कवितेपासून कवितेपर्यंत....प्रवाह कवितेचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in विशेष
5 Mar 2011 - 4:28 pm
मराठी दिन

मिपावर मराठी दिनानिमित्त विविध उत्तम लेखन वाचायला मिळत आहेत तेव्हा आमचेही दोन शब्द.

मराठी कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आवडणा-या कवितांची आठवण होते. आपापल्या आवडत्या कवींच्या कविता डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. काही कवितेच्या ओळी आठवतात. काही कवितेच्या शब्द, प्रतिमा आठवतात. काही कवितेचे आशय आठवतात तर कधी नुसतीच कवींची आठवण होते. कवितेचा प्रवास सुरु झाला तो ''माझा म‍-हाटिची बोल कौतुके । परि अमृतातेंही पैजा जिंके ॥”म्हणणा-या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरापासून. संत ज्ञानेश्वरापासून सुरु झालेला हा कवितेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. कवितेचा विषय निघाला की अनेक कवींची आठवण होते.

मराठी कवितेचा विचार करायचा म्हटला की प्राचीन कवितेकडे वळावे लागते. प्राचीन कवितेचे साधारणत: तीन प्रवाह मानले जातात. संत काव्य, पंत काव्य आणि (तंत काव्य) शाहिरी काव्य. असे ढोबळमानाने त्याचे वर्गीकरण केले जाते. मराठी काव्याची परंपरा ही संत काव्यापासून सुरु झालेली आहे. बाराव्या शतकापासून सुरु झालेली ही काव्यपरंपरंपरा अठराव्या शतकापर्यंतही दिसून येते. आजही काही काव्यरचना या प्राचीन काव्याशी नातं सांगतांना दिसतात. मात्र ही संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकेच भरेल असे वाटते. संतांच्या काव्यात ईश्वर भक्ती, धार्मिक विचार आणि त्याचबरोबर लोककल्याणाची तळमळही काव्यररचनेत दिसून येते. लोककल्याण आणि शिक्षण हा उद्देश दिसत असला तरी 'ईश्वरभक्ती' ची ओढ काव्यातून दिसते. संत कविता म्हटले की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम संत रामदास यांच्याबरोबर संत मांदियाळातील थोरा मोठांची आठवण झाली नाही तर नवल वाटावे.

काव्यपरंपरेत पुढे परंपरा येते ती पंत काव्याची. याला पंडिती काव्याची परंपरा असेही म्हटले जाते. संत काव्याहून वेगळी अशी रचना पंडिती काव्याची दिसते. पंडिती काव्याचे स्वरूप आख्यानप्रधान असे होते. जसे, रुक्मिणी स्वयंवर,नलदमयंती स्वयंवर, संक्षेप रामायण, वेणूसूधा, वगैरे प्रकारच्या रचनेतून लोकांचे मनोरंजन करावे लोकप्रिय व्हावे असा सरळ उद्देश दिसतो. लोकांच्या मनोरंजनासाठी रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथातला काही भाग निवडून त्यावर अलंकार,शृंगाराचा मारा करुन विविध रसांच्या माध्यमातून पांडित्याचे उत्तम प्रदर्शन पंडिती कवींनी केले. पंडितांसमोर विशिष्ट असा श्रोतुवर्ग होता. पंडित जरासे पुराणिक पद्धतीचे होते आणि त्यांना धनिकांचा आश्रय होता. राजे रजवाड्यांच्या आश्रय असल्यामुळे पुराणे सांगणे हा त्यांचा व्यवसाय होता जरासा फावला वेळ मिळाला की काव्यरचना करायची. पंडित कवींनी समाजमनाचे रंजन करायचा विडाही जरासा उचलला होता. असे असले तरी पंडितांचे लेखन मात्र संस्कृत महाकाव्यांवर पोसलेले असायचे. संस्कृत साहित्यातील रस,अलंकार,वृत्त यांचा या पंडितांना भारी नाद. उच्चभ्रू समाजातील संस्कृततज्ञ, पंडितवर्ग आणि उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे काव्य सादर केले. 'प्रगल्भ' लोकांसाठी केलेले साधारणतः त्यांचे लेखन होते. असे म्हटले तर वावगे ठरू नये. पंडित कवी म्हटले की, मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत, यांची आठवण होते.

काव्य परंपरेचा प्रवास आपल्याला पुढे शाहिरी काव्याकडे घेऊन जातो. शाहिरांनी मात्र काव्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली. पोवाडा आणि लावणीने नुसती बहार उडवून दिली. पोवाड्यात पराक्रमी व्यक्तीच्या प्रशंसनीय घटनांचे रसपूर्ण वर्णन शाहिरांनी केले. आपल्या धन्याचे गुण गौरव शाहिरांनी केले. शिवछत्रपती, सवाई माधवराव, भाऊसाहेब पेशवे, हे शाहिरांच्या लेखणीचे विषय झाले. श्राव्यकाव्य म्हणनन्यापेक्शा त्याला नाटकच म्हणावे इतके शाहीर आपल्या काव्याशी एकरूप झाले. पोवाडा वीररसाने ओतपोत भरलेला तर लावणी शृंगाराने सजवली गेली. लावणी जशी शृंगाराची होती तशी लावणी धार्मिकही होती. लावणीच्या रचनेत जसा ताल मोहवून टाकणारा होता तसा त्यात खटकेबाजपणाही होता. लावणीची रचना लोकगीतासारखी दिसते. मराठी माणसाच्या सांस्कृतिक परंपरा, संकेत, आदर्श हे लावणी रचनेतून दिसतात. लावणीचे लोकगीताशी जवळचे नाते आहे. गोंधळगीत, जागरण,वासुदेव अशा लोकगीतातून लावणीनृत्य आकाराला येत गेले. रामजोशी, अनंतफंदी, होनाजी बाळा, सगनभाऊ, या लावणीकारांची आपल्याला ओळख आहेच.

