'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in क्रिडा जगत
1 Mar 2011 - 8:28 pm

टिप :
सदर लेखात क्रिकेट आणि भारतीय संघाविषयी काही टोकाची आणि प्रामाणिक मते आढळतील, ती वाचुन आपल्याला अस्वस्थ वाटत आहे असे वाटल्यास त्या क्षणी लेखाचे वाचन थांबवावे अशी आग्रहाची विनंती.
----------------------------
कबुल केल्याप्रमाणे आम्ही आमच्या 'धोबीघाट' लेखामालेचे दुसरे पुष्प घेऊन ह्या विश्वचषकाच्या मौहोलात दाखल झालो आहोत, गेल्या काही सामन्यातले भारतीय संघाचे प्रदर्शन पाहुन आम्ही पहिल्या भागात जे उत्साहाने 'दुसरा भाग टीम इंडियाला समर्पित' असे लिहले होते त्याचे बरे वाटले, निदान आम्ही शब्द मोडल्याचे पाप आम्हाला लागणार नाही आणि आम्ही आता ह्या लेखात टिम इंडियाचा फुल्टु धोबीघाट करणार आहोत, असो.

ह्यावेळेसही म्हणे भारतीय संघ विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत आहे, मला हे ऐकुन आश्चर्य नाही वाटले, मला 'ह्यावेळी पतंगराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत' ह्या वाक्याची जितकी सवय झाली आहे तितकीच 'भारत ह्यावेळी क्रिकेट विश्वचषकाचा दावेदार' ह्या वाक्याची झाली आहे. पतंगरावांच्या संदर्भातले वाक्य मी दर ५ वर्षांनी वाचतो आणि क्रिकेटचे ४ वर्षांनी एवढाच काय तो फरक, बाकी काय होतेय ते मी पाहिले आहे आणि तुम्हीही पहात आहात. माझ्या मते तर आजकाल 'महागाई कमी होणार', 'स्वतःच्या घराचे स्वप्न मध्यमवर्गाच्या आवाक्यात येणार', 'भारत अतिरेकी संघटनांच्या नाड्या आवळणार' ह्यापासुन ते थेट आत्तापर्यंतचे 'स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणार' ही वाक्ये जशी कायम जनतेच्या डोळ्यात धुळ फेकुन राज्यसत्ता भोगण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाली आहेत तसेच 'भारत यंदा विश्वचषक जिंकणार' हे वाक्य क्रिकेटवेड्या जन्तेच्या खिशातला पैसा काढण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाले आहे असे वाटते, रिझल्ट तर तुमच्यासमोर आहेत, नै का ?

तरी बघा ह्या विश्वचषकात आयोजकांनीच मस्त चालुपणा केला आहे, मागच्यावेळी जेव्हा भारत-पाकिस्तान प्राथमिक फेरीतच गारद होऊन बाहेर पडल्यावर ह्या आयोजकांचा जो सुफडा साफ झाला होता त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्यांना थेट "२०-२०" नावाचे उत्तेजक घ्यावे लागले, असो ह्यावर आम्ही मागच्या भागात पुरेसे भाष्य केले आहेच. तर मी काय सांगत होतो की ह्यावेळी चालुपणा करुन एकुण १४ संघांचे २ गट पाडले ( प्रत्येक गटात साधारण ३ फालतु टिम ) आणि त्या-त्या गटातुन ४ संघ पुढच्या फेरीत दाखल होतील असा नियम काढला.
आहे की नै गंमत, म्हणजे ओढुन ताणुन का होईना टॉप संघाना ( माझा व्ह्यु बिझीनेसचा, बाकी क्वालिटी तुम्ही पहा ) पुढची फेरी सुलभ झाली की नै ? एखाद्या बांग्लादेशने भारताला आणि अजुन कुणी पाकिस्तानला हरवले म्हणुन उगाच कोट्यावधींचे लुस्कान नको. ह्याला राजकिय भाषेत "डमी उमेदवार" देणे असे म्हणतात, म्हणजे एखाद्या मतदारसंघात एखाद्या मातब्बर नेत्याच विजय शुअर शॉट फिक्स असेल तर इतर पक्ष समजुतदारपणे उगाच नगाला नग म्हणुन 'डमी उमेदवार' देतात अशी रित आहे राजकारणाची, त्यातुन चमत्कार घडवणारा आणि मोहिते पाटलांसारख्या दिग्गजाला बाहेरचा रस्ता दाखवणार्‍या 'भारत भालकें'सारखा एखादाच आणि तो चमत्कारही एकदाच, हे जर वारंवार घडत असेल तर मग खेळायचे नियमच बदलावे लागतात व तेच आता घडले आहे.
असो, आता भारतासाठी ( किंवा कुठल्याही नामवंत संघासाठी ) पुढची फेरी अलमोस्ट फिक्स आहे, बाकीचे लिंबुटिंबु इथे खेळतात ह्याचीच चैन आहे, काही जण 'का खेळतात' हा प्रश्नच आहे.

