- # हाच लेख मीमराठी.नेट येथे प्रकाशित झालेला आहे.
- # हा लेख लिहताना शास्त्रीय माहिती अथवा त्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करता माझ्या नजरेतून जे मी पाहिले ते लिहले आहे.
प्रस्तावना :
एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा शांत राहत नाही, असेच एक वेडं मला मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे काहीतरी सापडले ते म्हणजे पाषाणावर खोदलेले / रेखाटलेले चक्रव्यूह पाहताना, अगदी असेच नसले तरी त्याच्याशी मिळते जुळते काहीतरी मी पाहीले होते, पण कोठे हे काही केल्या आठवत नव्हते, मग त्याचा शोध घेणे चालू केले, जुन्या ट्रिपचे फोटो पाहिले, नेटवर शोधले पण काहीच हाती पडेना पण तोच काहीतरी शोधताना काहीतरी सापडावे असे घडले, एक चित्र मला सोनालीने दाखवले व नंतर तेथेच शोध घेतल्यावर जे दिसले ते अद्वितीय होते, हैलेबिडु येथे असलेल्या पुरातन मंदिराचे फोटो कोणीतरी पिकासावर अपलोड केले होते. फोटो पाहिले थोडी शोधा शोध घेतल्यावर समजले येथून (बेंगलोर पासून) जवळ नसले तरी लांब देखील जास्त नाही हे स्थळ.
माझ्या सारखाच अजुन एक वेडा, माझ्या ऑफिसमध्येच आहे, पण कामामुळे आम्ही दोघे एकत्र भटकायला बाहेर पडू शकत, पण सगळे योग जूळून आले व अचानक शनिवारी पहाटे या प्रवासाला निघायचे असे ठरले सुद्धा. त्यांने नवीन बाईक घेतली आहे, बजाज अव्हेंजर. व त्याच प्रकारची माझी बाईक होती यामाहा एनटायसर, त्यामुळे लांबच्या बाईक प्रवासाचा अनुभव कामी आला. सकाळी ६ वाजता आम्ही बेंगलोरू मधून बाहेर पडलो. जास्त काही त्रास न घेणे हा एकमेव उद्देश ठेऊन बाईकचे स्पिड फिक्स ६० किमी / तास असे आम्ही दोघांनी ठरवले व पुर्ण प्रवास त्याच वेगाने केला. (जीवनात पहिल्यांदा कुठल्यातरी गोष्टीवर सुरवाती पासून शेवट पर्यंत कंट्रोल ठेवला)
प्रवासाला निघताना आम्हाला कल्पना नव्हती की आपण काय पाहणार आहोत व त्याचे महत्त्व काय. १००० वर्षापेक्षा जास्त काळात देखील, आसमानी व सुलतानी कहर झेलून दिमाखाने उभे असलेल्या व भारताच्या स्थापत्यकलेचा उज्ज्वल इतिहास संभाळून ठेवणार्या ३ भव्य व दिव्य अश्या स्थळांचे दर्शन आम्ही अचानक घेऊ, हे ध्यानीमनी देखील नव्हते पण सर्व अचानक ठरत गेले व प्रवास सूरू झाला..
स्थळ : हैलेबिडु
जिल्हा : ह्सन, कर्नाटक
कसे जावे : बाईक वरून २४० कि.मी. बेंगलोरू हून. जवळचे रेल्वे स्टेशन हसन व एअरपोर्ट बेंगलोरू.
द्वारसमुद्र, होयसाळ / होयसाल साम्राज्याची राजधानी. ईस्वीसन १००० ते १४०० हा काळ त्या साम्राज्याचा सुवर्णकाल होता. या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची व अनेक वास्तुशिल्पांचे निर्माण सातत्याने होत राहिले. पृथ्वीवरील स्वर्गाची निर्मिती केले होयसाळ / होयसाल सामाज्याने. द्वारसमुद्र व बेल्लूर यांना पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणले जात असे. पुर्ण दख्खन (कर्नाटक) व तामिळनाडूवर होयसाल साम्राज्य पसरले होते.
ई.स. १००० च्या आधी त्या व आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर जैन धर्माचा प्रचंड प्रभाव होता, तो प्रभाव मोडून काढून पुन्हा हिंदू साम्राज्य उभे करण्याचे श्रेय या होयसाळ / होयसाल राजांना जाते, त्यांनी त्या भागावरील जैन धर्माचा प्रभाव जवळजवळ पुर्ण नष्ट केला व आपल्या अद्भुत व देखण्या होयसाल स्थापत्य कलेतून अनेक मंदिरे उभी केली, जुळी मंदिरे या प्रकार देखील त्यांनी सुरू केला ( याची माहिती पुढे येईल). द्वारसमुद्र मध्ये असलेली व होयसाळ / होयसाल राजांनी निर्माण केलेली ही मंदिरे प्रामुख्याने शिव मंदिरे आहेत.
मलिक काफुर व मोहंम्मद बीन तुगलक, यांनी या साम्राज्यावर आक्रमण केले, सर्वात आधी दिल्ली सुलतानाच्या आदेशाने मलिक काफुर ने १३११-१३१५ च्या आसपास होयसाळ / होयसाल सम्राजावर आक्रमण केले व शेकडो उंटावरून, सोने व दागिने या साम्राजातून घेऊन गेला पण जाताना त्याने द्वारसमुद्र जवळ जवळ नष्ट केले, मंदिरे पाडली, मुर्त्या नष्ट केल्या व शहर ध्वस्त केले. यानंतर काहीच वर्षानंतर मोहंम्मद बीन तुगलक ने आक्रमण केले व राहिलेले सर्व लुटून नेले व द्वारसमुद्र पूर्णतः: नष्ट केले, त्याच्या तावडीतून काहीच मंदिरे शिल्लक राहिली ती देखील भग्न अवस्थेत.
