आज २७ फेब्रुवारी, महान साहित्यिक कै. कुसुमाग्रज यांची जयंती. आज त्यांचा ९९ वा जन्मदिन, आजपासून त्यांच्या जन्मशताब्दिवर्षाला प्रारंभ होत आहे. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणार्या आणि आपला ठसा उमटविणार्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे.
कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तिचे परखड बोलही त्यांचेच. या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतीकवी आणि कानी ऐकु येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’
कवी कुसुमाग्रज हे खर्या अर्थाने ’क्रांतीकवी’. वयाच्या अवघ्या विशित कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतीकाव्ये लिहिली, ज्यांनी तत्कालिन समाजात नवे चैतन्य निर्माण केले. तो काळच धगधगत्या क्रांतीपर्वाचा होता. ’गर्जा जयजयकार’ ही कविता चौथ्या दशकाच्या अखेरची; १९३९ सालची. तिसर्या दशकाच्या अखेरीस आणि चौथ्या दशकाच्या सुरूवातीस पेटलेल्या क्रांतिच्या वडवानलाच्या तेजाने ते दिपले, भारावुन गेले. त्या कालखंडात हिंदुस्थानातील तरुणांच्या हृदयावर राज्य केले ते हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेच्या देशासाठी हसतमुखाने व अभिमानाने हौतात्म्य पत्करणार्या धाडसी वीरांनी. हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अशफाकऊल्ला खान, हुतात्मा राजेंद्र लाहिरी, हुतात्मा ठाकुर रोशनलाल,हुतात्मा जतिन दास, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा महावीरसिंह ही त्यातली काही दैदिप्यमान नावे.
ते महात्मे आपले दिव्य करून गेले. त्यांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतीगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगीतली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगु शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतीकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले. ज्यांनी मृत्युला कवेत घेतले त्यांना कशाचे भय असणार? ज्यांना धेयाव्यतिरिक्त कशाचीच आसक्ती नाही त्यांना मोह कसला असणार? ज्यांनी आपले सर्वस्व राष्ट्राला समर्पित केले त्यांना पाश कसले असणार? या महान क्रांतिकरकांच्या हौतात्म्याने भारावुन गेलेल्या कुसुमाग्रजांच्या लेखणीतुन मग या दिव्यत्वाच्या प्रवासाचे आणि वेड्या धेयाचे सार्थ वर्णन करणारे शब्द साकारले
पदोपदी पसरुन निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकलो कीर्तीचे वा प्रीतीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार.
(क्रांतीचा जयजयकार)
सशस्त्र क्रांतीमध्ये नसला तरी सामाजिक क्रांतीमध्ये म्हणजे काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या सत्याग्रहात ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते. बहुधा आयुष्याच्या याच वळणावर कुसुमाग्रजांना ध्येयवेडाचा साक्षात्कार झाला; प्रत्यक्ष अनुभुती आली आणि मग त्या झपाटलेल्या क्रांतिकवीचा धगधगता काव्यप्रवास सुरूच राहिला. आपली प्रतिभा केवळ निसर्ग वा भाव -भावना यात रममाण न होता, त्या प्रतिभेने स्वातंत्र्यसंग्रामासाठी या देशातील तरूणांना जर प्रेरित करता आले तर ती प्रतिभा सार्थकी लागेल हाच या क्रांतीकवीचा ध्यास. आणि ही भावना व्यक्त करताना कुसुमाग्रज म्हणतात
समिधाच सख्या त्या, त्यात कसा ओलावा,
कोठुनी फुलापरि वा मकरंद मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!
(समिधाच सख्या या-)
भारतमातेच्या पुत्रांना एल्गारासाठी प्रेरीत करताना कुसुमाग्रज म्हणतात -
रक्तध्वज पूर्वेवर चढुद्या
खोप्यातील खग नभी उडूद्या
आकाशात निखारा फुटुद्या
ज्वालांत जळुद्या तम सारा
हा काठोकाठ कटाह भरा.
(हा कठोकाठ कटाह भरा)
कुसुमाग्रजांनी सातत्याने अग्निपथाचा प्रचार केला. ज्यांना आवाहनाची भाषा मानवत नाही त्यांना आव्हान देऊन लोळवा असा प्रखर संदेश त्यांनी आपल्या कवितेतुन दिला. उन्मत्त पणाने प्रजेला दुर्बल म्हणुन हिणविणार्या मदांध सत्तेचे वर्णन करताना कुसुमाग्रज लिहितात
"दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड!
आतापर्यंत अत्याचार सहन केले म्हणुन प्रजेला सत्तधीशांनी तुच्छ लेखले, की हे दुबळे आमच काय वाकड करणार? जर सहनशीलतेचा अर्थ भ्याडपणा असा घेतला जात असेल तर मग सहिष्णुता विसरून मदांध सत्तेला आपल्या प्रचंड सामर्थ्याने उलथुन पाडणे हेच योग्य असे सांगताना कुसुमाग्रज म्हणतात ’
"दुर्बळ भेकड!"