असो, सध्या भारतीय संघाच्या मजबुत बांधणीचा आणि भयंकर फॉर्मचा वारंवार वास्ताँ दिला जातो, हे अर्थातच स्वाभाविकच आहे की हे असावेच लागते, हे सगळ्यांचे असते. मला सांगा तुम्ही एखाद्या संघाच्या कर्णधाराला "जाऊ दे, एवढ्या वेळी आमची टिम काय फॉर्ममध्ये नाही, बॅटिंगची बोंबाबोंब आहे आणि बॉलर्स तर हातापाया पडुन आणले आहेत. बहुतेक आम्ही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळू" असे बोलणे ऐकले आहे काय ? अहो विश्वचषकात खेळताय ना, मग चांगला फॉर्म आणि मजबुत बांधणी असणे अपेक्षितच आहे, अन्यथा संघ काय प्रतिस्पर्ध्यांच्या दाढ्या करायला पाठविला आहे की त्यांना मॉलिश द्यायला.
बाकी राहिली आकडेवारी, त्याचे कुणाला सांगताय ? मागच्यावेळी काय ही आकडेवारी नव्हती का ?

बाकी गेल्या काही दिवसात २ सामने थोडे थोडे पाहिले हो भारतीय संघाचे, भरुन आले बघा ह्या क्रिकेटचे बदलते स्वरुप पाहुन, च्यायला प्रत्येक डावात ३००+ ? अरे खेळपट्टी बनवता की गुळगुळीत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे बांधता ? जरा तरी त्या 'गोलंदाज' नावाच्या एकेकाळी क्रिकेटचा महत्वाचा भाग समजले जाण्यार्‍या लोकांवर दया करा.
तर ते असो, आपण बोलु भारतीय संघाचे, तर भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात ३००+ धावा ठोकल्या, सुरेखच आहे, फलंदाजांचे निर्विवाद यश आहे. अहो पण नंतर समोरचा संघही 'अलमोस्ट तेवढ्याच' धावा करतो ह्याला काय अर्थ आहे ? आपली बॉलिंग आहे का मजाक ? जर आपण 'असेच' खेळणार असु तर सर्वच गोलंदाजांचा घरी बसवुन ११ च्या ११ फलंदाज खेळवायला काय हरकत आहे ? एखाद्या ओव्हरमध्ये २-३ विकेट्स काढणे आणि उरलेल्यांमध्ये धु-धु धुतला जाणे ह्याला मी 'श्रेष्ठ गोलंदाजी' मानत नाही, त्या मिळालेल्या विकेट्स योगायोग आहेत. एखाद्याने टेचात १० पैकी २-३ ओव्हर्स मेडन टाकाव्यात, एकुणात जास्तीत जास्त ३५-४० धावा द्याव्यात आणि मग ज्या काही असतील त्या 'विकेट्स' घ्याव्यात, त्याला म्हणतात बॉलिंग. नाहीतर ह्या स्पेशॅलिस्ट बॉलर्स ( पक्षी : जहीर, नेहरा, मुनाफ वगैरे ) आणि पार्टटाईम बॉलर्स ( युवी, रैना आणि इतर ) ह्या गटांमध्ये फरक काय राहिला ?
फरक रहातच नसेल तर ह्यांना खेळवुन उगाच ३-४ चांगले फलंदाज आणि फिल्डर्स का कमी खेळवावेत, कारण एकदा का फलंदाजांकडुन खा-खा मार खाल्यावर ह्या बॉलर्सचा मैदानावर काय उपयोग असतो ? मुनाफला बॉलिंग झाल्यावर कुठे लपवावे हा प्रश्नच असतो कारण आपल्या स्पेशॅलिस्ट बोलर्सचे 'क्षेत्ररक्षण' हा सरकारी कारभारामधली 'पारदर्शता' इतकाच रोचक आणि संशोधनाचा विषय आहे.

असो, आता आम्ही काही निवडक खेळाडुंबद्दल ४ शब्द लिहणार आहोत.
१. विरेंद्र सेहवाग उर्फ नवाब :
खरे तर नवाब हे चुकीचे संबोधन आहे, सेहवागचे व्यक्तिमत्व जुळते ते सातारच्या राजे भोसल्यांशी. कृती आणि एकुणच वागण्यात तोच बेधडकपणा, तीच बेफिकिरी आणि तोच निडरपणा. मनापासुन खेळला तर समोरच्यांच्या चिंधड्या आणि मुड नसलाच तर 'तुमचा खेळ आणि तुम्ही गेलात चुलीत. मी मला वाटतो तसा शॉट मारणार, बाकी तुम्ही बघुन घ्या' ही वृत्ती.
क्षेत्ररक्षणात उगाच म्हणायचे म्हणुन चांगला फिल्डर, बाकी एखाद्या लग्नात जसा वरपक्षाकडच्या काकांच्या 'ताटे मोजायला मी इथे काय मोजणी कारकुन म्हणुन आलो आहे काय' सारखाच 'इथे क्रिकेटमध्ये मला काय डाय मारुन बॉल आडवायला आणले आहे काय, माझे काम बॅटिंग व तेच मी करणार' हा अ‍ॅटिट्युड.
चौकातला मवाली जसा परिणाम माहित असुन मोहल्ल्याबाहेरची पोरगी छेडतो आणि मार खातो तसेच हे नवाबसाहेबपण नेहमी 'ऑफ स्टंपबाहेरचा चेंडु छेडतात आणि विकेट टाकतात'. चालायचेच, मवाली आणि सेहवाग दोघेही सुधारणार नाहीत, सुधारले तर त्यांना अनुक्रमे मवाली आणि सेहवाग का म्हणावे बरं ?

