कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू
आईस रडवण्याचे, आभार घेतले तू
वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे
मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू
मातीत वेदना ही, का उगवते अजूनी
झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू
अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे
तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू
रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू
स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू
कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू
- संध्या
प्रतिक्रिया
29 Jun 2012 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू --^--^--^--
27 Jun 2012 - 2:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
शेवटचे कडवे तर... सुभान अल्ला!!
28 Jun 2012 - 12:21 pm | अमितसांगली
वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे
मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू...........हे मात्र पटल...
कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू........अप्रतिम.........
29 Jun 2012 - 5:14 am | सांजसंध्या
अत्रुप्त आत्मा, मिसळलेला काव्य प्रेमी आणि अमित सांगली आपले सर्वांचे आभार :) .
कविता वाचल्याबद्दल इतर सर्वांचे आभार..