वळवळ केवळ

विसुनाना's picture
विसुनाना in जे न देखे रवी...
6 Jun 2011 - 11:41 am

कोण ऐकतो, कोण समजतो? फुकाच अवघी तळमळ केवळ
झोप रात्रिची उडून जाते, होते पोटी जळजळ केवळ

मनास वाटे व्हावी क्रांती, राहु नये ही चळवळ केवळ
टीव्ही आणिक फेसबुकावर हाय उठवते खळबळ केवळ

रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ

सामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ
गळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ

ऊंचऊंच लाव्हा उसळावा स्वस्थ पसरला फुटून कातळ
आत्मतुष्टिचा झरा वाहतो थंडपणाने खळखळ केवळ

टरारणार्‍या स्नायुंमधुनी बसेल हिसका तुटेल साखळ
सांड बडवले जुवे खेचती, थुंकी गळते घळघळ केवळ

'जन्मलोच तर जगून जाऊ' - कापुरुषांची धडपड निर्बळ
गटारातल्या गांडवळांची अशीच असते वळवळ केवळ

***

कविता

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jun 2011 - 11:47 am | बिपिन कार्यकर्ते

सगळीच कडवी उत्तम जमली आहेत. विषण्ण वास्तव!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2011 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच कडवी भारी उतरली आहेत.

-दिलीप बिरुटे

स्वानंद's picture

6 Jun 2011 - 1:29 pm | स्वानंद

का लाजवितो आहेस सगळ्यांना?
अपाय नको उपाय हवा आहे!!!!

पैसा's picture

6 Jun 2011 - 1:30 pm | पैसा

आणि एकदम समयोचित.

सहज's picture

6 Jun 2011 - 1:32 pm | सहज

.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Jun 2011 - 2:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!!

अप्रतिम!!
अतिशय जळजळीत कविता.

मदनबाण's picture

7 Jun 2011 - 9:03 am | मदनबाण

शॉलिट्ट... :)

विसुनाना's picture

7 Jun 2011 - 1:45 pm | विसुनाना

वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे आभार मानतो.