नाथसंप्रदाय (२)
आज पंथातील 'शाखाभेद" व 'प्रभाव आणि कार्य" यांची ओळख करून घेऊ.
शाखाभेद :
प्रत्येक महत्वाच्या विचारसरंणीत स्थल, काल, व्यक्तिविशेष व व्यक्तिविचार यांमुळे भेद निर्माण होतात. नाथपंथातही अशा बारा शाखा निर्माण झाल्या. .या शाखा गोरक्षनाथापासूनच प्रचलित आहेत. यांमध्ये फार तात्विक मतभेद आहेत असे म्हणावयाचे कारण नाही व असे भेद इथे नोंदविणे शक्यही नाही. मी आज फक्त नाव, मूल प्रवर्तक,स्थान व प्रदेश देत आहे. (चौकटीत कसे देतात ते अजून शिकावयाचे आहे!)
(१) सत्यनाथी सत्यनाथ पाताल-भुवनेश्वर ओडिसा
(२) धर्मनाथी धर्मराज दुल्लु लक नेपाळ
(३) रामपंथ रामचंद्र चौकतप्पे पंचीरा गोरखपूर
(४) नाटेश्वरी लक्ष्मण गोरखटीला पंजाब
(५) कन्हड गणेश मानकरा कच्छ
(६) कपिलानी कपिलमुनी गंगासागर बंगाल
(७) बैरागपंथ भर्तृहरी रत ढोंडा पुष्कर (राजस्थान)
(८) माननाथी गोपीचंद जोधपूर महामंदीर राजस्थान
(९) आईपंथ भगवती विमला जोगी गुंफा बंगाल
(१०) पागलपंथ चौरंगीनाथ
(११) ध्वजपंथ हनुमान
(१२) गंगानाथी भीष्म पितामह जखवार पंजाब
वरील माहितीचा फारसा उपयोग नाही. एवढेच कळते की प्रसार फक्त उत्तर हिन्दुस्थानात आहे.अफगाणिस्थान पासून बंगाल व नेपाळ पासून विदर्भापर्यंत सर्वत्र नाथ संप्रदायाचा झेंडा फडकला होता. दक्षिणेतील पंथाला शैवसिद्ध म्हणतात. दोहोंची विचारसरणी सारखीच आहे. काही नावेही दोन्ही पंथांत समान आहेत.वामाचारी तांत्रिक साधनेचा सामना करणे हेच प्रमुख ध्येय.
प्रभाव आणि कार्य :
वज्रयान, सहजयान,शाक्त, कापालिक इ. वामाचारी तंत्रसाधनांविरुद्ध गोरखनाथाने आंदोलन उभे करून धर्माचे शुद्धिकरण केले. पण पुढे त्तंत्रिक नाथपंथात घुसले व त्यांनी आपल्यापूर्वीच्या पद्धती या पंथातही सुरूच ठेवल्या. त्यामुळे गोरखनाथाचा खरा वारसा चक्रधर, ज्ञानेश्वर,अल्लमप्रभू, कबीर, नानक यांसारख्या संत पुरुषांनीच चालू ठेवला असे म्हणावयास पाहिजे.
वामाचारी साधनांविरुद्ध लढा उभारून सात्विक धर्मधारणेला पाठिंबा देऊन नाथपंथाने भारतातील वातावरण शुद्ध ठेवण्याचे बहुमोल काम १०व्या-११व्या शतकांत केले. आत्मप्रामाण्याची प्रतिष्ठा, चित्तशुद्धीवर भर, बाह्यावडंबराला विरोध, शरीराचे साधनेतील महत्व, ही या पंथाची वैशिष्ट्ये. योगाला महत्व दिले तरी भक्तीला
नाकारले नाही. चित्तशुद्धीबरोबर आचारधर्मालाही महत्व दिले. स्त्रीला साधनेचे स्वातंत्र्य दिले पण मठात अनाचाराचा प्रवेश होऊ दिला नाही.
हा पंथ सर्वसामान्य जनतेला जवळचे मानत असे. शंकराचार्यांचा धर्मप्रसार उच्चवर्णीयांच्या पुरता मर्यदित होता. त्यांच्या मठात सामान्य जनतेला प्रवेश नव्हता म्हटले तरी चालेल. त्यांनी लांबून दर्शन घ्यावयाचे.
उलट नाथपंथीय जोगी सर्वसामान्यांत मिळून मिसळून असत. बहुतेक गावागावातून वस्ती करत. सर्वांकडचे अन्न त्यांना चालत असे. धार्मिक समानता ही या पंथाची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणावयास पाहिजे.