२. युवराज सिंग :
स्वातंत्रसंग्रामाच्या काळात जसे चोरीसाठी तुरुंगात गेलेले काही लोक स्वातंत्र्यानंतर ताम्रपत्र घेऊन 'स्वातंत्रसैनिक' झाले आणि त्या तुरुंगवासाच्या पुण्याईवर आयुष्यभर 'मानाचे पान' घेऊ लागले तसेच 'नॅटवेस्ट सेरिजमधली एक खेळी आणि ६ चेंडुत ६ सिक्सर' ह्यांच्या पुण्याईवर युवराज किती दिवस संघात मिरवणार आहे ते गांधीबाबांना माहीत.
एकेकाळी हा तंदुरुस्त आणि चपळ होता, आता नुसता त्याचा ढोल झाला आहे तो ही खणखणीत वाजत नाही, मैदानावर धावतो तर असे वाटते मायला ह्याला पळताना धाप वगैरे लागुन मैदानावरच 'प्राणवायु' द्यावा लागेल की काय ?
त्याला एकेकाळी भारताचा 'जाँटी र्‍होड्स' असे म्हणत, आजकाल त्याला 'मुनाफ पटेल' असे टोपणनाव आहे व ते चारचौघात उच्चारायला बंदी आहे, मुनाफचा म्हणे अपमान होतो, होत असेल, आम्हाला जास्त माहित नाही.
सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची जी हालत आहे तीच युवीच्या फॉर्मची आहे ... थर्डक्लास.
सध्या टिमच्या यशापयशात युवीचे काँट्रीब्युशन किती .... ( सुरेशजींच्या मते ) कॉमनवेल्थ घोटाळ्यात त्यांचाजेवढा सहभाग होता तेवढेच.
युवीकडुन अपेक्षा किती ठेवाव्यात ..... कांद्याकडुन ठेवता तितक्याच, डोळ्यात नक्की पाणी आणेल. कांदा जसा भाव चढले की ग्राहकांच्या आणि उतरले की उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणतो तसाच युवी खेळला तर समोरच्या संघाच्या आणि गंडला तर आपल्याच संघ आणि समर्थकांच्या डोळ्यात पाणी आणतो.

३. युसुफ पठाण :
कुणाच्याही एखाद्याच्या घरी जसे एखाद्या दिवशी इरेस पेटुन बाबा स्वतः संपुर्ण स्वयंपाक करतात आणि तो खरोखर उत्कृष्ट होतो तसेच युसुफचे आहे, एखाद्या दिवशी तो खरेच नजर लागेल असे खेळतो. पण शेवटी बाबा रोज स्वयंपाक करु शकत नाहीत आणि युसुफही प्रत्येकवेळी खेळु शकत नाही.
कित्येक वर्ष एकाच वर्गात काढलेल्या एखाद्या टग्याला (सध्याच्या अर्थाने दादा नव्हे, तो विषय नंतर कधीतरी ) लेक्चरला पाहुन एखादा नवा जॉइन झालेला मास्तर जसा गर्भगळित होतो तसे युसुफ मैदानात फलंदाजीला उतरल्यावर 'आता काय वाढुन ठेवले आहे' ह्या विचाराने समोरच्या संघाचेही तेच हाल होतात. पण दोन्हीतली साम्य आहे, टग्या कधीतरीच असे वर्गात घुसतो तसाच युसुफ 'कधीतरी' समोरच्या संघाला बडवतो, अन्यथा टग्या नेहमी कँटिनला पडिक असतो आणि युसुफ हातघाई करुन पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसतो.
अजुन काय लिहणे, 'कधीतरी'च ह्या प्रसंगासाठी किती लिहावे ?
बाकी लोक त्याला फलंदाज मानत नाहीत, तो फलंदाज नाहीही, पण त्याने फरक पडत नाही.
आजकाल तो पार्टटाईम गोलंदाजीही करतो, करावी लागते, त्याच्याकडुन नेहमीच धावा निघत नसल्याने त्याला अशी इतर कामे करावी लागतात, एखाद्या दिवशी तो स्वतःच 'अंपायरची टोपी' घालुन मैदानात उभा राहिला तर आश्चर्य वाटुन घेऊ नका, एवढेच समजा की आज त्याचा 'बॅटिंग-डे' नाही व तो मैदानावर 'इतर' कामे करत आहे.