पेशवाई गेली इंग्रजी राजवट आली नवविचारांची रेलचेल सुरु झाली आणि दोस्त हो येथून मात्र कविता बदलत गेली. प्राचीन परंपरेशी आशयाच्या बाबतीत तिने फारकत घेतली. प्राचीन कविता वर्णनपर, कथनपर,अशी होती. नव कविता मात्र स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचार सांगता सांगता समाजनिष्ठ होत गेली. केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक म्हणतात कारण त्यांनी काव्याची जुनी वाट सोडून नवी वाट चोखाळली. नवे मूल्य, नवे विचार कवितेतून मांडायला सुरुवात केली. कवितेला आत्मनिष्ठ आणि काही बाबतीत जीवननिष्ठ बनविले. जुन्या रुढी प्रथा परंपरेवर जोरदार हल्ला चढविला. समता,स्वातंत्र्य व बंधुत्वाची एक नवी 'तुतारी' फुंकली. नव्या दमाचा ’नवशिपाई’’ त्यांच्या कवितेतून दिसू लागला. सारांश सांगायचा असा की नवकविता पूर्णपणे बदलून गेली. लौकिक विषय काव्याच्या कक्षेत आले. काव्याचे प्रयोजन असे मानले गेले की समाजाला स्फूर्ती देते ते काव्य. नव्या मूल्यांचे दर्शन घडविते, आनंद देते ते काव्य मानल्या गेले. इंग्रजी काव्य अनुकरणानेच मराठी कवीतेला एक नवे वळण मिळाले.

सामाजिक सुधारणांचा विचार, जातिभेद, आर्थिक विषमता आणि निसर्ग असे विषय काव्यातून डोकावू लागले. निसर्गातील वस्तूंवर मानवी भावभावनांचा आरोप करुन काव्यमय वर्णने असलेल्या कविता याच काळातल्या. प्रेमविषयक दृष्टीकोन पवित्र आणि उदात्तही याच काळात होत गेला. केवळ कविताच नव्हे तर कवितेचा आकृतिबंधही बदलून गेला. आर्या,फटका,दोहा,अभंग काही जुनी वृत्ते, केशवसुताच्या समकालीन कवितेत दिसत असली तरी नवकवींनी आकृतीबंधाच्या बाबतीत बराच बदल केला. इंग्रजी सॉनेटची सुनीते झाली. अर्थात हा सर्व बदल इंग्रजी राजवटींमुळेच झाला असे म्हणण्यास वाव आहे.

केशवसुतपूर्व कविता, आधुनिक कवीपंचक, रविकिरण मंडळ आणि पुढे मर्ढेकर संप्रदाय पासून ते आजची जालीय कवी कवयत्रीपर्यंत कविता इतकी बदलली की विचारु नका. नैतिक मूल्यावरील कविता, यंत्राच्या संचारामुळे भावशुन्य झालेली माणसे, शेती,शेतकरी,दलित दुबळ्यांचे शोषण,ढोंगीपणा, दांभिकपणा, नैराश्य दु:ख, मानवता,स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राजकीय उदासिनता या आणि अशा आशयांनी मराठी कविता बदलून गेली आहे. रे.ना.वा.टिळक, कवी विनायक, बालकवी, गोविंदाग्रज, बी, ते आजच्या नवकवीपर्यंत अनेक कवींची नावे आता टंकावे लागतील.

कवितेच्या बाबतीत कवितेला अनेकदा विविध आरोपांना सामोरे जावे लागले आहे. कवितेतील स्वैरपणाचा अतिरेक, वास्तवाशी संबंध नसणा-या कविता. यमक जुळवून ओढून ताणून आलेल्या कविता. वास्तविक जीवनापासून फारकत घेतलेल्या कविता. अलंकारात मढवून घेतलेल्या कविता. प्रणय कवितांचा सुळसुळाट असलेल्या कविता . चंद्र,सूर्य,पाने फुले यात रमणारी निसर्ग कविता,स्वप्नांची नुसतेच मनोरे रचणारी कविता, चित्रविचित्र शीर्षकाच्या कविता, प्रचारकी कविता, राजकीय कविता, संगणकीय काळातील शब्दांचा भडीमार असलेल्या कविता, इंग्रजी शब्दांच्या अतिरेक असलेल्या कविता, पाश्चात्य कल्पना, तेच ते दु:खानुभव सांगणारी कविता, कविता प्रकारातील ग्रामीण कविता, लोकगीत वळणाची कविता, गझल,चारोळ्या,विडंबने,भावकविता,राष्ट्रीय कविता, अनुवादित कविता अशा काय नी कितीतरी प्रकारांच्या कवितांवर विविध आरोप बिचा-या कवितेवर झाले, होत असतात. कवी आणि कविता विनोदाचे विषय होतात. अशा सर्व गोष्टी सहन करत कवितेचा प्रवास आजही दमदारपणे सुरु आहे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणना-या तुकोबापासून ते आत्ताची कविता लिहिणा-यापर्यंत प्रत्येक काळातल्या कवींनी शब्दांवर प्रभुत्व राखत मराठी भाषा समृद्ध केली आहे. अशा सर्व कवींना जागतिक भाषा दिनाच्या निमित्ताने मी वंदन करतो.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

5 Mar 2011 - 6:22 pm | अवलिया

सुरेख आढावा !!

लेखन आवडले.

कवितेचा शतकांतून प्रवास मस्त वर्णन केलात सर!
'पंत काव्य' हे नाव मोरोपंतामुळे; तर 'तंत काव्य' हे नाव साथीला असलेल्या तुणतुण्यामुळे आलं असावं का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2011 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'पंत काव्य' हे नाव मोरोपंतामुळे; तर 'तंत काव्य' हे नाव साथीला असलेल्या तुणतुण्यामुळे आलं असावं का ?

अगदी बरोबर...!

-दिलीप बिरुटे

सहज's picture

5 Mar 2011 - 8:30 pm | सहज

दिव्य तो काव्यप्रवास!

लेख आवडला सर.

