जीवधन नाणेघाट - भाग २.

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
17 Feb 2011 - 10:35 am

जीवधन नाणेघाट - भाग १

आता आम्ही निघतो ते २००० वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन वहिवाटीच्या मार्गावर असलेल्या नाणेघाटात जाण्यासाठी.
नाणेघाट हा बहुत प्राचीन म्हणजे किती तर सुमारे दोन हजार वर्षांपासूनचा. फार पूर्वीपासून कोकणातील चेउल(चौल), शूर्पारक (नालासोपारा) इ. बंदरांतून देशोदेशीचे व्यापारी माल घेउन येत. व्यापार्‍यांच्या तांड्यांना सार्थवाह म्हणत. सह्याद्रीच्या प्रचंड भिंती त्यांच्या वाटा अडवत. सह्याद्री लंघून पुढे जाण्यासाठी ठिकठिकाणी या दुर्गम भिंतींतून घाट खोदण्यात आले. यापैकी सर्वात महत्वाचा तो नाणेघाट. कारण हा घाट जोडतो तो सातवाहनाची उपराजधानी असलेल्या जुण्णनगर उर्फ जुन्नर ला व त्यापुढे तो थेट पोहोचतो ते त्यांच्या वैभवशाली राजधानीला. प्रतिष्ठानला. आताच्या पैठणला. साहजिकच हा घाट सह्याद्रीच्या इतर सर्व घाटांपेक्षाही जास्त वहिवाटीचा त्यामुळेच सर्वोत्तम बांधणीचा. पाण्याची विपुल टाकी असलेला.
सह्याद्रीचा उभ्या कड्यातील एक घळ फोडून हा घाट तयार केला गेला. छिन्नी, हातोडा या साधनांनी इथल्या भिंती तासल्या गेल्या त्यांच्या खुणा येथे आजही स्पष्ट दिसतात. तेच दगड इकडे पायर्‍यांसारखे रचले गेले. वळणावळणांवर दगडांचेच बुरुज रचले गेले. तहानलेल्या वाटसरूंसाठी ठिकठिकाणी पाण्याची टाकी खोदण्यात आली. जकात गोळा करण्यासाठी दगडी रांजण उभारण्यात आला. घाटावर चौकीची ठिकाणे निर्माण करण्यात आली. एव्हढा महत्वाचा घाट असल्यामुळे त्याचे संरक्षणासाठी अनेक किल्ले उभारण्यात आले. जीवधन सगळ्यात जवळचा साथीदार. पुढे निमगिरी, हडसर, चावंड, हटकेश्वर, शिवनेरी, नारायणगड असे बलदंड किल्ले निर्मिले गेले. सार्थवाह, बौद्ध भिक्षू यांच्या विश्रांतीसाठी इथले अनेक डोंगर कोरून लेणी बनवण्यात आल्या. जुन्नर परिसरात महाराष्ट्रातील सर्वाधिक लेण्या आहेत. तर असा हा प्राचीन अत्यंत वर्दळीचा घाटमार्ग.
आम्ही जीवधनच्या पश्चिम दरवाजाने उतरलो आणि अर्ध्या तासातच नाणेघाटापाशी पोहोचलो. नानाचा अंगठा आणि त्याशेजारील डोंगर फोडून नाणेघाट बनवण्यात आलाय. खिंडीच्या तोंडाशीच जकातीचा दगडी रांजण व बाजूलाच काही जुन्या बांधकामाचे अवशेष आहेत. जवळच एका छोट्याश्या गुहेत गणपतीची मूर्ती आहे. नाणेघाटाच्या नळीत प्रवेश केला. सुरुवातीला अतिशय तीव्र उतार आहे. दगडानींच तो बांधून काढला आहे. पुढे अतिशय खोल दरी भिववून टाकते. नळी ओलांडताच आपण एका मोठ्या गुहेपाशी येतो. नानाच्या अंगठ्याच्या पोटातच ही गुहा बांधून काढलेली आहे. शेजारीचा पाण्याची बरीच टाकी आहेत. ही गुहा म्हणजेच सातवाहनांचे देवकुल. सातवाहन सम्राट स्कंद सातकर्णी (का गौतमीपुत्र सातकर्णी?) याची पत्नी राणी नागनिका हिच्या अधिपत्याखाली नाणेघाट व इथली गुहा कोरण्यात आली. तसे ब्राह्मी लिपीतील शिलालेख या गुहेत कोरलेले आहेत. सातवाहनांच्या कुलातील व्यक्तीचे पुतळेही या गुहेत आहेत. सध्या फक्त त्यांचे पाय शिल्लक आहेत. यम, इंद्र, चंद्र, सूर्य या वैदिक देवतांचेही उल्लेख इथल्या शिलालेखात सापडतात.
गुहा सोडून थोडेसे खाली उतरून गेलो. आता नानाचा अंगठा डोके वर करून बघावा लागत होता. हा मार्ग पुढे थेट कोकणातील वैशाखरे गावाला जाउन मिळतो. मुंबईवरून येथे यायचे झाल्यास मुरबाड -वैशाखरे वरून घाट चढून वर यावे लागते.
परत घाट चढून वर आलो व नानाच्या अंगठ्यावर जाण्यास निघालो. १०/१५ मिनिटातच सोपी चढण चढून सुळक्यावर पोचलो. इथे सह्याद्रीच्या धारेला वळसा (curvature) असल्याने व त्यात नानाचा अंगठा मध्यभागी असल्याने फारच विस्तृत दृश्य दिसते. भीमाशंकर, सिद्धगड, गोरखगड, सर्वात उंच धाकोबाचे टोपीसारखे शिखर, सपाट माथ्याचा दुर्ग, जीवधन, वानरलिंगी हे डावीकडे तर उजवीकडे वर्‍हाडाचे सुळके, भैरवगड, हरिश्चंद्रगड ते घनचक्करची रांग हे सर्व दिसते. वर वावरताना जरा जपूनच कारण सर्व तिन्ही बाजूंनी हा कडा तुटलेला आहे.
नानाच्या अंगठ्याचे रौद्र सौंदर्य पाहाण्यासाठी अजून थोडे पलीकडे जाउन पाहावे लागते. इथून तो सरळसोट तुटलेला कडा दिसतो. याइथेही घाटमार्ग तयार करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो पण ठिसूळ खडकांमुळे तो अर्धवट राहिलेला असावा. आता सूर्य मावळायला लागला होता. त्यामुळे आम्हीही निघायचे ठरवले. सुर्यास्त बघून आम्ही निघालो ते परत घाटघरला आलो. तिथून गाडीत स्वार व पुण्याला रात्री घरी.