४. महेंद्रसिंग धोनी :
धोनी भारताचा कॅप्टन असणे आणि गडकरीसाहेब भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष असणे ह्यातले विलक्षण साम्य तुमच्या लक्षात येत नसेल तर माय लॉर्ड यु नीड सम थरो स्टडी. दोघांनाही करायचे काहीच नसते, मात्र काहीही झाले की मिरवायचे मात्र असते.
झालच तर जणु सगळे काही माझ्यामुळेच घडते आहे हा मजेशीर अ‍ॅटिट्युडही असावा लागतो.
मधुन आधुन एखादे गंमतशीर आणि वादग्रस्त स्टेटमेंट द्यायचे असते हे ही त्यांचे एक्स्ट्रा काम.
असे म्हणतात की भाजपाचा अध्यक्ष नेहमीच कमनशिबी असतो, धोनीही नेहमीच 'टॉस हारतो' ( पुढेमागे त्याचा हा गुण त्याला भाजपाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ).
भाजपाचा अध्यक्ष शक्यतो थेट लोकसभा, विधानसभा वगैरे निवडणुका लढवत नाही, आपला धोनी पण शक्यतो 'न खेळण्याची' परंपरा पाळण्याची पुरेपुर काळजी घेतो.
एक काळ होता की गडकरींनी धडाडीने 'मुंबई-पुणे महामार्गाचे काम एकहाती संपवले होते' आणि धोनीही एकेकाळी 'एकहाती सामना संपवुन टाकायचा', आय रिपिट ... एकेकाळी !

५. जहीर खान :
तुम्ही कधी साऊथ इंडियन पिक्चर बघता का हो ?
त्यात की नै एक दणकेबाज व्हिलन असतो, त्याचे मस्त चालले असते, पुरेपुर दहशत असते व त्याला स्मरुन तो राडे घालत असतो व पब्लिक बर्‍यापैकी त्याला 'डरुन' असते. त्याने अलाण्या-फलाण्या दिवशी भररस्त्यावर एखाद्याला रक्तबंबाळ होईपर्यंत तुंबलेला प्रसंग लोकांमध्ये त्याचा 'खौफ' निर्माण करण्यास पुरेसे ठरत असते, तो ह्यावर आयुष्यभव सुखाने जगु शकत असतो.
पण एके दिवशी अशुभ मुहुर्तावर तो डोक्यात हवा जाऊन चुकुन सिनेमाच्या हिरोला 'ललकारतो' व मित्रांनो इथे त्या व्हिलनची 'कहानी खतम' होते.
जहीरचे सेमच आहे बघा, त्याचे यॉर्कर्स, त्याचा स्विंग, त्याचे बाउंसर्स आणि लाईन & लेन्थ सारे सारे पुरेपुर खौफ निर्माण करणारे आहे.
पण गंमत अशी आहे की जहीरच्या नेमके महत्वाच्या क्षणी डोक्यात हवा जाते व तो प्रतिस्पर्ध्यांच्या 'हिरो बॅट्समन्सना' खुन्नस वगैरे देतो व इथे रक्तपाताला सुरवात होते, आठवा २००३ ची भारत वि. ऑस्ट्रेलिया फायनल, बस बस आम्हाला जहीरबद्दल एवढेच लिहायचे आहे, पुर्णविराम

६. हरभजनसिंग :
भज्जी म्हणजे देवानंद, वाढत्या वयात आणि ढासळत्या क्वालिटीतही झळकण्याची हौस.
माय लॉर्ड, एक काळ होता की देवानंदच्या केसांच्या श्टायलीत आणि त्याच्या अदांमध्ये एक आख्खी पिढी वाहुन गेली. भज्जीच्या चढत्या काळातही त्याच्या फिरकीच्या जादुने स्टिव्ह-वॉ च्या ऑसिजचे बलाढ्य साम्राज्यही असेच वाहुन गेले.
पण जुनी पुण्याई किती दिवस पुरवुन खाणार महाराज ?
एके काळी ह्याचे बॉल वळत होते आणि ह्याला विकेट्स पडत होत्या. आता उगाच दुसरा पर्याय नाही म्हणुन पुर्वपुण्याईमुळे ह्याला स्टार्टिंग-११ मध्येखेळवणे म्हणजे वय होऊनसुद्धा करुणानिधींनी अट्टाहासाने स्वत:ला मुख्यमंत्री म्हणुन मिरवणे.
बाकी भज्जी हा 'नव-डे' चा गोलंदाज नाहीच. लावा बरं ३-४ क्लोजिंग फिल्डर्स, २ स्लिप्स आणि द्या ४ दिवस जुन्या खेळपट्टीवर ७० षटके वापरलेला चेंड्य भज्जीच्या हातात, फिर मॅजिक देखो साब !