इन्द्र्राज पवार's picture

5 Mar 2011 - 10:55 pm | इन्द्र्राज पवार

"मराठी दिन २०११" मि.पा.वर साजरा करावा ही कल्पना संपादक मंडळाने स्वीकारली आणि श्री.धमाल मुलगा यानी एक छान आवाहन करून ती मूर्त स्वरूपात इथे आणली, त्यातील सर्वात सुंदर पुष्प म्हणजे डॉ.दिलीप बिरुटे सरांचे "कविता" महात्म्य. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनालाही साजेसे असे कवितेवर लिखाण येणे अत्यंत गरजेचे होते आणि ते 'मराठी'च्याच एका प्राध्यापकांनी करावे हे उचितच म्हणावे लागेल.

"...कवितेच्या बाबतीत कवितेला अनेकदा विविध आरोपांना सामोरे जावे लागले आहे..."

~ सरांच्या या विधानात तथ्य असले तरी ते प्रामुख्याने कवितेतील नवनवीन प्रयोगांना उद्देश्यून आहेत आणि अगदी 'रविकिरण मंडळा'च्या स्थापनेपासूनच त्या त्या काळातील कवींनी सहन केले आहे. माधव जुलिअनसारख्या संवेदनशील (आणि प्रयोगशीलसुद्धा) कविला अत्रे नावाच्या मुलुखमैदान तोफेपासून झालेला त्रास सर्वश्रुत आहे (त्यातही कवितेच्या प्रयोगांना विरोध म्हणून त्यांच्या खाजगी आयुष्याला वर्तमानपत्री रूप देऊन माधवरावांना पुणे सोडायला लावणे हे देखील नवकवितेवर झालेल्या आरोपाचे फलच होय.) पण हा झाला इतिहास....जो अनेकविध रुपाने मांडता येऊ शकेल...पण कवितेवर होत असलेल्या आरोपांची विकृती दूर होण्यासाठी मराठी वैचारिक प्रज्ञेची मूसच बदलणे आवश्यक आहे. महाविद्यालनीन पातळीवर भाषांच्या क्रमिक पुस्तकांतदेखील कवितेमधील नवीन प्रयोगांना किती स्थान दिले जाते हा तर एक संशोधनाचा विषय होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे फायदे अचाट असतील पण कविता आणि भाषा अभ्यासकांच्या दृष्टीने मोठा तोटा कुठला झाला असेल तर 'सत्यकथा' व्यासपीठाचे निधन. मी 'अकाली' म्हणणार नाही, पण भागवतांनी प्रयोगशील साहित्यिकांचा हक्काचा खटाववाडीचा रस्ता ज्या दिवशी बंद केला त्याचवेळी 'कवितेतील नूतन प्रयोगांचे' दिवे मंदावून गेले, ते कायमचेच. [याला अपवाद असतील, पण ते "नियमाला अपवाद असतात...' हे वचन सिद्ध करण्यापुरतेच.]

सरांच्या लेखात "दलित कविते"तून प्रकटलेला वेदनेचा हुंकार आलेला दिसत नाही. ७० च्या आगेमागे पॅन्थरच्या माध्यमातून कवितेतील रम्योत्कटवादी काव्यदृष्टी मराठीतून लुप्त झाली आणि तिला लाभली धगधगीत अशा सामाजिक विषमतेची किनार. त्यामुळे कवितेची सैध्दांतिक तपासणी करायची झाल्यास निव्वळ "संतकाव्य" ते 'रोमँटिसिझम' इतकाच प्रवास अभ्यासकाच्या नजरेत पुरेसा होणार नाही. 'जालिय' कवितेचा उल्लेख लेखात आलेला आहे, आणि त्या धाटणीच्या कवितांचा अभ्यास करण्याची वेळदेखील लवकरच येईल इतके ते विश्व अनुभवसंपन्न झाले आहे. भाषावृद्धी संदर्भात जर विचार करायचा म्हटल्यास इंटरनेटमुळे उद्योगधंद्याला जितके व्यापक व्यासपीठ मिळाले आहे तितके साहित्य संसाराला आजतरी व्यापक म्हणावे असे स्वरूप आले नसल्याने अमुक एकाच्या किंवा एकीच्या कवितेतील अभिव्यक्ती किती सखोल आहे हे (दुर्दैवाने) मर्यादित स्वरूपातच चर्चिले जात आहे. पण आज ना उद्या ही स्थिती बदलण्याची सुचिन्हे दिसत आहेत. त्यामुळे उद्याचे काव्य आणि त्याची समाजाप्रती बदललेली दृष्टी समजण्याची मानसिक तयारी या घडीला झाली आहे, हे जालावर पसरत असलेल्या काव्यप्रतिभेतून निश्चित जाणवते.

मराठी भाषा दिनानिमित्य "कविता" या विषयावर इथे चर्चा झाली तर ते भाषेच्या समृद्धीचे प्रतिक मानले जावे.

एका अविट गोडीच्या विषयाचा समावेश येथे केल्याबद्दल डॉ.बिरुटेसरांना मनःपूर्वक धन्यवाद !

इन्द्रा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2011 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेच्या प्रवाहाला केवळ 'स्पर्श' करतांना अनेक गोष्टींच्या नोंदी करायच्या राहून गेल्या आहेत. आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाशी मी सहमतच आहे. प्रतिसादाबद्दल धन्यु........!

माझ्या लेखनाचे पहिले वाचक आदरणीय श्री प्रमोद देव आणि दुसरे वाचक धमाल मुलगा यांना वरील लेखनात निवडक कवींच्या काही निवडक ओळी हव्या होत्या त्याही मला वेळेअभावी डकवता आल्या नाहीत.

-दिलीप बिरुटे

वपाडाव's picture

7 Mar 2011 - 12:05 pm | वपाडाव

सरांच्या लेखात "दलित कविते"तून प्रकटलेला वेदनेचा हुंकार आलेला दिसत नाही.

नामदेव ढसाळांचा उल्लेख व्हायला हवा होता.

पंगा's picture

5 Mar 2011 - 11:33 pm | पंगा

लेखाची मांडणी आणि एकंदर आढावा आवडला.

आता काही बारीक मतभेदाचे मुद्दे.

