काल नीलायमला चक्क ब्लॅकमध्ये तिकिट घेऊन 'आयडियाची कल्पना' पाहिला. बर्याच दिवसांनी मराठी चित्रपट ब्लॅकमध्ये बघण्याचा योग आला. गर्दी चिक्कार होती. कधी नव्हे ते नीलायमचे पार्किंग फुल्ल झाले होते. हे चित्र बघून नयन सुखावले. सचिनची जादू अजूनही कायम आहे हे निदर्शनास आले.
आत गेल्यावर पाहिले तर बाल्कनी गच्च भरलेली होती. प्रेक्षक आतूरतेने चित्रपट सुरु होण्याची वाट बघत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक स्पर्धेने चित्रपट सुरु होतो. नायक जयराम (सचिन) एक हौशी नट असतो. त्याचा नायिकेच्या गाडीमुळे एक छोटासा अपघात होतो. मनोहर (अशोक सराफ) एक कारस्थानी वकील असतो आणि त्याचबरोबर तो जयरामच्या बहीणीचा (निर्मिती सावंत) नवरा असतो. अपघाताला गंभीर रूप देऊन पैसे उकळण्याचे कारस्थान मनोहर रचतो. नायिका पोलीस कमिशनर ठाकूर यांची बहीण असते. मग जयरामला काहीही झालेले नसतांना त्याला गंभीर दुखापत झालेली आहे असे भासवून मनोहर जी खेळी खेळतो आणि त्यातून काय काय गोंधळ उडतो याचे विनोदी सादरीकरण म्हणजे 'आयडियाची कल्पना'! मग जयरामचा जुळा भाऊ उभा करणे, त्याला अंथरुणाला खिळवून ठेवणे इत्यादी प्रसंगानी चित्रपटाला रंग भरण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत.
सचिनने यात तीन-तीन भूमिका वठवल्या आहेत. कितीही मेकप केला तरी सचिनचे वय चेहर्यावरच्या रंगांआडून डोकावून मनसोक्त आरडाओरडा करते. त्यामुळे थोडा रसभंग होतो. भार्गवी चिरमुले नायिका म्हणून खास अशी छाप पाडू शकलेली नाही. तिच्यातला 'नायिका' फॅक्टर खूप आधीच संपलेला आहे असे वाटले. पहिल्या गाण्यात आणि नंतर संपूर्ण चित्रपटात तिचा भडक मेकप खूपच त्रासदायक वाटतो. अशोक सराफ हेच खरे चित्रपटाचे नायक आहेत. काहीतरी कट रचून नंतर निर्माण होणार्या अडचणीच्या प्रसंगांमधून बाहेर पडण्याच्या त्यांच्या कल्पनांमुळे चित्रपटात माफक विनोदनिर्मिती झालेली आहे. महेश कोठारे छान वाटलेले आहेत. एक साधा, सरळ, सज्जन, होतकरू, निरुपद्रवी पोलीस कमिशनर ही कल्पना हास्यास्पद वाटत असली तरी महेश कोठारेंनी ही त्रासलेल्या कमिशनरची भूमिका छान वठवली आहे. निर्मिती सावंत, राजेंद्र चिटणीस, क्षितीज झारापकर, अली असगर, स्वप्नील जोशी इत्यादी कलाकार ठीक-ठाक आहेत.