७. श्रीशांत :
प्रत्येक वर्गात, प्रत्येक हापिसात आणि बहुतेक प्रत्येकच ठिकाणी 'च्यायला एकदा ह्याला कोपच्यात घेऊन बडवला पाहिजे, लै मस्ती आलीय ह्याला फुकटची' टाईपचा एक तरी मुलगा असतोच, टिम इंडियामध्ये 'श्रीशांत' आहे बॉस.
प्रत्येकाला जसा आपल्या मॅनेजर ह्या खुर्चीवर का बसतो हा प्रश्न पडतो तसेच मलाही 'श्रीशांत टिममध्ये का आहे' असा प्रश्न पडतो.
प्रत्येक ग्रुपमध्ये जसा एखादा फालतु कमेम्ट्स टाकणारा, उगाच लक्ष वेधुन घेणारा, आढ्यतखोर महामुर्ख मनुक्ष असतो तसा मेहरबान आपल्या टिममध्ये 'श्रीशांत' आहे.

८. मुनाफ पटेल :
अगदी प्रामाणिक, पापभिरु, कचखाऊ, दिवाभित पांढरपेशी मध्यमवर्गीय व्यक्ती, कुठल्याही महानगरात हटकुन आढणारी. रोजच्या कामात काडीचा उत्साह नसल्याने रडत-खुडत हापिसला जाणारी, तोंड वेडेवाकडे करुन काम करणारी आणि घरी परत आल्यावर संपुर्ण कंटाळुन कशातही रस न घेता अंथरुणावर अंग टाकणारी व हेच जीवन वर्षानुवर्षे जगणार्‍या एका मोठ्ठ्या समुदायाचा टिम इंडियातला प्रतिनिधी म्हणजे 'मुनाफ पटेल'.
गोलंदाजीचे काम जमेल तेवढ्याच प्रामाणिकपणे करणारा, त्यातही तोंड वेडेवाकडे न पडणारा, फिल्डिंग आणि बॅटिंग ह्यासारख्या समाजकार्यात अजिबातच रस न घेणारा आणि कुठल्याच बाबतीत स्वतःचे मत नसल्याने वादात न पडणारा हा नाकासमोर चालणारा 'मुनाफ'.
किती अपेक्षा ठेवायच्या तुम्हीच ठरवा, वाढत्या अनुभवामुळे जरा समंजस आणि समजुतदार वाटतो आहे तरी धडाडीची भयंकर कमतरता आहे.

९. आर. अश्विन :
केवळ आयपीएलच्या चेन्नै टिममध्ये खेळल्याने जर ( श्रीकांतच्या कृपेने ) इंडियन क्रिकेटमध्ये वर्णी लागत असेल बिलिव्ह मी ह्या रेटने आपल्या सपोर्ट स्टाफमधले निम्म्यांच्या वर चेन्नैच्या चेपॉक स्टेडियमबाहेर नारळ पाणी, इडली-वडा सांबार विकणे असा व्यवसाय करत असतील किंवा सरळ दणक्यात रजनीची गाणी लाऊन चेन्नैमध्ये रिक्षा पळवत असतील.
मला ह्याच्या निवडीतले लॉजिक समजले नाही तर मी काय कप्पाळ कमेंट करणार ?

असो, मजेमजेत बरेच काही लिहुन झाले.
भारत जिंकेल का वगैरे असल्या फालतु प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही बांधिल नाही, कोणीही जिंको पण खेळाचा विजय होईल असे युसलेस इमोशनल ब्लॅकमेलही नका करु, बिझीनेसमात्र 'येकदम कडक' होणार ह्यात अजिबात वाद नाही.
तशी सेटिंग झाली आहे म्हणतात

तुम्हाला हे आवडो किंवा ह्याचा बेक्कार राग येवो, आम्ही ही स्पर्धा संपोस्तोवर मधुनाआधुन पिंका टाकत राहणारच.
अहो सध्याच्या 'भाजपा'चा आम्हाला जरी बेक्कार राग येत असला म्हणुन काय आम्ही 'राजकारण गेलं चुलीत' असे म्हणुन टिपीकल मध्यमवर्गिय होऊ का ?
सध्याचे क्रिकेट नाही आवडत, खुप राग येतो, बघवत नाही, तरीही मधुनाअधुन पाहणार आणि त्यावर उगाच असे खरडणार.

तळटिप :
ह्या सर्व हजेरीत 'सचिन तेंडुलकर' ह्या इसमास मुद्दामुनच नाही घेतले, घेऊ नये असे वाटले, त्याच्यावर बोलायला आमच्याकडे आता काही शब्द उरले आहेत असे वाटत नाही.

क्रिकेट

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

1 Mar 2011 - 8:35 pm | सुहास..

सविस्तर उत्तरायण लवकरच (आज जरा वेळ कमी .)

बाकी लेखन-शैली नेहमीप्रमाणे फक्कड

श्रावण मोडक's picture

1 Mar 2011 - 8:36 pm | श्रावण मोडक

ह्या सर्व हजेरीत 'सचिन तेंडुलकर' इसमास मुद्दामुनच नाही घेतले, घेऊ नये असे वाटले, त्याच्यावर बोलायला आमच्याकडे आता काही शब्द उरले आहेत असे वाटत नाही.

नशीब. मला वाटलं दांडपट्ट्यात तोही येतोय की काय... बाकी डान्राव एकदम पावनखिंडीत पोचले हां...