पंडितांसमोर विशिष्ट असा श्रोतुवर्ग होता. पंडित जरासे पुराणिक पद्धतीचे होते आणि त्यांना धनिकांचा आश्रय होता. राजे रजवाड्यांच्या आश्रय असल्यामुळे पुराणे सांगणे हा त्यांचा व्यवसाय होता जरासा फावला वेळ मिळाला की काव्यरचना करायची. पंडित कवींनी समाजमनाचे रंजन करायचा विडाही जरासा उचलला होता. असे असले तरी पंडितांचे लेखन मात्र संस्कृत महाकाव्यांवर पोसलेले असायचे. संस्कृत साहित्यातील रस,अलंकार,वृत्त यांचा या पंडितांना भारी नाद. उच्चभ्रू समाजातील संस्कृततज्ञ, पंडितवर्ग आणि उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे काव्य सादर केले. 'प्रगल्भ' लोकांसाठी केलेले साधारणतः त्यांचे लेखन होते. असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या भागात तथ्यांशाच्या दृष्टीने वस्तुतः मतभेद असण्यासारखे काही नसावे. निदान, माझा या विषयात काही अभ्यास नसल्याने यातील तथ्यांशाच्या बाबतीत याहून वेगळे असे काहीच म्हणू इच्छीत नाही.

मात्र एक सामान्य निरीक्षण येथे नोंदवावेसे वाटते.

पंडितांसमोर 'विशिष्ट असा श्रोतृवर्ग' होता हे बहुधा पटण्यासारखे आहे. पंडितांचे लेखन संस्कृत महाकाव्यांवर पोसलेले असायचे, आणि संस्कृत साहित्यातील रस,अलंकार,वृत्त यांचा या पंडितांना भारी नाद होता, हे निरीक्षणही बहुधा योग्यच असावे. तसेच, त्यांचे काव्य हे समाजातील तथाकथित उच्चभ्रू वर्गाच्या, पक्षी संस्कृततज्ज्ञ, पंडितवर्ग आणि अन्य तथाकथित उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम असावे, याबद्दलही वाद घालण्यासारखे काही नसावे.

मात्र, पंडितांसमोरील 'विशिष्ट अशा श्रोतृवर्गा'तील सर्वच जण (किंवा बहुतांशसुद्धा) हे संस्कृततज्ज्ञ (किंवा संस्कृतातील जाणकार किंवा संस्कृत थोडेबहुत समजणारे), पंडित, तथाकथित उच्चभ्रू, तथाकथित उच्च अभिरुची असलेले किंवा 'प्रगल्भ' असावेत, याबद्दल साशंक आहे. वैयक्तिक पातळीवर, या 'विशिष्ट अशा श्रोतृवर्गा'बद्दलच्या बालपणीच्या स्वल्पनिरीक्षणाशी आणि बुजुर्गांकडून मौखिक परंपरेने कानावर पडलेल्या गोष्टींशी याचा फारसा मेळ बसत नाही.

त्याहीपुढे जाऊन, 'प्रगल्भता' आणि समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाचे सदस्यत्व (त्यातसुद्धा विशेष करून जन्मसिद्ध सदस्यत्व) यांचा काही आपोआप संबंध असावा असे वाटत नाही. आणि 'अभिरुचीची उच्चता' म्हणजे नेमके काय, याबद्दल बहुधा एकमत नसावे.

त्यामुळे, फारतर, या 'विशिष्ट अशा श्रोतृवर्गा'च्या पारंपरिक आवडीनिवडींशी मिळतेजुळते काव्य या पंडितकवींनी केले (आणि त्याहून व्यापक श्रोतृवर्ग त्यांच्या कक्षेबाहेर होता), इथवर म्हटल्यास बहुधा सहमती होऊ शकेल. मात्र त्याचा श्रोतृवर्गाच्या अभिरुचीच्या उच्चतेशी, पांडित्याशी, संस्कृतच्या ज्ञानाशी किंवा प्रगल्भतेशी लावलेला आपोआप संबंध काही पटला नाही. (भ्रूच्या उच्चतेशी संबंधही तितकासा पटला नाही, पण काही अंशी समजू शकतो. शेवटी भ्रू ही काय, जितकी ठेवावी तितकी उच्च किंवा नीच राहू शकते. त्याचा पांडित्य, प्रगल्भता, ज्ञान, अभिरुचीचा प्रकार वगैरेंशी संबंध असण्याची पूर्वअट तर नसतेच, आणि त्यांच्याशी ताळमेळ असण्याची अपेक्षा तर नसतेच नसते. भ्रूची पातळी हा स्वभावतः एक स्वयंघोषित प्रकार आहे.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2011 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रोतुवर्गाच्या मुद्याबद्दल मी तुमच्याशी किंचीत सहमत आहे. सर्वसाधारण श्रोते या पंडितांसमोर अगदी नव्हतेच असे काही समजण्याचे कारण नाही. मोरोपंताचेच उदाहरण देता येईल. बारामतीच्या नाइ़कांनी पंताची गुणवत्ता ओळखून कुटुंबातील मुलाबायकांना पुराण-कथन करण्यासाठी नेमणूक केली. आता हे कथन मराठीतून असले तरी संस्कृतप्रचुर मारा त्यावर असेल आणि तेही कुटुंबं ते कथन समजून घेणारे असावे. आता इथे श्रोतृवर्गाची अभिरुची पाहूनही पंडित कवी कवन करत असतील असे मला वाटते.

