सह्याद्रीच्या कुशीत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा

जातीवंत भटका's picture
जातीवंत भटका in कलादालन
18 Aug 2011 - 1:36 am

१५ ऑगस्ट सोमवार, म्हणजे जोडून सुट्ट्या आणि आमच्या सारख्या भटक्यांसाठी पर्वणी. पण नेमकी शनिवारी राखीपौर्णिमा आल्याने अखिल डोंगरयात्रा भगिनी मंडळामधल्या समस्त भगिनींनी वाडेश्वर मधे बैठा सत्याग्रह (मी त्याला खाद्याग्रह म्हणीन) मांडला. आणि जीवधन किल्ल्याला फाटा देऊन तीन दिवसांची मोहीम २ दिवसांवर आणली. या दोन दिवसात आम्ही दहा टाळकी कुकडनेरात (कुकडी नदीच्या खोर्‍यात) यथेच्छ भटकणार होतो. मी, श्रीकांत, शितल, प्राजक्ता, वृंदा, सतिश, प्रियांका, राहूल, गौरव आणि मयूर असा फौजफाटा जमा झाला होता.

शनिवारी पहाटे ५.३० ला साखर झोपेत लवंडलेलं पुणं सोडलं आणि नाशिक हमरस्त्याला लागलो. नारायणगावहून जुन्नरकडे जाणारा फाटा घेतला. शिवजन्मभूमी जुन्नरमधे शिरताच शिवनेरीचं रांगडं रुप डोळ्यात भरलं. माथ्यावर ढगांची दाटी जमली होती. त्या पावन भूमीवर सडे शिंपण्याची जणू काही स्पर्धा लागली होती. आमच्या आजच्या वेळापत्रकात चावंड आणि कुकडेश्वर होते. वेळ न दवडता आम्ही गाड्या चावंडवाडीच्या दिशेने हाकल्या. चालत गेलो असतो ( किंबहुना रस्त्यावरचे खड्डे आणि त्यातलं पाणी यामुळे पोहोत गेलो असतो असेही म्हणू शकतो) तर लवकर पोहोचलो असतो, इतका खराब रस्ता होता. जागोजागी खड्डे आणि त्यात भरलेलं पावसाचं गढूळ पाणी त्यामूळे अंदाज साफ चुकत होते. माझ्या गाडीला जर मनुष्यवाणी येत असती तर असल्या खराब रस्त्यावर आणल्याबद्दल तिने माझ्या सकट माझ्या खानदानाचाही उध्दार केला असता. चावंडवाडीत पोहोचलो तेव्हा ९.०० वाजले होते. चावंडचे नामकरण श्री शिवाजी महाराजांनी "प्रसन्नगड" असे केले होते.


चावंड उर्फ प्रसन्नगड

चहूबाजूंना सरळसोट कातळकडे असलेला हा बेलाग दुर्ग म्हणजे जुन्नरच्या शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या दुर्ग चौकडीतील एक अनोखं रत्न आहे. अंदाजे ८० अंशातला हा उभा कडा खोदून त्यात पायर्‍या घडवल्या आहेत. चावंडच्या कड्यांकडे पहाताना माझ्याच एका कवितेतलं कडवं मनात रेंगाळत होतं.

"तासिले कडे अभेद्य,
घडविले दुर्ग बेलाग...
सळसळती मनगटे मराठी,
अन् समशेर ओकते आग ..."

आश्रमशाळेजवळ गाड्या लावून आम्ही निघालो. पावसाची रिमझिम चालूच होती. आश्रमशाळेच्या मागूनच एक वाट चावंडवाडीहून येणार्‍या वाटेस जाऊन मिळते. पहिला सोप्पा टप्पा २० मिनिटात संपवून आम्ही चावंडच्या कड्यानजिक येऊन ठेपलो. इथून पुढे खरा कस लागणार होता. सरळसोट कडा तासून केलेल्या पायर्‍या, त्यावर वहाणारं पाणी, पायर्‍यांवर वाढलेलं शेवाळं आणि आधारासाठी कोण्या निसर्गवेड्या फॉरेस्ट ऑफिसरने लावलेल्या शिड्या या सगळ्यांच्या बेमालूम मिश्रणातून एक आव्हानात्मक वाट वर चढत होती. शक्यतोवर शिडीचा आधार घेऊ नका, उजव्या हाताने कड्यातील बेचक्यांना घट्ट पकड घ्या, पुढच्या पायाला घट्ट पकड मिळाल्यावरच दुसरा पाय पुढे टाका ... अश्या अनेक सुचना मी गोटातल्या सगळ्यांना दिल्या आणि एकेकाने वर जाण्यास सुरुवात केली. चावंडच्या त्या पायर्‍या एक वेगळंच थ्रिल देऊन गेल्या.


चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्‍या


चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्‍या


चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्‍या


चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्‍या

वाटेत आधारासाठी एक जंबुरा (छोटेखानी तोफ) पुरली आहे, हे पाहून हळहळ वाटली. किल्ल्यांवरील तोफांची मोजणी आणि संवर्धनासाठी काम करणारा माझा मित्र आणि इतिहास तज्ञ सचिन जोशी याच्या मनाची तळमळ आठवली.


वाटेत आधारासाठी पुरलेली तोफ

शेवटच्या टप्प्यातील पायर्‍या आधीच्या तुलनेत जरा प्रशस्त आणि दिड दोन फूट उंचीच्या आहेत. चावंड आणि हडसर किल्ल्यांचे दरवाजे प्राचीन काळातील प्रगत दुर्गबांधणी तंत्राची साक्ष देत आजही उभे आहेत. अखंड पाषाणात कोरलेल्या या दरवाजांकडे पाहताना एक वेगळीच अनुभूती येते.


चावंडचा दरवाजा आणि पायर्‍या


चावंडचा दरवाजा आणि पायर्‍या


चावंडचा दरवाजा आणि पायर्‍या

तासाभरात गड फिरून मनाजोगती छायाचित्रे घेतली आणि परतीच्या वाटेकडे लागलो.


वाटेवरून दिसणारी महादेव कोळ्यांची वस्ती चावंडवाडी आणि माणिकडोह धरणाचा विस्तृत जलाशय


माणिकडोह धरणाचा विस्तृत जलाशय


नाजूकतेची वरकडी आहे !!


रे फुलांची रोख किंमत करु नये कोणी ...


फुलले रे क्षण माझे .... फुलले रे !!


मधेच हा भेटला !!


तटबंदीवरून दिसणारं कुकडीचं खोरं आणि समोरचा शंभू डोंगर


चावंडवर माजलेलं गवत मागे शंभू डोंगर


चावंडच्या बालेकिल्ल्यावरील चामुंडा मातेचं मंदीर (किल्ल्यावरील सर्वोच्च जागा)


हरिश्चंद्र गडावरील कुंड आणि रतनवाडीतील कुंडाशी साम्यर्ध असलेलं चावंडवरील कुंड


कुंडाशेजारील मोडकळीस आलेली कमान


अवशेष


झाडोर्‍यात लपलेली पिंड


चावंडवरील सप्त मातृकांची टाकी (सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत)


वाटेवर पडलेले दगडी उखळ


चावंड उतरताना दिसणारी दरी आणि चावंडवाडी (फिश आय फिल्टरची करामत)

आश्रमशाळेसमोरील हापश्यावर चिखलाने माखलेले हातपाय धुवून घेतले. प्रियांका आणि शितलने आश्रमातल्या मुलींना मेहंदी काढायला घेतली आणि मी शाळामास्तरांशी गप्पा मारायला सटकलो. या आश्रमशाळेतील मुलींची संख्या लक्षणीय आहे. तिथेच त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्थाही आहे.


मेहंदी कार्यक्रम


मेहंदी कार्यक्रम


कुतुहल आणि निरागसता !!

मी बरोबर आणलेल्या औषधांच्या संचातील एक संच शाळामास्तरांकडे दिला आणि आम्ही चावंडवाडीचा निरोप घेतला. दरवेळी ट्रेकला जाताना मी प्रार्थमिक औषधांचे ३-४ संच सोबत घेऊन जातो. ज्या गावात दवाखाना नसेल किंवा गावापासून बराच लांब असेल अशा गावांतील शाळामास्तरांकडे किंवा सरपंचाकडे हे संच देऊन ठेवतो. यावेळेस माझ्यासोबत वृंदानेही एक संच आणला होता, जो आम्ही घाटघर मधे दिला.

आमचं पुढलं लक्ष होतं पूर गावचा कुकडेश्वर !! अदमासे २५०० वर्षांपूर्वीचे पाषाणात घडवलेले शिवमंदीर आणि कुकडी नदीचं हे उगमस्थान जिच्या पाण्यावर माणिकडोह धरण बांधलं आहे. मध्यंतरी पुरातत्व खात्याने पूर्वीचे पडझड झालेले मंदीर उतरवून पुन्हा त्याची नव्याने उभारणी केली आहे.


कुकडेश्वर मंदीर जीर्णोद्धारानंतर


कुकडेश्वर मंदीरावरील मुर्तीकाम


कुकडेश्वर मंदीरावरील नक्षीकाम


कुकडेश्वर


कुकडेश्वर मंदीरावरील नक्षीकाम


कुकडेश्वर मंदीरावरील मुर्तीकाम


कुकडेश्वर मंदीरावरील मुर्तीकाम


हरिश्चंद्रगडावरील मंदिराशी साम्यर्ध असणारं नक्षीकाम


पुजारीबाबा ( बम् बम् भोले !!! )

अजूनही मंदीराच्या पूर्वीच्या बांधकामातील काही शिलाखंड कचर्‍यात पडले आहेत. छपरावर ढीगभर सिमेंट ओतून त्यांनी संवर्धन केले आहे ? की मंदीर कुरूप करण्यास हातभार लावला आहे ? हा वादाचा मुद्दा आहे. दुपारचे जेवण उरकताना आजच्या वेळापत्रकात नाणेघाटाचा समावेश करण्याचा ठराव एकमताने पास झाला. गाड्या घाटघरच्या दिशेने हाकल्या.

