मागच्या लेखाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांना खुप खुप धन्यवाद. आजचा दुसरा भाग आपणा बरोबर शेयर करतोय. पुढला तिसरा आणि शेवटचा भाग माझ्या लिखाणाच्या मथळ्यातील "भारतीय" या शब्दामागील विचार सांगणारा असेल. मागील लिखाणाचा आणि या दुसऱ्या भागातील हेतु हा एकुणच उद्योग करण्याच्या प्रक्रियेत भावना नाकारता येत नाही असा होतां वा आहे. विशेषत: पहिल्या पिढीच्या उद्योजकांना तर सुरुवात भावनेच्या बळावरच करावी लागते.
दोनेक महिन्यापुर्वी एका मित्राचा फोन आला. त्याने डायरेक्ट विषयाला हात घातला.
" हाय सुधीर, बरीच वर्षे नोकरी करून आता कंटाळलोय. आता धंदा करायचाय. आजवर कंपनी साठी खूप राबलो. तेवढा माझ्यासाठी राबलो असतो तर माझं भलं झालं असतं. माझ्याकडे थोडा पैसा साठलाय. Technical Skills are not a problem for me. फक्त मला कशी सुरुवात करू आणि काय करू ते सांग."
माझ्या मित्राची मला दया आली.
उद्योगाची सुरुवात करायला पैसा, तंत्रज्ञान, अनुभव हे किरकोळ भांडवल असतं. हे व्यावहारिक किंवा भौतिक भांडवल आहे. फक्त एवढं भांडवल असुन उपयोग नाही. मुळ भांडवल आहे ते " वेड". धंदा सुरु करण्याचे वेड नसेल, तर सुरुवात आणि नंतर भरभराट होणं अशक्य आहे. हो, याचा अर्थ असाही आहे आणि तो माझा अनुभव ही आहे की ते व्यावहारिक भांडवल नसलं तरी चालेल पण धंदा सुरु करण्याचे passion पाहिजे. नोकरीत कंटाळा आला किंवा पैसा आहे किंवा एखादे product बनवता येतं म्हणुन धंदा करायला सुरुवात करणं धोक्याचे आहे. धंदा करण्याचे वेड असेल आणि छंदाचेच product असेल तर झिंग फारच उच्च स्तरातली.
मला उंदराच्या चित्रावर महाप्रचंड साम्राज्य उभा करणारा डिस्ने आणि त्याच्या व्यवसायाची स्टोरी या दोन्ही मध्ये हरवून जायला - वारंवार - खूप आवडतं. Disneyland चे स्वप्न त्याने बघितलं त्यावेळी त्याची पन्नाशी उलटून गेली होती. एव्हाना तो एक श्रीमंत व्यावसाईक होता, कार्टून्स मुळे. पण त्याचे Disneyland चे थेर त्याच्याच कंपनीच्या व्यावहारिक सल्लागारांना पटलं नव्हतं. त्यांनी ते धुडकावून तर लावलं होतच पण $१०,०००/- एवढी किरकोळच रक्कम देण्याचे मान्य केलं.डिस्नेचे स्वप्न तर अजस्त्र होतं, ज्याचे मूर्त स्वरूप आज आपण पाहतो. हजारो एकरामध्ये त्याला करमणुकीची बाग तयार करायची होती, त्यात शेकडो पूल बांधायचे होते, कृत्रिम नद्या तयार करायच्या होत्या, कार्टून्स जिवंत करायचे होते, आगगाड्या पळवायच्या होत्या - तो संपूर्ण झपाटला होता. हातात भांडवल होतं $१०,०००/- , वय पन्नाशी ओलांडलेल! बायकोनेही त्याला वेड्यात काढलं होतं. पण त्या वेड्यानं स्वत;ला प्रसंगी उध्वस्त करून आपलं स्वप्न साकार करायचं ठरवलं होतं.त्यानं आपलं राहत घर गहाण टाकलं, अनेक उत्तम साठविलेल्या वस्तू विकल्या, स्वत:चा विमा ही गहाण टाकला. सर्वस्व पणाला लावलं होतं. साईट वरच राहायचा. तिथल्या एका टावरवर दिवस भर उभा राहून कामाची देख रेख करायचा. त्या वेडाच भव्यरूप आज आपण पाहतोय! आता त्या अदभुत निर्मिती कडे पाहुन जग वेडं होतंय.
