आठवणीने दे !!
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे ,
क्षितिजावर लुकलुकणारा एक तर मात्र आठवणीने दे !!
ढगांनी भरलेले आभाळ नाही मागत तुझ्याकडे ,
थेंबा थेंबा ने बरसणारा एक ढग मात्र आठवणीने दे !!
बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे ,
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे !!
बेधुंद करणाऱ्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे ,
जाताना एक मोगऱ्याची कळी मात्र आठवणीने दे !!
उसळणारा बेछूट समुद्र नाही मागत तुझ्याकडे ,
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे !!
लखलखणाऱ्या दिव्यांची माळ नाही मागत तुझ्याकडे ,
सप्तरंग दाखवणारी एकच किरण शलाका मात्र आठवणीने दे !!
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नाही मागत तुझ्याकडे ,
तुझ्या मनात ध्रुव ताऱ्याची जागा मात्र आठवणीने दे !!
भिजवणारा डोळ्यातील घन ओला नाही मागत तुझ्याकडे ,
बंद डोळ्यातील एक थेंब मात्र आठवणीने दे !!
तुझ्या भेटीचे आश्वासन नाही मागत तुझ्याकडे ,
तू भेटून गेल्याचे एक स्वप्नं मात्र आठवणीने दे ! !
जगाशी लढण्याचे धैर्य , नाही मागत तुझ्याकडे
जगाचा विसर पडावा अशी जवळीक मात्र आठवणीने दे !!
हे क्षणभंगुर आयुष्य नाही मागत तुझ्याकडे ,
मी नसताना आकाशाकडे एक नजर मात्र आठवणीने दे !!
माझ्या आठवणीने गहिवरलेले श्वास नाही मागत तुझ्याकडे ,
नाव माझे पुसताना टाकलेला एक उसासा मात्र आठवणीने दे !!
मुठीएवढे तुझे हृदय नाही मागत तुझ्याकडे ,
माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे !!
प्रतिक्रिया
26 Dec 2011 - 12:23 pm | मनिष
आवडली. मस्त आहे!!
इथे 'तारा' हवे ना?
26 Dec 2011 - 12:59 pm | पक पक पक
छान कविता आहे, खुप आवडली....एकदम मस्त....
26 Dec 2011 - 5:23 pm | निनाव
१ नंबर!
26 Dec 2011 - 6:20 pm | वाहीदा
खुपच सुंदर !!
26 Dec 2011 - 7:47 pm | इन्दुसुता
अतिशय आवडली.