नाथ संप्रदाय (१)
या एका महत्वाच्या संप्रदायाची माहिती दोन भागांत देत आहे.पहिल्या भागांत संक्षिप्त इतिहास, सिद्धांत, सांप्रदायिक प्रमाणग्रंथ व वेष, उपास्य देवता, पुण्यक्षेत्रे यांची माहिती व दुसर्या भागांत शाखाभेद, प्रभाव आणि कार्य यांची माहिती घेऊं.
विविध नावे :
आदिनाथ शिवापासून सुरवात झाली म्हणून नाथसंप्रदाय असे नाव पडले. योगप्रधान असून सिद्धावस्था वा अवधूत अवस्था प्राप्त करणे हे ध्येय असल्याने योगसंप्रदाय, सिद्धसंप्रदाय, अवधूतसंप्रदाय अशी नावेही लाभली आहेत.
इतिहास :
गोरखनाथ हा या संप्रदायाचा प्रवर्तक. आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ-गोरखनाथ ही गुरूपरंपरा. मत्स्येंद्रनाथ हा कदलीवनातील योगिनीकौल या स्त्रीप्रधान तांत्रिक संप्रदायात अडकला होता. कदलीवन हे हिमालयाच्या पायथ्याशी असावे.(हजारीप्रसाद द्विवेदी) डॉ. ढेरे यांच्या मताप्रमाणे कदलीवन म्हणजे दक्षिणेतील श्रीशैल मल्लिकार्जुनाचा परिसर. हे जास्त योग्य वाटते. गोरखनाथाने तेथे जाऊन आपल्या गुरूला बाहेर काढले व संप्रदायाचा प्रसार भारतभर केला म्हणून गोरखनाथालाच प्रवर्तक म्हटले पाहिजे. दहाव्या-अकराव्या शतकात भारतात बौद्ध धर्माचा पाडाव झाला असला तरी त्यातील तांत्रिक विचारसरणीचा प्रभाव अनेकांवर पडला होता. तंत्रसाधनेचे प्रस्थ वाढून त्यांत अनेक विकृती आल्या होत्या आणि भयानक अनाचार बोकाळला होता. गोरखनाथाने आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाने त्याला आळा घालायाचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांनी त्याचा गौरव " योगाब्जिनी सरोवरु ! विषयविध्वंसैकवीरु !! " असा केला आहे.
सिद्धांत :
काश्मिरी शैव संप्रदायाचा गाढ परिणाम झाला असल्याने शिव-शक्त्तीच्या एकरूपतेचा विचार या संप्रदायात मांडला जातो. ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतात याचे सखोल विवरण केले आहे. गोरखनाथाच्या सिद्धसिद्धांतपद्धती या संस्कृत ग्रंथानुसार काही मूलसिद्धांत असे :
(१)शक्तियुक्त शिव : आदिनाथ शिव हे अंतिम सत्य आहे. शिवतत्व शक्तियुक्त आहे. शिव-शक्ति भिन्न नसले तरी शक्तिविना शिव काही करू शकत नाही. तो जेव्हा शक्तियुक्त असतो तेव्हा तो जगताचा प्रकाशक होतो. सिद्धसिद्धांत्पद्धतीतील या विचाराचा मोठा विस्तार ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतात केला आहे.
(२) पिंड-ब्रह्मांड एकत्व : जे जे ब्रह्मांडात आहे ते ते सर्व पिंडांत आहे हा दुसरा सिद्धांत. एकाकार शिव अनंतशक्तिमान असून निजानंदात मग्न असतांनाही नाना आकारात विलसतो. शंकराचार्यांच्या मते ब्रह्म सत्य व जग मिथ्या आहे. त्याहून हा विचार निराळा आहे.
(३) जीवनमुक्ती : हटयोगाच्या सहाय्याने मिळते. गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिष्य अमर व पक्व असा देह मिळवतो आणि नंतर त्याला मुक्ती मिळते. यानुळेच नाथसंप्रदायात गुरूला असाधारण महत्व प्राप्त झाले आहे. . गुरू आणि ईश्वर समोर आले तर प्रथम वंदन गुरूला करावयाचे कारण ईश्वर रागावला तर गुरू मदत करेल पण गुरू रागावला तर ईश्वर काहीच करू शकत नाही. महाविष्णूचा अवतार मानले गेलेले ज्ञानेश्वर आपले सर्व कर्तृत्व निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करतात ते यामुळेच. हा गुरूमार्ग आहे.