पृथ्वीवरील स्वर्ग असणारे नगर, मातीत मिळाले, व त्याला नवीन नाव मिळाले हैलेबिडु म्हणजे जुनी राजधानी, एक नष्ट शहर.
३५० ते ४०० वर्ष होयसाळ / होयसाल राजांनी एका मोठ्या भूखंडावर राज्य केले. हे प्रामुख्याने शिव भक्त. यांच्या राज्याचं चिन्ह होते सिंह व योद्धा, त्याकाळी ज्ञात व वापरात असलेल्या तिन्ही लिपी मध्ये त्यांनी अनेक शिलालेख निर्माण केले ज्यामध्ये, तामिळ (जूनी), कन्नड व तसेच मोडी भाषेत. मंदिरामध्ये, विजय / धर्म स्तंभावर तसेच रेखीव संगमरवरी पाषाणावर यांनी विपुल लेखन केले, ज्यामध्ये विजय कथा, साम्राज्यात झालेले फेरबदल, पुराण कथा, देव स्तुती इत्यादी चा समावेश आहे. मंदिर निर्माण साठी त्यांनी स्थानिक पिवळसर दगड (प्रस्तर ?) व पाया व मूर्ती निर्माण साठी काळ्या पाषाणाचा वापर प्रामुख्याने केला.
आता त्या काळात उपलब्ध असलेली दोन मंदिरे शिल्लक व सुस्थितीत आहेत. हैलेबिडु व बेल्लूर. १२ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या दोन प्राचीन शहरातील राहिलेले वैभव. तसे पाहता होयसाळ / होयसाल राजांनी आपल्या साम्राज्यात १५० च्या वर मंदिर निर्माण केलीत पण उल्लेखनीय व स्थापत्य कलेचा नमुना म्हणून हैलेबिडु व बेल्लूर हे महत्त्वाचे आहेत. मंदिरांची वैशिष्ट्य पुर्ण रचना व मांडणी वेगळ्या पद्घतीने केली गेली आहे. तीन द्वार असलेली व एकाच मंदिरात दोन गाभारे असलेल्या जुळ्या मंदिराची संकल्पना येथे राबवली गेली आहे. सर्वात प्रथम आपण हैलेबिडू मंदिर व त्याची रचना पाहू.
हैलेबिडु, असे नाव वापरण्यापेक्षा मी त्या शहराचे प्राचीन नाव पुढे वापरणार आहे जेणेकरून एका वैभवशाली शहराचे नाव आपल्या स्मृतीत कोरले जावे व आपल्या समृद्ध अश्या इतिहासामध्ये एक द्वारसमुद्र नावाचे नगर देखील होते ज्या नगराने देशाला व त्यावेळच्या समाज व्यवस्थेला एक नवीन प्रकारच्या स्थापत्य पद्धतीची, कलेची ओळख जगाला करून दिली याचा विसर पडू नये म्हणून.
तर,
द्वारसमुदचे मंदिर : एका तलावाच्या काठी उभारले गेलेले हे व पुर्ण पाषाणामध्ये निर्माण केले गेलेले हे मंदिर व त्याचे नाव आहे होयसळायेश्वर / होयसलायेश्वर मंदिर. राजघराण्यांचे प्रमुख मंदिर त्या राजघराण्याच्या नावानेच आजही ओळखले जाते. या मंदिराची ४-५ एकर परिसरामध्ये एक मुख्य जुळे मंदिर व आजूबाजूला सलग्न पण भारदस्त अशी ४-५ मंदिरे, समोर नंदी मंडप व (गर्भगृहाच्या समोर) विस्तृत तळे. अशी संरचना होती. आक्रमणानिमित्त प्रमुख मंदिर राहिले व बाकीची सलग्न मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली / केली केली. आता द्वारसमुद्र मध्ये फक्त होयसलायेश्वर मंदिर आहे, पण ते भव्य व दिव्य आहे.
प्रवेशद्वारातून पाहिल्यावर अनेकांना तामिळनाडू मधील महाबलीपुरम (तामिळनाडू, ५०-६० किमी, चेन्नई पासून) मंदिराची आठवण झाली नाही तर नवलच. पण जसे जसे जवळ जाऊ तसा तसा फरक समोर स्पष्ट होत जातात. महाबलीपुरम विषयी नंतर कधीतरी लिहतो. तर होयसलायेश्वर मंदिर हे तीन टप्पात आहे. नजरेत भरतो तो पहिला भाग दर्शनी मंदिराचा. जसे जसे तुम्ही जवळ जाता तसे मंदिर निर्माण करताना वापरलेली कल्पकता समोर येत जाते. ५-६ फुटाच्या मंदिराचा पाया, पूर्णतः इंटर-लॉकिंग सिस्टम ( मराठी शब्द ? ) वापरलेला. जर हे मंदिर वरून पाहिले तर त्यांची रचना स्टार (चांदणी) सारखी आहे.
