जीवधन नाणेघाट - भाग १

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
11 Feb 2011 - 10:28 am

जीवधन-नाणेघाटाच्या संरक्षक दुर्गचौकडीतील नाणेघाटाचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात जवळचा साथीदार. ज्याचे हाती जीवधन त्याचे हाती नाणेघाटाचे स्वामित्व.
आज पुर्वी केलेल्या जीवधनच्या ट्रेकच्या आठवणी जागवत आहे. तर अश्या ह्या नाणेघाटाच्या पहारेकर्‍याला भेटण्यासाठी आम्ही मित्र सकाळीच पुण्याहून निघालो. नारायणगावहून जुन्नरला आलो. जुन्नरच्या पाठीमागेच पुराणपुरुष शिवनेरी आपल्या मायेचे पंख पसरून उभा आहे. जुन्नरहून पुढे आपटाळे गावी दोन फाटे फुटतात. डावीकडचा फाटा आंबोली, दुर्ग, धाकोबा, दार्‍या घाटाकडे जातो तर उजवीकडचा फाटा आपल्याला चावंड किल्ल्यावरून नाणेघाट जीवधनला घेउन जातो. उजवीकडे वळून आम्ही आता जीवधनच्या पायथ्याचे गाव असलेल्या घाटघरचा मार्ग पकडला. आतापर्यंत साथ करत असलेल्या डोंगरांची जागा आता सह्याद्रीचे अजस्त्र पहाड घेत होते. थोड्यावेळात उजवीकडे चावंड किल्ल्याचे दर्शन झाले. नैसर्गिक तटबंदीने युक्त असलेल्या ह्या किल्ल्याला सर्वबाजूंनी खड्या कातळकड्यांचे संरक्षण आहे. जवळच पूर गावात कुकडी नदीकाठी असलेल्या कुकडेश्वराचे अप्रतिम कोरीव काम असलेले हेमाडपंथी शैलीचे भग्नावस्थेतील मंदिर आहे. थोड्याचे वेळात जीवधनच्या पायथ्याला असलेल्या घाटघरमध्ये पोहोचलो. हे एक छोटेसे आदिवासी गाव आहे. गावातूनच वाटाड्या घेतला व पाठीमागेच उभ्या असलेल्या जीवधनच्या मार्गाला लागलो. नाणेघाट २००० वर्षांपूर्वी बांधला गेला. जीवधनही तेव्हाचाच असणार. इकडील सर्व भाग सातवाहनकालीन बांधणीचा आहे. जीवधनला सर्वबाजूंनी कातळकड्यांचे संरक्षण आहेच. सुरुवातीला सपाटीवरून जाणारी वाट जीवधनला भिडून चढणीला लागते. ही पूर्व बाजूची वाट जाते ती सुकलेल्या ओढ्यावरून. कधी बांबूंच्या दाट बेटांमधून. वाटेवर घसारा फार आहे. काही वेळा एक्स्पोजर पण आहे. पदरातून जात जात ही अस्पष्टशी पायवाट अर्ध्या तासात जीवधनच्या मधल्या कातळकड्याला भीडते. आता सुरुवातीला उंच उंच कातळकोरीव पायर्‍या लागतात. पाठीमागे वळून पाहताच कोकणातल्या बाजूचा रौद्र कातळकड्याचे दर्शन होते. दमछाक करणार्‍या पायर्‍या संपल्यावर लागतो तो जीवधनचा सुप्रसिद्ध रॉकपॅच.
इथल्या पायर्‍या इंग्रजांनी १८१८ साली उद्धस्त केल्या. इथे आता २०/२५ फूट उंच उभा कडा आहे आणि त्यात खोबणी खोदलेल्या आहेत. पाय ठेवण्यासाठी किंचित पाउल मावेल इतक्याच पावठ्या व हाताची बोटे रोवण्यासाठी कड्यात छिद्रे पाडलेली आहे. हे तसे सोपेच कातळारोहण आहे. तरी काळजी आवश्यकच. इथे तुम्ही कड्यात हातपाय रोवले की तुम्ही अगदी भक्कमपणे कड्याशी जोडले जाता. शिवाय इथे खोल दरीचे एक्स्पोजरही तुलनेने कमी असल्याने हा भाग पटापट चढून जाता येतो. प्रस्तरारोहणानंतर एका भग्न दरवाजाचे अवशेष आहेत. व शेजारीच एका गुहेत पाण्याचे टाके आहे. पाणी एकदम शेवाळलेले पिवळेधमक दिसते. पण तो गालीचा थोडा हलवल्यावर खाली एकदम थंड, स्वच्छ पाणी आहे. ते अमृतासम पाणी पिवून आम्ही किल्यावर प्रवेश करते झालो. थोडे वरच्या भागात आल्यावर बरीचशी जमिनीत खोदलेली आणि थोडीशी बाहेर असलेली