दिग्दर्शनात ढिसाळपणा जागो-जागी दिसतो. मुळात पटकथा खूपच ढिसाळ असल्याने विनोदनिर्मितीला खूप वाव असूनदेखील स्वतःच्या फिल्मी करीअरचे उदात्तीकरण करण्याच्या नादात सचिनने चित्रपटाचा खूप भाग खर्ची घातलेला आहे. तीन-तीन भूमिका, त्यात स्वतःच्या स्वतःनेच बहाल करून घेतलेल्या 'महागुरु' या पदवीचे कौतुक, स्वतःच्या हिंदी आणि मराठी चित्रपटातल्या कारकीर्दीचा प्रेक्षकांना आठवण करून देण्याचा बालिश प्रयत्न, सचिन पिळगावकर या खर्या भूमिकेत स्वतःला दिलेले महत्व, तरूण मुली सचिनच्या खूप चाहत्या आहेत असे दाखवणारे प्रसंग, स्वतः नायिका सचिनची जबरदस्त फॅन असल्याचे प्रसंग अशा अनेक प्रसंगांनी चित्रपटाची लय बिघडते. कुठली १९-२० वर्षांची मुलगी सचिनची जबरदस्त वगैरे चाहती असेल? हे म्हणजे फर्ग्युसन कॉलेजात शिकणारी १६ वर्षाची सुंदर मुलगी आलोकनाथची जबरदस्त फॅन असण्यासारखे आहे. कल्पना करा, तिच्या पर्समध्ये आलोकनाथचे फोटो आहेत, मोबाईलवर आलोकनाथचा फोटो आहे... (असं चित्रपटात दाखवलेलं नाहीये; अशीच एक 'आयडियाची कल्पना' :-))
रेड लेबल, मॅक्सो डास रिपेलंट, लागू बंधू इत्यादी ब्रँड्सच्या मध्येच घुसडलेल्या जाहिराती अत्यंत हास्यास्पद वाटतात. हॉस्पिटलमध्ये सचिन नर्सला म्हणतो की मला डास चावतील, यावर नर्स म्हणते "असे कसे चावतील, मी आता मॅक्सोचे रिपेलंट लावते...." अरे काय आहे हे? नंतर खर्या सचिनला 'रेड लेबल'ची जाहिरात करायची असते म्हणून तिथे अशोक सराफ, सचिन आणि अली असगर 'रेड लेबल' चहा पितात आणि "वा काय मस्त सुगंध आहे", "हां, ये चाय हेल्दी भी हैं" सारखे संवाद म्हणतात. आवरा रे यांना कुणी. बालिशपणाला काही मर्यादा असतात. नायिका 'लागू बंधूं'च्या दुकानात गेल्यावर तिथला माणूस इतक्या वर्षांची परंपरा, शुद्धता वगैरे गोष्टी सांगून प्रेक्षकांना वात आणतो. इन-एंटरटेनमेंट ब्रँडींग इतके बालिश पद्धतीने नसते करायचे हे यांना कसे कळत नाही?
अशोक सराफांना ओढून-ताणून विनोद करतांना बघून हसावे की रडावे कळत नाही. "मला तुम्हाला एक महत्वाची इंपॉर्टंट गोष्ट सांगायची आहे...", "माझी आयडियाची कल्पना कशी वाटली"असल्या विनोदांवर हसू येण्याचा जमाना कधीच गेला.
चित्रपटातले प्रसंग तितकेसे नीट खुलत नाहीत. त्यामुळे घडणारा विनोद चेहर्यावरचे स्नायू दुखावणारे हसू आणतो, हृदयाला हसवणारे हसू क्वचितच फुटते. व्यक्तिरेखांना भडक आणि आक्रस्ताळा बाज दिल्याने पटकथेतले प्रसंग नीट उभे राहत नाहीत.
काही काही प्रसंग खूप मजा आणतात हे नक्की. जयराम चोरून नायिकेच्या घरी जातो तेव्हा त्याला ठाकूर समजून कमिशनरची बायको मिठी मारते. नेमके त्याच वेळेस कमिशनर उठतात आणि "अरे काय चाललंय हे?" असा प्रश्न हताशपणे विचारतात. महेशने हा प्रसंग छान केलाय. महेश अशोकला "काय? तुझं माझ्यावर प्रेम आहे?" असं विचारतात हा प्रसंग खूप छान झालाय. काही ठिकाणी प्रसन्न हसू खेचून आणण्यात चित्रपट बर्यापैकी यशस्वी झालाय.
गीत-संगीत या आघाडीवर काही उल्लेखनीय नाही. पहिली लावणी कर्कश्श तर आहेच शिवाय त्यातले पुरुष गायकाचे शब्दही नीट कळत नाहीत इतका गाण्यात गोंगाट आहे. बाकी गाणी लक्षात राहण्यासारखी नाहीत.
असा हा 'आयडियाची कल्पना' ठीक-ठाक वाटतो. प्रेक्षकांना हसवत ठेवण्यात मात्र नक्कीच यशस्वी ठरतो. चित्रपटभर प्रेक्षक मनमुराद हसत असतात. सचिन-महेश यांचे पहिलेच एकत्र दर्शन हे ही एक वैशिष्ट्य आहेच. काहीच करण्यासारखे नसेल, थोडा टाईम-पास करायचा असेल आणि विशेष म्हणजे मूड चांगला असेल तर 'आयडियाची कल्पना' बघण्यास हरकत नाही. नाही पाहिला तर खूप काही मिस कराल असेही नाही...
