हरकारियाचा दृष्टांत

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
17 Sep 2011 - 11:26 am

श्रोतेहो ही कथा ऐकावी । जी विक्रमा वेताळ ऐकवी। मी मूढ कीं कवि । यथामतिं वर्णिलीसे॥१॥ कथेचा राया विक्रमादित्य नायक। फिरें स्मशाने अनेकानेक। पकडूनि चेडेचेटूक। दंड त्यांसि करितसे॥२॥ उगवली अवसेचि रात। विक्रम झाला मार्गस्थ। मार्गी सापडले एक प्रेत। अग्नी द्यावया निघांला॥३॥ तंव तेथे झाला चमत्कार। प्रेती वेताळ करीं संचार। म्हणे मी आता करितो तुज ठार। आलास येथे कासयासीं॥४॥ विक्रम म्हणे तें सोपें नसे। गाठ तुझी मजसंगे पडलीसें। बघ आता तुझे हाल कैसे। करितो आता मी॥५॥ तंव वेताळ झाला सावध। भलत्या प्राण्याची पारध। करावया आलो मी मंद। समजले त्यालागी॥६॥ तो चतुरपणे बोले। यावरी एक उत्तर सापडलें। तें ऐक ऐक वहिलें। मग खुशाल दंड देईं॥७॥ मी सांगतो एक कथा। ऐक ती सावध चित्तां। कथा सांगूनि सरता। प्रश्न विचारेंन तुजलागीं॥८॥ जर न देसिं उत्तर । होउनिं शतशकलें तुझें शिर । लोळेल गडबडा धरणीवर। क्षणार्ध ही न लागें॥९॥ जर चुकिंचे उत्तर देसिं। सोडूनिं या प्रेतासिं । त्वरें पळेन आकाशी। ध्यानीं ठेव राजोत्तमा॥१०॥ विक्रमासिं पटलें मत। आता वेताळ कथा सांगत। ती ऐका होऊनिं एकचित्त। विनंतिसें श्रोतयांसि॥११॥ ऐसि एक शांत नगरी। राजा सुलक्षणी सुविचारी। दंडिले अनेक अत्याचारी। हा हा म्हणतां तयाने॥१२॥ काय वर्णावा राजाचा दरबार। लेखक विचारवंत कविवर। अन्नपूर्णा बल्लवाचार्य चित्रकार। यांचि असें मांदियाळी॥१३॥ परि एक असे विवंचना। एवढ्या विस्तीर्ण पत्तना। साधने विशेष दळणवळणा। काहीच नसतीं॥१४॥ तेही सापडले उत्तर। नाना नेमिले कारागीर। जावया नगराबाहेर। वाहने घडविलीं॥१५॥ संदेशांचि ने-आण करावया। शोधू लागलें उपाया। तोहिं सापडलां एकें ठायां। हरकारे नेमिलें॥१६॥ ऐसे जाहले सुमंगळ। चालें सर्व स्वच्छ निर्मळ। राज्याची जोडली गेली नाळ। बाहेरील नगरांसि॥१७॥ पण गोष्ट नसें इतुकीं सहज। पुण्य तेथे पापयांची गाज। उडविती राज्याची निज। कैसी ते ऐका॥१८॥ नेमिले जे हरकारे। त्यांतील निष्ठेने वागती सारे। ऐसिं कीर्ती नगरे। पसरलीसे॥१९॥ परि त्यातील हरकारे दोन । महाठक असती जाण । त्यांचे असे काय लक्षण। ऐक आता ॥२०॥ एक हरकारा अतिविक्षिप्त। संदेश द्यावया जात। तया नगरजनाच्या घरात । ठाण मांडितसे॥२१॥ जर जायी रामप्रहरासी। करावया बसे न्याहारीसी। जाता कोठे माध्यान्हीसी। भोजना बसे नि:शंक ॥२२॥ या हरकार्‍याने केला कहर। राजबंद्याचा पत्रव्यवहार। दाखवी बोलून तिसर्‍यासमोर। निंदा करी तयाची॥२३॥ राजबंदी दु:खी मनी। माझे क्षमापत्र नगरजनीं। दाविले याने वाचोनि। काय सुख मिळालें?॥२४॥ राजाच्या दरबारा जाता। बंदी झाला सांगता। हरकार्‍याची विक्षिप्तता। सांगितली तयाने॥२५॥ परी तो कैदी राज्याचा। कोण पाड ठेवी तयाचा। शेवटीं कडेलोट केला त्याचा। शिक्षा नाहीं चुकलीं॥२६॥ इकडे हरकार्‍यासि रायाने। बोलाविले दरबाराकारणें। म्हणें ऐशा कार्यानें। उद्या लावशील वाट॥२७॥ तुज समज देतों ये वेळें। ऐसे पुन्हा न करी वहिलें। अन्यथा तुजहीं बंदिशाळें। धाडवया लागेलं॥२८॥ जडली जी खोड एकदा। ती न जाई कदा। हरकारें चालूं ठेविला आपुला धंदा। निंदा किंवा वंदा॥२९॥ परी जो पकडला जाय। तोच चोर जगीं होय। ऐसा जगाचा न्याय। उफराटा॥३०॥ या हरकार्‍याच्या कर्मांची कथा। नाही कोणा आली पकडता। सुटला मोकाट आता। बंधन नसे तयासि॥३१॥ आता दुसरा ऐक भूपाळा। ज्याने हात घातला अहिंचे बिळा। इंगळींही न सोडिं त्याला। ऐसा हरकारा॥३२॥ त्याने करावे काय । प्रधानाच्या पत्रींचा आयव्यय। वाचता त्यासिं नाहीं भय। ऐसे केलेसें॥