शाळा.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
5 Jun 2008 - 11:16 am

शाळा.....

लहान लहान मुलांच्या मोठ्ठया मोठ्ठ्या मनात
आकांक्षांचं पीक ऊरी , वारं भरल्या कानांत !

त्रास देणारा शेजारचा मित्र पण जवळचा वाटतो
आवडणारी मुलगी लांब असून जवळची वाटते !

कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !

"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !

तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !

फक्त .....चुकलं की सर्वांसमोर ओरडणार्‍या "बाई"
आणि सुधारावं म्हणून मारणारे "सर" आता दिसत नाहित !

चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ली काही तास "शाळार्थी"
आपुलकी नसलेल्या शाळात हल्ली "विद्यार्थी" दिसत नाहित !

मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय
शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय !

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !

कारण हात उगारणारे सर किंवा बाई आता कदाचित नसतील , पण
वर्गातल्या मुलाला लागलं म्हणून रडणारे एखादे तरी वर्गशिक्षक असतील !

मस्ती केली की ओणवं उभं करणारे सर दिसतीलच कशाला?
"दमलं असेल पोरगं !" म्हणून पाणी देणार्‍या शिपायाची सर कशाला?

एकही विषय न शिकवणारे असतील शाळेचे मुख्याध्यापक
आणि वर्गात फिरून शिकवण्याची दृष्टी नाही आता व्यापक !

नाममात्र अस्तित्व घेऊन गल्ली बोळांत हल्ली उभ्या आहेत इमारती
'कळलें नाही तर "क्लास"मधे विचारा' या शिक्षकांच्या इशारती !

तरी पण आवडते सगळ्याच मुलांना शाळा
सोडा वॉटर सर्-बाई अन् चीर पडलेला फळा !

कारण चुकार फटीतून झिरपत असतं जसं पावसाचं पाणी,
तसा फुलवत असतो एखादा शिक्षक,एखादा शिपाई ....हा मळा !

------------------------------------------------------------------------------------गोखले एजुकेशन सोसायटी - बोरिवली पश्चिम - च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यानिमित्त २४-जुलै-'०७ रोजी केलेली आणि जाहीर वाचन झालेली एक कविता.....उदय गंगाधर सप्रे-ठाणे

आपण मला इथेही भेटू शकता :
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

आणि

कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/

कविता

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

5 Jun 2008 - 11:25 am | अमोल केळकर

तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !

मस्त रचना

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !

हे पण छान
आपली कवीतेने परत एकदा शाळेची आठवण आली.

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 1:15 pm | गणा मास्तर

मस्त आहे

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 1:20 pm | विसोबा खेचर

क्या बात है!

हृदयाला हात घालणारी कविता....!

कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !

"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !

ह्या ओळी सर्वात आवडल्या....

आपला,
(इयत्ता पहिली 'अ' च्या आठवणीने हळवा झालेला) तात्या.

स्वाती राजेश's picture

5 Jun 2008 - 2:27 pm | स्वाती राजेश

शाळेची आठवण करून देणारी...
मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय
शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय !

अगदी खरोखर हीच परिस्थिती आहे..:)

डोमकावळा's picture

5 Jun 2008 - 4:09 pm | डोमकावळा

"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !

आवडलं आपल्याला.....

विदेश's picture

5 Jun 2008 - 9:16 pm | विदेश

चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ली काही तास "शाळार्थी"
आपुलकी नसलेल्या शाळात हल्ली "विद्यार्थी" दिसत नाहित !

वास्तवातील सुरेख वर्णन!

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jun 2008 - 9:21 pm | llपुण्याचे पेशवेll

छान कविता आहे. :)
पुण्याचे पेशवे

वरदा's picture

5 Jun 2008 - 10:25 pm | वरदा

आहे...

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jun 2008 - 10:40 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आहे रे कविता, उदय. .... ते दिवस आठवले. अरे काय सांगू, माझ्या कडे एक कडीचा डबा होता आणि 'गोल्डस्पॉट' ची वॉटरबॅग सुद्धा. सकाळची शाळा असायची. आई मस्त गरम गरम पोळी करून त्याला छान तूपसाखर लावून त्या कडीच्या डब्यात घडी घालून ठेवायची. मग 'मधल्या सुट्टीत' (आता रीसेस असते) ती थोडी वाफेचं पाणी होऊन 'घामेजलेली' पोळी खाताना कसंतरीच वाटायचं. वाटायचं आईने पोळ्या थोड्या थंड करून मग डब्यात टाकल्या असत्या तर काय बिघडलं असतं? :''(

आता ते सगळे दिवस आठवत आहेत. त्या आठवणी परत जाग्या केल्याबद्दल धन्यवाद, मित्रा.