दुसरा टप्पा, बारा प्रकारचे लेअर (विभाग) असलेल्या भिंती. वेगवेगळ्या प्रकारे भिंती शिल्पे व नक्षी काम केलेले व अनेक पुराण कथा यांचे चित्रण याचा संगम म्हणजे मंदिराचे बाह्य रूप. सर्वात खालील विभागात, गज शक्तीचे प्रदर्शन, नंतर राज्य चिन्ह असलेल्या सिंहाचे व त्यांनंतर वेगळ वेगळ्या आपात्कालीन पद्घतीने नक्षी काम. त्याच्या वरच्या विभागात यक्ष, किन्नर, वाद्य वाजवणारे, नृत्यात मग्न असे नर्तकी व नर्तक यांची दर्शन. १० इंचाच्या आसपास उंची असलेल्या या विभागात, इतक्या बारकाईने कोरीव काम केले आहे की पाहताना दंग व्हावे व समोर पहात असलेले दृष्य आपल्या नजरे समोर घडत आहे असलेले नृत्य असावे असे भासते, अनेक छोट्या छोट्या गोष्टी, नर्तकीच्या पायातील पैंजण, ती च्या गळ्यातील दागिने व डोळे. कलेतून एखादं दृष्य जिवंत होते कसे या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते.
नंतरच्या सातव्या व आठव्या विभागामध्ये (लेअर) पुरातन कथा रेखाटलेल्या आहेत, ज्यामध्ये रामायण व महाभारत प्रामुख्याने आहेत. कर्ण वध, अभिमन्यू वध, युद्ध रचना, आयुधे, रथ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तसेच कृष्ण अवतारातील अनेक कथा येथे दिसतात, बाललीला कालिया मर्दन इत्यादी. प्रत्येक विभागाचे वैशिष्टे अधोरेखित करण्यामागचे कारण हे की त्यांनी जेव्हा मंदिर निर्माण सुरू केले तेव्हा त्यांना काय तयार करायचे आहे, याची स्पष्ट कल्पना होती, रामायणामध्ये महाभारत घुसत नाही अथवा महाभारतात इतर कथा. प्रमुख व महत्त्वपूर्ण कथा व त्यातील पात्र त्यांनी आधीच ठरवले होते, हे पाहताना लक्ष्यात येते. येथे काही गोष्टींचा संदर्भ तुम्हाला जोडावा लागतो, व ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या कथा पुर्ण माहिती असतील अथवा तो पार्ट, त्या कथेतील तो भाग स्पष्टपणे तुम्हाला समजला असेल. याच लेअर (विभागामध्ये ) ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते मला मिळाले. येथे तुम्हाला रावण कैलाश पर्वत उचलताना, कृष्ण - अर्जून अभिमन्यू च्या वधानंतर चर्चा करत असलेले, अर्जून व कर्णाचे भयंकर युध्द त्यांची अस्त्रे, शंकराचा दरबार, शंकराचे नटराज स्वरूप इत्यादी अनेक कथा पहावयास मिळतात.
चक्रव्यूह
ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते चित्र येथे देत आहे. हा फोटो टिम गोवा यांच्या लेखातील आहे.
हा सात लेयर मध्ये (विभागामध्ये) असलेल्या चक्रव्युहाचा नकाशा आहे. (९९.९% मला असे वाटते)
महाभारतातील प्रमुख घटना मधील ही एक घटना तेथे सचित्र कोरलेली आहे व तेथेच अश्याच पद्धतीचे एक भित्तीचित्र मला दिसले. व्युह रचना व त्याचा आकार. आधी मला गोव्यातील ते चित्र म्हणजे शक्यतो सुर्य घड्याळ असावे की काय असे वाटले होते व तसेच मी कोठेतरी पाहिले आहे असे वाटत होते, पण हे भित्तीचित्र पाहिल्यावर लक्ष्यात आले की नाही, हा चक्रव्यूह आहे व हा आपण उत्तर भारतात फिरताना, काही वाचन करताना पाहिलेले आहे.
यानंतरचा लेअर (विभाग) हा नक्षीकामाचा आहे व त्यानंतर मुख्य लेअर (विभाग) येतो तो भित्तीशिल्प याचा.
मी येथे व वरील लेखनामध्ये दोन वेगळे शब्द वापरले आहेत, भित्तीचित्रे व भित्तीशिल्प. दोन्ही प्रकारे दगडामध्ये कोरून कला प्रदर्शन केले जाते पण, दोन्ही मध्ये सौम्य असा फरक आहे, भित्तीशिल्प पुर्ण कोरीव व हाव-भावसह तसेच पूर्णाकृती मूर्ती / मूर्तींची रांग असते, तर भित्तीचित्रे मध्ये कथेला प्राधान्य असते मूर्तीच्या दिसण्यावर नाही (हा फरक मला वाटतो, याचे कुठलेही शास्त्रीय कारण माझ्याकडे नाही आहे).