रस्त्याची अवस्था फारच बिकट होती. घाटघर गावातील हनुमान मंदीरात मुक्काम करण्याचं आधीच ठरलं होतं पण दुर्दैव ! मंदीरात वेडावाकडा पाऊस आणि धुकं यामुळे पाणी साठलं होतं. शाळेची किल्ली शोधायला बाळू आसवलेचं घर गाठलं. त्यांच्याकडे पण किल्ली नव्हती पण त्यांनी अतिथी देवो भवः या वचनाला जागून आम्हाला त्यांच्याच घरात रहाण्यासाठी जागा दिली. मुक्कामाची सोय झाली होती. मधला वेळ सत्कारणी लावून प्राजक्ता आणि वृंदा (या दोघींना चहाचं भारी व्यसन आहे) यांनी गावात एका घरात आम्हाला चहा मिळेल याची व्यवस्था केली होती. चहा पिऊन आम्ही नाणेघाटच्या दिशेने निघालो.

घाटावर तूफान वारा होता आणि पाऊस तर अक्षरशा: फटके मारत होता. नाणेघाटाच्या पोटात गुहा आहेत त्यात ५० एक माणसे सहज राहू शकतील. सातवाहनांच्या काळात नाणेघाट हा कोकणातून देशावर येणारा व्यापारी मार्ग होता. कल्याण, नालासोपारा या बंदरातून माल प्रतिष्ठान ( आताचे पैठण ) या सातवाहनांच्या राजधानीकडे नेला जायचा. नाणेघाटावर या मालावर जकात आकारली जायची. सातवाहन साम्राज्ञी नागनिका हिने नाणेघाटात गुहा खोदल्याची नोंद इतिहासात आहे. गुहेतील भिंतीवर आकडेमोड सदृश्य शिलालेखही आहेत. घाटाच्या तोंडावरच एक दगडी रांजण असून त्यात जकात गोळा केली जात होती अशीही माहीती वाचनात आहे. नाणेघाटच्या वर एक अंगठ्यासारखा सुळका आहे ज्याचे "नानाचा अंगठा" असे नाव प्रचलित आहे. याच घाटरस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी चावंड, हडसर, निमगिरी यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली. ऐतिहासिक महत्व असलेल्या या नाणेघाटची मात्र आपल्याच लोकांकडून उपेक्षा होत आहे. आम्ही नाणेघाटात शिरताच पहिले दृश्य गुहेत कोंडाळं करून दारू पिणार्‍या काही स्थानिक मंडळींच होतं. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ हाच त्यांच्यात संभाषणाचा मुख्य मुद्दा असावा. त्यांची ती मुक्ताफळे जर का राणी नागनिकेने ऐकली असती तर कदाचीत तिने त्या करंट्यांना नानाच्या अंगठ्यावरून कडेलोटाची शिक्षा केली असती. आम्ही तिथे थोडे फोटो काढून काढता पाय घेतला.


नाणेघाटातून दिसणारं तळकोकण


गुहा आणि बाजूला पाण्याची टाकी


ब्राम्ही भाषेतील शिलालेख


चिंबाळलेला नाणेघाट


जकात गोळा करण्याचा दगडी रांजण


माझी लाडली :)

रात्री जेवणासाठी मी नुडल्सचं सूप आणि मुगाची डाळीची खिचडी केली होती. मधल्या वेळेत प्राजक्ताने बाळूच्या लहान लहान मुलींच्या हातावर मेहंदी काढून दिली.


मुगाच्या डाळीची खिचडी बनवताना मी आणि प्राजक्ता


खिचडीचा मंद सुवास दरवळू लागला होता ...


बाळूच्या लहानग्यांच्या हातावर मेहंदी काढताना प्राज.
( वरील तीनही फोटो वृंदाच्या सौजन्याने )

दुसर्‍या दिवशी सकाळी गावात प्रभातफेरी आणि झेंडावंदनाचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही लगेच निद्राधीन झालो.

सकाळी शाळेतील मुलांची प्रभातफेरी पाहून मन एकदम प्रसन्न झाले. त्यानंतर सर्व विद्यार्थी, गावातील सर्व जेष्ठ मंडळी, सरपंच, आम्ही पर्यटक आणि सह्याद्रिचे अनादीअनंत धीरगंभीर कातळकडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सोनेरी सूर्यकिरणं गावावर डोकावत होती, पावसाच्या हलक्या सरीही कोसळत होत्या.