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी
बस्स! फक्त अस्मितेची एक ठिणगी पडायचा अवकाश, क्रांतीचा वणवा पेटायला ती पुरेशी असते. आणि मग ते तथाकथित सामर्थ्यवान साम्राज्य खाक होते
हवेत पेटला
सुडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!
उठला क्षणात
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश
उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती!
(आगगाडी व जमीन)
या रूपकातुन कुसुमाग्रज आक्रंदत होते, की हे भारतियांनो, आता आपले सामर्थ्य एकवटा आणि तुमच्या सामर्थ्याला तुच्छ लेखणाऱ्या या मदांध सत्तेला भिरकावुन द्या.
मात्र स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अग्निमार्ग सोपा नाही तर भयंकर आहे आणि याचा परिणाम ’उध्वस्त होणे’ हाच आहे, पण आजच्या या उध्वस्ततेतुनच उद्याचे स्वराज्य निर्माण होणार आहे हेही त्यांनी सांगीतले. शत्रूचे सामर्थ्य वा क्रौर्य या दोहोंची फिकिर नसलेल्या वा यातनामय अंताचे भय नसलेल्या आणि बेभान होऊन रणात उतरलेल्या वेड्या मुलांविषयी कुसुमाग्रज म्हणतात,
न पराजयाने पराभूत होतसे
हा मृत्युंजय, ना मरणाने मरतसे
विजयाची एकच अखेर त्याला असे
स्वातंत्र्याचा ध्वज या गगनी गर्वाने चढणार
आहे अजिंक्य हा निर्धार
(अजिंक्य निर्धार)
आयुष्य देशावर ओवाळुन टाकलेल्या या मुलांना त्यांचे बलिदाना वाया जाणार नाही याची खात्री देत ते म्हणतात,
चितेवरी वीरांनो अपुली
जरी शरीरे भस्म जाहली
झळकत येईल या अग्नितुन समराचेच निशाण!
हे व्यर्थ न हो बलिदान!
(बलिदान)
कुसुमाग्रजांच्या अनेक कविता या खास एखाद्या व्यक्तिवरच आहेत हे त्याचा कुठे उल्लेख नसतानाही स्पष्ट जाणवते, उदाहरणार्थ
क्रुद्ध भूक पोटात घालुद्या खुशाल थैमान
कुरतडुद्या आतडी करुद्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
(क्रांतीचा जयजयकार)
हे वाचता क्षणी डोळ्यापुढे येतात ते आमरण उपोषणाने हौतात्म्य पावलेले हुतात्मा जतिन दास; तर
रक्ताने न्हाली
तनू ही रक्ताने न्हाली
आणि चाळणी जरी छातीची पिंजुनिया झाली...
(आव्हान)
हे वाचताना नजरेपुढे उभे राहतात आल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांच्या तुकडीशी अखेरच्या श्वासापर्यंत आणि अखेरच्या गोळीपर्यंत एकट्याने लढणारे हुतात्मा चंद्रशेखर आझाद!
कडकडती तडिता तव भवती
त्या प्रलयातुन संथ सरे ती
मेघापरि तव गंभीर मूर्ती
उद्घोषत ललकारी
(ध्वजधारी)
हे शद्ब आठवण करून देतात ते संसदेत बॉंब स्फोट घडविल्यावर तिथुन निसटुन जाण्याचा प्रयत्न न करता हातातली पत्रके फेकत ’इन्किलाब झिंदाबद’ च्या गर्जना देणारे हुतात्मा भगतसिंग आणि त्यांचे साथी बटुकेश्वर दत्त!
धूलिधूराच्या ढगामध्ये ती
दृष्टीआड हो तुझी आकृति
परंतु झेंडा झळकत वरती
तव संदेश पुकारी!
जय जयोस्तुते ते ध्वजधारी
(ध्वजधारी)
या ओळी डोळ्य़ापुढे उभे करतात नेताजी आणि त्यांची तिरंगा घेऊन हिंदुस्थानकडे कूच करणारी आझाद हिंद सेना.
याच नेताजींच्या महान कार्याचे कौतुक करताना कुसुमाग्रज म्हणतात,
एकाकी जासी झुंजत वैर्यांवर
घन रात्रित जैसा घुसतो अग्निशर
तिमिरावर फुलवित तेजाचा मोहर
अमरत्वाच्या सारंगीवर
छेडुनिया तांत
काळ होऊनी शाहिर गाइल
तव गौरव गीत
(सुभाष)
अत्यंत तेजस्वी अशा धगधगत्या कविता लिहिणारा हा क्रांतीकवी द्रष्टा होता. आज ज्यांनी सर्वस्वाचा होम केला त्यांचे नावही उद्या कुणाला माहित नसेल, मग त्यांना मान कुठुन मिळणार ही खंत त्यांनी आपल्या कवितेतुन मांडली
जनभक्तिचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नांव!