३३॥ अमात्याचि भार्या माहेराहूनि। पत्रे धाडे भर्तारालागूनि। ती ही वाचिल्यावाचूनिं । न राहिला हा॥३४॥ प्रधानासि संशय आला। त्याने उपाय एक पाहिला। तो पुढे अमलात आणीला। ऐक तो काय॥३५॥ प्रधाने लिहीले राजालागुनि। काल केलिसें पाहणीं। वाड्यामागल्या विहीरीमधूनि। कनकाचें हंडे असतिं॥ ३६॥ आता याने वाचिला व्यवहार। कसले सुवर्णहंडे सुसरी मगर। असती त्या कूपीं साचार। उतरता झाला॥३७॥ उतरल्या पश्चात कळली चूक। दूषण देत तो मूर्ख। मगरी-सूसरी अनेक। लागले पाठी॥३८॥ मग बाहेरी पळू लागला। प्राणी कसले सोडितीं त्याला। बोटांचा लचका तोडिला। केलासे घायाळ॥३९॥ जे जीवावरी आलें। ते पायाच्या बोटांवर भागले। पण गुण नाही गेलें । ऐक कैसे ते॥४०॥ पाय बांधी वस्त्राने। कसबसा चाले घराकारणे। पत्र लिहीले जे अमात्यभार्येने। काढू लागला पोतडीतूनिं॥४१॥ तिलाही संशय आलेला। चतूरपणा दाविला। ज्यादिशी निघाली सासुराला। तेव्हाच पत्र लिहीलें॥४२॥ पत्री घातली खाजकोयली। पत्र उघडता अंगी लागली। अंगांगाचि काहिली। झाली हरकार्‍याच्या॥४३॥ पायी घाव अंगी खाज। अविवेकाचा उतरला माज। केल्या अकृत्याची समज । उशिरा मिळाली॥४४॥ खरी मजा घडली दुसरे दिशी। प्रधान आला राजवाड्याशी। अमात्यही स्वभार्येशि। घेउनि येई॥४५॥ राजाशी म्हणती राजेश्वरा। बोलवा तो हरकारा। पातकांच्या केले कहरा। बोलवा आधिं तयासिं॥४६॥ राजाने सेवक धाडले सत्त्वर। शोधा रे हरकार्‍याचे घर। सांगा बोलाविती राजेश्वर॥ त्वरें येई॥४७॥ कैसा येतो हरकारा। सेवक आले घरा। तो हा शयनघरा। पडलासे निपचित॥४८॥ सर्वांगे बहुत सुजला। पायी जखम वाहे घळघळा। सेवक म्हणति रे चांडाळा। उचलोनि नेतो आता॥४९॥ आणिते झालें दरबाराशी। पाणी आले जनांच्या नयनासिं। पण आता क्षमा कैसि। अपराध असे केला॥५०॥ अपराध केला मान्य । राजा जाहला खिन्न। म्हणें तुजवरिं विसंबून। ठरलो मूर्ख॥५१॥ राजा क्रोधे पेटला। म्हणे तो सेवकांला। उचला रे या चांडाळा। टाका नगराबाहेरी॥५२॥ परराज्यां पसरलीं वार्ता। ते म्हणती अहा समर्था । इतुके अघटित होता। होतास कोठे राया॥५३॥ जे घडलें अघटित। परराज्यीं चर्चेचा विषय होत। जणू कां तोंडीलावणे सेवित। भोजनासंगे॥५४॥ आता वेताळ म्हणे विक्रमासिं। सांग राया मजसि़। कोण निर्दोष कोणी दोषी। असे कथेमाजी॥५५॥ राया म्हणे वेताळा। हरकारेचि दोषी वाटती मजला। विश्वासघात असे केला। तयांनी राजाचा॥५६॥ येथेच चुकलासि तूं राजा। राजाही दोषी असे दुजा। कैसे ते ऐक मनुजा। म्हणे वेताळ॥५७॥ रायाची चूक फक्त एक। न ठेविली काही देखरेख। कार्ये नेमिले महाठक। याची जाण न झाली॥५८॥ एकाच अपराधासि। शिक्षा विविध कैसि। एका देई समजेसि। एका केले हद्दपार॥५९॥ राजकैदी तक्रार करित। तंव हरकार्‍यासि समज देत। प्रधानामात्य दरबारी येत। तो कठोर केले शासन॥६०॥ हे असते वेळिंच केलें । तर परराज्यीं नसतें हसें जालें। चूक तें कळो आलें । ठकावरीं विसंबला॥६१॥ असो नगरजनांही आता कळलें। विश्वासूं नयें कोणा वहिलें। पदतळीं सापांसरड्यांची बिळें। असतील कीं॥६२॥ वरीवरी जरी दिसलें शांत। नगरजन हादरलें मनांत। ज्याची शंका होतो घेत। तेच घडलेसे॥६३॥ ऐसे वदोनि वेताळ। सोडी ते प्रेत तात्काळ। चुकीच्या उत्तराचे फळ। तेंच कीं होतें॥६४॥जर असे लिहीले अधिकउणे। विनंती असे श्रोतयांकारणें। मानुनि बाळकाचे बोलणें। पदरी घेईंजें॥६५॥ मज ना छंदवृत्तांचे भान। सुचलें ते काढिलें लिहोन। जनांनि ऐकोन वाचोन । मानावे गोड ही विनंति ॥६६॥ हा हरकारियाचा दृष्टांत। लिहोनिया पूर्ण होत। वाचकश्रोतयांस नमन करित। सुफळसंपूर्ण केलासे॥६७॥