एक सुस्थितीतील इमारत आहे. हेच जीवधनचे धान्यकोठार. आतमध्ये ही इमारत प्रचंड मोठी आहे. उजेड नसल्यामुळे विजेरीशिवाय पर्याय नाही. आतमध्ये १८१८ साली जळून गेलेल्या धान्याची घोटाभर पाउल मावेल इतक्या उंचीची राख सर्वत्र पसरलेली आहे. इमारतीतून बाहेर येउन वरच्या दिशेने गेलो. वर जिवाई देवीची उघड्यावर असणारी मुर्ती आहे. हे जीवधनचे सर्वोच्च टोक. इकडे आता पश्चिमेला नाणेघाटाचा आभाळात घुसलेला अंगठा दिसू लागतो. सह्याद्रीची धार दृग्गोचर होत जाते. आम्ही आता पलीकडच्या बाजूला उतरू लागतो. इथे उतरताना खडकात खोदलेल्या छोटेखानी पायर्‍या आहेत. स्वछ पाण्याने भरलेली पाण्याची टाकी आहेत. तिथेच थोडावेळ बसून जेवण करून आम्ही पुढे निघालो. याभागात इमारतींचे भग्नावशेष आहेत. आता आमचे लक्ष्य होते. ते जीवधनच्या सुप्रसिद्ध वानरलिंगी सुळक्याचे दर्शन. आता इथे कडेला सह्यद्रीची अतिशय खोल कातळदरी आहे. जवळजवळ २५०० फूटांचा हा सरळ तुटलेला कातळकडा आहे. आता वानरलिंगीचा सरळसोट उभा सुळका दिसायला लागला पण त्याचा पायथा मात्र सहज दिसत नाही तो झोपूनच पहावा लागतो. वानरलिंगी हा ५०० फूट उंचीचा एकदम सरळ उभा असलेला सुळका आहे. त्याचे रौद्र रूप पहायचे असेल तर जीवधनवर जाण्यावाचून दुसरा पर्यायच नाही.
आता आम्ही जीवधनच्या पश्चिमेकडच्या नाणेघाटाकडे जाणार्‍या मुख्य दरवाजाने उतरायचे ठरवतो. हा जीवधनचा राजमार्ग. नाणेघाटात जमा झालेली जकात याच मार्गाने जीवधन किल्ल्यावर यायची. सुरुवातीला एक सुंदर कमान आहे. १०/१२ पायर्‍या उतरून आपण एका सुंदर दरवाजापाशी येतो. इथे दुसरा दरवाजा लागतो. इथे येण्याच्या मार्ग दरड कोसळल्यामुळे भग्न झालेला आहे. दरडीतूनच खाली उतरावे लागते की आपण थेट दरवाजातच. बाहेर आल्यावर दिसते की हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आहे. उंच उंच बुरुजांनी हा बंदिस्त केला आहे. इथल्या सुरुवातीच्या पायर्‍याही भग्नावस्थेत आहे. एकदम अप्रतिम असेच हे प्रवेशद्वार आहे. ही नळीसारखी वाट आता आम्ही उतरू लागतो. इथे एक छोटेखानी रॉकपॅच आहे. पण पूर्व बाजूपेक्षा सोपा असाच. साधारण ६/७ फूटांचा हा पॅच आम्ही कसरत करून उतरतो. आता परत उंच उंच पायर्‍या लागतात. वाटेत नळीत ठिकठिकाणी छिन्नी हातोड्याने खोदून वाट तयार केल्याच्या खुणा दिसतात. थोड्याच वेळात कडा उतरून आम्ही मध्यभागावर येतो. आता इथे एक पायवाट कड्याला आडवी मारत जाते (ट्रॅव्हर्स). बाणांच्या खुणा जागोजागी केल्याने वाट चुकण्याचा तसा संभव नाही. ह्याच वाटेने सरळ पुढे गेल्यास आपण वानरलिंगीच्या पायथ्याला भिडतो. तिकडे न जाता आम्ही खालच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. कड्याला लगटून जाणारी वाट आता पदरातल्या दाट झाडीतून जाते. इथे आता मातीचा तीव्र उतार व घनदाट झाडी आहे. पण सोपी वाट आहे. झरझर ती वाट उतरून आल्यावर आपण झाडीतून बाहेर येतो. बाहेर पड्ल्यावर लागते ते नाणेघाटाचे विस्तृत पठार. आता जीवधनच्या वानरलिंगीला चिकटून असलेलेल काट्याची लिंगी, टोक हे सुळकेही दिसू लागतात. आता आम्ही निघतो ते २००० वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन वहिवाटीच्या मार्गावर असलेल्या नाणेघाटात जाण्यासाठी.