तर,
मुख्य लेअर (विभाग) मध्ये ३-४ फुट उंचीचे भित्तीशिल्प आहेत, ज्यामध्ये विष्णूची अनेक रूपे, अवतार, ब्रम्ह स्वरूप, शिव स्वरूप गणेश मूर्ती व इतर देवदेवता इत्यादी यांचे दर्शन घडते, येथे एक गोष्ट नोंद घेण्यासारखं आहे, मंदिर हे शिव मंदिर आहे, राजे हे शिव उपासक होते, पण त्यांच्या कलेमध्ये, आवडीमध्ये, फक्त शिव हा अट्टहास नाही आहे, विष्णू व शिव वाद ( जो उत्तर भारतात होता, आहे.) दिसत नाही, ज्या होयसाळ / होयसाल राज्यांनी जैन धर्माची पाळेमुळे खणून काढली दक्षिण भारतातून ( सध्या यांनीच की इतर कोणी याचे उत्तर नाही, कारण याच्या राजधानी पासून म्हणजेच द्वारसमुद्र पासून ९०-१०० किमी दुरवर असलेले प्राचीन जैन धार्मिक स्थळ / पुरातन स्थळ जसेच्या तसे उभे आहे, त्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे.) त्यांनी निर्माण केलेल्या मंदिराच्या भित्तीचित्रे / शिल्पा वर जैन तीर्थंकर देखील दिसतात. एक तर त्यांचा सर्वधर्म समावेशक असा विचार असावा अथवा एखाद्या धर्माचे, पंथाचे मन दुखावणे म्हणजे राजकारण हे कारण असावे.
मुख्य लेअर (विभाग) मध्ये विष्णूचा मक्ता जास्त उठावदार दिसतो, अनेक शिल्पे त्याच्या अवताराची आहेत, वराह अवतारापासून, नरसिंह अवतार व राम अवतार सगळेच तेथे दिसतात, बम्हास्वरूप देखील तेथे कोरलेले आहे त्याच बरोबर अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जी मी इतर भारता अनेक मंदिरे फिरलो पण दुर्गा अवतार /काली अवतार बिंतीशिल्पे मंदिरावर कधी पाहिलेले आठवत नाही, गळ्यात मुंडमाला पासून पायाखाली लोळलेला राक्षस अश्या प्रकारच्या ३-४ शिल्पे तेथे आहेत.
याच लेअर मध्ये, गणेश मुर्ती देखील आहे, पण त्याला प्रमुख द्वारा वर स्थान नाही मिळालेले आहे, पण गणेश मूर्ती ही ब्रह्मा, विष्णू व महेश (शिव) याच्या बरोबरीने तेथे दिसते तसेच, इतर कुठल्या देवाची नाही पण एक ८-९ फुटी उंच गणेश मूर्ती त्याच प्रांगणातून मिळाली होती जी आधी प्रवेशद्वारासमोर होती. अतिशय रेखीव एका पाषाणातून घडवली गेलेली ही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. विष्णूच्या नरसिंह अवताराचा देखील येथे बोलबाला आहे, नरसिंह शिल्पे तर आहेतच, पण नरसिंह स्तंभ व नरसिंह कथा असलेला शिलालेख देखील येथे आहे, शक्यतो याचे कारण साम्राज्याचे प्रमुख चिन्ह सिंह हे होते. अनेक जागी सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत.
सर्व जग डावीकडून उजवीकडे असे भटकते, पण आम्ही मुद्दाम उजवीकडून सुरूवात केली होती, कारण तेथे असलेली गर्दी टाळता यावी व योगायोगाने अनेकवेळा केलेला हा प्रयोग पुन्हा यशस्वी ठरला व मंदिर मनसोक्तपणे हवा तेवढा वेळ बाहेरून पाहता आले. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत, एक मुख्य प्रवेशद्वार व दोन उजवी व डावीकडून प्रवेशद्वार. जे प्रमुख द्वार आहे त्यातून राजघराण्यातील मंडळींना प्रवेश, उजवीकडच्या प्रवेशद्वारातून मंत्री अथवा राजघराण्या समकक्ष लोकांचे प्रवेश द्वार, व डावीकडील प्रवेशद्वार सर्व सामान्य जनतेसाठी होते. उजवी व डावी बाजू पाहिली तर दोन्ही मध्ये कणमात्र फरक करता येत नाही, दोन्ही बाजूची जडण-घडण एकाच पद्घतीने व प्रकाराने केलेली आहे, द्वारपालाच्या मूर्ती पासून चौकटीवर असलेल्या चिन्हापर्यंत सर्व काही एक सारखे. पण राज घराणे ज्या द्वारातून प्रवेश करत असे, त्याची योजना वेगळी व खास पद्घतीने केली आहे.
प्रवेशद्वारापासून काही फुट अंतरावर मंडप आहे, ज्या मंडपात भला मोठा नंदी आहे, भारतात जे अखंड शिळेतून तयार केलेले नंदी आहेत, व जे मी पाहिले आहेत त्यात सर्वात रेखीव असा हा नंदी आहे, तसेच हा भारतातील ४ अथवा पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच नंदी आहे. नंदीद्वारापासून प्रवेश केल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार व आता एक मंडप व त्याच्या समोर गाभारा आहे. मुख्य मंदिरात ५ फुटी उंच व जवळ जवळ ८-९ फुटी रुंदीचे शिवलिंग आहे ( आकार अंदाजे) वर मी लिहिल्याप्रमाणे हे जुळे मंदिर आहे, एकाबाजूला शिवलिंग व एका बाजूला मुर्ती असलेला गाभारा. असे दोन गाभारे आहेत. दोन्ही गाभार्या समोर नंदी आहे, व त्याच्या साठी पाषाण मंडप आहे, जुळे मंदिर हा शब्द देखील याच कारणामुळे वापरला जातो.