उदाहरणे जबरदस्त .. आवडले लिहिलेलेल

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Mar 2011 - 8:55 pm | निनाद मुक्काम प...

मुद्यांशी सहमत
युकेचा आदर्श डोक्यात ठेवून आपण आय पी एल लीग काढली आहे .
त्यांच्या फुट बोल मध्ये सुद्धा भरपूर पैसा / मोठे आयोजक /त्यांची मोठी बाजारपेठ
आता ते विश्वचषक स्पर्ध्धेत कधी ना कधी तरी हरणार हे त्यांना इतक्या अनुभावरून कळून चुकले आहे .
म्हणूनच कोण दुबळ्या संघाविरुध्ध विजय ते दणक्यात साजरा करतात .मग स्पर्ध्धेतून बाहेर पडल कि लगेच चाम्पियान ट्रॉफी बद्दल विचार चालू
आपापल्या टीमला मग ती लिवरपूल असो कि अजून कोणती .त्यावर भर विश्व चषकात चर्चा चालू होते .

सचिन निवृत्त झाल्यावर बहुदा आपली जनता सुद्धा आपण स्पर्धेतून बाहेर पडल्यावर लगेच आय पी एल बद्दल चर्चा करतील .
हि स्पर्धा प्रत्येक वर्षी बाळसे धरत आहे .
बाकी इटली व जर्मनीची स्वताची लीग आहे .पण परदेशी खेळाडू आणून ते इंग्लंड व भारतासारखा बाजार गोळा नाही करत .एखादा अपवाद वगळता

अवांतर : आता ह्या स्पर्धेत खेळून जर हात पाय तुटले तर आय पी एल ला मुकावे लागेल .मग प्रसिद्धी /अभिनेत्र्या /मोडेल्स सगळेच गमवावे लागेल .
आपल्याला बुआ सायना आवडते .
आणी आनंद अर्थात सचिन नंतर

"इटली व जर्मनीची स्वत:ची लीग आहे .पण परदेशी खेळाडू आणून ते इंग्लंड व भारतासारखा बाजार गोळा नाही करत "

हे वाक्य हृदयास भिडले बुवा. इटलीविजेत्या इंटरचा संघ आठवला. त्यांच्या पहिल्या अकरा जणात तर एकही इटालियन नाही.

बाकी मुद्द्यास अनुमोदन

-रंगोजी

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Mar 2011 - 10:10 pm | निनाद मुक्काम प...

बाजार गोळा करणे म्हणजे जगातील नामवंत खेळाडू बक्कल पैसा देऊन घेण्याची वृत्ती
बाकी माझे इटालियन बॉस व त्यांचे सहकारी हे ह्या खेळाविषयी व त्यांच्या लीग मधील स्वदेशी खेळाडूंबद्दल एवढे म्हणत असतात म्हणून हे विधान केले.
बाकी माझे ह्या खेळातील नॉलेज अगाध आहे .हे माझ्या अख्यानातील पहिल्या भागात मी लिहिले होते .
चू क भूल द्यावी ध्यावी .
नुकतेच आमच्या शहराच्या क्लबला म्हणजे जर्मनीतील १ बायर्न म्युनिक ला सासर्याच्या कृपेने सराव चालला असताना भेटून आलो .
क्रिकेट चे सामने पाहतांना काचेच्या वातानुकुलीत डब्यातून वारुणी चे चषक रिते करणारे क्रीडा रसिक व ह्या क्लब मध्ये मी ह्यात साम्यस्थळ म्हणजे आमचे खेळासंबंधी चे नॉलेज व ह्या खेळासंबंधी आस्था .

तेच ओ. इंग्लंडची लीग म्हणजे पैशाचा बाजार हे इटलीवाल्यानी म्हणायचं म्हणजे कसं आहे ना- मी नाही त्यातली नि कडी लावा आतली. अहो आता त्या सायबाच्या देशात ७००० क्लब आहेत. मग खेळायला पोट्टे आणायचे कुठून?

ते जावद्या. तुम्हा-आम्हाला काय फरक पडतो ओ. फक्त तुमच्या इटालियन बॉसची जिरवायची असेल तर सांगा. एकाला दहा पाईंट सांगतो.

- (पुणे फूटबॉल क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ समर्थक) रंगोजी

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!! तुफान गोलंदाजी! (फलंदाजीचा अतिरेक झाल्याने मुद्दाम गोलंदाजी म्हणत आहे याची नोंद घेणे) एकेका वाक्यात दोन दोन विकेटा. भारतीय संघ असेल वा नसेल पण डॉनराव मात्र फुल्ल फॉर्मात! ऐन वर्ल्डकपमध्ये क्रिकेटचा आणि भारतीय संघाचा धोबीघाट करण्याची कल्पना भलतीच आवडली. सिरिअसली, १०० षट्कांमध्ये ६७६ धावा होतात, शेवटच्या दहा षट्कांमध्येच फक्त आठ-नऊ बळी जातात आणि तिनशेच्यावर धावा होऊनही सामना हारण्याची नौबत येते हे पाहिल्यावर क्रिकेट कुठे आहे असा प्रश्न पडतो.