घाटघर गावातून दिसणारा जीवधन

पाठीमागे असणारे वर्‍हाड डोंगराचे नवरा, नवरी, भटजी हे कडे

ओढ्यातून जाणारी वाट

पायर्‍यांच्या सुरुवातीला

उंच पायर्‍या

कातळारोहणाची सुरुवात

जीवधनवरून होणारे नाणेघाटाचे प्रथमदर्शन

वानरलिंगी सुळका

झोपून पाहिल्यानंतरच

पश्चिम दरवाजाकडे उतरताना

दरडींमधून उतरताना

दरडीतून बाहेर आल्यानंतर

नळीतून जाणारा मार्ग

ट्रॅव्हर्स घेताना

पदरातून

उतरल्यावर आम्ही जिथून उतरलो ती दिसणारी घळ

झूम इन

नाणेघाटाकडे जाताना

मागे वळून पाहताना

प्रवासभूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 10:45 am | आजानुकर्ण

जीवधन, नाणेघाट, हडसर, चावंड हा सर्वच परिसर फार सुरेख आहे. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला माळशेज घाटाच्या बाजूने (वैशाखरे गावातून) नाणेघाटावर चढाई करायला मजा येते.

विंजिनेर's picture

11 Feb 2011 - 11:57 am | विंजिनेर

विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला माळशेज घाटाच्या बाजूने (वैशाखरे गावातून) नाणेघाटावर चढाई करायला मजा येते.

अगदी... अगदी...

प्यारे१'s picture

11 Feb 2011 - 10:55 am | प्यारे१

ढासु फटु.

स्टन्न्ड!!!

थँक्स वल्ली.

बघताना परत एकदा दम लागला त्या चढणीचा, अन अंगावर दाट धुक पसरल्याचा भास झाला. आम्ही पावसाळ्यात जायचो, अक्षय मुळे फार ठिकाण अशी फिरायला मिळाली. त्या नाणेघाटच्या पठारावर हे मोठ्या मोठ्या सापाम्च्या काती दिसतात, काटा येतो अंगावर. जिवधन ची घ़ळ तर आपण पार केली हे नंतर पटतच नाही. कीप इट अप डिअर, मिळतय तोवर सारा संह्याद्री पालथा घाला.

