सर्वप्रथम तुम्ही माझे अभिनंदन करावे अशी मी विनंती करतो. स्वतःच आरती ओवाळून घेतोय, कारण हा पराक्रमच असा आहे. मी चक्क मनोज कुमार कृत चित्रपट ‘क्लर्क’ (उच्चार: कलर्क) पूर्ण पहिला. ज्याचा एकतरी पुरावा म्हणजे हे रसग्रहण! दचकू नका. माझ्या भुताने लिहिले नाहीये. खुद्द मी; एक मर्त्य मानव या चित्रपटाचे रसग्रहण लिहीत आहे. आणि मी चक्क जिवंत आहे हे विशेषत्वाने लक्षात घ्या मंडळी!
हं, तर या चित्रपटातील पात्रांचा(या शब्दाला खरोखर जागलेत सगळेच!) परिचय करून घेऊ. भारत (मनोज कुमार), पूजा (अनिता राज), ऑफिसर बी. एम. शर्मा (सतीश शाह), भारतचा भाऊ राम (महम्मद अली), स्नेह कपूर (रेखा), विजय कपूर (शशी कपूर), शिपाई साधुराम (प्रेम चोप्रा), सोनू (सोनू वालिया), रामची पत्नी – रुक्मिणी, भारतचे बापू: सत्यपती (अशोक कुमार)
भारत चक्क डिफेन्सच्या कुठल्यातरी हपिसात एक प्रामाणिक व इमानदार क्लर्क असतो. या त्याच्या गुणांमुळे नेहमीच बॉसच्या(बी. एम. शर्मा) शिव्या खात असतो. त्याच ऑफिसातली त्याची कलिग पूजा त्याच्यावर जी जान से प्रेम करत असते. नेहमीप्रमाणेच शिव्या खाऊन झाल्यावर चित्रपटाची ओफिशियल सुरवात “मै एक कलsssssर्क हू” अश्या आरोळीने होते. भारत चा भैय्या राम दारू ढोसत व भारत सिगारेट पिता पिता एक तारीख येण्यासाठी किती दिवस उरलेत व दारू कशी संपली यावर गहन विचार करत असतात. सावकारीत जामीन गेल्याने व चीन युद्धात राम भैय्याचा एक पाय निकामी झाल्यानंतर केलेल्या मूर्खपणामुळे आपली ही अवस्था कशी आली याची दर्दभरी कहाणी ते प्रेक्षकांना सांगत असावेत, कारण आजूबाजूला कुणीच नसते. यांच्या बापाची (अशोक कुमार) पेन्शन, रामची पेन्शन व भारत चा पगार घरात येत असूनही सगळी बिले, व धाकट्या भावा-बहिणीच्या फिया पण सुटत नसतात म्हणे! (अश्या स्थितीत दारू सिगरेटचा खर्च कुठून भागवायचे हे आपण निमूटपणे विसरून जायचं बर का!) भारत त्या वेळेस काय भन्नाट वाक्य टाकतो! “जब बिल बडे होते है तो दिल छोटा नही करना चाहिये!” मान गये जनाब! हा संवाद चालू असतानाच मगासच्या खोकल्याचे कारण कळते.यांचे प.पू. पिताजी आजारी आहेत व त्यांना हृदयविकाराचा एक झटका आला आहे. आणि अश्या प्रकारे तो महान सीन चालू होतो, जो बघता काही डॉक्टरांनी व्यवसाय करणे सोडून दिले म्हणे. कारण आझाद हिंद सेनेचे गाणे ऐकूनच अशोक कुमारचे दुखणे पळून जाते व तो चक्क २ मिनिटात चालू-फिरू लागतो! (आत्महत्या सीन १) बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करण्याची घाई तरी किती असावी ते? खरंतर या दृष्यावरच एखादा लेख लिहिता येईल, पण ते असो! (नाही असोच!)
रुक्मिणी (रामची बायको) अनेकदा भावाला भेटायचे कारण सांगून उशिरा घरी येत असते म्हणून रामचा तिच्यावर राग व संशय असतो. अन येताना ती फक्त पैसे घेऊन येत नाही, तर रामसाठी दारूची बाटली व भारतसाठी जेवण घेऊन येत असते. याबद्दल छेडले असता रुक्मिणी एक झकास उत्तर देऊन गप्प बसवते “जो पती अपनी पत्नी को मान की शांती और तन का सुख ना दे सके वो शक नही करेगा तो और क्या करेगा”. बर जेवण फक्त भारतसाठीच बर का! घरातल्या इतरांचे काय हा सवाल आपण डोक्याप्रमाणे बाजूला ठेवायचा.