प्रतिक्रिया
3 Jan 2011 - 12:00 pm | यशोधरा
अर्र.. इतका ब्येक्कार आहे का! :(
3 Jan 2011 - 12:03 pm | अवलिया
पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद !
3 Jan 2011 - 9:35 pm | गुपचुप
धन्यवाद !
3 Jan 2011 - 12:12 pm | विजुभाऊ
मराठी चित्रपटात कित्येक दशके अशोक सराफ हेच हीरो म्हणून वावरत आहेत.
बाकी कोण उरले आहे आता हीरो म्हणून.
अशोकसराफांइतकी किंवा त्यांच्या जवळपास जाईल इतक अभिनय करणारे सगळे बहुतेक कुठेतरी गायब झालेत.
भरत जाधव यांच्या इतके उथळ अभिनय कोणीही करुन दाखवावा हे चॅलेन्ज.
मकरंद अनासपुरेंवर बालीश श्टाईलचे जोक आणि ते हॅ हॅ करत कसनुसे हसणे कोणी लादले आहे कोण जाणे.
देवारे मराठी चित्रपटाना /निर्मात्याना या असल्या ओसरून गेलेल्या लाटेत वाहून ने आणि कुठेतरी दूर बेटावर सोडून ये.
3 Jan 2011 - 12:15 pm | बिपिन कार्यकर्ते
अपेक्षा नव्हतीच. खरं तर तुम्ही 'थोडा चांगला आहे' असे म्हणत आहात तेच फार झाले. फालतूपणातून हे लोक कधी बाहेर येणार ते राम जाणे! त्या महागुरूला तर फटके द्यायला पाहिजेत!!!
3 Jan 2011 - 12:23 pm | ५० फक्त
मरगळलेल्या मराठि चित्रपटांना जरा चांगले दिवस येण्याची अजुन एक चांगली संधी सचिननं वाया घालवलि आहे हे निश्चित.
हर्षद.
आणि हो पॅसे वाचवल्याबद्दल समीर अतिशय धन्यवाद.
नव्या वर्षात या वाचलेल्या पॅशातुन पार्टी करु या.
हर्षद.
3 Jan 2011 - 12:31 pm | टारझन
पोकळ बांबु च्या फोकाने टेर्या शेका त्या आशोक सराफ आणि सचिन च्या ... च्यायचे भंकस साले .. !!
- (संतप्त प्रेक्षक) टारझन
3 Jan 2011 - 12:34 pm | विसोबा खेचर
परिक्षणाबद्दल आभार..
हा चित्रपट आज ना उद्या केव्हातरी टीव्हीवर दाखवतील तेव्हा पाहिला तर पाहू.. :)
3 Jan 2011 - 12:34 pm | ऋषिकेश
शुक्रवारीच रेडोवर वाईट्ट रिव्हू ऐकून "आघात" बघायचे ठरवले ते योग्यच दिसत्येय!
परिक्षण मस्त.. पैसे, वेळ आणि डोक्याला होणारा ताप वाचवल्याबद्दल आभार! :)
3 Jan 2011 - 12:39 pm | मी_ओंकार
मग ते तिघे चौपाटीवर चित्रविचित्र कपडे घालून डान्स कधी करत असतात?
- ओंकार.
3 Jan 2011 - 4:56 pm | समीरसूर
पिक्चर संपल्यावरचे ते गाणे आहे...
3 Jan 2011 - 12:43 pm | निनाद मुक्काम प...
तुम्ही काळ्या बाजारात तिकीट विकत घेतली? .
म्हणजे ''हात दाखवून अवलक्षण''
आपली ढेरपोट सांभाळत ह्या त्रीदेवांनी ह्या शिनेमातील नृत्याचा अविष्कार स्टेज दाखविण्याचे धारिष्ट्य दाखवले
.ते पाहून तुम्ही बहुदा हा सिनेमा पाहण्यास प्रवृत्त नव्हे तर उतावळे झाला .(कदाचित त्यावर समीक्षण करायचा उद्दात हेतूने तुम्ही महाग तिकीट काढले असावे .
बाकी ह्यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करायची .