निर्गुणोपासना ही कबीर व नानक यांची शिकवण नाथपंथातून आलेली. महाराष्ट्रात गहिनीनाथ-निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वर अशी परंपरा असली तरी ज्ञानेश्वरांनी आपल्या सर्वसमावेशक भूमिकेनुसार शिवाबारोबर विठ्ठलाला महाराष्ट्राचा लोकदेव म्हणून स्विकारले व वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान दिले. कर्नाटकात लिंगायतांनी अशीच विचारधारा स्विकारली.
आज दुर्दैवाने पंथाची स्थिती फार चांगली म्हणता येणार नाही. अनेक दोष पंथात शिरले आहेत. हजार वर्षांनी नवीन गोरक्षनाथाने परत अवतार घेतला पाहिजे !
शरद
प्रतिक्रिया
27 Dec 2011 - 9:26 pm | मदनबाण
बैरागपंथ भर्तृहरी रत ढोंडा पुष्कर (राजस्थान)
हे तेच भर्तृहरी आहेत काय ? जे उज्जैनचे (अवंतिका नगरी) राजा होते. मी लहानपणी उज्जैनला गेलो असताना भर्तृहरी गुंफा पाहिलेल्या आहेत.
बाकी नाथ संप्रदाय आला की मुख्यता उल्लेख येतो तो म्हणजे शाबरी विद्येचा आणि मंत्रांचा.गोरक्ष नाथांनी शाबरी विद्या प्रचारात आणली.
अनेक वेळा या मंत्रांन मधे फुरो वाचा,इश्वरी वाचा, हनुमान रखवाला इं शब्द येतात. विविध देवतांना प्रसन्न करुन घेउन त्या त्या मंत्रास सहाय्यभूत होण्यासाठी आव्हाहन केल्याने, विवध देवदेवतांची नावे या शाबरी मंत्र विद्येत आढळुन येतात. नवनाथ भक्तिसारात याचा उल्लेख आढळुन येतो.
ध्वजपंथ हनुमान
या वरुन एक गोष्ट आठवली ती म्हणजे मारुती हे विजयाचे प्रतिक आहे. महाभारतात अर्जुनाच्या रथावर (ध्वज पताकेवर) मारुती होता.
27 Dec 2011 - 9:54 pm | मूकवाचक
१. शंकराचार्यांचा धर्मप्रसार उच्चवर्णीयांच्या पुरता मर्यादित होता.
२. आचार्यमत (अद्वैत/ तथाकथित मायावाद) आणि ज्ञानेशमत (चिद्विलासवाद) हे वेगवेगळे सिद्धान्त आहेत.
- या दोन्ही विधानान्चे सविस्तर खन्डन 'आद्य शन्कराचार्य - वेध एका महावताराचा' (लेखकः स. कृ. देवधर, मेघ:श्याम सावकार) या पुस्तकात आहे.
---
आज दुर्दैवाने पंथाची स्थिती फार चांगली म्हणता येणार नाही.
- 'नाथ', 'स्वामी', 'परमहन्स' वगैरे बिरूदे मिरवणारे भ्रष्ट लोक गोरक्षकालापासून सगळ्याच कालखन्डात होते. एकीकडे नाथपन्थाचे सत्कार्यही अविरतपणे सुरूच आहे. नाशिकचे गजानन महाराज गुप्ते - कविवर्य 'बी' यान्चे बन्धू (१८९२ - १९४६), पावसचे स्वामी स्वरूपानन्द (महानिर्वाण १५/०८/१९७४ रोजी), माचणूरचे बाबा महाराज आर्वीकर (कार्यकाल १९५४ - १९७१) हे अलीकडच्या काळातील महाराष्ट्रात वास्तव्य असलेले थोर सन्त नाथपन्थी होते.
27 Dec 2011 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, नाथसंप्रदायाचा भाग खूप आटोपता घेतला असे वाटले.
बाकी, अन्य संकेतस्थळावरील एक चर्चा.
-दिलीप बिरुटे
27 Dec 2011 - 10:45 pm | पार्टनर
शरद,
तुमचे अनेक धन्यवाद या सुंदर लेखमालेबद्दल.
-पार्टनर
27 Dec 2011 - 10:46 pm | नीलकांत
नाथपंथाबाबत आधीपासूनच गूढ वलय आहे असं वाटते. गावातून अंगावर रूद्राक्षाच्या मोठमोठ्या माळाघालून फिरणारे योगी पाहून लहानपणी भिती वाटायची. ते घरोघरी मागायचे नाही. कुणी मध्ये दिलं तर घ्यायचे. असं आठवतं.