अरे हो तीथे एक विमान कोसळल होत त्याचे अवषेश अजुन मिळतात, म्हणजे मी गेले होते तोवर तरी मिळायचे म्हणे. तो उल्लेख नाही केला तुम्ही?

प्रचेतस's picture

11 Feb 2011 - 11:14 am | प्रचेतस

ही माहिती तर माझ्यासाठी नवीनच आहे. नाणेघाट मी आतापर्यंत ५-६ वेळा केलेला आहे मला तरी आतापर्यंत अवशेष दिसले नाहीत कुठे.
आणि जीवधन तुम्ही पावसाळ्यात केला म्हणजे कमाल आहे. पावसाळ्यात तर वाटा भयंकर निसरड्या होतात.

हो त्या निसर्ड्या वाटाच आम्ही चाललोय.आमचा ग्रुप बहुतेक दा पावसाळ्यातच बाहेर पडत असे.वीस जण होतो आम्ही. अगदी एक स्टोव्ह पण असायचा बरोबर.

विमानाचे अवषेश मोठ्ठे मोठ्ठे नाहित अन मला सापांच्या कातीतुन ते शोधायला वेळ ही नाही मिळाला, पण ही बातमी आहे की त्या भागात लो प्रेशरने पुर विमान डिसिंटीग्रेट झाल होत.

प्रसाद_डी's picture

11 Feb 2011 - 12:03 pm | प्रसाद_डी

मला पण आत एखादा ट्रेक क्लब जॉईन करावा सा वाटतो आहे आता... कोणी मदत करु शकत असेल तर आगोदरच धन्यवाद.

गणेशा's picture

11 Feb 2011 - 12:24 pm | गणेशा

मला पण असेच वाटते आहे.
पण आपणच सर्व मिळुन आपलाच स्वतंत्र टेक प्लॅन करु शकतो.
वल्ली आणि जीप्सी नक्कीच मदत करतील .. जीप्सींचे दर्शन बरेच दिवस झाले नाही.. एकदम तत्पर असतात ते यासाठी....

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Feb 2011 - 3:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

दोनदा आल्याने स्वसंपादित

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Feb 2011 - 3:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला पण नुकतीच आठवण आली होती जिप्सींची. बरेच दिवसात नाही दिसले.

असा ट्रेक प्लान केलात तर नक्की कळवा.

यशोधरा's picture

11 Feb 2011 - 12:05 pm | यशोधरा

मस्त लेख आणि फोटो. तो सुळका कसला भारी आहे!

गणेशा's picture

11 Feb 2011 - 12:22 pm | गणेशा

जबरदस्त एकदम

अमोल केळकर's picture

11 Feb 2011 - 12:25 pm | अमोल केळकर

मस्तच ! अवघड आहे हे मला तरी
धन्यवाद

अमोल केळकर

स्पा's picture

11 Feb 2011 - 12:30 pm | स्पा

वल्या.. खतरा फोटू...

सुळक्याचे फोटो मस्त आलेत

व्वा!!
वल्ली, सुरेख... इतक्या सुंदर मेजवानीसाठी धन्यवाद! नाणेघाटाच्या बाजूच्या नळीच्या वाटेची सैर घडवलीत, झकास्स!!!

२००१ आणि २००२ सालच्या पावसाळ्यात गेलोय जीवधन-नाणेघाट ट्रेकला. पहिल्या वेळी सर नाही झाला, दुसर्‍या वेळी इरेला पेटून गेलो होतो. सोप्या वाटणार्‍या वाटा पावसाळ्यात किती अवघड होऊ शकतात याचं जीवधन हे फार चांगलं उदाहरण आहे. वाटा, पुसट होतात, सगळीकडे माजलेलं रान, सोसाट्याचा वारा, रिपरिपणारा पाऊस, त्यामुळे अजूनच निसरडे होणारे कातळ, जंगलातले भुलभुलैय्या, आणि जोडीला बेफाम धुकं! पण अशा ऑड्समध्ये जीवधन केला की जग जिंकल्याचा आनंद होतो..