ह्याचे समकालीन बॉलीवूड अभिनेते ( मिथुन /चंकी /गोविंदा / जितेंद्र / ऋषी / कुमार गौरव / हे ८० च्या दशकातले आता गुमान वयाला साजेश्या भूमिका करतात .)
ह्यांना स्वताची लाल करायला आवडते .काय करणार गश्मीर भाऊ आपला अभिनय व नृत्याविष्कार मराठी शिनेमा साठी न ठेवता मुस्कुराके देख नामक भुक्कड हिंदी शिनेमात खर्ची करतात .
तेव्हा मराठी मायबापाच्या नशिबी जरठ दर्शन येणे ओघाने आलेच
बाकी जरठ विवाह हा समाजातून बर्याच अंशी नाहीसा झाला . तसा जरठ नायक बंदी समाजातून कधी होणार
3 Jan 2011 - 4:58 pm | समीरसूर
ब्लॅकमध्ये मराठी चित्रपटाचे तिकिट घ्यावे लागते हा आनंद होता आणि म्हणून घेऊन टाकले तिकिट... :-)
सचिन ने आता तरुणांना संधी द्यायला हवी आपल्या चित्रपटांमधून. महेश कोठारेंना ते जमले; सचिन अजून स्वतःला चॉकलेटी हीरो समजत आहेत म्हणून हा अत्याचार होतो आपल्यावर...
3 Jan 2011 - 1:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>> इन-एंटरटेनमेंट ब्रँडींग इतके बालिश पद्धतीने नसते करायचे हे यांना कसे कळत नाही?
असेच प्रकार महेश मांजरेकर च्या विरुद्ध नामक चित्रपटात होते. मी काही प्रसंग पहिले मग त्या वाटेला गेलोच नाही. अशोक सराफ यांच्याच अनपेक्षित नावाच्या चित्रपटात "जीवदया नेत्रप्रभा" असे गाणेच होते असे अंधुक आठवते.
बाकी हे परीक्षण वाचून चित्रपटाला जाण्याची शक्यता थोडी कमी झाली आहे. मटा ने मात्र यांची तुलना डायरेक्ट 'गंमत जंमत', 'नवरा मिळे नवरीला', 'आमच्या सारखे आम्हीच', 'अशी ही बनवाबनवी' यांच्याशी केली आहे.
दुवा :- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7199288.cms
3 Jan 2011 - 4:20 pm | मी_ओंकार
लेखात "लागा मोटरिया का धक्का" असे गाणे आहे असे लिहिले आहे. नवनिर्माण वाल्यांना फोन लावला पाहीजे. मग महागुरु पुन्हा मुलाखती द्यायला मोकळे.
- ओंकार.
3 Jan 2011 - 4:34 pm | भडकमकर मास्तर
मटाचे हे परीक्षण वाचून खूप करमणूक झाली...
स्पॉन्सर्ड परीक्षण मजेदार वाटले...
3 Jan 2011 - 5:01 pm | समीरसूर
'अशी ही बनवाबनवी', 'गम्मत जम्मत' आणि 'नवरी मिळे नवर्याला' हे खूप चांगले आणि मनोरंजक चित्रपट होते. बनवाबनवी तर माझा ऑल टाईम फेव आहे....उत्कृष्ट पटकथा आणि वेगवान हाताळणी यामुळे तो चित्रपट नेहमीच हसवतो. शिवाय कथा ही दमदार होती. 'गम्मत जम्मत' मध्ये अशोक सराफ अफलातून होते...
3 Jan 2011 - 1:39 pm | निनाद मुक्काम प...
ह्या सिनेमाद्वारे महागुरू संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे .
आता अजय अतुल चे काही खरे नाही .
बाकी महागुरू व त्यांचा सहकालाकारंना काय खुपते हे कार्यक्रमात पाहायला नक्की आवडेल .
3 Jan 2011 - 3:18 pm | गणेशा
मराठी पिक्चर्स मला आवडतात ..
परंतु हा पिक्चर आपल्या समिक्षणामुळे थेटर मध्ये जावुन कदाचीत नाही पाहणार ...
आनि मला "आयडिया ची कल्पना" हे नाव आणि त्यांचा डांन्स हे दोन्हीही आवडले नसल्याने हा पिक्चर नकोच पाहयला असेच वाटले होते
बाकी अशोक सराफ खुप छान अभिनेते आहेत, त्यांनी फक्त मैत्री आणि माणसांखातर कुठल्याही चित्रपटात काम करु नये असे मला पहिल्या पासुन वाटते ...
