1

बाहुली

Primary tabs

पेशवा's picture
पेशवा in जे न देखे रवी...
1 Sep 2011 - 2:47 am

दिवा सरकव कोपऱ्यात
हा अगणित तहानलेला अंधार
घडी घातलेले पाय पोटाशी घेऊन
ह्या सर्वव्यापी काळ्या रात्रीत
ती निथळत उभी आहे
शब्दांनी न सांगता
इवले इवले हात तिच्यापुढे धरले
तिच्या हातात दहा दिशांच्या जत्रांतून आणलेल्या ह्या रंगीबेरंगी बाहुल्या
त्यांच्या डोळ्यात भाव शिवले आहेत
त्यांचे ओठ अजाण वेदनेच्या टाक्यांनी बहरले आहेत.

देहवीणा वाजविणारी बोटे
तुझ्याच पोतडीत सापडतील
तुला गाणे कधीच समजले नाही
'पाच तारांची' ओळख कधी सरली नाही
घर झडभर शिशिराचे पानपाचोळे बघत
खिडक्यांची दारे दर पावसात फुगतात
तसा ह्या दूर अनोळखी देशात... मी...
हे असंख्य तुकडे झालेले देहभान कसे सांधावे?
बाहुल्यानो शिकवाल का टाके कसे पेलावे?

खळखळून हसणारे अनेक चेहरे
त्यावरचे डोळे ख्रिस्ताच्या खिळ्यांची आठवण करून देतात
दोन्ही लुकलुकतात,
वेदनेच्या तळ्यावरील कवडशांसारखे
कापडी शरीरातील धडधडणारे हृदय
त्याच क्षणी गोळीबंद शीळ घालते
माझ्या दारासमोर उभा असलेला मॅपल
भगवा होताना क्षणभर स्तब्ध होतो
क्षणभरच...

गुंडाळशील ना व्यवस्थित हे काचेचे कोमलपण?
खळकन फुटले तर विषारी इजाही करेल...
डोळ्यात पाणी भरण्याचे दिवस आले की
हमखास एखादा कावळा समोरच्या फांदीवर येतो
बाहुली नटून-थटून चौकटीत येते
आणि घड्याळासारखा मी फिरत राहतो
पंख झडतात, बाहुलीचे रंग सुरुकुततात
चौकटी मात्र अधिकाधिक बळकट होतात
ठराविक ठिकाणी माझे गजर तसेच होत राहतात

निथळणारी तशीच तू का उभी आहेस?
ह्या थारोळ्यात माझीच उमटत आहेत
अज्ञात, भयावह प्रतिबिंबे
खालचे अटीतटीने सारवलेले हे अंगण
माझे परिटघडीचे बोलघेवडेपण
सारे तुझ्या तळव्याखाली लगदा होत आहे
तुझ्या डोळ्यात अजून एक बाहुली गवसल्याचे समाधान....
एकच शेवटची इच्छा आहे
सांगशील ? माझ्या डोळ्यांसाठी कुठले भाव निवडले आहेस?
ह्या ओठात कुठल्या कथेला टाके घालणार आहेस?

बिभत्सअद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

1 Sep 2011 - 3:21 am | शुचि

>> माझ्या डोळ्यांसाठी कुठले भाव निवडले आहेस?
ह्या ओठात कुठल्या कथेला टाके घालणार आहेस? >>

>> बाहुल्यानो शिकवाल का टाके कसे पेलावे?>>

अनेकदा वाचून मला असा अर्थ लागला की बाहुल्या हातात घेतलेली आणि विविध बाहुल्या गोळा करणारी ती म्हणजे "नियती" आहे.

कविता जबरी आहेच.

क्रेमर's picture

1 Sep 2011 - 3:44 am | क्रेमर

संवादपूर्ण स्वगत वाचावेसे वाटले, आवडले. अगणित, सर्वव्यापी, असंख्य, अज्ञात असे शब्द टाळायला हवे होते असे मला वाचतांना जाणवले. एकूणच आत्मवेदनेसाठी वैश्विककतेचा आव कशाला आणावा? शब्दांवर अधिक चिंतन केल्यास कविता प्रभावी होईल असे वाटते.

जाई.'s picture

1 Sep 2011 - 9:56 am | जाई.

प्रभावी कविता