निर्मितीसाठी झपाटलेले लोक ना आपल्या कमतरतांची दखल घेतात ना त्याना स्वत:ला बेचिराख होण्याची, उध्वस्त होण्याची भीती असते. मला हे वेडच त्यामुळे प्रामुख्याने आवश्यक वाटते, विशेषत: माझ्या स्वत;च्या अनुभवावरून आणि जगभरच्या वेड्यांकडे बघून. मी हे अनुभवलंय की ते वेड एका प्रचंड मोठ्या साहसाला आपल्यात जन्माला घालतं. आणि ते साहस असल्या शिवाय उद्योगात तगून राहणं अशक्य आहे. काठावरबसुन व्यवहारीकतेचं भान ठेवायला सांगणा-या मित्र, नातेवाईक आणि सल्लागारांच्या भडीमाराने स्वप्नाची, निर्मितीची झिंग कमी होण्याची भीती असते. त्या काठावरल्या सल्लागारांचा भूमिका दहीहंडीच्या दिवशी गोविंदाला हंडी फोडता येवू नये म्हणुन ठेवलेल्या पाणी मारणा-या बघ्यांसारखी असते याची मला बोचरी जाणीव आहे. हंडीजवळ पोहोचायच्या आधीच पडून गोविंदाचा हात पाय जर चुकून मोडला तर बोच-या टोमण्याने घायाळ होऊन वेड कायमचे विझायाची भीती असते. उद्योग करताना सगळ्यात ज्यास्त त्रास असतो तो या आजुबाजुच्यांचा.
मला असे अजिबात म्हणायचे नाही की आपण त्यामुळे निर्मनुष्य आयुष्य जगावं . माझा गोतावळा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा होता आणि आहे. उद्योगाच्या झिंगे व्यतिरिक्त गोतावळा होता माझ्या बरोबर गाणा-या मित्रांचा, वसंत कानेटकर आणि तात्या शिरवाडकरांच्या सहवासाने पुनीत झालेल्या नाशिक मध्ये माझ्या बरोबर काम करणा-या अनेक नाटकांमधल्या मित्रांचा, कोल्हापूर पासुन दिल्ली पर्यंत पसरलेल्या आणि होस्टेल वर धिंगाणा घालणा-या माझ्या इंजीनियरिंगच्या सख्यांचा, निपाणीतल्या बालवाडी पासुन बारावीपर्यंत सोबत असणा-या जिवलगांचा आणि एका चळवळी मध्ये झोकून देऊन काम करताना सोबत असणा-या कार्यकर्त्यांचा !! त्यामुळे माझे आयष्य निर्मनुष्य कधीच नव्हतं वा नाही. माणसांचा धो धो वाहणारा धबधबा आहे. मी माझ्या मित्रांसाठी भरपूर वेळ ही देतो. अगदी भरपूर. पण ......पण. माझ्या उद्योग विश्वात असताना मी फक्त एकटा असतो. माझा सल्लागार माझ्यातच आहे. माझे मित्र सल्ला देत असतात वा सुचवत असतात त्यावेळी वेळी माझे कान नाक घसा डोळे सगळे बंद असतं. उद्योगाबाबतीत सरळ माझ्यावर भिरकावलेले टोमणे, काही failures बद्दलचे remarks माझ्या पर्यंत पोहोचतच नाहीत कारण माझ्या भोवती मी एक छान टणक वेष्टन अगदी सुरुवातीलाच बांधून घेतलंय. उद्योगाच्या प्रवासात फक्त अंतर्नाद ऐकायचा. चर्चा स्वत:शी करायची. निर्णय फक्त स्वत: घ्यायचा. आनंद मात्र सगळ्यांना वाटायचा. जितका वाटता येईल तितका. कारण आनंदाच्या बाबतीत मला आलेली अनुभूती भन्नाट आहे. आणि माझा त्या मला झालेल्या साक्षातकारा वरती श्रद्धा आहे.
"वृद्धी मायती क्षयात, क्षय मायती संचयात". दिलं की वाढतं आणि साठवलं की संपून जातं.
( क्रमश: ......)
प्रतिक्रिया
13 Jul 2011 - 2:27 pm | श्रावण मोडक
लेखन चांगले चालले आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
तुमचा अनुभव ध्यानी घेऊन एक सुचवतो - डिस्ने किंवा अगदी इतरही अनेक मोठे व्यावसायीक, ज्यांनी डिस्ने जसा टॉवरवर मुक्काम ठोकून होता तसे काही केले आहे, यांच्यासारखे आदर्श फार कमी ठेवले जातात. त्याऐवजी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचाच आदर्श ठेवून व्यवसायाची त्यांच्या त्या स्केलवर पायाभरणी करण्याचे अनेक फसलेले प्रयत्न पाहिले आहेत. त्यामुळे ही आदर्शांची निवड कशी असावी, हेही लिहा.