स्नेह कपूर (रेखा) ही कॉलेजच्या दिवसात भारतची प्रेयसी असते म्हणे. पण पैशाच्या अमिषाने एका अमीर विजय कपूरशी लग्न करून सेटल झालेली असते. टेंडरची फाईल याच्या ऑफिसात असल्याने स्नेह भारतला पिडणे चालू करते. फ्लॅशबॅकमध्ये एक गाणे वगैरेही होते. एके दिवशी त्याच्या ऑफिसात येऊन विद्यार्थी मेळ्याचे आमंत्रण वगैरे देते, निघताना भूतकाळातील आठवणी सांगून त्याला त्रस्त करून सोडते. अन मग भारत शिपायाच्या हातातली दारू भरलेली कोकची बाटली हिसकावून गटागट संपवून थेट तिथे (विद्यार्थी मेळ्यात) दाखल होतो. जुने दिवस आठवून व सध्याची हलाखीची परिस्थिती सांगत एक गाणे वगैरेही म्हणतो. या (गाढवाच्या) तोंडून गाणे ऐकून सगळेच लोक (होय, त्याच्या ऑफिसातले बॉस वगैरेही) त्याची तारीफ करत असत.
काही दिवसातच टेंडरची फाईल पुढे सरकवाण्यासाठी कपूर जोडी ऑफिसर शर्माला घोळत घेते, एक बॅग भरून पैसे देऊन मार्गाला लावतात.
गरिबीतून वर येण्यासाठी बलराम व त्याची प्रेयसी सोनू १५ ऑगस्टच्या पवित्र मुहूर्तावर एका बँकेवर दरोडा घालायचा प्लान बनवतात. ही सोनू पैशाने/स्वभावाने कशानेही गरीब दिसत नसते. हिची जीन्स खिश्यापासून थोड्या अंतराने घोट्यापर्यंत फाडलेली व मांडी-पोटऱ्या दाखवत लेसने बांधलेली वगैरे असते! तिला बाईक चालवता येते, फायटिंग येते. (बघा, कशी सर्वगुणसंपन्न आहे) पण ऐनवेळेस घोळ होऊन तो प्लान फसतो. परिस्थितीजन्य पुराव्यामुळे बलराम ऐवजी भारतला अटक होते. पोलीस स्टेशनात भारत गुन्हेगार नसून बलराम गुन्हेगार आहे हे कळते(हाही सीन अत्यंत रोचक आहे). बलरामला सोडवण्यासाठी तुलसीच्या मदतीला वैनीचा पैसेवाला भाऊ कुलजित येतो व आपला साथीदार दलबीर याला भेटायचा सल्ला देतो. दलबीर तिचा गैरफायदा घेतो.
----------------------------------------------------
कपूर घराणे उगीचच एक पार्टी ठेवतात व शर्मासकट सर्व स्टाफला आमंत्रित करतात (अगदी शिपाईसुद्धा) तिथे परत भारत एक गाणे गातो व (पुन्हा) आपली दर्दभरी दास्ताँ बयान करतो. प्रसंग काय, गाणे काय गातोय याचा काडीमात्र संबंध नसण्याची हिंदी चित्रपटांत तशीही एक परंपराच असल्याने मलातरी यात वावगे वाटलं नाही. हे गाणे हा अजून एक संशोधनाचा विषय! त्यामुळे तेही असोच!
पार्टीनंतर पूजाला जिंदल नावाचे एक गृहस्थ तिच्या घरी चारचाकीतून सोडतात. हे बघून तिच्या आईला अत्यंत काळजी वाटते. तेंव्हा झालेल्या चर्चेतून कळते की जिंदल पूजाचा ‘अनौरस बाप’ (ही उपाधी शोधून काढणारा माणूस धन्य आहे ना?) आहे.
