गावामध्ये काही ठराविक क्षेत्रात एक जागेचा मालक असतो. तो जागेचा रक्षणकर्ता असतो असे म्हणतात. ह्याला देवही मानतात. कधी कधी हा मालक दर्शनही देतो. भितीदायक असला तरी जमिनिचा रक्षणकर्ता व देवासमान म्हणून ह्याला कोणी कधी मारत नाही. हा मालक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन जागेत वावरणारा साप असतो.
आमच्या जागेतही आहे एक जागेचा मालक. मधुन मधुन आम्हाला आपले भव्य दर्शन देत असतो. आमच्या घराभोवती फिरताना आमच्या वास्तुचा हा सोबती.
साळुंख्या आणि कावळे कर्कश्य आवाजात गर्जना करु लागले की बाहेर मालकांचे दर्शन होणार ही काळ्या दगडावरची रेघ असते.
जागेचा मालक हा बुजुर्ग आहे. त्यामुळे त्याची जाडी आणि लांबी विलक्षण असते. कधी कधी वेटोळे घालुनही बसलेला दिसतो.
मालक आपले भक्ष पकडण्यासाठी बिळातुन बाहेर पडतात. कधी कधी हा मालक तोंडात बेडूक पकडून ठेवतो. मग त्या बेडकाच्या बचावाच्या सादीवरुनही मालकाला बेडकाचे भक्ष सापडले हे कळते. व आवाजाच्या दिशेने गेल्यावर मालक तोंडात बेडूक घेउन बसलेला सापडतो.
जागेचा मालक असला तरी हा बाहेर मात्र साळुंख्या आणि कावळ्यांमुळे सावधगिरी बाळगुनच बाहेर पडतो. कारण पक्षांनी ढोलीत घातलेली अंडी हे साप जाउन खाउन टाकतात. त्यामुळे साप बाहेर पडताच कावळे व साळुंख्या कर्कश्य आवाजात ओरडतात. नुसते ओरडत नाहीत तर त्या चिमुकल्या साळुंख्या ह्या भयानक मालकाला टोचे घेउन सळो की पळो करुन सोडतात. ह्यात साळुंख्यांची संख्या जास्त असते तर कावळे एक दोनच असतात. साळुंख्या सरळ त्याच्या डोक्यावर टोचे मारतात.
साळुंख्या अशा त्रास द्यायला लागल्या की मग हा मालक कुठेतरी गुपचुप आडोशाला जाउन लपतो.
मग साळुंख्या आणि कावळे त्या जागी हा मालक बाहेर येण्याची वाट पाहत तिथेच कर्कश्य आवाज करत ओरडत राहतात. मग हा मालक बराच वेळ लपुन बसला की मग साळुंख्या आणि कावळे आपआपल्या निवासस्थानी जातात. मग हा मालक बाहेर पडून जागेवर नजर फिरवून आपल्या बिळात जाऊन बसतो.
सापाला कोण घाबरत नाही ? सर्पमित्र सोडून बहुतेक सगळेच घाबरतात. तसा हा मालक आजुबाजुला आहे का हे बाहेर जाताना पहावे लागते. पण तसे घाबरण्याचे काहीच कारण नसते. कारण हा मालक कधी माणसाला खोड काढल्याशिवाय इजा करत नाही. एकदा तर आमची चाहुल लागल्याने हाच मालक चक्क आमच्यासमोर उड्या मारत (अगदी डिस्कव्हरीमध्ये दाखवतात त्याप्रमाणे) उड्या मारत निघुन गेला.
सापाला खरे तर शेतकर्यांचा मित्र म्हणतात. खरेच आहे ते. म्हणूनच सापांना मालक आणि देव मानुन त्यांचे रक्षण केले जाते. कारण हेच साप शेतात शेतीची नासधुस करणारे उंदी खाऊन पिकांचे संरक्षण करतात. असे वास्तुचे सोबती ज्यांना आपण भितो पण ते खरच आपल्या वास्तुचे, निसर्गाचे रक्षण करत असतात.
प्रतिक्रिया
2 Aug 2011 - 1:46 pm | श्रावण मोडक
वा...! मालक कोण आहे नेमका? धामण वाटत नाही.
2 Aug 2011 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार
धम्याच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
मस्त फटू आणि माहिती + वर्णन गो तै.
4 Aug 2011 - 4:12 pm | धमाल मुलगा
=))
असो.
जागुताई, लेखबिख फोटोबिटो एकदम जोरात आहे हां गाडी! :)
भारी लिव्हलंयस. मस्त.