मुक्तक

प्रतिक्रिया

श्री श्री श्री सुधांशू जी महाराज
साष्टांग दंडवत द्येवा

१ लंबर भावा
भयाण खपलो गेलोय....

चायला..
हसून हसून पुरेवाट झालीये

सद्य परिस्थितीवर भाष्य करण्याची आपली कला पाहून डोळे पाणावले

किसन शिंदे's picture

17 Sep 2011 - 1:06 pm | किसन शिंदे

खरचचं एक नंबर रे सूड, त्यादिवशी फोनवर बोलतानाच तुझी याविषयीची तगमग दिसली होती.

मी-सौरभ's picture

19 Sep 2011 - 2:36 pm | मी-सौरभ

हभप श्री सुधांशुजी महाराजांचा विजय असो!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Sep 2011 - 5:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सुड्या, लय भारी लिवले आहेस रे. या शैलीत इतके मोठ्ठे लिहून तरीही जे म्हणायचे आहे ते व्यवस्थित मांडले आहेस. सोपे नाही हे काम.

आता गोष्टीबद्दल, हरकाऱ्याने चूक केली हेच मुळात राजा किंवा प्रधानमंडळाने जनतेला सांगितले नाही. आपल्या अधिकाऱ्यांपैकी कुणीतरी चूक केली हे कबूल करण्याने राजा किंवा प्रधानांवर दोष येत नाही. त्यामुळे त्यांनी तसे जाहीर करायला पाहिजे होते. मला स्वतःला कुठल्याही राज्याचा कारभार पारदर्शक असावा असे वाटते, सदर राज्यात तो नाही असे गोष्टीवरून दिसते.

विसुनाना's picture

17 Sep 2011 - 11:54 am | विसुनाना

खरोखरीच पोथी वाचत आहे असे वाटले. मजकूर समजला. :)

श्रावण मोडक's picture

17 Sep 2011 - 11:58 am | श्रावण मोडक

मेलो. ;)
पण हे काही अक्षर वाङ्मय ठरणार नाही, सुधांशु.

धन्या's picture

17 Sep 2011 - 12:20 pm | धन्या

गाववाल्यानू, तुमी हा लेक "अक्षर वाङ्मय" व्हावा म्हनुन लिव्लाय काय?

परिकथेतील राजकुमार's picture

17 Sep 2011 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

व्यासांच्या शोधात..

श्रावण मोडक's picture

17 Sep 2011 - 12:04 pm | श्रावण मोडक

मोरया! :)

हे प्रतिष्ठापनेच्याऐवजी विसर्जनाचं होण्याची शक्यता नाकारता येत नाहीं. ;)

ओ... आमी इसर्जन बिसर्जन नाय करनार काय. आमी आंदशद्दा निर्मुलनवाल्याना दान करु. जल्ला तो काय निसर्गाची हानी बिनी व्हते ना इसर्जन केल्यावर...

धन्या's picture

17 Sep 2011 - 12:02 pm | धन्या

या दृष्टांतातला संदेश वगैरे जाऊदया गाढवाच्या शेपटीत, जे लिहिलंय ते जबरदस्त आहे.

लेखनशैली श्रीधर कवींच्या लेखनशैलीशी बर्‍यापैकी मिळते. खरं वाटत नसेल तर रामविजय, हरीविजय, पांडवप्रताप वगैरे उघडून पाहा. :)

देवरुखकर साहेब, बघा एखादया बापू, महाराजाला दाखवा हे तुमचं काव्य तो नक्की त्याचं चरीत्र तुम्हाला लिहायला सांगेल. तुम्हाला अर्थसामर्थ्य दान होइल आणि मग तुम्ही जगाल आणि तुमच्या काव्यावर दुसरेही जगतील ;)

मूकवाचक's picture

17 Sep 2011 - 12:22 pm | मूकवाचक

क्षणभर खापरे.ऑर्ग वर आहोत असे वाटून जावे इतकी भट्टी मस्त जमली आहे. पु.ले.शु.

धन्या's picture

17 Sep 2011 - 12:17 pm | धन्या

देवरुखकर, मुक्तकाचे शिर्षक मागे कधी तरी अकरावीला युवकभारतीमध्ये असलेल्या "गुळहारियाचा दृष्टांत" या वेच्याशी साम्य दाखवते.

अर्थात तो वेचा तेराव्या शतकात लिहिलेल्या महानुभाव पंथांच्या लीळाचरित्र या ग्रंथातून घेतला होता. त्याची भाषाशैली तुमच्या या मुक्तकाच्या भाषाशैलीपेक्षा पुर्णपणे वेगळी आहे. तुमची शैली मी वर म्हटल्याप्रमाणे श्रीधरकवींच्या शैलीशी जुळते.

नगरीनिरंजन's picture

17 Sep 2011 - 12:28 pm | नगरीनिरंजन

त्रिवार _/\_!
लै झ्याक जमवलंय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2011 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनशैली छान.

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

19 Sep 2011 - 3:41 pm | नितिन थत्ते

भारी. :)

(स्वगतः आता नेहमी सारखं कविता म्हणजे 'पास' करून चालणार नाही).

प्यारे१'s picture

17 Sep 2011 - 1:21 pm | प्यारे१

मस्त रे सुड्स.

प्रचेतस's picture

17 Sep 2011 - 1:22 pm | प्रचेतस

मस्तच जमलेय रे सूड, हाणलेस तेजायला.

नंदन's picture

17 Sep 2011 - 1:46 pm | नंदन

साष्टांग दंडवत!

हे असते वेळिंच केलें । तर परराज्यीं नसतें हसें जालें। चूक तें कळो आलें । ठकावरीं विसंबला

हे वाचून डोळे पाणावले आणि अं. ह. झालो.