कुमार बिपिन कार्यकर्ते,
इयत्ता १ली ते ४थी, तुकडी 'अ',
अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळा,
गोरेगाव (पूर्व), मुंबई.

अवांतरः जुन्या आठवणी यायला लागल्या, वय व्हायला लागलं की काय? :D

चतुरंग's picture

5 Jun 2008 - 11:10 pm | चतुरंग

कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !

"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !

तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !

हे मस्तच!

(इयत्ता चौथीत असताना एकदा डबा घरी विसरला तेव्हा कडकडून भूक लागून रडू यायला लागलं. बाहेर मुसळधार पाऊस असल्याने घरी जाणेही अवघड होते. सूर्यवंशी सरांनी आपुलकीने खाऊ घातलेल्या त्यांच्या डब्यातल्या चटणी-भाकरीची आणि शेजारच्या हॉटेलातून आणलेल्या गरमागरम बटाटेवडे आणि चहाची प्रेमळ चव अजूनही जिभेवर आहे! :) )

चतुरंग

चतुरंग साहेब,
आता लहान्पणी केलेली मस्ती आठवते आणि आपल्यामुळे किती गरीब बाईंना आणि सरांना त्रास झाला असेल ते कळते.पण लहान मुलांना फक्त अफाट ऊर्जा असते आणि मनाने निष्पाप असतात ती ! तरीही आमच्या शाळेतील गोरे बाई आठवतात , पट्टी हातात घेऊन मारु का,मारु का? असे विचारत रहायच्या पण अगदीच नाइलाज झाला तरच त्यांचा हात उठायचा.....आता आठवले तरी (खरे तर हे लिहिताना पण) डोळे भरून येतात्....कुठे आहात हो तुम्ही बाई?मी शाळा सोडून पण आता २८ वर्षे झाली.....तुमच्या ह्या लाडक्या मस्तीखोर मुलाला माफ कराल ना? (मी डोक्यानी तल्लख आणि हुशार आहे अशी त्या माऊलीची खात्री होती.....आज त्या असत्या तर त्यांना याचे समाधानच वाटले असते.....)

ओरडणारे सगळे सर-बाई आपले दुश्मन वाटतात
लहानपणी सगळ्यांच्या ज्ञानाचा "वय" भक्षक असतो
मोठेपणी सगळ्यांच्या वयाचे "ज्ञान" भक्षक होते.....
तेंव्हा कळते.....वय आणि ज्ञान यांचा शिक्षक हाच खरा रक्षक असतो !

तुम्ही लिहिलेल्या आठवणींनी पण डोळे भरून आले.....

तुमच्याबध्द्ल आपुलकी असल्याने आणि तुमच्या प्रतिसादात तशी ती माझ्याबध्दल पण असल्याची जाणीव झाल्याने आभार वगैरे न लिहिताच थांबतोय.....

आपला,

उदय सप्रे

बेसनलाडू's picture

6 Jun 2008 - 9:21 am | बेसनलाडू

झकास कविता!!!!! शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.
(विद्यार्थी)बेसनलाडू

मदनबाण's picture

6 Jun 2008 - 9:28 am | मदनबाण

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !

ही ओळ फार आवडली.....
खरचं शाळेत केलेला दंगा,,मस्ती याला तोड नाही...

(गणिताच्या तासाला नेहमीच वैतागलेला)
मदनबाण.....

गिरिजा's picture

8 Jun 2008 - 5:02 pm | गिरिजा

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !

खरय.. काही गोष्टी संपल्यावर / नसताना त्यांची किम्मत कळते.. शाळा हीसुद्धा त्यातलीच एक... नंतर कॉलेजात, नोकरीत कुठेच तशी मजा, तसा जिव्हाळा, तसे मित्र-मैत्रिणि हे काहीच मिळत नाही..

खूप सुरेख कविता आहे.. डोळ्यात पाणी नाही आल, तरच नवल..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------