मालक/मालकीण धामण वाटत नाही. (असती तर ओळख पटली असती. बत्तीसशिराळ्याच्या जत्रेत दिवसभर धामणी गळ्यात आणि धामणीची पिल्लं हातात गुंडाळून गावभर हिंडत होतो. अशी वळक इसरायचो न्हाई.)
-(जितेंद्र) धम्या.
2 Aug 2011 - 2:25 pm | विशाखा राऊत
बहुतेक वेळा बिनविषारी असलेले आदले असावे ते असे वाटत आहे
2 Aug 2011 - 2:34 pm | सहज
साप म्हणलं की लगेच नको वाटते खरे. आजवर प्रत्यक्ष साप बघायचा प्रसंग मोजक्याच वेळा आणी त्यातही इजा व्हायचा, किंवा धोक्यात असलेला एकही प्रसंग नाही. पण साप प्रत्यक्षात दिसला की मणक्यातून डोक्यात एक थंडगार लहर जाते. गंमत आहे. ही कसली अनामिक भीती?
बिनविषारी रॅट स्नेक चा एक प्रकार दिसतोय.
2 Aug 2011 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरी...
माझे वडिलही त्यांच्या लहानपणी आमच्या गावच्या वाड्यात की कुठेतरी एक अतिशय मोठा नाग नेहमी बघायला मिळायची आठवण सांगतात. तो म्हणे घराण्याचा मूळपुरूष आहे अशी गावातल्या लोकांची श्रद्धा आहे. असो.
2 Aug 2011 - 3:17 pm | नगरीनिरंजन
धामण दिसतेय.
फोटो छान. सापांबद्दल अनामिक आकर्षण आहे मला, पण प्रत्यक्षात मोकळे असे साप खूपच कमी वेळा दिसलेत.
मध्यंतरी नॅटजिओवर किंगकोब्रावर एक 'लै भारी' डॉक्युमेंटरी पाहिली त्यात पण तो असाच घराच्या आजूबाजूला फिरताना दाखवला होता.
2 Aug 2011 - 4:16 pm | पांथस्थ
सापावर इतका झकास लेख वाचला नाही बुवा.
मालकांना आमचा राम राम सांगा :)
2 Aug 2011 - 4:26 pm | गणपा
+१
2 Aug 2011 - 4:44 pm | इंटरनेटस्नेही
उत्तम!
2 Aug 2011 - 5:06 pm | मीनल
सापच तो. विषारी काय अन बिनविषारी काय? वेळ आलीच तर चावणार तर खरचं.
मग काय कारणार? धावपळ?????
3 Aug 2011 - 10:30 am | अर्धवट
माणसं जास्त विषारी असतात तै
2 Aug 2011 - 5:52 pm | इरसाल
जागुताई च्या घराशेजारी घर घ्यायच्या विचारात आहे.
फुले काय , झाडे काय, मालक काय, माश्यांच्या पाकृ काय (असे पण पाकृ केल्यावर ट्राय करायला पण कोणीतरी पाहिजे नं ?
2 Aug 2011 - 6:18 pm | तिमा
आमच्या ऑफिसच्या आवारात (चक्क मुंबईत) पण फिरतात एक मालक. गेल्या १५ वर्षांत तरी कधी चावले नाहीत कुणाला! फक्त एकच काळजी घ्यावी लागते, खाली बघून चालायचे, मग काही भीति नाही. (एकदा माझा पाय पडणार होता!)
2 Aug 2011 - 6:25 pm | इरसाल
कोकणात वडिलांच्या नोकरीच्या जागी राहत असताना घराशेजारी ८०/९० वर्षे जुना पण सुकलेला वड होता. आमच्या घराची एक खिडकी त्याबाजूस उघडायची अगदी कधीही सहज नजर टाकली तरी एक तरी सरपटणारा विषारी किंवा बिनविषारी साप दिसायचा.
अक्षरश: कधी कधी घरात कणे सापडायचे.किंवा वरच्या दांडीला विळखा घालून बसलेले मोठे साप असायचे.
जीवनातला पहिला विंचू तिथेच चावला होता.
2 Aug 2011 - 7:42 pm | गणपा
मग ?
मेला का आहे अजुन जिवंत तो विंचु?
3 Aug 2011 - 10:27 am | इरसाल
छोटा विंचू मोठ्या विंचवाला चावला तर काय फरक पडतो. मरणार तर छोटाच नं ?
मी नाव राशीवरून वृश्चिक आहे.