श्रावण मोडक's picture

17 Sep 2011 - 2:32 pm | श्रावण मोडक

हा धागा वाचताना माझ्या कानात तो वेताळ "जय जय रघुवीर समर्थ" असा गजर करतोय; ;) पण दिसत नाहीये.
नंदन, वेताळ कोण रे हा? आणि त्याने ज्याच्या मृतदेहात प्रवेश केला, तो देह कोणाचा? तू सांगतोस, की प्रियालीला विचारावे? ;)

नंदन's picture

17 Sep 2011 - 11:10 pm | नंदन

तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलं आहे का? ;) बाकी दोनाहून अधिक हरकारे या निकषाच्या(!) कसोटीवर उतरतात असं ऐकून आहे.

श्रावण मोडक's picture

17 Sep 2011 - 11:27 pm | श्रावण मोडक

बाकी दोनाहून अधिक हरकारे या निकषाच्या(!) कसोटीवर उतरतात असं ऐकून आहे.

या ऐकीव माहितीचा सोर्स कोण? बीबीसी १ की बीबीसी २? तू नेहमी बीबीसी ऐकतोस म्हणून विचारतोय. हां... आकाशवाणी हा सोर्स नसावा!

Nile's picture

17 Sep 2011 - 11:52 pm | Nile

ते जाऊं द्या आधी तो राज्यबंदी कोण होता ते सांगा बरं!! ;-)

हाण च्या मारी. लै भारी लिवलंय रे. एवढे मन लावून याआधी आपण तरी कुठला दॄष्टांत वाचला नाय ब्वॉ!! ;-)

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 12:10 am | श्रावण मोडक

ते जाऊं द्या आधी तो राज्यबंदी कोण होता ते सांगा बरं!!

त्याला काही 'काही दिवसांची तडीपारी' झाली नव्हती. आधी कडेलोटच केला होता. पण तो कष्ट करून कडा चढून आला. मग पुन्हा कडेलोट झाला. तरीही, कड्यावरून त्याच्यापर्यंत कारागिरांच्या आरोळ्या पोचतातच. कारागीरच ते. काम करताना हाकाट्यांची सवय असतेच त्यांना. हाकाटी न करता काम करतील तर ते कारागीर कसले? त्यांचा हेतू आहे की हा राजबंदी पुन्हा राज्यात यावा. अशी त्याची थोरवी.
ओळख आता कोण आहे हा राजबंदी ते.
या प्रश्नाचं उत्तर माहिती असूनही तू दिलं नाहीस तर...

सूड's picture

18 Sep 2011 - 6:56 am | सूड

श्रामो काका, कथेतल्या राजबंद्याची शिक्षा माफ व्हायला हवी होती असं विक्रम किंवा वेताळ कोणालाच वाटत नाही. मुद्दा हा आहे की राजासोबतचा राजबंद्याचा संवाद हरकार्‍याने वाचण्याची आणि तो तिसर्‍यासमोर (म्हणजे कुर्ल्यांच्या भाउबंद तिसर्‍या त्या नाय हां, थर्ड पर्सन थर्ड पर्सन) बोलून दाखवण्याची चूक केली. त्याबद्दल त्याला नुसतीच समज देणं आणि प्रधान अमात्य येता दुसर्‍या हरकार्‍यावर स्ट्रीक्ट अ‍ॅक्शन घेणं हे वेताळाला खटकलंय इथे. असो, बाकी तुम्ही काय बोलताहात काहीच कळलं नाही, अदितीतैंनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. ;)

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 10:39 am | श्रावण मोडक

कथेतल्या राजबंद्याची शिक्षा माफ व्हायला हवी होती असं विक्रम किंवा वेताळ कोणालाच वाटत नाही.

अर्थातच. पण कारागिरांना वाटतं. विक्रम आणि वेताळ तटस्थ आहेत, हे कथेतून दिसतं. कथेतला दृष्टान्त कथेच्याही बाहेरच्या पर्यावरणातून येत असतो. त्याच न्यायानं मी कारागीरांना मध्ये आणलं.

मुद्दा हा आहे की राजासोबतचा राजबंद्याचा संवाद हरकार्‍याने वाचण्याची आणि तो तिसर्‍यासमोर (म्हणजे कुर्ल्यांच्या भाउबंद तिसर्‍या त्या नाय हां, थर्ड पर्सन थर्ड पर्सन) बोलून दाखवण्याची चूक केली. त्याबद्दल त्याला नुसतीच समज देणं आणि प्रधान अमात्य येता दुसर्‍या हरकार्‍यावर स्ट्रीक्ट अ‍ॅक्शन घेणं हे वेताळाला खटकलंय इथे.

हो, पण इथं एका गोष्टीचा खुलासा हवा. वेताळाची विक्रमाकडून अपेक्षा काय आहे? दुसऱ्या हरकाऱ्यालाही समज द्यायला हवी, की पहिल्या हरकाऱ्यावरही दुसऱ्याप्रमाणेच कडक कारवाई करणं अपेक्षीत आहे? तटस्थतेकडून न्यायप्रियतेकडे जाण्याची वाटचाल आहे का, हे त्यातून समजेल. याविषयी खाली घासकडवी लिहितात तेही महत्त्वाचे आहे.
वैयक्तिक मत विचारशील तर, दुसऱ्या हरकाऱ्यावर कथेत दाखवलेली कारवाईच मला पटत नाही. तडीपारी किंवा कडेलोट ही कारवाई चुकीची. हरकाऱ्याचे हरकारेपद काढून घेणं आणि ते पद काढून घेतल्याची जाहीर घोषणा करणं ही कारवाई समुचित ठरते (अशी कारवाई निंदाकारक ठरते आणि सभ्यता अंगी शिरू शकते अशा व्यक्तींबाबत खूपच कठोर कारवाई असते). तसा काही प्रश्न कथेत यायला हवा होता. वेताळ आणि विक्रमाची ही कथा असल्याने हा पेच अपेक्षीत आहे. तीच गोष्ट पहिल्या हरकाऱ्याबाबतही करता येते का असाही पेच अपेक्षीत आहे.