अजून एका मुद्याकडे आपले लक्ष मला वेधले पाहिजे. कवी हा 'पंडित' म्हणून केव्हा मान्यता मिळवत असे, तर मध्ययुगीन शिक्षण पद्धतीत 'व्युत्त्पन्न' आणि 'पंडित' अशा प्रकारच्या संज्ञा आढळतात. काही प्राचीन ग्रंथाचा अभ्यास झाल्यावर त्याला आपापल्या स्पेशलायझेशन मधून काही प्राचीन काव्य आपापल्या प्रतिभेने लिहून दाखवावे लागे. त्याचबरोबर व्याकरण, न्याय, मिमांसा, वेदांत अभ्यास किंवा एका शास्त्राचा अभ्यास गुरुच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करायचा त्यावर प्रभुत्त्व मिळवणारा तो 'पंडित' समजला जात असे, आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बारा वर्ष लागत होते. [चुभुदेघे]

संस्कृत वृत्तात लेखन करणे आणि संस्कृतप्रचुर मराठी लिहिणे हा पंडितांचा आवडता प्रांत होता. त्यामुळे आपण जे शिक्षण घेतले आहे ते शिक्षण दाखविण्यासाठी [पांडित्याचे प्रदर्शन] ते सामान्य श्रोतूवर्गासाठी फार लिहित असतील असे काही वाटत नाही. पंडित कवीच्या अभ्यासकांचे म्हणने आहे की, विद्वान संस्कृततज्ञ आणि तसाच काव्याची अभिरुची असणारा वर्गच पंडित कवींसमोर होता. आणि ते त्यांच्यासाठी प्राचीन ग्रंथातील काही निवडक प्रसंग घेऊन अलंकाराची पेरणी करुन, संस्कृत काव्यशास्त्राच्या आधाराने आपली मांडणी करत असत. तेव्हा फारसे सामान्य श्रोते त्यांच्यासमोर नसावेत असे मला वाटते

पंतांची विद्वत्ता पाहून काही शेजारी स्त्रिया त्यांच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या की आम्हाला काही ओव्या लिहून द्या. मग तेव्हा पंत प्रासादिक अशा मराठी ओव्या त्यांना लिहून देत असेही वाचायला मिळते. तेव्हा सामान्य श्रोतुवर्गासाठी खूप काही लिहिता-बोलता येईल यासाठी असलेली प्रतिभाही त्यांच्याकडे होतीच.

प्रतिसादाबद्दल धुन्यु......!

-दिलीप बिरुटे

विसुनाना's picture

7 Mar 2011 - 11:33 am | विसुनाना

मूळ लेख आवडल्याची प्रतिक्रिया खाली दिली आहे. हा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे.
अवांतर -
श्रोतृवर्ग हा शब्द आपण काही ठिकाणी श्रोतुवर्ग असा चुकीचा लिहीला आहे . बारामतीचे नाइक हा उल्लेख बारामतीचे नाईक असा हवा. तसेच 'बारा वर्ष लागत होते' हा वाक्यखंड 'बारा वर्षे लागत होती' असा हवा.धन्यु चे धुन्यु झाले आहे. खरेतर धन्यवाद असे हवे होते. असो.
हा लेख ललितलेख नसल्याने लेखासह त्यावरील प्रतिसादही शुद्धलेखनास धरून असावेत ही अपेक्षा होती इतकेच. राग मानू नये.

इन्द्र्राज पवार's picture

7 Mar 2011 - 12:21 pm | इन्द्र्राज पवार

"...लेखासह त्यावरील प्रतिसादही शुद्धलेखनास धरून असावेत ही अपेक्षा होती इतकेच...."

~ या अपेक्षेबद्दल श्री.विसुनाना यांना मनःपूर्वक धन्यवाद.

डॉ.बिरुटे यांच्यासारख्या 'मराठी' विषयाच्या प्राध्यापकांनी तरी "धन्यु...धुन्यू" असे हास्यास्पद आणि मराठी भाषेची लक्तरे काढणारी रुपे आपल्या लिखाणात वापरू नयेत.

"शुद्धलेखन फाट्यावर मारा"...वगैरे प्रतिसाद इथे वारंवार व्यक्त होत असतात, ते खेळकरपणानेच घ्यावेत....त्याची अंमलबजावणी अट्टाहासाने होत राहिली तर तो 'मराठी दिन' संकल्पनेचाच अपमान होईल.

असो. सरांना या सूचनेबद्दल राग येणार नाही अशी आशा आहे.

इन्द्रा

आजानुकर्ण's picture

7 Mar 2011 - 5:39 pm | आजानुकर्ण

'मराठी' विषयाच्या प्राध्यापकांनी तरी "धन्यु...धुन्यू" असे हास्यास्पद आणि मराठी भाषेची लक्तरे काढणारी रुपे आपल्या लिखाणात वापरू नयेत.

विसुनाना आणि इन्द्राशी सहमत. चांगल्या लेखात अशा गोष्टींनी रसभंग होतो.

पंगा's picture

7 Mar 2011 - 6:28 pm | पंगा

चांगल्या लेखात अशा गोष्टींनी रसभंग होतो.

अधोरेखिताशी विशेष सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2011 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादातील धन्यु शब्दामुळे चांगल्या लेखाचा झालेला रसभंग मी समजू शकतो. :)

कृपया, ज्यांचा ज्यांचा असा रसभंग झाला आहे, होत आहे, आणि होणार आहे. त्या सर्वांनी माझ्या खरडवहीचा वापर करावा, ही आग्रहाची नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2011 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.बिरुटे यांच्यासारख्या 'मराठी' विषयाच्या प्राध्यापकांनी तरी "धन्यु...धुन्यू" असे हास्यास्पद आणि मराठी भाषेची लक्तरे काढणारी रुपे आपल्या लिखाणात वापरू नयेत.

'धन्यु 'हा शब्द मला जालावर वावरतांना लिहायला आवडतो. आपल्या मताचा आदर करुन म्हणतो की, मला तो शब्द अजिबात हास्यास्पद वाटत नाही. जालावरील अनेक शब्द आता मराठी भाषेत रुढ होत आहेत तेव्हा धन्यु शब्द आज तितका रुढ नसेल पण उद्याच्या मराठी भाषेत तो नक्की रुढ झालेलाही असेल. असो, प्रतिसादाबद्दल धन्यु.....!

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

7 Mar 2011 - 6:43 pm | अवलिया

दिलीप शेटशी सहमत आहे. :)

यासंदर्भात माझी आणि इंद्रराज पवारांची काही खरड चर्चा झाली. त्यात मी त्यांना ज्या खरडी केल्या त्या इथे देत आहे.