पुन्हा एकदा रुक्मिणी बाहेर जाताना तोच संवाद काम भांडण वगैरे होते; अन राम तिच्या मागावर राहतो. (ती पायी जाते व राम लंगडत. पण तरीही त्यांच्यात फारसे अंतर अज्जिबात नसते. काय पण वेग आहे लंगडण्याचा!) आजवर संशय घेतल्याचे प्रायश्चित्त म्हणून राम रुक्मिणीची माफी मागतो व त्याला तिच्या चपलेने बडवून काढण्याची आज्ञा करतो. एकीकडे भारत फाटकी चप्पल वापरत असतो तर वैनी अगदी नवीकोरी सेंडल! तिच्या उत्पन्नाचा स्रोत समजल्यावर आपल्याला घेरी येऊन पडणे बाकी असते. कारण रुक्मिणी चक्क तिचे रक्त विकून तब्बल दीडशे रुपये कमवत असते. या दीडशे रुपयांमध्ये काय काय करते बघा, नवऱ्याची दारू, भारतसाठी जेवण, बलरामच्या वकिलाची फी! मग बाकीच्यांचे उत्पन्न किती अन त्याचे काय होत असावे??? हा प्रश्न फक्त अन फक्त डोके ठेवून पिक्चर बघणारे लोकच विचारू जाणे!
विविध कारणाने सर्वजण दुःखी असताना पूजाच भारतच्या जीवनात हास्य फुलवेल असा विश्वास कौशल्या (दिना पाठक, भारतची आई) हिच्या मनात असतो. लगेच कॅमेरा जीम्नेस्तिक करणाऱ्या पुजाकडे! ती म्हणे शाळेपासून जिम्नॅस्टीक्स चॅम्पियन असते. तिने भारतला महत्वाचे काम आहे असे सांगून खेळ संकुलात आणलेले असते. तिचा जिम्नॅस्टीक्स वाला ड्रेस बघून (इथे फक्त हात व डोके सोडून सर्व अंग झाकलेले आहे. नसत्या अपेक्षा नकोत, नायक सभ्य आहे) बुचकळ्यात पडतो, तोंड फिरवून घेतो वगैरे वगैरे. मग ती जिम्नॅस्टीक्स चे थोडे प्रकार दाखवायला सुरवात करते अन पुन्हा एक गाणे! ती चक्क नाचायला लागते. गाण्यातला काही भाग स्विमिंगपूल जवळही चित्रित केलाय. खरंतर रोम्यांटिक गाणे असूनही जागा इतकी विचित्र का घेतलीये? हा प्रश्न दिग्दर्शकाप्रमाणेच आपणही फाट्यावर मारायचा.
तोवर तुलसीला दलबीर पासून दिवस गेलेले असतात म्हणून ती त्याला लग्न करण्याची गळ घालते. दलबीर अर्था तच नकार देतो. हे ऐकता क्षणीच त्याच्या नाकावर एक ठोसा बसतो. भारत आणि दलबीरची एक जोरदार हाणामारी होते. दलबीर मि. कपूरचा माणूस असल्याने माघार घेणार नसल्याचे सांगून पळ काढतो. तितक्यात भारतने मि. कपूर बरोबर हातमिळवणी करावी यासाठी स्नेह तिथे येते. समजुतीच्या चार गोष्टी सांगते. गरिबीचे दुष्टचक्र तोडण्यासाठी अधिकारी खानच्या कपाटातील ऑपरेशन ग्रीनस्टारची फाईल चोरून आणायला सांगते. अर्थातच यातून त्याची गरिबी दूर होणार असते. अन तो हे काम स्वीकारतो. अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे हे काम केल्यामुळे कपूर खुश होऊन १० लाख रुपये देतो. १० लाख मिळाल्यावर राम, व बापू आपल्या शेतातल्या नेताजींच्या पुतळ्याला अभिवादन करतात! भारताचे नशीब फळफळले म्हणून त्यांचे आभार मानतात! (डोके फोडून घ्यायची पुन्हा एकदा इच्छा व्हावी असा सीन) या १० लाखात रामचा पाय बारा झालाय, चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी झाली. हेच जेंव्हा सरकारी खर्चाने होणार होते तेंव्हा का नाही करून घेतले असा प्रश्न विचारण्यासाठी चित्रपटाची सुरवात लक्षात असायला हवी ना. ही टिप्पणी प्रेक्षकांसाठीच, निर्माता-दिग्दर्शकाला नव्हे याची नोंद घ्यावी.