ढगांची दुलई पांघरलेला घाटघरचा कुलपुरूष जीवधन


वंदे !!! मातरम !! जय जवान !! जय किसान !!!


भालतमाता की !!!! जय !!!! चे बोबडे बोल !!


ध्वजारोहण सोहळा

श्रावणातल्या या भारलेल्या वातावरणात राष्ट्रगीत सुरू झाले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या कुशीत स्वातंत्र्य दिन साजरा करायच्या माझ्या परंपरेला मी जागलो होतो. डौलाने फडकणार्‍या तिरंग्यासमोर मनोमन नतमस्तक झालो. यासगळ्यांत माझ्या भटकीची (माझ्या अर्धांगिनीची) अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. थोडे फोटो काढून आम्ही सामानाची बांधाबांध सुरू केली. आजचं लक्ष होतं हडसर !!


विजयी विश्व तिरंगा प्यारा ... झंडा उंचा रहे हमारा !!!


नतमस्तक आम्ही येथे !!

हडसर गावात गाड्या लावून आम्ही हडसरवर जाण्याचा राजमार्ग स्विकारला. पहिल्या पठारावर येताच समोर पसरलेल्या या गडाचं दुसरं नाव पर्वतगड का असावं याची प्रचिती येते.


पसरलेला हडसर उर्फ पर्वतगड

गडावर जाण्यासाठी अजून दोन मार्ग आहेत. एक गावकर्‍यांनी कातळात खुंट्या ठोकून केलेला मार्ग आणि दुसरा तटबंदीकडून चढून जाणारा मार्ग. राजमार्गाने जाण्याचे दोन फायदे आहेत. वाटेत पिण्याच्या पाण्याचे एक भुयारी टाके लागते आणि डोंगराच्या नळीतून बांधून काढलेल्या १००-१५० पायर्‍या पहायला मि़ळतात. अगदी पायर्‍यांपर्यंत गेल्या शिवाय त्या ठिकाणी अशी काहि पायर्‍यांची वाट आहे हे लक्षात येत नाही. वाट अगदी सोपी आहे.


पठाराहून दिसणारं निसर्गचित्र


हडसरला वळसा मारताना एका वेगळ्या कोनातून दिसणारा कातळकडा


लपाछपी खेळत होता बेटा !! पण आम्ही त्याला पकडला !!


कड्यात खोदलेलं नितळ पाण्याचं टाकं


याच नळीतून हडसरच्या पायर्‍या आहेत


नळीच्या तोंडाशी डावीकडून प्रियांका, गौरव, सतिश, मी, मयूर, वृंदा, प्राजक्ता, श्रीकांत आणि शितल.


नळीतील पायर्‍यांची वाट


तटबंदीवरून दिसणारी पायर्‍यांची वाट

पायर्‍या संपल्यावर बोगदेवजा पायर्‍या असलेले हडसरचे दोन कातळात खोदलेले दरवाजे लागतात. दरवाज्यात पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. हडसरच्या दरवाज्यावर असलेल्या खोदिव पायर्‍या म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अतिउच्च नमूना आहे. या पायर्‍यांतून पावसाचे पाणी जाण्यास पन्हाळी सुद्धा खोदलेली आढळतात. गडावर पाण्याची मुबलक टाकी आहेत. शंकराच्या मंदीरात ५-६ जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. मंदीरात कोनाड्यांत गणपती बाप्पा, हनुमान आणि गरूडाच्या मुर्ती आहेत. मंदीराच्या अलिकडे मोठ्ठा तलाव आहे. तटबंदीलगत जमीनीत खोदलेल्या धान्याच्या ३ कोठ्या आहेत. पण त्या रहाण्यायोग्य नक्कीच नाहीत.


अखंड कातळात खोदलेला हडसरचा दरवाजा


अखंड कातळात खोदलेला हडसरचा दुसरा दरवाजा


स्वर्गाचे दार हेच काय हो ??


हडसरचा प्रसिध्द खोदिव पायर्‍यांचा जिना


समोरील टेकडीवरून दिसणारा हडसरचा नजारा


दगडी पायर्‍यात खोदलेली पन्हाळी


शिवमंदीराकडे जाणारी पायवाट


हडसरवरील रमणीय शिवमंदीर


शिवमंदीरातील गणेश मुर्ती


शिवमंदीरातील हनुमान मुर्ती


शिवमंदीरातील गरूड मुर्ती


हडसर वरील शिवपिंड


गडाच्या उगवतीकडे असणारी गुहा


गडाच्या उगवतीकडे असणारी गुहा


गडाच्या उगवतीकडे असणारी गुहा


धान्याची कोठारं


धान्याची कोठारं


धान्याच्या कोठारांकडे जाणारा मार्ग


हडसरच्या पठारावर फुललेली रानफुलं


हडसरवरील तलाव आणि मागे शिवमंदीर


हडसरच्या पठारावर फुललेली रानफुलं


हडसरच्या पठारावर फुललेली रानफुलं

तास दिडतास गड हिंडून गावाची वाट धरली. गावात आल्यावर रस्त्यालगतच्या ओढ्यावर १५-२० मिनिटे चिखलाने बरबटलेले हात पाय आणि बूट धुण्याचा सामुहीक कार्यक्रम झाला.