धन्यवादचे धन्यु तुम्हाला आवडले नाही असे कुठेतरी वाचले. Smile

कान हा शब्द कर्ण (संस्कृत) -- कण्ण --- कान असा अपभ्रंश होत आला आहे.

कर्ण हा शब्द जसाच्या तसा सुद्धा वापरला जातो आणि कान म्हणुन पण वापरला जातो.

जर ते चालते तर धन्यवाद--- धन्यु का चालु नये?

धन्यवाद म्हणून माझ्या एखाद्या मित्राला म्हटले तर ते त्याला मैत्रीत ठिक वाटत नाही आणि बस का यार असे म्हणतो पण तेच त्याला पाठीवर थाप मारुन धन्यु रे किंवा फोन वर धन्यु म्हटले तर तितके गैर वाटत नाही Smile

शब्द संवाद परिपूर्ण करणारे असावेत त्यासाठी त्यात कालानुरुप बदल व्हायला हवा असे मला वाटते. आणि असे बदल होत असतील तर तो भाषेचा र्‍हास आहे असे मी मानत नाही

आणि

>>>>धन्यु' हे धन्यवादचे आंग्ळाललेले रूप मी इथेच - मि.पा.वर - पाहिले आहे. त्यामुळे मला ते (जरी तुम्ही म्हणता त्याप्रमाने चुकीचे जरी नसले तरी...) खटकते आणि याच हेतूने तिथे तसे मत मांडले होते.

मास्टर चे मास्तर.. ट्रे़झरीची तिजोरी... ही इंग्रजी शब्दांची मराठी रुपे आपण मान्य केली
मेजाचे टेबल असे थेट शब्द उचल मान्य केली

धन्यवादचे थांकुच्या स्वरुपात धन्यु झाले तर उलट मराठी शब्दाचेच रुप बदलून इंग्रजी शब्दाला पर्याय समर्थ पणे आला हे खटकले?

बर बर.

>>>>'कर्ण=कान' यात अमान्य करण्याचे काहीच कारण नाही. फक्त व्यावहारीक पातळीवर लिहिताना वा बोलताना .....असाही लिखाणात कुणी प्रयोग करीत नाही....जरी भाषेच्या दृष्टीने त्याचा वापर अगदी अचूक असला तरी.

दंतवैद्य
कर्णरोग
अनेक दा़खले देता येतील

थांबतो.

बाकी चालू द्या.

भाषा शुद्ध ठेवण्याच्या कुठल्याही प्रयत्नाला आमच्या शुभेच्छा या असतातच असतात !! :)

खूप सुंदर आढावा घेतला आहे कवितेचा.
लेख अतिशय सुंदर झाला आहे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा. :)
अभिनंदन!

कलंत्री's picture

6 Mar 2011 - 12:08 pm | कलंत्री

प्रा. साहेबांचा लेख आणि त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया ही खास मेजवानीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

खरे तर मिपाचा कट्टा व्हावा असे माझ्या मनात होते आणि हा लेख वाचल्यानंतर हा कट्टा व्हावा आणि मिपा चे एक वेगळेच अंग आपल्या लोकांना दिसावे अशी भावनाही मनात चमकून गेली.

अशा प्रस्तावित कट्ट्यावर प्रासाहेब आणि इतर लोकं कविता आणि त्याचा रसास्वाद घेत आहे असे चित्र तरळत आहे.

( स्वप्नाळू आणि काव्यप्रेमी) कलंत्री

गंगाधर मुटे's picture

6 Mar 2011 - 8:09 pm | गंगाधर मुटे

एवढ्याशा छोटेखानी लेखात आपण बर्‍याच मुद्यांना स्पर्श केला आहे.
आवडला लेख.

इन्द्र्राज पवार's picture

6 Mar 2011 - 9:07 pm | इन्द्र्राज पवार

"...संगणकीय काळातील शब्दांचा भडीमार असलेल्या कविता, इंग्रजी शब्दांच्या अतिरेक असलेल्या कविता, पाश्चात्य कल्पना, तेच ते दु:खानुभव सांगणारी कविता...."

~ सर, 'कवितेवरील आरोप' यामध्ये तुम्ही वरील छटांना प्राधान्याने स्थान दिले आहे, तरीही "कविते" ची शुद्धता टिकविण्याच्या चारचौघांच्या प्रयत्नांचाच तो एक भाग होता/आहे असे मानले तर हे दिसून येईलच की केवळ 'हौस' वा 'चूष' म्हणून कवितेच्या रचनेत इंग्रजी शब्दांचा आणि भन्नाट उपमांचा अतिरेक कुणी करत असेल तर ते कोणत्या पातळीपर्यंत स्वीकारणीय आहे हा देखील एक वादाचा मुद्दा आहेच आहे.

मर्ढेकरांनी काय थोडे प्रयोग केले होते काय? पिपांत मेलेले उंदिर तर सोडूनच द्या, पण "बेकलायटी", "फलाट", 'थ्रू" गाडी, कुल्फीमलईवाला, चिमट बाटल्या...इत्यादी त्या काळी डोक्याला भिरभिरी आणणारे शब्द प्रयोग....इतकेच काय पण 'वाह्यात माझी वावडी..." या अत्यंत गाजलेल्या कवितेत तर ते म्हणतात, "शेत ओकी ढेकळा...." सारखे धगधगीत रूपक वापरून नांगरटीला एक रोखठोक प्रमाण दिले ते किती समकालिकांच्या पचनी पडले असेल? पण त्यांचा जो समाज अभ्यास होता....त्याला आपण मानले तर मग त्यांच्यावर झालेले 'अ‍ॅब्सर्ड्टी' चे आरोप वृथा वाटावेत असेच आहे. दि.पु.चित्रे, मनोहर ओक आणि अरुण कोलटकर यानी काय कमी प्रयोग केलेत? अरुण आणि नामदेवरावांच्यावर तर स्वतंत्र धागे इथे निघणे आवश्यक आहेत, इतकी त्यांची महती आहे. पण म्हणून सरसकट भाषेत आणलेल्या प्रयोगाचे स्वागत केलेच पाहिजे असे नाही. कविच्या भूमिकेशी तादात्म्य पावण्याची प्रक्रिया ही कविता समजून घेण्याचा एक प्रकार आहे....ज्या विषयावर वा ज्या घटनेवर त्या कवितेतील भाषेचे प्रयोजन आहे तो विषय वा घटना तुम्हाला मला परिचित असेल तरच भाषेतील ती तोडमोड वा नवता आपल्या पचनी पडू शकेल. पण इतरांचाही विचार केलाच पाहिजे. 'भोपाळ कांडावर' त्या त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या शेकडो कवितातील मूठभर तर कविता आज आपल्या जवळ आहेत का? नाही, कारण एकच....ती वेदना समजावून सांगण्यासाठी वापरल्या गेलेल्या प्रतिमा इतक्या ठिसूळ होत्या की, कविने कोणत्या उद्देशाने तिचे प्रयोजन आपल्या रचनेत केले असावे असेच सतत वाटत राहते. उदा....त्या कांडावरील दोन ओळी रविवारच्या वर्तमानपत्राच्या ललित आवृत्तीतून....मला आठवतात तशाच देत आहे :