पुढे नाथ पंथ आणि शाबरी मंत्रांशी ओळख झाली ती इंदूरच्या श्री भैय्यु महाराजांची भेट झाल्यावर. ते नाथ पंथी आहेत आणि शाबरी मंत्र जाणतात असं त्यांच्या बाबत ऐकलेलं आहे. आधीच्या लेखात सांगीतल्याप्रमाणे भैय्युमहाराजांच्या आश्रमात श्री दत्तप्रभुंचे मोठे महत्व आहे. आणि त्यासोबतच त्यांच्या गुरूंचे सुध्दा आहे. दत्त हे सर्वांचे गुरू आहेत असं हा संप्रदाय मानतो असं ऐकलेलं आहे. ( हे सगळं ऐकीव आहे. कुठे वाचलेलं नाही.)
गेल्या दहा वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील निमकर्दा( ता. बाळापुर) येथे श्री भैय्युमहाराजांच्या प्रयत्नाने श्री विश्वनाथ शांती शोध आश्रम उभा केला जात आहे. या आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नाथ संप्रदायासंबंधी सर्व उपलब्ध माहिती गोळा करण्याचा व ती माहिती या विषयावर शोध घेणार्या संशोधकांना, उपासकांना पुरवण्याचा त्यांचा संकल्प आहे. काही वर्षांपुर्वी या आश्रमात जाण्याचा योग आला होता तेव्हा बांधकाम सुरू होते. कुणाला अधिक माहिती हवी असल्यास शोधून देता येईल.
तसेच पहिल्या भागात उल्लेख झालेले देवनाथ महाराजांचे संस्थान(अंजनगाव सुर्जी) सुध्दा पाहून आलेलो आहे. आता श्री जितेंद्रनाथ महाराज या आश्रमाची धूरा सांभाळत आहेत. अत्यंत विद्वान आणि तेजस्वी असं व्यक्तीमत्व आहे या महाराजांचं. आश्रम आणि त्यांचे शिष्य यांची आपसातली बांधणी अतिशय मजबुत असल्याचं जाणवतं. माझा मित्र कायम जात असतो. मी केवळ एकदोनदा जाऊ शकलो आहे.
तुमच्या या लेखामुळे केवळ ऐकीव किंवा तुटक माहिती असलेल्या विषयाबद्दल अधिक चांगली आणि सुसंगत माहिती मिळाली.
काही शंका -
१) दत्तप्रभुंची महाराष्ट्राबाहेर कुठे उपासना केली जाते का? (महाराष्ट्राचा सिमा भाग वगळता असं विचारायचं आहे.)
२) योगाच्या सामर्थ्यावर नाथपंथी शरीरावर प्रचंड नियंत्रण मिळवतात असं ऐकलं आहे. याबाबत अधीक माहिती देता येईल का? केवळ हटयोग नव्हे तर त्यापुढेही काही..
३) शाबरी मंत्रांबाबत अधिक सांगता येईल का?
४) नेपाळ व उत्तर प्रदेशात अनेक नाथपंथीयांच्या वेगवेगळ्या कथा सांगीतल्या जातात. त्यांची भविष्यवाणी आणि अन्य बाबतीत. खाली दक्षिणेत यांचा प्रसार झालेला दिसत नाहि.
५) नाथांतील नवनाथ नेमके कोण?
६) ऊसाच्या चरकाचे व नाथांचे नाते नेमके काय?
- नीलकांत
28 Dec 2011 - 10:57 am | मदनबाण
दत्तप्रभुंची महाराष्ट्राबाहेर कुठे उपासना केली जाते का?
मध्य प्रदेशात इंदुर येथे दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तुम्ही फोनवले होते तेव्हा मी त्याच उत्सवासाठी तिथे गेलो होतो.
३) शाबरी मंत्रांबाबत अधिक सांगता येईल का?
या बाबतीत अधिक माहिती नवनाथ भक्तिसार मधे वाचायला मिळेल.
शाबरी विद्येच्या बळावर वाताकर्षण्,संमोहनास्त्र इं अस्त्रे नाथांनी वापरलेली आढळतात.
अनेक गूढ प्रकारचे शाबरी मंत्र असुन शारिरीक व्याधींवर सुद्धा अनेक मंत्र आहेत... अगदी विंचु दंश झाल्यावर ते विष उतरण्यासाठी सुद्धा मंत्र या शाबरी विद्येत आढळुन येतात.