गेल्या दोन दिवस सह्याद्रीत घालवून परत शहराची वाट धरणं जीवावर आलं होतं. माहेराहून सासर कडे निघालेल्या एखाद्या माहेरवाशिणीच्या मनाची जी अवस्था होते तशी काहीशी अवस्था माझ्या मनाची झाली होती. पावलं निघत नव्हती पण कसेबसे मी स्वता:ला गाडीत कोंबले. या भटकंतीच्या बर्‍याचशा आठवणी मनात आणि काहीशा कॅमेर्‍यात साठवून परतीची वाट धरली.

प्रवास

प्रतिक्रिया

ढब्बू पैसा's picture

18 Aug 2011 - 1:44 am | ढब्बू पैसा

भटक्या फोटो सुरेख आहेत.
आणि मला भारतात नसल्याचा खूपच पश्चाताप होतोय!
माझी जळजळ तुझ्यापर्यंत पोचली आहेच म्हणा ;)

स्वातंत्र्यदिन फार योग्य रीतीने साजरा केलात, दर भटकंतीदरम्यान औषधं बरोबर घेऊन गावा-गावांत वाटणं ही अप्रतिम कल्पना आहे, तुमचं आणि तुमच्या सहकार्‍यांचं त्याबद्दल अभिनंदन!

गावच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, झेंडावंदन हे फार आवडलं!

मी खूप वर्षांपूर्वी यांतल्या चावंड, माणिकडोह या भागात भटकलो होतो. ती रस्त्यात पुरलेली छोटी तोफ पाहिल्याचं आठवतंय. (आज-काल नाशिक सारख्या शहरांमधून नवीन लावलेले सरकारी वीजेचे खांब, तांब्याचे सामान, फ्लाय-ओव्हरच्या बांधकामातील लोखंडी जाळ्या अशा गोष्टी आणल्या दिवशीच चोरीला जातात, त्या पार्श्वभूमीवर ही पितळेची तोफ अजून चोरीला गेलेली नाही हे सुदैवच म्हणायचं!)

पुढल्या ट्रेक मध्ये 'भटकी'चीही साथ असेल अशी शुभेच्छा!

+ १

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वातंत्र्यदिन फार योग्य रीतीने साजरा केलात, दर भटकंतीदरम्यान औषधं बरोबर घेऊन गावा-गावांत वाटणं ही अप्रतिम कल्पना आहे, तुमचं आणि तुमच्या सहकार्‍यांचं त्याबद्दल अभिनंदन!

+१

मालक, फोटो आणि वर्णन केवळ सुरेख.

-दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2011 - 7:37 am | राजेश घासकडवी

संपूर्ण लेख वाचला नाही, नुसते फोटोच बघितले. तुमच्या भटकंतीचं चित्ररूपी दर्शन छान घडलं.

फोटो खूप छान आले आहेत. मला वाटतं या सर्वांचे दोन किंवा तीन आल्बम/लेख केले असते तर जास्त चांगलं झालं असतं.

जातीवंत भटका's picture

18 Aug 2011 - 12:34 pm | जातीवंत भटका

मलाही लेख पूर्ण झाल्यावर असंच वाटलं पण कंटाळा नामक मित्राने घात केला, नाहीतर दोन भागातच देणार होतो. :०)

स्पा's picture

18 Aug 2011 - 8:26 am | स्पा

असेच म्हणतो.. फोटू लोड व्हायला खूप वेळ गेला...

असो पण लेख आणि फोटो दोन्ही चाबूक

चिंतामणी's picture

18 Aug 2011 - 8:52 am | चिंतामणी

सचीत्र लेख छान.

"पठाराहून दिसणारं निसर्गचित्र " केवळ अप्रतीम. चित्रच वाटते ते.

किसन शिंदे's picture

18 Aug 2011 - 9:33 am | किसन शिंदे

जबरदस्त भटकंती केलीस आणी करतोही आहेस, वर बहुगूणी यांनी म्हटल्याप्रमाणे भटकंतीला जातेवेळी तुझी औषधांचे संच बरोबर घेऊन ते गरजूंना वाटण्याची कल्पना अप्रतिम आहे. तुझ्या कलादालनातल्या लेखांबद्दल आम्ही काय बोलावं? तुझे हे लेख आमच्यासाठी मोठी पर्वणीच असतात.

पाषाणभेद's picture

18 Aug 2011 - 9:54 am | पाषाणभेद

खुष केलंस गड्या,

जय हिंद!