नाणेघाटाच्या डोंगराला 'नानाचा अंगठा' म्हणतात ना! म्हणून आम्ही वानरलिंगी सुळक्याला 'नाना' म्हणायचो. म्हणजे नाना तिथे जीवधनपाशी उभा आहे, आणि त्याचा अंगठा म्हणजे नाणेघाटाचा डोंगर! =)) =)) आणि 'नाना' म्हणजे आपले नानासाहेब नैत हो!! ये शेप्रेट नाना होने का!!
आमच्यातले थोडे आंग्लाळलेले लोक होते ते त्याला न्यूटन म्हणायचे, का कुणास ठाऊक! ;-)

--असुर

प्रचेतस's picture

11 Feb 2011 - 2:12 pm | प्रचेतस

पण ज्याला जीवधन पहिल्यांदाच करायचा आहे त्याने शक्यतो पावसाळ्यात जाउ नये. अवघड वाट हे कारण तर आहेच शिवाय पावसाळ्यात धुक्यामुळे दृश्यमानता काहीही नसते त्यामुळे सह्याद्रीच्या अफाट पसरलेल्या धारेचे, सरळ तुटलेल्या खोल कातळकड्यांचे, आजूबाजूच्या इतर किल्ल्यांचे, नानाच्या अंगठ्याचे एव्हढेच नाही तर खुद्द वानरलिंगीचेही दर्शन होत नाही.
वानरलिंगीलाच मुंबईकडचे लोक 'खडा पारशी' असेही म्हणतात.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2011 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार

वल्ली नेहमीप्रमाणेच झ का स !

ते फोटु बघुनच दम लागलाय मला ;)

५० फक्त's picture

11 Feb 2011 - 5:30 pm | ५० फक्त

वल्ली, लई भारी बाबा तुम्ही लोकं, मला तिच्यायला घराची लिफ्ट बंद असेल तर धस्स होतंय (का ते भेटल्यावर कळॅलच)

फोटो पण लई भारी आलेत, सुमित दाखवे, अनिल रावळेकर यांना ओळखतो काय, ते पण दर शनिवार रविवारी असेच फिरत असतात.

पुढच्या ट्रेकला आमच्या शुभेच्छा.

प्रचेतस's picture

11 Feb 2011 - 6:25 pm | प्रचेतस

या दोघांना नाही ओळखत. मी मात्र माझ्या शाळकरी मित्रांबरोबर भटकत असतो. आता रविवार हापिसात जावे लागणार आहे पण यदाकदाचित रद्द झालेच तर कार्ले, भाजे आणि बेडसे लेणी करायचा विचार आहे. बघू कसे जमते ते.

मनराव's picture

11 Feb 2011 - 6:07 pm | मनराव

वल्ली, झक्कास अनुभव.........

हडसर आणि चावंड पाहून झालाय................ अता जिवधन आणि नाणेघाट राहिलाय....... फोटो पाहिले मस्तच आहेत................लवकरच अता तो पण सर करणार..............

इन्द्र्राज पवार's picture

11 Feb 2011 - 6:25 pm | इन्द्र्राज पवार

वल्ली....

फोटो "दरडीतून उतरताना..." आणि 'नळीतून जाणारा मार्ग..." पाहताना मला चक्क आजकाल सर्वत्र गाजत असलेला आणि ऑस्करच्या रेसमधील चित्रपट "१२७ हावर्स" आठवला...तुमच्यासारखाच एक साहस आणि दुर्गप्रेमी युवक [एकटाच] अशा दरडीतून उतरत असताना एके ठिकाणी अडकून पडतो आणि त्यानंतरचे पुढचे १२७ तास 'जगण्यासाठी' कसा झगडा देत राहतो....याची सत्यकहाणी या चित्रपटात आहे. तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पाहावा...तुम्हास आणि जीवधन नाणेघाट ट्रेकमध्ये सामील झालेल्या सर्वाना तो भावेल.