----------------------------------------------
आता भारत नक्की कुठे अन काय काम करतो हे प्रेक्षकांना काळाने दुरापास्त होते. उंची ऑफिस काय, फोन, पार्ट्या वगैरे काय... असो. क्लबमध्ये जिंदल व पूजा बरोबर असताना एक फोन येतो व भारत कपूरला भेटायला निघतो. जिंदल पूजाला घरी सोडायची तयारी दाखवतो व भारत मान्य करतो. पूजाच्या जीवाला धोका आहे हे स्नेहकडून भारतला समजते. अपेक्षेप्रमाणे तिकडे बलात्कार सीन चालू (अन काही प्रेक्षकांचा पुन्हा अपेक्षाभंग!) पूजा जिंदलला त्या प्रसंगातही लेक्चर सुनावत असते. अन सरतेशेवटी मंदिरातील दुर्गेचे त्रिशूल घेऊन त्याचा खून करते. पूजा घरी येतेय तेवढ्यात पोलीस तिला व तिच्या आईला बोलावतात. मरता मरता तो भारतला उपदेश करून जातो कि पुढे कसा आलास ते त्या दोघांनाही माहित आहे, पण इथून परत कसे जायचे हे त्याचे त्यालाच ठरवायचे आहे! हॉस्पिटलमध्ये जिंदल पूजा निर्दोष असल्याचे सांगतो. पूजाच्या पाया पडून व आपली सर्व मालमत्ता पूजाच्या नावावर करून मरतो (एकदाचा). (मृत्युपत्र कधी तयार केलं वगैरे कोण विचारतोय रे? हाकला बघू त्याला!) लग्गेच पूजा व भारतचे लग्न! अचानक इतकं पैसा कसा आला व जिंदलने सांगितलेल्या उपदेशावरून पूजा-भारतमध्ये कुरबुरी चालू होतात. एके दिवशी भारत लाचखोर असल्याचे कळल्याने भारताच्या पिताजींना तीव्र झटका बसतो. गाद्दरीच्या पैशांची औषधे न खाता; आझाद हिंद फौजेचा वेश धारण करून नेताजींच्या फोटोला सल्युत करून प्राण सोडतात. रामसुद्धा भारतला गोळी घालायच्या बेतात असतो, पण जेलमधून फरार बलराम स्टेनगन घेऊन मध्ये पडतो. खान साहेब भारतचा वापर कपूरच्या विरोधात करण्याचे ठरवतात.
---------------------------------
कपूरचा नवा प्लान – ऑपरेशन रेड रोज ची माहिती मिळवणे हे त्याचे उद्दिष्ट असते. जेणेकरून तो आपल्या भारतभूची रक्षा, सेवा करेल! त्यासाठी असलेल्या मिटींगमध्ये जाऊन रेड रोज मिशन आपण पूर्ण करणार असल्याचे सांगतो. या मिशन प्रमाणे भारताच्या पंतप्रधानांचा खून करणे, संसदेवर हल्ला करणे अपेक्षित असते. निघताना स्नेह भारतला यात सहभागी न होण्याबद्दल विनवते. भारत तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करतो. तिथून निघून साधुराम व भारत खान साहेबांच्या बंगल्यावर येतात. त्यांचा पाठलाग करत कपूरचे लोक आलेले असतात. त्यांचा नायनाट वगैरे करण्याच्या भानगडीत साधुरामचा बळी जातो. भारतला कपूरचे लोक कपूरकडे घेऊन जातात. तिथे पुन्हा हाणामारी. यातून जरा रीलाक्स होण्यासाठी मिसेस स्नेह कपूरचा एक छानसा डान्स चालू होतो. इतक्यात लाईट जातात व अंधाराचा फायदा घेऊन भारत पळून जातो. पूजा ‘तिची’ गाडी घेऊन त्याला वाचवायला आलेली असते. रेड रोज ऑपरेशन उद्याच होणार असल्याची माहिती खान साहेबांना देणे गरजेचे असल्याने ते तिकडे जात असता मध्येच राम ‘त्याच्या गाडीतून’ बंदूक घेऊन उभा! आरोप-प्रत्यारोपांचा खेळ, बंदुका, नीती-अनीती या सगळ्यांची चिरफाड होत असतानाच बलराम पण स्टेनगन घेऊन हजर! शेवटी दिग्दर्शक खानसाहेबाला गाडीतून यायला भाग पाडतो व मायबाप प्रेक्षकांची सुटका करतो.