हे मंदिराचे पुरावे व शिलालेख सापडले आहेत, त्यात एका भल्यामोठ्या सुर्यनारायणाच्या मुर्तीचा उल्लेख येतो, ज्यात सुर्य नारायण त्यांच्या सात अश्व जोडलेल्या रथातून येत आहेत असे रेखाटले होते, पण ती मुर्ती हरवलेली आहे, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही पश्चिम मुख मूर्ती नंदी मूर्तीच्या बरोबर मागे म्हणजे पूर्वेकडे स्थापन केलेली होती आतील मंडपातील प्रत्येक खांब वेगवेगळ्या कथा सांगतो, जसे नरसिंह कथा, महाभारत कथा. छतावर अत्यंत रेखीव सुबक असे नक्षी काम केले आहे. भिंतीवर कन्नड/तामिळ मध्ये शिलालेख कोरलेले आहेत, वर लिहिल्याप्रमाणे एका गाभार्यात शिवलिंग आहे व दुसर्या गाभार्यात मुर्ती.
क्रमशः
प्रतिक्रिया
29 Nov 2011 - 7:58 pm | प्राजु
वर वर चाळला आहे लेख. चित्रे दृष्ट लागण्याइतकी सुंदर आहेत.
नीट वाचून मग प्रतिक्रिया लिहिन. तोवर जागा राखून ठेवत आहे.
30 Nov 2011 - 9:21 am | मदनबाण
तोवर जागा राखून ठेवत आहे.
तायडु ने अनेक ठिकाणी अशा जागा राखुन ठेवल्या आहेत,त्या सर्व भरल्या की मगं नंबर लावावा म्हणतो ! ;)
29 Nov 2011 - 8:12 pm | पाषाणभेद
काय सुंदर शिल्प आहेत राजे! त्याकाळच्या शिल्पकारांची मेहनतीचे गुण गावे तितके थोडेच.
29 Nov 2011 - 8:43 pm | VINODBANKHELE
रावणा!!!!!!!!!!!!
अभिनंदन,,,,
त्वा स्वर्ग पाहिला........................
29 Nov 2011 - 8:43 pm | VINODBANKHELE
रावणा!!!!!!!!!!!!
अभिनंदन,,,,
त्वा स्वर्ग पाहिला........................
29 Nov 2011 - 8:51 pm | पैसा
इतक्या सुंदर फोटोंसाठी धन्यवाद! त्यांची माहितीसुद्धा खूप छान प्रकारे लिहिली आहे. ही श्ल्पे म्हणजे दगडात गोठलेलं सौंदर्य. त्यांचा नाश कोणीही कसा करू शकतो हेच कळेनासं होतं. फोटो तर अप्रतिमच आले आहेत. अत्यंत क्लिअर आणि सगळे बारकावे नीट टिपले गेलेत.
आमच्या लेखमालिकेतली ती आकृती आहे तिला स्थानिक लोक "चक्रव्यूह" असंच म्हणतात. पण ती वास्तविक महाभारत काळाच्या आधीची आहे. तिच्या आधारे नंतरचे सेनापती चक्रव्यूहाची रचना करत असतील तर देव जाणे!
24 Aug 2013 - 2:17 am | चित्रगुप्त
उत्तम फोटो.
@ पैसा: ...आमच्या लेखमालिकेतली ती आकृती आहे तिला स्थानिक लोक "चक्रव्यूह" असंच म्हणतात. पण ती वास्तविक महाभारत काळाच्या आधीची आहे. ........
वरील विधानात 'चक्रव्यूह' चे शिल्पाचा काळ, आणि 'महाभारताचा' (अर्थात जेंव्हा ते प्रत्यक्षात घडले, तेंव्हाचा) काळ नेमका कोणकोणता आणि तो कोणत्या संदर्भांवरून्/पुराव्यांवरून गृहित धरला आहे, हे वाचायला आवडेल.
24 Aug 2013 - 10:55 am | पैसा
आता अगदी थोडक्यात लिहिते. http://www.misalpav.com/node/17609 या आमच्या लेखात जो चक्रव्युह नाव दिलेला आकार आहे, त्या शिल्पाकृतींचा काळ साधारण नव अश्म युग असा निश्चित केला गेला आहे. म्हणजे आजपासून किमान ७ ते १२ हजार वर्षांपूर्वी कधीतरी. तिथल्या इतर आकृत्या या अगदी प्राथमिक स्वरुपातल्या शिकारी, प्राणी इ च्या आहेत. महाभारताचा काळ हा खूपच सुसंस्कृत लोकांचा झाला. या शिल्पांमधे अशा प्रगत संस्कृतीच्या कोणत्याही खुणा नाहीत. हा विशिष्ट आकार अन्यत्र खूप ठिकाणी सापडला आहे. लेबिरिंथ बद्दल मी तुम्हाला सांगावं असं काही नाही! पण आईच्या गर्भातील बाळ किंवा असा काही संदर्भ इतिहासपूर्व काळापासून या आकाराला लावला गेला असावा.
महाभारताचा काळ हा साधारण ५००० वर्षांपूर्वीचा असा आतापर्यंतचा समज होता. अर्थात या दोन्हीच्या काळाबद्दल नवीन संशोधन होतं तसे बदल होत आहेतच पण इतक्या प्राथमिक स्वरूपातील प्रस्तर शिल्पे, आकृत्या माहाभारत काळापूर्वीची आहेत यात काही संशय नाही. आपल्याकडे अनेक ठिकाणच्या शिल्पांना, देवळांना पांडवांनी तयार केली अशा कथा लोकांनी चिकटवल्या आहेत. तसाच प्रकार होऊन या आकृतीला चक्रव्युहाचे नाव दिले गेले असावे किंवा या आकृतीचा उपयोग करून नंतरच्या काळात चक्रव्युहाची कल्पना उदयाला आली असावी.
