम प्रकरण नाहीये हा, नाही आपला उगाच गैरसमज होईल तुमचा, म्हणून विशेष उल्लेख करावासा वाटला).
पुढे शशीची मुलं, तिचा नवराही येतात अमेरिकेत लग्नात हजेरी लावायला. नेमक्या लग्नाच्या दिवशी शशीची परीक्षा असते त्या शिकवणीची, कारण तो शेवटचा दिवस असतो ना. अहो होssss ....चार आठवडे संपले कि राव यात. पुढे जसा लग्नाचा प्रसंग येतो आणि जेव्हा शशीची बहिण आपल्या मुली आणि जावयाबद्दल बोलत असते, तेव्हा राधाही आपल्या मावशीला बोलावयास भाग पाडते. याच प्रसंगात शशीचा नवरा उठला ताडकन पुन्हा, माफ करा माझ्या बायकोला नीटसं इंग्रजी नाही येत बोलता. पण इथेच चित्रपटात सिक्सर लागतो आणि अशी काही ती इंग्रजी बोलते, मग ते तुटक का होईना पण बोलते ना हो खरी....नवरा तिचा अन मुलगी गुमान मान खाली घालून खिन्न होतात आणि आत्ता पर्यंत घडलेल्या सा-या प्रसंगाची लाज वाटायला लागते मग त्यांना.
झालं कि... चित्रपट संपला राव... या लग्नाच्या वेळी राधा आपली.....:-)..... न चुकता शशीच्या शिक्षकांना आणि तिच्या त्या शिकवणीतील खास दोस्तांना आमंत्रण द्यायला विसरत नाही हो, आणि शशीचा भाषण ऐकून सरांचे डोळेही पाणावतात..
चला साठा उत्तरीची कहाणी, सुफळ संपूर्ण झाली..
कळावे लोभ असावा,
आपला विनम्र
-- के डी
चित्रपटासाठी ४ स्टार **** माझ्यातर्फे..
प्रतिक्रिया
4 Nov 2012 - 11:53 pm | बॅटमॅन
पिच्चर मस्ताय येकदम! लै लेट पाहिला पण पैशे वसूल :)
5 Nov 2012 - 3:52 pm | खबो जाप
कुनि कायबि म्हना पिक्चर येकदम मस्त हाये .....
ते काय ते येकदम पैसा वस्सुल राव ..... :-)
5 Nov 2012 - 4:13 pm | माम्लेदारचा पन्खा
श्रीदेवीचा आवाज बर्फात कुडकुडत बोलणाऱ्या बाईसारखा झालाय...
एवढा फरक सोडला तर तिचे पुनरागमन यशस्वी ठरलंय
5 Nov 2012 - 4:15 pm | बॅटमॅन
सहमत. शिवाय चेहर्याची रयाच गेलीये सर्जरीने. तरीबी अॅक्टिंग मस्ताय हेवेसांनल.
5 Nov 2012 - 7:23 pm | अनन्न्या
श्रीदेवी खरच पाहवत नाही. पूर्वी कशी मस्त वाटायची.
5 Nov 2012 - 11:04 pm | अर्धवटराव
>> पूर्वी कशी मस्त वाटायची.
-- अगदी मनातलं टंकलय.
अर्धवटराव