सर्वांचे मनोमिलन झाल्यावर कपूर व त्याचे गुंड हल्ला चढवतात. भारत व टीम च्या मदतीला सर्वगुणसंपन्न सोनू तिची बाईक घेऊन येते. अर्थातच भारत व खानची नैतिक बाजू बळकट असल्याने बावळट प्रतिकार करूनही सर्व गुंडांना जाण्यास भाग पाडतात. कपूर फक्त बलराम व सोनूला गोळी घालून मारतो. (जर कुणी प्रेक्षक जिवंत असेल तर इथे नि:श्वास सोडतो, “चला, २ पात्रे कमी झाली” म्हणून)
कपूर व त्याचे सहकारी पंतप्रधानांच्या गाडी ताफ्यावर लक्ष ठेवून असतात. तितक्यात खान साहेब व इतर लोक (भारत व त्यांचे कुटुंबीय, अजून कोण असणार??) रस्ता अडवतात. मग समजते कि इंटेलिजन्सकडून माहिती मिळाल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पंतप्रधान दुसऱ्या रस्त्याने गेलेत व गाडीचा ताफा चकवा देण्यासाठी चाललाय. कपूर गोळीबार चालू करतो. मग दुष्टांचे निर्दालन वगैरे चालू होते. दरम्यान प्रत्येक जन जे काही संभाषण करते ते ऐकून सुन्न होतो! कपूर भारतवर गोळी चालवणार तोच मिसेस कपूर मध्ये पडते व गोळी तिला लागते. मरता मरता भाषणबाजी करत एक गाणेसुद्धा गाते! कपूर शेवटी स्वतःला बॉम्बणे उडवून घेतो. खान साहेब रामला विश्वास देतात कि भारत सरकार त्यांना त्यांचे शेतजमीन वगैरे इनाम म्हणून देईल (जी त्यांनी आधीच १० लाखातून घेतलीये!)
इथून पुढचा भाग तुनळीवर उपलब्ध नाही. सर्व दुष्टांचे निर्दालन व नायकाची देशनिष्ठा सिद्ध होत असल्याने इथेच चित्रपट संपत असावा. हे सगळे बौद्धिक अत्याचार बघेपर्यंत प्रेक्षक मात्र कधीच संपलेला असतो.
प्रतिक्रिया
21 Apr 2012 - 5:57 pm | प्रसाद प्रसाद
तुझ्या सहनशीलतेचे कौतुक वाटले. असला पिक्चर पूर्ण बघायचा!!!!!!!!! एका प्रसंगाचा दुसऱ्या प्रसंगाशी ओढून ताणून लावलेला संबंध आणि उपदेशपर किंवा दुःखाची कहाणी सांगणारी गाणी, अरारारा!!!!! मानलं बाबा तुला.
21 Apr 2012 - 7:11 pm | पैसा
परीक्षण भारीतलं आहेच! पण तुझा थीसिस लिहायला डोकं जागेवर आलेलं आहे ना नीट? हा पिक्चर बघितल्याबद्दल तुझा जाहीर सत्कार करावा म्हणते!
21 Apr 2012 - 8:10 pm | सस्नेह
+१ !
अन्याभाऊ, तुमचे पाय कोठे आहेत ? जरा दर्शन घ्यावं म्हणते. अशीच अमुची सहनशक्ती व्हावी म्हणुन !
21 Apr 2012 - 8:08 pm | यकु
(मृत्युपत्र कधी तयार केलं वगैरे कोण विचारतोय रे? हाकला बघू त्याला!)
=)) =)) =))
या मिशन प्रमाणे भारताच्या पंतप्रधानांचा खून करणे, संसदेवर हल्ला करणे अपेक्षित असते.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
एवढा सगळा पसारा पाहून तु सहीसलामत बाहेर पडून परिक्षण लिहिल्याबद्दल तुझे अभिनंदन रे अन्या. ती परेडच्या गाण्याची क्लीप पाहिली होती चेपुवर मागे तेव्हाच हा महान पिच्चर आहे हे कळलं होतं.
21 Apr 2012 - 9:43 pm | ५० फक्त
सहनशक्तीला प्रणाम, मागे अविनाश काकांनी सुचवल्याप्रमाणे कधी मिपाचे स्नेह संमेलन झाले तर हा चित्रपट दाखवण्यात यावा आणि मगच जेवु घालावे.
21 Apr 2012 - 10:36 pm | प्रास
सॉलिड क्लर्क-परिक्षण!
अन्याभाऊंचा लेखनाचा उपास अशा परिक्षणातून संपेल असं वाटलं नव्हतं पण आनंद झाला वाचून.
मित्र हो, हा चित्रपट तू नळीवर पाहून जिवंत राहिलेले अन्याभाऊ पहिले असतील तर मिपाच्या या संस्थळावर मी जाहिर करतो की सदर चित्रपट अंधेरी, मुंबईच्या 'बहार' नामे चित्रपटगृहात फस्ट डे फस्ट शो बघून जिवंत राहून आलेलो आहे ;-)
22 Apr 2012 - 12:12 am | श्रीरंग
ओ ब्यूटी ब्यूटी ब्यूटी!! ओ स्वीटी स्वीटी स्वीटी!!