(४) गोरखनाथाने यमनियमादि अष्टांगयोग वर्णिला आहे पण तो पातंजल योगशास्त्राहून निराळा आहे.कुंडलिनी जागृतीला महत्व असून नाना आसने, बंध, मुद्रा अशा नानाविध यौगिक प्रक्रियांचे सूक्ष्म वर्णन हटयोगप्रदीपिकेत केले आहे.
(५) योग्याच्या आचारवर्णनाचा विचार केला असून कठोर ब्रह्मचर्य, वाक्संयम, आत्मनिष्ठा, मानसिक शुद्धी, सारीरिक शौच, ज्ञाननिष्ठा यावर भर दिला आहे. मद्य व मांससेवनाचा निषेध केला असून मुंडन, उपवास, तीर्थयात्रा, अग्निहोत्र, संन्यास या संप्रदायात निषिद्ध मानल्या आहेत.
प्रमाणग्रंथ :
सिद्धांत आणि साधना सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. त्यांपैकी सिद्धसिद्धांतपद्धती, गोरक्षपद्धती, हटयोगप्रदीपिका,
गोरक्षसिद्धांतसंग्रह इत्यादि मोठ्या प्रमाणात अभ्यासिले जातात.
उपास्यदेवता :
आदिनाथ शिव ही प्रधान उपास्यदेवता असली तरी शाक्त, कापालिक इ. इतर सांप्रदायिकांचाही समावेश नाथासंप्रदायात झाल्याने काली, अंबा आदि शक्तीची रुपे, भैरव, कालभैरव एकलिंग इत्यादि शिवाची रुपेही पुढे
उपास्य देवता म्हणून स्विकारली गेली.
पुण्यक्षेत्रे :
सुरवातीला तीर्थयात्रेची गरज नाही असे सांगितलेगेले असले तरी तीर्थयात्रा ही भावीकाची गरज असते.प्रयाग, अयोद्ध्या, त्र्यंबकेश्वर, द्रारका, हरद्वार, बद्रीनाथ, पुष्कर, अमरनथ, पशुपतीनाथ ही महत्वाची पुण्यक्षेत्रे मानली जातात.
उरलेली माहिती दुसर्या भागात.
शरद
प्रतिक्रिया
26 Dec 2011 - 11:24 am | अर्धवटराव
ओह्ह.. मला आधि वाटायचं कि या संप्रदायात भगवान दत्तात्रय उपास्य दैवत आहे...
अर्धवटराव
26 Dec 2011 - 7:35 pm | मूकवाचक
नाथ सम्प्रदायात भगवान दत्तात्रय गुरूस्थानीच आहेत.
(महाराष्ट्रातील नाथसम्प्रदायी सन्तान्ची उपास्यदैवते (इष्टदैवते) अनेकविध होती. उदा. एकनाथ महाराज - दत्त, विदर्भातील देवनाथ - मारूती, ब्रह्मचैतन्य गोन्दवलेकर महाराज - राम, चिन्चवडचे मोरया गोसावी - श्रीगणेश, विसोबा खेचर - शिवभक्त इ.)
सन्दर्भः सोहम साधना - पन्थराज (लेखक - श्री. म. दा. भट)
28 Dec 2011 - 12:44 pm | चैतन्य दीक्षित
गोंदवलेकर महाराजही नाथपंथीय होते ही नवीन माहिती.
(हे नक्की खरे आहे का? असा प्रश्न अजूनही आहेच....)
असो, लेख छान व माहितीपूर्ण आहे.
28 Dec 2011 - 2:36 pm | मूकवाचक
गोन्देवलेकर महाराज आणि नाथ पन्थ या विषयात प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मूळ सन्दर्भ श्री. म. दा. भट यान्च्या तिथे उल्लेख केलेल्या पुस्तकातून जसाच्या तसा दिलेला आहे.