नाणेघाटाची नळी

घाटातील दगडी मार्ग

गुहेतील ब्राह्मी लिपीतील शिलालेख

जकातीचा दगडी रांजण व त्यापुढील बांधकामाचे अवशेष.

नाणेघाटावरून दिसणारा विस्तृत प्रदेश

नानाच्या अंगठ्याच्या कडा डावीकडून

डावीकडे केले गेलेले घाट निर्मितीचे प्रयत्न

सूर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी

प्रवासभूगोल

प्रतिक्रिया

संजयशिवाजीरावगडगे's picture

17 Feb 2011 - 10:55 am | संजयशिवाजीरावगडगे

सुरेख अप्रतिम आवडले !

मनराव's picture

17 Feb 2011 - 12:59 pm | मनराव

मस्त........

विंजिनेर's picture

17 Feb 2011 - 1:36 pm | विंजिनेर

मस्त! एक पावसाळा सहलीत नाणेघाटात गेल्यानंतर पुढचे बरेच दिवस आम्ही शाळेत ब्राम्ही लिपीत एकमेकांना निरोप पाठवायचो त्याची आठवण झाली :)

Mrunalini's picture

17 Feb 2011 - 11:55 pm | Mrunalini

मस्त :)

मुलूखावेगळी's picture

18 Feb 2011 - 10:27 am | मुलूखावेगळी

मस्त हो वल्ली तुमचा सफर आनि फोटु.
पुन्हा १दा १२७ अवर्स सिनेमा आठ्वला.

आयला घेउन जा की कधितरी बरोबर, का उगी फोटो टाकुन छळतोय.

मार्चचं लक्षात आहे ना, विसरलास तर बघ, लई मोठे मोठे साक्शिदार आहेत माझ्याकडं, सांगुन ठेवतोय.

हर्षद.

प्रचेतस's picture

18 Feb 2011 - 1:26 pm | प्रचेतस

मार्च मध्ये नाणेघाटातच जाउ. :) आपण तरी कधीपण तिथे जायला एका पायावर तयारच असतो.

धमाल मुलगा's picture

18 Feb 2011 - 9:47 pm | धमाल मुलगा

बोला हर हर...महाऽदेऽऽव.............. :)

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 1:29 pm | आजानुकर्ण

क्या बात हैं. नाणेघाटाच्या एका सुळक्यावरुन रॅपलिंग केले होते ते आठवले. नाणेघाटाची खरी मजा पावसाळ्यातच. अक्षरशः स्वर्गीय असतो हा परिसर. नाणेघाटावरची गुहा फार छान आहे. ती खिंडही झकास आहे.

चित्रा's picture

19 Feb 2011 - 1:47 am | चित्रा

भटकंतीचे फोटो सुंदर. माहितीही अप्रतिम.

मात्र, पुढच्या वेळी अशा कुठच्याही ठिकाणी गेला तर अशा शिलालेखांचे किंवा मूर्तींचे इ. बरेचसे फोटो काढा.
अशा शिलालेखांमधून इतिहासाबद्दलचे लहान लहान दुवे मिळत जातात.

विकास's picture

19 Feb 2011 - 2:13 am | विकास

अजून काय लिहायचं? :-)

अप्पा जोगळेकर's picture

19 Feb 2011 - 9:58 am | अप्पा जोगळेकर

फोटो मस्त आहेत. पण पावसाळ्यात नाणेघाटात जाउ नये असे प्रामाणिक मत आहे. हली तो पिकनिक स्पॉट झालाय. वरती नुसता दंगा चालू असतो.

आनंदयात्री's picture

19 Feb 2011 - 10:05 am | आनंदयात्री

मस्त मस्त लेख वल्लीशेठ. बारकावे रंगवुन सांगितलेत म्हणून मजा आली. बाकी अंगठा नानाचाच का ?

प्रचेतस's picture

19 Feb 2011 - 11:06 am | प्रचेतस

अंगठा नानाचाच, मात्र नानासाहेबांचा नाही. :)

चावटमेला's picture

19 Feb 2011 - 6:15 pm | चावटमेला

सुंदर फोटो आणि तितकीच सुंदर माहिती..

स्वतन्त्र's picture

22 Feb 2011 - 12:07 pm | स्वतन्त्र

मस्त आलेत फोटो.

मी देखील पावसाळ्यात नाणेघाट आणि भोरांडयाचे दार/दर्या हा ट्रेक केला होता.
हा परिसराच फार सुंदर आहे, फक्त खंत जाणवते ती या परिसरात असणाऱ्या विजेच्या मनोऱ्यांची.

MSEB ने या परिसराच्या नैसर्गिक देखाव्याला गालबोट लावलेलं आहे.