एवढं गुंतागुंतीचं क्लिष्ट नाट्यमय कथानक उलगडून सांगितलस.. कमाल आहे.
"मै डॉक्टर के पास गया था, लेकिन.... डॉक्टर साब को फीssssssssज चाहिये थी"
"मै शिकार नही... पूजा हूं" (स्वतःवर बलात्काराचा प्रयत्न होत असतानाचा अनीता राजचा निरागस संवाद)
असली वाक्यं चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.
22 Apr 2012 - 12:38 am | पाषाणभेद
भक्कम परिक्षण केलेत.
कलर्क चित्रपटाच्या कालखंडात हिंदी चित्रपटांनाही सरकारी अनुदान मिळत होते काय हो?
22 Apr 2012 - 7:53 am | शिल्पा ब
मला कैच समजलं नैये!!
22 Apr 2012 - 8:39 am | प्रचेतस
वाचून सदेह स्वर्गप्राप्ती जाहली आहे.
हे परीक्षण तर टाकून झाले, आता 'बोल'णार कधी?
22 Apr 2012 - 1:06 pm | ५० फक्त
प्रश्नाचा रोख किंचित चुकला की काय ?
23 Apr 2012 - 3:50 pm | प्रचेतस
नाय हो. रोख योग्य त्या जागीच आहे.
22 Apr 2012 - 10:58 am | मोदक
हा सीन बघून पुढे काही बघणे शक्य झाले नाही.. ..
तू नळीवर आहे.. आणि त्याच्यावरती पडलेल्या कंमेंट्स वाचण्यासारख्या आहेत. :-D
22 Apr 2012 - 11:04 am | पिंगू
मायला हा चित्रपट मी पाहूच शकत नाही... ;)
पाय कुठे आहेत रे तुझे... :D
- पिंगू
22 Apr 2012 - 1:06 pm | पियुशा
तुझ्या सहनशक्तिला ___/\___ ;)
22 Apr 2012 - 2:27 pm | दादा कोंडके
खत्रा परिक्षण अन्या!
बाकी मी सुद्धा असले स्टंट्स करत असतो.
मागच्याच आठवड्यात दादागीरी नावाचा हिंदीमध्ये डब केलेला एक सिनेमा जवळ जवळ शेवट पर्यंत पाहिला. फक्त शेवटचे १५ मिनिटं नाही बघू शकलो. नाहितरे वेडच लागलं असतं मला! :)
त्यातला अगदी टायटल्सच्या ही आधिचा ओपनिंग शॉट:
बंगळूरुच्या गद्रीच्या :) रस्त्यावर ट्रॅफीक जॅम झालय. हॉर्नचे आवाज येतायत. फ्री लेफ्ट टर्न असून एकजण रस्ता अडवून उभा आहे. तेव्ह्ड्यात साधारण ५०-५५ वय असलेला पोट सुटलेला माणूस बाईकवरून येतो. हेलमेट काढून त्या कारमधल्या माणसाला स्वतःच्या भरदार मिश्या, डोळ्याखालच्या पिशव्या, आणि काळा सुरकुतलेला चेहरा दाखवतो आणि त्याची कान उघडणी करतो. तो माणूस मग "सॉरी शक्तीमान" म्हणून ह्याचं नाव विचारतो. हा मग 'सिटीझन' म्हणतो!
दुसरा सीनः हाच माणूस जॉगींगला जात असताना ड्रेनेजचं झाकण उघडं असल्यामुळे आत मध्ये पडलेल्या त्याच भागाचा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इंचार्जला बाहेर काढतो आणि त्याच्या चुकिची जाणीव करून देतो, आणि जाताना परत स्वतःचं नाव 'सिटीझन' असं तोर्यात सांगतो.
तीसरा सीनः भरदिवसा गद्रीत बसस्टोपवर दोन तरूण एका मुलीची छेड काढत असतो. त्यावेळी तीच्या मैत्रीणीला स्त्रीशक्तीची आणि एकीच्यी बळाची जाणीव करून देतो आणि स्वतःचं नाव 'सिटीझन' असं सांगून जातो.
चौथा सीनः ह्या माणसाच्या बाईकला पाडून एक इनोवा निघून जाते. त्या गाडीचा नंबर लक्षात ठेउन हे महाशय ती गाडी येताना आधीच स्वतःची बाईक रस्त्यामधे उभे करून श्टाईलित वाट बघत असतात. गाडीची काळी काच खाली करून पंचवीस-तीस वर्षाची तारुण्यानी मुसमुसलेली ललना खाली उतरते आणि मीच गाडी पाडली याला पुरावा काय असं म्हणते. तर हा म्हातारा चेकाळून तीचं चुंबन घेतो आणि आता याला पुरावा काय असं म्हणतो!