29 Nov 2011 - 8:56 pm | सोत्रि
ओक्के,
शीर्षक वाचून मला वाटले की 'त्रिकोणाच्या कविते'बरोबर आता लेखही आला की काय, पण नाही.
सुंदर शिल्पं आणि मस्त फोटोज!
- (गोल) सोकाजी
29 Nov 2011 - 9:01 pm | गणपा
फोटों ईतकाच लेखही देखणा झाला आहे.
29 Nov 2011 - 9:50 pm | विलासराव
माहीती आणी शिल्पे दोन्ही आवडले.
तुम्हाला अचानक आलेल्या योगाबद्दल हेवाही.
29 Nov 2011 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा
लेख सावकाशीने वाचेनच...पण खरच कलाकुसर हा शब्द अश्या गोष्टींसाठी नुसता कमीच पडणार नाही तर तो उत्तरकालीन वाटेल...नविन शब्द शोधावा लागेल.... वाचनखुण अर्थातच साठवली गेली आहे...
29 Nov 2011 - 11:07 pm | क्रान्ति
काय अप्रतिम शिल्पकला आहे! फोटो खूप उत्तम आले आहेत. चक्रव्यूह आणि त्याचा नकाशा हे दोन फोटो फारच खास! लेख मनापासून आवडला.
विदर्भात मार्कंडेय ऋषींनी १४०० वर्षांपूर्वी निर्माण केलेलं मार्कंडा येथील मंदिर बरंच अशा स्वरूपाचं वाटलं. आता ते अतिशय जीर्ण अवस्थेत आहे, आणि नक्षलवादी भाग असल्याने [गडचिरोली, चामोर्शी] त्याचा जीर्णोद्धार करण्यात कुणाला फारसं स्वारस्य नाही, असं तिथल्याच रहिवाशांनी सांगितलं ! या ठिकाणी दक्षिणवाहिनी वैनगंगा आपला प्रवाह बदलून उत्तरवाहिनी होते.
30 Nov 2011 - 12:41 am | दशानन
सर्वांचे धन्यावाद.
30 Nov 2011 - 7:05 am | सूड
अतिशय सुंदर शिल्पं आणि माहितीपूर्ण लेख.
30 Nov 2011 - 7:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मालक, फोटो आवडले. लेख सवडीनं वाचीन.
-दिलीप बिरुटे
(बीझी)
30 Nov 2011 - 9:21 am | प्रचेतस
लेख व छायाचित्रे सर्वच अप्रतिम.
30 Nov 2011 - 10:44 am | जाई.
माहितीपूर्ण लेख
शिल्पे सुंदर आहेत
30 Nov 2011 - 10:47 am | सविता००१
वल्ली यांच्याशी १००० % सहमत
30 Nov 2011 - 11:44 am | मैत्र
सगळी छायाचित्रे उत्तम आहेत.. लेखात बरीच माहिती आहे.
खूप उत्तम प्रयत्न आहे म्हणून काही सुचवतो आहे --
- लेख थोडासा विस्कळीत झाला आहे. खूप सारी माहिती मनापासून लिहिलेली दिसते पण वाचकाला सलगता / संदर्भ लागत नाही
- उत्तम शिल्पाच्या फोटो शेजारी त्याची माहिती असेल तर जास्त चांगलं वाटेल.
- कानडी उच्चार हे सहसा 'ळ' किंवा 'ळ्ळ' असे आहेत -- हळेबीडू / होयसाळा
- तसेच तुगलक नाही तर मुहम्म्द बिन तुघलक हा योग्य शब्दप्रयोग असावा असे वाटते..
१००० ते १४०० हा सुवर्णकाळ असणे अवघड आहे तर तो एकूण काल असावा. कारण सर्वात बलाढ्य राजे -- कल्याणीचे 'चालुक्य' राज्यकर्ते हे सुमारे बाराव्या शतकापर्यंत शक्तिशाली होते आणि त्यांचे राज्य उत्तर महाराष्ट्रापासून ते मध्य कर्नाटकापर्यंत होते.
होयसाळ साम्राज्य दक्षिण कर्नाटकात जोम धरून होते आणि त्यांनी त्या भागावर उत्तम आधिपत्य केले हेही खरेच.
अजून काही माहिती मिळाल्यास लिहितो..
संदर्भ : विकी / ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया..
1 Dec 2011 - 6:59 pm | मन१
मी जिथवर इतिहास वाचलाय त्यावरून सांगतो, राष्ट्रकूट, चालुक्य, त्यांच्याच भावकीतले सोळंकी हे आपल्याला वाटतात त्या अर्थाने "शक्तीशाली","साम्राज्ये" वगैरे नव्हती. तुम्हाला जो एकछत्री अंमल अपेक्षित आहे तो मौर्य व गुप्त ह्यांच्या काळात होता. अगदि हर्षवर्धनाच्या काळातही "बलाढ्य केंद्र"सत्ता अशी नव्हती. दक्षिण भारतातही नाही अन् उत्तर भारतात तर अजिबातच नाही.(तिक्डे प्रामुख्याने काही चांद्रवंशीय व सूर्यवंशीय त्यातही राजपूत घराण्यांची असंख्य राज्यांची greater rajputanaची कल्पना होती.)