जालावर हे सापडले: http://gondavalekarmaharaj.com/tukamai.htm
इथेही दुसर्या परिच्छेदात ब्रह्मचैतन्य महाराजान्चे सद्गुरू तुकामाई हे नाथपन्थी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
26 Dec 2011 - 11:50 am | कवितानागेश
या पंथात सर्वानी गिरिनार पर्वतावर जाउन श्री दत्तगुरुंकडूनही दीक्षा घेतल्याचा उल्लेख आहे.
:)
26 Dec 2011 - 2:40 pm | रणजित चितळे
मला खूप दिवस वाचायचे होते नाथ संप्रदायाबद्दल. बरे झाले आपण येथे दिलेत. (काथ्याकूटात का ते कळले नाही). १८ सिद्ध चेन्नईचे ज्यांचे अगस्त्य ऋषी हे आदी सिद्ध होते ते पण नाथ पंथातलेच ना.
26 Dec 2011 - 9:20 pm | शरद
(१) सर्वांना दत्ताने दीक्षा दिली.... अंशत : खरे. मत्स्येंद्रनाथ, जालंदर, इ. ३-४ जणांना दिली. त्यातही मत्स्येंद्रनाथांना शिवाच्या सांगण्यावरून. नवनाथभक्तिसार या ग्रंथात गिरीनार पर्वताचा उल्लेख नाही. तरीही उपास्य देवतांमध्ये दत्ताचा उल्लेख आढळत नाही हे आश्चर्यकारक वाटते. हल्ली नवनाथभक्तिसार या ग्रंथाचे वाचन करतांना दत्ताची तसबीर लावण्याची पद्धत आहे. एक शक्यता अशी की नाथसंप्रदाय हा शैव असल्याने उपास्य देवतांत शिव आणि शक्ती (वा त्यांची रुपे) यांचाच समावेश केला गेला असावा. दत्त संप्रदाय हा महाराष्ट्रात (व थोड्या प्रमाणात दक्षिणेत) लोकप्रिय असल्याने उत्तरेत उपास्य देवता म्हणून त्याची गणना केली गेली नसावी (हा माझा एक अंदाज).
(२) उत्तरेतील नाथपंथीय सिद्धांना "नाथसिद्ध" म्हणतात तर दक्षिणेतील सिद्धांना "शैव सिद्ध". दोन्ही पंथांत विचारसरणीत साम्य असून काही नावेही मिळतीजुळती आहेत. तामिळनाडूतील सिद्धांनी तामिळ भाषेत वैद्यक ,नक्षत्रविज्ञान, रसायन, सामुद्रिक इ. विषयांवर पुस्तके लिहली आहेत.
(३) इतर प्रतिसादांवर माहिती दिली गेली आहेच.
शरद
26 Dec 2011 - 9:54 pm | मदनबाण
हल्ली नवनाथभक्तिसार या ग्रंथाचे वाचन करतांना दत्ताची तसबीर लावण्याची पद्धत आहे.
एक वाचनिय दुवा.
26 Dec 2011 - 2:47 pm | गवि
ज्ञानेश्वरांचा उल्लेख वर आला आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ हे नाथपंथातले होते असं ऐकण्यात आलं होतं. हे खरं आहे का? "नाथ" हे तिन्ही भावांच्या नावांच्या शेवटी लावल्याचेही कुठेकुठे ऐकले होते. ज्ञाननाथ, सोपाननाथ वगैरे. चुभूदेघे. पण हे सर्व नाथपंथीय होते का?
स्त्रियांचे या पंथात काय स्थान होते?
पावसच्या स्वामी स्वरुपानंद आश्रमात मुख्य मंदिराच्या मंडपात सर्व भिंतींवर नाथांचे अवतार आणि माहिती लिहिलेली आठवते. सध्याचे ठाऊक नाही. स्वरुपानंदही नाथपंथाचे आचरणकर्ते होते का?
उसाच्या रसाच्या दुकानांना (रसवंती गृहांना... गुर्हाळांना नव्हे) नेहमी नाथांपैकी एखादे नाव असते हेही जाताजाता नोंदवू इच्छितो. कारण ठावूक नाही. लेख रोचक आहे.