असो, बाकी तुम्ही काय बोलताहात काहीच कळलं नाही,

अच्छा? तुमच्या या विधानावर विश्वास ठेवावा असा तुमचा आग्रहच असेल तर ठेवतो बापडा. ;)

हो, पण इथं एका गोष्टीचा खुलासा हवा. वेताळाची विक्रमाकडून अपेक्षा काय आहे? दुसऱ्या हरकाऱ्यालाही समज द्यायला हवी, की पहिल्या हरकाऱ्यावरही दुसऱ्याप्रमाणेच कडक कारवाई करणं अपेक्षीत आहे?
वेताळाला विक्रमाकडून अपेक्षित उत्तर हे आहे की, पहिल्या हरकार्‍यावरही दुसर्‍याप्रमाणेच कडक कारवाई व्हायला हवी होती. राजबंद्याचा पत्रव्यवहार असला म्हणून काय झालं ?? हरकार्‍याचं काम निरोप पोचवणं, ते वाचून लोकांसमोर त्याचा उल्लेख करणं हे चूक होतं. त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी होती. वेताळ या उत्तरांची अपेक्षा ठेवून होता, पण विक्रमाने 'सविस्तर उत्तरे द्या' ला आलेला प्रश्न एका वाक्यात सोडवला.

याविषयी खाली घासकडवी लिहितात तेही महत्त्वाचे आहे.
अगदी अगदी !!
हरकाऱ्याचे हरकारेपद काढून घेणं आणि ते पद काढून घेतल्याची जाहीर घोषणा करणं ही कारवाई समुचित ठरते (अशी कारवाई निंदाकारक ठरते आणि सभ्यता अंगी शिरू शकते अशा व्यक्तींबाबत खूपच कठोर कारवाई असते)
मान्य. पण हरकार्‍यांच्या चूका काढून दाखवायला प्रधान, अमात्य इतकेच काय राजबंदी सुद्धा पुढे आले. राजा कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा काय (इथे राजाने लक्ष का घातलं नाही हा प्रश्न स्वतः वेताळालाही पडलाय, ज्याचं उत्तर आपल्याकडे नाही तो प्रश्न विक्रमाला विचारुन त्याची प्रेतातून सुटका शक्य नव्हती ) स्वतः जातीनं लक्ष घालताना वेताळाच्या कथेत दिसला नाही. त्यामुळे त्याने जे केले तेही नसे थोडके, असं वेताळाचं मत झाल्याने तो विक्रमाला फार प्रश्न विचारुन पेचात पकडत नाहीये. तुम्ही म्हणता तसं झालं असतं तर नगवासीयांच्या मनात एक विश्वासाची भावना निर्माण झाली असती, असं वेताळाचं मत होतं.
अच्छा? तुमच्या या विधानावर विश्वास ठेवावा असा तुमचा आग्रहच असेल तर ठेवतो बापडा.
आग्रहाला मान दिल्याबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे. :)

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 4:14 pm | श्रावण मोडक

एकूण राजाच्या वर्तनाचा विषय आपण न्यायप्रियतेकडे नेऊया. राजाच्याच नव्हे तर सर्वांच्याच वर्तनाचा विषय तिकडे जावा.
आपल्या पत्रातला मजकूर हरकाऱ्यांना कसा कळला हे राजबंद्याला कसे माहिती झाले हे काही वेताळ सांगत नाही. म्हणजे, तिथं दोन शक्यता - एक तर राजानेच हरकाऱ्यांना ते सांगितले; किंवा हरकाऱ्यांनी राजाचेच पत्र वाचले. दुसरी शक्यता म्हणजे राजाने राजबंद्याविषयी काही कारागिरांशी चर्चा केली आणि त्यातून कारागिरांनी त्यांच्या सवयीप्रमाणे हाकाटी करत काम केल्यानं ती बाहेर पसरली व त्यातून हरकार्‍यांच्याही कानी काही गोष्टी पडल्या. वेताळ या संभाव्यतांबद्दल काहीही सांगत नाहीच. शिवाय, कथेबाहेरचे पर्यावरण घ्यायचे ठरवले तर, राजबंद्याची पुन्हा हकालपट्टी ही हरकार्‍यावि्रूद्धच्या तक्रारीमुळे नाही, तर स्वत:च्याच दुष्कृत्यांमुळे झाली, असे नगरजन सांगतातच. म्हणजे, आधीच्या शक्यतांच्या आधारे इतर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने, आणि कथाबाह्य पर्यावरणाच्या संदर्भात मुद्दाच भिन्न असल्याने इथे राजबंद्याचा वेताळ देत असलेला दाखला अपुरा आहे. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तो पुरेसा नाही. कारण, त्यातून राजबंद्याविषयी उगाचच एक उदात्त चित्र निर्माण होतं.
आता हरकाऱ्यांची कृत्ये. वेताळ पुन्हा मोजके दाखले देऊन सार्वत्रिक स्थितीविषयी प्रश्न विचारतो. वास्तविक, अशा सार्वत्रिक प्रश्नांच्या उत्तरासाठी दाखलेही सार्वत्रिक असावे लागतात. अन्यथा राज्यसंस्था कोलमडून पडेल. कारण, दाखल्यांचा ढिग आहे. हरकाऱ्यांबाबतच नव्हे तर सर्वांबाबत. त्यात नगरजनही आले, कारागीरही आले. ते होऊ द्यायचे नसेल तर त्या थेअरोटिकल प्रश्नाचे नीट उत्तर मिळण्यासाठी सार्वत्रिक स्थिती मांडावी लागते. तर, हरकाऱ्यांनी फक्त राजबंद्याची आणि अमात्य-भार्या यांचीच पत्रे वाचली का? वेताळाला हे विचारले पाहिजे. हरकाऱ्यांकडे नेमकी कामगिरी काय होती? ते काय करायचे हेही वेताळाने सांगितले पाहिजे. पुन्हा वेताळ म्हणतो की हरकाऱ्यांना राजाने नेमले होते. नेमणुकीची प्रक्रिया वेताळाला माहिती नाही का? अशी नेमणूक जाहीर केली जाते. कथेत वेताळ तसे काही सांगत नाही. त्यामुळे त्याविषयीही शंकाच निर्माण होतात.
तो राजा विक्रम आहे, म्हणून त्यानं सभ्यपणे अपुरी उत्तरं देऊन वेताळाला मुक्त होण्याची संधी दिली. एरवी, दुसरा एखादा असता त्यानं आधी वेताळाला पन्नास प्रश्न केले असते आणि ते ऐकून वेताळही भंजाळून गेला असता.
खरे तर, तू म्हणतोस तसा खुद्द वेताळच इथं अडचणीत आलेला आहे. कारण त्याच्याही मनी काही प्रश्न उमटतात, पण त्याची उत्तरे ठाऊक नसल्याने तो ते विचारतही नाही. वेताळाने या कथेची रचना अजून नीट केली, तर विक्रमाची पंचाईत होईल. विक्रम पक्षपाती असेल तर त्याला सत्य उत्तरे देता येणार नाहीत. त्याचा शीरभंग होईल. आणि त्याने निःपक्षपातीपणे खरी उत्तरे दिली तर वेताळ मुक्त होईलच, पण दाटून आलेले ढग निमून जातील. सारे काही स्वच्छ होईल. पण...