असुर's picture

1 Mar 2011 - 9:43 pm | असुर

इतकी हाणामारी?? परवा स्ट्रॉसनेपण इतका धुतला नाय ना भौ!!!

डान्राव, जौ द्या हो, एकदा का या क्रिकेटच्या च्यामपिअयणच्या निवडणूका झाल्या की हैच आखाडा करायला मोकळे आपण! तोपर्यंत "हीच पालखी, हीच दिंडी, विठूराया तुझीच रे भक्ती"म्हणायचं नि काय!

बाकी आपल्या बॉलर्सनी तोंडाला काळं फासायची वेळ आणली आहे इकडे हापिसात!

--असुर

डॉन्राव.. मस्त धुतलाय!!
फक्त या फटकेबाजीतून चावलांचे कार्टे कसे काय सुटले हे कळले नाही.
ओझा ऐवजी चावलाला घ्यायचे मला तरी एकच कारण दिसते.
आय पी यल मध्ये चावलाला जास्त किम्मत आली होती.

-रंगोजी

माझीही शॅम्पेन's picture

1 Mar 2011 - 10:34 pm | माझीही शॅम्पेन

तटीशी सहमत ! :)

९. आर. अश्विन :
केवळ आयपीएलच्या चेन्नै टिममध्ये खेळल्याने जर ( श्रीकांतच्या कृपेने ) इंडियन क्रिकेटमध्ये वर्णी लागत असेल बिलिव्ह मी ह्या रेटने आपल्या सपोर्ट स्टाफमधले निम्म्यांच्या वर चेन्नैच्या चेपॉक स्टेडियमबाहेर नारळ पाणी, इडली-वडा सांबार विकणे असा व्यवसाय करत असतील किंवा सरळ दणक्यात रजनीची गाणी लाऊन चेन्नैमध्ये रिक्षा पळवत असतील.
मला ह्याच्या निवडीतले लॉजिक समजले नाही तर मी काय कप्पाळ कमेंट करणार ?

सध्या इन्ग्लड विरूध्ध जशी गोलंदाजी झाली , त्या प्रमणात इडली विकणारे पण चांगली गोलंदाजी करू शकतात. माझ्या मते भज्जीला आराम देऊन आश्विन चा जुगार खेळायला हरकत नसावी

मुलूखावेगळी's picture

1 Mar 2011 - 10:58 pm | मुलूखावेगळी

मस्त लेख
भारी
पण भारतानी जिन्कावे आनि तुम्ही तोंडावर आपटावे हीच इच्छा;) (शब्दशः घेणे क्रुती नाही अपेक्षित )

डानराव लई भारी लेख लिहिलाय राव तुम्ही. हे जर सच्यानं असंच्या असं टिम मिटिंगात वाचुन दाखवलं, तर सगळे ढोपरात दुखतंय म्हणुन खे़ळणारच नाहीत.

असो, गंभीर आणि चावला का सोडले ओ. त्यांना पण घ्या की पट्ट्यात.

पैसा's picture

1 Mar 2011 - 11:30 pm | पैसा

पण त्या "चिरगुटाना" कशाचं काही वाटत नाही हो! जोपर्यंत त्यांचे स्पॉन्सर्स त्यांच्या पाठीमागे असतात तोपर्यंत ते काही करा, टीममधे परत येतच रहातात. आणि टीम सिलेक्शन गुणवत्तेवर वगैरे काही होत नाही. कोणाचा गैरसमज असला तर काढून टाका तो! अगदी एका राज्याची १४ वर्षांखालील मुलांची टीमसुद्धा "हा अमक्याचा मुलगा" "तो तमक्याचा भाचा" अशा प्रकारे निवडली जाते. दाखवण्यापुरते सिलेक्शन कँप लावतात, आणि तिथे १०/१२ वर्षांची मुलं ४/४ तास जीव तोडून आपलं स्किल दाखवतात. हे मी जवळून बघितलंय. हाच पॅटर्न थेट वरपर्यंत.

टारझन's picture

2 Mar 2011 - 12:17 am | टारझन

सर्वांत बुद्धीमान आणि अभ्यासु प्रतिसाद ऑफ द मेलेणियम :)

- भैसा

पैसा's picture

2 Mar 2011 - 8:59 am | पैसा

.... .- .--. .--. -.-- -... .. .-. - .... -.. .- -.-- --. . - .-- . .-.. .-.. ... --- --- -. -... .... .- .. ... .- .-

प्रीत-मोहर's picture

2 Mar 2011 - 9:02 am | प्रीत-मोहर

.. ... . -.-. --- -. -.. - .... .- - -.- --- ... .- .-

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 11:44 pm | बेसनलाडू

अख्खा भारतीय संघ आता या धुलाईनंतर 'खिल खिल जाएगा' असे वाटते.
(धोबी)बेसनलाडू

टारझन's picture

2 Mar 2011 - 12:10 am | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

एक णंबर्स !!