26 Dec 2011 - 7:28 pm | मूकवाचक
ज्ञाननाथ, सोपाननाथ वगैरे. चुभूदेघे. पण हे सर्व नाथपंथीय होते का? - हो. निवृत्तीनाथ हे गहिनीनाथान्चे शिष्य आणि ज्ञानदेवान्चे दीक्षागुरू.
स्वरुपानंदही नाथपंथाचे आचरणकर्ते होते का? - हो (गणेशनाथ उर्फ बाबामहाराज वैद्य हे त्यान्चे दीक्षागुरू)
प. पू. बाबा महाराज आर्वीकर यान्च्या समग्र साहित्यातून, प्रामुख्याने दिव्यामृतधारा या ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावरील प्रतिपद टीकेतून नाथ सम्प्रदायाचेच तत्वज्ञान मान्डलेले आहे.
(नाथ सम्प्रदायविषयक सविस्तर माहितीसाठी http://atmaprabha.com/index.htm या साईटवरून पीडीएफ डाउनलोड करा.)
27 Dec 2011 - 8:43 pm | तुषार काळभोर
महाराष्ट्रातील बव्हंशी रसवंतीगृहांचे चालक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आहेत. त्यातही बोपगाव, भिवरी,ही गावे प्राधान्याने आहेत. (ही गावे सासवड - कोंढवा रस्त्यावर आहेत.) तर, हे बोपगाव कानिफनाथांचे समाधी स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असल्याने कानिफनाथ हे बहुतेक सर्व रसवंति-गॄहचालकांचे पूजनीय दैवत आहेत. म्हणून सर्व रसवंतिगॄहांची नावे कानिफनाथ-नवनाथ अशी असतात. तर चालकांची नावे काळे, जगदाळे, फडतरे, झेंडे, अशी असल्याचे दिसून येईल.
26 Dec 2011 - 7:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, वाचतोय. माहितीपूर्ण लेखन.
-दिलीप बिरुटे
26 Dec 2011 - 8:12 pm | मदनबाण
डॉ. ढेरे यांच्या मताप्रमाणे कदलीवन म्हणजे दक्षिणेतील श्रीशैल मल्लिकार्जुनाचा परिसर.
हो, हेच ते कदलीवन (कर्दळीवन).कदली =केळ्याचे झाड्.माझे तिर्थरुप कदलीवनात जाउन आलेले आहेत.
गुरुचरित्राच्या ५१ अध्यायात या वनाचा उल्लेख असुन नॄसिंहसरस्वती कदलीवनास प्रस्थान करतात असा उल्लेख आढळतो.
उसाच्या रसाच्या दुकानांना (रसवंती गृहांना... गुर्हाळांना नव्हे) नेहमी नाथांपैकी एखादे नाव असते हेही जाताजाता नोंदवू इच्छितो.
हो. कारण ही मंडळी (फडतरे ) ही नाथसंप्रदाय मानणारी असल्याने बर्याच रसवंती गॄहांचे नाव हे नाथपंथीय असते. हा प्रश्न मी कोकणात गेल्यावर गुहागर एसटी स्टॅडवर असलेल्या रसवंती गॄहाच्या मालकांना विचारला होता.
27 Dec 2011 - 9:42 pm | विकास
नाथसंप्रदायाबद्दल फारच कमी माहिती होती ती या दोन भागांमुळे मिळत आहे. धन्यवाद!
एक प्रश्नः दहाव्या-अकराव्या शतकात भारतात बौद्ध धर्माचा पाडाव झाला असला तरी त्यातील तांत्रिक विचारसरणीचा प्रभाव अनेकांवर पडला होता.
यातील ऐतिहासिक भागाबद्दल अधिक (वेगळ्या लेखात) लिहीता येईल का?
1 Jan 2012 - 5:31 pm | अमोल मेंढे
संत कबीर नाथ पंथी होते?
गुरु गोबिंद दोउ खडे
काके लागु पाय?
बलीहारी गुरु जाउ
गोबिंद दियो बताय|
संत कबीर