त्यातही स्वताची वाह.. वाह करणार्यांपासुन त्यांनी लांब रहावे असेच वाटते..
अवांतर :
खुद्द दादाकोंडके यांच्या पांडु हवालदार या पिक्चर मध्ये अशोक सराफ जबरी वाटले होते( नंतर दादांनी त्यांना कधीच आपल्या पिक्चर मध्ये घेतले नाही...असो, मुन्नाभाई मध्ये जसा सर्कीट आहे त्यापेक्षा ही जास्त भाव खावुन गेले होते अशोक सराफ .. त्या नंतर त्यांचा सहज सुंदर अभिनय जबरदस्त होता.. परंतु भिकार पिक्चर आणि बरोबरचे चिल्लर अभिनेते यांमुळे त्यांची कारकिर्द म्हणावी अशी ग्रेट वाटली नाही, तरीही एक जबरदस्त अभिनेता म्हणुन ते छान आहेत.)
3 Jan 2011 - 3:30 pm | धाकली
परिक्षणाबद्दल आभार.
तसाहि सचिन आज-काल फारच डोक्यात जातो.
3 Jan 2011 - 4:09 pm | भडकमकर मास्तर
१६ वर्षाची सुंदर मुलगी आलोकनाथची जबरदस्त फॅन असण्यासारखे आहे. कल्पना करा, तिच्या पर्समध्ये आलोकनाथचे फोटो आहेत, मोबाईलवर आलोकनाथचा फोटो आहे...
मजेदार वाक्य ..
मी स्वतः आलोकनाथ असतो तर माझी तुलना स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवून घेणार्या माणसाशी केल्याबद्दल भयंकर दु:ख झाले असते....
या सिनेमासाठी प्रमोशनची स्टारमाझावरती मुलाखत चालू होती त्यात महागुरूंनी स्वतःचे इतके कौतुक करून घेतले होते की घाईघाईने च्यानल बदलण्याखेरीज गत्यंतर नव्हते...
तुम्ही हा सिनेमा काळ्याबाजारात तिकीट घेऊन पाहिलात, तुमच्या मराठी सिनेमावरच्या प्रेमाला साष्टांग नमस्कार....
3 Jan 2011 - 8:16 pm | धमाल मुलगा
फक्त, 'रेबीज...रेबीज...रेबीज...' आणि धावाधाव! ;)
3 Jan 2011 - 4:13 pm | टारझन
सकाळ वृत्तपत्रात कोणत्या तरी टोणग्याने एकदा पहावा असा चित्रपट म्हणुन परिक्षण लिहीलंय .. त्याच्या ही टेर्या बडवायला हव्या.
- टारेश टेर्याबडवी
3 Jan 2011 - 4:22 pm | दिपक
सचीन दिग्दर्शक म्हणून ठिक असला तरी नट म्हणून कधी आवडला नाही. ’बनवा बनवी’ मधे अशोक सराफ, लक्ष्या आणि सचिन दारु पिऊन येतात तो सिन आठवा.
परिक्षाणाबद्दल धन्यवाद समिरसूर. :-)
अशोक सराफ साठी तरी एकदा हा चित्रपट पाह्यचा आहे.
3 Jan 2011 - 5:05 pm | समीरसूर
सचिन हा दिग्दर्शक म्हणून खरच चांगला आहे. नट म्हणून तो ठीकठाक आहे. दारूच्या सीनमध्ये अशोक आणि सचिन यांच्या अभिनयसामर्थ्यातला फरक दिसून येतो...
पण महेश कोठारे हा दिग्दर्शक म्हणून सचिनपेक्षा उजवा वाटतो आणि अभिनेता म्हणून सचिनपेक्षा खूपच डावा वाटतो. 'शुभमंगल सावधान' एक छान सुबक चित्रपट होता. कुठेच ढिसाळपणा, घिसाडघाई हे दोष दिसले नाहीत.
मला महेशचा 'दे दणादण', 'थरथराट', 'धूमधडाका' हे चित्रपट आवडले होते.
3 Jan 2011 - 11:03 pm | अर्धवटराव
सचीनचा चाहता वर्ग आहे (त्यात महिलांचा भरणा जास्त आहे) हे मान्य... पण मलाही सचीन एक अभिनेता म्हणुन कधीच फार आवडला नाहि.