पुष्करिणी's picture

2 Mar 2011 - 1:32 am | पुष्करिणी

धोबीघाट लै भारी ..फक्त गंभीरला इतकं गंभीरपणे का घेतलं हो

वेळेअभावी, मस्त चौकार षटकार मारलेत पण त्याहुन बेस्ट विकेटा काढल्यात डानराव, इतकेच म्हणतो. बाकी ह्या डान्यालाच का नाही पाठवत बोलिंगला तिकडे?

बाकी आपली टीम इंग्लंड बरोबर सपशेल हागली!! असेच हागत राह्यले तर काय सांगता येत नाय पह्यला राउंडमध्येच सुफडा साफ व्हायचा पुन्हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2011 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

८. मुनाफ पटेल : अगदी प्रामाणिक, पापभिरु, कचखाऊ, दिवाभित पांढरपेशी मध्यमवर्गीय व्यक्ती, कुठल्याही महानगरात हटकुन आढणारी. रोजच्या कामात काडीचा उत्साह नसल्याने रडत-खुडत हापिसला जाणारी, तोंड वेडेवाकडे करुन काम करणारी आणि घरी परत आल्यावर संपुर्ण कंटाळुन कशातही रस न घेता अंथरुणावर अंग टाकणारी व हेच जीवन वर्षानुवर्षे जगणार्‍या एका मोठ्ठ्या समुदायाचा टिम इंडियातला प्रतिनिधी म्हणजे 'मुनाफ पटेल'.

अरारा.................!!!! :)) =))

ज्ञानेश...'s picture

2 Mar 2011 - 9:34 am | ज्ञानेश...

लेख आवडेश.
बॉलिंगमधे सुधारणा झाली तर यावेळी आपल्याला कप मिळण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत, हे माझे मत अजूनही कायम आहे. ऑल वी नीड इज वन गुड सीमर. (वर्षानुवर्षे पाटा पिचेस बनवत गोलंदाजांचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचा हा परिणाम आहे.)
गंभीर, कोहली, सचिन, सेहवाग यांसारखे फलंदाज एकाच वेळी एकाच संघात असणे ही बाब नक्कीच आशादायक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2011 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॉलिंगमधे सुधारणा झाली तर यावेळी आपल्याला कप मिळण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत

सहमत आहे. पण आपली गोलंदाजी म्हणजे षटकं पूर्ण करण्याचा एक औपचारिक भाग वाटतो.
कधी एकदा आपण आपलं षटक पूर्ण करु आणि क्षेत्ररक्षणाला जाऊ असा भाव मला गोलंदाजाच्या चेह-यावर दिसतो.
विकेटा पडतात तेव्हा कर्तृत्त्व कमी आणि योगायोगाच्या गोष्टी च अधिक वाटतात मला.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

2 Mar 2011 - 10:03 am | प्यारे१

>>>

अहो सध्याच्या 'भाजपा'चा आम्हाला जरी बेक्कार राग येत असला म्हणुन काय आम्ही 'राजकारण गेलं चुकीत' असे म्हणुन टिपीकल मध्यमवर्गिय होऊ का ?
सध्याचे क्रिकेट नाही आवडत, खुप राग येतो, बघवत नाही, तरीही मधुनाअधुन पाहणार आणि त्यावर उगाच असे खरडणार.

>>>

नका त्रास करुन घेऊ. चला. 'चिंतन' बैठकीला बसू.
(आयला तिथेही 'स्वयंसेवक' नीट 'व्यवस्था' करायचे नाहीत या वर्ल्ड कपमुळे)

डाण्राव ऎट हिज ब्येश्ट! काय मस्त बडवलंय.. वा वा वा..!

काय त्या उपमा, काय वर्णनं.. अरारारा.. =))
हसुन हसुन पुरेवाट..

राघव

अभिज्ञ's picture

3 Mar 2011 - 12:05 pm | अभिज्ञ

डॉनरावांची उत्तुंग टोलेबाजी/भेदक गोलंदाजी आवडलि.

:)

अभिज्ञ.

अवलिया's picture

3 Mar 2011 - 2:19 pm | अवलिया

क.. ड..क !!

इंटरनेटस्नेही's picture

4 Mar 2011 - 12:54 am | इंटरनेटस्नेही

अतिशय रोख ठोक पण तरीही करारी असे लेखन. हसवता हसवता आपल्या टीम इंडिया मधील कच्चे दुवे दाखवुन देणारे व सहज टीप्पणी करणारे विवेचन. आवडला, हे वेगळे सांगायला नकोच!:)

-
(क्रिकेट रसिक) इंट्या तेंडुलकर.

सहज's picture

4 Mar 2011 - 9:54 am | सहज

गेल्या हजार वर्षात मिपावर इतका कडक लेख आला नाही व येणार नाही. अथ पासुन इतीपर्यंत खतरनाक!!

डॉनराव विश्वचषकस्पर्धा असे पर्यंत रोज एक प्रतिसाद देउन हा लेख पहील्या पानावर आणु का?

धोबीपछाड लेख!!

_/\_ दंडवत