प्रचेतस's picture

18 Aug 2011 - 10:12 am | प्रचेतस

अतिशय सुरेख लेख आणि तितकेच सुंदर वर्णन.
चावंडला अजून जाणे झालेले नाही, नाणेघाटाच्या तर कित्येक सफरी केल्यात. हडसरला मागच्या वर्षी केलेल्या सफरीची आठवण झाली.
निसर्ग आपले रंग वेगाने बदलतो हेच खरे. पावसाळ्यात तर तो आपले सर्व सौंदर्य उधळत येत असतो.

अदमासे २५०० वर्षांपूर्वीचे पाषाणात घडवलेले शिवमंदीर

हे शिवमंदिर ९ व्या शतकातले शिलाहारांच्या झंझ राजाने बांधलेले आहे. खिरेश्वरचा नागेश्वर, हरिश्चंद्रगडावरचा हरिश्चंद्रेश्वर, रतनवाडीचा अमृतेश्वर याच काळातील.

अमोल केळकर's picture

18 Aug 2011 - 10:17 am | अमोल केळकर

प्रसन्न गड आणि सभोवतालचा निसर्ग पाहून ' मन' अगदी प्रसन्न झाले :)

अमोल केळकर

शैलेन्द्र's picture

18 Aug 2011 - 10:25 am | शैलेन्द्र

चाबुक लेख, अन त्याहीपेक्षा चाबुक भटकंती..

सहज's picture

18 Aug 2011 - 10:37 am | सहज

_/\_

नगरीनिरंजन's picture

18 Aug 2011 - 11:04 am | नगरीनिरंजन

मस्त!

स्वतन्त्र's picture

18 Aug 2011 - 11:06 am | स्वतन्त्र

सह्याद्रीच्या कुशीत,किल्ल्यांच्या सानिध्यात जाउन,स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची कल्पनाच भन्नाट !

निनाद's picture

18 Aug 2011 - 11:13 am | निनाद

फार सुंदर - असे भटकवून आणल्या बद्दल अनेकानेक आभार. मोठीच फेरी केलीत. चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्‍या आवडल्या. तुमचा औषधचांचा उपक्रमही आवडला. त्या बरोबर मराठी भाषेतील - औषधे कशी वापरावीत - असे पत्रकेही द्यावीत ही विनंती. मग माणूस बदलला तरी माहिती तेथे राहील ही आशा.

वाटेत आधारासाठी एक जंबुरा (छोटेखानी तोफ) पुरली आहे, हे पाहून हळहळ वाटली. किल्ल्यांवरील तोफांची मोजणी आणि संवर्धनासाठी काम करणारा माझा मित्र आणि इतिहास तज्ञ सचिन जोशी याच्या मनाची तळमळ आठवली.

हे पाहून मलाही हळहळ वाटली. प्रत्येक तोफेकडे किती कहाण्या असतील इतिहासाच्या किती ठेव्यांना आपण आपल्या हस्तेच मुकावे... :(
इतिहास तज्ञ सचिन जोशी यांच्या विषयी वाचायला फार आवडेल. त्यांच्या कार्याची ओळ्कह स्वतंत्र लेखात करून द्यावी ही आग्रहाची विनंती.
कुंडाशेजारील मोडकळीस आलेली कमान पाहून परत तीच हळहळ. चावंडवरील सप्त मातृकांची टाकी (सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. अशी पाण्याची विभागणी का केली असावी असा प्रश्न मनात येऊन गेला. सिव्हिलायझेशन्स या मालिकेतील मास्टर्स ऑफ रिव्हर्स ही डॉक्युंमेंटरी पाहिलेली आठवली त्यात ढोलवीरा येथील प्राचीन नगरातही धरणाद्वारे अशी पाण्याची अनेक भव्य कुडे बांधलेली होती त्याचे मॉडेल पाहायला मिळाले होते. - काहीसे साम्य जाणवले.

सरकारद्वारे मंदिराची पुनर्बांधणी हा अतिशय क्लेशदायक प्रकार असतो! त्यापेक्षा ते तसेच राहिले तर अजून चांगल्या प्रकारे जपणूक होते अशी माझी खात्री आहे.
झेंडा वंदनाची, प्रभात फेरीची चित्रे दिल्या बद्दल किती आभार मानू? मन उचंबळून आले!

तुम्ही या सर्व विभागांची इतिहासाच्या खुणांची तपशिलवार चित्रे काढून नोंद ठेवताय हे मोठे काम करत आहात. हे आश्वासक आहे. या आधारावर एक एक किल्ल्यांची मोठी चित्र गॅलरी विकीवर उभी राहू शकेल. अर्थात तुम्हाला त्यात रस असेल तर.

मुलांच्या हातावर मेंदी काढून देण्याची कल्पना मस्तच आहे, खुप आवडली.
शिवमंदिराची जागा खूप आवडली मनाने तेथे जाऊन आल्यासारखे वाटले! तुम्ही नशीबवान आहात की अशी मस्त भटकंती पावसाळ्यात करताय...

स्वाती दिनेश's picture

18 Aug 2011 - 11:23 am | स्वाती दिनेश

लेख, चित्रे , मेंदी, औषध वाटप, सह्याद्रीच्या कुशीतला स्वातंत्र्यदिन सगळंच फार आवडलं,
स्वाती

निनाद's picture

18 Aug 2011 - 11:28 am | निनाद

गेल्या दोन दिवस सह्याद्रीत घालवून परत शहराची वाट धरणं जीवावर आलं होतं. माहेराहून सासर कडे निघालेल्या एखाद्या माहेरवाशिणीच्या मनाची जी अवस्था होते तशी काहीशी अवस्था माझ्या मनाची झाली होती. पावलं निघत नव्हती पण कसेबसे मी स्वता:ला गाडीत कोंबले. या भटकंतीच्या बर्‍याचशा आठवणी मनात आणि काहीशा कॅमेर्‍यात साठवून परतीची वाट धरली.

याच्याशी १००% सहमत आहे. निसर्गात भटकल्यावर शहरात परत जाणे म्हणजे मला अ‍ॅसिड वॉश घेतल्या सारखे वाटते. ते भगभगणारे दिवे, इमारती, गर्दी आणि भरधाव जाणार्‍या मोटारी हे सगळे खरोखर नकोसे असते - अतिशय नकोसे!

श्रावण मोडक's picture

18 Aug 2011 - 11:44 am | श्रावण मोडक

दंडवत!

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2011 - 1:25 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच दंडवत!

Nile's picture

18 Aug 2011 - 1:39 pm | Nile

हेवा वाटला.

Nile's picture

18 Aug 2011 - 1:39 pm | Nile

हेवा वाटला.

स्मिता.'s picture

18 Aug 2011 - 2:04 pm | स्मिता.

सर्व फोटो अतिशय सुंदर आहेत. ते बघून काही वर्णन करायलाच सुचत नाहीये. प्राथमिक औषधांचा संच, मेहंदी या कल्पना खूप आवडल्या. पुढल्या भटकंतीकरता शुभेच्छा!! :)

विसुनाना's picture

18 Aug 2011 - 2:12 pm | विसुनाना

या सफरीला आम्हालाही घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद.

हे आणि असे गडकोट पायी फिरून प्रत्यक्षात बघणे आता शक्य नाही हे जाणवत आहे. :(

छोटा डॉन's picture

18 Aug 2011 - 2:14 pm | छोटा डॉन

च्यामारी, आता काय म्हणावं रे तुम्हा लोकांना ?
अक्षरशः दंडवत रे बाबांबो !
_/\_

बघुयात आमचा योग कधी जमतोय ते.

- छोटा डॉन

शाहिर's picture

18 Aug 2011 - 2:51 pm | शाहिर

लै भारी आहे ..सर्व काही !!
आम्च्या सार्ख्या लोळ्यां ना लाज वाटते हो स्वताची असे भन्नाट कही पाहिले कि

एक चित्रं हजार शब्दांच काम करते म्हणातात.
तुझ्या या बोलक्या चित्रांनी याची पुन्हा एकदा प्रचिती आणली.
बाकी बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत.
_/\_

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 3:18 pm | आत्मशून्य

झेंडा वंदन एकदम मस्त झालेलं दिसतयं. आणि निसर्गसौंदर्या बद्दल तर काय बोलायचं ? शब्द अपूरे...

दीप्स's picture

18 Aug 2011 - 3:22 pm | दीप्स

खूपच छान !!

तुमची गावागावात औषधे देण्याची कल्पना खूपच छान आहे. हा उपक्रम आवडला आणि प्राजक्ताची मेहंदी पण खूप आवडली संगातीला. आणि खूपच हेवा वाटतो तुमच्या टीमचा. खूपच नशीबवान आहेत तुम्ही १५ ऑगस्ट तुम्ही सह्याद्रीच्या कुशीत साजरा केलात कारण भारताच्यास्वतंत्र लढ्यात अग्रगण्य नाव आहे ते सह्याद्री. शिवाजी महाराजांना गनिमीकाव्याने लढता आले असेल तर ते या सह्याद्रीमुळेच, तिच्या निसर्ग निर्मित रचने मूळे, विविधतेने नटलेल्या पर्वत रांगामूळे. सह्याद्री आपल्याला खूप काही सांगते आपला इतिहास, आपली संस्कुर्ती, आपल्या परंपरा.

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्‌ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले. हिंदवी स्वराज्यासाठी सह्याद्रीची गिरिशिखरे, पशू-पाखरे, झरे-पऱ्हे, घोरपडी नव्हे; तर अवघा निसर्गच जणू या महत्कार्यासाठी सज्ज झाला होता.

आणि हो फोटो नेहमीसारखेच खूप छान आहेत. पुन्हा एकदा पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा !!

प्राजक्ता पवार's picture

18 Aug 2011 - 3:27 pm | प्राजक्ता पवार

अप्रतिम फोटो . भटकंतीचे वर्णन आवडले :)

नि३सोलपुरकर's picture

18 Aug 2011 - 4:04 pm | नि३सोलपुरकर

अप्रतिम वर्णन, फोटो पाहून ' मन' अगदी प्रसन्न झाले

आणी वर शाहिर यानी म्ह्ट्ल्याप्रमाणे "आम्च्या सार्ख्या लोळ्यां ना लाज वाटते हो स्वताची असे भन्नाट कही पाहिले की "----------- १००% सहमत...

पुढल्या भटकंतीकरता शुभेच्छा!!

बाकी तुम्ही मागच्या वेळी आवतान द्यायचे कबुल केले होते...सायबा

अप्रतिम या पेक्षा एक ही शब्द माझ्याकडुन येवुच शकत नाहि..

तुझे सर्व फोटो मला आवडतातच.. त्यातुनही निरागस मुलांचे फोटो मला नेहमीच आवडतात भावतात...

अप्रतिम या पेक्षा एक ही शब्द माझ्याकडुन येवुच शकत नाहि..

तुझे सर्व फोटो मला आवडतातच.. त्यातुनही निरागस मुलांचे फोटो मला नेहमीच आवडतात भावतात...

प्रभो's picture

18 Aug 2011 - 7:08 pm | प्रभो

क ड क फोटू!!

मुलूखावेगळी's picture

18 Aug 2011 - 7:32 pm | मुलूखावेगळी

छान , मस्त लेख न फोटु

शुचि's picture

18 Aug 2011 - 9:28 pm | शुचि

अप्रतिम फोटो.

जबरदस्त फोटो आणि वर्णन जाभ, आणि नविन गाडीचं अभिनंदन.

स्वैर परी's picture

19 Aug 2011 - 2:15 pm | स्वैर परी

नुसतं तुमच्या भटकंतीला नाही, तर दंडवत तुमच्या जोमाला, ईच्छेला, संकल्पनेला! लेख आणि फोटो दोन्ही मनापासुन आवडलेत. :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2011 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार

__/\__

अशक्य आहेस बाबा तू !

फटू आणि विस्तृत वर्णन अतिशय आवडले. भटकंती बरोबरच तू इतरही जे समाजोपयोगी कार्य करतो आहेस ते विशेष भावले :)

बादवे :- शंकराची 'पिंड' नसते रे 'पिंडी' असते.

माझ्या गाडीला जर मनुष्यवाणी येत असती तर असल्या खराब रस्त्यावर आणल्याबद्दल तिने माझ्या सकट माझ्या खानदानाचाही उध्दार केला असता.

नाहीतर काय !
अशी इकडे तिकडे दामटता आणि मग पडतात स्क्रॅच :P

जे.पी.मॉर्गन's picture

19 Aug 2011 - 5:51 pm | जे.पी.मॉर्गन

+११११११
दंडवत ! _/\_

जे पी

पल्लवी's picture

19 Aug 2011 - 3:21 pm | पल्लवी

_/\_

पल्लवी's picture

19 Aug 2011 - 3:21 pm | पल्लवी

_/\_

धमाल मुलगा's picture

19 Aug 2011 - 7:03 pm | धमाल मुलगा

आमचा आता साष्टांग नमस्कारच घ्यावा म्हाराजा...

धन्य धन्य जाहलो!
अधिक काय बोलावे? तो निसर्ग, ती वेळ आणि ते ध्येय्य...आमचे आपले शब्द बापुडे केविलवाणे असं झालंय.

प्राजु's picture

19 Aug 2011 - 8:56 pm | प्राजु

____________/\_____________

अगदी कोपरापासून दंडवत..!

काय फोटो आहेत का खेळ!!
अशक्य!!

जाई.'s picture

19 Aug 2011 - 10:24 pm | जाई.

वृतांत आणि फोटो अतिशय अप्रतिम.
छान वाटल.
तुम्ही करत असलेल्या कार्याला माझा दंडवत_/\_

अन्या दातार's picture

19 Aug 2011 - 11:26 pm | अन्या दातार

अप्रतिम!!!

पैसा's picture

21 Aug 2011 - 7:53 pm | पैसा

वर्णन आणि फोटो खासच आलेत!

सविता००१'s picture

22 Aug 2011 - 2:10 pm | सविता००१

अप्रतिम फोटो आणि सुंदर वर्णन.

भन्नाटभानु प्रकाशचित्रे आणि वर्णनं....

जियो! (शब्दसौजन्य- तात्या)

स्पंदना's picture

29 Aug 2011 - 7:15 am | स्पंदना

येस्स!!

जियो !

सुमीत भातखंडे's picture

29 Aug 2011 - 10:32 pm | सुमीत भातखंडे

छान सफर घडवलीत.
दंडवत आणि धन्यवाद!