मेला छोटा तिच्यायला .....................
2 Aug 2011 - 7:41 pm | रेवती
साप म्हटलं की भिती वाटते. फोटू चांगले आलेत.
माझ्या मुलाच्या मित्राने एकदा आम्हाला अर्थवर्म म्हणून चिमटीत पकडून जे दाखवायला आणलं होतं ते सापाचं पिल्लू होतं. अगदी लहान होतं. बीनविषारीच असावं पण भीती वाटली. माझा मुलगा मित्राला ते पिल्लू मागत होता.
3 Aug 2011 - 11:24 am | जागु
श्रावण, राजकुमार, सहज, बिपिन, नगरीनिरंजन, पांथस्थ, गणपा, इंटरनेट्स्नेही,मिनल,अर्धवच, इरसार, तिरशिंग, रेवती धन्यवाद.
इरसार बापरे विंचवाचा दंश ? भयानक दुखतो असे ऐकल आहे. आईकडे शेतात अशा सापाच्या काती वगैरे पडलेल्या खुप पाहील्या आहेत.
हा धामणच असावा.
सापाची खोडी काढल्याशिवाय साप काही करत नाही. उलट आपली चाहुल लागली की तो पळून जातो. त्यामुळे सापाला एवढ घाबरण्यासारख काही नसत. फक्त त्याच्यावर पाय वगैरे नाही पडाला पाहीजे.
3 Aug 2011 - 4:07 pm | इरसाल
अस्मादिकांना सकाळी सकाळी ६ च्या आसपास विंचू चावला तो हि झोपेत काहीतरी चावल्याची जाणीव झाली आणि दुसऱ्या हाताने फटका देवून त्याला तिथेच आडवा करण्यात आल्याचे नंतर समजले. त्याचे धूड अंथरुणाच्या बाजूलाच होते.गावातच विंचू उतरवणारे एक गृहस्थ होते त्यांना पाचारण करून विंचू उतरवला गेला. पण इतके नक्की आठवतेय कि मी ठणाणा बोंबा मारत होतो दुखतेय दुखतेय म्हणून.
नन्तर त्याच गावात इंगळी चावल्याने माणूस कसा उड्या मारू शकतो हे पाहिलेय.
3 Aug 2011 - 8:20 pm | चित्रा
साप दुरून पहायला ठीक आहे. आमच्या घरी माझ्या लहानपणी दोनदा तरी साप आल्याचे आठवते. तो हुसकून काढायला काही लोक आल्याचे आठवते. साप कोणाला चावल्याचे मात्र कधी घडले नाही. तरी साप दिसला की मारण्याकडेच लोकांचा कल होतो. हे तसे दुर्दैवी आहे, पण 'जाऊ दे, बिनविषारी आहे' म्हणून सोडून देताना दिसत नाहीत. सापाला सापही म्हणत नसत. ते 'जनावर' असे म्हटले जाई याचे तेव्हा आणि अजूनही आश्चर्य वाटते :)
जागु यांचे परिसराबद्दलचे कुतुहल दाद देण्यासारखे आहे.
3 Aug 2011 - 3:15 pm | आत्मशून्य
.
3 Aug 2011 - 3:43 pm | मनराव
झक्कास.........!!!
मालक तुमचं सदैव रक्षण करोत..........
3 Aug 2011 - 10:30 pm | सविता००१
जागुतै, मस्तच लिहिले आहे. मालक पण मस्त आलेत फोटोत.
4 Aug 2011 - 4:45 am | गणा मास्तर
उत्तम आहे. वाचुन थोडी भिती वाटली आणि आपण उगाच सापाला घाबरतो असेही वाटले.
4 Aug 2011 - 11:13 am | अमोल केळकर
मस्त लेख, मालकांना पंचमीच्या शुभेच्छा :)
अमोल केळकर
4 Aug 2011 - 11:26 am | स्वाती दिनेश
छान लेख जागु,
स्वाती
4 Aug 2011 - 12:15 pm | मी ऋचा
मालकपंचमीच्या शुभेच्छा!
4 Aug 2011 - 12:27 pm | मदनबाण
आमच्या इथे बरेच साप आधी यायचे... आताही कधी तरी चुकुन दर्शन घडते.