मात्र कुणी स्तुतीसुमने उधळली नाहीत म्हणुन त्या बलिदानाचे महत्व कमी होणार नाही तर अशाच ’अनामिकांच्या’ असंख्य बलिदानांतुनच स्वातंत्र्य साकारले आहे याची ग्वाही कुसुमाग्रज देतात आणि त्या अज्ञात वीरां विषयी स्वतंत्र भारताच्या नागरिकांच्या हृदयातली कृतज्ञता व्यक्त करताना कुसुमाग्रज लिहितात
जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे ह्रे तुझेच बलिदान!
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा!
(अनामिकास)
कै. कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दिवर्षाचा आज आरंभ होत आहे, त्या निमित्ताने या महान क्रांतिकवीला विनम्र अभिवादन.
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 1:52 am | प्राजु
खूप सुंदर आणि समायोचित लेख.
कुसुमग्रजांच्या कवितांचा धावता आढावा आवडला.
:)
27 Feb 2011 - 8:43 am | नगरीनिरंजन
+१
असेच म्हणतो.
27 Feb 2011 - 11:33 am | पैसा
अक्षरशः सहमत!
27 Feb 2011 - 11:34 am | अवलिया
सहमत
1 Mar 2011 - 5:12 am | बेसनलाडू
कविवर्यांच्या क्रांतीकवितांचे सुरेख अवलोकन केले आहे. आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
27 Feb 2011 - 4:25 am | शुचि
माझी आवडती कविता - अहि-नकुल.
सर्पाच्या सौंदर्याचे, सामर्थ्याचे विलक्षण प्रभावी वर्णन या कवितेमध्ये आहे. शेवटी मुंगसाचा सर्पावरती विजयच दाखविला आहे.
कधी लवचिक पाते खड्गाचें लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.
मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.
वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.
चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !
_________________________________________________
कोलंबसाचे गर्वगीत किती सुंदर कविता आहे. "“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!”
ही ओळच किती वीरश्रीपूर्ण आहे.
_________________________________________________
८ वीमध्ये त्यांचा "जीवनलहरी" हा काव्यसंग्रह वाचला आणि इतका सुंदर वाटला, इतका आवडला की डोळ्यातून धारा लागलेल्या आठवतात. पुढे "विशाखा" वाचला. कुसुमाग्रज माझे अत्यंत आवडते कवी आहेत.
27 Feb 2011 - 2:47 am | स्वाती२
सुरेख समयोजित लेख!
27 Feb 2011 - 8:37 am | सहज
नुकत्यात मध्यपूर्व आशीयामधे उन्मत्त सत्ताधीशांच्या विरोधात उसळलेल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचताना अजुनच आवडले.
साहीत्याच्या माध्यमातुन अश्या तेजस्वी कवितातून, स्वातंत्र्य संघर्षाला अजुनच धार येते. म्हणूनच बहुदा मदांध तालीबानी हे ललित साहीत्याचे वावडे असणारे असतात.
27 Feb 2011 - 9:40 am | कलंत्री
सर्वसाक्षींच्या ओघवत्या लिखाणातून हे सर्व वाचतांना अंगावर रोमांच आले. त्या काळातील साक्षीदार जरी होता आले नाही तरी त्या काळानंतर त्याचे रसास्वाद आणि महत्त्व वाचता आले त्याचे भाग्य मम मनाला हेही समजले.
कालच बालगंधर्वात काव्यवाचनाचा ऐकण्याचा आनंद घेतला, धुंदी चाखली, आज परत तोच प्रत्यय आला.
साक्षीचे विशेष आभार.
27 Feb 2011 - 10:06 am | अप्पा जोगळेकर
ह्जार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या सागरा डळमळू दे तारे |
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशाकोन सारे ||
ही खासच कविता आहे. थोर कवीला विनम्र अभिवादन.
27 Feb 2011 - 3:37 pm | रामदास
स्फूर्ती स्त्रोत आहेत.
स्तोत्र आहेत.
सर्वसाक्षी ,समयोचीत लेख.
धन्यवाद .
27 Feb 2011 - 3:43 pm | यशोधरा
सुरेख लेख. फार आवडला.
28 Feb 2011 - 7:53 pm | धमाल मुलगा
अप्रतिम!
साक्षीदेवा,
कुसुमाग्रजांचे आम्हा पामरांवर हेदेखील एक उपकारच म्हणायला हवे. इतका सुंदर लेख लिहिण्याची तुम्हाला उर्मी मिळाली आणि आम्ही वाचक धन्य झालो. :)
कुसुमाग्रजांच्या क्रांतीकाव्यपंक्ती आणि त्यावरचं भाष्य आवडलं हे.वे.सां.न.ल. :)