पाचवा सीनः ही बया त्याच्या ह्या आगावूपणावर भाळून त्याच्या प्रेमात पडते आणि स्वतःच्या मैत्रिणीला घेउन त्याचं नाव -पत्ता काढण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणून पोलिस स्टेशन मध्ये येते. इंस्पेक्टरच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने डॉळ्यासमोर धरलेला पेपर काढल्यावर लाजून चूर होउन "आम्ही नाई जा!" म्हणत ती पळ काढते!
पुढं काय-काय आहे ते सांगून तुमची गंमत घालवत नाही! :)
22 Apr 2012 - 9:59 pm | श्रीरंग
वर्णनावरून तरी तुम्ही म्हणताय तो नायक विजयकां'थ' हाच असणार! कहर आहे हा माणूस!!
22 Apr 2012 - 5:54 pm | तिमा
परीक्षण वाचून डोके अजिबात गरगरले नाही कारण पूर्वीपासून 'भारतकुमार' हे असलेच सिनेमे काढत आले आहेत. देशभक्तीच्या बाबतीत त्यांची मोनोपोली होती. आणि अॅक्टिंग बद्दल तर काही विचारायलाच नको. मी त्यांचा 'पूरब और पश्चिम' हा एकच सिनेमा थेटरात पाहिला. बाकीचे नंतर टी.व्ही. वर फुकट (केवळ गाण्यांसाठी चांगले असले तर) पाहिले.
तुमचा पेशन्स इतका दांडगा आहे की भुंग्याने मांडी पोखरताना देखील तुम्ही स्तब्ध बसू शकाल कर्णासारखे.
22 Apr 2012 - 6:34 pm | रमताराम
कितीऽऽ डोक्याला त्रास द्याल रे किती डोक्याला त्रास द्याल*.
मी तुझ्या लेखाचे दोन प्यारेग्राफ वाचले नि कोणाचं कोण काय नि काय करतं हे समजण बंद झालं. चित्रपट कसा काय बघितलास रे बाबा तू पुरा. कुठल्याशा बोलरच्या अत्युक्तृष्ट बोलिंग विश्लेषण सांगताना ब्याट्समनबाबत कणेकरबुआ वैतागून म्हणाले होते तसे 'तू काय कॉम्पोज खाऊन झोपला होतास का थेटरात?' असे विचारायचीही सोय नाही तुला, कारण तपशील इथे देतो आहेस म्हणजे चांगला जागा होतास की. ज्योतिष्याला हात, पाय.... आपलं हे नाडी किंवा कुंडली दाखवून चेक करून घे साडेसाती वगैरे चालू झाली आहे का ते.
*श्रेयः कणेकरबुवा.
22 Apr 2012 - 6:25 pm | सविता००१
भारी आहेस. तुझ्या सहनशक्तीला सलाम!!!!!!!!
बाकी हाच सिनेमा का रे निवडलास पहायला? ;)
22 Apr 2012 - 7:32 pm | चित्रगुप्त
अभिनंदन.
या सिणीमाची हिरवीण कोण म्हणायची, रेखा कि अनिता राज ?
22 Apr 2012 - 10:31 pm | चिगो
___/\___ बास, आणखी काय बोलणार ?
22 Apr 2012 - 10:47 pm | मन१
http://www.youtube.com/watch?v=rMe0nZkGEWY
पूर्ण चित्रपट पाहवत नाही त्यांनी हा दोन्-चार मिनिटांचा सीन तरी पहाच नक्की.
परिक्षण टाकल्याबद्दल दुवा स्वीकारा आमच्या.
23 Apr 2012 - 11:06 am | प्यारे१
>>>परिक्षण टाकल्याबद्दल दुवा स्वीकारा आमच्या.
+१
23 Apr 2012 - 11:21 am | मृत्युन्जय
बर्याच दिवसापासुन या चित्रपटाचे परीक्षण लिहिणार होतो. पण हा चित्रपट एवढा डिट्टेलवारी पाहिला आहे हे लोकांना सांगण्याचे धाडस होइना. असो. तरी तु लिहिले मस्तच आहेस. मला एवढे चांगले नसते जमले.