मी वरच्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणेच या मंत्रात बर्याच वेळा फुरो मंत्र, इश्वरो वाचा, हनुमान रखवाला /हनुमान वीर की शक्ती ,गुरु की शक्ती हे शब्द प्रयोग बर्याच वेळा आढळुन येतात.
हे मंत्र कुठले हे जाणुन घेण्यासाठी हे वाचा. (पान क्रमांक ६७)
शाबरी मंत्र अतिशय प्रभावी असल्याचे मानले जाते,तसेच बहुतेक तंत्रा मध्ये सुद्धा याचा वापर होत असावा.
४) नेपाळ व उत्तर प्रदेशात अनेक नाथपंथीयांच्या वेगवेगळ्या कथा सांगीतल्या जातात. त्यांची भविष्यवाणी आणि अन्य बाबतीत. खाली दक्षिणेत यांचा प्रसार झालेला दिसत नाहि..
हो दक्षिण भारतात याचा प्रसार जास्त झाला नसावा असेच दिसते,दक्षिणेत कार्तिकस्वामी (शंकाराचा पुत्र्)यांचे पुजन जास्त आढळुन येते.
५) नाथांतील नवनाथ नेमके कोण?
1.मच्छेंद्रनाथ 2.गोरखनाथ 3.जालंधरनाथ 4.नागेश नाथ 5.भारती नाथ 6.चर्पटी नाथ 7.कनीफ नाथ 8.गेहनी नाथ 9.रेवन नाथ
६) ऊसाच्या चरकाचे व नाथांचे नाते नेमके काय?
याचे उत्तर या लेख मालिकेच्या मागच्या भागात काही प्रतिसादात दिलेले आहे.
28 Dec 2011 - 2:19 pm | कवितानागेश
दत्तप्रभुंची मंदीरे दक्षिणेत पाहिली आहेत.
पण तिथे उपासना कशी केली जाती हे नक्की माहित नाही.
28 Dec 2011 - 11:03 am | प्यारे१
एक निरंजन को मै जानू गुरुजी दुजे को नही जानू अशी काहीशी नाथसंप्रदायातली रचना फार सुंदर आहे.
शौनक अभिषेकींनी गायलेली टीव्हीवर पाहिली.
28 Dec 2011 - 2:50 pm | चैतन्य दीक्षित
दूजे के संग नही जाऊ जी ! अशी ती रचना आहे.
कुमार गंधर्वांच्या आवाजात, त्यांची कन्या कलापिनी कोमकली यांच्या आवाजात हे निर्गुणी भजन ऐकलं आहे.
अतिशय सुरेख भजन आहे हे!
28 Dec 2011 - 1:10 pm | सदानंद ठाकूर
चांगली माहिती दिली आहे.
28 Dec 2011 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार
बरेच दिवस ह्या विषयावरती माहिती वाचायचीच होती. ती तुम्ही साध्या सोप्या प्रकारे उपलब्ध करून दिलीत, त्या बद्दल धन्यवाद. प्रतिसादांमधून देखील खूप छान माहिती समजली.
'सिद्धावस्था वा अवधूत अवस्था' ह्या बद्दल थोडे सविस्तर लिहाल काय ?
29 Dec 2011 - 6:42 am | कुळाचा_दीप
29 Dec 2011 - 6:22 pm | स्वाती२
लेखमाला आवडली. प्रतिसादही माहितीपूर्ण. आमच्या ओळखीचे एकजण नवनाथांचे भक्त होते. त्यांच्याबद्दल एकाच वेळी कुतुहल आणि भीती वाटायची एवढेच आता आठवते.
29 Dec 2011 - 7:55 pm | पैसा
या विषयावर आणखी वाचायला आवडलं असतं. प्रतिसादातूनही बरीच माहिती मिळाली.
1 Jan 2012 - 6:02 pm | अमोल मेंढे
ओम श्री कामरुप कामाख्या देवी,
जहा बसे इस्माईल जोगी,
इस्माईल जोगी ने दिया पान का बीडा,
पहला बीडा आती जाती,
दुजा बीडा दिखावे छाती,
तिजा बीडा अंग लिपटाई,
चौथा खाये पास चली आयी,
मेरी भक्ती , गुरु की शक्ती..........
पुढचे आठवत नाही...
हा वशीकरण मंत्र आहे हे मिपा च्या चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच