माझी कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
4 Jul 2008 - 10:31 pm

प्रयत्नही करुनही जमत नाही कविता
तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप
माझ्या अहंकाराला डिवचतो.
ही अस्वस्थता कोसळत जाते,
तिन्ही सांजेला.

धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.

आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.

कवितामत

प्रतिक्रिया

सुवर्णमयी's picture

5 Jul 2008 - 3:41 am | सुवर्णमयी

शेवट अतिशय आवडला.
सोनाली

चतुरंग's picture

5 Jul 2008 - 4:23 am | चतुरंग

अथक भरुन आलेल्या आभाळाने स्वत:चेच वजन असह्य होऊन बेधुंद कोसळणार्‍या पावसाच्या रुपाने जमिनीवर धाव घ्यावी तशी, बिरुटे साहेबांच्या काव्य प्रतिभेने मिपावर धाव घेतली!! :)

छान मुक्तछंद साधलाय प्रा.डॉ. अजून कविता येऊदेत.

चतुरंग

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Jul 2008 - 6:47 am | श्रीकृष्ण सामंत

डॉ.दिलीपजी,
वैचारिक मनस्ताप जेव्हा अहंकाराला डिवचतो
त्याच वेळी अश्या कवितेची निर्मीती होते.
स्वानुभव
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर's picture

5 Jul 2008 - 8:14 am | अरुण मनोहर

कविता आपोआपच झरते. झरते तेव्हा एकाकीच असते. त्या झर्‍याचा झुळझुळ आवाज ऐकून पांथस्थ येतात आणि तृप्त होऊन जातात.

विसोबा खेचर's picture

5 Jul 2008 - 8:24 am | विसोबा खेचर

बिरुटेसाहेब,

लै भारी कविता केली आहे राव तुम्ही! आशय जबर्‍या आहे...

कविता खूप आवडली. अजूनही लिहा बिरुटेशेठ! अगदी भरभरून...!

आपला,
(प्राध्यापक बिरुट्यांचा विद्यार्थी) तात्या.

सहज's picture

5 Jul 2008 - 8:45 am | सहज

प्रयत्नही करुनही समजत नाही कविता
तेव्हा होणारा निर्मळ आनंद
माझ्या आयुष्याला सुखावतो.
ही मंगलता बहरत जाते,
अनंत काळापर्यंत.

सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन
कवितेला लाथाडून चालतांना
एकदा तरी विचार घोळुन जातोच
ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे?

अजुन सुख गोळा करुन आल्यावर
मीच मला समजावतो
रंजले, गांजले, रोगी
पिडीत, पछाडीत व इतर
सगळ्यांची काळजी घेणारेय
वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा
तु लेका निवांत रहा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2008 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजा, असा बदला घेतला तर :)

प्रयत्नही करुनही समजत नाही कविता
तेव्हा होणारा निर्मळ आनंद
माझ्या आयुष्याला सुखावतो.
ही मंगलता बहरत जाते,
अनंत काळापर्यंत.

अरे, मग काय कवींनी कविताच करु नये.
कोणी कविता करुन सुख मिळवतो कोणी अलिप्त राहुन !!!

सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन
कवितेला लाथाडून चालतांना
एकदा तरी विचार घोळुन जातोच
ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे?

कविंना माफ कर !!!

अजुन सुख गोळा करुन आल्यावर
मीच मला समजावतो
रंजले, गांजले, रोगी
पिडीत, पछाडीत व इतर
सगळ्यांची काळजी घेणारेय
वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा
तु लेका निवांत रहा..

दोस्ता एकवेळ निवांत राहता येईल, वेदनेपासून अलिप्त नाही !!!

एकलव्य's picture

5 Jul 2008 - 9:37 am | एकलव्य

अहो सर - अर्थ पोहचला... पण मला विचाराल तर तुम्ही साधे सरळ लिहिता तेव्हा शब्द आणि गोडी मनात तासनतास गुणगुणत राहते.

(अकव्य)लव्य

II राजे II's picture

5 Jul 2008 - 10:41 am | II राजे II (not verified)

काय लिहू !!
मस्त वेदना व्यक्त झाल्या आहेत... छान कविता....

स्वगतः राजे आपले एक एक मित्र ह्या कवितारोगामुळे अस्वस्थ आहेत... त्यां सर्वांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना करावयास हवी आपल्याला ! बेचारी काल यशो ह्या रोगाची बळी होती... आज सर देखील ..... वाईट वाटतं .. असे मोठ मोठे लेखक अचानक चार ओळीच्या कविता करतात तेव्हा ;)

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

विसुनाना's picture

5 Jul 2008 - 11:44 am | विसुनाना

निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.

या ओळी खास आहेत.

पद्मश्री चित्रे's picture

5 Jul 2008 - 12:57 pm | पद्मश्री चित्रे

>>माझी कविता एकाकी असते

नेहेमीच.
स्वानुभव.

धनंजय's picture

5 Jul 2008 - 4:59 pm | धनंजय

झपाटणारी कल्पना आहे, पण तिला मूर्त करायला समर्थ शब्द नाहीत. अशी घालमेल चितारली आहे बिरुटेसरंनी.

त्या अस्वस्थतेतून आणखी स्फुरण येत राहो!

अविनाश ओगले's picture

5 Jul 2008 - 9:01 pm | अविनाश ओगले

छान कविता, दिलीपजी...

नारदाचार्य's picture

5 Jul 2008 - 11:06 pm | नारदाचार्य

... करून जाणारी रचना...
अभिनंदन...
बर्‍याच काळानं मुक्तछंदात काही चांगलं वाचायला मिळालं...
अधिक मागणी करीत नाही. कारण हा मागणी तसा पुरवठा यातला प्रकार नाही.

मुक्तसुनीत's picture

6 Jul 2008 - 12:26 am | मुक्तसुनीत

मुक्तछंदातली कविता आवडली. अशाच कविता येत राहू देत.

चित्रा's picture

6 Jul 2008 - 8:07 pm | चित्रा

छान, कविता आवडली.

पिवळा डांबिस's picture

6 Jul 2008 - 8:09 pm | पिवळा डांबिस

निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.
क्या बात है!!!
मस्त!!!!

बेसनलाडू's picture

7 Jul 2008 - 11:04 am | बेसनलाडू

ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.

आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.

फारच छान. खूप आवडले.

(एकाकी)बेसनलाडू

मोकाट वळू's picture

7 Jul 2008 - 8:10 pm | मोकाट वळू

सहि आहे.....

नाना चेंगट's picture

27 Jul 2012 - 4:05 pm | नाना चेंगट

चक्क प्राडॉ कविता करतात? बाब्बो !

वर्तमानपत्री लेखकांची मराठी भाषेत खूपच गर्दी झालेली आहे

धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.

हेहेहे... फक्त यमक आणि अर्थ नसलेली कडवी एकत्र करून कविता होत नाही महाशय!