पण मला वाटते बलराम, तुलसी कोण आहेत हे तु सांगितलेले नाहिस. शिवाय इतर पात्रांची ओळखही थोडी विस्कळीत आहे. चित्रपटच इतका विस्कळीत आहे म्हणा की हे होणारच :)
23 Apr 2012 - 11:29 am | गणामास्तर
धन्य आहेस..पूर्ण बघितलास म्हणजे खरच तुझ्या सहनशक्तीला सलाम..
आणि शेवट सांगितल्या बद्दल आभार. तुझ्या नादाला लागून बघायला चालू केला होता पण मला तर अर्ध्यातूनच नाद सोडावा लागला. :)
23 Apr 2012 - 11:48 am | स्पा
भेंडी .............
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
अरारारार्रा
पार बाजार उठला राव
23 Apr 2012 - 3:26 pm | अमृत
जबरदस्त वस्त्रहरण :-) आणि काय म्हणणार....
कृपया याचे हिंदीत भाषांतर करू नका नाहीतर म.कु. (भा.कु.) उगाच केस वगैरे टाकेल.... :-)
अमृत
23 Apr 2012 - 3:30 pm | बिपिन कार्यकर्ते
अन्या! &*&^%#^&*( !!!!! सांगितलेलं काम करत नाहीस... टेपा लावतोस आणि हे भलतं सलतं 'बोल'त बसलायेस!
26 Apr 2012 - 12:58 am | मृगनयना
उत्कृष्ट ! ! ! आपलं विश्लेषण / विच्छऐदन वाचून मी हा चित्रपट पाहिला (एका दमात) . दिग्दर्शकाच्या कल्पना शक्ती ची दाद द्यायला हवी. सहसा रात्री चित्रपट पाहताना झोप येते , पण हा एकमेव असा चित्रपट होता ज्याने माझी झोप उडवली.
बाकी तुमचे विशेष कौतुक करावे वाटते ......
उत्तम रसग्रहण ... !!!
26 Apr 2012 - 1:20 am | कवितानागेश
मला अजूनही कळला नाहीये सिनेमा....
जाउ दे. :(
26 Apr 2012 - 2:47 pm | सुहास..
अन्या लेका जिवंत असल्याबद्दल अभिनंदन !! ;)
पायाचा फोटु पाठव, मनोज कुमार कडुन, भर चौकात ओवाळुन घ्यावे म्हणतो
27 Apr 2012 - 5:12 pm | फारएन्ड
हा चित्रपट पाहण्याची डेअरिंग केल्याबद्दल पहिले अभिनंदन! कहाणी खतरनाक कॉम्प्लेक्स आहे. दोन तीन वेळा तरी वाचावी लागणार :)
माझ्या भुताने लिहिले नाहीये. खुद्द मी; एक मर्त्य मानव या चित्रपटाचे रसग्रहण लिहीत आहे. >>> हा खुलासा महान :)
१० लाख मिळाल्यावर राम, व बापू आपल्या शेतातल्या नेताजींच्या पुतळ्याला अभिवादन करतात! >>>
यातून जरा रीलाक्स होण्यासाठी मिसेस स्नेह कपूरचा एक छानसा डान्स चालू होतो. >>>
भारत व त्यांचे कुटुंबीय, अजून कोण असणार??>>> :D असली वाक्ये जबरी धमाल आहेत :)
28 Apr 2012 - 8:03 am | amit_m
इतक्या सहनशक्तीबद्दल हबिनंदण...
19 Jan 2013 - 1:04 pm | भुमन्यु
एव्हढा भयानक चित्रपट बघायचा आणि नंतर त्याच इतक भलं मोठं परीक्षण लिहायचं "मान गये मुघल ए आझम"....
19 Jan 2013 - 2:51 pm | अद्द्या
कामाचा कंटाळा आला.. म्हणून हे उघडलं..
अन हे SSSSSSSSSSS काय .. ???
काही तरी अर्थ आहे का याला ?
19 Jan 2013 - 3:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असला पाणचट पिकचर एका बैठकीमधे बसुन पाहायचे डेअरींग केल्याबद्द्ल अन्या दातारांचे अनिरुद्ध दातारांकडुन अभिनंदन....आपल्या सहनशक्तीला मानाचा मुजरा....एवढी सहनशक्ती कुठुन मिळाली ह्याविषयी एक मार्गदर्शनपर लेख टाकावा अशी समस्त मिपा करांच्या वतीनी मागणी....तसेच सहनशक्ती साठी विशेष नोबेल पुरस्कार जाहीर करायची मागणी..!!