हात पाय नाक डोळे नसलेला एक प्राणी जंगलात शिरला
डोक्याच्या जागी एक भला मोठा पोकळ बुडबुडा, संतापाने भरलेला
शब्दहीन आक्रोशाचा लोट निव्वळ दिसत होता
पाय फुटलेल्या वाटांवरून दिशाहीन वाहत होता
डोक्यावर त्याच्या कुणा संताची पालखी होती
गडबडलेल्या वनराजाला शिकार हि नवखी होती
सावज टप्प्यात असून सुद्धा झेप त्याची पोचत नव्हती
कोल्हया लांडग्यांची नख सुद्धा गोळ्याला त्या डाचत नव्हती
गुहेमध्ये जाऊन त्याने काही वर्ष चाळली
काळ थोडा मागे करून युग थोडी पाहिली
किडे मुंग्या हरणं ससे चिरडलेली अनेक मनं
इतिहासाच्या पुस्तकातली रक्तबंबाळ किती पानं
पुस्तकात वेदनेचा चेहरा नव्हता कुठेच छापला
सनावल्यांच्या गर्दीमध्ये इतिहास आमचा तेव्हाच फसला
काही चुका गाळ्ल्या तरी गाळ तसा बराच होता
पालखीतल्या संताचा चेहरा बराच खरा होता
वनराजाची आता कसोटी, वेसण त्याला घालायचीय
शिकार मात्र या वेळी रक्ताशिवाय करायचीय..
प्रतिक्रिया
13 Sep 2011 - 9:29 pm | माझीही शॅम्पेन
व्वा छान कविता आहे ! आवडली :)
अवांतर - सविस्तर प्रतिसाद जन-लोकपाल झाल्यावर देण्यात येईल :)
13 Sep 2011 - 10:24 pm | राजेश घासकडवी
किंचित बाळबोधतेकडे झुकणारी वाटली (विशेषतः लोकपालचा उल्लेख आल्यामुळे) तरीही आवडली. या प्राण्याचं दात रुतवता न येणारं, नक्की हातातही धरता न येणारं पाऱ्यासारखं रूप थोडं उलगडून दाखवलं असतं तर आणखी आवडली असती.
13 Sep 2011 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
कविता छान जमलीये....
@-वनराजाची आता कसोटी, वेसण त्याला घालायचीय
शिकार मात्र या वेळी रक्ताशिवाय करायचीय.. ....ये लाजवाब है....आहाहाहाहा येक नंबर... :-)
14 Sep 2011 - 6:21 pm | जाई.
रुपकात्मक कविता आवडली
14 Sep 2011 - 7:52 pm | नगरीनिरंजन
लोकांच्या जरा दिशाहीन, उस्फूर्त, भरकटलेल्या आंदोलनाच्या प्राण्याचे वर्णन चांगले आहे. शिवाय हा प्राणी न मारता नुसती वेसण घालायची आहे हे ही मस्त उतरलं आहे.
पुस्तकात वेदनेचा चेहरा नव्हता कुठेच छापला
सनावल्यांच्या गर्दीमध्ये इतिहास आमचा तेव्हाच फसला
काही चुका गाळ्ल्या तरी गाळ तसा बराच होता
पालखीतल्या संताचा चेहरा बराच खरा होता
या ओळी खूपच आवडल्या.
15 Sep 2011 - 5:38 am | स्पंदना
हात पाय नाक डोळे नसलेला एक प्राणी जंगलात शिरला
डोक्याच्या जागी एक भला मोठा पोकळ बुडबुडा, संतापाने भरलेला
शब्दहीन आक्रोशाचा लोट निव्वळ दिसत होता
पाय फुटलेल्या वाटांवरून दिशाहीन वाहत होता
__/\__