It was like a loose confederate.The same way it existed in mid to late 18th century of Maratha confederate.
राज्यांचा संघ्,मांडलिक राजे,स्थानिक वतनदार अशी ती शृंखला होती.
आता हे वरच काहीच समजलं नाही अस्सं म्हणत असाल तर वेगळ्या शब्दात लिहितोय.
चंद्रगुप्त मौर्यानं सत्तेवर आल्याआल्या काय केलं? मुळात नंद राजघराण्यानं आधीच सोळा महाजनपदांपैकी* काही घराणी घशात घालून मोठे "मगध राज्य" बनवले होते. त्यांनी आधीच्या राज्यक्र्त्यांचा समूळ बिमोड केला. आधीच्या राज्यक्र्त्यांचा वंश संपवला किंवा परागंदा व्हायला भाग पाडले.(मग ते पुढे दूरच्या भाअगात जाउन शेती-वाडी, व्यापार-उदीम अशी सामान्य जनांसारखीच कामे करत.) हे नंदांचं राज्य त्यानं takeover केलं.
नंतर आसपासची गणराज्ये(घराणेविहीन) काही जिंकून व काही तहाने जोडली. इतर "राजां"ची राज्ये जिंकली, राजांना बंदी बनवले किम्वा मारून टाकले किंवा सत्ताभ्रष्ट तरी केलेच केले.(विशेषतः घुसलेल्या ग्रीक क्षत्रपांना)
म्हणजे, आजच्या बिहार पासून ते उत्तरेला पेशावर्,मुल्तान पर्यंत एकच राज्घराणे शिल्लक राहिले :- मौर्य.
सगली सत्ता केंद्राच्या,मगधाच्या हातात. ह्यांच्याअशी स्पर्धक होइल असे सर्वच दूर झालेले,संपलेले.
अगदि तद्वतच तुघलक-खिल्जी-काफूर ह्यांनी केले.जिथे जिथे जिंकले, तिथले राजवंश तत्काळ किम्वा काही कालाने थेट संपवलेच. ती घराणी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी सत्तेवर आलीच नाहित.(उदा:- दिल्लीहून व अजमेरहून चौहान घराणे संपले ११९१ला, ते कायमचेच. १२९१ला देवगिरीचे यादव संपले, ते कायमचेच. शिल्लक राहिलेल्या यादव कुळाला देवगिरी सोडून जावे लागले, साम्राज्य तर बुडालेच.)
"अस्सय होय. मग असच चालुक्य भरभराटॅएच्या काळात असताना होय्सळ कसे असतील? ह्यांच्यापैकी एकाने दुसर्याअला संपवले असेलच ना" हा विचार सहज डोक्यात येतो. पण तसे नाही.
गुप्त काळानंतर, म्हणजे चौथ्या पाचव्या शतकानंतर भारतात एक्संध असे कुठलेच राज्य नव्हते. हे भारताचे शाब्दिक चित्र मी देतोय ते पहा.
आजच्या बांग्लादेश व बंगालात गौड घराण्याची सत्ता होती. पश्चिम बंगालमधील पश्चिम भागातून निघालेल्या वर्धन घराण्याची सत्ता बर्अयच मध्यभारतावर्(महाराष्टृआपर्यंतही) ,पूर्व भारतावर(ओरिसा वगैरे) होती.
पैठण हे राजधानीचे ठिकाण होते. दक्षिणेला आख्खा आंध्र व बराचसा कर्नाटक्,महाराष्ट्र ह्यांच्या ताब्यत होता.पश्चिमेला हे गुजरातच्या काही भागापर्यंत होते.(कोकण व नाणे घाट तर त्यात आलेच) . त्यानंतर केरळ व तामिअळ्नाडू मधे अशी अनेक घराणी होती, त्यातली प्रमुख चार पांड्य,चोळ,चेरा आणि पल्लव.
मग एकाच वेळी इतकी सगळी घराणी कशी?
कारण त्यांच्या सीमा कधीच स्थिर नसत. सतत आपसात युद्धे व चकमकी चालत. मात्र कुणीही जिंकले तरी समोरच्या घराण्याचा समूळ विनाश कधीच होत नसे.फक्त तह होइ. काही खंडाणी व मुलूख द्यावा लागे व विजेत्याचे मांडलिक बनून रहावे लागे. म्हणजे हरल्यानंतरही तुम्ही "राजा" ही पदवी लावू शकता. "महाराजाधिराज" ही पदवी विजेता लावणार. एक उदाहरण समजा :- पाड्यांनी चोळांचा पराभव केला. तर चोळ संपले का? तर नाही.
चोळांनी फक्त आपल्या खजिन्यातला काही हिस्सा पांड्यांना द्यायचा आणि पांडयंना म्हणत रहायचे "तुम्ही राजे,राजधिराजे" बाकी त्यांच्या स्वतःच्या महसूलात्, जीवनशैलीत व एकूणच राज्यकारभारात काहीही ढवळाढवळ होनार नाही. अगदि "जैसे थे" तशीच स्थिती राहिल!! मग होतं काय की ह्या मांडलिक चोळ राजांपैकीच कुणीतरी एक पराक्रमी राजा निघतो २-३ शतकांनंतर व मग तो आपले मालक पांड्याम्ना हरवून आपली स्वामित्व सिद्ध करतो.
