स्थलांतर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
17 Jul 2011 - 10:04 am

काळा, शिशु होतो तेव्हा
खादाड मी राऊ होतो
उनाड मी काऊ होतो
बडबडी मी चिऊ होतो
स्वच्छंदी मी पक्षी होतो

काळा, युवक होतो तेव्हा
सशा सारखा मी देखणा होतो
हरणासारखा मी चपळ होतो
चित्यासारखा मी आक्रमक होतो
उमदा मी प्राणी होतो

काळा, प्रौढ होतो तेव्हा
राबणारी मी मुंगी होतो
साठवणारी मधमाशी होतो
जाळी विणणारा कोळी होतो
कष्टकरी मी कीटक होतो

काळा, तुझ्यामुळे मी वृद्ध झालो
शिशू-युवक-प्रौढ....
स्थलांतरे कर-करून मी विद्ध झालो
इतरांसाठी जगून मी बद्ध झालो
पक्षी, प्राणी, किटक पुन्हा बनू दे
आता फ़क्त माझ्यासाठी जगू दे

पक्षाचे मला पंख दे
शरीराची नसेल, तरी मनाची भरारी दे
प्राण्याची मला आक्रमकता दे
अनुभवाच्या बलाची जाणीव राहू दे
कीटकाची चिकाटी दे
बांधलेली जाळी आणि वारुळे
काळा, तुझ्या स्थलांतरांनी मोडली तरी
पुन्हा रचण्याची उम्मीद दे

-- यशवंत काकड ह्यांच्या एका रचनेवरून स्फुरलेली कविता

कविता

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

18 Jul 2011 - 6:02 pm | बहुगुणी

आवडली!
(यशवंत काकडांच्या मूळ लेखनाचा दुवा उपलब्ध असेल तर तोही द्या, वाचायला आवडेल. धन्यवाद!)

श्रावण मोडक's picture

18 Jul 2011 - 6:43 pm | श्रावण मोडक

+१