13 Jul 2011 - 2:43 pm | गणेशा
लेख प्रेरणादायी.. विशेषकरुन आपल्यामधीलच एक असणार्या माणसाचे प्रगतीपथावरील मन उलगडले जात आहे अशी आपुलकी वाटते आहे वाचताना.
एक विनंती..
पुढील भाग शेवटचा नका टाकु..
तुमचे अनुभव.. वेळप्रसंगी असलेला दृष्टिकोन, काही वेळेस झालेले तोटे.. आणि असे बरेच लिहा..
बघा एक मस्त लिखान होउन जाईन. आणि हे लिहिण्याचे ही 'वेड' एक उत्तम पुस्तक बाजारात आणु शकेन..
दूसरी विनंती
जर पुढील भाग लिहिले तर " भारतीय उद्योग: भावना आणि व्यवहार" असे व्यवहारवादी जड नाव न देता सरळ साधे 'झिंग स्वप्नांच्या राज्यातील" " वेड स्पनपुर्तीचे' असले आपल्यातले नाव ठेवावे.
पुढील खुप भाग वाचण्यास आतुर..
13 Jul 2011 - 6:25 pm | प्रास
+१
13 Jul 2011 - 7:08 pm | स्मिता.
हाही भाग मागील भागाप्रमाणेच छान जमून आलाय.
सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहे पण एका मुद्द्याबाबत जरा साशंक आहे:
मित्रमंडळी, नातेवाईक, सल्लागार यांच्या बाबतीत असलेली तुमची मते एका मर्यादेपर्यंत बरोबर आहेत. ही मंडळी बोलायला लागली की कान-डोळे बंद करण्याचा जो पवित्रा तुम्ही घेतलाय तो सर्वांनाच व्यवहार्य असेल असे वाटत नाही.
तुमच्यात आत्मविश्वास होता, आहे. आणि सुदैवाने तुमच्या मनाने जे वेड घेतले ते योग्य दिशेने होते. अर्थात यशप्राप्तीपूर्वी थोडेफार अपयशही पचवावे लागले असेल असे गृहीत धरून मी असे म्हणते की तुमचे निर्णय योग्य असल्याने इतरांचे सल्ले न ऐकणं हे तुमच्या पथ्यावर पडलं.
परंतु, जर एखादी व्यक्ती केवळ एखाद्या कल्पनेने भारावून जावून त्या दिशेने पावले उचलत असेल तर तीला सल्ले देऊ नये का? किंवा त्या व्यक्तीने हितचिंतकांचे सल्ले न ऐकल्याने पुढे नुकसान झाल्यावर पश्चाताप होतच असणार ना?
13 Jul 2011 - 7:21 pm | सुधीर मुतालीक
पश्चाताप, पराभव हे थांबे लागतात ना मध्ये मध्ये. कधी कधी मध्येच अपघात ही होतो. पण कुठल्या थांब्यावर किती वेळ थांबायचं की तिथेच प्रवास संपवायचा हे ठरलेल्या ठिकाणी पोचायची किती घाई आहे आणि त्यासाठी झपाटलेला आहे यावर ठरत.
13 Jul 2011 - 10:42 pm | आनंद
लेख खुपच आवडला !
खरय वेडच असाव लागत.
----वेडा
14 Jul 2011 - 10:40 pm | अर्धवटराव
तुम्ही महाभारतावर लिहायचं म्हणताय आणि व्यासाच्या काव्यप्रेरणेवर लिहीताय. अर्थात, हे झिंग महात्म्य उद्योगधंद्यातलं सर्वात महत्वाचं भांडवल, इंधन आहे हे पटलं... आणि पहिल्या भागात त्याचा लुफ्त मस्त आला. पण या भागात अॅक्चुअल डावाला सुरुवात होणार असं वाटलं होतं. तिसरा भाग तर तुम्ही शेवटचा म्हणताय :(
अर्धवटराव
14 Jul 2011 - 7:36 pm | विजुभाऊ
तुम्हे एतुमचे अनुभव देखील सांगा. फार मोलाचे असतील लोकाना.
मराठीमध्ये असे लिखाण तसे कमीच आहे. तुमच्या लिखाणाने एक उत्तम भर पडेल
17 Jul 2011 - 11:27 am | अभिजीतराव
निर्मितीसाठी झपाटलेले लोक ना आपल्या कमतरतांची दखल घेतात ना त्याना स्वत:ला बेचिराख होण्याची, उध्वस्त होण्याची भीती असते. मला हे वेडच त्यामुळे प्रामुख्याने आवश्यक वाटते.........
अन्गावर शहारे आले. उच्च दर्जचे मार्गदर्शन. सर्,असे मार्गदर्शन मिळाले तर समाज गरीब नक्किच नाहि राहणार.