"दे श्वास मला ऑक्सिजन, घुटमळत आहे कार्बनमध्ये
उद्याचा दिस जरी नाही मजला, पण होप्स ठेवतो कुपीमध्ये..."

काय समजते यातून? काय प्रसंग...काय ती घटनेची दाहकता....आणि कशासाठी 'होप्स' ? कसली ती कुपी? ... मग अशावेळी ती कविता (?) भोपाळ वायू दुर्घटनेवर आहे म्हणून डोक्यावर घ्यायची का? असे असेल तर दुर्बोधता + छ्चोरपणा याच्याशिवाय आरोप व्हायचेच असले तर आणखीन किती आणि कुठले होत राहतील? तरीही भिन्न भिन्न स्वरूपाचे त्या त्या काळात आरोप होत गेले म्हणून तर कविता जगत आली आहे असे माझे मत आहे.

पु.शि.रेगे यानीदेखील काय कमी प्रयोग केले? पण ज्या ज्या वेळी केले त्या त्या वेळी त्यानी मराठी भाषेला नवनवीन अलंकारांचे आंदण दिले आहे. स्त्रीच्या देहाचे वर्णन करताना ते लिहितात :

"सतेज तुझे बोलणे-चालणे
सुकुमार खेळे अंगी नव्हाळी....
क्षणभर वाटे
अपूर्व जणून हिमसेक हा
स्वच्छ, निरागस, तेजाळ, विश्रब्ध..."

इथे कविची ना नैतिक ना अनैतिक दृष्टी....त्यांच्यावर असला आरोप होऊच शकत नाही. रेग्यांच्या कविमनातील पुरुष स्त्रीकडे एक 'स्त्री' म्हणूनच पाहतो आणि मग तिथे अश्लिलतेचा आरोप होणे हे त्या कविवर अन्यायकारक ठरते. 'हिमसेक' ची प्रतिमा तर अतुलनिय अशीच आहे.

तुम्ही म्हणता तसे संगणकीय घडामोडीमध्ये नवनवीन शब्दांच्या जडणघडणीला खूप वाव आहे, पण म्हणून उगाच "तुझ्या हार्ड डिस्कमध्ये माझ्या दिलाचा प्रोग्राम व्हायरस फ्री राहिल काय?" ही कोणत्या प्रयोगाची जातकुळी?. रेग्यांनी "झनन-झांजरे....ठिबक-ठाकडे....बहर-बावरे" या नादवंत शब्दांना जन्म दिला होता. प्रयोगाच्या दृष्टीने या प्रयोजनाला निश्चित असा अर्थ नसेलही, पण त्यातील गेयता मोहवून टाकते.

फार सुंदर आहे हा विषय...!!

इन्द्रा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2011 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दलित कवितेचे त्याच त्या अनुभवाबद्दल थोडी चर्चा केली पाहिजे असे वाटते. गेल्या काही वर्षात दलित कविता पाहिल्या की लक्षात येते की, युगानयुगे शोषित माणसाचे अनुभव दलित कवितेतून व्यक्त झालेले दिसते. दलित कविता म्हटले की, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर या कवींची आठवण होते. वरील सर्व कवींची वेदना एकच असली तरी अविष्कारात विविधता आहे.

आज दलित कवींची दुसरी-तिसरी पिढी कविता लिहिते आहे. पण अनुभवाच्या एकेरीपणाच्या पुढे ती कविता जात नाही असे मला वाटते. एका कवीपेक्षा दुस-या कवीची कविता खूप-खूप वेगळी असेल पण अनुभव-वेदना मात्र एकच आहे असे वाटायला लागते. असो, विषय खूप मोठा आहे.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

7 Mar 2011 - 2:43 am | विकास

मराठी कवितेच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाचा धावता आढावा एकदम आवडला.

रे.ना.वा.टिळक, कवी विनायक, बालकवी, गोविंदाग्रज, बी, ते आजच्या नवकवीपर्यंत अनेक कवींची नावे आता टंकावे लागतील.

यात राहीले असे म्हणायला म्हणून उद्देश नाही, पण "अशिक्षित" असलेल्या बहिणाबाईंनी देखील स्वत:च्या काव्यातून विचार करायला लावला.

या शिवाय अजून एक कवि/कवयत्रींचा प्रकार आहे. त्यांची काव्ये कायम निनावीच आणि मर्यादीत वर्तुळातच राहतात - मंगलाष्टके, डोहाळे आणि पाळणे लिहीणारे. काहीवेळेस जुन्याच काव्यपंक्तीत नावे अक्षरशः "फाइंड अँड रिप्लेस" केलेली असतात. पण काही मंगलाष्टके, डोहाळे आणि पाळणे हे मात्र खरेच स्वतंत्र काव्य प्रकार असतात.

जाता जाता एक प्रश्नः

शिवछत्रपती, सवाई माधवराव, भाऊसाहेब पेशवे, हे शाहिरांच्या लेखणीचे विषय झाले.