नंदन's picture

18 Sep 2011 - 11:10 pm | नंदन

हे बोलणं कशाबद्दल चाललंय काही कळत नाही राव. मनमोहन सिंग - कलमाडी - ए. राजा ह्या त्रिकूटाबद्दल चर्चा चालली आहे, असा माझा आपला एक अज्ञ अंदाज ;)

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 11:15 pm | श्रावण मोडक

माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. तू एकटाच असा आहेस की ज्याला हे सगळं काय चाललं आहे ते नेमकं समजलं. बीबीसी ऐकण्याचा फायदा हाच. मीही आता बीबीसी ऐकायला सुरवात करणार आहे. ;)

नंदन's picture

19 Sep 2011 - 12:06 am | नंदन

बाकी मनमोहन हे कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक आहे, हे तुम्हांला सांगायला नकोच :)

श्रावण मोडक's picture

19 Sep 2011 - 9:56 am | श्रावण मोडक

हे असले ग्लानिर्भवती सारखे शब्द नको रे वापरू. च्यायला, नंदन लिहितोय म्हटल्यावर मी 'गर्भवती'च वाचलं. अशानं लफडी वाढतात राव. ;)

नंदन's picture

19 Sep 2011 - 11:24 am | नंदन

अलीकडे प्रश्नांना उत्तर न देण्याचा जमाना आहे. तेव्हा आम्हीही 'प्रेग्नंट'* पॉज घेऊन थांबतो.

* नो पन इन्टेन्डेड :)

श्रावण मोडक's picture

19 Sep 2011 - 11:43 am | श्रावण मोडक

म्हणजे, शक्याशक्यता बक्कळ आहेत तर... ;)
मीही थांबतो. खव आहेच. :)

नंदन's picture

17 Sep 2011 - 11:54 pm | नंदन

मेकॉलेच्या वंशजांवर आमचा काडीचाही विश्वास नाही. सोर्स पूर्ण देशीच आहे. (वाढदिवसाच्या शुभेच्छा अकाली स्वीकारण्याची तयारी करावी काय? :D)

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 12:02 am | श्रावण मोडक

सोर्स पूर्ण देशीच आहे.

बीबीसी - २. म्हणजेच बीबीसीची हिंदी सेवा. देशी. बीबीसी - १ म्हणजे विंग्रजी. ती विदेशी सेवा.

प्रियाली's picture

18 Sep 2011 - 5:21 pm | प्रियाली

वेताळ कोण रे हा? आणि त्याने ज्याच्या मृतदेहात प्रवेश केला, तो देह कोणाचा? तू सांगतोस, की प्रियालीला विचारावे?

हा धागा सुटला कसा माझ्या नजरेतून? जरा शीर्षके अधिक "बोधप्रद" देत जा रे कुणी. नाहीतर आहेतच आमच्यासारखे काही धागा न उघडणारे ढ पण एक आणखी गोष्ट लक्षात आली की काही तथाकथित सुजाणांना धाग्याचा अर्थच कल्ला नाय... गंमत आहे. चालू द्या!

प्रधान, अमात्य, चिटणीस धाग्यावर हजेरी लावून छान छान म्हणाले त्यातच सर्व आले. ;)

बाकी प्रश्न राहिला वेताळाचा तर त्याने आता वेगवेगळी झाडे पकडून राजाशी पंगा घ्यायचे ठरवलेले दिसते. ;)

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 10:34 pm | श्रावण मोडक

प्रधान, अमात्य, चिटणीस धाग्यावर हजेरी लावून छान छान म्हणाले त्यातच सर्व आले.
काय सांगता? कुठं, कुठं? लगेच दुवे द्या. व्यनि केला तरी चालेल. ;)

प्रियाली's picture

18 Sep 2011 - 10:36 pm | प्रियाली

हेहेहेहेहेह! हेहेहेहेहे!

आधी मला व्य. नि, करणे आणि जाहीर लिहिणे यांतील फरक समजावा बघू. ;)

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 10:49 pm | श्रावण मोडक

आधी मला व्य. नि, करणे आणि जाहीर लिहिणे यांतील फरक समजावा बघू.