मग आधीच्या मालकांना, पांड्यांना तो समूळ संपवतो का? तर अजिबात नाही.तोही आधीसारखेच त्याम्ना मांडलिक बनवून सोडून देतो. पुन्हा अजून दीड्-दोन शतकात चाके पुन्हा उलटी होतात व पुन्हा पांड्य मालक!
तर स्थिती अशी होती.
म्हणजे मांडलिक राजा असला तरी त्याच्या राजय्चा तो भरभराटीचा काळ असू शकतो(कला-स्थापत्त्य वगैरे किंवा एकूणच administration. भलेही सैनिकी सामर्थ्य फार नसेल.)
सांगायचे म्हणजे, होयसळ हे त्याकालात चालुक्य किंवा राष्ट्रकूट ह्याम्चे मांडलिक असले, तरी त्यांची राजधानी हळेबीडच होती. तिला कुणी मुलापासून नष्ट्-भ्रष्ट करत नसे. युद्ध म्हणजे तात्कालिक आर्थिक हानी.बस्स. एकदा हे ध्यानात घेतलं की मग स्वाभाविक लक्षात येतं की त्या चालुक्य्-अधिपत्याच्या काळातच मंदिराची बांधणी होत रहाणे शक्य आहे. चालुक्यांचे अंकित असतानाच त्यांनी इतर राजांचा पराबह्व करत स्वतःचा विस्तार केला असणे शक्य आहे.
आपण शालेय इतिहासात त्यामुळेच वाचले असेल "राष्ट्रकूटांनी चालुक्यांचा पराभव केला आणि चालुक्यांना उतरती कळा लागली" आणि २-३ शतकानी ह्याच्याच उलट "चालुक्यांनी राष्ट्रकूटांचा पराभव केला आणि राष्ट्रकूटांना उतरती कळा लागली" म्हणजेच, इतकी युद्धे होउन संपले कुणीच नाही. एकाच वेळी दोघेही कार्यरत राहू शकतात.
ह्याचे समांतर उदाहरण म्हणजे कित्येक राजपूत घराणी (मेवाड सोडून) असे मानतात की १५२७ ते ब्रिटिशकालादरम्यानचा काळ (मुघलांनी अंकित केलेला) हा त्यांचा वैभवशाली काळ होता!!!
उत्तमोत्तम स्थापत्यरचाना(खजानाबावडी वगरे सरख्या सुंदर विहीरी), भव्य -देखणे महाल हे राजपुतांनी मुघलांचे अंकित असतानाच बांधलेत.
अजून एक मुद्द काल निश्चितीचा व घराणी जे दावे करतात त्यांच्या सत्यतेचा येतो. बर्याचदा पुलकेशी व हर्षवर्धन किंवा हर्षवर्धन व बंगालचा गौडाधीप शशांक एकाच इलाख्यावर आपली सत्ता आहे असे साम्गतात्,दाखवतात!
तुम्ही म्हणता ते सत्य धरूनही सांगायचे म्हणजे धागाकर्ते सांगतात तो काळ बरोबर असण्याची भारपूर शक्यता आहे.
*सोळा महाजनपदे म्हणजे श्रावस्ती,कुशावती, कोसल्,वृज्जी,शाक्य,उज्जैन,काशी इत्यादी.
2 Dec 2011 - 11:00 am | रम्या
माहीतीपुर्ण प्रतिसाद.
30 Nov 2011 - 11:59 am | गवि
राजे.. काय जबरदस्त क्वालिटी आहे फोटोंची.. मान गये उस्ताद...
30 Nov 2011 - 2:37 pm | चैतन्य दीक्षित
फार फार सुंदर शिल्पे आहेत.
खजुराहो येथील शिल्पांची आठवण झाली.
(वैधानिक इशारा: कृपया 'खजुराहो' म्हणजे केवळ 'संभोगशिल्पे' असा शिक्का मारून वरील वाक्यावर पानीपत करू नये.)
1 Dec 2011 - 5:59 pm | मृत्युन्जय
आवडला.
2 Dec 2011 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार
लेखन आणि फटू सगळेच अप्रतिम.
3 Dec 2011 - 3:11 pm | निनाद मुक्काम प...
तुमचा सचित्र लेख आवडला. दक्षिणेतील आपला इतिहास ,शिल्पकला सारेच भन्नाट आहेत.
ह्यावेळी भारत दौर्यात उत्तर भारत पाहणार आहे´. पुढच्या वेळेला दक्षिणेवर स्वारी नक्की.
3 Dec 2011 - 3:12 pm | निनाद मुक्काम प...
तुमचा सचित्र लेख आवडला. दक्षिणेतील आपला इतिहास ,शिल्पकला सारेच भन्नाट आहेत.
ह्यावेळी भारत दौर्यात उत्तर भारत पाहणार आहे´. पुढच्या वेळेला दक्षिणेवर स्वारी नक्की.
16 Aug 2013 - 10:51 pm | दशानन
आज चौकटराजा यांना भेटलो त्यांच्यासाठी हा लेख वरती घेऊन येत आहे :)
26 Aug 2013 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख आणि छायाचित्रे... भारतातील एक प्राचीन रत्न बाहेर काढलेत !
18 Aug 2017 - 9:10 pm | दशानन
सध्या हे मंदिर युट्यूबवर खूपच चर्चेत आहे म्हणून धागा वर घेऊन येत आहे, जेणे करून नवीन माहिती सोबत थोडी माहिती देखील लोकांना मिळेल.