फोटोवरून कळतेच.....'ये अपनी बस की बात नही, बाबा !'....पण वर्णन वाचून मनी येते मात्र की, आपणही केव्हातरी तुमचा पाठलाग करीत जथ्यात सामील व्हावे.

सुंदर अनुभवकथन....

इन्द्रा

प्रचेतस's picture

11 Feb 2011 - 6:29 pm | प्रचेतस

इंद्रराज तुम्ही तर जथ्यात जरूर सामील होउन सह्याद्रीचे वारकरी व्हाच. आणि ही जीवधनची घळ तर काहीच नाही. तुम्हाला जर खरोखर "१२७ हावर्स" चा अनुभव सह्याद्रीत घ्यायचा असेल तर सांदण दरीशिवाय पर्याय नाही.

आत्मशून्य's picture

16 Feb 2011 - 6:15 pm | आत्मशून्य

मला सूध्दा नेमका "१२७ हावर्स" आठवला.

फोटोवरून कळतेच.....'ये अपनी बस की बात नही, बाबा !'....

अस काही नाहीये हो, सोबत ग्रूप असेल तर घेतात सगळे एकमेकांना सांभाळून, म्हणून ट्रेकींग अवश्य कराच, हे आपलं भाग्य आहे की आपण सह्याद्रीच्या कूशीत आहोत. कारण ट्रेकींगची मज्याच वेगळी आहे. जेव्हडे अवघड, तीतकेच मजेशीर, थरारक आणी योग्य काळजी घेतली तर संपूर्ण सूरक्षीत.

साहसी प्रकारात रॅपेलींग,रीव्हर क्रोसींग थोडं चॅलेंजींग असते पण जमून जाते, तर रॉक क्लायबींग, मात्र अवघड. तेथे फक्त शरीराने धडधाकट व मनाने साहसी लोकांनाच प्रवेश. पण ट्रेकींग बरच सोपं, आनंददायी व सर्व वयोगटासाठी ऊपलब्ध.

स्वाती दिनेश's picture

11 Feb 2011 - 6:51 pm | स्वाती दिनेश

मस्त फोटो आणि ट्रेक जबर्‍या झालेला दिसतो आहे..
स्वाती

श्रावण मोडक's picture

11 Feb 2011 - 7:12 pm | श्रावण मोडक

जबऱ्याच...

प्राजु's picture

12 Feb 2011 - 3:11 am | प्राजु

अप्रतिम!!! काय सुरेख आहेत फोटो. :)

महेश-मया's picture

15 Feb 2011 - 10:25 am | महेश-मया

छान फोटो, महाराष्ट्रात असं काहि असेल हे माहितच नव्ह्तं

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Feb 2011 - 4:51 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त फोटो आणी वर्णन...

अवांतर...अरे हो तीथे एक विमान कोसळल होत त्याचे अवषेश अजुन मिळतात, म्हणजे मी गेले होते तोवर तरी मिळायचे म्हणे. तो उल्लेख नाही केला तुम्ही?>>>> अपर्णाजी ते विमान जिवधन नाणेघाट परिसरात नाही तर कल्याण-नगर रोड वरील खुबि फाट्यावरुन एक वाट सिंद्दौला टेकडीवरुन नाणेघाटात येते त्या वाटेवर पडले होते. अजुनही सिंद्दौला टेकडीपरिसरात त्याचे अवशेष सापडतात.

धमाल मुलगा's picture

16 Feb 2011 - 4:57 pm | धमाल मुलगा

हे आपलं...वल्ली.... :D

फोटु झकासच.
माझा प्रश्न एकच... 'आता कधी?' :)

मुलूखावेगळी's picture

16 Feb 2011 - 9:37 pm | मुलूखावेगळी

+१
आता कधी?

मुलूखावेगळी's picture

16 Feb 2011 - 9:37 pm | मुलूखावेगळी

+१
आता कधी?

प्रचेतस's picture

17 Feb 2011 - 9:09 am | प्रचेतस

कधी ते तुम्हीच ठरवा आणि सांगा. आपण काय बाबा तयारच आहोत यायला.