मी आणि माझा मित्र जवळच्या जंगलात फिरत असताना एकदा समोर नागराज आले होते...मला एकट्याला तिथेच सोडुन त्याने कलटी मारली होती ! ;) सापाची कात सापडल्यास ती हातात कात घेउन त्याचे निरिक्षण करायला मला फार आवडायचे. :)
एकदा एक भला मोठा साप (मेलेल्या अवस्थेतला) कोणत्या तरी टारगटाने बागेत आणुन टाकला होता... लांबुन एखाधा पडवळ असावा असेच वाटत होते...जवळ गेल्यावर तो सापड्या आहे हे कळायचे ! ;)
जाता जाता :--- मन डोले मेरा तन डोले... कोन बजाये बासुरिया या गाण्यात बासरी नाही ऐकु आली पण बिन् ची सुंदर धुन मात्र नक्कीच कानावर पडते. ;)
4 Aug 2011 - 12:57 pm | पल्लवी
भलताच उरक आहे बाई तुला ! :)
आज पंचमीला काय गोडधोड करुन घालणार की नाही मालकांना ?
4 Aug 2011 - 1:19 pm | जागु
पल्ले अग घातल सकाळीच. मोदक, उकडलेले दाणे, लाह्या, काकडी, दुध केळी सगळ ठेउन आले. थोड्या वेळाने मोदकांचा फोटो देते.
4 Aug 2011 - 8:31 pm | मी-सौरभ
ओ जागु तै...
साप मांसाहारी असतो असे ऐकून माहीत आहे.
वरचे सगळे पदार्थ एखाद्या बॅचलरच्या नशीबी आले असले तर उत्त्म झाल असतं. :)
एक थाळी कमी बनली असती की नै????
4 Aug 2011 - 11:04 pm | प्राजु
>>>>साप मांसाहारी असतो असे ऐकून माहीत आहे.<<
ठ्ठ्यॉ!!!!!! च्यायला.. साधासुधा कसला.. वात्रट सौरभ आहे.
जागु, लेख छान आहे गं.
4 Aug 2011 - 11:12 pm | मी-सौरभ
'साप मांसाहारी आहे'
यात मी काय वात्रट पणा केला??
मी साधा सुधा च आहे हो प्राजु ताई :)
4 Aug 2011 - 11:18 pm | पंगा
अहो त्यांना तो जोक वाटला असावा. (का कोण जाणे.) आणि 'साप मांसाहारी आहे' हा जर जोक असेल, तर तो आपोआप 'नॉनव्हेज जोक' झाला, नाही का?
नॉनव्हेज जोक सांगितला, म्हणून वात्रट.
5 Aug 2011 - 3:48 pm | पल्लवी
>>> (का कोण जाणे.)
:D :D :D
8 Aug 2011 - 7:35 pm | मी-सौरभ
क ड क ...
(दिस्च्लैमेरः ही फक्त प्रतिक्रिया आहे यातून कुठलाही मांसाहारी अर्थ काढू नये ही विनंती)
7 Aug 2011 - 11:35 pm | जागु
आता साप उंदीर, बेडूक खातो म्हटल्यावर तो मांसाहारीच आहे.
6 Aug 2011 - 6:37 pm | सौन्दर्य
लेख फारच छान वाटला, मुख्यत्वे करून त्यातील निरीक्षण.
सापाचे फोटो जरा अजुन निट काढता आले असते.
सापाला कान नसतात त्यामुळे जमीनीवरच्या कंपनाने त्याला इतरांची चाहूल लागते, मग असे असताना, एखाद्याचा पाय अंगावर पडे पर्यंत ते वाट का बघतात ?
"आता मासा उंदीर, बेडूक खातो म्हटल्यावर तो मांसाहारीच आहे." - मासा "उंदीर आणि बेडूक खातो" हे ज्ञान आम्हाला नव्हते, चला माहीतीत भर पडली. (ह्.घ्या)
सौन्दर्य
6 Aug 2011 - 11:56 pm | पंगा
...'बेडकाप्रमाणेच उंदीर हाही एक उभयचर प्राणी आहे' असा निष्कर्ष काढण्यास हरकत नसावी काय?
7 Aug 2011 - 11:45 pm | गणपा
(जर उंदीर पाण्यात जाउन माश्याच भक्ष बनत असेल तर मासे पण पाण्या बाहेर येउन उंदराची शिकार करत नसतील कश्यावरुन? ) .;)
हा नियम लावायचा म्हटलं तर मासे पण उभयचर कॅटेगरीत मोडावेत.
8 Aug 2011 - 6:19 am | सहज
या उभयचर व भक्ष्य वरुन हा एक जबरी सीन आठवला. :-)
7 Aug 2011 - 11:36 pm | जागु
सौंदर्य चुकीची दुरुस्ती केली आहे.