सचीनचे शिणीमे उणे लक्ष्या/अशोक सराफ = शूण्य
बाकी अशोक सराफ ग्रेटच. त्यातही त्याचे जुने चित्रपट. मी आजही "बिनकामाचा नवरा" बघतो आणि मनसोक्त हसतो.
(अशोक सराफ फॅन) अर्धवटराव
3 Jan 2011 - 6:05 pm | विजुभाऊ
सचिन चा " नवरा माझा नवसाचा" नामक एका सुंदर चित्रपटाची ३ग्रेड नक्कल बघितली तेंव्हा वाटले की अरेरे या दिग्दर्शाला मेंदू नावाची गोष्ट नसावी. मेहेमूदच्या बोम्बे टू गोवा चित्रपटाची अगदी थेट नक्कल केली असती तरी ती खूप उत्तम वाटली असती.
असो.
दैव आपले.
बनवाबनवी मधे लक्ष्याने जी धमाल केली आहे त्या तुलनेत सचिन फारच तोकडा वाटला होता. ( धनन्जय माने आहेत का?)
अशोक सराफांचा "एक उनाड दिवस" देखील बरा होता.
महेश कोठारे शोले श्ताईल गाणी संवाद यातून बाहेरच आले नाहीत.
3 Jan 2011 - 7:21 pm | रेवती
भार्गवी चिरमुलेचा नाच (कि लावणी?) फु बाई फु च्या अंतिम फेरीला पाहिल्यावरच चित्रपटाबद्दल फारशी आशा उरली नाही.
सचिनला आपल्या हिंदीतल्या मिणमिणत्या करियरचा फारच अभिमान आहे असं जाणवत राहतं.
3 Jan 2011 - 8:06 pm | कानडाऊ योगेशु
समीक्षण वाचुन आठवले... ह्या चित्रपटाची कथा फारूख शेख - संजीवकुमार अभिनीत "लाखोंकी बात" वरुन घेतली आहे.
बाकी आपल्या उमेदीच्या काळात सचिन-महेश कधी एकमेकांच्या वाट्याला गेले नव्हते.
हीच गोष्ट मिथुन - अनिलकपूरबाबत सुध्दा लागु होते."युवराज" मध्ये पिसार्या झडलेल्या मोरासारखे दोघांचे दर्शन अगदीच दु:सह्य होते.(पूर्ण युवराजच एक भयानक नाईटमेअर होता म्हणा.) विशेष म्हणजे मिथुन सुध्दा डान्स इंडिया डान्स चा मास्टर आहे.
बाकी सचिन म्हणजे कमल हसनची एक टुकार कॉपी वाटतो.(चित्रपट निर्मितीच्या सगळ्याच अंगात उगाच लुडबुड.)
3 Jan 2011 - 8:37 pm | प्राजु
सचिन च्या सगळ्या सिनेमांमध्ये "अशी ही बनवा बनवी" हा अत्युच्च दर्जाचा चित्रपट होता. त्यानंतर त्या दर्जाचा चित्रपट कधी आलाच नाही असंच वाटतं.
3 Jan 2011 - 11:33 pm | सखी
सहमत आहे. पण सचिनने दिग्दर्शित केलेल्या चांगल्या चित्रपटात - आत्मविश्वासही उल्लेख करावा लागेल असे वाटते, नीलकांती पाटेकरने सुरेख काम केले आहे. अर्थात बनवाबनवी व आत्मविश्वासची तुलना करता येणार नाही.
5 Jan 2011 - 10:35 pm | नाना पुंजे
सचिन चे पूर्वी चे सगळे सिनेमे भारी होते. बनवाबनवी, माझा पती करोडपती, गम्मत जम्मत, भुताचा भाऊ, नवरी मिळे नवर्याला इत्यादी. पण आता चे सहन होत नाहीत.
या चित्रपटात शेवटचा अर्धा तास निर्मिती सावंत भोजपुरी मध्ये बोलते. अक्षरशः डोक्यात जाते.
मराठी चित्रपटात हिंदी चा वापर कधी संपणार देवाला माहित. आपली एक स्वतंत्र ओळख आहे असं या लोकांना कधी कळणार आहे की नाही?
सतत जुन्या हिंदी चित्रपटांचे संवाद, गाणी इत्यादी टाकून हे काय साधतात काय माहीत?