जरा कायदेतज्ज्ञांना विचारून सांगतो. ;)

स्पा's picture

17 Sep 2011 - 2:35 pm | स्पा

सगळा आनंदी आनंद आहे

-- आनंदी यात्रेकरू स्पा

५० फक्त's picture

17 Sep 2011 - 10:53 pm | ५० फक्त

मस्तच रे, आजच्या काळात अशा रचना करणे म्हणजे निखिल वागळेचि मुलाखत घेण्याएवढं अवघड आहे. उद्याचा अपसेंटि एक डाव माफ तुला.

पैसा's picture

17 Sep 2011 - 11:06 pm | पैसा

सुडक्या, विक्रम वेताळाचे आणखीन अध्याय लिही. वाचून थक्क झाले!

प्रभो's picture

18 Sep 2011 - 1:28 am | प्रभो

ऑसम रे !!

आत्मशून्य's picture

18 Sep 2011 - 2:20 am | आत्मशून्य

वाचकश्रोतयांचेही आपणास नमन ! ऐसे घडले हे राप्चीक लेखन !!
भले परराज्यींही हसें घडोन ! संस्थळ सर्वोत्तम हेच !!

श्रावणमांसी जरी सरले ! तरी उत्तम वाचन आज घडवियले !!
धन्य हे आमचे भाग भले ! वाचून हासून उर फूटेसी!!

आता राजास विनंती ही पाठवणी ! जपावी सर्वांची व्यनी मनी !!
सर्वजण तिथे मंगलगाणी ! वाजवत नसताती !! ;)

सूधांशूने हे काव्य रचीले ! सर्वे सदस्ये अर्पीले !!
न उडवीयले राजा/प्रधानाने ! संतोष मनी तो हाच!!

राजेश घासकडवी's picture

18 Sep 2011 - 2:43 am | राजेश घासकडवी

ओघवत्या भाषेत, निरूपण केल्याप्रमाणे केलेलं लेखन आवडलं. कवितेचा अभ्यास करताना रूपकांचा वापर कसा केला आहे हे बघणं आवश्यक असतं. त्या निकषावर ही कविता उतरते. प्रत्येक वाचक आपल्या अनुभूतीनुसार तिचा अर्थ लावू शकतो.

या कथाप्रधान कवितेची शोकांतिका आणखीन तीव्र करणारा बदल सुचवतो. कथेतल्या राजाने जर अमात्याचेच हरकाऱ्यावर नजर ठेवण्याचे अधिकार काढून घेतले तर? रोश वि. ऍडम्समध्ये व्हिसलब्लोअरलाच शिक्षा करण्याची प्रवृत्ती दाखवली आहे. तसं तुमच्या राजाने केलेलं दाखवलं तर? म्हणजे राज्यात शांतता आहे असं दाखवण्यासाठी गुन्हा नोंदवणाऱ्या पेनांमधलीच शाई काढून घेणारा राजा दाखवा. मग कवितेतला विक्रमादित्य ही न्यायबुद्धी पाहून जीभ हासडून जीव देऊल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2011 - 4:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपाचे तरूण रक्त श्री. सुधांशु देवरूखकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मर्यादित खरडी आणि प्रतिसाद यांच्याद्वारे माझी त्यांच्याशी ओळख होती. पण त्यातूनही त्यांनी आपली काव्य-शस्त्र-विनोदाची जाण उच्च असल्याचे जाणवून दिले होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या-त्या आयडीची शैली वापरण्याचा प्रयत्न करण्याची परंपरा आहे. पण आम्ही परंपरांना छेद देणारे असल्यामुळे (स्वतःला एवढं सुंदर लिहीता येत नसल्याचं जाहीर कसं सांगायचं?) आम्ही आमच्याच शैलीत सुड उर्फ सुधांशु देवरूखकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत.

शुभेच्छुक
अदितीताई अवखळकर पाटील
सचिव, अवखळवाडी भगिनी मंडळ
मु. अवखळवाडी, पो. बेरकेवाडी.

५० फक्त's picture

19 Sep 2011 - 2:40 pm | ५० फक्त

मिपावरचे तरुण रक्ताचे अशी दुरुस्ती सुचवतो, तसेच श्री. सुधांशु हे मिपावरील मोएबॅसंघाचे संस्थापक सदस्य असल्याचा उल्लेख राहुन गेल्याचे जाणवले.

शाळेत अभ्यासलेल्या व आतापर्यंत लक्षात राहिलेल्या शास्त्रानुसार रक्त हे शरीरात कायम तयार होत असल्याने ते कायमच तरुण म्हणजे चिरतरूण असते असे म्हणता येईल आणि श्री. सुधांशु यांचे रक्त हे ते मिपासदस्य होण्यापुर्वीपासुन अस्तित्वात असल्याने त्यांच्या रक्ताला मिपाचे तरुण रक्त कितपत योग्य आहे असा प्रश्न पडतो आहे.

असो, आमच्याही श्री, सुधांशु यांना अवकाळी पावसासारख्या अवकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अवांतर - श्राद्धपक्षाच्या महिन्यात अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असते, हा त्यातला प्रकार आहे काय? ज्या पितरांची तिथी माहित नसते त्यांच्या नावाने त्या दिवशी पाणी सोडले जाते, तसे एखाद्या सदस्याचा वाढदिवस माहित नसल्यास त्याच्या चांगल्या धाग्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात काय ? तरूण किंवा म्हाता-या, सर्व प्रकारच्या रक्ताच्या सदस्यांकडुन मार्गदर्शनाची अपेक्षा.

मी-सौरभ's picture

19 Sep 2011 - 2:52 pm | मी-सौरभ

मा. च्या प्र....