यातील सवाई माधवराव शाहीरांच्या लेखणीचे विषय का आणि कसे झाले यासंदर्भात काही माहिती मिळाली तर आवडेल.

इन्द्र्राज पवार's picture

7 Mar 2011 - 11:45 am | इन्द्र्राज पवार

"...यातील सवाई माधवराव शाहीरांच्या लेखणीचे विषय ....!"

~ श्री.विकासरावांना पडलेला हा प्रश्न माझ्याही मनी आलाच होता, पण नंतर वाटले की कदाचित सरांना "थोरले माधवराव" अपेक्षित असावेत.

"शाहिरी परंपरे"त समस्त पेशव्यांपैकी अमुक एकावर भरभरून पोवाडे आल्याचा दाखला नाही....पानिपतच्या इतिहासावर शाहिरी रचना आहेत.

इन्द्रा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2011 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाहिरी परंपरे"त समस्त पेशव्यांपैकी अमुक एकावर भरभरून पोवाडे आल्याचा दाखला नाही

काय म्हणता ? :) असो,

प्रभाकर या शाहीराने जे काही ऐतिहासिक पोवाडे लिहिले आहेत त्यापैकी दुस-या बाजीरावावर दोन पोवाडे आणि आणि पेशवेवंशावर दोन पोवाडे लिहिले आहेत. पेशवेवंशावरील पोवाड्यात काय काय आहे ते मला काही माहिती नाही. अधिक संदर्भ मिळाले तर लवकरच सादर करतो.

होनाजी हा तर पेशव्यांचा आश्रीत शाहीर होता. होनाजीला पेशवेदरबारात खूप मानही होता. होनाजीने जे काही पोवाडे लिहिले त्याबद्दल अधिक माहिती माझ्याजवळ आता नाही. उत्तर पेशवाईतल्या शाहीरांबद्दल काही माहिती मिळाली तर पुढे कधी तरी डकवेन. [डकवेन-डकवणे, हा शब्द जालावर रुढ आहे. त्यावर काथ्याकूट करु नये. धन्यवाद.]

-दिलीप बिरुटे

पंगा's picture

7 Mar 2011 - 6:21 pm | पंगा

[डकवेन-डकवणे, हा शब्द जालावर रुढ आहे. त्यावर काथ्याकूट करु नये. धन्यवाद.]

'डकवणे' हा शब्द जालावरच कशाला, जालाबाहेरही रूढ असावा. ('चिकटणे' अशा अर्थी 'डकणे' असा शब्द मोल्सवर्थात सापडतो. तसेच 'डकवणे' अथवा 'डकविणे' याचा अर्थ मोल्सवर्थाने दिलेला नसला, तरी असे क्रियापद असण्याबद्दलची दखल मोल्सवर्थाने घेतलेली दिसते. पहा: 'डकवण' अशा मोल्सवर्थातील नोंदीबरोबरची टीप.)

चित्रा's picture

7 Mar 2011 - 5:42 am | चित्रा

धन्यवाद! आढावा आवडला. काही कवितांवरून बिरुटेसरांनी असेच अधून मधून लिहावे ही विनंती.

sneharani's picture

7 Mar 2011 - 10:38 am | sneharani

सुंदर लेखन!
मस्त!!

विसुनाना's picture

7 Mar 2011 - 11:20 am | विसुनाना

मराठी कवितेचा संक्षिप्त आढावा घेणारा लेख आवडला.
शिवाय अनेकांचे (विशेषतः इंद्रराज यांचे) प्रतिसादही अभ्यासपूर्ण आहेत. तेही आवडले.
प्रयोगाबाबत म्हणाल तर आपल्या शरदिनी (मंदार जोगळेकर-भडकमकर मास्तर-)अभ्यंकर यांची कविता कशी वाटते? :)

यशोधरा's picture

7 Mar 2011 - 11:35 am | यशोधरा

सुरेख लेख. आढावा आवडला.

लेख अतिशय आवडला ...
मनापासुन एकदम ...

त्यावरील प्रतिक्रिया ही खुपच सुंदर ..अप्रतिम..
विशेष इंद्राजीम्ची पहिली प्रतिक्रीया छानच.

अवांतर : सध्याचे नवकवी पाहिले की कधीतरी वाटते येव्हडी प्रतिभा .. येव्हडे शब्दसामर्थ्य क्वचितच मिळते काही जनांना.
पण स्पर्धेच्या या जगात हे नवकवी गर्दीत अनोळखीच राहतात ..
काही वेळेस त्यांच्या कविता नीट नसतील ही, पण प्रोत्साहनपर आपल्या रिप्लयमधुन नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल..
आणि नक्कीच, हे लिखान करणारे भाषा समृद्ध करताना, त्याच्यामध्ये आपल्या पामराचे ही थोडे हातभार लागले आहेत हा आनंद सर्वांना मिळेलच मिळेल ..

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2011 - 4:50 pm | परिकथेतील राजकुमार

नानबाशी सहमत :)

प्रा.डॉ. सुरेखच आढावा घेतला आहेत. खुप आवडले.
आता लिहिते व्हा !

अवांतर :- आंतरजालावर एका वेगळ्याच विश्वातला सवितेपासून कवितेपर्यंतचा प्रवास आठवला ;)

आजानुकर्ण's picture

7 Mar 2011 - 5:34 pm | आजानुकर्ण

चांगला लेख लिहिला आहे बिरुटे सरांनी. अतिशय माहितीपूर्ण

बेसनलाडू's picture

7 Mar 2011 - 11:31 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

धनंजय's picture

7 Mar 2011 - 11:45 pm | धनंजय

हा धावता आढावा म्हणजे मेजवानीपूर्वीचे क्षुधावर्धक असल्यासारखा.

प्रत्येक काळावरती काही कवितांमधील कडवी मासल्यादाखल घालून उत्तम लेखमाला करता येईल. सरांनी आणि काही अन्य चौफेर वाचकांनी मनावर घ्यावे, ही विनंती.