वपाडाव's picture

19 Sep 2011 - 3:21 pm | वपाडाव

प्र.का.टा.आ.

किसन शिंदे's picture

19 Sep 2011 - 5:17 pm | किसन शिंदे

प्र.का.टा.आ

प्रचेतस's picture

19 Sep 2011 - 5:34 pm | प्रचेतस

सुधांशु महाराज, वाढदिवस झाला, वाढदिवसाच्या शुभेच्छाही मिळाल्या, आता बड्डे प्यार्टी कधी मिळणार?

ढब्बू पैसा's picture

18 Sep 2011 - 4:43 am | ढब्बू पैसा

जबराट लिहिले आहे. वाचताना टिपीकल पोथीच्या लयीत वाचल्याने अजून मजा आली :). शैली भन्नाटच!

मजकूर समजला :)

प्रियाली's picture

18 Sep 2011 - 5:24 pm | प्रियाली

जबराट लिहिले आहे. वाचताना टिपीकल पोथीच्या लयीत वाचल्याने अजून मजा आली . शैली भन्नाटच!

अगदी! +१

मजकूर समजला

ज्यांना समजायला हवा त्यांना समजत नाही; समजत नाही म्हणून असे साहित्य मिपावर टिकते आणि यापेक्षा अधिक स्पष्ट लिहिले तर शिक्षा होते. ;)

सदर लेखकाची शैली आवडली किंबहुना त्याचा वापर इतरांनीही करावा अशी विनंती आहे.

चित्रा's picture

18 Sep 2011 - 9:54 pm | चित्रा

सुधांशुजींची पाठ थोपटा रे कोणीतरी. पोथी छान लिहीली आहे.

खरोखर वेगळीच अनुभुती आली पोथी वाचून

संपत's picture

18 Sep 2011 - 11:42 pm | संपत

रुपक डोक्यावरून गेले.

क्रेमर's picture

19 Sep 2011 - 12:51 am | क्रेमर

सुंदर टोला.

नंदन काका आणि श्रामो काका यांच्या सुरेख भागीदारी मुळे संघाचे अर्धशतक फलकावर झळकले
अभिनंदन .

आजच्या दिवसात शतक पूर्ण होवो , हीच वेताळा चरणी प्रार्थना ;)

श्रावण मोडक's picture

19 Sep 2011 - 10:31 am | श्रावण मोडक

नंदन काका आणि श्रामो काका यांच्या सुरेख भागीदारी मुळे संघाचे अर्धशतक फलकावर झळकले

खातंय मार आता. ;)

नंदन's picture

19 Sep 2011 - 11:30 am | नंदन

काकाईझम नावाचा एक धार्मिक पंथ आहे. 'ब्रदरहूड' ह्या अर्थी. (जिज्ञासूंनी ह्या पानावर जाऊन Kakaism शोधून पहावे) श्री. स्पा ह्यांचा प्रतिसाद त्या दृष्टिकोनातून स्वीकारण्यात येत आहे ;)

श्रावण मोडक's picture

19 Sep 2011 - 12:17 pm | श्रावण मोडक

स्पा म्हणेल, "मी माझे शब्द मागे घेतो, तुझी स्वीकृती नको; पण त्या लिंका आवर." च्यायला, कुठं पाठवशील एखाद्याला सांगता येणार नाही. ;)

स्पा's picture

19 Sep 2011 - 12:21 pm | स्पा

मी माझे शब्द मागे घेतो, तुझी स्वीकृती नको; पण त्या लिंका आवर

श्रीयुत नंदन लिंकाळे

आजकाल लैच लिंका पाडाय लागले हैत :D

स्पा's picture

19 Sep 2011 - 10:32 am | स्पा

=))
=))

काहीच कल्ला नाय.
अभ्यास वाढव भावश्या अभ्यास.
बाकी हुशार लोकांचे अभिनंदन

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Sep 2011 - 11:53 am | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!! क्या बात!!

वपाडाव's picture

19 Sep 2011 - 1:52 pm | वपाडाव

ठसन द्या.... ठसन घ्या.... आता होउन जाउ द्या.....

वाह रे मेरे शेर....
तु बहुत आगे जायेगा....

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2011 - 2:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकदम भारी माल. एक लंबर. मि. पा. वरच्या एका मॄत आयडीची आठवण झाली.

बाबारे तुझ्या पोतडी मधे अजुन काय काय आहे?

मृत्युन्जय's picture

19 Sep 2011 - 2:51 pm | मृत्युन्जय

आमच्याकडुन साष्टांग स्वीकारावा सुधांशु महाराज.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Sep 2011 - 4:47 pm | बिपिन कार्यकर्ते

साष्टांग दंडवत! अध्याय वाचला, मजकूर समजला! हा एवढा मोठा मजकूर पोथीरूपात लिहायचा म्हणजे भन्नाटच!

बिका, तुमास्नी असं मनायचंय का? (मी बी, मी बी )

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Sep 2011 - 6:21 pm | बिपिन कार्यकर्ते

सहनत आहे! ;) (शेंडी / टक्कल वगळता! ;) )

शिल्पा ब's picture

19 Sep 2011 - 8:00 pm | शिल्पा ब

प्रतिसाद वाचुन काय तो अंदाज लागला असं मला वाटतंय.

बाकी छान ल्हिलंय. शैली का काय म्हणतात ती छान आहे.

इंटरनेटस्नेही's picture

21 Sep 2011 - 12:48 pm | इंटरनेटस्नेही

सर्वप्रथम इतके चांगले साहित्य नजरेतुन सुटले याबद्दल खेद व्यक्त करतो.
मस्त लिहिलयस रे सुड. एकदम आवडेश.

स्वानन्द's picture

21 Sep 2011 - 3:41 pm | स्वानन्द

लई भारी लिहीलंय...!!